'मचाण शांतता’ - पिठूर चांदण्यातली ती रानरात्र| एपिसोड १ | ताडोबा जंगलातील थरारक मराठी कथा..
रात्र होती शांत पण ती शांतता खोटी,
प्रत्येक झाडामागे दडली होती सावली मोठी |
मचाणावर बसलेले डोळे जागे होते,
लख्ख चांदण्यात रानातील प्रत्येक हालचाल टिपत होते |
🔗"वादळालाही वाकवणारी गलबतगाथा!” समुद्रातील थरारक जीवनसंघर्ष | हृदयस्पर्शी मराठी कथा..
“एक थरारक जीवन संघर्ष, जिथे प्रत्येक लाट मृत्यूशी झुंज देत होती..”
खाऱ्या समुद्राच्या अथांग पाण्यात, काळ्याकुट्ट वादळात आणि गर्जणाऱ्या लाटांमध्ये एक गलबत आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत होते. शिडांत भरलेला वारा, नांगराचा विश्वास आणि खलाशांची जिद्द यांची ही जिवंत गाथा तुम्हाला समुद्राच्या त्या भयाण दुनियेत घेऊन जाईल जिथे प्रत्येक क्षण हा जीवन आणि मृत्यूमधील संघर्ष होता.
'मचाण शांतता’ - पिठूर चांदण्यातली ती रानरात्र| एपिसोड १ | ताडोबा जंगलातील थरारक मराठी कथा..
रात्रीच्या गूढ जंगलात मचाणावरून केलेली प्राण्यांची गणना, स्पॉटलाईटच्या प्रकाशात चमकणारे डोळे, बगळ्यांचे आवाज, घुबडाची हाक, मोराची केकावली आणि चांदण्यांनी न्हालेली भयाण रात्र.. “मचाण शांतता - पिठूर चांदण्यातली ती रानरात्र” हा लेख तुम्हाला जंगलातील एका थरारक आणि रहस्यमय रात्रीचा जिवंत अनुभव देतो. वन्यजीव, निसर्गरात्र, जंगल सफर आणि मचाण संस्कृती आवडणाऱ्यांसाठी हा (एपिसोड १) अनुभव अविस्मरणीय ठरेल.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रात्रीची जंगल सफर, मचाणावरून केलेली वन्यजीवांची गणना आणि निसर्गाच्या कुशीत अनुभवलेला थरार या मराठी जंगलकथेचा गाभा आहे. पिठूर चांदण्यात उजळलेले जंगल, स्पॉटलाईटमध्ये चमकणारे प्राण्यांचे डोळे, घुबडाची हाक, मोराची केकावली आणि प्रत्येक क्षणी जाणवणारी अनामिक भीती वाचकाला त्या रात्रीचा प्रत्यक्ष अनुभव देते. जंगल, वन्यजीव आणि रहस्य यांची आवड असणाऱ्यांसाठी ही कथा अविस्मरणीय ठरेल.
लेखक म्हणून जंगल, वन्यजीवन आणि मचाण निरीक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, अशी इच्छा मी एकदा माझ्या एका जवळच्या उच्चपदस्थ मित्राजवळ व्यक्त केली होती. निसर्ग आणि जंगलाविषयी असलेली माझी आस्था पाहून त्या मित्राने ताडोबा येथील वनविभागात कार्यरत असलेले वनाधिकारी श्री. सोमेश्वर यांच्याशी माझ्या सहभागाबाबत चर्चा केली. निसर्ग लेखक मारुती चितमपल्ली यांच्या लेखनाचा मी दर्दी वाचक असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
योगायोगाने त्या काळात ताडोबामध्ये वनविभागातर्फे ‘रात्र वन्यजीवन निरीक्षण मोहीम’ अंतर्गत विशेष मचाण निरीक्षण मोहीम आयोजित करण्यात आली होती.
काही दिवसांनी त्या मित्राचा मला फोन आला. त्याच्या आवाजातही एक वेगळाच उत्साह जाणवत होता. तो म्हणाला,
“मचाण निरीक्षण मोहिमेअंतर्गत तुला रानरात्रीचा थरार प्रत्यक्ष अनुभवण्याची दुर्मीळ संधी मिळाली आहे. तू निघायची तयारी कर. तत्पूर्वी वनाधिकारी श्री. सोमेश्वर यांच्याशी बोलून घे ते तुला पुढील सर्व मार्गदर्शन करतील.”
ते शब्द कानावर पडताच मनात एकाच वेळी उत्सुकता, आनंद आणि अज्ञात रानरात्रीबद्दलचं गूढ कुतूहल दाटून आलं…
आणि अखेर त्या अविस्मरणीय जंगल मोहिमेचा दिवस ठरला..
माझ्या सोबत ‘शामक बावा’ हा एक अनुभवी वाइल्डलाइफ डॉक्युमेंटरी निर्माता देखील होता. त्याच्या साठी एका वरिष्ठ वनाधिकाऱ्यानेही त्याला आवश्यक परवानगी मिळवून दिली होती. विशिष्ट नियम आणि अटींच्या अधीन राहून जंगलात जाऊन ‘वन्य जीवनावर फिल्म’ बनविता येते. अनेक जंगली प्राणी रात्रीच अधिक सक्रिय होत असल्यामुळे रात्रीचे निरीक्षण आणि चित्रीकरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र अशा वेळी भडक प्रकाश, मोठा आवाज किंवा प्राण्यांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करण्यास सक्त मनाई असते.
त्या मोहिमेसाठी आम्हाला बारमाही पाणी असलेल्या आणि वन्यप्राण्यांची सतत ये-जा असणाऱ्या एका पाणवठा जवळील जुन्या मचाणावर संपूर्ण रात्र थांबण्याची विशेष परवानगी मिळाली होती. त्या ठिकाणी रात्री पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांचे निरीक्षण करणे, त्यांच्या हालचाली टिपणे तसेच वनरक्षकाला प्राण्यांची शिरगणती करण्यासाठी मदत करणे, हा त्या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. जंगलाच्या गडद शांततेत, त्या जुन्या मचाणावर बसून रात्रभर वन्यजीवनाचे रहस्य अनुभवण्याची संधी आमच्यासाठी अत्यंत रोमांचकारी आणि अविस्मरणीय ठरणार होती.
