मुख्य सामग्रीवर वगळा

ओढ मायेची | आई-वडिलांचे प्रेम, नियतीचा खेळ आणि हृदयस्पर्शी मराठी कथा..

 ओढ मायेची|आई-वडिलांचे प्रेम, नियतीचा खेळ आणि हृदयस्पर्शी मराठी कथा..

ओढ मायेची | आई-वडिलांचे प्रेम, नियतीचा खेळ आणि हृदयस्पर्शी मराठी कथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
मायेच्या नात्याला,

शब्दांची गरज नसते |

एक हाक पुरेशी असते,

मन पुन्हा भरून येते |

👉नादान स्वप्नांची किंमत | लोभ, विश्वासघात आणि एका चुकीच्या निर्णयाची थरारक कथा...🔗

झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने अनेकांना आकर्षित करतात पण लोभ आणि चुकीचे निर्णय आयुष्याला अनपेक्षित वळण देऊ शकतात. 'नादान स्वप्नांची किंमत' ही अशीच एक थरारक मराठी कथा आहे, ज्यात एका साध्या सहीने तीन आयुष्यांचे भविष्य कायमचे बदलून जाते. विश्वास, मैत्री, फसवणूक आणि लोभ यांच्या गुंतागुंतीत अडकलेल्या पात्रांचा हा प्रवास वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो आणि प्रत्येक निर्णयाचे दूरगामी परिणाम काय असू शकतात, याचा विचार करायला भाग पाडतो.

ओढ मायेची| आई-वडिलांचे प्रेम, नियतीचा खेळ आणि हृदयस्पर्शी मराठी कथा..

काही नाती काळालाही हरवतात..काही भेटी आयुष्यभर मनात जिवंत राहतात..आई-वडिलांचं प्रेम, नियतीचा एक अनपेक्षित खेळ आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा भावनिक प्रवास अनुभवण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत वाचा..
आई-वडिलांची माया ही कोणत्याही नात्यापेक्षा श्रेष्ठ असते. 'ओढ मायेची' ही प्रेम, त्याग, नियती आणि कुटुंबातील नात्यांची हृदयस्पर्शी मराठी कथा आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित प्रसंगामुळे बदललेली नाती, काळाच्या ओघातही न संपणारी मायेची ओढ आणि शेवटी डोळ्यात पाणी आणणारा भावनिक शेवट या कथेला अविस्मरणीय बनवतो. प्रत्येक वाचकाच्या मनाला स्पर्श करणारी ही कथा ती पुढे..

एक साधं आयुष्य-निशांतचा दिनक्रम,

निशांत हा २६ वर्षांचा केमिकल इंजिनिअर युवक होता. रोज संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर फ्रेश होऊन तो आई-बाबांसोबत गप्पा मारायला बसायचा नंतर जेवण आणि नंतर मोबाईल पाहणे हा त्याचा दिनक्रम,दिवस कितीही व्यस्त गेला तरी रात्रीचा थोडासा वेळ त्याने फक्त आई-बाबांसाठी राखून ठेवला होता. त्या वेळेत ना मोबाईल, ना टीव्ही. फक्त आई-बाबा आणि त्यांच्यासोबतच्या मनमोकळ्या गप्पा.

हा त्याच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनला होता. सकाळी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत फारसे बोलणे होत नसे. एकदा ऑफिसमध्ये गेल्यावर कामाच्या व्यापामुळे फोन करूनही निवांत बोलायला वेळ मिळत नसे. त्यामुळे संध्याकाळच्या त्या वेळेला तो खूप महत्त्व द्यायचा,बाबा कुठे कामासाठी गेले असतील तर आईशी गप्पा.. त्या काही क्षणांना निशांतच्या आयुष्यात विशेष महत्त्व होते.

जेवण झाल्यावर आई-बाबांशी थोड्या गप्पा मारून निशांत आपल्या खोलीत जायचा. त्यानंतर मोबाईलवर आलेले मेसेज, सोशल मीडियावरील पोस्ट किंवा एखादा व्हिडिओ पाहत तो थोडा निवांत वेळ घालवायचा आणि मग झोपी जायचा. हा त्याच्या आयुष्याचा रोजचा न बदलणारा नित्यक्रम होता.

