मुख्य सामग्रीवर वगळा

भक्तांचा कैवारी : जय सदगुरू शंकर महाराज | भाग ३ | श्रद्धा, चमत्कार आणि गुरुकृपेची सत्यकथा

“भक्तांचा कैवारी : जय सदगुरू शंकर महाराज”| भाग -3| श्रद्धा, चमत्कार आणि गुरुकृपेची सत्यकथा

भक्तांचा कैवारी : जय सदगुरू शंकर महाराज | भाग ३ | श्रद्धा, चमत्कार आणि गुरुकृपेची सत्यकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
संपला होता आधार, हरवली होती आस,

मंदावला होता जीवनाचा प्रत्येक श्वास |

सदगुरू कृपेने उजळला त्याचा जीवनसाज,

भक्तवत्सल जय सदगुरू शंकर महाराज ||

🔗"दोन इशारे आणि वाचलेले प्राण" - श्री शंकर महाराज लीला | भाग -2| सत्य घटनांवर प्रेरित भक्तीकथा

सावित्रीच्या प्रलयंकारी रात्रीत घडलेली एक थरारक आणि गूढ कथा,मुसळधार पाऊस, सावित्री नदीचा रौद्र अवतार, अंधाराने गिळलेला महामार्ग आणि मृत्यूची चाहूल देणारे दोन अनाकलनीय इशारे..ही कथा मागील पोस्ट मध्ये वाचली असेलच..

“भक्तांचा कैवारी : जय सदगुरू शंकर महाराज”| भाग -3| श्रद्धा, चमत्कार आणि गुरुकृपेची सत्यकथा

मृत्यूच्या दाराशी पोहोचलेल्या एका भक्ताला कोमाच्या अंधारातून परत जीवन प्रकाशात आणणाऱ्या सदगुरूंच्या कृपेची हृदयस्पर्शी अनुभूती. श्रद्धा, विश्वास आणि सदगुरूंच्या अमोघ कृपाशक्तीची ही भक्तीकथा..

सदगुरू शंकर महाराजांच्या कृपेमुळे घडलेल्या चमत्कारांच्या कथा आजही हजारो भक्तांना श्रद्धा आणि विश्वासाची प्रेरणा देतात. या भागात मृत्यूच्या दाराशी पोहोचलेल्या एका भक्ताला सदगुरूंच्या अमोघ कृपेने नवजीवन कसे मिळाले, याचा हृदयस्पर्शी अनुभव उलगडतो. श्रद्धा, गुरुभक्ती आणि दैवी कृपाशक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाने ही कथा शेवटपर्यंत जरूर वाचावी.


भाग - 2 वरून पुढे...  

वसंत, वर्षा, अनंत आणि त्यांच्या परिवाराच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होते. मात्र वसंत आणि वर्षाच्या चेहऱ्यावर ते समाधान अक्षरशः ओसंडून वाहत होते. ज्यांच्या कृपेने आपले प्राण वाचले, त्या सदगुरुंचे दर्शन झाल्याची भावना त्यांच्या अंतःकरणात दाटून आली होती.

तीर्थप्रसाद ग्रहण करून आणि काही काळ दर्शन मंडपात ध्यान करून ते मंदिरा बाहेर पडू लागले, इतक्यात रामनाथ यांनी प्रेमाने हाक मारली.

“अहो मंडळी, जरा थांबता का? शंकर महाराजांचे दर्शन घेतलेत, हे फार चांगले झाले. सदगुरुंची कृपा तुमच्या पाठीशी सदैव राहो. मला तुमच्याशी थोडे बोलायला आवडेल.”

वसंत आणि अनंत यांनी एकमेकांकडे पाहिले.

“आपल्याला आता थेट घरीच जायचे आहे. थोडा वेळ अजून थांबलो तरी हरकत नाही,” वसंतचे साडू अनंत म्हणाले.

