मुख्य सामग्रीवर वगळा

'अल्लड प्रेम ' | बालपणीच्या निरागस प्रेमाची हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा..


                अल्लड प्रेम | बालपणीच्या निरागस प्रेमाची हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा

'अल्लड प्रेम ' | बालपणीच्या निरागस प्रेमाची हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
  ना तेव्हा "प्रेम, प्रीती हे शब्द कळले  
ना त्या शब्दांचे अर्थ तेव्हा समजले |
तुझ्या एका कटाक्षा साठी
मन मात्र कायम वाट पाहून राहिले |
बालपण गेले, तारुण्य आले
त्या आठवणींनी  मनात घर मात्र करून ठेवले |
      

🔗  “हळद रुसली” गिरगावातील जुन्या इमारतीतील पिशाच्चाची थरारक मराठी भयकथा  

     मागील लघु कथा ही एक भयकथा आहे.ही गिरगावातील एका जुन्या इमारतीत घडलेली अंगावर काटा आणणारी मराठी भयकथा आहे. एका अविवाहित तरुणाला पिशाच्च शक्तींच्या जाळ्यात अडकवून त्याचे भुताशी लग्न लावण्याचा प्रयत्न आणि ‘सदगुरू दत्त’ नामामुळे झालेली त्याची थरारक सुटका! ही कथा वाचताना प्रत्येक क्षणी भीतीची जाणीव होईल.

     'अल्लड प्रेम '| बालपणीच्या निरागस प्रेमाची हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा

        पुढील  लघु कथा ही एक सुंदर मराठी प्रेमकथा आहे. जी बालपणातील निरागस, नादान आणि मनात कायम राहणाऱ्या प्रेमाच्या आठवणींवर आधारित आहे. ' निमिष ' आणि 'रेवती ' यांच्या शाळेतील अल्लड प्रेमाची ही गोष्ट, आपल्याला त्या निष्पाप दिवसांची आठवण करून देते. वेळ बदलते, आयुष्य पुढे पुढे जात राहते, पण बालपणातील त्या कोवळ्या भावना कायम मनात जपलेल्या राहतात.
     बालपणीचे निरागस प्रेम आयुष्यभर मनात जपलेली एक सुंदर आठवण बनून राहते. ही हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा निमिष आणि रेवती यांच्या शाळेतील निष्पाप मैत्री, कोवळ्या भावना आणि न बोलता व्यक्त झालेल्या प्रेमाचा भावनिक प्रवास उलगडते. काळ पुढे सरकतो, आयुष्य बदलते; पण बालपणीच्या त्या अल्लड आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम जिवंत राहतात. प्रेम, निरागसता आणि आठवणींचा हा प्रवास प्रत्येक वाचकाच्या मनाला नक्कीच स्पर्श करून जाईल.
          वरील ‘चारोळी ‘ बालपणातील अल्लड, बालिश, नादान स्थिती बाबत खूप काही सांगून जाते.बालपणातले प्रेम हे शब्दांत मांडणे कठीण असते, कारण ते खूप साधे आणि निरागस असते. त्या वयात “प्रेम” म्हणजे काय हेच मुळी समजत नसते, पण त्यावेळी कोणीतरी   खास वाटायला लागते.बालपण म्हणजे निरागसतेचा, अल्लड आणि निष्पाप भावनांचा काळ. या काळात निर्माण होणारे “प्रेम” हे खरे तर प्रेमापेक्षा एक गोड आकर्षण असते. त्यात कोणत्याच अपेक्षा नसतात, दिखावा नसतो,त्यात फक्त एक साधी, स्वच्छ भावना असते. आपण काय करत आहोत हे त्या बालमनाला सुद्धा माहीत नसते. मोठे झाल्यावर आपण प्रेमाचे अनेक अर्थ समजून घेतो, पण बालपणातील त्या कोवळ्या भावना मात्र कायमच मनात जपलेल्या राहतात. त्या आठवणी त्या माणसांच्या जीवनात कायमच एक कोपरा जपून ठेवतात.
       हे ‘अल्लड प्रेम ‘ अशाच दोन जीवांचे होते.  माझा तो मित्र आणि मी एकाच शाळेत आणि एकाच वर्गात होतो. आयुष्याच्या धावपळीत पुढे पुढे आमच्या भेटीगाठी कमी झाल्या होत्या. अधूनमधून कधी गिरगावात गेलो, तर मी त्याची आवर्जून, धावती भेट घ्यायचो. दोन शब्द बोलायचे, जुनी आठवण काढायचो आणि पुन्हा आल्या वाटेने निघून जायचो.पण तो नेहमी म्हणायचा,“अरे, कधीतरी निवांत भेट ना मित्रा !” त्याच्या त्या नित्य आग्रहाचा मान ठेवून एकदा मी त्याला  निवांत भेटलो. त्याच्याशी सवडीने आणि फुरसतीने गप्पा मारत असताना, मी सहजच त्याला त्याची मैत्रीण ' रेवू ' बद्दल विचारले “ तुझी ती मैत्रीण सध्या काय करते ? यावर माझा मित्र ‘निमिष ' मला म्हणाला की आपल्या शाळेच्या रीयुनियन मध्ये या बाबत  सुमीतकडे मी ‘रेवू ‘ बद्दल चौकशी  केली असता, त्याने मला शिवी हासडली. आणि पुढे म्हणाला तुमचे प्रेम एवढे कमकुवत असते का रे ?” त्यावर ‘निमिष ‘ काही क्षण गप्प राहिला,मग थोड्या गंभीर आवाजात म्हणाला,“ मित्रा,तुला काय सांगणार ? आमच्या प्रेमाचे, आमचे प्रेम तसे नव्हतेच,ते अल्लड होते, नादान होते अपेक्षारहित होते.” त्यानंतर अजून पुढे ‘निमिष ‘ म्हणाला की, "आम्ही तिला शोधायला तिच्या गावी रेवदंड्याला सुद्धा गेलो होतो. " ‘ओमकार’ सुद्धा होता माझ्यासोबत. ‘निमिष’ पुढे म्हणाला “होय, रे बालपणीचे  प्रेम अल्लड आणि नादान असते. ते पुढे नेण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी ते पुढे जात नाही.  आठवणीच्या जिवंत कोपऱ्यात फक्त ते निपचित पडून असते,  नादान, बालिश आणि अल्लड प्रेम हे खूप वेळ वाट पाहणारे नसते, चंचल आणि चळवळे असते.जर नियतीच्या मनात असते तर तिचा योग्य वेळेत माझ्याशी संपर्क झाला असता." सुमित पुढे म्हणाला  ‘’ अरे ! ‘निमिष’ तुमच्या त्या प्रेमाचा गवगवा झाल्याने तिच्या मामाने तिच्या आईवडिलांकडे तिला ' रेवदंड्याला ' परत पाठवले. मग पुढे तिचे काय झाले ते मला सुद्धा माहीत नाही,त्यानंतर काही वर्षांनी मामाने सुद्धा चाळीतले घर सोडले आणि तो अंधेरीला राहायला गेला. त्यामुळे आता तर मला तिच्या बाबत काहीच म्हणजे काहीच कळण्यासारखे नव्हते.” पुढे 'निमिष ' ने  त्या विषयाला पूर्ण विराम दिला. मी सुद्धा तो विषय तिथेच सोडून दिला.त्याला त्या बाबत जास्त खोदून विचारले नाही.
       गिरगावातून घरी आलो तेव्हा निमिषने सांगितलेली सगळी व्यथा डोक्यात फिरत होती. घरी पोहोचताच बायकोने माझ्याकडे पाहिले आणि लगेच ओळखले,“काय रे, आज काहीतरी वेगळाच दिसतोस, काय झाले ?”मी तिला सगळे  सांगायला सुरुवात केली,निमिषची भेट, त्याच्या आठवणी, आणि ती रेवतीची गोष्ट. सगळं ऐकून ती थोडी उत्सुक झाली. मला सुद्धा तिला हे सर्व सांगण्या शिवाय रहावले नाही. खरे तर ती कथा मी मनातच ठेवणार होतो. मी बायकोला त्या  'अल्लड प्रेमाची ' कथा सांगायला सुरुवात केली, “निमिष आणि मी आठवीत एकाच वर्गात होतो. शाळेचे आमचे सत्र दुपारचे होते. प्राथमिक शाळेचे वर्ग, बालवर्ग आणि उच्च माध्यमिकचे वर्ग दुपारी भरायचे. शाळा संध्याकाळी सुटायची. शाळेत जाताना आम्ही दोघे पुढे मागे असू परंतु शाळेतून  घरी येताना मात्र आम्ही एकत्र असायचो. शाळेच्या जड बॅगा  खांद्याला लटकावून आम्ही रमत गंमत, गप्पा गोष्टी करत घरी जायचे. शाळेच्या गेट मधून बाहेर पडताना रांग लावून  बाहेर पडत होतो. कारण दुसऱ्या बाजूंनी प्राथमिक आणि बालवाडीच्या विद्यार्थ्यांना घ्यायला त्यांचे पालक आलेले असायचे.
       गेटच्या बाहेर आलेल्या अशाच पालकांमध्ये एक मुलगी तिच्या मामे भावाला घ्यायला दररोज यायची ती सुद्धा जवळपास आमच्याच वयाची किंवा थोडी फार लहान सुद्धा असू शकेल.शाळेतून बाहेर पडताना, 'निमिष 'पुढे आणि मी मागे  असायचो. गेट बाहेर पालकांची नेहमीप्रमाणे गर्दी असायची. आणि त्या गर्दीतच ती मुलगी रोज दिसायची. ती गर्दीत उभी राहून मामे भावाची वाट पहायची सोडून, निमिषची वाट  पाहायची आणि तो दिसला की त्याच्या कडे पाहून हलकेसे स्मित करायची.सुरुवातीला "निमिष " थोडा गोंधळलेला असायचा. ते स्मित कुणाला आहे ? मला की ओमकार ? हा प्रश्न त्याच्या मनात उभा रहायचा. एक दिवस तो मला हळूच म्हणाला,“अरे, ती माझ्याकडे बघतेय की तुझ्याकडे ? ”मी तिच्याकडे एक तिरपी नजर टाकली आणि मग त्याच्याकडे पाहून हसत म्हणालो,“अरे बाबा, ती माझ्याकडे नाही रे, ती सरळ तुझ्याकडेच बघतेय!” मग सुरू झाली निमिषची तिच्या बरोबरची  आखो देखी. त्या  दोन तीन मिनिटांमध्ये त्यांची धावती परंतु आश्वासक नजरभेट व्हायची. सुरुवातीला फक्त तिचे स्मित,मग नंतर नंतर निमिषचे हलकेसे स्मित,अशा प्रकारे ते स्मितला,  स्मितने  उत्तर द्यायला लागले. हळूहळू त्या दोन-तीन मिनिटांच्या नजर भेटीत एक वेगळीच ' प्रेम दुनिया ' तयार झाली. पुढे पुढे  त्या दोन तीन मिनिटांमध्ये त्यांची ‘नेत्रपल्लवी’सुरू झाली. खूप दिवस असेच सुरू होते. 'निमिष 'आणि मी गेटवर आलो की 'निमिष 'चे पाय रांगेत घुटमळायचे,त्या मुळे मागच्या मुलांची धक्का बुक्की व्हायला लागायची.ती धक्काबुक्की  मी मागे  थोपवून धरत होतो. आम्ही एकदा रांगेतून बाहेर पडलो की मागेपुढे न पाहता सरळ वाटेला लागायचो. थांबून तिच्या मागेमागे तिची पाठ कधी काढली नाही. की ती कोण आहे ? ती कुठे राहते ? कोणत्या रस्त्याने जाते ? कोणत्या शाळेत जाते ? थोडक्यात, तिची ओळख करून घ्यायची  'निमिष 'ला  गरज पडली नाही आणि  मी सुद्धा त्याला तसे करायला कधी भरीस पाडले नाही.
      एकदा आमच्या वर्गातील मित्र 'सुमित ' आम्हाला म्हणाला "आज तुम्ही दोघे माझ्या घरी या तुम्ही दोघे चांगले टेबल टेनिस खेळता. आमच्या चाळीत टेबल टेनिसचे मोठे टेबल आहे. आपण खेळूयात",आम्ही एकमेकांकडे पाहून म्हटले “ ठीक आहे’.शनिवारी अर्धा दिवस शाळा सुटली की जाऊयात. शनिवारी  बालवाडीला सुट्टी असल्याने शाळेपुढे पालकांची गर्दी नव्हती. सुमित,निमिष आणि मी सुमितच्या चाळीत पोहचलो. आमची दप्तरे ठेवून ,सुमितने आणलेल्या  टेबल टेनिस बॅट्स  आम्ही निरखून पहिल्या नंतर खेळायला सुरुवात केली असता. कोणीतरी एका खोलीचे दार किलकिले उघडून आमच्याकडे पाहून, कोण खेळतेय ? हे निरखून पहात होते, पण ते कोण असावे ? हे नीट कळत नव्हते. काहीवेळाने ते किलकिले उघडे असणारे दार थोडे अर्धवट उघडले गेले. तेव्हा आम्हा दोघांना कळले की कोणी तरी मुलगी आहे. परंतु  ती अजून  स्पष्टपणे पुढे येत नव्हती.  काही वेळ झाल्यावर तो दरवाजा पूर्ण उघडून ती बाहेर आली म्हटल्यावर 'निमिष' एकदम चमकला.आश्चर्यचकित होऊन,  डोळ्यांनेच त्याने तिला विचारले तू इथे कुठे ? असे विचारल्यावर तिने सुद्धा डोळ्यांनीच आणि सोबत हाताने खुणावले मी इथेच राहते.  सुमितने, निमिष आणि रेवतीची सुरू असलेली ती ‘नेत्रपल्लवी’ पाहिली होती. निमिषचा तो स्मार्ट खेळ पाहून रेवती अजून त्याच्यावर लट्टू झाली. त्याच्या प्रत्येक शॉर्टला हळूच टाळ्या वाजवत होती. आमचे  खेळून झाले संध्याकाळचे सहा वाजले होते. चाळीत दुपारी वामकुशी घेणारे सुमितचे शेजारी तसेच रेवतीची आजी,मामी सुद्धा  हळूहळू  घराबाहेर यायला लागले होते. त्याबरोबर आम्ही आमचा खेळ आटोपता घेतला आणि जायला निघालो. निमिषणे वरती पहिल्या मजल्यावर पाहिले तर 'रेवती ' हसून 'निमिष 'ला हात हलवित 'बाय बाय ' करत होती. निमिषची छाती एकदम ५६ इंच चौडी झाली होती.निमिष एकदम खुश होता. उड्या मारत घरी गेला.
      दुसऱ्या दिवशी 'सुमित ' शाळेत आला आणि निमिषला प्रेमाने शिव्या हासडायला लागला. “काय रे तुम्ही दोघे! प्रेम प्रकरण करता आणि जवळच्या मित्राला सुद्धा सांगत  नाही ? आणि ते सुद्धा माझ्या चाळीतल्या मुलीशी ! जरा तरी लाज वाटायला पाहिजे होती तुम्हाला !” निमिष थोडा गोंधळला, पण लगेच म्हणाला,“अरे खरेच सांगतो, आम्हाला काहीच माहीत नव्हते की ती कुठे राहते ते आणि या मध्ये ‘ओमकारला’ कृपया घेऊ नकोस, त्याचा यात काहीही संबंध नाही !” मी ही मध्ये पडलो आणि म्हणालो की ,“हो रे सुमित ' तिचे नाव काय, ती  कुठे राहते ? हे आम्हाला सुद्धा काहीच माहीत नव्हते. रोज शाळेबाहेर दिसायची ती एवढेच ” सुमित थोडा शांत झाला. निमिष पुढे म्हणाला,“नशिबानेच काल तुझ्या चाळीत तिची भेट झाली. नाहीतर अजूनही  तिच्या बद्दल आम्हाला काहीच कळले नसते.” मी हसत म्हणालो, “खरे सांगायचे तर आम्ही कधीच  तिचा माग काढला नाही.ती कुठे जाते, कुठे राहते ? हे जाणून घ्यायची गरजच आम्हाला वाटली नाही. नंतर 'सुमित 'ने 'निमिष 'ला तिची सर्व माहिती दिली. ती मामाकडे राहते आणि तिचा मामा पोलिसमध्ये आहे. मामा,पोलिस मध्ये  आहे म्हटल्यावर 'निमिषची ' कढी जरा पातळ झाली होती. पण नंतर स्वतःला सावरून तो म्हणाला “प्यार किया तो डरना क्या ? “ हे त्या आठवीच्या मुलाला कळत होते. नंतर  आम्ही दोघे  असेच दर शनिवारी टेबल टेनिस खेळायला 'सुमित 'च्या घरी जायला लागलो. 'निमिष - रेवती 'चे  'अल्लड प्रेम 'अजून  फुलायला लागले.
      'रेवती ' गिरगावातील एका मुलींच्या  शाळेत जात होती. शाळा सकाळी  10 ते 5 होती नंतर ती मामेभावाला आणायला आमच्या शाळेत यायची. दोघांची ओळख पुढे गेल्यावर ते आता मनमोकळेपणाने  बोलायला लागले होते. 'निमिष 'आता 'रेवती 'आणि तिच्या मामेभावा सोबत जायला लागला होता. मी त्यांच्याबरोबर जायचे सोडून दिले. मी आता एकटाच घरी जायला लागलो. 'निमिष 'च्या घरी त्याच्या आईला त्याचे कपडे धुवायला टाकताना त्याच्या पँटच्या खिशात रेवतीचे प्रेमपत्र मिळाले, गुलाबी कागदावर मी तुझीच,तू माझाच अशा प्रेमाच्या शब्दांची त्यात उधळण होती. त्यावर सुवासिक अत्तर लावले होते.पत्रावरून हे प्रकरण खूप पुढे गेल्याचे निमिषच्या आईच्या लक्षात आले होते. परंतु त्याच्या आईने फुरसतीने निमिषला समजावण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी लहान वाटणाऱ्या रेवतीच्या  मामेभावाने त्याच्या वडीलांना म्हणजे  रेवतीच्या मामाला सर्व काही सांगितले की 'निमिष 'आमच्या सोबत रोज असतो. मामाने त्या दोघांना फिरताना रंगेहात पकडले. सातवी - आठवीतली तुम्ही मुले,प्रेम करायचे हे काय तुमचे वय आहे का ? असे म्हणून मामाने दोघांना दमात घेतले. त्याने ही सर्व गोष्ट त्याच्या बहिणीला म्हणजे रेवतीच्या आईला फोन करून सांगितली. मामाने भाचीला 'रेवदंड्याला ' तिच्या आई-बाबा कडे गावी परत पाठवले. 'निमिष 'आणि 'रेवती '  या दोघां मध्ये विरह निर्माण झाला.
      आम्ही दोघे नववीत गेलो, 'निमिष ' एकसारखा 'सुमित ' कडे 'रेवती 'ची माहिती काढायचा प्रयत्न करत असायचा पण त्यालासुद्धा तिची  माहिती नसल्यामुळे तो सरळ माहित नाही म्हणायचा. 'निमिष 'आता एकटा पडला होता, त्या मुळे आम्ही परत शाळेतून सुटल्यावर एकत्र जायला लागलो.  पहिल्यासारखा 'निमिष 'आता राहिलेला नव्हता, त्याच्यात पूर्वीसारखा उत्साह राहिलेला नव्हता. चित्त कुठे तरी हरवल्या सारखा तो गुमसुम वागायचा,
         दहावीची परीक्षा झाल्यावर  'निमिषला 'बरे वाटावे म्हणून त्याच्या सोबत एकदा मी “रेवदंड्याला’ जायचे ठरवले. 'अलिबाग ' पिकनिक पॉईंट असल्याने आम्ही घरी सांगितले की ‘अलिबागला’ पिकनिकला चाललो आहोत आणि त्या नावाखाली आम्ही 'रेवदंडा ' संपूर्ण फिरून आलो परंतु तिचा ठाव ठिकाणा काही लागला नाही. आम्ही खाली हाताने हात हलवत परत आलो . दहावीची परीक्षा पास झाल्यावर आम्हाला वेगवेगळ्या कॉलेज मध्ये  प्रवेश मिळाले. 'निमिष 'ची संगत सुटली. अशीच काही वर्षे गेलीत 'रेवती 'चा मामा गिरगाव सोडून अंधेरीला राहायला गेला होता.