अधूनमधून आई त्याच्या खोलीत यायची. प्रेमाने त्याच्या डोक्याची चंपी करायची, केसांतून अलगद हात फिरवायची. आईच्या त्या मायेच्या स्पर्शात इतकी ऊब असायची की त्या रात्रीची झोप त्याला जणू स्वप्ननगरीत हरवून गेल्यासारखी वाटायची.

त्या दिवशी गप्पा मारताना त्याला बाबा म्हणाले,

"निशांत, उद्या आम्ही दोघे जवळच्या एका नातेवाईकाच्या मुलीच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी पुण्याला जाणार आहोत,तुला या बाबत अगोदर विचारले होते. तेव्हा तू नाही म्हणाला होतास,परत एकदा तुला विचारत आहे,आमच्या बरोबर तू चल.  एका मुलीचे स्थळ तुझ्यासाठी आले आहे. ती मुलगी आणि तिचे आई बाबा  तिथे येणार आहे. आपल्याला लग्नाला जाता येईल आणि त्या मुलीला सुद्धा पाहता येईल."

निशांत स्मित करून हसला आणि म्हणाला,

"बाबा, ही अजून प्राथमिक बोलणी आहेत. समजा तुम्हा दोघांना ती मुलगी आवडली नाही तर  ? मग माझी फेरी उगाच फुकट जाईल. शिवाय ऑफिसमध्ये सध्या खूप काम आहे. त्यात या उन्हाळ्यात पुण्यापर्यंतचा प्रवास करणे म्हणजे आणखी त्रास."

क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला,"आणि दुसरे म्हणजे, तुमची आणि मुलीच्या घरच्यांची बोलणी निश्चित झाली की आपण भेटायला जाऊच की ? मग आत्ताच घाई कशाला?"

त्याच्या बोलण्यावर आई-बाबांनी एकमेकांकडे पाहिले. त्याच्या म्हणण्यातही काही तथ्य होते. त्यामुळे त्यांनी फार आग्रह न धरता विषय तिथेच सोडून दिला.

त्यानंतर निशांत आपल्या खोलीत गेला. नेहमीप्रमाणे मोबाईलवर आलेले मेसेज, सोशल मीडियावरील पोस्ट आणि विविध व्हिडिओ पाहत तो निवांत बसला होता. स्क्रोल करता करता अचानक एक साप्ताहिक राशीभविष्य त्याच्या नजरेस पडले.

निशांतचा देवधर्मावर विश्वास होता पण राशीभविष्य, ज्योतिषशास्त्र किंवा हस्तसामुद्रिक यांसारख्या गोष्टींवर त्याची फारशी श्रद्धा नव्हती. आई-वडिलांच्या समाधानासाठी तो जन्मपत्रिका जुळवण्यास विरोध करत नसे, एवढेच. त्यांच्या आनंदापुढे त्याला बाकी सर्व गोष्टी गौण वाटत असत.

त्या रात्री त्याच्या डोळ्यांवर झोपेची हलकी गुंगी चढू लागली होती. जणू निद्रादेवी मोरपिसाने त्याच्या पापण्यांवर अलगद स्पर्श करत होती. असे असताना सुद्धा त्याचे लक्ष कधी नाही ते त्या राशीभविष्याच्या बातमीकडे वेधले गेले.

पेंगुळलेल्या अवस्थेत तो ती बातमी वाचत राहिला. वाचताना त्याच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले."लोक खरंच या गोष्टींवर किती विश्वास ठेवतात!" तो स्वतःशीच पुटपुटला.

मोबाईल बाजूला ठेवण्याचा विचार करत असतानाच अचानक स्क्रीनवर त्याच्या धनु राशीचे भविष्य झळकले. त्याने सहजच आपल्या धनु राशीचे भविष्य वाचायला सुरुवात केली.

"तुमचा हा आठवडा धावपळीचा आणि मनस्ताप देणारा दुःखाचा राहील. प्रवासापासून धोका संभवतो.."

हे वाक्य वाचताच झोपेने मिटू पाहणाऱ्या त्याच्या पापण्या क्षणभर उघडल्या. पेंगुळलेल्या अवस्थेतच त्याच्या मनात विचार चमकून गेला.

"अरे बाबा, प्रवास तर माझे आई-बाबा करणार आहेत. मी कुठे जाणार आहे? आणि त्या दोघांच्या राशी सुद्धा धनु नाहीत. मग मी कशाला याचा विचार करू?"

