मुख्य सामग्रीवर वगळा

महापूर : एका शापाचा शेवट | भाग २ | थरारक मराठी रहस्यकथेचा हृदयस्पर्शी शेवट🌊⚡🌧️

 

अस्वीकरण - 

 ही लघुकथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यातली पात्रे, घटना व संवाद लेखकाच्या कल्पनेतून साकारलेले आहेत. कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

महापूर : एका शापाचा शेवट | भाग-2 |थरारक मराठी रहस्यकथेचा हृदयस्पर्शी शेवट🌊⚡🌧️


महापूर : एका शापाचा शेवट | भाग २ | थरारक मराठी रहस्यकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
विनाशाच्या लाटांत जगणे हरवून गेले,
आशेचे दिवेही क्षणभर विझून गेले.
शाप संपला, नदी पुन्हा शांत झाली,
पण त्या महापुराची जखम काळजात कायमची राहिली..! 🌊

🔗'महापूर : एका शापाची सुरुवात' भाग - १|मराठी रहस्यकथा | थरारक महापूर कथा🌊⚡🌧️

वरील कथेच्या भाग मध्ये भूतकाळात श्रीमंतीत जगणारा माणूसही निसर्गाच्या कोपामुळे कसा रंक झालेला आहे, त्याच्या त्या दयनीय परिस्थितीचे वर्णन मागच्या भागात केलेले आहे..👆

महापूर : एका शापाचा शेवट | भाग २ | थरारक मराठी रहस्यकथेचा हृदयस्पर्शी शेवट🌊⚡🌧️

रौद्र लाटांचा कहर, जगण्यासाठीची झुंज आणि विनाशातून उगवलेली आशा..महापुराच्या शापाची थरारक कहाणी आणि हृदयस्पर्शी शेवट वाचा..👉

महापूर मराठी रहस्यकथेच्या या अंतिम भागात रौद्र रूप धारण केलेला निसर्ग, मानवी संघर्ष आणि अनेक वर्षांपासून गावावर असलेल्या शापाचे भीषण परिणाम उलगडतात. महापुराच्या प्रचंड लाटांमध्ये प्रत्येकजण जगण्यासाठी झुंज देत असताना त्या शापाची किंमत संपूर्ण गावाला चुकवावी लागते. विनाश, दुःख आणि त्याग यांच्यातून उगवणारी आशा, तसेच संकटानंतर नव्याने उभे राहण्याची जिद्द या कथेचा हृदयस्पर्शी शेवट अधिक प्रभावी बनवते.

पावसाळी वातावरणात आमची गाडी पिंपळवन गावाच्या हद्दीत शिरताच, सभोवतालचा निसर्ग जणू एका वेगळ्याच रूपात आमचे स्वागत करू लागला. रस्त्याच्या एका बाजूने दुथडी भरून वाहणारी जयगड नदी आमच्या गाडीसोबतच प्रवास करत असल्याचा भास होत होता. तिच्या प्रचंड प्रवाहाचा घोंघावणारा आवाज वातावरणात एक अनामिक गूढता निर्माण करत होता. नदीच्या दोन्ही तीरांवर पसरलेल्या दाट झाडीमुळे तिचे विस्तीर्ण पात्र कधी नजरेस पडत होते, तर क्षणात पुन्हा हिरव्यागार पडद्याआड लपून जात होते. 
   गाव जसजसे जवळ येऊ लागले तसतसे धुक्याच्या हलक्या चादरीत पिंपळवन लपेटलेले दिसत होते. गर्द राई हळूहळू आपला हिरवागार पडदा हळूच बाजूला सारत होती.जशी काही एखादी व्यक्ती चेहऱ्यावरची मुखपट्टी काढताच तिचे खरे रूप क्षणार्धात समोर येते, तशीच दाट झाडीची ओढणी दूर सारत जयगड नदी एका क्षणात आपल्या संपूर्ण वैभवासह आमच्या नजरेसमोर उभी ठाकली.क्षणभर माझी नजर तिच्यावर खिळून राहिली.

हिरव्या डोंगरांच्या कुशीतून वाहणारी ती नदी अतिशय मनोहर दिसत होती पण त्याच वेळी तिचे दुथडी भरून वाहणारे रौद्र रूप अंगावर काटा आणणारे होते. पाण्याचा वेग, प्रवाहाची रुंदी आणि काठांवर आदळणाऱ्या लाटा पाहताना नकळत मनात धडकी भरत होती.

“ही अवस्था आमच्यासारख्या पाहुण्यांची असेल, तर वर्षानुवर्षे या नदीच्या सान्निध्यात राहणाऱ्या गावकऱ्यांची काय अवस्था होत असेल?” हा प्रश्न नकळत मनात उमटला.

