मुख्य सामग्रीवर वगळा

“गोठलेलं काश्मीर | २०१२ मधील अविस्मरणीय काश्मीर सफर, बर्फवृष्टी आणि जीवघेणा थरार

 “गोठलेलं काश्मीर : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”

गोठलेलं काश्मीर : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरारकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी  ”
गोठलेल्या बर्फात स्वर्गाचे रूप खुलले,
दल लेकच्या लाटांमध्ये स्वप्न आमचे झुलले |
नंदनवन पाहताना मन हरवून गेले,
पण दगडांच्या सावलीत थरारही अनुभवले |

 🔗 “बच्चा… मधुबाला मिली क्या?”| वेताळ, स्मशान आणि भन्नाट भय-विनोदी मराठी कथा ..

  "अमावस्येच्या रात्री वेताळाच्या पालखीच्या शोधात गेलेल्या आमच्या टोळीची भन्नाट भय-विनोदी कथा! स्मशान, वेताळ, मधुबाला आणि खिचडी पार्टी यांचा जबरदस्त कॉमेडी संगम.”

      'गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर ,बर्फवृष्टी आणि जीवघेणा थरार”

      माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.

   काश्मीर प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरेल. २०१२ मध्ये केलेल्या या काश्मीर सफरीत दल लेकवरील हाऊसबोट, गुलमर्गचे बर्फाच्छादित निसर्गसौंदर्य, पहलगामचे रमणीय दृश्य, गोंडोला राईडचा थरार आणि अचानक बदललेली परिस्थिती यांचा अविस्मरणीय अनुभव मिळतो. अफजल गुरु यांच्या फाशीनंतर निर्माण झालेला तणाव, कर्फ्यूचे वातावरण आणि त्या काळात पर्यटक म्हणून आलेले अनुभव या प्रवासवर्णनाला अधिक जिवंत आणि रोमांचक बनवतात.

अ) काश्मीर यात्रा नियोजन -
    ते फेब्रुवारी २०१२ चे वर्ष होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आमच्या जवळच्या आप्त-नातलगांसोबत आमचे तीन सदस्यीय कुटुंब काश्मीर टूरला निघाले होते. एकूण दहा जणांचा आमचा गोतावळा होता.
   फेब्रुवारी महिना म्हणजे काश्मीरचा कडाक्याचा हिवाळा! खरं तर काश्मीर एप्रिल-मे नंतर ते जूनपर्यंत पाहायचे असते, असं अनुभवी लोक सांगतात. पण आमचा उद्देश “फुललेलं काश्मीर” पाहण्यापेक्षा “गोठलेले काश्मीर” अनुभवण्याचा होता. आम्हाला बर्फ पाहायचा होता  आणि शक्य असेल तर त्यात मनमुराद हुंदडायचं सुद्धा होतं !
   आमच्या सर्व नातेवाईक मंडळींच्या सुट्ट्या आणि त्यांच्या वेळा ह्या त्या महिन्यातच एकत्र जुळून येत असल्याने प्रवासासाठी तोच योग्य काळ ठरला.  प्रत्येकाचे शेड्युल, ऑफिस, मुलांच्या परीक्षा, कुणाचे घरचे कार्यक्रम हे सर्व पाहता फेब्रुवारी महिना आमच्यासाठी “दैवी योग” ठरला.त्या प्रमाणे तारीख निश्चित झाली. मुंबईतील एका प्रसिद्ध टूर कंपनी मार्फत आमचा प्रवास ठरला. येण्या-जाण्याचा प्रवास हवाई मार्गे होता.
    प्रवासाचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतशी आमच्या घरात “काश्मीर अभियान तयारी” जोरात सुरू झाली होती.उनी कपडे, लोकरीचे स्वेटर, हातमोजे, कानटोपी, मफलर, मोजे, औषधं, कॅमेरे,  खाऊची पॉकेट्स  असा सगळा जामानिमा भरला जात होता.

      ब) विमान प्रवास -

   शेवटी एकदाचा प्रवासाचा दिवस उजाडलाच. आम्ही सगळे एअरपोर्टवर पोहोचलो. देशांतर्गत विमान प्रवासाची ही तशी माझी पहिलीच वेळ होती. परंतु विमान प्रवासाचा अनुभव माझ्या साठी मात्र नवीन नव्हता. माझे वडील ‘एअर इंडिया’ मध्ये होते. लहानपणी त्यांच्या सोबत माझे परदेश विमान प्रवास झालेले असल्यामुळे  विमानात बसण्याचे “कुतूहल किंवा उत्सुकता ” माझ्या मनात बिलकुल नव्हते.
      मी मात्र निवांत होतो. कारण मला आधीच माहित होते की विमान प्रवासात खरा थरार टेक ऑफ मध्ये नसतोच. विमान एकदा आकाशात गेले की पुढचे बरेच तास ते पांढऱ्या ढगांच्या समुद्रात हरवून जातं. खिडकीतून बाहेर पाहिले की फक्त पांढरे शुभ्र ढग, ना झाडे, ना माणसं, ना रस्ते काहीच दिसत नाही. खाली नेमकं काय चाललंय याचा काहीच अंदाज नसतो. मला तर तोच सगळ्यात मोठा थरार वाटायचा.
   कारण जमिनीवर असताना निदान कुठे आहोत हे तरी कळते पण विमानात बसल्यावर आपण आकाशात नेमके कुठे आहोत हे एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि पायलट यांनाच माहित असते!बाकीचे प्रवासी मात्र ढग पाहून खुश होत होते.
   सामानाची चेक-इन झाली आणि आमचं विमानात बोर्डिंग सुरू झाले. विमान ‘इंडिगो’ कंपनीचे होते. एअर होस्टेसच्या हसतमुख स्वागताने आम्ही आत शिरलो. वरच्या करियरमध्ये बॅगा ठेवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. शेवटी कसेबसे एकदाचे सामान त्यात बसले आणि नेमून दिलेल्या आमच्या सीटवर आम्ही स्थानापन्न झालो.
    एकदा माणूस “फॅमिली वाला” झाला की त्याने विंडो सीट कायमची विसरायची असते. कारण ती सीट नैसर्गिक हक्काने बायकोची किंवा मुलांचीच असते.आपल्या नशिबी काय?तर मधली किंवा साइड सीट!आणि मग विमाना मधील नजारा पाहण्यातच सुख मानायचं असतं.
     खिडकीजवळ बसलेली मंडळी मात्र मोठ्या उत्साहात ढग, रनवे, विमानाचे पंख, खाली दिसणारी घरे पाहत असतात. आणि आपण?आपण समोरच्या सीट वरून समोर एअर होस्टेज सुरक्षितेची प्रात्यक्षिके दाखवत असते ती फक्त पाहायची.
    भारतीय वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता श्रीनगरसाठी  आमच्या  विमानाने    ‘सांताक्रूझ एअर पोर्ट’ वरून उड्डाण केल्यानंतर विमानातून खाली मुंबईचे विहंगम दृश्य दिसायला लागले. मुलगी विंडो सीटवरून ते दृश्य मन भरून पाहत होती,मुंबईला एक पूर्ण घिरटी घालून विमानाने प्रवास सुरू केला. नंतर मात्र खिडकीतून फक्त ढग आणि ढगच दिसत होते आणि विमानाचा पंख, बाकी काही नाही. एअर होस्टेज सुरक्षेच्या वेगवेगळ्या सूचना देत होत्या. सुरुवातीला चहा-कॉफी, स्नॅक्सच्या फेऱ्या झाल्यात.
   जुन्या काळात हवाई प्रवासात ‘डाउनड्राफ्ट इफेक्ट’ चा अनुभव सर्वांनाच जाणवायचा, विशेषतः नवीन प्रवाशांना तो जास्त जाणवायचा.  हा अनुभव विमान खाली येतानाच जास्त जाणवायचा, वर जाताना मात्र तसे काहीही वाटायचे नाही. ही जी भीती आहे, ती उंच आकाश पाळण्यातून अचानक खाली येताना जसे वाटते तशी होती. आताच्या नवीन आणि प्रगत विमान तंत्रज्ञानामुळे,तसा अनुभव मला काश्मीर विमान प्रवासात बिलकुल आला नाही. 
      विमान भारतीय सरहद्द सोडून पाकिस्तान हद्दीतून प्रवास करत असल्याचे एअर होस्टेज ने अनाउन्समेंट करून सांगितले. बऱ्याच भारतीय विमान प्रवासांमध्ये पूर्वी विशेषतः उत्तर भारत/काश्मीर मार्गावर विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जात असत.
   विमान श्रीनगर एअरपोर्ट  वर लँड झालं आणि प्रवाशांचे ‘डीबोर्डिंग’ सुरू झाले. विमानातून बाहेर पडताच श्रीनगरच्या थंडीने पहिल्याच क्षणी आमचे जोरदार स्वागत केले. एअरपोर्टच्या लॉबी मध्ये शिरल्या शिरल्या मला अचानक कुडकुडी भरून आली. मुंबईच्या उकाड्यातून थेट त्या बर्फाळ वातावरणात शिरल्यावर शरीराला सुद्धा दोन मिनिटं विचार करावा लागतो. 
     माझी तर नेहमीचीच ही समस्या. अचानक थंड हवेत गेले की शरीरातील रक्त त्या वातावरणाशी “सेट” होईपर्यंत काही वेळ मला थरथरायला होते.बाकीचे नातेवाईक मात्र उत्साहात होते. काहीजणांनी लगेच कान टोपी डोक्यावर चढवली, काहींनी हातमोजे घातले, तर काहीजण फक्त तोंडातून धूर निघतोय का हे पाहण्यात व्यस्त होते.
    सर्व बॅगेज हातात आल्यावर आमचा स्थानिक टूर मॅनेजर हातात आमच्या नावाचा फलक घेऊन उभा होता. आम्ही सगळे त्याच्या भोवती जमा झालो. त्याने आमचे स्वागत केले आणि आवश्यक सूचना दिल्यानंतर तो आम्हाला एअरपोर्टच्या बाहेर घेऊन आला. बाहेर आमच्यासाठी १२ सीटर एसी मिनी बस तयार उभी होती. त्यानंतर त्याने आमची बस चालक ‘फजल’ याच्याशी ओळख करून दिली. “हे फजल, पुढील संपूर्ण प्रवासात हेच तुमचे ड्रायव्हर कम गाईड असतील,” असे तो म्हणाला. फजलने हसून आमचे स्वागत केले. पुढील सात दिवस काश्मीरमधील विविध स्थळांचा प्रवास त्याच्या सोबतच होणार होता.

 क) दल लेक आणि हाऊसबोट अनुभव -

     आम्ही आमचे सामान घेऊन मिनी बसमध्ये स्थानापन्न झालो. गाडी सुरू होताच श्रीनगर शहर कसे आहे ते डोळेभरून पाहण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले उंच चिनार वृक्ष, थंडगार हवा, मधूनच दिसणाऱ्या लष्कराच्या चौक्या आणि पारंपरिक काश्मीरी घरे पाहताना आपण खरोखरच काश्मीरमध्ये आलो आहोत याची जाणीव होत होती. शहरात एक वेगळीच शांतता आणि सौंदर्य जाणवत होते.
     सुमारे अर्ध्या तासाने ड्रायव्हर आम्हाला दल लेक कडे घेऊन आला. विशाल दल लेक डोळ्यांत मावत नव्हता. दूरवर पसरलेले शांत पाणी, त्यावर तरंगणारे शेकडो लहानमोठे बोट हाऊस आणि इकडून तिकडे फिरणाऱ्या शिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर जिवंत वाटत होता. रंगीबेरंगी सजवलेले बोट हाऊस पाण्यावर संथपणे डुलत होते. काहींवर सुंदर लाकडी नक्षीकाम केलेले होते तर काहींवर रंगीत पडदे आणि फुलांची सजावट दिसत होती. त्या सगळ्या दृश्यात एक वेगळीच राजेशाही झलक जाणवत होती.
   लहान शिकाऱ्यांची सतत ये-जा सुरू होती. काही शिकाऱ्यांमध्ये ताजी फळे, भाज्या आणि फुले दिसत होती तर काहींमध्ये हस्तकला वस्तू, शाली, दागिने आणि केशर विकणारे व्यापारी पर्यटकांना हाक मारत होते. तलावावरील हे तरंगते बाजार पाहताना खूप वेगळा अनुभव येत होता. काही शिकाऱ्यांमध्ये चहा आणि स्थानिक खाद्यपदार्थ विकणारे सुद्धा फिरत होते.
    लेकच्या डावीकडे नजर गेल्यावर तलावाचा एक भाग पूर्ण हिरवागार दिसत होता. क्षणभर मला वाटले, “एवढे शेवाळ बापरे!” पण लगेच मनात वाचलेली माहिती आठवली. दल लेकमधील पाण्यावर तरंगत्या पद्धतीने केली जाणारी शेती म्हणजेच “फ्लोटिंग गार्डन्स” किंवा स्थानिक भाषेत “राड” म्हणून ओळखली जाणारी शेती होय. ही शेती पाण्यावर तरंगणाऱ्या गवत, जल वनस्पती आणि चिखल यांच्या थरांवर तयार केली जाते. त्या तरंगत्या बेटांसारख्या पट्ट्यांवर काकडी, टोमॅटो, पालक, मुळा आणि इतर भाज्यांची लागवड केली जाते.
     दल लेक फ्लोटिंग गार्डन्स ही तरंगती शेती जगभर प्रसिद्ध आहे. पाण्यावर तयार केलेल्या नैसर्गिक बेटां सारखी दिसणारी ही शेती पाहून निसर्ग आणि मानवी कल्पकता यांचे अद्भुत मिश्रण अनुभवायला मिळत होते. त्या शांत तलावात तरंगणारी हिरवीगार शेती पाहताना मन अक्षरशः भारावून गेले होते.
     आम्ही तलावाच्या जेटीजवळ आलो आणि गेट नंबर ९ च्या घाटावर उतरलो. जसे समुद्रकिनारी बोटी लागण्याच्या जागेला बंदर किंवा जेटी म्हणतात तसेच तलावातील होड्या आणि शिकारे पकडण्याच्या जागेला घाट म्हटले जाते. घाटावर सतत पर्यटकांची ये-जा सुरू होती. कुठे सामान वाहून नेणारे लोक, कुठे पर्यटकांना आवाज देणारे शिकारेवाले तर कुठे फोटो काढण्यात मग्न झालेले पर्यटक दिसत होते. त्या सगळ्या गजबजाटात सुद्धा दल लेकची शांतता मात्र अबाधित होती.
   थोड्याच वेळात मध्यम आकाराच्या शिकाऱ्यात आम्ही सर्व दहा जण आणि आमचे सामान चढले. शिकारा हळूहळू पाण्यावरून पुढे सरकत होता. त्याच्या संथ हालचालीं सोबत दल लेकचे निसर्ग सौंदर्य जणू आमच्या समोर उलगडत होते. आजूबाजूला अथांग पसरलेले शांत पाणी आणि त्याच्या पलीकडे निरभ्र आकाशाशी स्पर्धा करणारी हिमाच्छादित पर्वतशिखरे दिसत होती. त्या शुभ्र बर्फावर पडणाऱ्या सूर्य किरणांमुळे ती शिखरे तेजाळून निघाली होती. क्षणभर असे वाटत होते की ही साधी हिमशिखरे नसून जणू सुवर्ण मंडित पर्वतच आमच्यासमोर उभे आहेत.
  गार वाऱ्यामुळे अंग अक्षरशः गोठून जात होते. गाडीत बसल्यावर आम्ही डोक्यापासून पायापर्यंत सर्व लोकरीचे कपडे चढवले होते, हातमोजे, पायमोजे, कानटोपी सर्व काही घातले होते; तरीही बोचरी थंडी कपड्यांच्या आत शिरून अंगाला झोंबत होती. शिकाऱ्यात बसल्यावर तलावा कडून येणारी थंड हवा आणखी तीव्र जाणवत होती. काही वेळ आम्ही बोलणेही कमी केले आणि फक्त निसर्ग न्याहाळत बसलो.
    आता आम्हाला उत्सुकता लागली होती की आमची हाऊसबोट नेमकी कशी असेल. आजूबाजूला अनेक रंगीबेरंगी आणि विविध आकारांच्या हाऊस बोटी दिसत होत्या. काही अगदी राजवाड्या सारख्या सजवलेल्या होत्या तर काही साध्या पण आकर्षक वाटत होत्या. प्रत्येक हाऊस बोटीवर सुंदर लाकडी कोरीवकाम केलेले दिसत होते. काहींना रंगीत दिव्यांची सजावट होती तर काहींच्या बाल्कनीत फुलझाडे ठेवलेली होती.
     थोड्या वेळाने आमची दल लेक हाऊसबोट जवळ आली. बाहेरूनच ती अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत होती. लाकडी नक्षीकामाने सजवलेले प्रवेशद्वार आणि खिडक्यां वरील कोरीव डिझाईन्स पाहून जुन्या राजेशाही काळाची आठवण येत होती. आतमध्ये प्रवेश करताच जणू पाण्यावर तरंगणाऱ्या छोट्याशा घरात आलो आहोत असे वाटले. आपल्या कडच्या 3 BHK घरासारखी तिची रचना होती. पायाखाली संपूर्ण शिकाऱ्यामध्ये  लाल रंगाची मऊ जाजम अंथरलेली होती. दिवाणखान्यात काश्मीरच्या निसर्ग चित्रांच्या मोठमोठ्या तसबिरी लटकवलेल्या होत्या. संपूर्ण सजावट लाल रंगाच्या विविध छटां मध्ये करण्यात आली होती. सोफा, पडदे, गालिचे आणि त्यावरील दुलया सुद्धा लाल रंगाशी सुसंगत होत्या. त्या उबदार सजावटी मुळे बाहेरची थंडी थोडी विसरल्यासारखी वाटत होती.
  प्रवासातून आल्यावर आंघोळ करणे किंवा निदान हातपाय स्वच्छ धुणे ही आपल्याकडची अंगवळणी पडलेली सवय पण इथे तीच सवय जणू शत्रू ठरत होती. पायमोजे आणि हातमोजे काढावे तर बोचरे थंड पाणी आणि थंड वातावरण हाता पायांचे तळवे अक्षरशः गोठवून टाकत होते. नळातून येणारे पाणी इतके थंड होते की हात लावताच अंगावर शहारे येत होते. शेवटी कसाबसा धीर करून आम्ही फक्त हात धुतले आणि लगेच पुन्हा हातमोजे चढवले. त्या क्षणी काश्मीरची थंडी नेमकी काय असते याची खरी जाणीव झाली.
   थोड्याच वेळात नाश्त्याची तयारी झाली. डायनिंग टेबलवर गरमागरम पदार्थ मांडले गेले होते. नाश्त्याला काश्मीरी रोटी, आलू पराठे, शिरमाल, ब्रेड-बटर-जॅम, गरम दूध आणि उकडलेली अंडी असे पदार्थ होते. बाहेर कडाक्याची थंडी असल्यामुळे गरमागरम पराठे आणि दूध घेताच शरीरात उब पसरल्यासारखे वाटले. शिरमालची हलकी गोडसर चव आणि त्याचा केशराचा मंद सुगंध खूपच वेगळा आणि स्वादिष्ट वाटत होता. तलावाच्या शांत वातावरणात बसून घेतलेला तो नाश्ता आयुष्यभर लक्षात राहावा असा अनुभव होता.
    नाश्ता झाल्यावर थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा शिकाऱ्यातून दल लेक सफारी सुरू झाली. शिकारा पाण्यावर संथपणे पुढे सरकत होता आणि आजूबाजूचा निसर्ग जणू आमच्यासोबत प्रवास करत होता. काही वेळातच होडीतून सामान विकणारे व्यापारी आमच्या शिकाऱ्याजवळ येऊ लागले. त्यांनी त्यांच्या छोट्या होड्या आमच्या शिकाऱ्याला अगदी अलगद चिकटवल्या आणि त्यातील सामान दाखवू लागले. कुणाकडे रंगीबेरंगी शाली होत्या, कुणाकडे केशर, सुकामेवा, दागिने, लाकडी हस्तकला वस्तू तर कुणाकडे फुलांचे गुच्छ होते. आमच्या शिकाऱ्याभोवती सहा-सात होड्या जमा झाल्या होत्या. प्रत्येक व्यापारी आपल्या वस्तूंचे कौतुक करून आम्हाला खरेदीसाठी आग्रह करत होता. त्या तरंगत्या बाजाराचा अनुभव अतिशय वेगळा आणि रोमांचक वाटत होता.
     ज्यांना जे आवडले ते विकत घेत होते. काहीजण केशर आणि ड्रायफ्रूट घेत होते तर काहीजण काश्मीरी शाली आणि स्मृतिचिन्हे पाहण्यात मग्न झाले होते. संपूर्ण मार्केट फिरताना असाच अनुभव येत होता. पाण्यावरच उभे राहून सुरू असलेले हे बाजारपेठेचे जीवन पाहून आश्चर्य वाटत होते. तलावावरील लोकांचे दैनंदिन जीवन किती वेगळे आणि पाण्याशी किती जोडलेले आहे याची जाणीव होत होती.
    ती सफारी पूर्ण करून दुपारी आम्ही परत आमच्या दल लेक हाऊसबोट वर आलो. थंडीमुळे भूकही चांगलीच लागली होती. थोड्याच वेळात जेवणाची तयारी झाली. दुपारच्या जेवणात गरमा गरम रोट्या, राजमा भाजी, डाळ, पनीरची भाजी, आलू दम, चिकन करी किंवा प्रसिद्ध रोगन जोश, तसेच सुगंधी काश्मीरी पुलाव असे अनेक स्वादिष्ट पदार्थ होते. पुलावा मध्ये घातलेले सुकामेवा आणि मसाल्यांचा सुगंध संपूर्ण खोलीत दरवळत होता. थंड वातावरणात गरमागरम काश्मीरी जेवणाचा आस्वाद घेताना प्रवासाचा सगळा थकवा नाहीसा झाला.
   मी सहज कुतूहल म्हणून शिकाऱ्यावाल्याला विचारले, “एवढ्या विविधरंगी हाऊसबोटी आहेत, त्यातून आपली बोट ओळखायची झाली तर फक्त नाव लक्षात ठेवले तरी पुरेसे होईल का?” त्यावर तो हसत म्हणाला, “साहब, एकवेळ बोटीचे नाव विसरलात तरी चालेल; पण बोटीचा नंबर लक्षात ठेवणे फार आवश्यक आहे. नाहीतर रात्रीच्या वेळी चुकीच्या हाऊसबोटीत जाल आणि अनोळखी माणसांचे काही खरे नाही!” त्याचे ते बोलणे ऐकून आम्हीही हसलो पण त्यातले वास्तव लगेच लक्षात आले. कारण दल लेक मध्ये शेकडो हाऊस बोटी पाण्यावर तरंगत असतात आणि रात्रीच्या अंधारात त्या सगळ्या जवळपास सारख्याच भासतात.
    संध्याकाळ होईपर्यंत सतत कोणी ना कोणी व्यापारी शिकाऱ्यांमधून आमच्या हाऊस बोटीजवळ येत होते. संध्याकाळी पुन्हा एक छोटा तराफा आला आणि आम्ही पाण्यावरची शेती पाहण्यासाठी निघालो. दल लेक फ्लोटिंग गार्डन्स जवळून पाहताना आश्चर्य वाटत होते. पाण्यावर तरंगणाऱ्या त्या हिरव्यागार पट्ट्यांवर भाजीपाला पिकवलेला दिसत होता. काही ठिकाणी स्थानिक लोक छोटी होडी घेऊन त्या शेतीत काम करत होते. त्या शांत वातावरणात शिकाऱ्याच्या पाण्यावर उमटणाऱ्या लहरींचा मंद आवाज फारच सुखद वाटत होता.
   परत येईपर्यंत वातावरणातील प्रकाश हळूहळू कमी होत चालला होता. आकाशात संधिप्रकाश पसरू लागला होता. आम्ही घाईघाईने काश्मीरी पारंपरिक पोशाख घालून फोटो सेशन सुरू केले. कारण काही वेळातच अंधार पडणार होता. त्या मंद प्रकाशात बर्फाच्छादित पर्वतांवरून परावर्तित होणारा उजेड अजूनही आपली झलक दाखवत होता. क्षणभर असे वाटत होते की संपूर्ण निसर्गाने स्वतःभोवती रुपेरी शाल पांघरली आहे. आणि मग अचानक जणू कुणीतरी एका क्षणात दिव्याचा स्विच बंद करावा तसा काळोख दल लेक वर पसरला.
   काही क्षणांतच सर्व हाऊस बोटीवरील दिवे लागले आणि दल लेक अक्षरशः उजळून निघाला. विविध रंगांचे दिवे तलावाच्या श्यामवर्णी पाण्यावर पडून जणू रंगीबेरंगी रांगोळीच तयार झाली होती. ते दृश्य इतके मनमोहक होते की बराच वेळ आम्ही शांतपणे फक्त तेच न्याहाळत बसलो होतो. परत हाऊस बोटीवर आल्यावर गरमा गरम वाफाळलेला कावा चहा पुढे आला. केशर, दालचिनी आणि सुगंधी मसाल्यांचा दरवळ असलेला तो कावा घेताच अंगात उब पसरल्या सारखे वाटले.
      हाऊस बोटीच्या पुढील डेकवर आराम खुर्चीत बसून आम्ही रात्रीच्या दल लेकचे सौंदर्य अनुभवत होतो. हवेतला गारवा आता आणखी वाढू लागला होता. दूरवरून शिकाऱ्यांच्या हालचाली दिसत होत्या आणि त्यांच्या पाण्यावर उमटणाऱ्या मंद लहरी रात्रीच्या शांततेला एक वेगळाच स्वर देत होत्या. महिला वर्ग अजूनही फिरत्या व्यापाऱ्यां कडील वस्तू खरेदी करण्यात रमल्या होत्या.
     रात्रीच्या जेवणात आमच्या मागणीनुसार स्थानिक बाजारातून आणलेल्या माशाचे कालवण, बोकडाचे मटण, चिकन सूप, चिकन बिर्याणी असे अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवले होते. थंड वातावरणात गरमागरम जेवणाची चव आणखी खुलून येत होती.  रात्र जसजशी वाढत गेली तसतसा थंडीने अक्षरशः कहर केला. अंगात लोकरीचे कपडे, अंगावर जाडजूड रजया आणि दुलया असूनही थंडी कमी होत नव्हती. पायाखाली गरम पाण्याच्या छोट्या बॅगा ठेवण्यात आल्या होत्या. तरीसुद्धा बोचरी थंडी आतपर्यंत शिरत होती. त्या रात्री एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली उन्हाळ्यात खूप उकाडा असला तरी झोप लागत नाही आणि काश्मीर सारख्या कडाक्याच्या थंडीतही झोप सहज येत नाही. त्याक्षणी आपल्या घरचा साधा एसी सुद्धा किती बरा असतो, असे वाटून गेले.
     दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम गरम पाण्याने आंघोळी आटोपल्या. बाहेरच्या कडाक्याच्या थंडीत गरम पाण्याचा स्पर्श म्हणजे जणू एखादे वरदानच वाटत होते. त्यानंतर गरमा गरम आणि भरपूर असा हेवी ब्रेकफास्ट झाला. पराठे, ब्रेड-बटर, उकडलेली अंडी, चहा आणि काही स्थानिक पदार्थ खाऊन अंगात चांगलीच ताकद आली. सकाळचे वातावरण अत्यंत प्रसन्न होते. तलावावर हलके धुके पसरले होते आणि सूर्य किरणे त्या धुक्यातून आरपार जात असल्यामुळे संपूर्ण परिसर अधिकच मोहक दिसत होता.
    सकाळी साधारण आठ वाजता आम्ही ‘आदी शंकराचार्य मंदिर’ येथे जाण्यासाठी, हाऊस बोटीतून चेक आऊट झालो. भगवान शंकराला समर्पित असलेले हे प्राचीन मंदिर डोंगरावर वसलेले आहे. पूजनीय आदि शंकराचार्य यांनी येथे ध्यान केल्याची श्रद्धा असल्यामुळे या स्थळाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. थोडासा घाट युक्त रस्ता पार केल्यानंतर ड्रायव्हरने रस्त्याच्या बाजूला बस पार्क केली आणि सांगितले, “आता पुढे पायीच जावे लागेल. वरती सुरक्षा दलाची पोस्ट असल्यामुळे गाड्यांना परवानगी नाही.”
    आम्ही वर जाणाऱ्या रस्त्याने चालू लागलो. काही अंतरावर केंद्रीय राखीव पोलिस दलाची सुरक्षा चौकी होती. तपासणी करून पुढे गेल्यावर दगडी बांधणीचा २४३ पायऱ्यांचा जिना सुरू झाला. थंड हवेमुळे श्वास जरा वेगाने लागत होता, पण मंदिरात पोहोचण्याची उत्सुकता असल्यामुळे आम्ही तो जिना जवळजवळ एका दमात पार केला. वर पोहोचल्यावर मंदिरातील शांत आणि पवित्र वातावरण मनाला विलक्षण प्रसन्न करून गेले. दर्शन घेताना एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती जाणवत होती.
    तेथील एका स्थानिक व्यक्तीने सांगितले की ‘जय जय शिव शंकर’ हे प्रसिद्ध गाणे, ज्यात राजेश खन्ना आणि मुमताज यांच्यावर चित्रिकरण झाले होते, त्यातील काही दृश्ये या परिसरात चित्रित करण्यात आली आहेत. त्यामुळे त्या ठिकाणाशी सिनेसृष्टीची ही एक आठवण जोडली गेली आहे.
    मंदिर डोंगरावर असल्यामुळे वरून दिसणारे दृश्य अत्यंत अप्रतिम होते. संपूर्ण दल लेक, त्यावर तरंगणाऱ्या हाऊस बोटी, दूरवर पसरलेले श्रीनगर शहर आणि भोवती उभ्या असलेल्या पर्वतरांगा यांचे विहंगम दृश्य डोळ्यांत साठवून ठेवावे असे वाटत होते. वरून दिसणाऱ्या दल लेकच्या शांत पाण्यावर पडलेला सूर्यप्रकाश जणू चांदी सारखा चमकत होता.

   ड)  गुलमर्गची बर्फ यात्रा -

  आमचा पुढचा पडाव हा गुलमर्ग होता,आम्ही गुलमर्गकडे रवाना झालो. हिमालयातील पीर पंजाल पर्वतरांगांच्या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये वसलेले गुलमर्ग हे आशियातील सर्वांत लांब आणि उंच स्की स्लोप पैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.गुलमर्गच्या दिशेने जाताना घाट सुरू होण्याच्या आधीच रस्त्याच्या दुतर्फा अनेक दुकाने दिसत होती. त्या दुकानांमध्ये थर्मल वेअर, जाड जॅकेट, ग्लोव्हज, वूलन कॅप, स्नो शूज आणि बर्फात वापरण्याचे इतर कपडे भाड्याने देत होते. पर्यटक तिथे थांबून आपापल्या गरजेनुसार कपडे घेत होते. आम्ही सुद्धा आमच्या गरजे नुसार तसे भाड्याचे कपडे आणि शूज घेतले.
    त्या परिसरात सर्वत्र थंडीचा प्रभाव स्पष्ट जाणवत होता आणि पुढे किती प्रचंड बर्फ असेल याची कल्पनाच येत होती. पण प्रत्यक्षात त्या थंडी समोर आपले कपडे किती कमी पडतात याची खरी प्रचिती पुढे आली. स्थानिक लोक वारंवार सांगत होते की, “वरती गेल्यावर ही थंडी वेगळीच असते.” आणि ते अक्षरशः खरे निघाले.
  गुलमर्गकडे जाणाऱ्या घाट रस्त्यावर पोहोचल्यावर आमच्या मिनी बसच्या ड्रायव्हरने आम्हाला दुसऱ्या विशेष बसमध्ये बसवले. बर्फाळ आणि घसरड्या रस्त्यांवर चालण्यासाठी त्या बसच्या चारही टायरांना जाड लोखंडी साखळ्या बसवलेल्या होत्या. त्या साखळ्या रस्त्यावर आदळताना एक वेगळाच आवाज करत होत्या. आजूबाजूला सर्वत्र शुभ्र बर्फ पसरलेला होता. काही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच बर्फाच्या भिंती तयार झाल्या होत्या. वातावरणात एवढी थंडी होती की श्वासातून निघणारी वाफ स्पष्ट दिसत होती.
    मात्र पुढे अचानक मोठी ट्रॅफिक जाम झाली. आमची बसच नव्हे तर अनेक गाड्या त्या रस्त्यावर अडकून पडल्या होत्या. पुढे काय झाले आहे याची कोणालाच नीट माहिती नव्हती. आम्ही जवळ जवळ तास-दीड तास त्याच अवस्थेत बसून होतो. बाहेर पडावे तर बोचरी थंडी आणि आत बसावे तर सततची प्रतीक्षा. त्या वेळी ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, उत्तर काश्मीर मध्ये झालेल्या  प्रचंड बर्फवृष्टीमुळे “काल रात्री तर आम्ही पूर्ण रात्रभर असेच या रस्त्यात अडकून पडलो होतो.” ते ऐकून अक्षरशः उरात धस्स झाले. त्या निर्जन बर्फाळ रस्त्यावर रात्रभर अडकून राहण्याची कल्पनाच अंगावर काटा आणणारी होती.
      काही वेळाने प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी बर्फ हटवून रस्ता मोकळा केला आणि वाहनांची रांग हळूहळू पुढे सरकू लागली. अखेर आम्ही गुलमर्ग मधील आमच्या ३ स्टार हॉटेलवर पोहोचलो.ते मुळात हॉटेल वाटतच नव्हते.उत्तर गोलार्धातील थंड प्रदेशातील बर्फाचे घर ‘इग्लू’ सारखे वाटत होते ते संपूर्ण बर्फाखाली झाकले गेले होते. फक्त दरवाजा आणि खिडक्या मधील बर्फ तेव्हढा बाजूला सरला होता.तेथे पोहोचून आम्ही हॉटेलमध्ये चेक-इन केले. 
      थोडा आराम केल्यानंतर संध्याकाळी परिसरातील कडक आणि टणक बर्फावर  फिरण्यासाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी बाहेर पडलो . हॉटेलच्या आजूबाजूला फक्त आणि फक्त शुभ्र बर्फ दिसत होता. झाडे, रस्ते, छप्परे सगळेच बर्फाच्या पांढऱ्या चादरी खाली झाकले गेले होते. त्या परिसरात एक विलक्षण शांतता भरून राहिली होती. इथला बर्फ हा स्केटिंग आणि स्कीइंग मुळे टणक झालेला आहे.स्केटिंग आणि स्कीइंग करताना खूप लोक दिसले विदेशी नागरिक सुद्धा त्यात खूप होते.आमचा तो कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सकाळी होता.
     आम्ही लोखंडी खिळे असलेले विशेष स्नो शूज घातले होते तरीसुद्धा बर्फावर चालताना सतत घसरण होत होती. अक्षरशः असा एकही माणूस दिसत नव्हता की जो बर्फावर एकदा तरी घसरून पडला नाही. कुणी हसत पडत होते तर कुणी दुसऱ्याला धरून स्वतःचा तोल सांभाळत होते. त्या पडापडी मध्येही सगळे मजा घेत होते.  रात्रीचा मुक्काम त्याच हॉटेलवर होता.
     मात्र त्या बर्फात फिरताना एक गोष्ट लगेच लक्षात आली. अनेक ठिकाणी बर्फावर मोठमोठे पिवळसर डाग दिसत होते. ते म्हणजे लोकांनी किंवा प्राण्यांनी लघुशंका केलेल्या जागांचे डाग होते. त्यामुळे वरवर स्वच्छ आणि शुभ्र दिसणारा बर्फ प्रत्यक्षात तोंडात घेण्यास किंवा खाण्यास योग्य नसतो हे स्पष्ट झाले. अनेक पर्यटक उत्साहात बर्फ हातात घेऊन तोंडात टाकतात; पण प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यावर आम्ही तो विचार लगेच सोडून दिला.
     दुसऱ्या दिवशी सकाळी चहा- नाश्ता झाल्यानंतर  खिलनमर्गच्या स्की स्लोप्सना भेट देऊन स्केटिंग आणि स्कीइंग करण्याची खूप मजा केली हा अनुभव अजून माझ्या डोळ्या समोर येतो.ती बर्फाळ मौजमजा झाल्यावर तिथल्या बर्फाच्छादित एका धाब्यावर चविष्ट आणि लज्जतदार जेवण केले.तेव्हा  तर मला राहून राहून आम्ही उत्तर गोलार्धातील प्रदेशात असल्या सारखे  वाटत होते. 
    जेवणानंतर आम्ही गोंडोला राईड  ही रोप वे फेरी केली.अवर्णनीय असली तरी बर्फाच्या जंगलात ती मध्येच अडकली तर काय होईल ? हा नकोसा प्रश्न सारखा येत होता.  गोंडोला ( रोप वे केबिन ) मधून  दिसणारे बर्फाच्छादित दऱ्या खोऱ्यांचे दृश्य मन थक्क करून टाकणारे होते. मधून मधून जंगली ससे खूप दिसलेत. पाईन,देवदार वृक्षाच्या भाऊगर्दीत मधेच चिनार वृक्ष सुद्धा दिसून येत होते.माझ्या बाजूला सहचारिणी बसली होती. त्या साऱ्या परिस्थितीचा आणि प्रवासातील प्रत्येक क्षणाचा ती मनापासून आनंद घेत होती. हा अनुभव खूपच थरारक होता.
    तिकडे आम्ही दोन रात्री मुक्काम केला. तापमान उणे ९ अंशांपर्यंत खाली गेले होते. रात्रीच्या वेळी बाहेर पडणे म्हणजे स्वतःला थंडीच्या हवाली करण्यासारखे वाटत होते. हातमोजे, मफलर, जाड जॅकेट आणि लोकरीचे अनेक थर घातले तरी थंडी शरीरात गनिमी कावा केल्यासारखी  शिरतच होती. हॉटेलच्या खोलीत हीटर असूनही रात्री झोपताना रजई मध्ये गुंडाळून बसावे लागत होते. त्या दोन दिवसांत काश्मीरच्या थंडीची खरी ताकद अनुभवायला मिळाली. त्यानंतर आमचा पुढचा मुक्काम होता पहलगाम.

   इ ) पहलगाम आणि बैसरन घाटी

    झेलम नदी पार करत आमची मिनी बस पहलगाम येथे पोहोचली. वाटेत दिसणारी निसर्गरम्य दृश्ये मन मोहून टाकत होती. नदीच्या काठा वरची छोटी गावे, पाइन वृक्षांच्या रांगा आणि डोंगरांच्या कुशीतून जाणारे वळणावळणाचे रस्ते पाहताना प्रवासाचा थकवा जाणवतच नव्हता. पहलगाम मध्ये पोहोचल्यानंतर लक्षात आले की इथे कुठेच बर्फ पसरलेला दिसला नाही. हे असे कसे ? असे ड्रायव्हरला विचारल्यावर तो म्हणाला “फक्त काही विशिष्ट भागांमध्ये, जसे की बैसरन व्हॅली अशा ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर बर्फ साचलेला  दिसून येईल” असे ड्रायव्हर म्हणाला.(याच बैसरन घाटीत मागील वर्षी एप्रिल/२०२५  मध्ये  निरपराध पर्यटकांवर अतिरेक्यांनी निर्घुण हल्ला केल्याची घटना घडली होती, तेच हे ठिकाण) गुलमर्गची थंडी अंगाला चिटकून राहणारी तर पहलगामची थंडी ही  बोचरी होती. अंगावर अनेक थरांचे कपडे असून सुद्धा थंड वाऱ्याने अंगावर अक्षरशः काटा येत होता.

  पहलगामला पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती, त्यामुळे त्या दिवशी फक्त हॉटेलमध्ये जाऊन विश्रांती घेतली. बाहेर थंडी एवढी होती की गरम चहा हातात घेऊन बसण्यातच एक वेगळी मजा येत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी बैसरन घाटी पाहण्याचा कार्यक्रम ठरला होता. त्यानुसार सकाळी आम्ही दहा घोडे बुक केले. प्रत्येक घोड्यासोबत त्याचा घोडेवाला सुद्धा होता. घोड्यांवर बसून आम्ही वरच्या दिशेने निघालो.

   हिवाळ्यामुळे बैसरन घाटीकडे जाणाऱ्या चढाच्या मार्गावर अर्ध्या पुरुषाएवढा भुरभुरीत बर्फ पसरलेला होता. त्या बर्फातून घोडे अतिशय सहजपणे चालत होते. मध्येच एखाद्या घोड्याचा पाय घसरला की क्षणभर धडकी भरत होती; पण ते घोडे रोजच्या सवयीप्रमाणे लगेच स्वतःला सावरत पुढे निघत होते. मला मिळालेला घोडा खूपच चपळ होता. तो सतत सर्वांच्या पुढे राहण्याचा प्रयत्न करत होता. त्याला पुढे दुसरा घोडा असलेला अजिबात सहन होत नव्हता. त्यामुळे माझी सफर थोडी जास्तच रोमांचक झाली होती.
    काही वेळाने आम्ही बैसरन घाटीतील त्या प्रसिद्ध सपाट गवताळ माळरानावर पोहोचलो. मात्र हिवाळ्यामुळे संपूर्ण परिसर बर्फाने झाकला गेला होता. त्यामुळे तेथे फिरण्यापेक्षा फक्त ते अप्रतिम दृश्य पाहण्यातच आम्ही रमलो. उन्हाळ्यात येथे खूप चहलपहल असते, पर्यटकांची गर्दी असते आणि संपूर्ण विस्तीर्ण हिरवेगार मैदान नजरेच्या टप्प्यात दिसते असे स्थानिक सांगत होते. सभोवताली उभे असलेले उंच पाइन वृक्ष आणि मधोमध पसरलेले ते विशाल मैदान पाहूनच त्याला “मिनी स्वित्झर्लंड” का म्हणतात याची कल्पना येत होती.
     त्यानंतर आम्ही अरू व्हॅली आणि चंदनवारी हे परिसरही घाईघाईत पाहून घेतले. अरू व्हॅलीचे शांत आणि निसर्गरम्य वातावरण तर चंदनवारीच्या बर्फाळ दृश्यांनी मन भारावून गेले. मात्र वेळ कमी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी फार वेळ थांबता आले नाही. वाटेत थोडा वेळ ‘बीज बेहरा’ येथे क्रिकेटच्या बॅट्स तयार होणाऱ्या कारखान्याला भेट दिली. काश्मीरमधील प्रसिद्ध विलो लाकडापासून बनणाऱ्या या बॅट्सची प्रक्रिया पाहताना सर्वांनाच उत्सुकता वाटत होती. तिथेच एका दुकानातून अस्सल काश्मिरी मधही विकत घेतले. त्यानंतर आमची गाडी सुकामेवा मार्केटकडे वळली. बदाम, अक्रोड, काजू आणि केशर यांची सर्वांनी मनसोक्त खरेदी केली. खरेदी आटोपेपर्यंत संध्याकाळ झाली होती आणि त्यानंतर आम्ही पुन्हा श्रीनगर मध्ये परतलो.

        ई) श्रीनगर दर्शन -

     कारण पुढचा संपूर्ण दिवस श्रीनगर फिरण्यासाठी राखून ठेवलेला होता. श्रीनगर मधला पहिला साईट सीन होता शालिमार बाग. मुघल बादशाह जहांगिर याने आपल्या प्रिय पत्नी नूरजहाँसाठी हे भव्य उद्यान बांधले होते. मुघल स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना मानल्या जाणाऱ्या या बागेत प्रवेश करताच समोर दिसणारे कारंजे, दगडी वाटा, वाहणारे पाण्याचे प्रवाह आणि सावली देणारे उंचच उंच चिनार वृक्ष मन मोहून टाकत होते. बागेच्या प्रत्येक टप्प्या वरून दिसणारे दृश्य जणू एखाद्या चित्रपटातील प्रसंगा सारखे भासत होते. येथे पर्यटक मोठ्या उत्साहाने फोटोग्राफी करत होते. थंडगार हवेमुळे आणि हिरव्यागार वातावरणामुळे प्रवासाचा सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला. बागेतील शांतता आणि पाण्याच्या कारंज्यांचा मंद आवाज आणि तुषारांची उधळण मनाला एक वेगळाच आनंद देत होते.
      त्यानंतर आम्ही निशात बाग येथे पोहोचलो. दल लेकच्या किनाऱ्यावर वसलेले हे सुंदर उद्यान “गार्डन ऑफ जॉय” म्हणून ओळखले जाते. समोर शांत दल लेक, दूरवर दिसणाऱ्या बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि टप्प्याटप्प्याने उतरत्या बागांची रचना पाहताना मन अगदी हरखून गेले. येथे वाहणारा गार वारा आणि फुलांचा मंद सुगंध वातावरण अधिकच आल्हाददायक बनवत होता. पर्यटक निवांत बसून त्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेत होते. काही ठिकाणी स्थानिक फोटोग्राफर पारंपरिक काश्मीरी पोशाख घालून फोटो काढून देत होते. लहान मुले हिरवळीवर खेळत होती तर काही पर्यटक दल लेकच्या पार्श्वभूमीवर सेल्फी घेण्यात रमले होते.
    यानंतर आम्ही चश्मे शाही येथे गेलो. आकाराने लहान असले तरी हे अतिशय देखणे आणि शांत उद्यान आहे. येथे असलेला नैसर्गिक झरा खूप प्रसिद्ध असून त्याचे पाणी अतिशय थंड आणि शुद्ध मानले जाते. त्या झऱ्याच्या खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज संपूर्ण परिसरात प्रसन्नता निर्माण करत होता. हिरवळ, रंगीबेरंगी फुले आणि स्वच्छ वातावरणामुळे येथे काही क्षण निवांत घालवावेसे वाटत होते. डोंगरांच्या कुशीत वसलेले हे ठिकाण पाहताना मनाला एक वेगळीच शांतता लाभत होती.

       शेवटी आम्ही इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन पाहिले. विविध रंगांच्या ट्युलिप फुलांनी बहरलेले हे उद्यान पाहताना जणू रंगांची उधळणच झाल्याचा भास होत होता. लाल, पिवळे, गुलाबी, जांभळे आणि पांढरे अशा अनेक रंगांच्या फुलांच्या रांगा अतिशय आकर्षक दिसत होत्या. पर्यटकांची येथे प्रचंड गर्दी होती, तरीही त्या फुलांचे सौंदर्य प्रत्येकाला मंत्रमुग्ध करत होते. प्रत्येक पावलागणिक नवीन फोटो काढण्याचा मोह आवरत नव्हता. संपूर्ण दिवस निसर्गसौंदर्य अनुभवण्यात कसा गेला हेच समजले नाही.

    सर्व पर्यटन स्थळे पाहून आम्ही पुन्हा श्रीनगर मधील मार्केटमध्ये फिरलो. स्थानिक बाजारात काश्मीरी शाली, केशर, ड्रायफ्रूट, लाकडी कोरीव कामाच्या वस्तू आणि रंगीबेरंगी हस्तकला पाहताना वेळ कसा गेला ते समजलंच नाही. काहींनी घरच्यांसाठी भेटवस्तू घेतल्या तर काहीजण फक्त त्या बाजारातील गजबज आणि रंगत अनुभवत होते. रात्री उशिरा आम्ही हॉटेलवर परतलो. सर्व सामान आवरून बॅगा भरल्यात,दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर  उठून बॅगा तेव्हढ्या घेऊन बाहेर पडायचे आणि सकाळी साडे अकराच्या फ्लाईटने मुंबईला परतायचे असा आमचा साधा प्लॅन होता.आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर थंडीमुळे लालेलाल झळाळी आली होती. मात्र मुंबईत परतल्यावर ती लाली हळूहळू सावळट रंगात बदलली आणि त्या खुणा माझ्या चेहऱ्यावर बरेच दिवस दिसत राहिल्या.

    उ) कर्फ्यू 

   मात्र दुसरा दिवस उजाडला तोच एक भयावह आणि उरात धडकी भरवणारी बातमी घेऊन.पहाटे पासून संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण पसरले होते. अतिरेकी ‘अफजल गुरु’ याला फाशी दिल्याची बातमी पसरताच संपूर्ण श्रीनगरमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला होता. सर्व दुकाने बंद होती. रस्त्यांवर प्रचंड दगडफेक सुरू असल्याच्या बातम्या येत होत्या. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनाही प्रशासनाकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. “कोणत्याही पर्यटकांना बाहेर सोडू नका.”
     हॉटेलच्या खिडकीतून बाहेर पाहिले तर संपूर्ण रस्ता ओस पडलेला दिसत होता. नेहमी गजबजलेले श्रीनगर त्या दिवशी भयानक शांत झाले होते. अधूनमधून फक्त पोलिसांच्या गाड्या फिरताना दिसत होत्या आणि त्यातून मोठ्या आवाजात अनाऊन्समेंट सुरू होती. दूरवर कुठेतरी घोषणा आणि गोंधळाचे आवाज ऐकू येत होते. वातावरणात एक दडपण आणि अस्वस्थता,भीती भरून राहिली होती.
      आम्ही सकाळी नऊ वाजता आमच्या सर्वांचे  सामान एकत्रित करून हॉटेलच्या लॉबी मध्ये ड्रायव्हरची वाट पाहत होतो. नऊ वाजता येणार म्हणणारा आमचा ड्रायव्हर दहा वाजले तरी अजून आलेला नव्हता. त्याचा मोबाईलही लागत नव्हता. वेळ जसजसा पुढे जात होता, तसतशी आमची चिंता वाढत होती. फ्लाईट चुकली तर एक वेळ ठीक पण या तणावपूर्ण परिस्थितीत अडकून पडण्याची कल्पनाच अंगावर काटा आणणारी होती.
     शेवटी आम्ही ठरवले की पोलिसांची मदत घेऊन एअर पोर्टकडे निघायचे. हॉटेल ते एअरपोर्ट अंतर अवघ्या अर्ध्या तासाचे होते पण त्या दिवसाच्या परिस्थितीत ते अंतर कितीतरी पट भीषण वाटत होते. आम्ही खाली उतरून पोलिसांशी बोलायला जाणार इतक्यात अचानक आमची मिनी बस हॉटेलच्या पोर्चमध्ये येऊन उभी राहिली.
     ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला किती संघर्ष करावा लागला असेल याची आम्हाला कल्पना येत होती. सात दिवस सतत हसतमुखाने आमच्या सोबत राहणारा तो त्या दिवशी पूर्णपणे हादरलेला दिसत होता. तो स्वतः काश्मीरी असल्यामुळे स्थानिक म्हणून त्याची ओळख असल्यामुळे आतापर्यंत त्याच्यावर हल्ला झाला नव्हता पण आता पर्यटकांना एअरपोर्ट रोड वरून घेऊन जाणे म्हणजे आमच्या जीविताला मोठा धोका होणार, याची त्याला भीती सतावत होती.मुख्य रस्त्यावर दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि अडवणुकीच्या घटना सुरूच होत्या.
    तो हळू आवाजात म्हणाला, “मी तुम्हाला दुसऱ्या रस्त्याने घेऊन जातो  पण तो खूप अरुंद आहे. मध्ये एखादी गाडी अडकली तर आपण अडचणीत येऊ.” काही क्षण तो स्वतःच विचार करत राहिला आणि मग म्हणाला, “चलो.. मागच्या रस्त्यानेच जाऊया.”

   ऊ ) परतीचा थरारक प्रवास-

    बस सुरू झाली आणि आम्ही सगळे अक्षरशः नि:शब्द बसलो. खिडकी बाहेरचे वातावरण तणावाने भरलेले होते. काही ठिकाणी रस्त्यावर दगड विखुरलेले दिसत होते. दुकाने बंद, लोखंडी शटर खाली आणि रस्त्यांवर फक्त सुरक्षा दलांची वाहने दिसत होती. आम्ही ज्या चिंचोळ्या रस्त्याने जात होतो तिथे शांतता होती पण ती शांतता आणखी भयावह वाटत होती.
    अचानक एका वळणावर काही तरुणांनी आमच्या बसकडे दगड फेकले. जोरात आवाज झाला आणि एका बाजूची काच फुटली. क्षणभर सर्व जण दचकले. एका नुक्कड वर  आमची बस अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु ड्रायव्हरने  न जुमानता आणि गाडीचा वेग कमी न करता बस पुढे दामटली. पुढे काही अंतरावर पुन्हा दगडफेक झाली. या वेळी दगडे बसच्या पत्र्याच्या बॉडीला लागली होती. फुटलेल्या काचां मधून थंड वारा आत येत होता आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्या थंड हवेत सुद्धा आम्हाला दरदरून घाम फुटला होता.त्या क्षणी आम्हाला जाणवत होते की हा ड्रायव्हर स्थानिक काश्मिरी असून सुद्धा अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालून आम्हाला सुरक्षित पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.
    मोठ्या हिमतीने, सावधपणे आणि सतत परिस्थितीचा अंदाज घेत घेत अखेर त्याने आम्हाला सव्वा अकराच्या सुमारास एअरपोर्टवर सुरक्षित पोहोचवले. त्या क्षणी आमच्या सगळ्यांच्या जीवात जीव आला. सात दिवस त्याने केलेले सहकार्य आणि शेवटच्या क्षणी जीवावर उदार होऊन आम्हाला सुरक्षितपणे एअरपोर्टवर पोहचवण्याची ती धडपड आम्ही कधीच विसरू शकणार नव्हतो. गाडीतून उतरल्यावर त्याच्या मिनी बसचे नुकसान दिसून आले. काही काचा फुटल्या होत्या,गाडीच्या पत्रावर बरेच पोचके आले होते.
     आम्ही त्याला मनापासून धन्यवाद दिले आणि त्याला खूश करणारी टीपही दिली. त्याच्या डोळ्यांतही समाधान दिसत होते. विमानतळाच्या प्रवेशद्वारातून आत जाताना आम्ही शेवटचे एकदा मागे वळून पाहिले.खुशीने आणि थोड्याशा हळव्या मनाने,आम्ही त्याला आणि काश्मीरला अलविदा केले.
    मनात एकाच वेळी दिलासा, भीती, आदर आणि काश्मीरच्या अविस्मरणीय आठवणी दाटून आल्या. काश्मीर हे भारताचे ‘नंदनवन’ आहेच परंतु ते अतिरेक्यांच्या दुष्ट आणि काळ्या छायेत आहे,याचे तेव्हा अतीव दुःख झाले.आता भारताच्या नंदनवनातून ती काळी दुष्ट सावली दूर झाल्याने मनात समाधान आहे.
“प्रवास फक्त ठिकाणांचा नसतो, तो अनुभवांचा आणि आठवणींचा सुद्धा असतो.”

🔗भरकटलेली शिवाई’-पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी.

   पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा. 👉   

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.


तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी - लोगो





📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook

टिप्पण्या

  1. त्या प्रवासातील प्रत्येक क्षण आजही मनात जिवंत आहे — काही आनंद देणारे, तर काही प्रसंग भीती ,मनाला अस्वस्थ करणारे, पण सर्वच कायम स्मरणात राहणारे.

    उत्तर द्याहटवा
  2. मला आपण परत काश्मीचा परत प्रवास करत आहोत असं वाटले तुमच्या बुद्धीला खरोखर सलाम तुम्हाला हुवे हुब सर्व गोष्टी आठवतात आणि आमच्याही आठवणी परत जागृत केल्यात त्याबद्दल धन्यवाद ! खुप छान लेख

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर प्रवास वर्णन आहे. शेवट सुध्दा थरारक आहे. मजा आली.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...