“वनविभागाच्या ‘रात्र वन्यजीवन निरीक्षण मोहीम’ कार्यक्रमांतर्गत वनरक्षकाला वन्यप्राण्यांची गणना करण्याचे काम सोपविण्यात आले होते. त्याच मोहिमेत शामक बावा याला वाइल्डलाइफ शूटिंगसाठी, तर मला एक हौशी लेखक म्हणून संपूर्ण रात्र मचाणावर राहून जंगल आणि वन्यजीवन जवळून अनुभवण्याची दुर्मीळ संधी मिळाली होती.”
मी विदर्भ एक्स्प्रेसने सकाळी नागपूरला पोहोचलो. प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी हॉटेलवर दुपारी दोन वाजेपर्यंत विश्रांती घेतली, कारण त्यानंतर मला वनाधिकाऱ्यांच्या कार्यालयात साडेतीन वाजे पर्यंत पोहोचायचे होते. त्या आधीच ‘शामक बावा’ हे त्यांच्या वाइल्डलाइफ शूटिंग संदर्भातील माहिती वनाधिकाऱ्यांना देत होते. कार्यालयात पोहोचल्यावर वनाधिकाऱ्यांबरोबर माझी औपचारिक ओळख झाली आणि त्याच वेळी शामक बावाशी ही प्रथमच भेट झाली.
साधारणत: चारच्या सुमारास आम्ही जीपने ‘ताडोबा-अंधारी व्याघ्र अभयारण्या’च्या अंधारी रेंजकडे रवाना होणार होतो. मात्र जीप ज्या ठिकाणी थांबणार होती, तेथून पुढे मचाणापर्यंत जवळपास एक तास पायी चालत जावे लागणार होते. चहा-पाणी झाल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी आमच्या सोबत येणारे अनुभवी वनरक्षक बाबूलाल यांच्याशी आमची ओळख करून दिली.
बरोबर चार वाजता आम्ही उघड्या जीपमधून ताडोबा-अंधारीच्या दिशेने निघालो. त्या वेळेलाही उन्हाचा तडाखा अजिबात कमी झाला नव्हता. नागपूरचे ऊन म्हणजे फक्त घाम काढणारे नसते, तर अंगाला अक्षरशः चटका देणारे असते. पुणे-मुंबईच्या तुलनेत येथील उष्णतेची तीव्रता पूर्णपणे वेगळी जाणवत होती. मी मुंबईचा तर शामक बावा पुण्याकडील असल्याने साडेचार वाजताही आम्हाला अंगावर चटके बसल्याचा भास होत होता.
काही वेळातच जंगलाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आम्ही पोहोचलो. मोठे लोखंडी गेट हळूहळू उघडले गेले आणि आमच्या जीपने ताडोबाच्या गूढ जंगलात प्रवेश केला. आमचा जीप चालक आणि त्याच्या सोबतचा वनरक्षक हे दोघेही पर्यटकांना जंगल सफारी घडवण्यात अनुभवी असल्याने ते मुद्दाम हळूहळू, निरीक्षण करत गाडी चालवत होते, जेणेकरून वाटेत एखादा वन्य प्राणी दिसण्याची शक्यता वाढेल. जंगलात ज्या भागात वाघ किंवा इतर वन्यप्राण्यांची हालचाल असल्याचे त्यांना जाणवत होते, त्या ठिकाणी जीप थांबवून वनरक्षक हाताने दिशा दाखवत आम्हाला म्हणत होते.
“तिकडे पहा… त्या झाडीत!”
मी माझ्या दुर्बिणीतून त्या दिशेने निरीक्षण करत होतो, तर शामक बावा त्याच्या कडील High Power lence असलेल्या कॅमेरा मधून त्या दुर्मीळ क्षणांचे व्हिडिओ टिपत होता. अशा प्रकारे चार-पाच ठिकाणी त्यांनी जीप थांबवून आम्हाला विविध वन्य प्राण्यांचे दर्शन घडवले. जंगलातील अनुभवी माणसांच्या नजरेला अगदी क्षीण हालचाली सुद्धा सहज जाणवत होत्या.
काही अंतरानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. जिथपर्यंतच जंगल सफारीच्या जीप्सना पर्यटकांना घेऊन जाण्याची परवानगी असते, तिथे पर्यंत आम्हाला नेवून सोडले. त्यापुढील भाग सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद होता. आमची जीपही तेथेच थांबली. पुढचा प्रवास आम्हा तिघांना मी, शामक बावा आणि वनरक्षक बाबूलाल यांना पायी करायचा होता. त्या दाट जंगलातून जवळपास एक तास चालत आम्हाला त्या जुन्या मचाणापर्यंत पोहोचायचे होते.
ज्या अनवट पायवाटेवरून आमच्या प्रवासाची सुरुवात झाली, त्या वाटेच्या थोड्याच अंतरावर एक स्वच्छ ओहोळ संथपणे वाहत होता. त्या पाण्याची निर्मळता इतकी होती की स्फटिकासारख्या पारदर्शक प्रवाहातून ओहोळाचे अंतरंग स्पष्ट दिसत होते. तळाशी पडलेले दगड-गोटे, त्यांच्यावर साचलेली हिरवी लव्हाळी आणि त्या लव्हाळीत अन्न शोधत फिरणाऱ्या पिटुकल्या माशांची लगबग पाहताना क्षणभर तिथेच निवांत बसून राहावे असे वाटत होते.
आम्ही ज्या जंगलातील अनोळखी वाटेने पुढे जात होतो, ती वाट दाट गर्द राईने पूर्ण वेढलेली होती. जणू काही आजूबाजूच्या लता-वल्लरींनी आमच्या स्वागतासाठी एखादा नैसर्गिक हिरवा मंडपच तयार केला होता. काही वेली वाटेवर इतक्या खाली लोंबकळत होत्या की त्या हाताने बाजूला सारतच पुढे जावे लागत होते.
चालत असताना दोन्ही बाजूंच्या झुडपांतून अधून मधून “खसखस…” असा आवाज ऐकू येत होता. बहुधा एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्याची ती चाहूल असावी. कदाचित सरडे किंवा इतर लहान वन्यजीव आमच्या पावलांच्या आवाजाने दचकून झुडपांमध्ये सैरावैरा पळत असावेत. त्या दाट जंगलातील प्रत्येक सळसळ, प्रत्येक आवाज मनात एक वेगळीच उत्सुकता आणि हलकीशी भीती निर्माण करत होता.
वनरक्षक बाबूलाल आम्हा दोघांना वारंवार सावध करत म्हणत होता.
“माझी पाठ सोडू नका.. नाहीतर जंगलात रानभूल लागेल. आत्ता उजेड आहे म्हणून वाट सहज दिसते आहे पण काळोख दाटला की तुम्हाला शोधणंही कठीण होईल.”त्याच्या आवाजात अनुभवातून आलेली गंभीरता होती.
आम्ही ज्या पायवाटेने चालत होतो ती काही अंतरानंतर संपली आणि पुढे एका सुकलेल्या नदीचे विस्तीर्ण पात्र दिसू लागले. नदी पूर्ण कोरडी पडली होती. मात्र मधून मधून हिरवट रंगाच्या पाण्याची लहान-मोठी डबकी तयार झाली होती. त्या भागात ओलावा टिकून असल्यामुळे पुढील वाट काही प्रमाणात कारवीच्या दाट झुडपांनी व्यापलेली होती.
चालताना त्या कारवीच्या फांद्या सतत पायात अडकत होत्या. कधीही तोल जाईल असे वाटत होते; पण बाबूलाल मात्र रोजच्याच सवयीप्रमाणे सहजपणे त्यातून वाट काढत पुढे चालला होता. सात वर्षांनी फुलणाऱ्या कारवीने त्या परिसराला जणू जांभळट-निळसर रंगाची चादरच पांघरली होती. कारवी ही मुख्यतः कोकण आणि सह्याद्री परिसरातील जंगलांत मोठ्या प्रमाणावर आढळणारी वनस्पती असली, तरी काही प्रमाणात ‘ताडोबा-अंधारी व्याघ्र अभयारण्या’ मधील काही भागात सुद्धा तिचे अस्तित्व दिसून येते.
संध्याकाळ सरत चालली होती. एका मोकळ्या जागेत आम्हाला मोर, लांडोर आणि त्यांची पिलावळ शांतपणे चरताना दिसली. एखाद दुसरा मोर त्यांच्या पिसाऱ्यांचा संभार घेऊन उडताना पहायला मजा आली ते दृश्य इतके सुंदर आणि प्रसन्न होते की शामक बावा आपल्या कॅमेऱ्यातून ते अधाशा सारखा टिपत होता, तर मी मोबाईलमध्ये त्या क्षणांना जपून ठेवत होतो.
बाबूलालच्या हालचालीही विलक्षण होत्या. एखादं सुंदर दृश्य, एखादा वन्यप्राणी किंवा दुर्मीळ पक्षी कॅमेऱ्यात टिपण्यासारखा दिसला की त्याची पावलं नकळत थबकत. तो काहीच बोलत नसे पण त्याचं ते शांतपणे थांबणं म्हणजे जणू मुक्यानेच दिलेला संकेत असायचा
“आता..हा क्षण कॅमेऱ्याने टिपा .”
जंगलातील प्रत्येक हालचालीशी एकरूप झालेला बाबूलाल, त्या रानवाटेवर आम्हाला निसर्ग वाचायला शिकवत होता..
घड्याळात पाहिले तर संध्याकाळचे पाच वाजले होते तरीही वातावरणात पांढरा फाटक सूर्यप्रकाश पसरलेला होता. दिवस अजून पूर्ण मावळलेला नाही, याची जाणीव त्या उजेडातून होत होती. जंगलाच्या त्या निबीड भागात अनेक छोट्या- मोठ्या पायवाटा इकडे तिकडे फुटलेल्या दिसत होत्या. त्या पाहून माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. मी बाबूलालला विचारले.
“या दाट जंगलात एवढ्या पाऊलवाटा तयार व्हायला इथे माणसं तरी कोण येतात ?”
माझा प्रश्न ऐकून तो हलकेसे हसला आणि म्हणाला,
“साहेब, प्रश्न खूप चांगला आहे. पर्यटक जिथे तुमची जीप थांबली तिथपर्यंतच येऊ शकतात, तेही फक्त जीपने. मध्ये कुठेही उतरून फिरायला त्यांना परवानगी नसते.”
थोडा थांबत त्याने आजूबाजूच्या वाटांकडे बोट दाखवले आणि म्हणाला,
“या ज्या अनेक पायवाटा दिसत आहेत ना..त्या माणसांच्या नाहीत तर त्या प्राण्यांच्या आहेत. जंगलात त्यांना ‘गेम ट्रेल’ किंवा ‘सगरी’ म्हणजेच प्राण्यांच्या पाऊलवाटा असे म्हणतात. पाणी, अन्न किंवा सुरक्षित जागा शोधताना वन्यप्राणी सतत याच मार्गांनी फिरत असतात.”त्याचा आवाज आता अधिक गंभीर झाला होता.
“ तुम्ही मात्र या वाटांवरून कधीच जाऊ नका. या खूप भुलवणाऱ्या आणि फसव्या असतात. माणसाला वाटतं की ही सरळ वाट कुठेतरी घेऊन जाईल पण जंगलात त्या अचानक हरवतात, वळतात किंवा आणखी दाट भागात शिरतात. मी सोबत नसतो, तर कदाचित तुम्हाला सुद्धा त्या वाटांवरून चालायचा मोह आवरता आला नसता..”
‘ताडोबा-अंधारी व्याघ्र अभयारण्य’ हा मुख्यतः कोरड्या पानगळीच्या जंगलांचा प्रदेश असल्याने तेथे साग मोठ्या प्रमाणावर आढळतो. उंच, सरळसोट, मजबूत आणि दिमाखदार उभा असलेला साग जणू त्या जंगलाचा रखवालदारच भासत होता. त्या दाट अरण्यातून चालताना माझे पाय कुठे पडत आहेत, याकडेही लक्ष उरले नव्हते. आजूबाजूची झाडे, झुडपे, आकाशाला भिडलेले डेरेदार वृक्षांचे शेंडे आणि सतत बदलणारे जंगलाचे रूप पाहण्यात मी पूर्ण हरवून गेलो होतो.
सभोवताली असंख्य आवाजांचा एक अद्भुत मेळ घुमत होता. पक्ष्यांची किलबिल, विविध किड्यांची किरकिर, कोकिळेची लांब तान, हुप्प्याचा “हूप.. हूप..” असा आवाज हे सारे ध्वनी जणू निसर्गाने त्या हिरव्यागार दृश्यामागे मुद्दाम पार्श्वसंगीत म्हणून लावले होते, असे भासत होते.“त्या क्षणी मला जाणवलं की जगातील प्रत्येक अरण्य हे पक्षी, प्राणी आणि असंख्य कीटकांच्या आवाजांनीच जिवंत असतं.”
त्या जंगलात बाबू, साग, तेंदू, धावडा असे अनेक वृक्ष एकत्र नांदत असल्यासारखे दिसत होते. त्या वृक्षांकडे पाहताना अचानक मनात एक विचित्र विचार चमकून गेला. माणसांमध्ये जशा वेगवेगळ्या प्रवृत्ती असतात, तशाच वृक्षांमध्येही असतील का ? काही वृक्ष पूर्ण वाकलेले दिसत होते जणू आयुष्यापुढे लाचार झाल्यासारखे. काही मात्र ताठ मानेने सरळ उभे होते, जणू स्वाभिमानी योद्धेच. काही उन्मत्त वृक्षांनी आपल्या फांद्यांचा भार इतर झाडांवर टाकलेला होता, तर काही “माझाच झेंडा उंच” या गर्वाने इतरांपेक्षा अधिक उंच वाढलेले दिसत होते. त्या गर्द हिरव्या समूहात काही ठेंगणी झाडेसुद्धा होती . मोठ्या वृक्षांच्या सावलीमधून वाढण्यासाठी केविलवाणा संघर्ष करत असल्या सारखी. त्या जंगलातील वृक्षसृष्टी मला त्या क्षणी एखाद्या मानवी प्रवृत्ती सारखीच वाटू लागली होती.
जेव्हा आम्ही जीप त्या निषिद्ध सीमारेषेजवळ सोडली, तेव्हा मी वनरक्षक बाबूलालला विचारले की “बाबूलाल.. आपल्याला मचाणा पर्यंत पोहोचायला अंदाजे किती वेळ लागेल?”तेव्हा त्याने “साधारण एक तास” असे सांगितले होते पण शामकची सतत चालणारी व्हिडिओग्राफी आणि माझी मोबाईल फोटोग्राफी यामुळे आमचा वेग मंदावला होता. आम्हाला अंधार पडण्यापूर्वी मचाणावर पोहोचणे आवश्यक होते. त्यामुळे आमच्या चालण्याचा वेग पाहून बाबूलालने अंदाज बदलत सांगितले की आता सहा - सव्वा सहा वाजेपर्यंत पोहोचू.
घड्याळात साडेपाच वाजत आले होते. म्हणजे हातात जेमतेम अर्धा ते पाऊण तास उरला होता. मला लांब चालण्याची सवय असल्याने विशेष त्रास जाणवत नव्हता पण शामक मात्र थकलेला दिसत होता. त्याला सिगारेट ओढायची तल्लफ येत होती. मात्र बाबूलाल त्याला तसे करू देत नव्हता.
तो ठामपणे म्हणाला, “साहेब, जंगलातले वणवे बहुतेक वेळा माणसांच्या चुकांमुळेच लागतात. सुक्या पानांमध्ये सिगारेटची एक ठिणगी पडली तरी इथे मोठी आग लागू शकते.”त्याचे म्हणणे अगदी रास्त होते. त्या कोरड्या जंगलात एक छोटीशी ठिणगीही भयंकर संकट निर्माण करू शकत होती.
आम्ही पुढे चालत राहिलो. काही अंतरावर चिंचेच्या झाडांची दाट वसाहत लागली होती. त्या उंच झाडांवर असंख्य बगळ्यांची घरटी दिसत होती. संध्याकाळ सरत असल्याने पक्ष्यांची घरट्याकडे परतण्याची लगबग सुरू झाली होती.
आता वातावरणातील उजेड हळूहळू कमी होत चालला होता. सुरुवातीला माझे लक्ष वृक्षांची उंची, त्यांच्या फांद्यांचा पसारा आणि जंगलाच्या सौंदर्याकडे होते पण आता परिस्थिती बदलत होती. अंधार वाढू लागल्याने माझे लक्ष समोर पडणाऱ्या प्रत्येक पावलावर केंद्रित झाले. वाट नीट पाहतच पुढे जावे लागत होते.
तेवढ्यात वाटेवर मला मोठमोठे खुरांचे ठसे दिसले. बाबूलालने खाली वाकून ते पाहिले आणि शांतपणे म्हणाला,“हे रानगव्यांचे ठसे आहेत..अगदी ताजे.”
कळपाने फिरणारी हरणे मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये माणसांच्या इतकी सवयीची झालेली दिसतात की ती अनेकदा न घाबरता पर्यटकांच्या जवळ विहरत असतात. तेव्हा त्या ठिकाणाला “अभयारण्य” का म्हणतात ?, याची जाणीव होते. पण इथले दृश्य पूर्णपणे वेगळे होते. आमच्या पावलांची चाहूल लागताच कान टवकारून उभी राहिलेली हरणे सावध नजरेने आमच्याकडे पाहत होती. त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट भीती दिसत होती “आणखी जवळ आलात तर आम्ही क्षणात पळू..” असा जणू त्यांचा इशाराच होता.
पुढे जाताना काही अंतरावर मुंग्यांची आणि वाळवीची उंच वारुळे दिसत होती. काही वारुळे तर एखाद्या माणसा एवढी उंच होती. दूरून पाहताना जणू एखादा तपस्वी स्थिर उभा राहून तपश्चर्या करत आहे, असा भास होत होता. ती वारुळे इतकी मजबूत आणि घट्ट होती की एखाद्या मोठ्या जनावराची धडक बसली तरी सहज कोसळणार नाहीत, इतकी मजबूत होती.
आता आमचा मचाण फार दूर उरला नव्हता. संध्याकाळचे सहा वाजत आले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अजूनही वातावरणात फटफटीत उजेड टिकून होता. आम्ही थोडे पुढे सरकलो आणि अचानक बाबूलाल थबकला. त्याच्या त्या अचानक थांबण्याचा अर्थ शामकच्या लगेच लक्षात आला. बाबूलालच्या अनुभवी नजरेस बहुधा एखादा महत्त्वाचा शॉट किंवा वन्यप्राण्यांची हालचाल दिसली असावी.
त्याने हातातील सुकलेल्या झाडाच्या काठीने हलकेच एका दिशेने इशारा केला आणि कुजबुजला,
“तिकडे पहा..”
क्षणात शामकच्या कॅमेऱ्याचा फोकस त्या दिशेने वळला. समोर दोन नाग एकमेकांत विळखा घालून गुंतलेले दिसत होते. सुरुवातीला ते जमिनीवर वेटोळे घालत संथ हालचाली करत होते नंतर त्यांनी शरीराचा पुढचा भाग अर्धवट उंचावला. उरलेले शरीर काटकोनात जमिनीला टेकवून ते एकमेकांभोवती अलगद फिरत होते. त्या हालचालींमध्ये एक विचित्र लय आणि संमोहन होते. अधूनमधून त्यांच्या तोंडातून मंद फुसफुस किंवा चित्कारासारखा आवाजही ऐकू येत होता. जंगलातील त्या शांत संध्याकाळीत ते दृश्य अत्यंत रहस्यमय आणि थरारक वाटत होते.
त्या प्रसंगाकडून नजर हटवून मी पुढे पाहिले, तर आमचे मचाण आता स्पष्ट दृष्टीक्षेपात आले होते. एका उंच वृक्षावर गोलाकार बांधलेले ते मचाण दूरून एखाद्या आदिवासी प्रहरी मनोऱ्यासारखे दिसत होते. वरती छप्पर घातलेले होते आणि आजूबाजूला बांबूंची जाळी लावलेली होती, जणू काही जंगलाच्या मध्यभागी उभारलेले एखादे सुरक्षित निरीक्षणगृहच.
मी त्या मचाणाकडे पाहत चाललो असताना अचानक समोरून मुंगसांची एक जोडी झपकन झुडपांत शिरली. बाबूलाल हलकेसे हसत म्हणाला,“मुंगूस दिसले म्हणजे या भागात सापांचं अस्तित्व नक्कीच आहे..”आणि काही क्षणांपूर्वी पाहिलेल्या त्या दोन नागांच्या रहस्यमय हालचाली त्याच्या शब्दांना जणू पुष्टीच देत होत्या.
थोडे पुढे गेल्यावर एक प्रचंड उंच आणि मोठ्या घेराचे सागवानी झाड आमच्या समोर आले. त्या झाडाखाली उभे राहून वर पाहिले, तर एखाद्या इमारतीच्या दुसऱ्या मजला एवढ्या उंचीवर ते मचाण बांधलेले दिसत होते. दाट जंगलाच्या मध्यभागी उंचावर उभारलेले ते मचाण पाहताना एकाच वेळी कुतूहल आणि सुरक्षिततेची भावना मनात निर्माण होत होती.
मचाणावर चढण्यासाठी मजबूत बांबूंच्या पायऱ्या लावलेल्या होत्या. सुरक्षिततेसाठी दोन्ही बाजूंना कठडेही बसवलेले होते. आम्ही सावकाश त्या पायऱ्या चढत वर पोहोचलो. मचाणाची आतील रचना अत्यंत साधी, मजबूत आणि उपयोगी पद्धतीने केलेली होती. त्या परिसरात बांबू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने जवळजवळ सर्व बांधकामात बांबूचाच वापर केला गेला होता.
आत बसण्यासाठी मजबूत लाकडी फळ्या आणि बांबूपासून तयार केलेले बाक ठेवलेले होते. संपूर्ण रचना पाहताना ते एखाद्या छोटेखानी बांबूच्या घरासारखेच वाटत होते. ते दृश्य पाहताच जुन्या मराठी चित्रपटातील एक गाणे नकळत ओठांवर आले .
“हाऊस ऑफ बांबू.. बांबूच्या घरात राहायला हवे..”
त्या शांत जंगलात ते गाणे मनातच हलकेसे गुणगुणत मी आजूबाजूला पाहत होतो. वनरक्षक, छायाचित्रकार किंवा निरीक्षणासाठी आलेले लोक आरामात बसू शकतील अशी व्यवस्था होती. तसेच वेळ प्रसंगी एखाद्याला झोपता यावे म्हणून अरुंद जागाही ठेवण्यात आली होती. जंगलातील रात्र जागून काढण्यासाठी आवश्यक तेवढीच, पण अत्यंत विचारपूर्वक केलेली ती रचना होती.
मचाणाच्या भिंती पूर्णपणे बंद नव्हत्या. सभोवतालचे जंगल स्पष्ट दिसावे म्हणून ठिकठिकाणी लहान खिडक्या आणि मोकळ्या फटी ठेवलेल्या होत्या. त्या फटींतून तलाव परिसर, झाडीत होणाऱ्या हालचाली आणि पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांचे सहज निरीक्षण करता येत होते. पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून वरती टिन, लाकूड आणि काही भागात गवताच्या आच्छादनाचे छप्पर घातलेले होते.आतील भागात दुर्बीण, पाण्याच्या बाटल्या, कॅमेरे आणि इतर साहित्य ठेवण्यासाठी छोटी जागा बनवलेली होती.
संपूर्ण रचना पाहताना ते जणू एखादे “हाऊस ऑफ बांबू”च वाटत होते. त्या मचाणावर उभे राहिल्यावर जंगलाच्या अगदी जवळ आल्याचा एक विलक्षण अनुभव येत होता. आत सौर दिव्याची व्यवस्था होती, त्यामुळे रात्री अत्यल्प प्रकाशात आवश्यक काम करता येणार होते.
त्या मचाणाची रचना निरीक्षण, सुरक्षितता आणि मर्यादित आराम या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन तयार करण्यात आली होती. मचाणा समोर बारमाही पाणी असलेला विस्तीर्ण पण आटोपशीर तलाव होता. आजूबाजूची दाट वनराई आणि पाण्याच्या अस्तित्वामुळे त्या परिसरात सुखद थंडावा जाणवत होता. संपूर्ण मचाण दोन-तीन उंच सागवानी वृक्षांच्या मजबूत खोडांचा आधार घेऊन बांधलेले होते. समोरील तलाव, भोवतालची गर्द झाडी आणि उंच वृक्ष यांच्या सान्निध्यात ते मचाण जणू निसर्गात पूर्णपणे विलीन झालेले दिसत होते.
मचाणावर चढल्यावर थंड वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करून जात होती. समोर तलाव परिसर, दूरवर पसरलेले जंगल आणि हलकेच डुलणारी वृक्षशिखरे नजरेत भरत होती. सकाळी येथे पक्ष्यांचा मधुर किलबिलाट ऐकू येत असावा, तर रात्री जंगलातील रहस्यमय आवाज वातावरण अधिकच रोमांचक करत असतील, अशी कल्पनाच मनाला थरारून टाकत होती.
जंगलातील जीवन जवळून अनुभवण्यासाठी “मचाण” ही खरोखरच एक रोमांचकारी रचना मानली जाते. मचाण म्हणजे झाडांवर किंवा उंच खांबांवर बांधलेला लाकडी अथवा बांबूचा उंच निवारा. पूर्वी शिकारीसाठी त्यांचा उपयोग केला जात असे परंतु आज वन्यजीव निरीक्षण, छायाचित्रण, संशोधन आणि जंगल अभ्यासासाठी मचाणांचे महत्त्व अत्यंत वाढले आहे.
