मुख्य सामग्रीवर वगळा

समर्थ बैठकीतील स्थानिक निरुपणकार | शब्दांच्या पलीकडची साधना | सद्गुरू भक्तीच्या प्रेरणादायी ३ कथा

अस्वीकरण

    या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात  आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर सदर कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे   


  “शब्दांच्या पलीकडची साधना” - समर्थ बैठकीतील स्थानिक निरुपणकार|शब्दांच्या पलीकडची साधना | सद्गुरू भक्तीच्या प्रेरणादायी ३ कथा..


शब्दांच्या पलीकडची साधना” - समर्थ बैठक प्रेरणादायीकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
“ सदगुरू विण जन्म निर्फळ ।
 सदगुरू  विण दुःख सकळ ।
 सदगुरू  विण तळमळ ।
जाणार नाहीं ॥”

🔗 बंधन विवाहाचे आणि मन कैदेतले"|जबरदस्तीचा विवाह, संमती आणि भारतीय कायदा | विचारप्रवर्तक मराठी कथा

      जबरदस्तीचा विवाह, विवाहातील संमती, कौटुंबिक दबाव, मुलींचे हक्क, भारतीय विवाह कायदा आणि सामाजिक वास्तव या विषयांवर आधारित हा लेख समाजातील एका गंभीर वास्तवाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. विवाह हा फक्त परंपरा नसून दोन मनांची स्वेच्छेने झालेली साथ असावी, हा संदेश मागील लघु कथेतून मांडण्यात आलेला आहे.

समर्थ बैठकीतील स्थानिक निरुपणकार | शब्दांच्या पलीकडची साधना | सद्गुरू भक्तीच्या प्रेरणादायी 3 कथा..

       महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत “समर्थ बैठक” ही केवळ धार्मिक सभा नसून संस्कारांची एक जिवंत शाळा मानली जाते. या परंपरेला आधुनिक काळात व्यापक रूप देण्याचे कार्य प. पू. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांनी केले. आज देशभरात तसेच परदेशातही हजारो समर्थ बैठका नियमितपणे पार पडतात. या बैठकींमध्ये “निरुपणकार” ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
    समर्थ बैठक ही केवळ धार्मिक सभा नसून व्यक्तिमत्त्व विकास, संस्कार आणि समाजसेवेची प्रेरणा देणारी आध्यात्मिक परंपरा आहे. या परंपरेत स्थानिक निरुपणकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यांच्या प्रभावी निरुपणातून सद्गुरूंचे विचार, भक्ती, सेवा आणि संस्कार सामान्य लोकांपर्यंत पोहोचतात. या लेखात समर्थ बैठकीतील स्थानिक निरुपणकारांचे कार्य, त्यांच्या साधनेचे महत्त्व आणि सद्गुरू भक्तीची प्रेरणा देणाऱ्या तीन हृदयस्पर्शी कथा जाणून घेऊया
     निरुपणकार म्हणजे केवळ व्यासपीठावर उभा राहून बोलणारी व्यक्ती नव्हे. तो समर्थ विचारांचा वाहक, संस्कारांचा संवाहक आणि समाजमनाला दिशा देणारा वैचारिक दीपस्तंभ असतो. त्याच्या शब्दांत केवळ माहिती नसते; तर अनुभव, साधना आणि श्रद्धेचे अधिष्ठान असते.
      समर्थ बैठकीत मंगलाचरण, प्रार्थना, भजन, अभंग, दासबोध किंवा मनाचे श्लोक वाचन, मुख्य निरुपण, सेवा कार्यांचे नियोजन आणि समारोपाची आरती अशा विविध गोष्टींचा समावेश असतो. पण या संपूर्ण प्रक्रियेला जिवंतपणा देणारा घटक म्हणजे निरुपण.
       अनेक वेळा एखादा साधक पहिल्यांदाच बैठकीत येतो. सुरुवातीला तो फक्त ऐकण्यासाठी बसलेला असतो. पण निरुपण जसजसे पुढे सरकते, तसतसे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागतात. काहींच्या डोळ्यांत विचार दिसू लागतो, काहींच्या मनातील संभ्रम दूर होऊ लागतो, तर काही जण स्वतःच्या जीवनाकडे नव्याने पाहू लागतात. हीच निरुपणाची खरी ताकद असते.
      समर्थ बैठकीतील निरुपणकारांची शैली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते. कठीण अध्यात्मिक विचार ते अगदी सहज भाषेत सांगतात. दैनंदिन जीवनातील प्रसंग, घरगुती उदाहरणे, व्यवहारातील अनुभव यांमधून ते अध्यात्म समजावून सांगतात. त्यामुळे निरुपण हे केवळ तत्त्वज्ञान राहत नाही ते श्रोत्यांच्या जीवनाशी जोडले जाते.
      काही निरुपणकार अत्यंत अभ्यासपूर्ण बोलतात. शास्त्र, इतिहास, संतवाङ्मय, आधुनिक समाजरचना यांचे संदर्भ देत ते विषय मांडतात. तर काही जण फार साध्या शब्दांत बोलतात पण त्यांच्या अनुभवातून आलेले शब्द थेट मनात उतरतात. समर्थ बैठकीत दोन्ही प्रकारच्या शैलींना समान महत्त्व असते.
       ग्रामीण भागातील एखादा साधा शेतकरी निरुपण करताना जेव्हा स्वतःच्या आयुष्यातील संघर्ष सांगतो, तेव्हा श्रोत्यांना त्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसते. तर शहरातील एखादा सुशिक्षित निरुपणकार आधुनिक जीवनातील ताणतणाव, स्पर्धा आणि मानसिक अस्थिरता यांचा संदर्भ देत समर्थ विचार समजावतो. दोघांची भाषा वेगळी असली तरी उद्देश एकच असतो, माणसाला विचार करायला लावणे.
     समर्थ बैठकीचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे व्यक्तीपेक्षा विचाराला महत्त्व असते. एखादा ठरलेला निरुपणकार अनुपस्थित असला तरी बैठक थांबत नाही. दुसरा जेष्ठ सेवेकरी पुढे येतो आणि ते कार्य पुढे चालू ठेवतो. कारण समर्थ परंपरेत व्यक्ती तात्पुरती असते, विचार कायमस्वरूपी असतात.
     अनेकदा बैठकीत एखादा अनुभवी ज्येष्ठ सेवेकरी अचानक उभा राहून निरुपण करतो. सुरुवातीला तो अगदी शांत आवाजात बोलायला सुरुवात करतो. पण जसजसा विषय पुढे जातो, तसतसे त्याच्या शब्दांमधून साधनेची ताकद जाणवू लागते. श्रोत्यांना तेव्हा समजते, व्यासपीठावर उभे राहण्यासाठी केवळ वक्तृत्व पुरेसे नसते, त्यामागे आयुष्यभराची साधना लागते.
      निरुपणकाराचे खासगी जीवन हे बाहेरून दिसते तितके सोपे नसते. तोसुद्धा एक सामान्य माणूसच असतो. त्यालाही संसारातील अडचणी असतात, आर्थिक ताण असतो, आरोग्याच्या समस्या असतात, कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात. पण तरीही तो व्यासपीठावर उभा राहतो तेव्हा स्वतःच्या दुःखापेक्षा समोरील साधकांच्या मानसिक उभारणीला अधिक महत्त्व देतो.