माझ्या मनात हा विचार येताच प्रभंजनकडे नजर गेली. तो मात्र शांतपणे नदीकडे पाहत होता. त्या नजरेत भीती नव्हती, पण एक वेदना होती जणू त्या नदीने त्याच्याकडून काहीतरी अमूल्य हिरावून घेतले होते.

थोडा वेळापूर्वी पडलेला वारा आता पूर्णपणे थांबला होता. आजूबाजूची सर्व झाडे आणि झुडपे निश्चल उभी होती. लहानपणी खेळल्या जाणाऱ्या "स्टॅच्यू" खेळात जसा एखादा मुलगा एका जागी स्थितप्रज्ञ होऊन उभा राहतो, तशी ती सारी वनराई स्तब्ध भासत होती.तरीही त्या शांततेत एक विचित्र आवाज सतत कानावर येत होता.

सुरुवातीला तो आवाज नेमका कशाचा आहे, हे मला समजले नाही. काही क्षण कान देऊन ऐकल्यावर लक्षात आले की तो सळसळण्याचा आवाज होता. विशेष म्हणजे त्या सळसळीचा नाद इतका स्पष्ट आणि व्यापक होता की काही वेळा जयगड नदीच्या पाण्याच्या खळखळाटालाही तो मागे टाकत होता.

मी आजूबाजूला नजर फिरवली.

तेव्हाच प्रभंजन हसत म्हणाला, “ही पिंपळाची झाडं आहेत.”

खरंच, पिंपळ हा असा वृक्ष आहे की अगदी मंद झुळूक आली तरी त्याच्या पानांतून एक वेगळाच सळसळता नाद निर्माण होतो. इतर झाडे शांत असताना पिंपळाची पाने मात्र सळसळ आवाज करत आपले अस्तित्व जाणवून देत राहतात. त्या आवाजात एक गूढता, एक जिवंतपणा आणि एक अदृश्य स्पंदन असते.

आता मला गावाच्या नावाचा अर्थही उमगू लागला होता.

‘पिंपळवन’..

नावाप्रमाणेच गावाच्या चहूबाजूंना पिंपळांच्या वृक्षांची विपुलता होती. जिथे नजर जाईल तिथे उंच, डेरेदार पिंपळ वृक्ष दिसत होते. त्यांच्या पानांची अखंड सळसळ जणू या गावाची ओळखच बनली होती. त्या नादात काहीतरी मोहक होते. पण त्याचवेळी एक अनामिक अस्वस्थताही दडलेली होती.

माझी उत्सुकता पाहून प्रभंजन म्हणाला,

“तुला माहिती आहे का, ही सगळी पिंपळाची झाडं अजूनही का टिकून आहेत?”

मी नकारार्थी मान हलवली.

तो म्हणाला, “ही जागा आमच्या गावच्या देवराईची आहे. पूर्वीच्या लोकांनी देवाची जागा म्हणून ती जपून ठेवली. त्यामुळे इथल्या झाडांना कुणी हात लावला नाही. नाहीतर आजूबाजूच्या अनेक भागातल्या झाडांप्रमाणे ही झाडंही केव्हाच तोडली गेली असती आणि त्यांच्या जागी इतर लागवड किंवा बांधकामं झाली असती.”

मी पुन्हा त्या उंच पिंपळांकडे पाहिले.

खरंच, अनेक पिढ्यांच्या श्रद्धेने आणि जपणुकीनेच ती वृक्षराई आजही ताठ उभी होती. शेकडो पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेली ती देवराई गावाच्या इतिहासाची जिवंत साक्ष देत होती. पिंपळांच्या पानांची अखंड सळसळ जणू त्या जुन्या पिढ्यांचे आभार मानत होती, ज्यांनी विकासाच्या नावाखाली या वृक्षांचा बळी जाऊ दिला नव्हता.

“पिंपळवन” हे नाव केवळ गावाचे नाव नव्हते तर त्या देवराईने जपलेल्या निसर्ग वारशाची ओळख होती.

आमची गाडी आता मुख्य रस्ता सोडून गावाकडे जाणाऱ्या अंतर्गत मार्गाला लागली. सध्या तो कच्चा रस्ता वाटत होता मात्र त्याच्याकडे बारकाईने पाहिल्यावर त्याचे वेगळेच वास्तव समोर येत होते.

तो मूळचा कच्चा रस्ता नव्हता.

एकेकाळी तो डांबरी आणि सुस्थितीत असावा, याच्या खुणा अजूनही ठिकठिकाणी दिसत होत्या. उखडून निघालेले डांबर, मातीखाली दबलेले खडीचे थर आणि पावसाच्या पाण्याने तयार केलेले खोल चर त्याच्या जुन्या वैभवाची साक्ष देत होते.