क्षणभर तो स्वतःशीच हसला.

"मनस्ताप आणि धावपळीचा आठवडा म्हणे! हे मात्र काही अंशी खरं आहे. ऑफिसमध्ये सध्या कामाचा एवढा ताण आहे की गेल्या महिनाभरापासून धावपळ आणि मनस्ताप हे दोन्ही सुरूच आहेत.काम करताना वरिष्ठांचे बोलणे ऐकून घेणे हे तर दुःख करण्यासारखेच असते"

भविष्यावर त्याचा फारसा विश्वास नसला तरी त्या वाक्याशी साधर्म्य परिस्थितीतून तो जात असल्याने त्याच्या चेहऱ्यावर नकळत कुत्सित स्मित उमटले.

"अशा दोन-चार सामान्य गोष्टी लिहिल्या की कोणालाही ते भविष्य खरं वाटेल," तो मनात म्हणाला.

त्याने मोबाईलवरील ती बातमी पुढे स्क्रोल केली, फोन बाजूला ठेवला आणि बेडवर अंग टाकले. काही क्षणांतच त्याच्या डोळ्यांवर झोपेची गडद चादर पसरू लागली..

इतक्यात दार हलकेच उघडून त्याची आई आत आली.

"अरे निशांत, थांब.. थांब..अजून झोपू नकोस," ती हसत म्हणाली.

निशांतने अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले.

"उद्या आम्ही पहाटेच निघणार आहोत. ड्रायव्हरलाही बोलावले आहे. त्यामुळे तुला पहाटे उठवायचे नाही म्हणून आम्ही शांतपणे निघून जाऊ. दार फक्त ओढून घेऊ."

ती पुढे म्हणाली,

"आणि हो, रात्री परत यायला उशीर झाला तर आमची वाट पाहत बसू नकोस. जेवणवाल्या मावशी संध्याकाळी जेवण करून जातील. तू वेळेवर जेवून घे. उद्या जरा घरी लवकर ये. मित्रांसोबत उगाच रेंगाळत बसू नकोस."

आईच्या या नेहमीच्या सूचनांचा वर्षाव ऐकत असतानाच निशांत झोपेच्या अधीन होत चालला होता. बोलण्याइतकीही त्याच्यात शक्ती उरली नव्हती. त्याने फक्त एक हात वर करून "सगळं कळलं" अशी खूण केली.

आईच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले.

तिने खोलीत नजर फिरवली. निशांतला खोलीतील दिवे सुरू ठेवण्याची सवय होती. त्यामुळे झोपण्यापूर्वी त्याच्या खोलीत डोकावून लाईट बंद आहेत की नाहीत याची खात्री करणे हा तिचाही रोजचा नित्यक्रम बनला होता.

तिने ट्यूबलाईट बंद केली. खोली क्षणात अंधाराने भरून गेली.

प्रखर प्रकाश नाहीसा होताच जणू निद्रादेवीने त्याच्या पापण्यांवर अलगद फुंकर मारली. काही क्षणांतच विचारांची गर्दी विरली आणि निशांत गाढ झोपी गेला.

पुण्याचा प्रवास-

सकाळी पहाटे पाचच्या सुमारास ड्रायव्हर इमारतीखाली येऊन पोहोचला. निशांतचे आई-वडील जानकी आणि राघव, आधीच तयार होऊन त्याची वाट पाहत होते.

ड्रायव्हरला घरी बोलावून त्याला चहा-पाणी दिल्यानंतर सव्वापाचच्या सुमारास ते खाली उतरले. बाहेर अजूनही रात्री सारखाच अंधार होता. उन्हाळ्याचे दिवस असले तरी पहाटेच्या हवेत किंचित गारवा जाणवत होता. वातावरण प्रसन्न, शांत आणि प्रदूषणमुक्त वाटत होते.

भल्या पहाटे प्रवासाला जाण्याचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात अनेकदा आले होते. त्यामुळे आज काही विशेष वेगळे वाटत नव्हते. उलट, मुंबईची वाहतूक टळणार आणि गाडी कुठेही न थांबता पुण्यापर्यंत पोहोचणार, याचाच त्यांना आनंद होता.

गाडी सुरू झाली. इमारतीच्या आवारातून बाहेर पडताच परिसरातील शांतता अधिकच जाणवू लागली. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती.

मात्र गाडी गेटबाहेर पडताच गेट जवळच बसलेली पाच-सहा कुत्री एकाएकी हेल काढून रडू लागली.

क्षणभर राघवच्या मनात एक विचार चमकून गेला.

"कुत्री अशा प्रकारे रडली की काहीतरी अशुभ घडते, असे पूर्वीचे लोक म्हणायचे.."

पण पुढच्याच क्षणी त्याने तो विचार झटकून टाकला.

"अरे, ही कुत्री तर रोजच भुंकतात, रडतात. प्रत्येक गोष्टीत अपशकून शोधत बसलो तर आयुष्य कसे जगायचे?"

तो स्वतःशीच हसला आणि आरामात सीटला टेकला.

गाडीने वेग घेतला आणि मुंबई-पुणे महामार्गाच्या दिशेने प्रवास सुरू झाला..

गाडी हायवेला लागली आणि परिसराचे चित्र हळूहळू बदलू लागले. शहरातील तुरळक चारचाकी आणि दुचाकी वाहनांऐवजी आता मोठमोठे ट्रक, कंटेनर आणि इतर जड वाहने मोठ्या संख्येने दिसू लागली.

मोठ्या शहरांमध्ये जड वाहनांना रात्री आणि पहाटेच्या वेळेतच प्रवेश दिला जात असल्याने त्यांची एवढी वर्दळ असणे साहजिकच होते. त्यातही हायवे जवळ जवळ मोकळा असल्यामुळे बहुतेक वाहने चांगल्याच वेगात धावत होती.

त्यांचा ड्रायव्हरही काळजीपूर्वक एकामागून एक वाहनांना ओव्हरटेक करत वाट काढत होता. कधी एखादा कंटेनर, तर कधी प्रचंड ट्रेलर मागे टाकत गाडी पुढे सरकत होती.

गाडीच्या खिडकीतून बाहेर नजर गेली, तर रस्त्यावरील दिवे आपला पिवळसर प्रकाश शांतपणे पसरवत उभे होते. त्या प्रकाशाच्या पलीकडे मात्र अजूनही गडद काळोख दाटून बसला होता. रस्त्याच्या कडेला उभी असलेली झाडे, बंद दुकाने आणि रांगेने दिसणाऱ्या इमारती अंधारात विरून गेल्यासारख्या भासत होत्या. जणू संपूर्ण जग अजूनही गाढ झोपेत होते आणि त्या निवांत पहाटेच्या वेळी फक्त हायवेवरून धावणारी वाहनेच जागी होती.

जानकी आणि राघव निवांतपणे गप्पा मारत प्रवासाचा आनंद घेत होते. अजून पुढे त्यांची कोणती परीक्षा वाट पाहत आहे, याची त्यांना किंचितही कल्पना नव्हती.

त्यांची गाडी नवी मुंबईपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्व क्षितिजावर प्रकाशाची हलकी चाहूल लागली होती. आकाश हळूहळू फटफटू लागले होते. रस्त्यांवर आता थोडी रहदारी दिसू लागली होती. काही जण मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते, तर काहीजण दिवसाच्या कामासाठी घराबाहेर पडण्याची तयारी करत होते.

गाडी भरधाव वेगाने आपला रस्ता कापत पुढे सरकत होती. चौकातील पिवळे मिचमिचणारे सिग्नल जणू "सावध राहा आणि पुढे जा" असा संदेश देत होते. ड्रायव्हरही पूर्ण लक्ष देऊन वाहन चालवत होता.

नवी मुंबईचा टोलनाका पार केल्यानंतर त्यांची गाडी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दाखल झाली. रुंद, प्रशस्त आणि तुलनेने मोकळा रस्ता पाहून ड्रायव्हरने गाडीचा वेग किंचित वाढवला.

प्रवासाची सुरुवातीची उत्सुकता आता ओसरू लागली होती. पहाटेची वेळ, गाडीची हलकी कंपने आणि बाहेरून येणारा थंडगार वारा यामुळे जानकीच्या डोळ्यांवर झोपेची झापड येऊ लागली. काही वेळातच तिचा डोळा लागला.

राघवही सीटला टेकून बाहेरचा नजारा पाहत होता. पण त्याचेही डोळे हळूहळू पेंगू लागले. जागेपण आणि झोप यांच्या सीमारेषेवर तो अलगद डोलत होता..

खालापूरजवळील फूड मॉलमध्ये नाश्ता आणि चहा उरकून त्यांनी पुन्हा प्रवास सुरू केला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मागे पडला आणि गाडी मुळशीच्या दिशेने धावू लागली.

लग्नसोहळा आणि निकिता-

डेस्टिनेशन वेडिंग मुळशी तालुक्यातील एका निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास जानकी, राघव आणि त्यांचा ड्रायव्हर तेथे पोहोचले.

वधू-वर पक्षातील अनेक नातेवाईक दोन दिवसांपूर्वीपासूनच रिसॉर्टमध्ये मुक्कामाला होते. जानकी आणि राघव यांनाही तसे निमंत्रण होते पण निशांतच्या कामामुळे आणि स्वतःच्या नियोजनामुळे त्यांनी फक्त लग्नाच्या दिवशी पोहोचणे पसंत केले होते.

लग्नाचा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. अनेक वर्षांनी भेटलेल्या नातेवाईकांसोबत गप्पा, हशा, फोटोसेशन आणि विविध कार्यक्रम यांत दोघेही रमून गेले. दिवसभर आनंदाचे वातावरण होते.

मात्र जवळजवळ प्रत्येक नातेवाईक एकच प्रश्न विचारत होता.

"काय हो, निशांत आला नाही?"

राघव आणि जानकी एकमेकांकडे पाहून हसत उत्तर देत.

"ऑफिसच्या कामामुळे येता आलं नाही."

दिवसभर त्यांनी हेच उत्तर कित्येक वेळा दिले.

दरम्यान, निशांतसाठी आलेल्या स्थळाबाबत दोन्ही कुटुंबांमध्ये प्राथमिक चर्चा झाली. मुलगी आणि तिच्या घरच्यांचा स्वभाव जानकी आणि राघव यांना आवडला. पत्रिकाही समाधानकारकरीत्या जुळत असल्याचे सांगण्यात आले.

"लवकरच मुलगा-मुलगी प्रत्यक्ष भेटतील असा कार्यक्रम ठेवूया," असे ठरले आणि दोन्ही बाजूंनी त्यास सहमती दर्शवली.

मुलगी म्हणजे निकिता, मात्र अधूनमधून एकच प्रश्न विचारत होती.

"निशांत का आला नाही?"

तिला वाटले होते की तोही लग्नाला येईल. निदान दूरून का होईना, त्याची एक झलक तरी पाहायला मिळेल. मैत्रिणींनाही तो दाखवता आला असता. पण त्याच्या अनुपस्थितीमुळे तिचा थोडासा अपेक्षाभंग झाला होता.त्या मुळे ती थोडी निराश दिसत होती.

लग्नसोहळा मोठ्या उत्साहात पार पडत होता. रिसॉर्टच्या हिरव्यागार परिसरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. कुठे फोटोसेशन सुरू होते, कुठे गाण्यांच्या तालावर तरुणाई थिरकत होती, तर कुठे ज्येष्ठ मंडळी जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पांमध्ये रमली होती.

राघव आणि जानकीही अनेक वर्षांनी भेटलेल्या नातेवाईकांमध्ये छान मिसळले होते. एका काकांनी हसत विचारले,

"काय राघव, आता पुढची शहनाई तुमच्या घरात कधी वाजणार?"

त्यावर राघव हसत म्हणाला,

"अहो, आधी मुलगा तयार झाला पाहिजे. आम्ही तर कधीचे तयार आहोत."

त्याच्या उत्तरावर आजूबाजूचे सगळेच हसले.

थोड्याच वेळात निशांतसाठी स्थळ म्हणून सांगून आलेली मुलगी आणि तिचे आई-वडील पुन्हा समोरासमोर आले. प्राथमिक होकार देण्यापूर्वी एकमेकांना आणखी थोडे जाणून घेण्यासाठी ही भेट ठरली होती. मुलगी सुस्वभावी, नम्र आणि समजूतदार वाटत होती. तिच्या प्रत्येक शब्दातून आत्मविश्वासाची एक शांत झलक दिसून येत होती.

"निशांत आला नाही याचे वाईट वाटले," निकिता हलकेच हसत म्हणाली.