         अनेक वेळा असे घडते की निरुपण सुरू असताना निरुपणकाराच्या स्वतःच्या आयुष्यात मोठे संकट सुरू असते. पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर शांतता असते. कारण समर्थ बैठकीत निरुपण करणारा प्रत्येक सेवेकरी एक गोष्ट शिकलेला असतो.“स्वतःचे दुःख मनात ठेवायचे पण दुसऱ्याच्या मनात आशेचा दिवा लावायचा.”समर्थ बैठकीतील अनेक ज्येष्ठ निरुपणकार स्वतःच्या व्यवसायातून वेळ काढून सेवा करत असतात. कोणी शिक्षक असतो, कोणी सरकारी कर्मचारी, कोणी व्यापारी, तर कोणी शेतकरी. दिवसभर संसार आणि व्यवसाय सांभाळून ते रात्री उशिरापर्यंत अभ्यास करतात. समास समजून घेतात,उदाहरणे शोधतात, स्वतः चिंतन करतात कारण त्यांना माहिती असते. निरुपण ही केवळ बोलण्याची कला नाही, ती जबाबदारी आहे.
      दासबोधातील २०० समासांवर निरुपण करणे हे सोपे कार्य नाही. प्रत्येक समासा मागे व्यवहार, अध्यात्म, मनोविज्ञान आणि जीवनदृष्टी दडलेली असते. त्यामुळे निरुपणकाराला सतत अभ्यास करावा लागतो. अनेक जण स्वतः टिपणे तयार करतात. काही जण जुन्या निरुपणकारांचे मार्गदर्शन घेतात. तर काही जण स्वतःच्या अनुभवातून विषय अधिक जिवंत करतात.
       समर्थ बैठकीत उपस्थित राहणारे साधकही अत्यंत निष्ठेने सहभागी होतात. ग्रामीण भागातील अनेक लोक १५ ते २० किलोमीटरचा प्रवास करून बैठकीला येतात. काही जण दिवसभर कष्टाची कामे करून थेट बैठकीत येतात. रात्री उशिरा घरी पोहोचून दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर जातात. पण त्यांच्या चेहऱ्यावर थकव्या पेक्षा समाधान जास्त दिसते.
      एखाद्या मोठ्या सभागृहात बैठक सुरू असते. व्यासपीठावर निरुपणकार शांतपणे समास समजावत असतो. सभागृहात पूर्ण शांतता असते. मध्येच एखादा मनाचा श्लोक उच्चारला जातो आणि शेकडो साधक एकाच स्वरात तो म्हणतात. त्या क्षणी निर्माण होणारे वातावरण शब्दांत सांगणे कठीण असते. ती केवळ सभा राहत नाही ती सामूहिक साधनेची अनुभूती बनते.
      महिला निरुपणकारांचा ही समर्थ बैठकीत मोठा वाटा असतो. घर, संसार, मुलांची जबाबदारी सांभाळून त्या सेवा करतात. अनेक वेळा स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून त्या इतर महिलांना मानसिक आधार देतात. त्यांच्या निरुपणात आईची माया, समजूतदारपणा आणि अध्यात्मिक स्थैर्य यांचा सुंदर संगम दिसतो.
     समर्थ बैठकीतील अनेक तरुणही आज निरुपणकार म्हणून पुढे येत आहेत. आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान आणि सामाजिक बदल यांचा संदर्भ देत ते समर्थ विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत. त्यामुळे ही परंपरा केवळ जतन होत नाही, तर काळानुसार अधिक व्यापक होत आहे.
     निरुपणकार घडवणे हीसुद्धा एक मोठी प्रक्रिया असते. ज्येष्ठ निरुपणकार नव्या सेवेकऱ्यांना मार्गदर्शन करतात. सुरुवातीला एखाद्याला छोटा भाग समजावून सांगण्याची संधी दिली जाते. हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढवला जातो. चुका झाल्या तर प्रेमाने समजावले जाते. कारण समर्थ परंपरेत स्पर्धेपेक्षा संस्काराला अधिक महत्त्व दिले जाते.
     समर्थ बैठकीतील निरुपणकारांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची निरपेक्षता. त्यांना प्रसिद्धीची अपेक्षा नसते. अनेक वर्षे सेवा करूनही त्यांची नावे बाहेरच्या जगाला माहीत नसतात. पण हजारो साधकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर असतो. कारण त्यांनी लोकांना केवळ प्रवचन दिलेले नसते तर कठीण काळात मानसिक आधार दिलेला असतो.
     काही निरुपणकारांचे शब्द लोकांच्या आयुष्यात कायमचे घर करून राहतात. एखादा साधक संकटात असताना अचानक त्याला बैठकीत ऐकलेले एखादे वाक्य आठवते आणि तो पुन्हा उभा राहण्याची ताकद मिळवतो. कदाचित त्यालाच समर्थ विचारांचे सामर्थ्य म्हणत असावेत.
     समर्थ बैठकीतील निरुपणकार हा एका दिवसात तयार होत नाही. तो वर्षानुवर्षांच्या साधना, सेवा, संघर्ष आणि अनुभवांतून घडत असतो. त्याच्या प्रत्येक शब्दामागे त्याचे जगलेले आयुष्य उभे असते.म्हणूनच समर्थ बैठकीतील निरुपणकार हा केवळ वक्ता नसतो.तो श्रद्धा आणि समाज यांच्यामधला एक जिवंत दुवा असतो.
       त्यांच्या वैयक्तिक जीवनातही सद्गुरू भक्ती, साधना आणि श्रद्धेची प्रचिती अनेक प्रसंगांतून अनुभवायला मिळते. संसारातील संकटे, मानसिक संघर्ष आणि भावनिक प्रसंग यांमध्येही  सदगुरू वरील त्यांची निष्ठा अधिक दृढ होत गेलेली दिसून येते. अशाच काही अनुभूती पुढील तीन लघुकथांतून अधिक स्पष्टपणे जाणवतात.