सर्वजण रामनाथ यांच्यासमोर बसले. काही क्षण शांत राहून ते म्हणाले,

“ तुमचे संभाषण माझ्या कानावर पडले. तसेच महाराजांप्रती तुमची भक्ती आणि भावपूर्ण हालचाल पाहून मीही भारावून गेलो.”

वर्षा आणि वसंतकडे पाहत ते पुढे म्हणाले,

“तुम्ही दोघे खरोखर भाग्यवान आहात. महाराजांनी तुम्हाला त्यांच्या चिन्मय स्वरूपाची अनुभूती दिली आहे. अनेक भक्तांना ते विविध स्वरूपांत दर्शन देतात, मार्गदर्शन करतात, संकटातून बाहेर काढतात. म्हणूनच माझ्याकडून तुम्हा दोघांना प्रणाम.”

असे म्हणत त्यांनी नम्रतेने हात जोडले.

नंतर वसंतकडे पाहून ते म्हणाले,

“सावित्री नदीच्या काठावर, काळोख्या रात्री मृत्यू दबा धरून बसला असताना महाराजांनी इशारा देऊन ते संकट दूर केले, हे तुमच्या तोंडून ऐकले आणि मला माझा स्वतःचा अनुभव आठवला. म्हणूनच तुम्हाला थांबवले.”

क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले,

“दत्त संप्रदायातील अवतारी महापुरुष कधीच स्वतःची कीर्ती पसरवण्याचा आग्रह धरत नाहीत. पण त्यांच्या भक्तांवर एक जबाबदारी असते. अनुभूतीचे अवडंबर माजवणे नव्हे, तर भक्ती योगाचा प्रसार करून सामान्य माणसाला श्रद्धा, संयम आणि सदाचाराच्या मार्गाकडे वळवणे हीच खरी सदगुरू सेवा आहे. त्यामुळे अनेकांचे दुःख हलके होते आणि जीवनाला नवी दिशा मिळते.”

"मी मूळचा सावंतवाडीचा पण नोकरीनिमित्त अनेक वर्षे मुंबईत वास्तव्यास होतो. आता मात्र निवृत्तीनंतर मी आणि माझी पत्नी धनकवडी येथे स्थायिक झालो आहोत. उरलेले आयुष्य शंकर महाराजांच्या चरणी व्यतीत करावे, त्यांच्या सेवेत आणि स्मरणात घालवावे, या एकाच भावनेने आम्ही येथे घर विकत घेतले. महाराजांच्या कृपेने आमचे जीवन सुख, समाधान आणि शांततेत व्यतीत होत आहे.”

मुंबई आणि सावंतवाडी सोडून पुण्यातील धनकवडी येथे स्थायिक होण्यामागे एक विलक्षण प्रसंग कारणीभूत आहे. तो प्रसंग सांगण्याआधी मला एक छोटी विनंती करायची आहे.

महाराजांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या भक्तांना मी त्यांच्या चरित्राचे पुस्तक भेट देत असतो. ही दोन पुस्तके तुम्हा दोघांसाठी."

असे म्हणत त्यांनी आपल्या झोळीतून दोन पुस्तके काढली आणि वसंत व अनंत यांच्या हातात दिली.

"कृपया यांचे वाचन करा. शक्य असल्यास पारायणही करा. महाराजांचे चरित्र हे केवळ पुस्तक नाही, तर अनेक अनुभूतींचा खजिना आहे."दोघांनीही ती पुस्तके आदराने हातात घेतली आणि भक्तिभावाने आपल्या मस्तकाला टेकवली. त्यांच्या मनात महाराजांविषयीचा आदर आणि श्रद्धा आणखी दृढ झाली होती.

त्यानंतर रामनाथ कोणती अनुभूती सांगणार आहेत, याची उत्सुकता सर्वांच्या मनात निर्माण झाली. सर्वजण शांतपणे, एकाग्र चित्ताने आणि पूर्ण लक्ष देऊन त्यांच्या समोर बसले. मंदिरातील वातावरणात एक विलक्षण गांभीर्य आणि चैतन्य भरून राहिले होते.