"ऑफिसमधून सुट्टी मिळाली नाही, बाळा," जानकीने उत्तर दिले. "नाहीतर, आम्ही त्याला जबरदस्तीने घेऊनच आलो असतो."

"ठीक आहे. पुढच्या भेटीत ओळख करून घेऊ," निकिता म्हणाली.

तिच्या त्या सहज बोलण्याने जानकीच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.

नंतर जेवणाच्या वेळी जानकी हळूच राघवच्या जवळ येऊन म्हणाली,

"ती मुलगी निकिता, छान वाटली मला."

राघवही हसला.

"मलाही. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिचा स्वभाव चांगला दिसतोय."

"आपल्या निशांतसोबत जोडी छान दिसेल ना?"

"हो. आता पुढचे त्यांच्यावर सोडूया."

त्या दोघांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होते. आपल्या मुलाच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याची गोड जाणीव त्यांच्या मनोमन होत होती.

दुपारी जेवणानंतर निशांत आणि त्याच्या आईचे फोनवर बोलणे झाले.

"आम्ही पाचच्या सुमारास निघणार आहोत," जानकी म्हणाली. "जास्तीत जास्त नऊ-दहा वाजेपर्यंत मुंबईला पोहोचू. उशीर झाला तर आमची वाट पाहू नकोस. जेवून झोपून जा."आणि हो, सगळेजण तुझी चौकशी करत होते.. निकिता सुद्धा, आम्हाला ती मुलगी मनापासून खूप आवडली रे. आता दुसऱ्या कुठल्याही स्थळाचा विचार करण्याची गरज नाही. पुढच्या आठवड्यात आपण तिच्या घरी पुण्याला जाणार आहोत. गंमत म्हणजे ती एक सारखी तुझ्या बद्दलच विचारत होती."

आईचा उत्साह ऐकून निशांत हसला.

"अगं आई, आधी मला भेटू तरी दे तिला."

"ते सगळं नंतर. आम्हाला ती आवडली म्हणजे अर्धी लढाई जिंकलीच समज!" जानकी हसत म्हणाली.

फोन ठेवताना दोघांच्याही मनात एक वेगळाच आनंद होता.

जेवणानंतर पुन्हा एकदा सगळे गणगोत आणि आप्तस्वकीय एकत्र जमले. गप्पा, हशा आणि आठवणींनी वातावरण पुन्हा एकदा रंगून गेले. आणि कधी संध्याकाळचे पावणे पाच वाजले ते दोघांना समजलेच नाही.

संध्याकाळी रिसॉर्टमधून निघताना जानकीने मोबाईलमध्ये परत निकिताचा  फोटो पुन्हा पाहिला आणि हसत म्हणाली,

"हा फोटो निशांतला दाखवला की त्याची प्रतिक्रिया बघायला मजा येईल."

राघवही हसला.

"आधी घरी पोहोचू दे. मग त्याची चांगलीच फिरकी घेऊ."

दोघेही आनंदी मनाने गाडीत बसले. पुढील काही दिवसांत घरात लग्नाच्या चर्चांना उधाण येईल, अशी सुखद स्वप्ने त्यांच्या मनात रंगू लागली होती..

परतीचा प्रवास

राघव, जानकी आणि त्यांचा ड्रायव्हर संध्याकाळी पाचच्या सुमारास मुळशीतील रिसॉर्टमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. बाहेर अजून ऊन असले, तरी वातानुकूलित गाडीमुळे प्रवास आरामदायी वाटत होता. त्यांना निरोप देण्यासाठी त्यांचे जवळचे नातेवाईक आणि निकिताही बाहेर आली होती. हात हलवत सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि गाडी हळूहळू रिसॉर्टच्या आवाराबाहेर पडली.

लग्नातील जेवण, दिवसभराची धावपळ आणि उन्हाचा थकवा यामुळे ड्रायव्हरने जेवणानंतर थोडी विश्रांती घेतली होती. त्यामुळे तोही ताजातवाना वाटत होता.

निघताना अनेक नातेवाईकांनी त्यांना सल्ला दिला.

"आजची रात्र इथेच थांबा. सगळे मिळून गप्पा मारू, मजा करू. उद्या सकाळी निवांत निघा."