अ) “सदगुरू..सदा सहाय्यते”


"सदगुरू सदा सहाय्यते"

       ठाणे शहरातील समर्थ बैठकीचे ज्येष्ठ निरुपणकार रामचंद्र अनेक वर्षांपासून अखंड सेवा करत होते. त्यांच्या निरुपणात ओघवती भाषा, साधेपणा आणि विचारांना स्पर्श करणारी आत्मीयता होती. ते बोलायला उभे राहिले की सभागृहातील वातावरणच बदलून जायचे. अनेक साधक तर रविवारी बैठकीला येताना एकमेकांना विचारायचे 
“आज रामचंद्रांचे निरुपण आहे ना?”
       रामचंद्र निरुपण करताना समोरील श्रोत्यांशी इतके एकरूप व्हायचे की ते केवळ व्यासपीठावर बोलत आहेत असे वाटत नसे जणू घरातील एखादा ज्येष्ठ माणूस प्रेमाने जीवन समजावून सांगत आहे, अशी भावना निर्माण व्हायची.पण त्या काळात त्यांच्या आयुष्यात एक मोठी चिंता सुरू होती. त्यांची मुलगी वृषाली डेंग्यूने गंभीर आजारी पडली होती. दोन दिवस ती सतत तापाने फणफणत होती. घरात तणावाचे वातावरण होते. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी प्लेटलेट्स खूप कमी झाल्याचे सांगितले. डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले,“आजची रात्र महत्त्वाची आहे. ताप कमी झाला नाही तर उद्या तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल.”
हे ऐकल्यावर रामचंद्र यांच्या पत्नी जानकी यांच्या डोळ्यांत पाणी आले. पण त्यांनी स्वतःला सावरले. त्या शांतपणे म्हणाल्या“तुम्ही वाडीला जा. सद्गुरूंच्या चरणी तिची चिंता ठेवा. औषधोपचार डॉक्टर करतील पण तिच्या मागे सद्गुरूंचा आशीर्वादही असू द्या.”
     रामचंद्र पूर्णपणे द्विधा मनःस्थितीत अडकले होते. एकीकडे लेकराच्या जीवाची काळजी आणि दुसरीकडे सद्गुरू सेवा. अखेर त्यांनी श्रद्धेवर विश्वास ठेवला.
शुक्रवारी रात्री ते रेवदंड्याकडे निघाले. प्रवासभर त्यांच्या मनात एकच विचार होता .“माझ्या लेकराला काही होऊ नये..” शनिवारी सकाळी सभामंडपात परमपुज्य  आप्पासाहेब धर्माधिकारी तथा आप्पास्वारींचे सगुण निरुपण सुरू झाले. सभागृहात विलक्षण शांतता होती. मनाचा श्लोक उच्चारला गेला .
“मना पावना भावना राघवाची ।
धरी अंतरी सोडि चिंता भवाची ॥”
आप्पास्वारी त्या श्लोकाचा अर्थ समजावत होते 
“संसारातील चिंता सद्गुरू चरणी अर्पण करा. तुम्ही एकटे नाही. सद्गुरू तुमच्या पाठीशी उभे असतात.”
      हे शब्द ऐकताच रामचंद्र यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. त्या क्षणी त्यांना जणू स्वतःसाठीच उत्तर मिळाल्यासारखे वाटले. त्यांनी डोळे मिटून मनोमन प्रार्थना केली.
निरुपण संपल्यानंतर त्यांनी थरथरत्या हातांनी घरी फोन लावला. फोनच्या दुसऱ्या बाजूने वृषालीचाच आनंदी आवाज आला 
“बाबा! माझा ताप उतरला..मला आता खूप बरं वाटतंय!”
क्षणभर रामचंद्र काही बोलूच शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सभामंडपातील गर्दी, आवाज, हालचाल, त्या क्षणी सगळं काही दूर गेल्यासारखं वाटत होते.
त्यांना जाणवली की औषधांपेक्षा मोठी एक अदृश्य शक्ती आपल्या लेकरामागे उभी आहे.
त्यांनी डोळे मिटले,हात जोडले आणि अंतर्मनातून एकच शब्द उमटला.
“सदगुरू.. सदा सहाय्यते.”