जणू एखादा पराभूत राजा फाटके वस्त्र परिधान करून उभा असला, तरी त्याच्या चालण्यातून आणि चेहऱ्यावरून त्याचे पूर्वीचे वैभव ओळखू यावे, तशीच त्या रस्त्याची अवस्था झाली होती. काळाच्या आणि निसर्गाच्या तडाख्यांनी त्याचे रूप बदलले होते पण एकेकाळी तो पक्का आणि मजबूत होता, हे त्याच्या अंगावरील जखमाच सांगत होत्या.

मी त्या रस्त्याकडे पाहिले आणि नकळत मनात विचार आला

या गावातील रस्त्याचे असे हाल झाले असतील, तर त्या गावातील माणसांचे काय हाल झाले असेल? कल्पनाच न केलेली बरी..

बहुतेक घरे नवीन बांधलेली किंवा डागडुजी केलेली होती किंवा कोणीच राहत नाही अशी सुद्धा होती, ज्या घराला कोणी वारसदार नाहीत अशी चिऱ्यांची  घरे पडझड झालेली विदर्ण अवस्थेत उभी असलेली दिसली,त्याचे चिरे बाजूलाच कोसळून पाण्याबरोबर वाहत  गेल्यासारखे दिसत होते या वरून  काही तरी आस्मानी संकट या गावावर कोसळल्याचे दिसत होते.

आता हळू हळू प्रभंजनच्या परिस्थितीचा थोडा थोडा अंदाज यायला लागला होता परंतु नेमका कोणता ही मात्र अजून स्पष्ट झाले नव्हते आणि मला जाणवत होतं की प्रभंजनच्या आयुष्यात घडलेली कहाणी ही केवळ एका माणसाची नव्हे, तर एका आस्मानी संकटाने उद्ध्वस्त केलेल्या संपूर्ण जगाची कहाणी असणार होती.

ते आस्मानी संकट कोणते असावे ? हे मात्र कळायला मागत नव्हते,तो महापूर होता की वादळ, की आणखी काही, हे मला तो पर्यंत समजले नव्हते पण गावाच्या प्रत्येक वळणावर त्या संकटाच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. काही घरांनी नव्याने उभारी घेतली होती, तर काही अजूनही त्या आपत्तीची जखम अंगावर बाळगत उभी होती.

गाडी वेगात पुढे सरकत होती आणि माझ्या मनातील प्रश्नांची संख्या वाढत होती.आता प्रभंजनच्या परिस्थितीचा थोडाफार अंदाज यायला लागला होता. त्याच्या आयुष्यात घडलेला बदल हा केवळ वैयक्तिक नव्हता, तर तो या संपूर्ण गावाच्या इतिहासाशी जोडलेला असावा, अशी शंका मनात आकार घेऊ लागली होती.

पण नेमके काय घडले होते, हे अजूनही धुक्यात लपलेल्या डोंगरासारखे अस्पष्टच होते.

प्रभंजन पुढच्या सीटवर बसला होता. तो ड्रायव्हरला वळणावळणाचे रस्ते दाखवत होता. काही मिनिटांतच गाडी एका मोठ्या घरासमोर येऊन थांबली.

खरे तर त्याला घर म्हणणे योग्य ठरणार नव्हते.

तो एक चौसोपी बैठा वाडा होता.

पहिल्याच नजरेत त्या वाड्याच्या भूतकाळातील ऐश्वर्याच्या खुणा स्पष्ट जाणवत होत्या. वाड्याचा अर्धा भाग काळाच्या झळा सोसत, जुन्या वैभवाची साक्ष देत उभा होता तर उर्वरित अर्धा भाग नव्याने बांधलेला किंवा डागडुजी केलेला दिसत होता. जणू भूतकाळ आणि वर्तमान एकाच वास्तूच्या कुशीत एकमेकांना बिलगून उभे होते. एका बाजूला समृद्धीच्या आठवणी होत्या, तर दुसऱ्या बाजूला संकटानंतर पुन्हा उभे राहण्याची धडपड. वाड्याचा एक भाग जुन्या जखमांचे व्रण अंगावर मिरवत होता, तर दुसरा भाग नव्या आशेची साक्ष देत होता. जणू काल आणि आज एकाच छपराखाली निःशब्द संवाद साधत उभे होते.

घरात पाऊल टाकताच समोर पडवी दिसली.पडवीच्या भिंतीवर अनेक ठिकाणी लोखंडी खुंट्या ठोकलेल्या होत्या. त्या पाहताच माझ्या मनात विचार आला,एकेकाळी या भिंतीवर घराण्यातील पूर्वजांच्या, कुटुंबप्रमुखांच्या आणि मानाच्या व्यक्तींच्या तसबिरी लटकत असाव्यात. काळाच्या ओघात त्या तसबिरी नाहीशा झाल्या होत्या पण त्यांना आधार देणाऱ्या खुंट्या अजूनही भिंतीला घट्ट चिकटून उभ्या होत्या.त्या खुंट्या जणू भूतकाळातील वैभवाच्या शेवटच्या साक्षीदार होत्या.