 रामनाथ यांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभर त्यांनी वसंत आणि अनंत यांच्या डोळ्यांत पाहिले. त्यानंतर त्यांची नजर हळूहळू समाधी मंदिराकडे वळली. शंकर महाराजांच्या समाधीकडे भक्तिभावाने पाहत ते पुढे बोलू लागले..

"मी मुंबईतील एका शासकीय कार्यालयात अधिकारी पदावर कार्यरत होतो. सेवेची अजून दोन वर्षे बाकी होती. मुलांचे शिक्षण पूर्ण झाले होते, त्यांची लग्नेही झाली होती. आता फक्त निवृत्तीची वाट पाहत होतो.”

“निवृत्तीनंतर सावंतवाडीला जाऊन कायमचे स्थायिक व्हायचे आणि कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात उर्वरित आयुष्य शांतपणे व्यतीत करायचे, असा आमचा निर्धार होता. त्यासाठी वडिलोपार्जित घराची डागडुजीही करून ठेवली होती.”

“खरे तर माझी अर्धांगिनी नेहमी म्हणायची,

बस्स झाले आता..थांबा. वयाच्या अठराव्या वर्षापासून सतत काम करत आला आहात. आता थोडा आराम करा. मेहनत करायची हौस असेल तर आपल्या गावच्या मातीत करा. मुंबईतील धावपळ, धक्के आणि धाकधुकीचे जीवन आता पुरे झाले.”

तिचे म्हणणे ऐकून मी हसत उत्तर द्यायचो,

“ माझी उरलेली दोन वर्षाची शासकीय सेवा मी केवळ नोकरी म्हणून करत नाही. तर ती आता माझ्यासाठी जनसेवा झालेली आहे. एखाद्या नागरिकाचे काम वेळेत पूर्ण झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान मला वेगळाच आनंद देऊन जाते. हा अनुभव मला अजून दोन वर्षेच मिळणार आहे. त्यानंतर तर निसर्गाच्या सान्निध्यात, आपल्या कोकणात राहून आपल्याला जीवन जगायचेच आहे.”

“माझे हे उत्तर ऐकून ती समाधानाने हसायची परंतु तिच्या मनात निवृत्तीनंतर मला लवकरात लवकर गावी घेऊन जाण्याची ओढ मात्र कायम होती.”

“खरे सांगायचे तर मला सुद्धा कार्यालयातून घरी जाण्याची विशेष घाई नसायची. दिवसातील जास्तीत जास्त काम पूर्ण व्हावे, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा व्हावा, यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असायचो. कार्यालयात वेळेच्या आधी पोहोचणे आणि आवश्यक असल्यास उशिरापर्यंत थांबून काम करणे हा माझा नित्यक्रमच बनला होता”

“दिवसभराचे काम समाधानकारक रीतीने पूर्ण करून कार्यालयाबाहेर पडताना मनात एक वेगळेच समाधान दाटून यायचे. एखाद्या नागरिकाचे काम वेळेत पूर्ण झाल्याने त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान पाहणे, हीच माझ्यासाठी खरी कमाई होती”

“उलट एखादे काम काही कारणास्तव प्रलंबित राहिले की मन अस्वस्थ व्हायचे. घरी गेल्यानंतरही त्या प्रकरणाचे विचार डोक्यात घोळत राहायचे. त्यामुळे शक्य तितके काम त्याच दिवशी पूर्ण करण्याकडे माझा कटाक्ष असायचा”.

“कदाचित म्हणूनच सेवेतली शेवटची दोन वर्षे मी नोकरी म्हणून नव्हे, तर जनसेवेची एक संधी म्हणून जगत होतो”.

रामनाथ यांचे ते अनुभव कथन वसंत, अनंत आणि त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य मनःपूर्वक ऐकत होते.

  “सन २०१२ मधील ते पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस होते. मुंबईत नुकताच पावसाळा सुरू झाला होता. पावसाळ्याच्या सुरुवातीला मुंबईचे एक वेगळेच रूप पाहायला मिळते. उन्हाळाभर साचलेली धूळ, माती आणि कचरा पहिल्या काही सरींमध्ये वाहून येतो. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलेले असते”.

“रेल्वे स्थानकांवरील पादचारी पूल, फलाट, रस्त्यांच्या कडेला असलेल्या फरशा आणि पदपथ यांवर चिखलाचा एक पातळ थर जमा झालेला दिसतो. अशा वेळी प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. क्षणभर दुर्लक्ष झाले किंवा पाय घसरला, तर थेट धाडकन आपटण्याची वेळ येते. नशीब बलवत्तर असेल तर किरकोळ मार लागून निभावून जाते अन्यथा कपाळमोक्ष हा अटळच समजावा.”

रामनाथ यांचे शब्द ऐकून वसंतने संमतीदर्शक मान हलवली. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनाचा अनुभव घेतलेल्या त्यालाही त्यांच्या म्हणण्यातील सत्य जाणवत होते.

“मग तुमच्या पायात कितीही महागडे किंवा नामांकित कंपनीचे बूट असोत, निसरड्या फरशीसमोर त्यांचाही निभाव लागत नाही. मुंबईकरांना पावसाळ्याच्या सुरुवातीला या परिस्थितीची चांगलीच सवय असते. त्यामुळे रेल्वेच्या जिन्यावर चढताना किंवा उतरताना प्रत्येक जण आपोआप सावध होतो”

“त्या दिवसांतही अशीच परिस्थिती होती. आकाश सतत ढगांनी भरून गेलेले होते आणि केव्हा पावसाची सर कोसळेल याचा काही नेम नव्हता”.

“त्या दिवशी कार्यालयात एक महत्त्वाची बैठक होती. त्यामुळे मी नेहमीपेक्षा थोडा लवकर घराबाहेर पडलो. पण रस्त्यावर येऊन पाहतो तर रिक्षांसाठी प्रचंड रांग लागलेली होती. घरातून वेळेत निघूनही रिक्षेमुळे कार्यालयात उशीर होणार, याची चिन्हे दिसू लागली”.

“कसेबसे रिक्षा मिळाली आणि मी बोरिवली स्थानकात पोहोचलो. घड्याळाकडे नजर टाकली. वेळ हातातून निसटत होती. चर्चगेटकडे जाणारी गाडी कोणत्याही परिस्थितीत पकडायची, या निर्धाराने मी भराभर पावले टाकू लागलो”

“फलाटाकडे जाणारा जिना मी सफाईदारपणे उतरू लागलो. तेवढ्यात समोर गाडी फलाटावर उभी असल्याचे दिसले. गाडी सुटण्याआधी पोहोचण्यासाठी मी अजून थोडा वेग वाढवला.”

आणि नेमका तिथेच घात झाला...

“माझा उजवा पाय जिन्याच्या पायऱ्यांवर बसवलेल्या, असंख्य प्रवाशांच्या वर्दळीमुळे गुळगुळीत झालेल्या स्टीलच्या पट्टीवर पडला आणि क्षणार्धात घसरला. एका हातात बॅग असल्याने स्वतःला सावरण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.”

“मी वेगात असल्यामुळे मागे गेलेला तोलही तितकाच जोरदार होता.

पुढच्याच क्षणी माझ्या डोक्याचा मागील भाग जोरात पायरीवर आदळला.”

"धाssप!"

“तो आवाज झाला आणि माझ्या डोक्यात प्रचंड वेदना आणि रक्तस्त्राव सुरू झाला,जोराची उलटी झाली आणि त्याच क्षणी माझ्या डोळ्यांसमोर काळाकुट्ट अंधार पसरला.”

“पुढे काय झाले, याची मला काहीच माहिती नाही”

मात्र त्यानंतर जे काही घडले, ते मला माझ्या पत्नीच्या तोंडून समजले.

"सकाळची साधारण अकराची वेळ असावी. मुलगा आणि सुनबाई कार्यालयात गेले होते. घरात ती एकटीच होती. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली.”

फोनवरील क्रमांक अनोळखी होता.

“हॅलो..”

समोरून एक गंभीर आवाज आला.

“मॅडम, आम्ही बोरिवलीतील एका रुग्णालयातून बोलत आहोत. तुमच्या पतींचा अपघात झाला आहे. कृपया तात्काळ रुग्णालयात या.”

“हे शब्द ऐकताच तिच्या  पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. क्षणभर तिला काहीच सुचेना. तिचे हातपाय थरथरू लागले.”

“तिने स्वतःला सावरत तातडीने मुलाला, सुनेला आणि विवाहित मुलीला फोन केला. घडलेला प्रकार सांगून त्यांनाही त्वरित रुग्णालयात येण्यास तिने सांगितले.”

“काही वेळातच ती  रिक्षाने रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचली.तिच्या मनात भीतीचे असंख्य विचार गर्दी करत होते. अपघाताची बातमी ऐकल्यापासून तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. पाय लटपटत होते. पुढे काय दिसणार, काय ऐकायला मिळणार याची कल्पनाही तिला करवत नव्हती.”

“आधार द्यायला जवळ कोणीच नव्हते. अशा अवस्थेत ती मनोमन सदगुरुंचे नाव घेत आणि धीर एकवटत रुग्णालयात तिने प्रवेश केला.”

“रिसेप्शन काउंटरवर जाऊन तिने  माझ्या  नावाची चौकशी केली. कर्मचाऱ्यांनी संगणकावर माहिती तपासली आणि तिला तात्काळ आयसीयू विभागात जाण्यास सांगितले”

“आयसीयूच्या दाराशी पोहोचल्यावर सुरुवातीला तिला आत जाऊ दिले नाही. मात्र ती  माझी पत्नी असल्याचे तिने सांगितल्यावर कर्मचाऱ्यांनी तिला आत प्रवेश दिला”.

“दार उघडून,थरथरणाऱ्या पावलांनी ती आत शिरली.."

रामनाथ यांच्या तोंडून त्यांच्या पत्नीने अनुभवलेली ती धावपळ, असहायता आणि मनःस्थितीचे वर्णन ऐकून वसंत आणि अनंत यांच्या पत्नींचे डोळे नकळत पाणावले. एका स्त्रीच्या मनावर अचानक ओढवलेल्या त्या प्रसंगाची तीव्रता त्यांना प्रकर्षाने जाणवत होती. त्या दोघीही भावूक होऊन रामनाथ यांच्या तोंडून त्यांच्या पत्नीचे अनुभव मनोभावे ऐकत होत्या.

आयसीयूच्या दारातून आत प्रवेश करताच तिच्या मनावर एक अनामिक दडपण आले. सर्वत्र औषधांचा तीव्र वास दरवळत होता. विविध यंत्रांमधून येणारे "बीप.. बीप.." असे नियमित आवाज वातावरणातील गंभीरता अधिकच वाढवत होते. काही रुग्ण बेशुद्ध अवस्थेत पडले होते, तर काहींच्या शरीराला विविध नळ्या आणि वैद्यकीय उपकरणे जोडलेली होती.

पांढऱ्या शुभ्र मंद प्रकाशात न्हालेल्या त्या वॉर्डमध्ये मृत्यू आणि जीवन यांच्यातील संघर्ष जणू उघड्या डोळ्यांनी दिसत होता. प्रत्येक चेहऱ्यावर चिंता आणि अनिश्चिततेची छाया पसरलेली होती. त्या वातावरणात तिच्या हृदयाची धडधड आणखी वाढली आणि भेदरलेल्या नजरेने ती माझा बेड शोधू लागली.

आयसीयूच्या त्या गंभीर वातावरणात तिची नजर प्रत्येक बेडवर फिरत होती. मनात भीतीचे असंख्य विचार उसळत होते. "नेमके किती गंभीर लागले असेल?", "त्यांची अवस्था कशी असेल?", "ते शुद्धीवर असतील का?" असे अनेक प्रश्न तिच्या मनात वादळासारखे घोंगावत होते.

जितकी ती माझ्या बेडच्या जवळ जात होती, तितकी तिची छातीतली धडधड वाढत होती. हात थरथरत होते. मनातल्या मनात ती सदगुरू दत्त महाराजांचा धावा करत होती. "महाराज, माझ्या नवऱ्याला काही होऊ देऊ नका," अशी प्रार्थना तिच्या ओठांवर सतत येत होती.

अखेर तिची नजर माझ्यावर पडली. डोक्याला जाड बँडेज बांधलेले होते. हाताला सलाईन लावलेली होती. चेहरा निस्तेज दिसत होता. ते दृश्य पाहताच तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. क्षणभर तिचे पाय लटपटले. समोर उभे असलेले वास्तव स्वीकारणे तिला कठीण जात होते.

तरीही पुढच्याच क्षणी तिने स्वतःला सावरले. कारण त्या क्षणी रडणारी पत्नी नव्हे, तर आपल्या पतीसाठी खंबीरपणे उभी राहणारी जीवनसंगिनी होणे अधिक आवश्यक होते.

  तिने माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी तिच्याकडे गंभीर नजरेने पाहिले आणि म्हणाले,

"पेशंटची परिस्थिती सध्या तरी अत्यंत नाजूक आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने जीवाला तातडीचा धोका नाही परंतु ते सध्या कोमामध्ये गेले आहेत."

रामनाथ यांचे हे विधान ऐकताच वसंत आणि अनंत यांच्या चेहऱ्यावरील भाव क्षणात बदलले. काही क्षणांपूर्वी उत्सुकतेने ऐकणारे ते दोघे आता गंभीर झाले होते. रामनाथ यांच्या आयुष्यात घडलेल्या त्या प्रसंगाची भीषणता त्यांच्या मनाला स्पर्शून गेली होती.

डॉक्टरांचे शब्द ऐकताच तिच्या छातीत धडकी भरली.

कंपित आवाजात तिने विचारले,

"डॉक्टर, ते कोमातून कधी बाहेर येतील?"

डॉक्टर काही क्षण शांत राहिले.

"याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही. ते उद्याही शुद्धीवर येऊ शकतात किंवा काही महिने, कदाचित काही वर्षेसुद्धा लागू शकतात. प्रत्येक रुग्णाची परिस्थिती वेगळी असते." हे उत्तर ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. डोळ्यांसमोर अंधारी दाटून आली. काही क्षण तिला स्वतःचा तोल सावरताही येईना.

क्षणभरापूर्वी पर्यंत अपघाताची भीती होती पण आता त्याहून भयानक वास्तव तिच्यासमोर उभे ठाकले होते. आयुष्यभर खंबीरपणे कुटुंबाचा आधार बनून उभा राहिलेला तिचा जीवनसाथी बेशुद्ध अवस्थेत मृत्यू आणि जीवन यांच्या सीमारेषेवर पडला होता.

डोळ्यांतून निरंतर अश्रू ओघळत होते. मात्र पुढच्याच क्षणी तिने डोळे पुसले, मनात निरंतर ‘सदगुरू श्री दत्ता’चा धावा सुरू होता आणि तिचे थरथरणारे मन स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते.

दरम्यान, अपघाताची बातमी कळताच आमचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिचित रुग्णालयात जमा होऊ लागले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. आयुष्यभर हसतमुख, उत्साही आणि इतरांच्या मदतीला धावून जाणारा मी आज आयसीयूच्या बेडवर निपचित पडलेलो होतो.

मात्र त्या क्षणी माझ्यासाठी कोणीही काही करू शकत नव्हते. सर्वजण हतबल होऊन काचेच्या पलीकडून माझ्याकडे पाहत उभे होते. कोणाच्या ओठांवर प्रार्थना होती, कोणाच्या डोळ्यांत अश्रू होते, तर कोणाच्या मनात आशा आणि भीती यांचा संघर्ष सुरू होता.वेळ पुढे सरकत होती पण माझ्यात कोणतीही हालचाल दिसत नव्हती. त्यामुळे प्रत्येक क्षणासोबत सर्वांची अस्वस्थता वाढत चालली होती.

हे सर्व सांगत असताना मध्येच रामनाथ काही क्षण शांत झाले. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव पाहूनच पुढील प्रसंग साधासुधा नसल्याची वसंत आणि त्या सर्वांना जाणीव झाली. मंदिरातील वातावरण अधिकच गंभीर झाले होते. पुढे काय झाले असेल? हा प्रश्न आता उपस्थित प्रत्येकाच्या मनात घर करून बसला होता.

असेच दिवस सरत होते. भौतिक जगात काय घडत आहे, याची मला कोणतीही जाणीव नव्हती. परंतु कोमाच्या त्या अचेतन अवस्थेत मी एका विलक्षण, गूढ आणि अंधाऱ्या विश्वात वावरत होतो.

त्या जगात ना दिवस होता, ना रात्र. सभोवताली असीम काळोख पसरलेला होता. कधी कधी त्या काळोखाच्या पलीकडून कुणीतरी मला खुणावत असल्याचा भास व्हायचा. जणू मृत्यूचे दूत मला त्यांच्या दिशेने बोलावत होते.

अशाच एका वेळी त्या अंधाऱ्या विश्वात एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व प्रकट झाले. त्यांच्या भोवती दिव्य प्रकाशाचे वलय होते. चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि नजरेत अथांग करुणा होती.

मी त्या प्रकाशाच्या दिशेने पाहत असतानाच ते माझ्याजवळ आले आणि मला मागे खेचू लागले.

"तुम्ही मला मागे का नेत आहात?" मी त्यांना विचारले.

त्यावर ते शांतपणे म्हणाले,

"तुझी आयुष्यरेषा अजून संपलेली नाही. तुझे कार्य अजून बाकी आहे. हे अंधाराचे जग तुझ्यासाठी नाही. तुझी जागा इहलोकात आहे. इथे अधिक काळ थांबलास, तर तुझ्या हाती असलेली संधीही निसटून जाईल."

मला मात्र त्या गूढ जगातून बाहेर पडायचे नव्हते. मी त्यांचे ऐकण्यास तयार नव्हतो. शेवटी त्यांनी मला अक्षरशः उचलून आपल्या खांद्यावर घेतले आणि त्या गाढ अंधारातून ते मला दूर घेऊन जाऊ लागले.

यानंतर काय घडले, याची मला आठवण नाही.

पण दोन आठवड्यांनंतर मी कोमातून बाहेर आलो.

डोळे उघडल्यावर मी पुन्हा या जगात परतलो होतो.

मात्र एक प्रश्न माझ्या मनात कायम राहिला होता.मला त्या अंधाऱ्या विश्वातून परत आणणारे ते अवलिया संत नेमके कोण होते?

काही महिन्यांनी एकदा मी पुस्तकांच्या दुकानात पुस्तके पाहत उभा होतो. तेव्हा अचानक माझी नजर एका पुस्तकावर गेली.

पुस्तकाचे नाव होते ,"अवलिया संत शंकर महाराज".

मुखपृष्ठावरील छायाचित्र पाहताच माझ्या अंगावर शहारे आले.

दोन पाय दोन्ही हातांनी ओढून बसलेली तीच मुद्रा.. तोच तेजस्वी चेहरा.. तीच करुणामय नजर..

मी क्षणात स्तब्ध झालो.

"अगं, हे बघ!" मी पत्नीला उत्साहाने म्हणालो, "मला त्या अंधाऱ्या जगातून परत आणणारे संत हेच होते. अगदी असेच दिसत होते!"

त्या दिवसापासून माझ्या आयुष्याला नवे वळण मिळाले.

मी ते पुस्तक विकत घेतले, संपूर्ण वाचून काढले आणि त्यानंतर सहपत्नी धनकवडी येथील समाधी मंदिरात दर्शनासाठी आलो.

मुंबई आणि सावंतवाडी सोडून आज मी आणि माझी पत्नी याच भागात रहात आहोत. आमचे उरलेले आयुष्य त्यांच्या चरणी अर्पण केले आहे. हीच माझी कृतज्ञता आणि हीच माझी सदगुरू सेवा.

रामनाथ यांचे अनुभव कथन संपताच काही क्षण मंदिर परिसरात शांतता पसरली. त्यांच्या आयुष्यावर कोसळलेल्या त्या भीषण संकटाची आणि कोमाच्या अंधाऱ्या गर्तेतून त्यांना सुरक्षितपणे परत आणणाऱ्या सदगुरूंच्या कृपेची कथा ऐकून सर्वजण भारावून गेले होते.
वसंत, अनंत आणि त्यांच्या परिवाराच्या मनात श्री शंकर महाराजांविषयीचा आदर, श्रद्धा आणि भक्तिभाव अनेकपटींनी वाढला होता. संकटाच्या काळात भक्तांचा कैवारी बनून धावून येणाऱ्या आणि मृत्यूच्या दारातूनही आपल्या भक्ताला परत आणणाऱ्या त्या अवलिया सदगुरूंच्या चरणी त्यांचे मन कृतज्ञतेने नतमस्तक झाले.

त्या क्षणी प्रत्येकाच्या अंतःकरणातून एकच उदगार उमटत होता

"भक्तवत्सल, भक्तांचा कैवारी, जय सदगुरू श्री शंकर महाराज!" 

ही कथा केवळ एका व्यक्तीची अनुभूती नाही, तर संकटसमयी सदगुरू वरील अढळ श्रद्धा आणि विश्वास किती सामर्थ्यशाली असतो याची प्रचीती आहे.

समाप्त 🖋️📖📚

तुम्हालाही श्री शंकर महाराजांची कृपा किंवा एखादी अनुभूती लाभली असेल, तर ती कमेंटमध्ये जरूर शेअर करा. अशाच सत्यकथा, अनुभूती आणि भक्तिमय लेखांसाठी "शब्दांची मुशाफिरी" ला नियमित भेट द्या.

अस्वीकरण -

ही कथा काल्पनिक साहित्यिक स्वरूपात साकारण्यात आली असून ती केवळ वाचकांच्या मनोरंजन, चिंतन आणि भक्तिभाव जागृत करण्याच्या उद्देशाने लिहिण्यात आली आहे. कथेमधील पात्रे, संवाद, प्रसंग, अनुभूती आणि अलौकिक वर्णने ही कथानकाच्या गरजेनुसार सादर केलेली साहित्यिक मांडणी आहे. त्यांचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती, घटना किंवा अनुभवाशी थेट संबंध जोडण्याचा हेतू नाही. तसेच या कथेद्वारे कोणत्याही अलौकिक, धार्मिक किंवा वैज्ञानिक दाव्याची पुष्टी करण्याचा उद्देश नाही.

🎨 'एक चित्रकार : एका चुकीच्या रेषेची शिक्षा'| हृदयस्पर्शी मराठी कथा | कला, संघर्ष आणि पश्चात्ताप 🖌️🔗

एका संवेदनशील चित्रकाराची, विचारांच्या नावाखाली आयुष्यभराची किंमत मोजावी लागलेल्या माणसाची हृदयस्पर्शी कहाणी. कला, अस्मिता, संघर्ष, गुन्हा, तुरुंगवास आणि पश्चात्ताप यांचा वेध घेणारी ही काल्पनिक कथा तुम्हाला अंतर्मुख करेल. वाचा पुढील कथेत..👉

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.


तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी - लोगो






📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...