'यथार्थ गिरगाव' | मुंबईच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि परंपरेचा जिवंत वारसा
🔗 "भूल गया क्या मुझे" अक्कलकोट यात्रेतील सत्य घटना आणि स्वामींचा भक्तानां प्रश्न
यथार्थ गिरगाव | मुंबईच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि परंपरेचा जिवंत वारसा
या गिरगावची जनवस्ती ग्रँट रोड पासून मरीन लाईन्सच्या पूर्वेकडील पट्ट्यात पसरलेली आहे. गिरगावचे सहा ते सात उपविभाग आहेत. उदा. गिरगाव प्रार्थना समाज, ऑपेरा हाऊस, खेतवाडी, गायवाडी,ठाकूरद्वार, माधव बाग, चिराबाजार इत्यादी. हे विभाग अधिकृत नसले तरी लोकांच्या मनात कोरलेले आहेत. प्रत्येक विभागाची स्वतःची एक ओळख, स्वभाव आणि वैशिष्ट्य आहे.
या गिरगावच्या मध्यवर्ती भागात, चर्नी रोड रेल्वे स्टेशनजवळ आणि ठाकूरद्वार भागात असलेली मुंबई महानगरपालिकेची जी बाग आहे, तिला पूर्वी ‘जपानीज गार्डन’ म्हटले जायचे. नंतर तिला स. का. पाटील उद्यान असे अधिकृत नाव देण्यात आले. मुंबईचे तीन वेळा महापौर राहिलेले सदाशिव कान्होजी पाटील यांचे नाव त्या बागेला देण्यात आलेले आहे.
खरे तर ती जागा पहिल्या महायुद्धात कामी आलेल्या ब्रिटिश सैनिकांची दफनभूमी होती. ती हटवून सार्वजनिक उद्यान बांधण्यासाठी ब्रिटिश सरकारची इंग्लंडमध्ये जाऊन परवानगी घ्यावी लागली, असे तेव्हा सांगितले जायचे. खरे-खोटे काहीही असो, पण त्या जागेच्या इतिहासात एक गूढता आणि वजन आहे. आजही त्या बागेत काही ठिकाणी जुन्या काळाच्या खुणा जाणवतात.
यानंतर गिरगावची प्रेक्षणीय स्थळे म्हटली की गिरगाव चौपाटी, तिचा विस्तीर्ण किनारा आणि तारापोरवाला मत्स्यालय ही ठळकपणे समोर येतात. हिंदू, पारशी, मुस्लिम समाजांच्या जिमखान्यांनी अनेक खेळाडू घडवले. त्यात गिरगावमधले एकनाथ सोलकर यांसारखे नाव विशेष उल्लेखनीय आहे. खेळ, संस्कृती आणि सामाजिक जीवन यांचा सुंदर संगम गिरगावात दिसून येतो.
चर्नी रोड ते मरीन लाईन्सपर्यंतचा परिसर इतिहास, श्रद्धा आणि व्यापार यांचा अनोखा संगम आहे. या पट्ट्यात मुस्लिम बांधवांचे ‘बडा कब्रस्तान’ दिसते तर थोडं पूर्वेकडे गेल्यावर मुंबईचे ग्रामदैवत मुंबादेवीचे मंदिर भक्तांना आकर्षित करत उभं आहे. याच परिसरात व्यापारी गजबजही तितकीच रंगलेली दिसते मंगलदास मार्केटमधील घाऊक कपड्यांची उलाढाल आणि तांबा-काटा मार्केटमधील भांड्यांची खरेदी-विक्री गिरगावच्या दैनंदिन जीवनाला वेगळीच चैतन्य देतात. सांस्कृतिक वारशाची गोष्ट निघाली की एक नाव अभिमानाने घेतलं जातं ते म्हणजे लोकमान्य टिळक यांचे. सन १८९३ साली त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ गिरगावातील केशवजी नाईक चाळीत रोवली. ही घटना आजही या भागाच्या सांस्कृतिक ओळखीची साक्ष देते.
गिरगाव म्हणजे चाळ संस्कृतीची पंढरी. कमीतकमी चार मजल्यांच्या जुन्या इमारती, १०x१० च्या खोल्या, आणि त्यात राहणारी मोठी कुटुंबे,हे चित्र गिरगावचे वैशिष्ट्य आहे. १०-१२ माणसं एका छोट्याशा घरात राहत असली तरी त्यांची मने मात्र मोठी होती. १५-२० इमारतींच्या समूहाला ‘वाडी’ किंवा ‘गल्ली’ म्हटले जायचे. त्या नावांमध्येही तेथील सामाजिक व्यवस्थेचा इतिहास दडलेला आहे,शेणवीवाडी, कोळीवाडी, फणसवाडी, चंदनवाडी, धोबी वाडी, ताड वाडी,खोताची वाडी,गाय वाडी, ,पिंपळवाडी, भटवाडी, तेलीवाडी, , आंग्रेवाडी, पोपट वाडी, ताड वाडी कोलभट लेन, झावबा वाडी, मुगभाट लेन,बोरभाट लेन आंबेवाडी, खत्तर गल्ली, केळेवाडी,गंगाराम खात्री वाडी ही व अशी कितीतरी नावे आजही डोळ्यांसमोर येतात. आता सुद्धा कधी काळी कामानिमित्त गिरगावात गेलो तरी तेथील वाड्या,गल्ली,लेन,मार्ग, चौक,रस्ते आजही स्वतःहून ओळख दाखवतात,वाट दाखवतात ते रस्ते अजूनही ओळख विसरलेले नाही.अजून सुद्धा तोच आपलेपणा त्या भागात फिरताना मला दिसून येतो.
चाळी मधून राहणारा गिरगावकर शेजारधर्म पाळण्यात सदैव पुढे असायचा, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा होता. कुणाच्या घरी शुभ कार्य असेल तर संपूर्ण वाडी कामाला लागायची, आणि दुःखातही सगळे खांद्याला खांदा लावून उभे राहायचे. गिरगावातील चाळींमधील बहुतेक घरे सताड उघडी असतात, क्वचित किंवा दाराला कडी घातली तर रात्रीच.
अस्सल मराठी खाद्यसंस्कृतीचे दर्शन हे गिरगावातच होत होते. टेंबे भोजनालय, गोमंतक, सत्कार,सदानंदाश्रम, अनंताश्रम, क्षुधा शांती भवन,समर्थ भोजनालय, विनय हॉटेल सामंतचा चक्का,पणशीकर दुग्धालय ही नावे म्हणजे चवीची हमी होती. शाकाहारी किंवा मांसाहारी पदार्थ किंवा जेवणासाठी ती ठिकाणे प्रसिद्ध होती.
ऑपेरा हाऊसपासून मेट्रोपर्यंत इराणी हॉटेल्सची रेलचेल होती. चहा, बन-मस्का आणि गप्पा,हा एक वेगळाच अनुभव होता. आमच्या शाळेजवळील बोरकर वडापाव वाला तर प्रसिद्धच होता. त्याचा एक वडा-पाव म्हणजे जंबो वडापाव,मोठा आणि चवीला भारी! अक्षरशः त्याच्या भोवती गराडा पडलेला असायचा.
गिरगाव हे धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे केंद्र होते. गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी,प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा व्हायचा. त्या काळात टीव्ही नव्हते, त्यामुळे चित्रपट, ऑर्केस्ट्रा, नाटके हेच मुख्य मनोरंजन होते.
दहीहंडीच्या वेळी गोविंदा पथकांची धूम असायची. वेगवेगळ्या भागातले चित्ररथ पाहण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची. ब्लफ मास्टर हिंदी सिनेमातील दही हंडी उत्सवातील अभिनेते शम्मी कपूर यांच्यावर चित्रित केलेले बहारदार गाणे "गोविंदा आला रे आला " या गाण्याचे चित्रीकरण गिरगावातील खेतवाडी आणि मंगलवाडी मध्ये झालेले आहे. त्यावेळेस गोविंदा सणाचे उत्सवी माहोल पहायला मिळण्याचे एकमात्र ठिकाण हे गिरगाव होते.
रात्री उशिरापर्यंत वडापाव, पावभाजी, आम्लेट पावच्या गाड्या चालू असायच्या. विविध भागातील खाऊ गल्ल्या तर गिरगावची खास ओळख होती. गिरगावातील माणूस कधीच उपाशी राहू शकत नाही ते याच मुळे.
पिकेट मारुती, काळाराम, गोरा राम, स्वामी समर्थ मठ, फडके वाडी गणपती मंदिर, बालाजी मंदिर ही व अशी अनेक मंदिरे गिरगावच्या आध्यात्मिक वातावरणाला आकार देतात.
नाटक हे मराठी माणसाचे व्यसन आणि मुंबई मराठी साहित्य संघ हे गिरगावकरांचे हक्काचे ठिकाण. सेंट्रल सिनेमा, रॉक्सी, मेट्रो, नॉव्हेल्टी ही चित्रपटगृहे म्हणजे आठवणींचा खजिना आहेत.
शिक्षणाच्या बाबतीतही गिरगाव आघाडीवर होते. अनेक नामांकित शाळा आणि महाविद्यालये येथे होती. याच भागातून अनेक मोठी माणसे घडली,न्यायाधीश, कलाकार, अभिनेते, खूप सारे !
मुंबई कधी झोपत नाही, तसेच गिरगावही कधी पूर्ण झोपत नाही. मध्यरात्री काठी आपटत जागते रहो म्हणण्याची खरे तर गिरगावात बिलकुल आवश्यकता नसताना सुद्धा मध्येच कधी तरी हाळी देणारे 'नेपाळी गुरखे' सुद्धा पहायला मिळतील. पहाटे दूधवाले, रात्री उशिरापर्यंत रंगणारे गप्पांचे फड, ही गिरगावची ओळख आहे. आता पुनर्विकासामुळे गिरगावचे स्वरूप बदलत आहे. चाळींच्या जागी टॉवर्स उभे राहत आहेत. तरीही, सण-उत्सव, परंपरा आणि लोकांच्या आठवणींमुळे गिरगाव अजूनही जिवंत आहे.
सन १९९० च्या आसपासचा हा प्रसंग असावा. गिरगावच्या आनंदाश्रम हॉटेलच्या नाक्यावर काही बेरोजगार तरुण मुलांनी वडापावची गाडी लावून स्वयंरोजगाराचा मार्ग निवडला होता. वडापावची गाडी छान चालायची. रात्री नऊपर्यंत त्यांची छान कमाई व्हायची. या वडापाववाल्या कडून एक फार मोठं समाजकार्य घडलं.
असेच संध्याकाळी आम्ही सुद्धा वडापाव खायला जात होतो, त्यावेळी मागील दोन दिवसा पासून एक गोष्ट सतत आमच्या लक्षात यायची की बाजूच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्या वरून एका वेळी आठ-दहा मुले सतत रडत असायची. आम्ही म्हणायचो, “कदाचित प्ले-स्कूल असेल.” अनेक गिऱ्हाईकांनी ही गोष्ट त्याला सांगितली. तोही सुरुवातीला दुर्लक्ष करत म्हणायचा, “मरू दे, असतील कुणाची तरी मुले.” पण एक गोष्ट विचित्र होती रात्री आठ नंतर त्या मुलांच्या रडण्याचा आवाज अचानक बंद व्हायचा.
त्या काळात गिरगावात घरे लहान आणि माणसे जास्त असल्याने, अनेक जण चाळीत किंवा रस्त्याच्या कडेला पथारी टाकून झोपायचे. लघुशंकेसाठी दोन बिल्डिंगमधल्या चिंचोळ्या गल्लीचा आधार घ्यायचे.
त्या रात्री तो वडापाववाला लघुशंकेसाठी उठला असता सहजच म्हणून तो ज्या बिल्डिंगमधून मुलांच्या रडण्याचा आवाज यायचा, त्या मजल्यावर कुतुहल पोटी गेला. त्या घराचे दार बंद होते, पण खिडकी किलकिली होती. त्यातून त्याने पाहिले तर खोलीत १०–१२ मुले गाढ झोपलेली दिसली. त्याच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली .“एवढी मुले कोणाची?”,जर “प्ले-स्कूल असेल तर त्यांना त्यांचे पाल्य घरी का नेत नाहीत ?” “जर यांचीच मुले असतील, तर मग सतत रडत का असतात?”
अश्या विचारांचा त्याच्या मनात कल्लोळ सुरू असतानाच तो झोपायला गेला, पण त्याला झोप येईना.
त्याच वेळी साध्या वेषातील डिटेक्शन पोलिस गस्त घालत होते. रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांना पोलिस नावानिशी ओळखत असतात. त्याने बाजूला घेऊन पोलिसांना सर्व हकीकत सांगितली ,“दोन दिवसांपासून संध्याकाळी मुले खूप रडतात आणि रात्री अचानक शांत होतात.”
हे ऐकल्यावर पोलिसांच्या विचारचक्रांना वेग आला. “ही मुले पळवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीची शिकार तर नाही ना ?” अशी त्यांना शंका त्यांच्या मनात डोकावू लागली. त्यांनी लगेच पब्लिक टेलिफोनवरून पोलिस स्टेशनला कळवलं. कारण काही दिवसांपूर्वी गिरगावात लहान मुले पळवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. कॉल जाताच पोलिसांनी बिल्डिंगखाली फील्डिंग लावली. काही पोलिस पुढे, काही मागे असे ४-५ हत्यारबंद पोलिस त्या तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दबकत दबकत पोहोचले. किलकिल्या खिडकीतून आत पाहिलं तर खरोखर १०–१२ मुले बेशुद्ध अवस्थेत झोपलेली दिसली.
दार ठोठावलं. आतून आवाज आला “कौन है?”
पोलिस म्हणाले , “पोलिस! दरवाजा खोलो.”
पण पलीकडून कोणताच प्रतिसाद आला नाही.
पोलिसांचा संशय बळावला.
थोडा वेळ वाट पाहून पोलिसांनी जोरात धक्के मारून दार तोडले. प्रवेश करताच त्यांना आत दोन बायका आणि ती १२ मुले दिसली. त्या महिला अत्यंत घाबरलेल्या व भेदरलेल्या अवस्थेत होत्या. दरम्यान,त्यांच्या सोबतचा एक पुरुष पाइपने खाली उतरुन पळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तो पोलिसांच्या तावडीतून सुटू शकला नाही. सर्वांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले.पण तिथे जे उलगडले ते अत्यंत धक्कादायक आणि भयावह होतं.
मुलांना गुंगीची औषधं देण्यात येत होती. त्यामुळे ती सकाळी आणि रात्री शांत असायची, पण दुपारी औषधांचा प्रभाव ओसरू लागला की त्यांच्या रडण्याने आजूबाजूचा परिसर अस्वस्थ होत असे. दरम्यान दुसऱ्या दिवशी त्यांना परदेशात पाठविण्याच्या तयारी पूर्ण झाली होती. त्या मुलांच्या सुदैवाने, योग्यवेळी पोलिसांनी कार्यवाही केल्याने त्यांची सुटका एक दिवस आधीच झाली.
काही अरब देशामध्ये पूर्वी उंटांच्या शर्यतीसाठी लहान मुलांचा वापर केल्याच्या काही घटना समोर आल्या होत्या. लहान मुलांना उंटावर जॉकी म्हणून बसविले जात असे. उंट धावताना मुलांना त्रास होतो आणि ती मुले जोरजोरात रडतात. त्या आवाजाने उंट अधिक वेगाने धावतात. याकरीता शर्यतीसाठी लागणारी मुले दक्षिण आशियातील काही भागातुन पळवून किंवा विकत घेतली जात असे. सन २००५ नंतर लहान मुलांचा उंटाच्या शर्यती करीता जॉकी म्हणून वापर करण्यावर अरब देशांनी बंदी आणून त्या बाबतचा कडक कायदा बनविल्याने आता असे प्रकार होत नाहीत.
खरे तर आमच्यासारख्या वडापाव प्रेमींच्या साध्या प्रश्नांनीच तो वडापाववाला कदाचित जागरूक झाला असावा आणि त्यांच्यामुळे एका ह्यूमन ट्रॅफिकिंग करणाऱ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा छडा लागला. 'यथार्थ गिरगाव' या लेखात हा अनुभव कथन करण्याचे कारण एवढेच की गिरगावात घडणाऱ्या प्रत्येक घटना या अनुभवात बदलतात. दक्ष गिरगावकर आणि जागृत वडापाववाल्यामुळे हे शक्य झाले. गिरगावकर हे जागृत आणि कायम दक्ष असतात. गिरगावकरांचा हा गुण जर यथार्थ गिरगावात नोंदवला गेला नाही तर यथार्थ शिर्षकाचा काहीही उपयोग होणार नाही
🔗ध्यान हटी ,दुर्घटना घटी|वाहतूक सुरक्षेचे नियम आणि रस्ता सुरक्षिततेचा महत्त्वपूर्ण संदेश
"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख
💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा
पुढील भागासाठी ब्लॉगला Follow करा.आणि आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.
sjomkar.blogspost.com ब्लॉगला Follow करा.
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी © All Rights Reserved


अतिशय जिवंत आणि माहितीपूर्ण लेख 👏✨
उत्तर द्याहटवागिरगावची परंपरा, संस्कृती आणि माणुसकी खूप सुंदरपणे उलगडली आहे.
विशेषतः वडापाववाल्याच्या जागरूकतेमुळे वाचलेली मुले हा प्रसंग मनाला हादरवून टाकतो 🙏
खूपच अभिमान वाटावा असा लेख .
उत्तर द्याहटवा“यथार्थ गिरगाव” म्हणजे फक्त वर्णन नाही तर अनुभव आहे, हे अगदी स्पष्ट जाणवतं.
गिरगावकरांची एकजूट आणि सतर्कता याचं सुंदर उदाहरण मांडलं आहे.
खूप जिवंत आणि अभिमान वाटावा असा लेख 👍
उत्तर द्याहटवागिरगावची संस्कृती, माणुसकी आणि जागरूकता इतक्या सुंदरपणे उलगडली आहे की वाचताना त्या वातावरणात गेल्यासारखं वाटतं.
Thanx lots 1
हटवाछान लेख
उत्तर द्याहटवास्तुत्य उपक्रम!
उत्तर द्याहटवा