मी पडवीत उभा राहून आजूबाजूला नजर फिरवली. वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात एक कथा दडलेली होती. काही कथा समृद्धीच्या, काही संघर्षाच्या आणि काही अशा वेदनांच्या, ज्यांची जखम अजूनही पूर्ण भरून आलेली नव्हती.

प्रभंजनची पत्नी समोर आली. तिने लांबूनच नमस्कार केला. प्रभंजनने माझी ओळख तिला आधीच करून दिलेली असावी. तिच्या पाठोपाठ त्याची वयस्कर, अविवाहित चुलत बहीणही बाहेर आली. ती काही वर्षे मुंबईत वास्तव्यास असल्यामुळे तिने मला लगेच ओळखले.

चहापाणी झाले, थोड्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि मग प्रभंजन म्हणाला,

“चल, तुला आमचं दुकान दाखवतो.”

सकाळचे जेमतेम नऊ वाजले होते. मुंबईला परतण्यास अजून बराच अवकाश होता. त्यामुळे आम्ही त्याच्यासोबत बाहेर पडलो. त्याच्या गावातील प्रत्येक दृश्य आता मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असल्यासारखे वाटत होते.

घराबाहेरून थोडे अंतर चालत गेल्यावर प्रभंजन आम्हाला रस्त्याच्या कडेला घेऊन गेला. समोर एक प्रचंड आकाराची, पण पूर्णपणे विदीर्ण झालेली वास्तू उभी होती. खरे तर ती वास्तू नसून तिचे उरलेसुरले अवशेषच होते. भिंती ठिकठिकाणी तडकलेल्या होत्या. काही भाग पूर्णपणे कोसळले होते. मोडलेले चिरे, दगड आणि बांधकामाचा ढिगारा अजूनही आजूबाजूला विखुरलेला दिसत होता.

क्षणभर माझा विश्वासच बसला नाही.

हेच ते दुकान?

पंचक्रोशीत नावाजलेले, गावाच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू असलेले, ज्याचा अभिमान प्रभंजनला लहानपणापासून होता तेच हे दुकान?

मी स्तब्ध होऊन त्या भग्न वास्तूकडे पाहत राहिलो.

त्या विदीर्ण दृश्यात फक्त दगड आणि विटा मोडलेल्या नव्हत्या तर एका कुटुंबाची स्वप्ने, मेहनत आणि अनेक पिढ्यांनी उभे केलेले वैभवही ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले दिसत होते.

नकळत माझे डोळेही जड झाले. समोर उभ्या असलेल्या प्रभंजनकडे पाहण्याचे धैर्यही काही क्षण मला झाले नाही.

मी त्या भग्न झालेल्या दुकानाकडे पाहत म्हणालो,

“अरे प्रभा, तुझे सर्व नातेवाईक तर सोन्या-चांदीच्या व्यवसायात होते. गावात मानमरातब होता. मग अशी परिस्थिती कशी आली?”

माझा प्रश्न ऐकताच त्याने मान खाली घातली. काही क्षण तो शांत राहिला.

“ओमकार, काळ बदलला रे,” तो हळू आवाजात म्हणाला. “आता दागिन्यांची डिझाईन बनवणारी आधुनिक यंत्रं आली आहेत. पूर्वी हाताने होणारी अनेक कामं मशीनवर होतात. जे थोडंफार काम उरलं आहे ते सुद्धा कमी मजुरीवर बाहेरचे कारागीर करतात. त्यामुळे आमच्यासारख्या पारंपरिक सुवर्णकारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला.”

तो थोडा थांबला.

“त्यात वडील आणि मोठे काका गेले. दोन्ही मोठे भाऊही गेले.एकामागोमाग घरातील सर्व आधारस्तंभच निघून गेले. आता घरात मी आणि माझी चुलत बहीण एवढेच उरलो आहोत.”

त्याच्या आवाजातील वेदना आता स्पष्ट जाणवत होती.

“लहान काका?” मी विचारले.

“ते त्यांच्या संसारात रमले आहेत. आणि खरं सांगायचं तर त्यांना दोषही देता येत नाही. इथे आहे तरी काय? ना जमीन-जुमला, ना शेतीवाडी. एक पडके दुकान आणि कसाबसा टिकून असलेला वाडा. या सगळ्यासाठी ते परत का येतील?”हे बोलताना त्याची नजर त्या भग्न दुकानावरच खिळलेली होती.

ही कहाणी फक्त प्रभंजनच्या एका कुटुंबाच्या पडझडीची नव्हती. त्या मोडकळीस आलेल्या भिंती, गावातील नव्याने बांधलेली घरे आणि जयगड नदीच्या काठावर दिसणाऱ्या जखमा काही वेगळेच सांगत होत्या.