ब) “जेव्हा श्रद्धेला मिळाले यशाचे फळ”

“जेव्हा श्रद्धेला मिळाले यशाचे फळ”


        मध्य मुंबईतील समर्थ बैठकींमध्ये “सविता ताई” हे नाव अनेक महिला साधिकांसाठी प्रेरणेचं प्रतीक बनलं होतं. त्यांच्या निरुपणात कृत्रिम आवेश नव्हता, मोठमोठे शब्द नव्हते; पण त्यांच्या आवाजात अशी एक आत्मीयता होती की समोरील प्रत्येक महिला साधिकेला त्या आपल्याच घरातील व्यक्ती वाटायच्या.
     त्या बोलायला उभ्या राहिल्या की अनेक महिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसायचं. काही तर बैठकीनंतर खास त्यांच्या जवळ येऊन स्वतःच्या अडचणी सांगायच्या. कारण त्यांना माहिती होते सविता ताई फक्त ऐकणार नाहीत तर मनाला धीर देणारे दोन शब्द नक्की बोलतील.पण दुसऱ्यांना आधार देणाऱ्या त्या स्त्रीच्या आयुष्यातही संघर्ष कमी नव्हते.
        घरातील आर्थिक जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. यजमानांची तब्येत सतत चिंतेत टाकणारी होती. सासूबाई वारंवार आजारी पडत होत्या आणि त्यातच मुलगा ‘सूचित’च्या भविष्याची चिंता त्यांना आतून पोखरत होती.‘सूचित’ उच्चशिक्षित होता,बुद्धिमान होता,मेहनती होता पण नोकरीच्या बाबतीत नशीब त्याला साथ देत नव्हते. दिवसा साधारण नोकरी आणि रात्री उशिरापर्यंत राज्यसेवेचा अभ्यास आणि रविवारी ‘श्री बैठक’ उपस्थिती,  अशी त्याची दिनचर्या झाली होती. अनेक परीक्षा दिल्यात पण प्रत्येक वेळी यश थोडक्यात हुकायचे.मुख्य परीक्षा पास होऊन तो मुलाखती पर्यंत पोहोचला होता. पण इंटरव्ह्यू वरून परत आल्यानंतर तो खूप नाराज होता.
“आई इंटरव्ह्यू चांगला गेला नाही,” तो निराश स्वरात म्हणाला होता.
त्या रात्री सविता ताईंना झोपच लागली नाही. आई म्हणून त्यांना मुलाची वेदना जाणवत होती. पण त्यांनी त्याच्यासमोर कधीही निराशा दाखवली नाही.
त्या फक्त एवढंच म्हणाल्या 
“तू प्रयत्न सोडला नाहीस ना? मग बाकीचं सदगुरू वर सोड.”
दोन महिने गेले.
एका शुक्रवारी त्या रेवदंड्याला गेल्या. सभामंडपात परमपुज्य आप्पासाहेब धर्माधिकारी तथा आप्पास्वारींचे निरुपण सुरू होते. त्यांच्या मधुर आवाजात मनाचा श्लोक घुमला 
“धरी रे मना संगती सज्जनाची ।
जेणे वृत्ति हे पालटे दुर्जनाची ॥”
      त्या शब्दांनी सविता ताईंच्या मनात काहीतरी बदलू लागलं. चिंता हळूहळू श्रद्धेत परिवर्तित होत होती. “सूचित, हा समर्थ विचारांत वाढलेला मुलगा आहे. त्याचे कष्ट व्यर्थ जाणार नाहीत,” असा विश्वास त्यांच्या मनात दृढ होत गेला.
       निरुपण संपल्यानंतर त्यांनी मोबाईल सुरू केला. मुलाचा आणि यजमानांचा मिस्ड कॉल दिसताच त्यांच्या छातीत धडधड वाढली.असे लागोपाठ तीन चार मिस्ड कॉल ? म्हणून त्यांनी घाईघाईने सूचितला फोन लावला.
“अरे सूचित..काय झालं?”
क्षणभर शांतता होती आणि पुढच्याच क्षणी तिकडून आनंदाने थरथरणारा आवाज आला 
“आई.. मी सरकारी अधिकारी झालो ! राज्यसेवा परीक्षा पास झालो! माझी निवड झाली!”
हे ऐकताच सविता ताईंच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. कित्येक महिन्यांची चिंता, प्रार्थना, वेदना आणि आशा एका क्षणात विरघळून गेली.
त्यांनी डोळे मिटले.
सभामंडपातील  सदगुरूच्या प्रतिमेकडे पाहत त्यांनी मनोमन नमस्कार केला.
त्या क्षणी त्यांना जाणवलं 
“श्रद्धा कधीच व्यर्थ जात नाही”

क) “मरणा अंती परमेश्वर”

“मरणा अंती परमेश्वर”


         पालघरमधील ज्येष्ठ निरुपणकार नारायण गेली अनेक वर्षे समर्थ बैठकीत सेवा करत होते. त्यांच्या आवाजात विलक्षण शांतता होती. ते निरुपण करताना कधीही आक्रमक वाटत नसत; पण त्यांच्या साध्या शब्दांत इतकी जबरदस्त ताकद असायची की श्रोते शांतपणे विचारात हरवून जायचे.
     त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील 'बनपार' हे होते, गावात त्यांची वृद्ध आई राहत होती. वयाच्या नव्वदीतही तिची स्मरणशक्ती उत्तम होती आणि मुलाबद्दलचा मायेचा ओलावा तसाच जपला गेला होता. आपल्या मुलाच्या सद्गुरुभक्तीचा तिला मनस्वी अभिमान वाटत असे.
      नारायण गावी गेले की ते रोज सकाळी आपल्या आईसमोरही प्रेमाने निरुपण करायचे. त्यांच्या ओघवत्या आणि भावपूर्ण निरुपणातून सद्गुरूंचे विचार ऐकताना तिचे मन समाधानाने भरून जायचे. मुलाच्या मुखातून उमटणारे ते अध्यात्मिक विचार ऐकून तिला अंतःकरणी आनंद आणि धन्यता वाटायची आणि मग नारायण रोज दोन तास तिच्यासमोर दासबोध, मनाचे श्लोक आणि समर्थ विचार समजावून सांगत बसायचे. त्या वेळी तिच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसायचे, ते पाहून त्यांनाही अंतर्मनातून शांती मिळायची.

एकदा मात्र आई अचानक गंभीर झाली.

ती शांत आवाजात म्हणाली,

     “नारायणा ! हे बघ, जर मी गेल्याची किंवा माझी प्रकृती अत्यवस्थ असल्याची बातमी तुला कळली, आणि त्या वेळी तू  सदगुरू सेवेत असशील, तर ती सेवा कधीच अर्धवट सोडून येऊ नकोस. सदगुरू कार्यालाच प्रथम स्थान दे. माझ्याविषयी चिंता करू नकोस कारण आयुष्याचा शेवट हा अटळच असतो पण सद्गुरू सेवा खंडित होता कामा नये.”
हे ऐकताच नारायण हादरले.

“आई, असं का बोलतेस?” त्यांनी हळू आवाजात विचारले.

ती फक्त हलकेसं हसली.

“ सदगुरू सेवा मोठी असते रे  माझ्यासाठी ती कधीच अर्धवट सोडू नकोस.”

काही दिवसांनी रेवदंड्यात असताना पहाटे तीनच्या सुमारास त्यांना धाकट्या भावाचा फोन आला.

“दादा..आईची प्रकृती खूप गंभीर आहे. तू लगेच निघ.”

फोन ठेवल्यानंतर नारायण पूर्ण रात्र जागेच होते. मन आईकडे धावत होते. पण त्याच वेळी तिचे शब्द सतत कानात घुमत होते.

पहाट होताच त्यांनी शांतपणे नामस्मरण सुरू केले.

दुसऱ्या दिवशी परमपुज्य  आप्पासाहेब धर्माधिकारी तथा आप्पास्वारींच्या सगुण निरुपणात मनाचा श्लोक उच्चारला गेला 

“मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।

अकस्मात तोही पुढे जात आहे ॥”

त्या क्षणी नारायण पूर्ण अंतर्मुख झाले.

त्यांच्या मनात अचानक एक विलक्षण शांतता उतरली.

“मी आईची शेवटची इच्छा पूर्ण केली..” हा विचार मनात येताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

सभागृहातील गर्दी हळूहळू बाहेर पडत होती.

पण नारायण मात्र जागेवरच शांत बसून होते.

त्या अश्रूंमध्ये दुःख होतं पण त्याचबरोबर एक समाधानही होतं.

कारण त्या क्षणी त्यांना जीवन, मृत्यू, मोह आणि सद्गुरू सेवेचा खरा अर्थ उमगला होता.

  ॥ श्रीराम समर्थ ॥

“शब्द हे निमित्त… विचार हा प्रवास आणि साधना हेच अंतिम ध्येय.”
      समर्थ विचार,  सदगुरूभक्ती आणि निरपेक्ष सेवेच्या माध्यमातून समाजमनाला दिशा देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात निरुपणकारांना विनम्र अभिवादन.
     समर्थ रामदास यांच्या विचारांचा प्रकाश आणि सदगुरूच्या कृपेचा आधार प्रत्येक साधकाच्या जीवनात आशा, श्रद्धा आणि मानसिक स्थैर्य निर्माण करो हीच प्रार्थना.

 🔗 'मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश' -

        'समर्थ रामदास स्वामी' यांच्या मनाचे श्लोकांमधील जीवन बदलणारे उपदेश आणि ३ प्रेरणादायी कथा जाणून घ्या. मन शांत, यशस्वी आणि सकारात्मक ठेवण्यासाठी हे विचार आणि लघु कथा नक्की वाचा.👉

  🔗 बच्चा ! .. मधुबाला मिली क्या ?”||वेताळ, स्मशान आणि भन्नाट भय-विनोदी मराठी कथा..

    "अमावस्येच्या रात्री वेताळाच्या पालखीच्या शोधात गेलेल्या आमच्या टोळीची भन्नाट भय-विनोदी कथा! स्मशान, वेताळ, मधुबाला आणि खिचडी पार्टी यांचा जबरदस्त कॉमेडी संगम.”पुढील लेखात 👉


✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.


तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो






📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा !

टिप्पण्या

  1. जीवनातील तणाव कमी करून सकारात्मक दृष्टिकोनाने पुढे जाण्यासाठी हा संदेश खूप उपयुक्त वाटला. वाचताना मन प्रसन्न आणि प्रेरित झाले

    उत्तर द्याहटवा
  2. मनाचे श्लोकांमधील गहन विचार, प्रभावी निरूपण आणि प्रेरणादायी कथा यांचा अप्रतिम संगम!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा