मुख्य सामग्रीवर वगळा

मचाण शांतता : अरण्याचा हुंकार | एपिसोड ३ | ताडोबा जंगलातील थरारक मराठी रहस्यकथा

 अस्वीकरण - 

     अरण्य कधी कधी वास्तवापेक्षाही अधिक गूढ असते.प्रस्तुत कथा ही निसर्ग, जंगलातील अनुभव, लोककथा आणि कल्पनारंजन यांच्या संगमातून साकारलेली साहित्यकृती आहे.

              मचाण शांतता : अरण्याचा हुंकार (एपिसोड -३)| ताडोबा जंगलातील थरारक मराठी रहस्यकथा

मचाण शांतता : अरण्याचा हुंकार (एपिसोड -३) मराठी रहस्यकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
मचाणावर शांतता पण जंगल जागं होतं,
धुक्याआड कुणीतरी अंधाराशी संवाद साधत होतं|
तो मनुष्य होता, सावली की अरण्याचा आत्मा,
प्रश्नांची उत्तर शोधताना मनच जंगलात हरवत होतं|

🔗मचाण शांतता : अरण्यऋषी - जंगलाचा अदृश्य रक्षक ( एपिसोड -२ )

  ताडोबा अंधारीच्या निबीड जंगलातील एक गूढ, थरारक आणि रोमांचकारी अनुभव.अंधारी नदीच्या काठावर आणि जंगलाच्या गाभाऱ्यात, यत्र तत्र सर्वत्र फिरणाऱ्या एका रहस्यमय व्यक्तीची ही कथा मागील एपिसोड २ वाचली असाल तर  आता एपिसोड -३ ची कथा पुढील प्रमाणे..

 मचाण शांतता : अरण्याचा हुंकार (एपिसोड -३) | ताडोबा जंगलातील थरारक मराठी रहस्यकथा

  अंधारी नदी, ताडोबाचे निबीड जंगल आणि एका गूढ अरण्यऋषीची थरारक कथा
       ताडोबा अंधारीच्या घनदाट जंगलात घडणाऱ्या रहस्यमय घटनांवर आधारित “मचाण शांतता : अरण्याचा हुंकार” ही एक रोमांचकारी मराठी जंगलकथा आहे. अंधारी नदीचे रौद्र रूप, वनरक्षकांचे धोकादायक जीवन, शिकाऱ्यांच्या सावल्या आणि जंगलात अधूनमधून दिसणारा एक गूढ अरण्यऋषी,जो कधी संकटात जीव वाचवतो, तर कधी धुक्यात विरून जातो.ही कथा निसर्ग, गूढता, अध्यात्म आणि जंगलातील अनामिक शक्ती यांचा संगम अनुभवायला लावते.
    ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गूढ वातावरणावर आधारित ही थरारक मराठी जंगलकथा निसर्ग, रहस्य आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम आहे. अंधारी नदीच्या काठावर घडणाऱ्या अनाकलनीय घटना, वनरक्षकांचे जीवावर उदार होऊन केलेले कर्तव्य, शिकाऱ्यांच्या हालचाली आणि वेळोवेळी प्रकट होणारा गूढ अरण्यऋषी या कथेला वेगळीच उंची देतात. प्रत्येक भागात जंगलातील नवे रहस्य उलगडत जाते आणि वाचकाला शेवटपर्यंत उत्कंठेत ठेवते.
   वनरक्षक बाबूलाल अंधारी नदीच्या नैसर्गिक सौंदर्याची आणि जैवविविधतेची त्याच्या कथात्मक वाणीने मला माहिती देत होता आणि  म्हणाला “अंधारी नदी” म्हणजे नागपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या जंगल कुशीतून वाहणारी  निसर्गाने निर्माण केलेले एक अद्भुत आणि रहस्यमय सौंदर्य होय. ती ताडोबाच्या जंगलात उगम पावते आणि वैनगंगेला जाऊन मिळते.  तिच्या नावातच एक गूढता दडलेली आहे.       
    “अंधारी” हे नाव ऐकताच मनात काळोख्या जंगलाचे, शांत रात्रीचे आणि गहन निसर्गाचे चित्र उभे राहते.जंगलातील उंच सागवान, बांबू आणि विविध वृक्षांच्या सावलीतून वाहताना तिचे पात्र अनेक ठिकाणी अंधुक दिसते. कदाचित त्यामुळेच तिला “अंधारी” असे नाव मिळाले असावे. ही नदी केवळ पाण्याचा प्रवाह नसून ताडोबा जंगलातील असंख्य जीवसृष्टीची ती जीवनवाहिनी आहे. तिच्या किनाऱ्यावर उभे राहिले की माणूस नकळत निसर्गाच्या अधिक जवळ जातो.

    'अंधारी नदी' ही मुख्यतः विदर्भातील दाट जंगलातून वाहणारी अवखळ आणि स्वच्छंदी नदी आहे. जशी एखादी सुंदर ललना आपला पदर एका हातात सावरत, तर दुसऱ्या क्षणी तोच पदर वाऱ्यावर मुक्तपणे सोडून अवखळ चालीने धावत जाते, तसाच काहीसा अंधारीच्या प्रवाहाचा स्वभाव आहे.पावसाळ्यात तिचा प्रवाह त्या ललनेच्या उधळलेल्या पदरासारखा स्वच्छंदी, बेभान आणि अवखळ होऊन वाहू लागतो. तर कधी शांत, तर कधी रौद्र,तर कधी मोहक, तर कधी भयावह. म्हणूनच अंधारी नदीचे रूप प्रत्येक ऋतूत वेगळे भासते.उन्हाळ्यात तिचा प्रवाह काहीसा संथ होतो, तर पावसाळ्यात ती रौद्र आणि विशाल रूप धारण करते.अंधारी नदीच्या या कला पाहण्या सारख्या असतात.

   'अंधारी नदी'चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या परिसरातील समृद्ध जैवविविधता. 'अंधारी नदी' ही लेकुरवाळी नदी आहे.तिच्या काठावर अनेक वन्य प्राणी पाण्यासाठी येतात. वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, चितळ, रानडुक्कर यांसारखे अनेक प्राणीमात्र या नदीवर अवलंबून आहेत. दाट निबीड अरण्य,वनराईची ती माता आहे.उन्हाळ्याच्या दिवसांत सुकलेल्या आणि थकलेल्या अंधारी नदीत उरलेली पाणवठी म्हणजे जंगलातील प्राण्यांसाठी जणू जीवनदानच असते.

     पहाटेच्या वेळी नदीकाठी दाट धुक्यातून बाहेर पडणाऱ्या प्राण्यांचे निरीक्षण करणे  हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.  अंधारी नदीचे वातावरण दिवस आणि रात्र अशा दोन्ही काळात वेगळे भासते. दिवसाच्या वेळी पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्यावर चमकणारे सूर्यकिरण आणि नदीच्या प्रवाहाचा मंद आवाज मनाला प्रसन्न करतो. पण रात्र होताच संपूर्ण परिसर गूढतेने भरून जातो. पावसाळ्यात अंधारी नदीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. डोंगरदऱ्यांतून कोसळणारे पाणी नदीत मिसळते आणि तिचा प्रवाह वेगवान बनतो. आजूबाजूची झाडे हिरवाईने नटतात. नदीच्या किनाऱ्यावरील मातीच्या सुगंधाने संपूर्ण जंगल भारावून जाते. अनेक लहान ओढे आणि झरे या नदीला येऊन मिळतात. त्या काळात नदीचा आवाजही अधिक प्रखर होतो. दूरवरून ऐकू येणारा तिचा खळाळता नाद जणू जंगलाचे संगीतच वाटते.

    अंधारी नदी ही पर्यावरणाच्या दृष्टीनेही अत्यंत उपयुक्त आहे. जंगलातील वनस्पती, पक्षी आणि प्राणी यांच्या अस्तित्वासाठी ती आवश्यक आहे. नदीमुळे परिसरातील भूजल टिकून राहते. अनेक झाडांच्या मुळांना ओलावा मिळतो. त्यामुळे जंगल हिरवेगार राहण्यास मदत होते. जंगल आणि नदी यांचे नाते अतूट असते. नदी कोरडी पडली तर जंगलातील जीवनच धोक्यात येऊ शकते.

     अत: असे म्हणता येईल की, 'अंधारी नदी' ही फक्त एक नदी नसून जंगलाच्या आत्म्याचा एक भाग आहे. तिच्यात निसर्गाचे सौंदर्य, शांतता, गूढता आणि जीवनदायी शक्ती एकवटलेली आहे. तिचे अस्तित्व जंगलाला समृद्ध करते तर  माणसाला तिच्या अस्तित्वाची ती जाणीव करून देते. त्यामुळे 'अंधारी नदी'चे संवर्धन करणे म्हणजे आपल्या पर्यावरणाचे आणि भविष्यातील जीवनाचे रक्षण करणे होय. 

      विदर्भ आणि कोकण या  दोन्ही प्रदेशातील पावसामध्ये मोठा फरक दिसून येतो. कोकण समुद्राच्या जवळ असल्यामुळे पाऊस अतिशय मुसळधार आणि सलग पडतो. ढगाळ वातावरण, दमट हवा आणि हिरवागार निसर्ग हे कोकणातील पावसाचे वैशिष्ट्य आहे. अनेकदा काही दिवस सूर्य दर्शन होत नाही. याउलट नागपूरमध्ये पाऊस तुलनेने कमी आणि खंड देत पडतो.नागपूरचा पाऊस विजांचा कडकडाट आणि अचानक जोरदार सरींसाठी ओळखला जातो. दोन्ही ठिकाणचा पाऊस निसर्गाला वेगवेगळे सौंदर्य प्रदान करतो.

      एके दिवशी सकाळी आमच्या वरिष्ठांना खबर आली की 'अंधारी रेंज' मध्ये दोन संशयित शिकाऱ्यांची हालचाल टिपण्यात आलेली आहे.ती रेंज  माझे कार्यक्षेत्र असल्याने माझ्या सोबत दोन वनरक्षक आणि आवश्यक तो जामानिमा घेऊन तयारी निशी आम्हा तिघांना निघण्याचे आणि शक्यतो त्यांना हुसकावून लावा किंवा पकडून आणण्याचे आदेश झालेत. 

     त्या मोहिमेवर मी आणि आणखी दोन वनरक्षक असे आम्ही तिघेजण होतो. स्वसंरक्षणासाठी आमच्याकडे मजबूत काठ्या, बिनतारी वॉकी-टॉकी आणि आवश्यक ती प्राथमिक साधने होती. सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते.मोहीम सुरू होईपर्यंत वातावरण पूर्णपणे सामान्य होते. पाऊसही एखाद्या गरीब आदिवासी मुलासारखा शांतपणे, संयमाने कोसळत होता. मोहीम रद्द करावी किंवा पुढे ढकलावी असे कोणतेही संकेत तेव्हा निसर्ग देत नव्हता.

     आम्ही बाहेर पडलो,खबर मिळालेला परिसर अंधारी नदीकाठचा होता.अंधारी नदी फुगल्याची बातमी आम्हाला आदल्या रात्रीच्या टीव्ही वरील वार्तांकनातून समजली होती. तिचा रौद्र अवतार किती भयानक असू शकतो, याची आम्हाला अनुभवातून चांगलीच माहिती होती. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड पावसामुळे तिने आपली मर्यादा सोडून इतक्या प्रचंड वेगाने वाहत असेल, याची आम्हाला कल्पनाच नव्हती.

      आम्ही सर्व तयारी करून लगबगीने जीप घेऊन निघालो.जीप ही घनदाट अरण्यातील निमुळत्या रस्त्यासाठी उपयोगात येत नाही म्हणून जेव्हढी जीपची धाव जावू शकते. तिथ पर्यंत आम्ही जीप नेली. आम्हाला उतरवून जीप आल्यापावली परत निघून गेली आणि पुढे उरला होता फक्त पावसाने वेढलेला जंगलाचा अथांग प्रदेश. मी शांतपणे मन लावून बाबुलालाचे कथन ऐकत होतो.तो पुढे म्हणाला..

    आम्ही जंगलातून वाट काढत पुढे सरकत होतो. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले होते. प्रत्येक पावलागणिक आमचे गमबूट चिखलात खोलवर रुतत होते आणि ते बाहेर काढत पुढे चालणे अधिकाधिक कठीण होत चालले होते.काल परवापर्यंत उजाड भासणारे माळरान आणि मोकळे भाग आता नव्या पालवीने फुलून गेले होते. माणसाएवढे वाढलेले हिरवेगार गवत, दाट झुडपे आणि पावसाने बहरलेली वनराई यांतून आम्हाला अक्षरशः वाट काढावी लागत होती.

     त्या उंच गवतात नेमके काय दडले असेल, कोण दबा धरून बसले असेल,याचा अंदाज आम्हा कुणालाच नसतो. प्रत्येक हालचाली सोबत मन अधिक सावध होत होते.अंगावर बुलेटप्रूफ जॅकेट आणि त्यावर पिवळ्या रंगाचे रेनकोट चढवलेले होते. मुसळधार पावसात आम्ही पुढे सरकत असताना झाडांवरील पक्षीसुद्धा क्षणभर त्यांच्या तीक्ष्ण नजरेने आमच्याकडे पाहत असल्याचा भास होत होता.जणू जंगल स्वतःच आमच्या उपस्थितीची दखल घेत होते.

       कडक उन्हाळ्यामुळे  तापलेले जंगल आता पावसाचा अभिषेक झाल्याने आता शांत शांत परंतु निसरडे आणि ओलसर झाले होते. जंगलातील प्रत्येक हालचालीवर चौकस नजर ठेवत आम्ही सावधपणे पुढे सरकत होतो. उन्हाळ्यात अंधारी नदीचा क्षीण खळखळाट ऐकण्यासाठी मला काही काळ ध्यानमुद्रेत शांत बसावे लागले होते. पण आज परिस्थिती पूर्ण वेगळी होती. नदीच्या पाण्याची गर्जना आता खूप दूरवरूनच कानावर येत होती. त्यावरूनच अंधारी किती प्रचंड फुगली असेल, याचा अंदाज आम्हाला दुरूनच आला.

    अंधारीच्या काठावर पोहोचण्याआधीच शेवटी पावसाने आम्हाला गाठलेच. त्या वर्षीचा श्रावण महिना तेव्हा सुरू झाला होता. आसमंतावर काळ्याभोर ढगांनी दाटी केली होती आणि ताडोबा अंधारी फॉरेस्ट रेंजवर धुवांधार पाऊस कोसळत होता.जशी एखादी गाडी टॉप गिअरमध्ये सुसाट धावते, तसाच जणू आभाळानेच टॉप गिअर टाकला होता. पावसाचा जोर क्षणभरासाठी ही कमी होत नव्हता.

      अशा परिस्थितीतही आमची मोहीम सुरू झाली. जंगल, पाऊस आणि अंधारी नदीचा वाढता रौद्रपणा यांची पर्वा न करता आम्हाला पुढे निघणे भाग होते. कारण वनकर्म्यांच्या ड्युटीत ऋतू, वादळ किंवा भीती यांना फारसे स्थान नसते.आम्ही अंधारी नदीकाठी पोहचलो.श्रावणातील मुसळधार पावसात अंधारी नदीने रौद्ररूप धारण केले होते. पात्राबाहेर वाहणाऱ्या तिच्या पाण्याला मातीमुळे जणू मातकट रंगाचा शालूच लाभला होता.

      त्या दृश्याने संपूर्ण जंगलाचा नूरच पालटून गेला होता. काळ्याकुट्ट ढगांनी आकाश पूर्ण व्यापून टाकले होते आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंधारी नदीचा ओघ प्रचंड वेगाने प्रवाहित होत होता.वाहत्या प्रवाहाची अफाट ताकद आणि दाब यामुळे आजूबाजूचा संपूर्ण परिसर हादरत असल्याचा भास होत होता. जणू अंधारी नदीने त्या क्षणी आपले शांत रूप झटकून निसर्गातील रौद्र शक्तीचे भयावह दर्शन घडवायला सुरुवात केली होती.

      नदीकाठची अनेक झाडे अर्धी अधिक पाण्यात बुडाली होती, तर वाळूचे किनारे पूर्णपणे अदृश्य झाले होते. वाहत्या प्रवाहासोबत माती,लाकडे, तुटलेल्या फांद्या आणि पालापाचोळा, प्रचंड वेगाने पुढे वाहत होता. जंगलातील प्राणी सुद्धा सुरक्षित जागेच्या शोधात इकडून तिकडे भटकताना दिसत होते.अंधारी नदीचे ते रौद्र, पण तितकेच अद्भुत रूप पाहताना निसर्गाच्या अपरंपार शक्तीची प्रकर्षाने जाणीव होत होती.

      आम्ही नदीच्या काठाकाठाने शोधक नजरेने शिकाऱ्यांचा माग घेत पुढे सरकत होतो. अंगावर बुलेटप्रूफ जॅकेट आणि त्यावर रेनकोट असूनही मुसळधार पावसाने आम्ही पूर्ण भिजून गेल्यासारखे वाटत होते.धुक्यामुळे संपूर्ण परिसर धुरकट झाला होता आणि त्या धूसर वातावरणात अंधारी नदी अधिकच गूढ, अधिकच भयावह भासत होती.जोरदार पावसात अरण्यातील नद्या आणि नाले अत्यंत धोकादायक होऊ शकतात. अंधारी नदीसारख्या जंगलातील नद्यांमध्ये अचानक पाणी वाढते. त्यांच्या प्रवाहाचा वेग खूप जास्त असतो.गुरे, वन्यप्राणी किंवा माणसे वाहून जाण्याचा धोका असतो.छोटे पूल, कच्चे रस्ते आणि ओढे धोकादायक बनतात. अनेक छोटे पूल पाण्याखाली जात असतात.

      अचानक नदीपलीकडून १२ बोर बंदुकीचे दोन बार ओढल्याचा आवाज संपूर्ण जंगलभर घुमला. अंधारी नदीचा खळखळाट आणि मुसळधार पावसाच्या सरींचा तडतडात सुरू असताना सुद्धा त्या गोळीबाराने वातावरणाची शांतता क्षणार्धात चिरून टाकली.आवाज होताच नदीच्या पलीकडे आणि आवाजाच्या दिशेने जाण्यासाठी आजूबाजूला एखादा छोटा पूल किंवा मार्ग मिळतो कां ? याचा आम्ही शोध घेऊ लागलो. काही अंतरावर पाण्याखाली गेलेला एक छोटा पूल ज्याला विदर्भात "पुलिया” असे म्हणतात, तो दिसला. त्यावरून घोटाभर उंचीचे पाणी वेगाने वाहत होते. शिकारी नदीच्या पलीकडे होते आणि आता कोणत्याही परिस्थितीत तिकडे पोहोचणे आवश्यक होते.

   वाहत्या आणि जोरदार वेग असलेल्या पाण्यात मी सावधपणे त्या ब्रीजवर पाऊल टाकत पुढे पुढे सरकू लागलो. गमबुटांत आधीच पाणी शिरले होते, त्यामुळे जमिनीवर नीट पकड मिळत नव्हती.  लहानपणापासून पोहण्याची सवय असल्याने पाण्याची भीती मनात नव्हती.

      माझे दोन्ही साथीदार मात्र पुढे यायला घाबरत होते. त्यांच्या पायात अक्षरशः कंप भरला होता. मी एकेक पाऊल अतिशय सावधगिरीने पुढे टाकत होतो.इतक्यात समोरच्या शिकाऱ्यांना माझी हालचाल लक्षात आली. त्यांनी मला ठार मारण्यासाठी नव्हे, तर मला पुढे सरकण्यापासून रोखण्यासाठी माझ्या पायांच्या दिशेने दोन गोळ्या मारल्या त्या चुकवण्याच्या नादात माझा तोल गेला आणि मी पाण्याच्या प्रचंड प्रवाहात ढकलला गेलो.आणि पुढच्याच क्षणी अंधारीच्या उग्र प्रवाहाने मला ओढत नदीच्या मध्यभागी नेवून ठेवले.

     पाण्याच्या प्रवाहाच्या राक्षसी ताकदी मुळे पोहताना मला प्रचंड अडचण येत होती.त्यात बुलेट प्रूफ जॅकेट मध्ये पाणी शिरल्याने ते जड झाले होते.पायातले गुमबूट सुटून पाण्यात वाहून गेले. अंधारीचा राक्षसी प्रवाह मला माझी मान वर करायला वेळ देत नव्हता.अक्षरशः फरफटत पुढे घेऊन जात होता. क्षणभर तर मला माझी पोहण्याची कलाच मी विसरलो की काय? असे वाटू लागले.

       त्याचे बोलणे मी तल्लीन होऊन ऐकत होतो, बाबुलाल मन लावून पुढे सांगत होता..आता मी फक्त हातपाय हलवत पाण्यावर कसाबसा तरंगत होतो. जणू त्या उग्र प्रवाहापुढे मी पूर्णपणे शरण गेलो होतो. मनात एक निराश विचार चमकून गेला.“कुठे न्यायचे आहे ते ने..आता मी मला सर्व तुझ्याच हवाली केले आहे..” पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की नाकातोंडात सतत पाणी जात होते. डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली होती. अचानक मी एखाद्या उंच जागेवरून पाण्याच्या लोढ्यांसोबत खाली कोसळल्यासारखा फेकला गेलो. बहुतेक एखाद्या मोठ्या धबधब्यातून मी खाली आदळलो असावा.

      नशिबाने मी दगडावर आपटलो नाही पण पाण्याच्या खोल तळाशी खेचला गेलो होतो. पोटात भरपूर पाणी गेले होते. श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता, मग माझी शुद्ध हरपली.त्या अर्धमृत अवस्थेत माझ्या डोळ्यांसमोर माझा संपूर्ण जीवनपट क्षणार्धात तरळून गेला.इतक्यात अचानक शरीराला एक जबरदस्त हिसका बसला. कोणीतरी अविश्वसनीय वेगाने मला पाण्याबाहेर खेचत असल्याची मला जाणीव झाली..

ते नेमके काय होते..?

दिवास्वप्न होते कां..?

की मृत्यूच्या उंबरठ्या वरच्या अर्धमृत मनाचा भास होता..?

की मृत्युला कोणी तरी रोखले ..?

देव जाणे..

जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा माझ्या पोटातील पाणी काढले गेले होते. अंगात प्रचंड वेदना होत होत्या. श्वास सुरू होता, पण शरीर पूर्ण थकून-मांदून गेले होते.

हळूच डोळे किलकिले करून आजूबाजूला पाहिले..

मी अजूनही या पृथ्वीवरच होतो.

उठून मी गुडघ्यात मान घालून काही क्षण तसाच निःशब्द बसून राहिलो. तेवढ्यात सहज बाजूला लक्ष गेले आणि क्षणात माझ्या अंगावर काटा उभा राहिला.

माझ्या अगदी शेजारी तीच टोकेरी, मजबूत काठी शांतपणे ठेवलेली होती.

ती पाहताच मी मनोमन हादरलो. नकळत हात जोडले गेले. त्या अज्ञात रक्षक शक्तीबद्दल मनात कृतज्ञतेची भावना दाटून आली.

“माझा जीव वाचवणारा तो नेमका कोण होता..?”

हा प्रश्न मनात पुन्हा एकदा काळ्या ढगासारखा दाटून आला; पण त्याचे उत्तर मात्र अजूनही अंधारीच्या प्रवाहाइतकेच गूढ होते.

    काही वेळाने मुसळधार पावसात नदीकाठाने शोध घेत माझे दोन्ही सहकारी तिथपर्यंत पोहोचले. सततच्या पावसात, चिखलातून आणि वाढलेल्या झुडपांतून मला शोधता शोधता ते पूर्ण थकून गेले होते. मला जिवंत पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेची भावना उमटली. त्यांनी मला सावधपणे आधार दिला.आम्ही अंधारी नदीच्या गर्जनाऱ्या प्रवाहाकडे एकदा नजर टाकली आणि हळूहळू रेंज ऑफिसच्या दिशेने निघालो.

पण त्या दिवशी अंधारीच्या त्या रौद्र प्रवाहातून मला नेमके कुणी बाहेर काढले..?

हा प्रश्न मात्र आजही माझ्या मनात तसाच जिवंत आहे.

त्याचे उत्तर मला आजपर्यंत कधीच मिळाले नाही..

आणि कदाचित 

काही रहस्ये उलगडण्यासाठी नसतातच.

       साधारण एक वर्ष उलटून गेले होते. त्या काळात अंधारी रेंजमध्ये शिकाऱ्यांच्या हालचाली पुन्हा वाढल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. त्यामुळे नव्या आणि जुन्या संशयित शिकाऱ्यांची माहिती पडताळण्यासाठी विभागातील जुने अभिलेख पुन्हा शोधले जात होते.त्या कामासाठी नेमलेल्या टीममध्ये माझीही नियुक्ती झाली होती. आम्ही धूळ खात पडलेल्या जुन्या फाईली, अहवाल आणि चकमकींच्या नोंदी काळजीपूर्वक तपासत होतो.अशाच एका जुन्या अभिलेखावर नजर पडताच माझे हात क्षणभर थबकले..

  तो अहवाल अंधारी फॉरेस्टमधील एका धडक मोहिमेचा होता. शिकाऱ्यांच्या टोळीशी झालेल्या चकमकीदरम्यान एक वनरक्षक बेपत्ता झाल्याची नोंद त्यात होती.

त्या फाईलमध्ये त्याचा एक जुनाट, काळसर फोटो जोडलेला होता..

आणि तो फोटो पाहताच माझ्या अंगावर शहारा उभा राहिला.

कारण त्या वनरक्षकाचा चेहरा..

त्या अरण्य ऋषीसारखाच दिसत होता.

फाईलवर लिहिलेले नाव मी पुन्हा एकदा हळूच वाचले 

“हिडमा उसेंडी”

त्या क्षणी माझ्या मनात असंख्य प्रश्नांचे वादळ उठले.

“तो अजून जिवंत असेल..?”

“की जंगलानेच त्याला स्वतःमध्ये सामावून घेतले असेल..?”

त्या गूढ कुतूहलाने पछाडून मी 'हिडमा उसेंडी'चा शोध घेण्याचा निर्णय घेतला..

       गडचिरोलीच्या घनदाट जंगलातील एका दुर्गम गावात त्याचे घर असल्याची माहिती मला मिळाली. कुतूहलाने पछाडल्यासारखा मी माझ्या एका विश्वासू मित्राला सोबत घेत त्या गावाकडे निघालो.

     दाट जंगल, लाल मातीचे रस्ते आणि अधूनमधून दिसणारी विरळ आदिवासी घरं पार करत आम्ही शेवटी त्या गावात पोहोचलो.घरासमोरच्या अंगणात एक वृद्ध स्त्री शांतपणे बसली होती. आम्हाला पाहताच तिने घराच्या आत हाक मारली. काही क्षणांत एक मध्यमवयीन पुरुष बाहेर आला. त्या काळात तो परिसर अत्यंत संवेदनशील असल्यामुळे ते दोघे सुरुवातीला आमच्याशी बोलायलाही तयार नव्हते.

    पण मी हळू आवाजात “हिडमा उसेंडी..” हे नाव उच्चारताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.

त्या माणसाने घराच्या मागच्या बाजूकडे तोंड करून मोठ्याने हाक मारली.

“दादा..!”

आणि पुढच्याच क्षणी..

घराच्या मागच्या बाजूने कंबरेपर्यंत पांढरी दाढी वाढवलेला एक म्हातारा सावकाश चालत समोर आला.

त्याला पाहताच माझ्या छातीत अक्षरशः धस्स झाले.

तो..

अगदी हुबेहूब त्या अरण्य ऋषीसारखाच दिसत होता.

     माझे हृदय इतक्या जोराने धडधडू लागले की, क्षणभर ते छातीचा पिंजरा फोडून बाहेर येईल की काय असे वाटू लागले. हातपाय सुद्धा अक्षरशः लटपटू लागले.

     सोबतच्या मित्राने मला जर आधार दिला नसता, तर त्या क्षणी पाठ जमिनीला टेकवलेल्या मल्लासारखी माझी अवस्था झाली असती.त्याने मला त्या घराच्या पायरीवर बसवले. पाण्याची बाटली उघडून काही घोट पाणी पाजले, तेव्हा कुठे माझे चित्त थाऱ्यावर आले.

मी थरथरत्या आवाजात त्या वृद्धाला विचारले 

“तुम्ही..कोण?”

तो शांतपणे म्हणाला 

“मी हिरमा उसेंडी..”

ते नाव ऐकताच पुन्हा एकदा माझ्या डोक्यात गरगरू लागले.

मी अडखळत विचारले 

“म्हणजे,तुम्ही अजून जिवंत आहात..?”

त्यावर तो मंद हसला आणि म्हणाला 

“अरे..समोर तुला मी जिवंत उभा दिसतोय म्हणजे मी जिवंतच आहे ना ?”

त्या क्षणी माझी मानसिक अवस्था विचित्र झाली होती. मनात विचारांचा प्रचंड गोंधळ सुरू होता.

“हा जर हिडमा असेल.. तर अभिलेख्यात तो बेपत्ता कसा..?

आणि या वयात तो अंधारी रेंजमध्ये पुन्हा पुन्हा कशासाठी फिरतो..?”

नंतर मनाचा धीर करून,मी त्याला संपूर्ण घडलेला प्रकार सविस्तर सांगितला.

ते ऐकताच तो वृद्ध अचानक मोठमोठ्याने हसायला लागला.

मग माझ्या खांद्यावर हात ठेवत शांत आवाजात म्हणाला 

“अरे.. तू ज्याला पाहिलंस, तो मी नाही. मी हिरमा आणि तो हिडमा, माझा जुळा भाऊ. तो माझ्यासारखाच दिसायचा"

चाळीस वर्षांपूर्वी तो जंगलात गायब झाला आणि आजतागायत परत आलाच नाही.

आम्ही अजूनही त्याची वाट पाहतोय..”

काही क्षण तो आकाशाकडे पाहत शांत राहिला.

आणि मग हळू आवाजात पुढे म्हणाला,

“मध्ये मध्ये तो मला स्वप्नात दिसतो बरे का..

जणू अजूनही त्या जंगलात भटकतोय..”

माझ्या खांद्यावरील हात काढून तो आता उभा न राहता, माझ्या अगदी जवळ येऊन बसला. त्याच्या डोळ्यांत एक विचित्र शांतता होती.

“त्याचा तू फार विचार करू नकोस,” तो म्हणाला.

“मला खात्री आहे..तो जिथे कुठे असेल, तिथे फक्त जंगलाचाच विचार करत असेल.

तो स्वतः..किंवा त्याचा आत्मा..

जो पर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत तो अरण्याचा हुंकार भरत राहील.

आणि तुम्हा जंगलसेवकांच्या पाठीशी कायम उभा राहील.

फक्त तुमची नियत स्वच्छ ठेवा..”

ते शब्द ऐकताच नकळत माझे हात जोडले गेले.

मनोमन मी त्या अरण्य ऋषीचे स्मरण केले आणि शांतपणे त्याला नमस्कार केला..  

     सर्व सांगून झाल्यावर शेवटी बाबूलाल काही क्षण शांत बसून राहिला. त्याने अलगद डोळे मिटले. तो स्पष्टपणे भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.त्या अरण्य ऋषीबद्दलचा गाढ आदरभाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटला होता. जंगलातील आमच्यासारख्या जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या वनकर्म्यांच्या पाठीशी कुठेतरी एखादी अनामिक शक्ती उभी आहे.जी आपली पाठराखण करत आहे.अशी एक विलक्षण श्रद्धा आणि अभिमान त्याच्या चेहऱ्यावर झळकत असल्याचे मला दिसून आले.

                                                                      "समाप्त"🖋️📖📚  
      
       “मचाण शांतता : अरण्याचा हुंकार” ही ताडोबा अंधारीच्या जंगलावर आधारित एक गूढ, थरारक आणि वातावरणनिर्मिती करणारी मराठी कथा मालिका आहे. अंधारी नदी, वनरक्षकांचे अनुभव, वन्यजीव, आदिवासी जीवन आणि अरण्यऋषीच्या रहस्यातून ही कथा वाचकाला जंगलाच्या गाभाऱ्यात घेऊन जाते.
     ज्यांना जंगल कथा, रहस्यकथा, मराठी थ्रिलर, वन्यजीव आणि निसर्गाशी संबंधित साहित्य आवडते, त्यांच्यासाठी ही मालिका एक वेगळाच अनुभव ठरेल.

🔗लिपुतारा टनेल रेस्क्यू : “मृत्यूच्या पलीकडचा श्वास” (एपिसोड -१)

       माणसाच्या जगण्याच्या दुर्दम्य इच्छेपुढे संकटालाही कधीतरी मागे हटावंच लागतं.हिमालयाच्या कुशीत घडलेली एक थरारक काल्पनिक भुयारकथा जी अंधार, मृत्यू आणि जगण्यासाठीच्या संघर्षाचा थरार पुढे आणते.हिमालयातील ‘लिपुतारा टनेल’ दुर्घटनेत ३९ कामगार तब्बल १८ दिवस भुयारात अडकले होते. मृत्यू, अंधार, ऑक्सिजनची झुंज आणि बचाव पथकांच्या अदम्य प्रयत्नांची ही थरारक आणि प्रभावी मराठी कथा वाचा.जी फक्त दुर्घटनेची कथा नाही,तर आशा, धैर्य, मैत्री आणि मानवी जिद्दीचा जिवंत दस्तऐवज आहे..👉


अस्वीकरण - ही कथा जंगलातील अनुभव, लोककथा, निसर्ग निरीक्षण आणि लेखकाच्या कल्पनारंजनावर आधारित साहित्यकृती आहे. कथेमधील काही प्रसंग वास्तव प्रेरित असले तरी त्यांचे साहित्यिक स्वरूपात रूपांतर करण्यात आले आहे.

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी


"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.


तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो





📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...