ध्यान हटी, दुर्घटना घटी !| वाहतूक सुरक्षेचे नियम आणि रस्ता सुरक्षिततेचा महत्त्वपूर्ण संदेश
🚦 वाहतूक सुरक्षा संदेश 🚦
वाहतूक सुरक्षा ही एक जबाबदारी,
नियमांचे पालन हीच खरी खबरदारी ।
अती आत्मविश्वास घरी ठेवा,
शांत डोक्याने वाहन चालवा ।
नको धांदली, नको अती घाई,
देहाला नका पाडू धाराशाही ।
वाहतूक नियमांचे करा पालन,
सोबतच्या जीवांचे करा रक्षण ।
अती आत्मविश्वास घरी ठेवा,
शांत डोक्याने वाहन चालवा ।
नको धांदली, नको अती घाई,
देहाला नका पाडू धाराशाही ।
वाहतूक नियमांचे करा पालन,
सोबतच्या जीवांचे करा रक्षण ।
🔗 यथार्थ गिरगाव | मुंबईच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि परंपरेचा जिवंत वारसा
गिरगाव 'बद्दल अनेकांनी लिहिलेले असेल, परंतु ' यथार्थ गिरगाव ' म्हणजे 'जसे आहे तसे' किंवा वास्तव स्वरूपात कसे आहे ? त्याबाबत मी कमीतकमी शब्दात जास्तीत जास्त गिरगाव बद्दल लिहायचा प्रयत्न केलेला आहे. खरे तर गिरगाव हा विषय वाचण्यापेक्षा अनुभवून घेण्यासाठी जास्त रंजक आहे.त्याबाबत तुम्ही मागच्या कथेत जाणून घेतले असेलच.
ध्यान हटी दुर्घटना घटी! | वाहतूक सुरक्षेचे नियम आणि रस्ता सुरक्षिततेचा महत्त्वपूर्ण संदेश
रस्त्यावरचा एक क्षणाचा निष्काळजीपणा आयुष्यभराची वेदना देऊ शकतो. 'ध्यान हटी दुर्घटना घटी!' हा केवळ इशारा नसून प्रत्येक वाहनचालक आणि पादचाऱ्यासाठी जीवन वाचवणारा संदेश आहे. या लेखात वाहतूक सुरक्षेचे नियम, रस्ता सुरक्षिततेचे महत्त्व, निष्काळजीपणामुळे होणारे अपघात आणि त्यातून घ्यायची शिकवण यांचा वास्तववादी वेध घेतला आहे. सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येकाने पाळावयाच्या सवयी आणि जागरूकतेचा हा प्रेरणादायी मराठी लेख अवश्य वाचा
आता या लेखात पालघर जिल्ह्यातील सफाळे घाटातील एका जीवघेण्या थरारक घटनेची जशीच्या तशी कथा.जिथे एका क्षणाच्या चुकीने आयुष्याचा तोलच जाऊ शकला असता पण प्रसंगावधान आणि ईश्वरी कृपेने मृत्यूच्या दारातून परत येण्याचा हा अनुभव अंगावर काटा आणणारा आहे.रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक विभाग ध्यान हटी ,दुर्घटना घटी ! या व अशा पाट्या रस्त्याच्या कडेला, जिकडे वाहन चालकाचे सहज लक्ष जाईल आणि जो अपघात प्रवण भाग आहे, अशा ठिकाणी लावत असते.
याचा सरळ अर्थ असा आहे की वाहन चालकांनी लक्षपूर्वक वाहन चालवावे. स्पीड लिमिट किती असायला हवी, या व अशा अनेक सूचना आणि सावधानी दर्शविणारे फलक रस्त्याच्या कडेला दर्शनी जागेत लावले जातात. प्रत्येक फलकाचे एक विशेष महत्व आहे. वाहन चालकाने ते नक्कीच विचारात घ्यायला हवे,नाहीतर अपघात हा ठरलेलाच आहे.
अनवधानाने सुद्धा अशी चूक होऊ देवू नका. जरी एकदा अशी चूक झाली तरी ती वारंवार होऊ द्यायची नाही, ही वाहनचालकाची जबाबदारी आहे. अशा बेजबाबदार चुकांमुळेच तर गंभीर अपघात घडत असतात. सन २०१२ चे ते वर्ष असावे, मी नवीनच चारचाकी वाहन घेतले होते. नवीन गाडी घेण्यापूर्वी, सन २००७ पासून माझ्याकडे पक्के लायसन्स होते. स्वतःची गाडी आल्यावरच गाडी चालविण्याचा परिपूर्ण सराव करावा असे माझ्या मनात होते. नवीन गाडी आल्यावर मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेहुणा आणि भाच्यासोबत बऱ्यापैकी सराव केला होता.