मचाणावर बसून एखाद्या पाणवठ्याकडे शांतपणे लक्ष ठेवले, तर हरणे, रानडुक्करे, माकडे किंवा कधी कधी वाघासारखे हिंस्त्र प्राणीही पाहायला मिळू शकतात. वनरक्षक, संशोधक आणि छायाचित्रकार प्राण्यांना कोणताही त्रास न देता त्यांचे निरीक्षण करता यावे म्हणून मचाणांचा उपयोग करतात. साहस, संयम, निरीक्षण आणि निसर्ग प्रेम यांचे सुंदर प्रतीक म्हणजे मचाण.
आम्ही मचाणावर पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. संधिप्रकाश अजून वनराईत रेंगाळत असेल, अशी माझी कल्पना होती पण त्या निबीड जंगलात परिस्थिती वेगळीच होती. मावळत्या उजेडाची छटा जणू वृक्षांच्या दाट सावल्यांमध्ये विरघळून गेली होती. विस्तीर्ण माळरानावर किंवा समुद्रकिनारी संधिप्रकाशाची जी मोहक जादू अनुभवायला मिळते, ती येथे अजिबात जाणवत नव्हती. उलट अंधाराने घाई असल्यासारखी संपूर्ण जंगलावर आपली काळी चादर नकळत पसरवली होती.
काही क्षणांतच गडद काळोख सर्वत्र दाटून आला. इतका की डोळ्यासमोर हात धरला तरी काहीच दिसत नव्हते. ते दृश्य पाहून शामक वैतागून म्हणाला,“शट यार! एवढ्या लांब जीव टाकत आलो.काय अर्थ आहे ? या अंधारात काहीच आपल्या हाती लागणार नाही. येताना तीन-चार शॉट्स मिळाले, तेवढंच!”
तेवढ्यात बाबूलालने मचाणातील एक सौरदिवा सुरू केला. मंद पिवळसर प्रकाशात त्याचा शांत चेहरा दिसू लागला. तो निवांतपणे म्हणाला,“घाई करू नका साहेब ! तुमचा सेटअप लावून घ्या आणि आधी जेवून घ्या. थोड्याच वेळात चंद्र उगवेल. मग सगळीकडे लख्ख चांदणं पडेल. त्या उजेडात बहुतेक प्राणी समोरच्या पाणवठ्यावर पाणी प्यायला येतात.असा आमचा तसा अनुभव आहे. मी सुद्धा आज त्यांची गणना करायलाच आलो आहे.”मग त्याने माझ्याकडे वळून विचारले,
“साहेब, दुर्बीण आणली आहे ना?”
मी हलकेसे हसत उत्तर दिले,
“हो..आणली आहे.”
“मग ठीक आहे,” तो म्हणाला,
“चला, आधी जेवून घेऊया आणि चंद्रोदयाची वाट पाहूया. अजून अर्धा-पाऊण तासात चंद्र वर येईल..”
आम्ही तिघांनीही सोबत आणलेले जेवण एकमेकांमध्ये वाटून घेतले. जंगलात अशा मोहिमांना जाताना शक्यतो नॉनव्हेज पदार्थ सोबत आणत नाहीत, कारण त्यांच्या वासाने जंगली श्वापदे मचाणाजवळ येण्याची शक्यता असते. मंद सौर दिव्याच्या पिवळसर प्रकाशात, दाट जंगलाच्या मध्यभागी बसून केलेले ते साधे जेवण मात्र आयुष्यभर स्मरणात राहावे असेच होते.
जेवण झाल्यावर शामकने त्याची सिगारेट शिलगावली आणि बाबूलाल कडेही पुढे केली. बाबूलालने ती घेत हलकेच म्हणाला,“साहेब, सिगारेट विझवताना फक्त काळजी घ्या.. उघड्यावर तेव्हढी फेकू नका.” त्याच्या आवाजात नेहमीसारखीच सावधगिरी होती.
मी मात्र मचाणाच्या फटीतून बाहेर डोळे विस्फारून अंधारात काही दिसते का ? हे पाहण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात दूरवर काही ठिपके चमचमताना दिसले. सुरुवातीला क्षणभर वाटले कोणीतरी टॉर्च चमकवत आहे पण लगेच लक्षात आले की ते काजवे आहेत.
तळ्याभोवती च्या झाडांवर बगळ्यांची घरटी होती. त्यांच्या “कैक ss रॅक” आवाजाने आसमंतातील निसर्गरात्र एखाद्या हॉरर सिनेमातील गूढ संगीताची अनुभूती देत होती. त्याला साथ देत घुबडाचा “हु ss हु” घुमणारा आवाज, मोराची केकावली “क्याँ s क्याँ s म्याँव.. म्याँव..” त्यात भर टाकत होती.ते सर्व विचित्र आवाज रात्रीचा थरार अधिकच वाढवत होती. बेडकांचा “डराव डराव” आवाजाची सोबत आणि रातकिड्यांची अखंड किरकिर जणू तंबोऱ्याने खर्ज स्वर लावल्या सारखी एक भेसूर लय देत होती. त्या सगळ्या नादांनी चांदण्याने न्हालेलं पिठूर वातावरण आणखी गूढ, रहस्यमय आणि अंगावर काटा आणणारं बनलं होतं.
उन्हाळ्याच्या अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीला काजवे मोठ्या प्रमाणावर दिसतात. असंख्य काजवे त्या गडद अंधारात चमकत उडत होते. जणू निसर्ग स्वतःच काळोखाच्या विशाल पडद्यावर हिरवट-पिवळ्या प्रकाशाची उधळण करत होता. काही वेळापूर्वी काळ्या चादरीसारखा वाटणारा अंधार आता चांदण्याच्या हलक्या उजेडात रुपेरी झळाळी धारण करू लागला होता.इतक्यात बाबूलालचा मंद पण ठाम आवाज ऐकू आला..
“आता आपलं खरं निरीक्षण सुरू झालं आहे. आता कोणीही बोलायचं नाही. मचाण पूर्ण शांत राहायला हवं.”
चंद्रमाचा प्रकाश आता संपूर्ण जंगलावर दुधाळ चांदण्यासारखा पसरला होता. तळ्याभोवतीचे झाड झुडपे, त्यांची काळी सावली आणि त्या सावल्यांतून पाण्याकडे येणारी जनावरेही आता स्पष्ट दिसू लागली होती. बाबुलाल मचाणावर बसून प्राण्यांची गणना करत होता. अधूनमधून तो अंधार चिरत प्रखर स्पॉटलाईट जंगलाच्या दिशेने फिरवत असे. अचानक डोळ्यांवर पडलेल्या त्या प्रकाशामुळे जनावरांचे चमकणारे डोळे क्षणभर स्थिर होत आणि त्यांची ओळख पटत असे. हीच ती “स्पॉट लाईट काऊंट” पद्धत होती. समोर दिसणाऱ्या प्रत्येक प्राण्याची संख्या, हालचाल आणि दिशा तो काळजीपूर्वक आपल्या जुन्या वहीत नोंदवत होता.
मचाणा खालून लांब लचक आणि आणि जाडजुड काही तरी चमकत जात होते.नीट पाहिले तर तो अजगर होता. चंद्राच्या प्रकाशात त्याची काळपट हिरवी कांती चमकत होती.एखादा आळशी लठ्ठ माणूस शांतपणे रस्त्यावर चालत असतो, तशी त्याची चाल होती. दूरवरच्या एका झाडीत तो गुडूप झाला.
“ चांदणी रात्र पुढे सरकत गेली तशी तळ्या भोवतीची झाडी जणू सावध झाली. अगोदर चितळांचा कळप अलगद पुढे आला. प्रत्येक पाऊल टाकताना ते कान टवकारून आजूबाजूचा अंदाज घेत होते. एखादा नर चितळ अधूनमधून मान वर करून अंधारात नजर फिरवत होता.
थोड्याच वेळात रानडुकरांची जड चाहूल लागली. काठावरचा चिखल उडवत ती थेट पाण्याकडे उतरली. त्यांच्या मागून सांबर सावधपणे पुढे आले. पाणी पितानाही त्यांचे कान सतत हलत होते.
दूर कुठेतरी मोर ओरडला आणि क्षणार्धात सगळीकडे शांतता पसरली. झुडपांतून एखाद्या शिकाऱ्याची चाहूल तर नाही ना, याची जाणीव प्रत्येक जनावराला होती.
काही वेळाने अंधारातून एक विशाल गवा बाहेर आला. त्याच्या जड पावलांनी तळ्याकाठची माती हलल्यासारखी वाटत होती. पाण्यावर चंद्राचे प्रतिबिंब थरथरत होते आणि त्या शांत तळ्यावर जंगलातील प्रत्येक जीव आपली तहान भागवत होता.”
तितक्यात एका बाजूने कोल्हा दबक्या पावलांनी पुढे आला. त्याच्या डोळ्यांत टॉर्चच्या फिकी प्रकाशरेषेत विचित्र चमक दिसत होती. वर आकाशात घुबड ‘हू.. हू..’ करत घिरट्या घालत होते, तर तळ्याकाठी बेडकांचा डर्राव सुरूच होता.
आणि मग सगळे जंगल क्षणभर स्तब्ध झाले. झुडपांआडून आलेल्या जड पावलांच्या आवाजाने प्रत्येक प्राण्याची नजर एका दिशेला वळली..”
रात्र अधिक पिठूर होत चालली होती. चंद्रप्रकाशात समोरील पाणवठा रुपेरी दिसत होता. आम्ही तिघेही पूर्ण शांत बसलो होतो. रातकिड्यांचा सततचा किर्र आवाज आणि अधूनमधून पाण्यात होणारी हलकी हालचाल ऐकू येत होती.अचानक समोरील गर्द झाडीत जोरात खसखस झाली.शामकने क्षणात कॅमेरा त्या दिशेने रोखला. बाबूलालने हाताने आम्हाला अजिबात हालचाल करू नका असा इशारा केला. माझा श्वास नकळत मंद झाला. त्या काळ्याकुट्ट झाडीत दोन पिवळसर डोळे चमकताना दिसले..काही क्षण संपूर्ण जंगल स्तब्ध झाले.
आणि मग सावकाश एक प्रचंड वाघ चांदण्याच्या उजेडात पाणवठ्याकडे उतरू लागला.
त्याच्या प्रत्येक पावलाने पाण्याच्या काठावरील चिखल हलत होता. तो इतका जवळ आला होता की त्याच्या श्वासाचा आवाजही ऐकू येत होता. त्या क्षणी माझ्या हातातील दुर्बीण खाली सरकली. शामकचा कॅमेरा सुरू होता पण आमच्या तिघांच्याही डोळ्यांत एकच भावना होती.थरार..!
त्या रात्री मचाणावर बसून आम्ही फक्त वाघ पाहिला नव्हता..
तर जंगलाच्या खऱ्या राजाचे साम्राज्य अनुभवले होते
चंद्र प्रकाशात रात्र अधिक लख्ख होत चालली होती. चंद्रप्रकाश आता तलावावर पांढऱ्या धुक्यासारखा पसरला होता. आम्ही तिघेही पूर्ण शांत बसून पाणवठ्यावर येणाऱ्या जनावरांची प्रतिक्षा करत होतो.
समोरील तलाव चांदण्याच्या रुपेरी प्रकाशात एखाद्या आरशासारखा चमकत होता. मंद वाऱ्यामुळे पाण्यावर हलकी तरंगरेषा उमटत होती. तलावाच्या काठावर उभ्या असलेल्या साग आणि बांबूंच्या सावल्या पाण्यात लांबवर हलताना दिसत होत्या. अधूनमधून एखादा मासा पाण्यावर उसळी मारत होता आणि त्या शांत पाण्यावर गोल गोल तरंग पसरत होते.
तलावा भोवतीची गर्द वनराई इतकी शांत झाली होती की दूरवर पाणथळीत उभ्या असलेल्या एखाद्या पक्ष्याची हालचाल सुद्धा स्पष्ट जाणवत होती. सततची रातकिड्याची किर्रकिर्र तर कधी दूरवरून येणारा सांबराचा सावध इशारा त्या शांततेला हलकेच छेद देत होता.
चंद्र आता पूर्ण वर आला होता. त्याचे प्रतिबिंब तलावाच्या मध्यभागी थरथरत होते. त्या रुपेरी उजेडात समोरील पाणवठा जणू जंगलातील सर्व प्राण्यांचे गुप्त सभास्थान वाटत होता. बाबूलालच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी हेच ठिकाण संपूर्ण जंगलाचे हृदय बनते.
अचानक तलावाच्या दुसऱ्या टोकाला पाण्यात हलकी हालचाल झाली..
बाबूलाल सावध झाला.
आम्ही तिघांनीही श्वास रोखून त्या दिशेने पाहिले..
आणि मग चांदण्याच्या धूसर प्रकाशात ती रहस्यमय आकृती हळूहळू झाडीतून बाहेर येताना दिसली.
तो कुजबुजला,
“समोर बघा.. पण आवाज करू नका.” त्याचे आपल्याकडे लक्ष आहे.
समोरील पाणवठ्याच्या काठावर एखाद्या सावलीसारखी एक आकृती उभी होती.
सुरुवातीला मला वाटले एखादा आदिवासी असेल पण ती आकृती विचित्र शांत होती. कमरेपर्यंत वाढलेली दाढी, विस्कटलेले केस, उघड्या बोडक्या अंगावर थोपटलेला भस्माचा लेप, चांदण्या प्रकाशात तो ठसठसून दृष्टीस पडत होता आणि हातात लांब भाल्यासारखी टोकेरी टोक असलेली मजबूत काठी.तो वृद्ध सावकाश पाण्याजवळ बसला. आश्चर्य म्हणजे आजूबाजूला असलेली हरणे किंवा सांबरे त्याला अजिबात घाबरत नव्हती. उलट ती शांतपणे त्याच्या आसपास उभी होती.
शामक कॅमेरा उचलणार इतक्यात बाबूलालने त्याचा हात पकडला.
त्याच्या कपाळावर घाम होता.
तो अगदी मंद आवाजात म्हणाला,
“कॅमेरा चालू करू नका. जंगलात काही गोष्टी फक्त पाहायच्या असतात, टिपायच्या नसतात..”
त्या वृद्धाने एकदा आमच्या मचाणाकडे पाहिले.
क्षणभर त्याचे डोळे चांदण्यात चमकले..
आणि पुढच्याच क्षणी तो गर्द जंगलात दिसेनासा झाला.
पहाटे मी बाबूलालला त्याच्याबद्दल विचारले.
तो काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला,
“साहेब.. या जंगलात काही वाटा प्राण्यांच्या असतात आणि काही वाटा या अरण्यऋषींच्या..”
रात्रभर आम्ही त्या मचाणावर शांत बसून जंगलाचा श्वास ऐकत होतो. अधूनमधून पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांच्या सावल्या चांदण्यात उमटत होत्या. पहाटेच्या धूसर अंधारात दूर कुठेतरी रान कोंबड्याने बांग दिली आणि निद्रिस्त अरण्य हळूहळू जागं होऊ लागलं.” त्यानंतर मनातला काळोख हळूहळू विरघळू लागला. त्या एका रात्रीने मला शिकवले की जंगल हे फक्त झाडे आणि प्राणी यांचे स्थान नाही तर ते एक जिवंत, श्वास घेणारे आणि माणसाला नम्र बनवणारे स्वतंत्र विश्व आहे.
रात्रीचे गूढ भेसूर संगीताचे चॅनेल बदलून कोणी तरी पहाटेचे भक्तिमय संगीत सुरू करावे तशी पक्षांची किलबिलाट सुरू झाली. रात्री गूढ संगीताला साथ देणारी मोराची केकावली आता भक्ती गीताला साथ करणारे संगीत वाद्य वाटायला लागले. त्या पहाटेच्या उल्हासित वातावरणात आम्ही मचाणावरून खाली उतरलो.
हवे मध्ये प्राणवायू ठासून भरल्या सारखे वाटत होते. शामक बावा झोपेमुळे पेंगुळलेला असला तरी त्याला ज्या प्रकारचे जंगल रात्रीचे चित्रण हवे होते ते मनसोक्त मिळाले होते. बाबुलालची प्राणी गणना व्यवस्थित झाली होती हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते.मला मात्र जंगलातील त्या एका रात्रीने निसर्गाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली होती. शहरात राहणारा माणूस जंगलाला फक्त “वन” समजतो पण त्या रात्रीनंतर मला जाणवले, जंगलालाही हृदय असते, शांतता असते आणि स्वतःची एक भाषा असते.
त्या रात्री मला थोर निसर्ग लेखक मारुती बापू चितमपल्ली यांच्या लेखनातील जंगल अधिक खोलवर समजले. जंगल पुस्तकातून वाचता येते ते आभासी पद्धतीने डोळ्या पुढे उभे सुद्धा करता येते पण त्याचे खरे चित्रण मचाणावरची एक रात्रच शिकवू शकते. पहाटे पहाटे परतीच्या वाटेवर चालताना मला वाटत होते की जंगल आपण पाहून येत नाही, तर ते जंगल आपल्या मना मध्ये कायमचे घर करून राहते.
बाबुलालला मी जंगलातील त्या गूढ अरण्य ऋषी बद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला “साहेब मेन गेट वरील कॅन्टीन समोरील पारावर बसून यावर निवांतपणे तुम्हाला सर्व सांगतो “ आम्ही निसर्गाची प्रभात माया अनुभवत परतीच्या मार्गावर लागलो..
( क्रमश…एपिसोड २)
मचाण शांतता : अरण्यऋषी - जंगलाचा अदृश्य रक्षक”
ही कथा ताडोबा अंधारीच्या निबीड जंगलात घडणाऱ्या गूढ घटनांवर आधारित एक थरारक मराठी जंगलमालिका आहे. अंधारी नदी, वनरक्षकांचे अनुभव, जंगलातील रहस्यमय व्यक्तिमत्त्व आणि निसर्गाच्या अदृश्य शक्ती यांचा संगम असलेली ही कथा वाचकाला एका वेगळ्याच अरण्यविश्वात घेऊन जाते.
टीप - जर तुम्हाला जंगल, वन्यजीव, गूढ कथा, थरारक अनुभव आणि आध्यात्मिक रहस्य या करीता
🔗 मचाण शांतता : ‘अरण्यऋषी’ - ‘जंगलाचा अदृश्य रक्षक’ ( एपिसोड -२ ) |ताडोबा जंगलातील थरारक मराठी रहस्यकथा..
अस्वीकरण -
या कथेत वर्णन केलेले प्रसंग, व्यक्तिरेखा आणि अनुभव हे साहित्यिक मांडणीचा भाग आहेत. कोणत्याही व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.👉
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख
प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.
💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.
👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.
तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.
धन्यवाद! 🙏
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved
(ओमकार शिवलकर)
📩 Subscribe करा
नवीन पोस्ट लगेच मिळवा!


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा