मुख्य सामग्रीवर वगळा

गोव्यात फुललेली प्रेमकथा | भाग १ | सत्यकथेवर प्रेरित हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा

 अस्वीकरण-

    ही कथा लेखकाच्या आठवणी आणि अनुभवांवर प्रेरित असली तरी गोपनीयता जपण्यासाठी सर्व पात्रांची नावे, गावाचे नाव, हॉटेलचे नाव आणि ओळख पटवू शकणारे इतर तपशील बदलण्यात आले आहेत. कथेतील काही प्रसंग साहित्यिक मांडणीसाठी विस्ताराने वर्णन केलेले आहेत. या कथेतील कोणतेही पात्र, संस्था किंवा घटना प्रत्यक्ष व्यक्ती अथवा ठिकाणाशी जुळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

    'सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा' – (Episode - १)|सत्यकथेवर प्रेरित हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा

गोव्यात फुललेली प्रेमकथा | भाग १ | सत्यकथेवर प्रेरित हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
गोव्याच्या लाटांनी प्रेमाची कहाणी लिहिली,
एका नजरेने दोन हृदयांची दारे उघडली |
स्वप्नांच्या वाटेवर पावले पुढे पडली,
पण नियतीने अजून शेवटची चाल राखून ठेवली |

🔗'अडकलेले श्वास' : ‘लिफ्टमधील काही अनुभवकथा आणि लघुकथा’ लिफ्ट सुरक्षेचे महत्त

           लिफ्टमध्ये अडकणे हा अनेकांसाठी केवळ काही मिनिटांचा त्रास असतो, तर काहींसाठी तो भीती, घुसमट आणि मानसिक संघर्षाचा अविस्मरणीय अनुभव ठरतो. या लेखात लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तींच्या काही सत्य अनुभवकथा आणि काल्पनिक लघुकथांमधून अशा प्रसंगातील मानसिक अवस्था, सुटकेचे क्षण आणि लिफ्ट सुरक्षेचे महत्त्व उलगडण्याचा प्रयत्न मागच्या लघुकथेत केला आहे.

'सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा' – भाग १ (Episode - १)|सत्यकथेवर प्रेरित हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा..

   कॅटरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे गोव्यातील ट्रेनिंग, 'बेला प्राया' गावातील वातावरण, झुबिन आणि कॅरोलची पहिली भेट, मैत्री, प्रेम आणि पुढे उभे राहिलेले अनपेक्षित वळण. वाचा एका सत्यकथेवर आधारित रोमांचक प्रेमकथेचा पहिला भाग..

  गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात फुललेली ही मराठी प्रेमकथा मैत्री, प्रेम, स्वप्ने आणि आयुष्यातील अनपेक्षित वळणांचा भावनिक प्रवास उलगडते. कॅटरिंग कॉलेजच्या ट्रेनिंगसाठी गोव्यात आलेल्या झुबिनची कॅरोलशी झालेली पहिली भेट त्यांच्या आयुष्यात कायमचा बदल घडवून आणते. सत्यकथेवर प्रेरित असलेल्या या कथेत प्रेम, मैत्री, विरह आणि आयुष्याचे वास्तव यांचे सुंदर चित्रण अनुभवायला मिळेल.

    सन १९९२ चे ते वर्ष असावे. मी मुंबईतील एका कॅटरिंग कॉलेजच्या अंतिम वर्षात शिकत होतो. आमच्या बॅचमध्ये विविध भाषा बोलणारी आणि विविध धर्मांची मुले होती. मात्र आमच्यात उत्तम सलोखा होता.

    अंतिम वर्षाचा भाग म्हणून आम्हाला पाच महिन्यांच्या इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंगसाठी गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पाठविण्यात येणार होते. मुलींच्या ट्रेनिंगची व्यवस्था मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलवर  करण्यात आली होती. गोव्याला जाणारे आम्ही एकूण अठरा मुले होतो. त्यामध्ये तीन पारशी, चार कॅथॉलिक, एक नेपाळी, दोन पंजाबी, पाच मराठी, दोन उत्तर प्रदेशातील आणि एक दक्षिण भारतीय विद्यार्थी होता.

  गोव्याला रवाना होण्याचा दिवस उजाडला. चेंबूरहून आमच्यासाठी एक लक्झरी बस बुक करण्यात आली होती. मी धरून दोन-तीन मुले सोडली तर इतर  सर्वजण मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये राहणारे होते. बसमधील मागच्या बाजूच्या अठरा जागा आमच्यासाठी राखीव होत्या.

   सर्व मित्र एकत्र आल्यामुळे बसमध्ये अगदी पिकनिकचे वातावरण निर्माण झाले होते. आमच्या बॅचच्या को-ऑर्डिनेटर मॅडम स्वतः आम्हाला निरोप देण्यासाठी आल्या होत्या. बस सुरू होण्याच्या काही क्षण आधी त्यांनी आम्हा सर्वांना सूचना दिली.

