मुख्य सामग्रीवर वगळा

'सिंगापूर स्टोरी | सिंगापूरमध्ये भारतीय जोडप्याला मुलगा दत्तक मागणाऱ्या जोडप्याची हृदयस्पर्शी कथा

                  सिंगापूर स्टोरी | सिंगापूरमध्ये भारतीय जोडप्याला मुलगा दत्तक मागणाऱ्या जोडप्याची हृदयस्पर्शी कथा..

'सिंगापूर स्टोरी | सिंगापूरमध्ये भारतीय जोडप्याला मुलगा दत्तक मागणाऱ्या जोडप्याची हृदयस्पर्शीकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी

 सिंगापूर नगरी न्यारी,
डोळ्यांत भरून घ्यावी सारी|
 एक सिंगापूरी माऊली
तिला नव्हती संततीची सावली |
तिच्या हृदयाची दुर्बल मनस्थिती,
कारण त्याचे माया, ममता, प्रीती|
अभागी, वंचित माऊली अशी 
चैन-सुख नसे तिच्या जीवाशी |
दोष तिचा प्रारब्धाला,
फुटक्या, हतबल नशिबाला|

     🔗 ' मासुंदेच्या काठावरती  | दैवदुर्लभ योगाने फुललेली हळुवार मराठी प्रेमकथा

      

      ही एक हळुवार प्रेमकथा असून ' देवदुर्लभ योग' दोन प्रेमी जिवांना कसे ? सहज आणि अल्पावधीत जवळ आणते हे तुम्ही या मागील लेखात वाचले असेल. 

      'सिंगापूर स्टोरी ' 

   पुढील लेख आहे ,यात सिंगापूर मध्ये फिरायला गेलेल्या भारतीय जोडप्या कडे त्यांचा मुलगा दत्तक मागणाऱ्या इंडो-  चायनिज जोडप्याची लघुकथा पुढच्या लेखात.
     सिंगापूरच्या आधुनिक आणि बहुसांस्कृतिक वातावरणात घडणारी ही हृदयस्पर्शी मराठी कथा एका अनपेक्षित भेटीपासून सुरू होते. फिरण्यासाठी गेलेल्या भारतीय जोडप्याला एका इंडो-चायनीज जोडप्याची भेट होते आणि त्यांच्या आयुष्यात एक भावनिक वळण येते. एका निरागस मुलाला दत्तक घेण्याची अनपेक्षित विनंती, त्यामागील भावना आणि त्या प्रसंगातून निर्माण झालेले नैतिक प्रश्न या कथेला वेगळीच खोली देतात. प्रेम, माणुसकी आणि नात्यांच्या अर्थाचा विचार करायला लावणारी ही कथा शेवटपर्यंत वाचकाला गुंतवून ठेवते.
         'सिंगापूर स्टोरी “ हे प्रवास वर्णन आणि त्या प्रवासात घडलेल्या आठवणीची आहे. माझे वडील म्हणजे भाऊ हे ‘ एअर इंडिया ‘ या भारत सरकारच्या अंगिकृत हवाई सेवा उपक्रमात कार्यरत होते. एअर इंडिया ची स्थापना सन 1922 रोजी जे आर.डी. टाटा यांनी केली. तर सन 1953 मध्ये तिचे राष्ट्रीकरण झाले. त्यावेळेपासून तब्बल 70 वर्ष ती कंपनी भारत सरकारच्या ताब्यात होती. आता ती परत टाटा समूहाकडे हस्तांतरित झाली आहे .
      आमचे भाऊ हे त्यांच्या चुलत्यांच्या जागेवर सन 1963 रोजी नोकरीला लागले होते. तत्पूर्वी ते ‘भारतीय डाक सेवेत ‘ कामाला होते. चुलत्यांना एकच मुलगी त्यामुळे त्यांनी त्यांच्या दोन्ही पुतण्यांना आपल्या पोटच्या मुलांसारखे वाढवले होते. त्यांना मुलगा नसल्याने त्यांनी त्यांच्या दोन नंबर पुतण्याचा म्हणजेच माझ्या वडिलांचा  ‘एअर इंडिया’ मध्ये  नोकरीसाठी दावा (क्लेम) करून ठेवला होता. दोन वर्षांनी भाऊंना 'एअर इंडीया' मध्ये नोकरी मिळाली. एअर इंडियात कायमस्वरूपी नोकरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला वर्षातून एकदा सहकुटुंब परदेश प्रवासाची  (पती /पत्नी,मुलगा,आई- वडील ) सुविधा मिळते. भाऊंना वर्षातून 8 ते 12  मोफत परदेश प्रवास सवलतीची तिकिटे मिळत होती. त्यावेळी ‘ एअर इंडियाचा ‘ जॉब म्हणजे जग फिरण्याची 'सुवर्ण संधी ' मानली जायची परंतु जर फ्लाइटमध्ये जागा रिकामी असेल तरच त्या सीट्सना कन्फर्मेशन मिळत असे. 
      जगातील कोणत्याही देशांमध्ये मोफत परदेश प्रवास सवलतीची वर्षातून 8 ते 12 तिकिटे जरी  मिळत  असली तरी, कोणत्याही देशात जाऊन त्याचा आनंद घेणे बहुतेक स्टाफला शक्य व्हायचे नाही कारण काही मोजकेच देश असे आहेत की तिथल्या राहण्याचा आणि खाण्याचा खर्च हा भारतीय खर्चाप्रमाणे परवडणारा असायचा उदा.मॉरिशस, हाँगकाँग,सिंगापूर. व्हियेतनाम ,थायलंड,मलेशिया इत्यादी. या देशामध्ये राहण्याचा, खाण्याचा आणि फिरण्यावर होणा-या खर्चाची भरपाई करण्याच्या क्लुप्त्या या मंडळीकडे असायच्या. मागणी असलेल्या भारतीय वस्तू ज्या तिकडे सहज उपलब्ध होत नसायच्या,अशा वस्तू ते सोबत घेऊन जात असत,उदा.मॉरिशसमध्ये कोल्हापुरी चप्पलांना विशेष मागणी होती.  प्रवास खर्च मोफत असायचा पण राहण्याचा, खाण्याचा आणि फिरण्याचा त्यांचा खर्च सुद्धा भरपूर यायचा त्यामुळे त्याची भरपाई अशा प्रकारे करत होते, त्या त्या देशांमध्ये  भारतीय वस्तू घेणारे काही व्यापारी असायचे त्यांना ते देऊन त्यातून मिळणाऱ्या पैशातून ते तो खर्च भागवायचे. भारतात परतताना मात्र तिथल्या उपभोग्य वस्तू   उदा. इलेक्ट्रॉनिक वस्तू,कपडे इत्यादी ते सोबत घेऊन यायचे.
      परदेश प्रवास करणारा सगळाच एअर इंडियाचा स्टाफ हा कस्टमवाल्यांचा बऱ्यापैकी ओळखीचा असल्याने त्यांनी आणलेल्या वस्तूंवर नियमानुसार अबकारी कर लावून ते त्यांना सोडत होते.उलट- सुलट त्यांच्या बॅगेज तपासून त्यांना कधीच मनस्ताप द्यायचे नाहीत. सोबत पत्नी आणि लहान मुले असले की त्यांना सामान आणायला सोयीचे पडायचे उदा.साड्या, खेळणी या व अशा अनेक गोष्टी अधिकच्या आणायला मिळत असे. भाऊ नेहमी मला आणि सर्वात लहान भावाला घेऊन जायचे, आम्ही वयाने लहान असल्याचा बहुतेक अशा वेळी त्यांना फायदा व्हायचा. एकदा सिंगापूर वरुन येताना भाऊंनी मोठा स्टीलचा सुरा (Cleaver ) घरगुती कामांकरीता विकत घेऊन इतर सामाना सोबत ठेवला होता. सिंगापूर च्या ‘Paya Lebar’ एअरपोर्ट वर बॅगेजच्या नियमित तपासणीत स्कॅनरमध्ये आमच्या एका बॅगेत त्यांना तो 'सुरा ' दिसून आला म्हटल्यावर तेथील एअर पोर्ट सिक्युरिटी ऑफीसरने आमच्या सर्व बॅगासह आम्हाला बाजूला नेऊन आमची चौकशी सुरू केली. एअर इंडिया स्टाफ ,कुटुंबासोबत प्रवास करत आहे आणि सोबत लहान मुलगा सुद्धा आहे, हे लक्षात येताच सिक्युरिटी ऑफीसरने फक्त सुरा तेव्हढा काढून घेतला आणि आम्हाला पुढे जाऊ दिले.
        साधारण 1979 चे वर्ष असावे, भाऊंचे सिंगापूर साठीचे बुकिंग झाले होते. आम्ही प्रवासासाठी रात्री 8 वाजता सांताक्रूझ एअर पोर्टला पोहचलो परंतु त्या सिंगापूर फ्लाईट मध्ये अचानक तत्काळ प्रवाशांचे बुकिंग झाल्याने ते आयत्या वेळीच फुल झाले.कंपनीच्या नियमानुसार एअर इंडिया स्टाफची सर्व बुकिंग रद्द करून त्यांना पाच दिवसानंतरच्या फ्लाईटचे बुकिंग देण्यात आले.
     पाचव्या दिवशी मात्र सगळे सुरळीत झाले.सकाळी 10.30 वाजता बोईंग 747 ने सांताक्रूझ एअर पोर्टवरून उड्डाण केले, तसे पहायला गेले तर  सिंगापूरचा विमान प्रवास हा माझ्या आयुष्यातील पहिला विमान प्रवास होता. नंतर हाँगकाँग व इतर देशाचे प्रवास सुद्धा झाले परंतु आयुष्यात लक्षात राहील असा प्रवास म्हणजे सिंगापूरचा प्रवास.
      भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सिंगापूरसाठी आमच्या  विमानाने    ‘सांताक्रूझ एअर पोर्ट’ वरून उड्डाण केल्यानंतर विमानातून खाली मुंबईचे विहंगम दृश्य दिसायला लागले. मुंबईला एक पूर्ण घिरटी घालून विमानाने प्रवास सुरू केला. नंतर मात्र खिडकीतून फक्त ढग आणि ढगच दिसत होते आणि विमानाचा पंख, बाकी काही नाही. एअर होस्टेज सुरक्षेच्या वेगवेगळ्या सूचना देत होत्या. सुरुवातीला चहा - कॉफी, स्नॅक्सच्या फेऱ्या झाल्या दुपारी वेस्टर्न पद्धतीचे कॉन्टिनेन्टल जेवण आले. भाऊंनी मला पुढच्या खिडकी जवळची जागा दिली होती, तिकडे मी एकटाच होतो. बाकी सर्व मंडळी मागे बसली होती. मी वेस्टर्न पद्धतीचे 'कॉन्टिनेन्टल 'जेवण प्रथमच खात होतो. त्यात लवंग आणि काळ्या मिरीची भरमार होती. मी ते पदार्थ खायला सुरवात केल्याबरोबर काही वेळाने तोंडात जाळ पडला. जेवण राहिले बाजूला, पाण्यानेच पोट भरावे लागले. जुन्या काळात हवाई प्रवासात ‘डाउनड्राफ्ट इफेक्ट ’ चा अनुभव सर्वांनाच जाणवायचा परंतु नवीन प्रवाशांना तो जास्त जाणवायचा. विशेष म्हणजे हा अनुभव विमान खाली येतानाच जाणवायचा, वर जाताना मात्र तसे काहीही वाटायचे नाही. ही जी भीती आहे, ती उंच आकाश पाळण्यातून अचानक खाली येताना जसे वाटते तशी होती. आताच्या नवीन आणि प्रगत विमान तंत्रज्ञानामुळे,तसा अनुभव मला काश्मीर विमान प्रवासात बिलकुल आला नाही.  
        खरे तर, मुंबई सिंगापूर हा हवाई प्रवास हा साडेपाच तासांचा आहे.  सिंगापूर हा आग्नेयकडील देश असल्याने मुंबई - सिंगापूर या दोन शहरांमध्ये ग्रीनिज वेळेप्रमाणे अडीच तासांचा फरक आहे. त्यामुळे सिंगापूर टाईम नुसार विमानाला ‘Paya Lebar ‘ या एअरपोर्ट वर उतरायला  संध्याकाळचे  6.30 वाजले होते. सिंगापूर एअरपोर्ट मधून बाहेर पडण्याची ‘Arrival procedures ‘ पुर्ण करेपर्यंत बाहेर चांगलाच अंधार दाटून आलेला होता.
          सिंगापूरला आम्ही संध्याकाळी ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो त्याचे मालक हे इंडो - चायनीज जोडपे होते. नवरा चायनीज तर बायको भारतीय ‘मध्य प्रदेश ‘ मधील ‘झांशी ‘कडची होती. सिंगापूर मध्ये ७५ % जनसंख्या ही चायनीज असून ७% भारतीय आहेत व उर्वरित इतर. मला पाहताक्षणी त्या जोडप्याला मी आवडायला लागलो होतो की काय कुणास ठाऊक ? पहिल्या दिवसापासून ते माझ्याकडे विशेष लक्ष द्यायचे,मला काय हवं नको ते पहायचे, एक आठवडा आम्हीं सिंगापूर येथे होतो. तेथे बरीच प्रेक्षणीय स्थळे आम्ही पाहिली, सिंगापूरचे जुरोंग बर्ड गार्डन (१९७१) आणि सिंगापूर प्राणी संग्रहालय (१९७३) पाहिले; मात्र तिथे काही फार वेगळे किंवा विशेष वाटले नाही. आपल्या मुंबईतील जिजामाता प्राणिसंग्रहालयात जसं पाहायला मिळते, तसंच काहीसे तिथेही दिसले. बर्ड गार्डन मध्ये पेंग्विन,आफ्रिकन पक्षी,वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी पहायला मिळाले आणि बरेच काही. त्या वेळचे सिंगापूर आणि आताचे सिंगापूर यात खूप बदल झालेला आहे.
        इतर दिवशी आई -वडील सामानाची खरेदी करायला जात होते, तेव्हा हॉटेलचे मालक असलेले इंडो-चायनीज जोडपे त्यांना म्हणायचे "तुम्ही शॉपिंगला जा, याला कशाला फिरवता,आम्ही त्याला सांभाळू "म्हणून आई वडील मला त्या जोडप्याकडे सोडून जायचे. पण काहीही असो ते दोघे माझे खूप लाड,कोड-कौतुक करायचे. ती बाई मला हिंदीत प्रेमाने म्हणायची "तू हमारे साथ सिंगापूर मे रहोगे ना ? हमें अच्छा लगेगा " मग ती बाई हळूच म्हणायची आम्हाला मुले नाहीत. ते दोघे एकमेकांशी मेंडरिन मध्ये संवाद साधायचे. ती बाई फक्त आमच्याशी हिंदी मधून  बोलायची. 
           आम्ही जेव्हा फिरायला बाहेर पडायचो तेव्हा रस्त्यांवर आपल्या  इथल्यासारखेच विविध वस्तूंचे स्टॉल दिसून आलेत. सिंगापूर मध्ये ‘लिटिल इंडिया ‘ म्हणून भारतीयांच्या वस्तीचा प्रमुख भाग (Indian locality) हा 'शेरंगून रोड' या परिसरात आहे. त्या भागात फिरताना  हेमांडपंथीय मंदिरे, तमिळ लोकांच्या धार्मिक मिरवणुका,दाक्षिणात्य पेहरावात फिरणारी माणसे इत्यादी मुळे चेन्नईला असल्याचा जास्त भास होत होता. 'लिटिल इंडिया ' मार्केटमध्ये फिरताना आपण सिंगापुरात आहोत,असे कदापि वाटले नाही कारण तिथे सराईतपणे तमिळ व हिंदी भाषा बोलली जात होती. एकदा असेच फिरता फिरता रात्री खूप उशीर झाला होता. सर्व हॉटेल्स बंद झाली होती, फक्त एक दाक्षिणात्य हॉटेल अर्धवट शटर लावलेल्या अवस्थेत दिसत होते. वडिलांनी तेथील माणसाला सांगितले की "आम्ही मुंबईहून आलो आहोत. सर्व हॉटेल्स बंद आहेत, आम्हाला जेवण मिळेल का ? " त्यावर मद्रासी लुंगी घातलेला दाक्षिणात्य माणूस हसत म्हणाला " कां नाही मिळणार ? जरूर मिळेल " आणि आम्हाला त्यांनी केळीच्या पानात जेवायला वाढले ,काय अप्रतिम जेवण होते ते, आजही ती चव जिभेवर रेंगाळते.
         ज्या दिवशी आम्ही मुंबईला परतणार त्याच दिवशी सकाळीच ते इंडो-चायनीज जोडपे आमच्या रूमवर येऊन त्यांनी वडिलांना म्हणजे भाऊंना हा तुमचा मुलगा आम्हाला दत्तक द्याल का ? कारण आम्हाला मूल बाळ नाही ,आम्ही तुमच्या मुलाला व्यवस्थित आणि प्रेमाने सांभाळू, इथल्या कोर्टाची जी काही प्रक्रिया असेल ती आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू,” अशी त्यांनी विनंती केली. मात्र वडिलांनी ठामपणे नकार देत सांगितले.“ते कदापी शक्य नाही.” पुढे वडील स्पष्टपणेच म्हणाले की “आमच्या नातेवाईकांपैकी जरी कोणी अशी मागणी केली असती, तरीही मी त्याला नकार दिला असता. आमची मुले आम्हाला जड झालेली नाहीत." विशेष म्हणजे सन 1980 पूर्वी कोणत्या ही देशामधील ‘दत्तक विधान ‘ प्रोसीजर ही वेळखाऊ आणि मनस्ताप देणारी नव्हती.  परंतु आत्ता ‘चाईल्ड ट्रॅफिकिंग ‘ मुळे सर्वच देशातील याबाबतचे कायदे एकदम कडक झालेले आहेत. 
       आमचे रात्रीचे फ्लाईट होते. हॉटेलच्या भाड्याचे पैसे घ्यायला ते तयार नव्हते. शेवटी वडिलांनी हट्टाने ते दिले. संध्याकाळी जेव्हा आम्ही जायला निघालो तेव्हा ती बाई मला पकडून ओक्साबोक्शी रडत होती. मला सोडायलाच तयार नव्हती. मला मिठी मारूनच होती. माझ्या बालमनाला तेव्हा समजले की कमी वेळेत सुद्धा माणूस दुसऱ्यावर माया, प्रेम, ममता करू शकतो, त्याकरीता फार मोठी किंवा जुनी ओळख असायलाच हवी असे काही नाही. कदाचित तिच्या नशिबात पुत्र सुख नसावे. वडिलांनी कसाबसा तिचा पिच्छा सोडवला. हा सर्व प्रकार पाहून रस्त्यावरचे लोक गोळा झाले होते, हा काय प्रकार सुरू आहे ? हे पहायला. आमचे रात्री 9 चे फ्लाईट होते. ते जंबो जेट प्रकारातील बोईंग 747 पेक्षा मोठे विमान होते. येताना फ्लाईट मधल्या जेवणाने माझे तोंड पोळले होते, म्हणून आता परत तोंड पोळून घ्यायचे नाही. याची मी जाणीवपूर्वक काळजी घेतली. 
        माझ्या बाजूलाच एक फॉरेनर जोडपे बसले होते. त्यातील गृहस्थ माझ्या शेजारी आणि त्याची पत्नी खिडकी जवळ बसली होती. परदेशी गृहस्थ इंग्लिशमध्ये मला विचारू लागला "Where is Bombay?" मराठी पाचवी मधला मुलगा त्याला काय उत्तर देणार? मग त्याने एक पेन आणि कागद घेतला त्यावर भारताचा नकाशा काढून त्याने ‘मद्रास’ कुठे आहे ते मला लिहून दाखवले आणि नकाशात ‘मुंबई ‘ कुठे आहे ? ते दाखव,असे त्याने मला सांगितले. यावेळी मुंबईचे ‘बॉम्बे ‘ नाव मला जेमतेम इंग्लिश मध्ये लिहिता येत होते. मी त्याला त्याने काढलेल्या नकाशात मुंबई कुठे आहे हे अगोदर डॉट काढून त्या खाली बॉम्बे लिहून दाखवले. त्यावर ती युरोपियन व्यक्ती एकदम खुश झाली. त्याने मला हात पुढे करून शेकहॅण्ड केले आणि “Very Clever Boy” असे म्हटले. कदाचित त्याचा हेतू भारतीय मुलाचे भूगोलाचे ज्ञान तपासण्याचा असावा. मग फ्लाईट मधल्या लाईट्स बंद झाल्याबरोबर मी गाढ झोपून गेलो ते एकदम सकाळी मुंबईचे एअरपोर्ट आल्यावरच जाग आली. लहान असल्यामुळे घरी आल्यावर थोडा Jet-Lag चा त्रास जाणवत होता. काहीही असो ! कमी वेळात माझ्यावर मुलासारखी माया करणारी आणि जीव टाकणारी ती माऊली अजूनही स्मरणातून काही जात नाही. ते प्रेम दिखाऊ होते ,की खरे हे देवास ठाऊक ?  तिच्या मायेचा मान ठेवून ते खरे होते असे समजायला काय हरकत आहे !

    'सिंगापूर स्टोरी ' 

    या लेखात सिंगापूर मध्ये फिरायला गेलेल्या भारतीय जोडप्या कडे त्यांचा मुलगा दत्तक मागणाऱ्या इंडो-  चायना जोडप्याची लघु कथा. संतती प्रेमा पोटी अभागी, वंचित असलेल्या माऊलीची कथा तुम्ही वाचली असेल.
                                                                     समाप्त🖋️📖📚

    🔗  “हळद रुसली” गिरगावातील जुन्या इमारतीतील पिशाच्चाची थरारक मराठी भयकथा  

    पुढील लघु कथा ही एक भयकथा आहे.ही गिरगावातील एका जुन्या इमारतीत घडलेली अंगावर काटा आणणारी मराठी भयकथा आहे. एका अविवाहित तरुणाला पिशाच्च शक्तींच्या जाळ्यात अडकवून त्याचे भुताशी लग्न लावण्याचा प्रयत्न आणि ‘सदगुरू दत्त’ नामामुळे झालेली त्याची थरारक सुटका! ही कथा वाचताना प्रत्येक क्षणी भीतीची जाणीव होईल..👉

 ✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा

पुढील भागासाठी ब्लॉगला Follow करा.आणि आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.

sjomkar.blogspost.com ब्लॉगला Follow करा.

तुमचे मत नक्की, अभिप्राय नक्की कळवा


SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी © All Rights Reserved


🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com

(ओमकार शिवलकर )

SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी -  लोगो




📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...