प्रभंजन अजून काहीतरी लपवत होता..

किंवा कदाचित त्या आठवणींना पुन्हा शब्द देण्याचे धैर्य तो गोळा करत असावा.

तेथून निघाल्यानंतर प्रभंजन आम्हाला पुढे कुठेतरी घेऊन चालला होता. नेमके कुठे, हा प्रश्न आम्ही विचारलाच नाही. आमच्याकडे वेळ भरपूर होता आणि आता आम्ही त्याच्या कहाणीचा एक भाग बनलो होतो.

ती वाट दाट वृक्षराजीतून जाणारी होती.

“सर्वांनी जपून चाला,” प्रभंजन अधूनमधून सांगत होता. “जमीन ओली आहे. पानांवर पाय पडला तर घसराल.”

तो प्रत्येक वळणावर आम्हाला सावध करत होता.

आजूबाजूची वनराई पावसाने धुऊन निघालेली होती. ओल्या मातीचा मंद सुगंध हवेत दरवळत होता. दूरवरून मोराच्या केकावल्याचा आवाज वारंवार कानावर पडत होता.“नदीच्या पलीकडे वनजमीन आहे,तिथे बरेच मोर आहेत.”प्रभंजन म्हणाला.

जयगड नदीच्या खळखळत्या प्रवाहाचा आवाज सतत सोबत होता. त्या खळखळाटावर मात करत मोराची केकावली अधूनमधून स्पष्ट ऐकू येत होती. काही वेळापूर्वी पूर्णपणे थांबलेला वारा आता हळूहळू झुळूकांच्या रूपाने वाहू लागला होता. नदीच्या प्रवाहाच्या दिशेने तो झुळूझुळू पुढे सरकत होता. पानांची सळसळ आणि नदीचा नाद एकमेकांत मिसळून एक वेगळेच संगीत निर्माण करत होते.

अचानक दाट झाडी संपली आणि आमच्या समोर नदीचे विस्तीर्ण पात्र उघड झाले.

क्षणभर आम्ही सर्वजण जागच्या जागी थबकलो.

समोरून वाहणाऱ्या पाण्यात दोन वेगवेगळे रंग स्पष्ट दिसत होते. एका बाजूने काळसर पाण्याची धार वाहत होती, तर दुसऱ्या बाजूने तांबूस-तपकिरी रंगाचे पाणी प्रवाहात मिसळत होते. दोन्ही धारा एकमेकांत सामावून पुढे जात होत्या, तरी त्यांची स्वतंत्र ओळख काही काळ टिकून होती.

दूरून पाहताना असे वाटत होते की जणू जयगड नदीने स्वतःवर काळ्या आणि तांबड्या रंगाचा साज चढवला होता. ते दृश्य विलक्षण सुंदर होते पण त्या अथांग पाण्याकडे पाहताना मनात एक अनामिक भीतीही दाटून येत होती.

निसर्गाचे सौंदर्य आणि त्याची रौद्रता एकाच वेळी अनुभवायची असेल, तर त्या क्षणी जयगड नदीकडे पाहणे पुरेसे होते.

त्या नदीकाठचा वारा पिऊन आणि निसर्गाची किमया पाहून मन  भरून आले  आणि जर या नदीने तिची मर्यादा ओलांडली तर काय परिस्थिती ओढवेल ही भीती सुद्धा मनात डोकावून गेली.

गावातील पडझड झालेली घरे, भग्न दुकान आणि वाड्याच्या अंगावरील जखमा पाहून अखेर माझ्या मनातील प्रश्न ओठांवर आला.“प्रभंजन, गावावर ही अशी विदीर्ण परिस्थिती ओढवली तरी कशी?”

माझा प्रश्न ऐकताच तो काही क्षण शांत राहिला. त्याने नदीकडे पाहिले, मग आकाशाकडे. त्यानंतर मोकळ्या हवेत एक दीर्घ श्वास घेतला. जणू अनेक वर्षे मनात दडवून ठेवलेल्या आठवणींना पुन्हा एकदा शब्द देण्याची तयारी तो करत होता.तो हळू आणि धीरगंभीर आवाजात बोलायला लागला.त्याच्या आवाजातील गंभीरता पाहून आम्ही सर्वजण शांत झालो..
“तसं पाहिलं तर जयगड नदी आम्हाला नवीन नव्हती. दरवर्षी पावसाळ्यात ती थोडीफार पात्राबाहेर यायची. नदीकाठच्या लोकांना त्याची सवयच झाली होती. पाणी वाढलं की खबरदारी घ्यायची आणि काही दिवसांनी सर्व काही पूर्ववत व्हायचं.”

तो क्षणभर थांबला.