त्यावेळी मी गोरेगाव मध्ये राहत असल्याने आरे डेअरी आमच्या जवळच होती. आरेच्या जंगलातील उंच,सखल रस्त्यावर गाडी चालविण्याचा माझा सराव पूर्ण झाला होता. त्यामुळे मी एकट्याने गाडी कुठेही चालवू शकतो,हा माझा आत्मविश्वास खूप वाढला होता. अशातच एके दिवशी ' साडू ' सोबत केळवा, पालघर येथे महत्त्वाचे कामानिमित अचानक जायचे ठरले.
मी प्रथमच ड्रायव्हरच्या भूमिकेत मुंबई - अहमदाबाद हायवे वरून आणि मुंबई बाहेर सफाळयाच्या घाटातून प्रवास करणार होतो. पक्के लायसन्स घेते वेळी विविध सिम्बॉल्सचा अभ्यास तोंडपाठ होता. कोणत्या ठिकाणी कोणता सिम्बॉल लावलेला असतो हे पूर्ण माहीत होते. मात्र पक्के लायसन्स मिळवण्यापासून ते नवीन गाडी घेईपर्यंत मध्ये ५ वर्षे गेल्याने, त्या मधल्या कालावधीत सिम्बॉल्सचा अभ्यास आणि जाण कमी झाली होती.
वाहतूक विभागाचे फलक पाहून गाडी चालवायची असते, ही महत्त्वाची बाबही त्या काळात माझ्या कडून दुर्लक्षित राहिली होती. गाडीची नवीन नवलाई आणि ती शिकण्याचे टेन्शन यामध्ये तीच महत्वाची बाब नकळत मागे पडली होती.अनुभव हा माणसाच्या जीवनातील उत्तम गुरु आहे. अनुभव हा माणसाला इतक्या काही गोष्टी शिकवत असतो की माणूस त्या गोष्टी मरेपर्यंत कधीच विसरणार नाही, असे तो अनुभव देऊन जातो.
तसे पहायला गेले तर ड्रायव्हर म्हणून लांब पल्ल्यावर गाडी चालविण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता. सोबतच्या 'साडू'ना ड्रायव्हिंग येत नव्हती. खरे तर , ड्रायव्हर नवखा असतो तेव्हा ड्रायव्हिंगची उत्तम माहित असलेली जाणकार व्यक्ती बाजूच्या जॉकी सीट वर असावी लागते. वाहतूक विभागाच्या नियमानुसार शिकाऊ लायसन्सधारक ड्रायव्हर साठी ड्रायव्हिंगचे पक्के लायसन्स असलेला जाणकार व्यक्ती बाजूला असणे अत्यंत गरजेचे असते. तसे पहायला गेले तर मी नियमाने पक्का लायसन्सधारक ड्रायव्हर होतो. त्यामुळे मला तशी जाणकार व्यक्ती बाजूला असणे बंधनकारक नव्हते. हायवेवर लांब पल्याची ड्रायव्हिंग मी प्रथमच करीत असल्याने, नैतिकदृष्ट्या माझ्यासोबत अनुभवी ड्रायव्हर असायलाच हवा होता. निदान त्याने मला पुढील येणाऱ्या अडचणींची पूर्व सूचना वेळोवेळी दिली असती. आयुष्यात घडणाऱ्या घटनाच शेवटी आपल्याला खऱ्या अर्थाने प्रशिक्षित करत असतात आणि घडवत असतात. पुढील घडलेल्या घटनेवरून मी खऱ्या अर्थाने ड्रायव्हर झालो असे म्हणायला हरकत नाही. मुंबई-अहमदाबाद हायवे वरील गोरेगाव ते वरई फाटा हा ६० किमीचा प्रवास मी एकदम आत्मविश्वासाने आणि सफाईदारपणे पूर्ण केला.मुंबई - अहमदाबाद हायवेवरील सफाळा फाटा ज्याला वरई फाटा सुद्धा म्हटले जाते त्या फाट्यावर वळण घेऊन माझी गाडी सफाळा मार्गे केळवे गावाच्या दिशेने धावत होती .
वरई ते केळवे हे अंतर २५ किमीचे आहे, तो पूर्ण रस्ता आजुबाजूच्या वनराईने समृद्ध आणि हिरवाईने नटलेला आहे. जवळच वन खात्याची दहिसर गावाची पोस्ट आहे. वनखाते वेळोवेळी वृक्षारोपण मोहिमा त्या भागात राबवत असते. त्या मुळे तो भाग निसर्ग सुंदर आहे.वरई फाट्यापासून १५ मिनिटांवर वाटेत वैतरणा नदीवरील पारगाव ब्रीज पार करावा लागतो, तो पार केल्यानंतर काही अंतरावर उभ्या चढाईचा तांदुळवाडी घाट लागतो हे मला त्यावेळेपर्यंत तरी माहित नव्हेत.
याच घाटाच्या अलीकडे उजव्या बाजूला तांदुळवाडी किल्ल्यावर जायचा रस्ता लागतो. वरई फाटा ते पारगाव ब्रीज हा सरळ मार्गी रस्ता असल्यामुळे हायवे प्रमाणे मी गाडी टॉप गिअरमध्ये टाकून चालवीत होतो आणि अचानक जे व्हायला नको होते तेच क्षणार्धात झाले. अचानक समोरच घाटाचा उभा चढ लागला, तो खरोखरच उभा चढ म्हणायला हवा कारण तो पहिल्या बरोबर मी गाडी क्षणार्धात टॉप गिअरमधुन फर्स्ट गिअरमध्ये घेतली परंतु गाडीचा वेग जास्त असल्यामुळे गाडी नियंत्रणात आली नाही आणि दुसऱ्या बाजूच्या रस्त्याची लेन आणि त्या बाजूच्या रस्त्याची कडा पार करून ती खोल दरीच्या दिशेने झेपावू लागली.
दुर्दैवाने त्या ठिकाणी साइड वॉल नव्हती. जर ती असती तर गाडीला कमीत कमी आधार मिळून ती जागेवर थांबली तरी असती, गाडी दुसऱ्या लेनचा रस्ता ओलांडून दरी आणि रस्त्याच्या बाजूच्या कडे मध्ये अडकली होती. रस्त्याच्या कडेला थोडे मातीचे टेपार असल्याने गाडी थेट दरीत कोसळता कोसळता वाचली. गाडीचे उजव्या बाजूचे पुढचे चाक त्या मातीच्या टेपार मध्ये असलेल्या भुसभुशीत मातीत अडकून पडले आणि गाडी बंद पडली. ती भुसभुशीत माती जर त्या वेळी तिकडे नसती तर आम्ही दोघेही त्या गाडीसह दरीत कोसळलो असतो.
'स्वामी कृपा ' म्हणूनच की काय आमची गाडी दरीत जाण्यापासून वाचली. तो चढ जसा उभा होता तसाच त्याच बाजूने खाली येणाऱ्या गाड्यांसाठी तो तीव्र उताराचा सुद्धा होता. जर यदाकदाचित दुसऱ्या बाजूने हेवी लोडेड ट्रक किंवा डंपर जर त्या वेळी खाली उतरत असता तर त्या ट्रक ड्रायव्हरला त्या तीव्र उतारावर त्याचा ट्रक नियंत्रित करणे फार कठीण होऊन बसले असते. कारण ती जागा केवळ उताराचीच नव्हती, तर पुढे तीव्र वळणाची सुद्धा होती.
थोडक्यात, वरून येणाऱ्या वाहनांसाठी ती जागा पूर्णपणे ‘ब्लाइंड कर्व्ह’ची होती. जर आमच्या गाडीला अशा एखाद्या ट्रकने धडक दिली असती तर आमची गाडी , एक तर चेपली गेली असती किंवा जेमतेम काठावर थांबलेली गाडी सुद्धा दरीत ढकलली गेली असती. रस्ता मोकळा आहे, हे पाहिल्यावर न बिथरता, क्षणार्धात रिव्हर्स गिअर टाकून मी गाडी मागे घेतली परंतु मातीच्या टेपारात पुढचे चाक घुसले असल्याने गाडी रिव्हर्स गिअरमध्ये सहज मागे यायला तयार नव्हती. एक्सेलेटर वर पूर्ण जोर दिल्यावर गाडी हळूहळू मागे सरकू लागली. सुदैवाने दोन्ही बाजूने वाहने येत नव्हती. कारण एखादी गाडी खालून जरी वर येत असती तरी सुद्धा काही तरी अघटीत झाले असते.
सुदैवाने त्यावेळी दोन्ही बाजूचा घाट रस्ता मोकळा होता. दोन्ही बाजूच्या लेन मोकळ्या असल्याचे पाहून निमिषार्धात मी फर्स्ट गिअर मध्ये गाडी घेऊन तो उभा चढ पहिला पार केला आणि पुढे तो घाट सफाईदारपणे पार करून सफाळा मार्गे केळावा गाठले. 'पुढे घाट सुरू होत आहे ' हा फलक मी खरे तर पाहिला होता, परंतु माझ्या सारख्या नवख्या ड्रायव्हरच्या डोक्यात त्यावेळी एक्सपर्ट ड्रायव्हरची धुंदी होती. ती धुंदी मात्र कायमची उतरली ती उतरलीच.