      'रेवती 'ग्रॅज्युएशन नंतर परत मुंबईला मामा कडे अंधेरीला राहायला आली होती.ती आता 'निमिष 'ला पूर्ण विसरली होती आणि 'निमिष 'सुद्धा. 'निमिष 'MBA करुन एका खासगी कंपनीत मॅनेजर पदावर काम करत होता,त्याचे सुद्धा लग्न झाले होते. 'रेवती 'मुंबईला येऊन एका 'कानडी ' मुलाच्या प्रेमात पडली, तो मोटार मेकॅनिक होता. त्या प्रेमाला परत मामा आणि कुटुंबीयांचा सक्त विरोध झाला म्हणून तिने त्याच्या बरोबर पळून जाऊन लग्न केले.
       'निमिष ' आता नुकताच 'गिरगाव 'सोडून तो ' विलेपार्ल्यात '  रहायला आला होता. त्यांच्या मुलीच्या शाळा प्रवेशाच्या वेळी त्याला 'रेवती 'आणि तिचा मुलगा दिसला. खूप वर्षांनी पाहत असून सुद्धा दोघांनी एकमेकांना दुरूनच ओळखले, पूर्वीची ओळख दोघांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होती,पण त्या डोळ्यात आता पहिल्यासारखी प्रेमाची चमक नव्हती, ती ओढही हरवलेली होती. दोघेही एकमेकांकडे फक्त पाहत होते. पण त्या नजरेत एक वेगळीच शांतता होती. थोडीशी दुरावलेली,नाराज. लहानपणी एकमेकांशी बोलण्यासाठी आसुसलेले ते दोघे आता मूकपणे एकमेकांकडे पाहत होते पण कुणीच बोलण्याचा पहिला प्रयत्न करत नव्हते.  दोघेही एकमेकांवर नाराज होते.कारण  काळाच्या ओघात त्यांनी एकमेकांशी ओळख टिकवली नव्हती .कदाचित नियतीने किंवा परिस्थितीने त्यांना तसे करू दिले नसावे. आता आपण स्वतःचे नसून दुसऱ्या कुणाचे तरी आहोत, ही प्रामाणिक भावना त्यांच्या मनाला कुठेतरी स्वतःला आवरत होती. दोघांचे एकमेकांकडे अनेकवेळा दृष्टीक्षेप झालेत.  
       ' निमिष 'ने मात्र त्या भेटीनंतर परत त्या शाळेत जाणे टाळले कारण तो आपल्या आयुष्यात सुखी, समाधानी आणि शांतपणे स्थिरावला होता. एक मात्र त्या एका भेटीने त्याचे मन  हलके झाले होते.कारण त्या भेटीने त्याच्या मनातली एक जुनी ओढ केव्हाच निवळून गेली आहे याची त्याला स्पष्ट जाणीव झाली.
त्या रात्री त्याला जाणवले, की
“सगळ्याच गोष्टी या मिळवण्यासाठी नसतात तर
काही गोष्टी सोडून दिल्यावरच, त्याहून सुंदर काही तरी मिळते”
 ही लघुकथा आहे,जी बालपणातील निरागस, नादान आणि मनात कायम राहणाऱ्या प्रेमाच्या आठवणींवर आधारित होती.
                                                                   समाप्त🖋️📖📚

  🔗  'माझे वाचनालय|मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, गिरगाव शाखेच्या अविस्मरणीय आठवणी    

   पुढील लघु कथा ही 'मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय', गिरगाव शाखेतील बालपण आणि तारुण्यातील आठवणी, वाचन संस्कृती, आणि एका मित्राच्या अपघातातून मिळालेली जीवनाची शिकवण यांवर आधारित भावनिक लेख..👉

 
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा

पुढील भागासाठी ब्लॉगला Follow करा.आणि आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.

sjomkar.blogspost.com ब्लॉगला Follow करा.

तुमचे मत नक्की, अभिप्राय नक्की कळवा


SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी © All Rights Reserved


🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com

(ओमकार शिवलकर )


                                                SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो



📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...