 " समुंदर के बीच मे मत जाणा, बीच में रहणा!"

  त्या सरदारणी असल्याने त्यांच्या बोलण्यात पंजाबी ढब होती. "त्यांना समुद्राच्या मध्यभागी जाऊ नका,चौपाटीवर वर राहा" असे म्हणायचे होते आणि क्षणात बस भर हास्याची लाट पसरली. आम्ही सर्वजण खळखळून हसू लागलो. आपली चूक त्यांच्या देखील लक्षात आली आणि त्या स्वतःही आमच्या हसण्यात सामील झाल्या.

 काही वेळाने बस सुरू झाली. आम्ही सर्वांनी त्यांना हात हलवून निरोप दिला आणि बसमधून एकच जयघोष घुमला.

 "गणपती बाप्पा मोरया!"

  दुपारी चार वाजता बस निघाली. संध्याकाळ होईपर्यंत सर्वांच्या गप्पांचा अक्षरशः फड रंगला होता. आमच्या मालवणी भाषेत अशा गप्पांना "गजाली" म्हणतात. पुढच्या सीटवर बसलेली मुलं सुद्धा आपापल्या जागा सोडून, मागे आमच्यात येऊन बसली होती. मी सर्वात मागच्या सीटवर, खिडकीजवळ बसलो होतो. थोडीफार जागा करून जवळजवळ सगळी टोळी मागे जमा झाली होती. त्या गजाली कसल्या? अर्थातच मुलींच्याच असायच्या..

 "ती अशी आहे.." "ती तशी वागते.." "ती त्याची मैत्रिणी आहे.." "तो तिचा मित्र आहे.."

 असे संवाद हिंदीतून रंगले होते. तरुण मुलांचा घोळका एकत्र आला आणि मुलींचा विषय निघाला नाही, असे कधी होत नाही.

     आमच्या बॅचमध्ये झुबिन, फरहाद आणि होमी अशी तीन पारशी मुले होती.त्यांपैकी झुबिन हा जणू साक्षात मदनबाणच होता. पुराणातील मदन देवाने पुन्हा जन्म घेतला तर तो कदाचित झुबिन सारखा दिसला असता. सडसडीत अंगकाठी, देखणे व्यक्तिमत्त्व, मधुर बोलणे आणि अस्खलित इंग्रजी. मुलींमध्ये त्याची लोकप्रियता जबरदस्त होती.

     फरहाद अगदी त्याच्या विरुद्ध बलदंड शरीरयष्टी, रुंद खांदे आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व. वयाने आमच्याच आसपासचा असला तरी त्याच्या तब्येतीमुळे तो काही वर्षांनी मोठा वाटायचा. पण विचारांनीही तो तितकाच मजबूत होता. मुलींच्या विषयापासून चार हात दूर राहणारा.

     तिसरा होमी तो एका आनुवंशिक आजारामुळे शारीरिकदृष्ट्या दिव्यांग विद्यार्थी होता. बोलताना आणि चालताना त्याला अडचण यायची. पण स्वभावाने तो अतिशय मनमिळाऊ विनोदी आणि चाणाक्ष होता.

   बस मध्ये चढताना होमी त्याच्या तुटक्या भाषेत झुबिन बाबत माझ्याकडे तक्रार करत म्हणाला,"झुबिनच्या शाळेत गर्लफ्रेंड होत्या,कॉलेज मध्ये होत्या.सोसायटीमध्ये आहेत आणि आता इथे तर दोन आहेत,आम्हाला तर एक सुद्धा नाही!"

 त्याची ती निरागस तक्रार ऐकून मी खळखळून हसलो.

बस मध्ये बसल्यावर मी सहज गंमतीने झुबिनला म्हणालो,

 "अरे झुबिन, होमीकडे जरा लक्ष दे रे बाबा!"

 त्यावर तो हसत म्हणाला,

 "माझं सगळं त्याचंच आहे!"

 हे ऐकून पुन्हा एकदा बसमध्ये हास्याचा फवारा उडाला.

     खरं तर तिघेही स्वभावाने अतिशय चांगले होते.मुलींना झुबिनमध्ये काहीतरी वेगळंच आकर्षण दिसायचे. तो बोलता बोलता नकळत मुलींवर गारूड करायचा आणि त्याला त्यासाठी विशेष प्रयत्नही करावे लागत नसत.

     आमच्या बॅचमध्ये चार कॅथॉलिक मुलेही होती. त्यांचे ध्येय स्पष्ट होते. कॅटरिंगचा डिप्लोमा पूर्ण झाल्यावर जहाजावर नोकरी मिळवणे किंवा परदेशात स्थायिक होणे. ते चौघेही मूळचे गोव्याचे होते.

    मी मालवणी भाषिक असल्यामुळे ते अधूनमधून माझ्याशी कोकणीत बोलत असत. मला कोकणी भाषा बऱ्यापैकी समजत असल्याने आमचे चांगले जमायचे. पुढे घडणाऱ्या एका प्रसंगात ते कॅथॉलिक आणि गोवेकर असल्याचा आम्हाला अनपेक्षितपणे फायदा झाला.

     गप्पाटप्पा, थट्टामस्करी आणि मुलींच्या चर्चा यामध्ये वेळ कसा गेला ते समजलेच नाही. संध्याकाळ होत आली होती. आमची लक्झरी बस मुंबई-गोवा महामार्गावर सुसाट धावत होती. एकामागून एक वाहनांना ओव्हरटेक करत ती पुढे सरकत होती.

     बसचा वेग पाहून कधी कधी मनात विचार यायचा की ड्रायव्हर अतिशय अनुभवी असावा किंवा मग त्याला वेगाची विलक्षण सवय असावी. मात्र त्याच्या चेहऱ्यावर कुठलीही चिंता दिसत नव्हती. स्टीयरिंगवर त्याची पकड भक्कम होती.

      खिडक्यांमधून थंडगार वारा आत येऊ लागला तसे काही जणांना सिगारेटची तलफ झाली. काही मुलं नेहमी धूम्रपान करत नसत पण सहल, पिकनिक किंवा मित्रांचा घोळका जमला की त्यांचीही सिगारेट पेटवण्याची हौस जागी व्हायची. काहींनी सिगारेट शिलगावल्या, तर काहींनी गुटख्याची पाकिटे फाडली.

     थोड्याच वेळात दिवसभराच्या गडबडीमुळे काही जण दमले आणि आपल्या जागेवर जाऊन बसले. बाहेर अंधार पडू लागला होता.  महामार्गावरील वाहनांच्या हेडलाईट्स अंधार चिरत पुढे धावत होत्या.

      माणगाव मागे पडल्यावर एका धाब्यावर बस थोड्या वेळासाठी थांबली..धाब्यावरून फ्रेश होऊन आल्यावर  झुबिन माझ्या शेजारी येऊन बसला. बस पुन्हा मार्गस्थ झाली. बाहेर अंधार पसरला होता.गजाली संपून आता बस मध्ये बहुतेक जण बाजूच्या सीटवरील मित्रांसोबतच्या गप्पांमध्ये रमले होते.

     झुबिन ने नेहमीप्रमाणे माझ्याकडे मुलींचा विषय काढला."अरे, आपल्या वर्गातली शेफाली आणि जुईली या दोघीही माझ्यावर लट्टू आहेत.माझ्यामुळे त्यांच्यात जवळजवळ दुश्मनीच सुरू झाली आहे."

 मी हसत म्हणालो,

 "मग गोव्याहून परत गेल्यावर कुणातरी एकीची निवड कर. दोघींना असं झुलवत ठेवू नकोस."

 तो खांदे उडवत म्हणाला,

  "अरे यार, त्यात माझी काय चूक? त्या माझ्यावर फिदा होतात, त्याला मी काय करणार? खरं सांगू, त्यांपैकी एकीची सुद्धा निवड करावी असं मलाही वाटतं नाही. त्या फक्त बेस्ट फ्रेंड्स म्हणून खूप चांगल्या आहेत पण बायको म्हणून नाही. आमच्या परिवाराच्या चालीरीती खूप ऑर्थोडॉक्स आहेत. "

 मी त्याला टोचून म्हणालो,

 "मग कशाला ही मस्ती करतोस ? कुठल्याही मुलीवर प्रेमाची फुंकर मारू नकोस,मुली या भावनिक असतात.जेव्हा त्या कुणावर प्रेम करतात, त्या खऱ्या मनाने करतात, तुझी ही सवय खूप वाईट आहे. आधी फुंकर मारायची आणि मग पळून जायचं."

 क्षणभर तो शांत झाला. मग हसत म्हणाला,

 "होय रे, तू बरोबर बोलतो आहेस. पण वयच असं आहे की त्याला मी तरी काय करणार?"

 मीही हसत म्हणालो,

 "तुझ्या या सवयीमुळे एक दिवस तू आम्हा सगळ्यांना गोत्यात आणणार आहेस."

 हे ऐकताच तो मोठ्याने हसला आणि म्हणाला,

 "मैं नहीं सुधरूँगा!"

    एक गंमत म्हणजे हा सगळा संवाद तो मराठीत बोलत होता. मध्येच त्याच्या बोलण्यात पारशी मराठीचा खास स्वर डोकावायचा. त्यामुळे त्याचे बोलणे आणखीच गमतीशीर आणि आपलेसे वाटायचे.

     माणगाव मागे पडल्यावर मुंबई - गोवा हमरस्त्यावरील वाहतूक बरीच कमी झाली होती. बसच्या मागच्या सीटवर बसल्यामुळे मी अधूनमधून मागे वळून पाहत होतो. मागे सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरला होता. बस ज्या रस्त्याने आली होती, तो रस्ताही आता दिसत नव्हता. फक्त बसच्या हेडलाईटच्या प्रकाशात समोरचा रस्ता उजळून निघत होता आणि त्या प्रकाशाच्या वर्तुळातच आमचा प्रवास सुरू होता.

         महाड येथे एका रेस्टॉरंट जवळ बस थांबली. सर्व प्रवाशांनी जेवण उरकले. दिवसभराच्या धावपळीने आणि रात्रीचा प्रवास सुरू असल्यामुळे सर्वांना थकवा जाणवत असल्याने जेवण झाल्यावर बहुतेक जण झोपून गेले.

     जेव्हा सकाळी जाग आली तेव्हा कुडाळ मागे पडले होते. खिडकीतून बाहेर नजर टाकताच कोकणातील निसर्गाचे अप्रतिम रूप दिसू लागले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाट हिरवीगार वनराई पसरली होती, तर जमिनीवर सर्वत्र लालसर माती दिसत होती. जणू धरित्रीने हिरवा-लाल शालू नेसून आपले सौंदर्य खुलवले होते. प्रत्येक वळणावर निसर्गाचे नवे रूप दिसत होते आणि प्रवासाचा सारा शीण क्षणोक्षणी नाहीसा होत होता.

      थोड्याच वेळात आमच्या बसने महाराष्ट्राची सीमा ओलांडून गोव्याच्या भूमीत प्रवेश केला. सकाळी साधारण नऊच्या सुमारास आम्ही पणजी बसस्थानकात पोहोचलो. आम्हाला पुढील पाच महिन्यांचे इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग ज्या "गोल्डन सँड रिसॉर्ट" या पंचतारांकित हॉटेलमध्ये करायचे होते, त्या हॉटेलची आकर्षक कोच बस आम्हाला घेण्यासाठी आधीच तेथे येऊन उभी होती. ती बस पाहताच आता आमच्या प्रशिक्षणाच्या नव्या पर्वाची खरी सुरुवात होणार असल्याची जाणीव झाली. रात्रभराच्या प्रवासाचा थकवा क्षणभर विसरून आम्ही आमचे सामान घेऊन उत्सुकतेने त्या कोच बसकडे निघालो.

     रात्रभराचा लांब पल्ल्याचा प्रवास करून आम्ही सगळेच पेंगुळलेले आणि थकलेले दिसत होतो. मात्र आमच्यात एकटाच झुबिन अगदी टवटवीत आणि उत्साही दिसत होता. त्याची झोप बहुधा व्यवस्थित पूर्ण झाली असावी. चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच आत्मविश्वासपूर्ण हास्य होते आणि नव्या ठिकाणी काय अनुभव मिळणार याची उत्सुकता त्याच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होती.

     पणजीहून निघालेली आमची कोच बस दक्षिण गोव्याच्या दिशेने वेगाने धावत होती. वाटेत गोव्याचे नागरी वैभव, स्वच्छ रस्ते, आकर्षक इमारती आणि हिरवागार परिसर पाहताना मन प्रसन्न होत होते. मी खिडकीतून बाहेर दिसणारे निसर्गसौंदर्य डोळ्यांत साठवून घेत होतो. लहानपणी एकदा नातेवाईकांसोबत कुलदेवतेच्या दर्शनासाठी 'शिवोली' गावात आलो होतो, तेवढेच माझे पहिले गोवा-दर्शन. त्यानंतर खूप वर्षांनी पुन्हा गोव्याच्या भूमीत पाऊल ठेवत होतो.

  काही वेळातच आमची कोच दक्षिण गोव्यातील ‘बेला प्राया’ गावाजवळ समुद्रकिनाऱ्यालगत वसलेल्या ‘गोल्डन सँड रिसॉर्ट’च्या भव्य कमानीतून आत शिरली. मुख्य प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच त्या पंचतारांकित रिसॉर्टचे वैभव नजरेत भरले. प्रशस्त परिसर, हिरव्यागार बागा, आकर्षक वास्तुरचना आणि सर्वत्र दिसणारी शिस्तबद्ध व्यवस्था पाहून त्या ठिकाणाचे महत्त्व सहज लक्षात येत होते. समुद्राच्या सान्निध्यात उभा असलेला तो आलिशान परिसर पाहून आमच्या उत्सुकतेत आणखी भर पडली.

     आत गेल्यानंतर आम्हाला प्रथम स्टाफ रेस्ट रूममध्ये जाऊन फ्रेश होण्यास सांगण्यात आले. त्यानंतर चहा आणि नाश्त्याची व्यवस्था होती. नाश्त्यातील पदार्थांची मांडणी, चव आणि दर्जा यावरूनही ते पंचतारांकित हॉटेल असल्याची साक्ष मिळत होती.

     थोड्याच वेळात आम्हाला एका मोठ्या मीटिंग रूममध्ये न नेता समुद्राकडे तोंड असलेल्या विशाल गॅलरीत नेण्यात आले. समोर अथांग अरबी समुद्र, कानावर पडणारी लाटांची अखंड गाज आणि अंगावर झेपावणारे खारे वारे यामुळे क्षणभर असे वाटत होते की आपण एखाद्या पंचतारांकित रिसॉर्टमध्ये नसून समुद्रावर तरंगणाऱ्या आलिशान जहाजावर उभे आहोत.

      तेथे आम्हा सर्वांना एका ओळीत ‘अटेन्शन’च्या पवित्र्यात उभे करण्यात आले. ओळख परेड सुरू झाली. प्रथम गोवेकर कॅथोलिक मित्रांनी स्वतःची ओळख करून दिली. त्यानंतर ‘होमी अँड ब्रदर्स’ म्हणून प्रसिद्ध असलेले होमी,  झुबिन आणि फरहाद यांची ओळख झाली. मग इतर विद्यार्थ्यांचा क्रम आला.

 आमचे मॅनेजरही गोवेकर कॅथोलिक होते. माझी ओळख झाल्यावर त्यांनी लगेच विचारले,

 "तूं आमच्या 'शिवोली'गांवचो आसा काय ? तूं रिव्हर सायडचो की चर्च सायडचो ?" 

 "त्यांनी दोन्ही प्रश्न एका दमात विचारले. बहुधा त्यांना खात्रीच वाटली असावी की मी गोव्याचाच असणार."

 “रिव्हर साइड,” मी उत्तर दिले.

 क्षणात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला.

 “वा..वा.. माझो गांवालो !” ते उत्साहाने म्हणाले.

      त्या एका वाक्याने कधी काळी पूर्वजांची भूमी असलेल्या अनोळख्या गोव्यातही आपलेपणाची ऊब जाणवली.

   सर्वांची ओळख परेड संपल्यानंतर आम्हाला आमच्या बोर्डिंग हाऊसमध्ये जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता पुन्हा हजर राहण्यास सांगण्यात आले. आम्ही पुन्हा कोचमध्ये बसलो आणि बोर्डिंग हाऊसच्या दिशेने निघालो.

     रस्त्यात ‘बेला प्राया’ गावातील भव्य चर्च नजरेस पडले. त्याची सुंदर वास्तुरचना, शुभ्र भिंती आणि आकर्षक बांधणी इतकी मोहक होती की त्यावरून नजर हटत नव्हती.पोर्तुगीजांची छाप असलेली वास्तू शैलीची घरे,दक्षिण गोव्यातील गावांचे निसर्गरम्य सौंदर्य, हिरवाईने नटलेला परिसर, नारळांच्या उंचच उंच रांगा आणि शांत वातावरण पाहून गोव्याची खरी ओळख अनुभवता येत होती. त्या गावाने तर पहिल्याच भेटीत माझ्या मनावर कायमची मोहिनी घातली होती.

     आमची कोच बस पुढे रस्त्यालगत असलेल्या एका जुन्या, एकमजली पोर्तुगीज शैलीतील बंगल्यासमोर येऊन थांबली. ड्रायव्हरने हॉर्न वाजवताच गोवन स्कर्ट परिधान केलेल्या एका मध्यमवयीन कॅथोलिक महिला दारातून बाहेर आल्या. त्यांच्या मागे त्यांची किशोरवयीन मुलगीही उभी होती.

     टिपिकल गोवन पेहराव आणि व्यक्तिमत्त्व असलेली ती मुलगी आमच्याकडे कुतूहलाने पाहत होती. आणि मग तिची नजर आमच्या मदनबाण झुबिनवर जाऊन स्थिरावली. झुबिनला पाहून एखादी मुलगी प्रथमदर्शनी त्याच्याकडे आकर्षित झाली नाही, असे क्वचितच घडायचे. जसा कमळाकडे भुंगा ओढला जातो, तसे काहीसे त्याचे व्यक्तिमत्त्व होते.

    त्या कॅथोलिक मुलीचे नाव 'कॅरोल' होते. आमच्या मधून तिला ज्याचा शोध होता तोच तिला सापडला होता. आणि झुबिन ही रोजप्रमाणे आपल्या आकर्षणाची जादू कुणावर चालते आहे का ? हे निरखत होता. दोघांचा शोध जणू एकाच क्षणी पूर्ण झाला.

 क्षणाचाही विलंब न लावता झुबिन पुढे गेला.

 “I'm Jhubin,” त्याने हसत ओळख करून दिली.

 “I'm Carol,” तिनेही तितक्याच सहजपणे उत्तर दिले.

 दोघांचे संभाषण सुरू होताना पाहून मला क्षणभर वाटले, जणू नियतीनेच त्यांची भेट घडवून आणण्यासाठी आमच्या या ट्रेनिंगची योजना आखली असावी की काय ?.

 होमी माझ्या जवळ येऊन कुजबुजला, “बघ, बघ.. कसा गुल उडवतोय!”

 मी हसत उत्तर दिले, “भाई, नशीब नशीब की बात है.. काही लोकांच्या वाट्याला फुलं आपोआप चालत येतात!”

     आम्हाला पहिल्या मजल्यावरील मोठा डॉर्मिटरी हॉल देण्यात आला होता. त्यामध्ये अठरा बेड्स होते. प्रवासामुळे आम्ही सगळेच पेंगुळलेले आणि थकलेले होतो. आपापल्या बॅगा एका कोपऱ्यात ठेवून जो तो मिळेल त्या बेडवर आडवा झाला. माझ्या शेजारच्या बेडवर नेपाळी मुलगा सोमेश्वर होता.

    कॅरोलला पाहून झुबिनची मात्र झोप उडाली होती. होमीने फरहादचे झुबिन विरोधात कान भरल्यामुळे मुळे फरहादने पारशी-गुजराती भाषेत त्याला खडे बोल सुनावले “आपण अनोळखी ठिकाणी आलो आहोत. कुणाला त्रास होईल असं काही करू नकोस,” असे तो त्याला समजावत होता.

 पण कुणाचे ऐकेल तर तो झुबिन कसला!

 सर्वजण दमल्यामुळे गाढ झोपून गेले. आमचा ‘सीसीटीव्ही’ होमी मात्र एक डोळा उघडा ठेवून झुबिनवर नजर ठेवून होता.

     दुपारच्या वेळी कॅरोलची आई 'ज्युली' मॅडम वामकुशीसाठी आत गेली. कॅरोल मात्र घराबाहेर येऊन उभी राहिली. तिची नजर वारंवार आमच्या डॉर्मिटरीच्या दिशेने जात होती. जणू ती झुबिनचीच वाट पाहत होती. आणि काही वेळातच झुबिनने तिथे हजेरी लावली. दोघांची भेट झाली तेव्हा जणू मागील जन्मातील अधुरी राहिलेली ओळख या जन्मात पूर्ण होत असल्याचा भास होत होता. ते जिन्यावर बसले आणि त्यांच्या गप्पांचा ओघ सुरू झाला.

    दुसऱ्या दिवशी आम्ही ट्रेनिंगसाठी हॉटेलमध्ये रुजू झालो. झुबिन, फरहाद आणि आंद्रे या मुलांचे इंग्रजी उत्तम असल्यामुळे त्यांना बार मॅनेजर म्हणून बार सर्व्हिस विभागात नेमण्यात आले. नेपाळी मुलगा सोमेश्वरला ‘ट्रेनी शेफ’ म्हणून चायनीज सेक्शन मिळाले, तर मला ‘ट्रेनी शेफ’ म्हणून इंडियन तंदूर विभागात काम देण्यात आले. कुणाला इंडियन,तर कुणाला काँटिनेंटल तर कुणाला Butchery तर कुणाला गार्ड मांझे (कोल्ड किचन )..अशा प्रकारे सर्वांचे प्रशिक्षण विभाग निश्चित झाले. 

    बार सर्व्हिसमध्ये काम करताना झुबिन, फरहाद आणि आंद्रे यांना परदेशी पर्यटकांकडून टिप म्हणून भरपूर डॉलर्स मिळू लागले. हॉटेल मध्ये काम करणाऱ्या गावातील काही स्थानिक मुलांच्या मनात त्यामुळे त्यांच्याविषयी मत्सर निर्माण झाला होता. मात्र कॅरोलची आई 'बेला प्राया' गावातील मानाची आणि प्रभावशाली व्यक्ती असल्यामुळे ते कधीही झुबिन किंवा त्याच्या मित्रांच्या नादी लागण्याचे  धाडस करत नव्हते.

    अशा प्रकारे झुबिन आणि कॅरोलचे प्रेमप्रकरण दिवसेंदिवस फुलत चालले होते. सुरुवातीला एका अनोळखी नजरेने सुरू झालेली ओळख आता मैत्रीत आणि मैत्री प्रेमात बदलली होती. बेला प्राया गावातील अरुंद रस्ते, नारळांच्या बागा, समुद्राकडून येणारा खारट वारा आणि संध्याकाळी चर्चच्या घंटांचा निनाद या सगळ्यांनी त्यांच्या प्रेमकहाणीला एक वेगळीच पार्श्वभूमी दिली होती.

   कॅरोलला झुबिनमध्ये काहीतरी वेगळेपण दिसत होते. त्याचा आत्मविश्वास, त्याचे हसरे व्यक्तिमत्त्व आणि कोणत्याही वातावरणात मिसळून जाण्याची कला तिला भावली होती. दुसरीकडे झुबिनलाही कॅरोलची निरागसता, तिचे मोकळेपण आणि तिचे प्रेमळ वागणे आवडत होते. मात्र झुबिनच्या स्वभावात एक गोष्ट होती. तो प्रेमात पडू शकत होता, प्रेमाचा आनंद घेऊ शकत होता, पण लग्नासारख्या कायमस्वरूपी जबाबदारीचा विचार आला की त्याच्या पोटात भीतीचा गोळा उठायचा.

    सुट्टीच्या दिवशी कॅरोल झुबिनला गाव दाखवण्यासाठी घेऊन जायची. कधी ते समुद्रकिनाऱ्यावर बसून सूर्यास्त पाहायचे. कधी एखाद्या जुन्या पोर्तुगीज शैलीतील घरासमोर उभे राहून तासन्तास गप्पा मारायचे. कधी चर्चच्या आवारात शांतपणे बसून भविष्याची स्वप्ने रंगवायचे.

 एकदा समुद्रकिनारी बसले असताना कॅरोलने विचारले,

 "झुबिन, ट्रेनिंग संपल्यावर तू मला विसरणार तर नाहीस ना?"

 झुबिनने तिच्याकडे पाहून नेहमीसारखे हसत उत्तर दिले,

 "तुला विसरणे इतके सोपे असते तर मी रोज इथे आलो असतो का?"

 त्या उत्तराने कॅरोलच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. पण झुबिनने उत्तर देताना लग्न, भविष्य किंवा कायमचे नाते यांचा उल्लेख मुद्दाम टाळला होता.

 आमच्या ग्रुपमधील मुलांना मात्र या दोघांची गोष्ट चांगलीच कळली होती. होमी तर रोज नवीन बातम्या आणायचा.

 "आज दोघे चर्चच्या मागे फिरत होते."

 "काल समुद्रकिनारी गेले होते."

 "आज कॅरोलने स्वतः बनवलेला केक झुबिनसाठी आणला."

 अशा बातम्या ऐकून आम्ही सगळे त्याची चेष्टा करायचो.

 फरहाद म्हणायचा, "भाई, आता लग्नाचे कार्ड छापायचे बाकी आहे."

 त्यावर झुबिन नेहमीप्रमाणे हसायचा. पण आतून तो या नात्याला किती गंभीरपणे घेत होता हे कुणालाच कळत नव्हते.

    दरम्यान हॉटेलमधील ट्रेनिंग जोरात सुरू होते. झुबिन, फरहाद आणि आंद्रे बार सर्व्हिस विभागात होते. परदेशी पर्यटकांशी इंग्रजीत सहज संवाद साधण्यामुळे त्यांना भरपूर टिप मिळत होती. डॉलर, पौंड आणि इतर विदेशी चलनाच्या नोटा त्यांच्या पाकिटात जमा होऊ लागल्या होत्या.

    मी तंदूर विभागात काम करत होतो. दिवसभर भट्टीसमोर उभे राहून सोबतच्या दोन कूक मंडळी कडून रोटी, नान आणि कबाब, तंदुरी फिश तयार करण्यात वेळ जायचा. सोमेश्वर चायनीज विभागात तर फरहाद काँटिनेंटल विभागात ,तर होमी हा गार्ड मांझे (कोल्ड किचन ) मधील कामात व्यस्त असायचे.रात्री मात्र आम्ही सगळे डॉर्मिटरीत भेटायचो आणि दिवसभराच्या गोष्टी सांगायचो.

 झुबिनच्या प्रेमकहाणीची चर्चा हा आमच्या गप्पांचा कायमचा विषय झाला होता.

 एक दिवस अचानक परिस्थिती बदलली.

 कॅरोलने झुबिनला थेट विचारले,

 "आपण लग्न कधी करणार?"

 हा प्रश्न ऐकून झुबिन काही क्षण गप्प बसला. त्याला अशी अपेक्षा नव्हती.

 "अजून वेळ आहे," तो म्हणाला.

 पण कॅरोलने विषय सोडला नाही.

 पुढील काही दिवसांत ती वारंवार लग्नाबद्दल बोलू लागली. सुरुवातीला झुबिनने तो विषय हसत हसत टाळला. पण मग एक दिवस कॅरोलची आई स्वतः पुढे आली.

 तिने झुबिनला घरी बोलावले. चहा-पाणी झाल्यावर ती गंभीर स्वरात म्हणाली,

 "तुम्ही दोघे एकमेकांना पसंत करता. मग आता उगाच वेळ का घालवायचा? पुढच्या आठवड्यात चर्चमध्ये लग्न करून टाकू."

 झुबिनला वाटले ती गंमत करत आहे.

 पण ती पुढे म्हणाली,

   "तुझ्या घरच्यांना बोलवायचे असेल तर बोलाव. नाही आले तरी हरकत नाही. माझी एकुलती एक मुलगी आहे. आमच्याकडे भरपूर जमीन-जुमला आहे. तुम्ही इथेच कायमचे राहा. व्यवसाय सांभाळा."

 हे ऐकताच झुबिनच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झाले.

 त्याने कसाबसा विषय बदलला आणि तिथून निघाला.

 त्या रात्री तो धावतच डॉर्मिटरीत आला.

 "मित्रांनो, मोठी गडबड झाली आहे."

 "काय झालं?"

 "ही मंडळी खरंच लग्न लावून देणार आहेत!"

 क्षणभर आम्ही सगळे त्याच्याकडे पाहत राहिलो आणि मग जोरात हसायला लागलो.

 "अरे, एवढी सुंदर मुलगी, इतकी प्रॉपर्टी, प्रतिष्ठित सासू आणि तुला भीती वाटतेय?"

 फरहाद म्हणाला.

 "तुम्हाला विनोद वाटतोय, पण माझे आयुष्य अडकणार आहे," झुबिन चिंताग्रस्त स्वरात म्हणाला. माझ्या घरचे मला हाकलून लावतील..

 पुढच्या दिवशी तो अचानक आजारी पडला.

 किमान वरवर तरी तसे दिसत होते.

 ताप, अशक्तपणा, डोकेदुखी, भूक न लागणे अशी सर्व लक्षणे त्याने अगदी उत्कृष्ट अभिनयाने दाखवली.

 आम्ही मात्र त्याचे नाटक ओळखले होते.

 पण कॅरोल आणि तिच्या आईने ते मनापासून खरे मानले.

 त्याला डॉर्मिटरीत न ठेवता थेट आपल्या घरी नेण्यात आले. डॉक्टर बोलावण्यात आले. औषधे आणण्यात आली. सूप, फळे आणि विशेष काळजी यांची व्यवस्था करण्यात आली.

 कॅरोल तर दिवसभर त्याच्या उशाशी बसून राहायची.

 ती त्याचे कपाळ पुसायची, वेळेवर औषध द्यायची आणि त्याची काळजी घ्यायची.

 झुबिनची अवस्था विचित्र झाली होती.

 एका बाजूला एवढी सेवा मिळत होती, तर दुसऱ्या बाजूला त्याला तिथून पळून जायचे होते.

 रात्री तो आम्हाला भेटायला यायचा तेव्हा म्हणायचा,

 "मित्रांनो, माझी सुटका करा."

 ते ऐकून आम्ही पोट धरून हसायचो.

 पण परिस्थिती खरोखर गंभीर बनत चालली होती.

मग आम्ही..  आंद्रे आणि इतर तीन कॅथोलिक मित्रांना या बाबतची माहिती काढण्याचे काम दिले.

 "लग्नाची तारीख शोधून काढा."

 दोन दिवसांनी ते माहिती घेऊन आले.

 "झुबिन, आता तुझा खेळ संपला, येत्या शुक्रवारी तुझे लग्न आहे."

 "काय?"

 "हो,चर्च बुक झाले आहे. फादरशी बोलणे झाले आहे, पाहुण्यांना निमंत्रणे दिली आहेत. पूर्ण तयारी झालेली आहे."

 हे ऐकताच झुबिनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला..पायाखालची जमीन सरकू लागली होती.

        झुबिन आणि कॅरोलचे नाते दिवसेंदिवस घट्ट होत होते. पण कॅरोलच्या मनातील प्रेम आता लग्नाच्या स्वप्नांपर्यंत पोहोचले होते. दुसरीकडे झुबिन मात्र एका वेगळ्याच मानसिक संघर्षातून जात होता. पुढे काय होणार? झुबिन लग्नासाठी तयार होईल की त्या गोंधळलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधेल? या साठी अवश्य वाचा पुढचा भाग..

                                                                     क्रमश:..Episode - २   

 🔗 सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा - भाग २ : पलायन, गोंधळ आणि विरह ( एपिसोड- २)|हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा..

  वाचा पुढील भाग : - सुशेगाद गोव्यातील निसर्गरम्य आणि शांत वातावरणात घडलेली एक प्रेमकथा आणि विरहकथा..👉


टीप -“या कथेत दाखवलेले धूम्रपान आणि गुटखा खाणे हे केवळ पात्राच्या स्वभाव चित्रण साठी आहे.” 

“धूम्रपान सेवन आणि गुटखा खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे”

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.


तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो





📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook


टिप्पण्या

  1. गोव्याच्या शांत वातावरणात उमललेलं प्रेम आणि त्यानंतरचा विरह... कथा अधिकच रंजक होत चालली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. शीर्षक वाचूनच भावनांचा कल्लोळ जाणवतोय. पुढचा भाग वाचण्याची उत्सुकता वाढली!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...