“पण २००५ या वर्षी काहीतरी वेगळंच घडलं. सुरुवातीला आम्हालाही वाटलं, नेहमीसारखंच असेल. मात्र दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत गेला. डोंगरातून उतरणारे पाणी, नदीत मिळणारे ओढे आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे नदीची पातळी वेगाने वाढू लागली.”

प्रभंजनची नजर आता समोर वाहणाऱ्या नदीवर खिळली होती.

जयगड नदी जणू स्वतःची मर्यादा विसरली होती, पाऊस थांबायचे काही नाव घेत नव्हता. सुरुवातीला आम्ही फारसं मनावर घेतलं नाही. पण नदीची पातळी तासा गणिक वाढत होती. आयुष्यात पहिल्यांदाच आम्ही जयगड नदीला इतक्या रौद्र रूपात पाहत होतो."

“त्या वर्षी धुवांधार पाऊस पडत होता,” प्रभंजन सांगू लागला. “सलग तीन दिवस झाले होते, पण पाऊस उघडीप द्यायलाच तयार नव्हता. आकाशात सूर्याचे दर्शन तर दूरच, दिवस आणि रात्र यातील फरकही ओळखू येत नव्हता. काळेभोर ढग आकाशावर ठाण मांडून बसले होते.

जसा पावसाचा जोर वाढत होता, तशी जयगड नदीही तिचे रौद्र रूप धारण करत होती. नदीचा खळखळाट इतका प्रचंड झाला होता की तो कानठळ्या बसवणारा वाटत होता. कधी कधी तर असे वाटायचे की इथून कुठेतरी दूर पळून जावे. पण पावसाच्या त्या साम्राज्यात जावे तरी कुठे?

रस्त्यावर चिटपाखरूसुद्धा दिसत नव्हते. प्रत्येकजण आपल्या घरात कोंडून बसला होता. सततच्या ओलाव्यामुळे धान्य खराब होऊ नये म्हणून मीही दुकान बंद ठेवले होते.

मात्र खरी भीती तेव्हा वाटली, जेव्हा नदीचे पाणी पात्र सोडून आमच्या परसापर्यंत येऊन पोहोचले.

त्या क्षणी माझ्या मनात पहिल्यांदाच विचार आला

‘आता आपला खेळ संपला.’

दर मिनिटागणिक पाण्याची पातळी वाढत होती. पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठमोठे लाकडी ओंडके, झाडांच्या फांद्या, जनावरे आणि घरगुती वस्तू वाहून जाताना दिसत होत्या. आयुष्यात प्रथमच मी निसर्गाचे असे रौद्र आणि भयावह रूप पाहत होतो.

गावकरी पूर्णपणे हतबल झाले होते. चिपळूणकडून गावात येणारा मुख्य रस्ता रात्रीच पाण्याखाली गेला होता. बाहेरून मदत येण्याची कोणतीही शक्यता उरली नव्हती.

ना पुढे जाता येत होते, ना मागे फिरता येत होते.

आम्ही अक्षरशः पाण्याच्या विळख्यात अडकलो होतो.

त्या क्षणी पैसा, प्रतिष्ठा, दुकान, संपत्ती या सर्व गोष्टी निरर्थक वाटत होत्या. आमच्या हातात एकच गोष्ट उरली होती.

स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव वाचवणे.”

“पाणी परसात आले तेव्हा आम्ही अजूनही स्वतःला धीर देत होतो. दरवर्षी पूर येतो आणि ओसरतो, याची सवय होती. पण त्या दिवशी नदीचा वेग काही वेगळाच होता.पाणी वाढतच होतं. आम्ही काहीच करू शकत नव्हतो.

अचानक अंगणात ठेवलेल्या लाकडांच्या मोळ्या पाण्यावर तरंगू लागल्या. काही मिनिटांतच पाणी ओटीवर आले. आम्ही घाईघाईने घरातील महत्त्वाच्या वस्तू वरच्या फळ्यांवर ठेवू लागलो. बायको देवघरातील मूर्ती, कागदपत्रे आणि थोडेफार दागिने गोळा करत होती. पाण्याचा वेग इतका होता की प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरत होता.

बाहेर अंधार पडू लागला होता. विजेचा पुरवठा केव्हाच खंडित झाला होता. फक्त विजांच्या कडकडाटात आणि आकाशात चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशातच आजूबाजूचे दृश्य दिसत होते. प्रत्येक चमकणाऱ्या विजेबरोबर नदी आणखी जवळ आल्यासारखी वाटत होती.

थोड्याच वेळात पाणी घरात शिरले.

सुरुवातीला टाचांपर्यंत...

नंतर गुडघ्यांपर्यंत...

आणि पाहता पाहता कंबरेपर्यंत.

माझी लहान मुलं भीतीने रडत होती. बायकोच्या डोळ्यांत घबराट स्पष्ट दिसत होती. पण त्या क्षणी त्यांना धीर देण्याखेरीज माझ्या हातात काहीच नव्हते.

'काळजी करू नका, काही होणार नाही असे मी म्हणत होतो पण मनातून मलाच त्या शब्दांवर विश्वास उरला नव्हता.

चारही बाजूंनी पाण्याने आम्हाला वेढले होते. जीव वाचवण्यासाठी रात्री उशिरा आम्ही घराच्या छपरावर जाऊन बसलो. खाली पाहिलं की अंगावर काटा यायचा. घरात शिरलेलं पाणी वाढत वाढत घरातील लाकडी वाशांवरून वाहू लागलं होतं. खाली उसळणाऱ्या पाण्याकडे पाहण्याचीही भीती वाटत होती. प्रवाहाबरोबर झाडे, जनावरे, घरांचे तुकडे आणि लाकडी ओंडके वाहून जात होते. एखादा ओंडका घराला धडकला की संपूर्ण वाडा हादरून जात होता.

त्या रात्रीचा प्रत्येक मिनिट एक वर्षासारखा वाटत होता.

पहाटेच्या सुमारास आकाशात हेलिकॉप्टरचा आवाज ऐकू आला. त्या आवाजाने प्रथमच आशेचा किरण दिसला. अनेक तास मृत्यूच्या सावलीत बसल्यानंतर मदत पोहोचत असल्याची जाणीव झाली. पण तोपर्यंत महापुराने आमच्या आयुष्याची राखरांगोळी करून टाकली होती.”

डोळ्यांसमोर आमचा संसार वाहून जात होता.

कपाटं, धान्याचे डबे, घरातील सामान, भांडीकुंडी. जे काही वर्षानुवर्षे जमवलं होतं ते सगळं पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर पडत होतं. आम्ही मात्र असहायपणे ते पाहत होतो.

पूर्वजांनी बांधलेला वाडा भक्कम असल्यामुळे तो कसाबसा तग धरून उभा राहिला हे आमचे नशीब पण दुकानाचं मात्र अक्षरशः कंबरडं मोडलं. घराच्या छपरावर बसून समोरून दिसणाऱ्या, आमच्या दुकानाची धुळधाण होताना मला 'याची डोळा'पहावे लागत होते.

सामानाने खच्चून भरलेलं दुकान..

गोदाम..

वर्षानुवर्षांच्या कष्टाने उभा केलेला व्यापार..

सगळं काही त्या पाण्याने गिळंकृत केलं.

लाखो रुपयांचा माल वाहून गेला. कपाटांमध्ये ठेवलेला रोख पैसा, महत्त्वाची कागदपत्रं, हिशेबाची वही.सर्व काही वशिष्ठीच्या पाण्याला स्वाहा झालं.

त्या दिवशी मला समजलं की ‘राजाचा रंक होणे’ म्हणजे काय.

अवघ्या काही तासांत आमच्याकडे काहीच उरलं नव्हतं.

काहीच नाही.

सुदैवाने आपत्ती व्यवस्थापनाच्या हेलिकॉप्टरने वेळीच बचावकार्य केलं आणि आमचे प्राण वाचले. महापूर ओसरल्यानंतर जेव्हा आम्ही परत घरी आलो, तेव्हा समोर उरला होता तो फक्त उद्ध्वस्त झालेला संसार.

पडवीच्या भिंतीवर लटकलेल्या पूर्वजांच्या तसबिरीही वाहून गेल्या होत्या. जणू महापुराने फक्त आमची संपत्तीच नाही, तर आमच्या घराण्याच्या आठवणीही हिरावून घेतल्या होत्या.

वाचलं होतं ते फक्त आमचं जीवित..

अंगावरील कपडे..

आणि माझ्या पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र.

जीवन पुन्हा उभं करण्यासाठी आम्हाला नव्याने सुरुवात करावी लागली. बायकोचं मंगळसूत्र आणि माझ्या हातातली सोन्याची अंगठी विकली. त्या पैशांत एक रिक्षा घेतली.

एकेकाळी पंचक्रोशीत नावाजलेल्या दुकानाचा मालक असलेला मी..

दुसऱ्यांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवणारा रिक्षाचालक बनलो.

पण निदान त्या मुळे माझं कुटुंब जिवंत राहिले.

त्या महापुराने मला एक गोष्ट शिकवली.

संपत्ती, मानमरातब, वैभव हे सर्व एका क्षणात नाहीसं होऊ शकतं पण जिवंत राहण्याची जिद्द असेल, तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो.”

प्रभंजन पुढे सांगू लागला,

“पण महापुरानंतर आणखी एक संकट माझ्यासमोर उभं राहिलं. त्या काळात रिक्षा परमिट देणे बंद असल्यामुळे ते मिळणं जवळजवळ अशक्य झालं होतं.आजही अनेक अडचणी आहेत. त्यामुळे कधी कधी भीतीच्या सावटाखालीच गाडी चालवावी लागते. काल तुमचा ड्रायव्हर परमिटबद्दल विचारत होता, तेव्हा मी घाबरलो होतो. कारण आता ही रिक्षाच माझं जीवन आहे, आणि हिच्यावरच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.

दोन मुलं अजून शिकत आहेत. बायको आणि चुलत बहीण टेलरिंगचं काम करून संसाराला हातभार लावतात. कशीबशी गाडी पुढे ढकलतोय. हीच माझी जीवनकहाणी आहे.

कधी परमिटची योजना सुरू झाली किंवा त्यात मला काही अडचण आली तर,शक्य असेल तेवढी मदत कर.”

त्याच्या आवाजात याचना नव्हती पण एका जुन्या मित्रावरचा विश्वास नक्कीच होता.

मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो,

“प्रभा, तुला कधीही कोणत्याही प्रकारची अडचण आली, तर मला नक्की कळव. मी मोठी आश्वासने देणार नाही पण माझ्याकडून होईल तेवढा प्रयत्न नक्की करेन.”

हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी समाधानाची एक हलकीशी रेष उमटली.

काही वेळाने आम्ही पुन्हा गावाच्या मुख्य रस्त्यावर आलो, जिथे आमची गाडी उभी होती. प्रभंजन आमच्यासोबत गाडीत बसला,आम्ही त्याला चिपळूणच्या गेस्ट हाऊसपर्यंत परत घेऊन आलो.

संपूर्ण प्रवासात तो आपल्या नातेवाईकांच्या आठवणी सांगत राहिला. संकटाच्या काळात कित्येकांनी पाठ फिरवली, काहींनी विचारपूसही केली नाही, याची खंत त्याच्या बोलण्यातून वारंवार जाणवत होती. मात्र त्याबद्दल राग नव्हता फक्त एक खोल वेदना होती.

आमची गाडी चिपळूण गेस्ट हाऊसजवळ थांबली.

तो खाली उतरला. त्याच्या उभ्या केलेल्या रिक्षा जवळ.

माझा फोन नंबर घेवून, तो हसत म्हणाला “कधी मुंबईला आलो तर भेटेन तुला,” .

“नक्की भेट,” मी उत्तर दिले.

त्याने हात हलवला. आम्हीही निरोपाचा हात दाखवला.

काही क्षणांतच तो आमच्या नजरेआड झाला.

गाडी मुंबईच्या दिशेने धावू लागली. बाहेर पावसाच्या सरी पुन्हा सुरू झाल्या होत्या. रस्ते, झाडे आणि डोंगर मागे सरकत होते पण माझ्या डोळ्यांसमोर मात्र सतत एकच चेहरा तरळत होता.

जपानी गार्डनमध्ये गावाच्या गोष्टी रंगवून सांगणारा प्रभंजन..

आणि महापुराच्या एका तडाख्यात सर्वस्व गमावूनही जगण्याची जिद्द न हरवलेला प्रभंजन..

त्या दिवशी मला महापुराची खरी व्याख्या समजली.

महापूर केवळ घरे, दुकाने आणि संपत्ती वाहून नेत नाही.तो अनेकदा माणसाचे संपूर्ण आयुष्यच वाहून नेतो.

महापूर : एका शापाचा शेवट | भाग - २
या अंतिम भागात निसर्गाच्या रौद्र रूपाने निर्माण केलेल्या विनाशाचे भयावह चित्र उलगडते. महापुराच्या लाटांशी संघर्ष करताना गावकऱ्यांनी अनुभवलेल्या वेदना, नुकसान आणि जगण्यासाठीची धडपड यांचे प्रभावी वर्णन या कथेत करण्यात आले आहे. संकट कितीही मोठे असले तरी धैर्य, एकता आणि आशा यांच्यामुळे नव्या सुरुवातीचा मार्ग सापडू शकतो, हा संदेश ही कथा देते.
समाप्त 🖋️📖📚

'महापूर : एका शापाची सुरुवात' पासून 'एका शापाचा शेवट' पर्यंतचा हा प्रवास निसर्गाच्या सामर्थ्याची आणि मानवी जिद्दीची अविस्मरणीय कहाणी आहे.
अशाच दर्जेदार मराठी कथा, लघुकथा, प्रवासवर्णन आणि उपयुक्त लेख वाचण्यासाठी "शब्दांची मुशाफिरी | SJ Omkar Blog" ला नियमित भेट द्या. 🌊📖✨

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना." 📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा. 💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा. 👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा. 🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा. धन्यवाद! 🙏 SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved (ओमकार शिवलकर)
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी  अधिकृत लोगो





📩 Subscribe करा
नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X

📸 Follow on Instagram

📘 Follow on Facebook

📌 Pinterest वर फॉलो करा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...