त्यानंतर अनेक वेळा तो घाट मी पार केला तेव्हा तेव्हा तिथून जाताना माझ्या डोळ्यापुढे तो प्रसंग उभा राहतोच. त्या घटनेमध्ये आम्हा दोघांना काहीच प्रॉब्लेम झाला नाही किंवा गाडीचे कोणतेच नुकसान झाले नाही हे फार महत्त्वाचे होते. खरे तर एवढा मोठा प्रसंग घडून सुद्धा 'साडू ' च्या मनात माझ्या गाडी चालविण्या बद्दल संभ्रम कधीच निर्माण झाला नाही, तो प्रसंग कधी घडलाच नव्हता असे समजून आजही ते माझ्या सोबत कुठेही यायला तयार असतात, हे विशेष !
आता पर्यंत मी अनेक भागातील नामांकित आणि बेलाग घाट पार केले आणि उतरले त्याचे सर्व श्रेय त्या घटनेला जाते, आजही ती घटना माझ्या घाट चढाईचा मार्गदर्शक आहे. ती आठवण म्हणून त्या जागेवरून कधीही जाताना मी त्या जागेवर हळूच तीन हॉर्न ची सलामी देतो. कधी असे केले की गाडीतली प्रवासी मंडळी विचारतात "असे हॉर्न कां वाजवलेत?" तर '' मी म्हणतो एखाद्या स्थानाप्रती असलेली श्रद्धा ''माझी मुलगी जेव्हा गाडीच्या स्टिअरिंग असते, तेव्हा तेव्हा तिने तोच घाट येताना-जाता अनेक वेळा सफाईदारपणे पार केलेला आहे. याचे कारण म्हणजे ती घटना जी की मी तिला आधीच सांगून ठेवली होती. त्यामुळे ती गाडी चालवताना वाहतूक विभागाच्या सर्व फलकांवर बारकाईने लक्ष ठेवून असते.
ध्यान हटी दुर्घटना घटी ! - या कथेमधून वाचकांना वाहतूक सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करा,हा संदेश मिळतो. ड्रायव्हर नवीन असो,किंवा अनुभवी त्याने वाहतूक सुरक्षेच्या नियमांचे पालन करायलाच हवे. सुरक्षित वाहन चालविणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे, याकडे दुर्लक्ष केले तर जीवघेणा अपघात संभवू शकतो.
समाप्त🖋️📖📚
🔗 'मासुंदेच्या काठावरती '|दैवदुर्लभ योगाने फुललेली हळुवार मराठी प्रेमकथा
तर या पुढील लघु कथा ही एक हळुवार प्रेमकथा असून 'दैवदुर्लभ योग' दोन प्रेमी जिवांना कसे ? सहज आणि अल्पावधीत जवळ आणते ,ते पुढील लेखात वाचायला मिळेल..👉
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख
💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा
पुढील भागासाठी ब्लॉगला Follow करा.आणि आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.
sjomkar.blogspost.com ब्लॉगला Follow करा.
तुमचे मत नक्की, अभिप्राय नक्की कळवा
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी © All Rights Reserved
🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com
(ओमकार शिवलकर )

अंगावर काटा आणणारा आणि डोळे उघडणारा अनुभव !
उत्तर द्याहटवाएका क्षणाच्या चुकीने काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण आहे ही कथा.
“ध्यान हटी, दुर्घटना घटी” हा संदेश इतक्या प्रभावीपणे पोहोचवला आहे की तो कायम लक्षात राहील
वाहनचालकाने over confidence नसावे. Expert ड्रायव्हरच्याही डोळ्यात अंजन टाकणारा सुरेख लेख. शॉर्ट फिल्म पाहत असल्याचा प्रत्यय आला
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाडोळ्यासमोर पूर्ण प्रसंग उभा राहिला.. छान लिहिलं आहे. असे लिहित रहा
खूपच थरारक आणि डोळसपणे लिहिलेला अनुभव 👏
उत्तर द्याहटवाप्रसंगावधान आणि शांत विचार किती महत्त्वाचे असतात, हे या घटनेतून प्रकर्षाने जाणवतं.
खूप थरारक घटना, स्वामीची कृपा म्हणून ह्या दुर्घटनेतून वाचलात..्
उत्तर द्याहटवामनयास्वी धन्यवाद !
उत्तर द्याहटवा