सल्ला वाईट नव्हता. खरं तर ते सहज थांबू शकले असते.

पण निशांत मुंबईत एकटाच होता.

त्याची ओढ दोघांनाही लागली होती.

राघव हसत म्हणाला,

"आता मुलाचं लग्न झालं असतं तर दोन दिवस अजून मुक्काम केला असता. पण सध्या तरी आमचा मुलगा घरी एकटाच आहे."

जानकीनेही त्याला दुजोरा दिला.

आई-वडिलांच्या मनात मुलाबद्दल असणारी ती ओढ त्यांना परतीच्या प्रवासासाठी आतुर करत होती.

मुंबईला लवकर पोहोचावे, निशांतसोबत निवांत गप्पा माराव्यात आणि निकिता बद्दल त्याची प्रतिक्रिया पाहावी, अशी अनेक सुखद स्वप्ने त्यांच्या मनात होती.

त्याच उत्साहात त्यांनी प्रवास सुरू केला..

एक्सप्रेस वे मोकळा असल्याने सूर्यप्रकाश असेपर्यंत शक्य तितके अंतर पार करण्याचा ड्रायव्हरचा विचार होता. अंधार पडल्यानंतर वाहनांचे दिवे सुरू झाले की ड्रायव्हिंगवर काही मर्यादा येतात, हा त्याचा अनुभव होता. त्यामुळे दिवसाचा उजेड असतानाच तो गाडीचा वेग योग्य मर्यादेत ठेवून पुढे जात होता.

धुक्याच्या हलक्या चादरीत लपेटलेल्या लोणावळा-खंडाळ्याच्या डोंगररांगा हळूहळू मागे सरकत होत्या. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून वाहनांचा अखंड प्रवाह मुंबईच्या दिशेने भरधाव धावत होता. लोनावळा ओलांडताच उंच डोंगरांची रांग विरळ होत गेली आणि महामार्गाच्या दुतर्फा कधी ओसाड माळरान, तर कधी नागरी वसाहतींचे चित्र नजरेस पडू लागले.

सायंकाळ आता रात्रीत रूपांतरित होत होती. रस्त्यावरच्या सर्व वाहनांचे हेडलाईट्स लागले होते. त्यांच्या प्रकाशाच्या लांबच लांब रेषा अंधार चिरत पुढे सरकत होत्या.

त्यांचा ड्रायव्हर तब्बल पंचावन्न वर्षांचा अनुभवी चालक होता. हजारो किलोमीटरचा प्रवास त्याने केला होता. कठीण रस्ते, मुसळधार पाऊस, घाटरस्ते आणि रात्रीचे प्रवास यांचा त्याला मोठा अनुभव होता. तरीही अंधार पडल्यानंतर कितीही अनुभवी चालक असला तरी त्याला अधिक सावध राहावे लागते, हे तो जाणून होता.

रिअर-व्ह्यू मिररमध्ये त्याला मागून येणाऱ्या असंख्य वाहनांचे हेडलाईट्स चमकत असल्याचे दिसत होते. काही दिवे जवळ असल्यासारखे वाटत होते, तर काही दूर. पण अंधारामुळे कोणते वाहन नेमके किती अंतरावर आहे आणि कोणत्या वेगाने येत आहे, याचा अचूक अंदाज बांधणे कठीण होत होते.म्हणूनच त्याने गाडीचा वेग थोडासा कमी केला आणि अधिक नियंत्रित पद्धतीने वाहन चालवू लागला.

ही गोष्ट राघवच्या नजरेतून सुटली नाही.

"आज हा असा सावधपणे गाडी का चालवत आहे?" त्याच्या मनात विचार आला.

गेली अनेक वर्षे तो याच ड्रायव्हरसोबत प्रवास करत होता. वेगवान वाहतुकीतून मार्ग काढणे, अवघड प्रसंगी शांत राहणे आणि आत्मविश्वासाने गाडी चालवणे हे त्याचे नेहमीचे वैशिष्ट्य होते. पण आज मात्र तो काहीसा जपून, प्रत्येक वाहनाचा अंदाज घेत पुढे जात होता.

क्षणभर राघवला त्याचे आश्चर्य वाटले. पण पुढच्याच क्षणी त्याने तो विचार बाजूला सारला.

"कदाचित रात्रीची वाहतूक जास्त असेल..सावध राहणेच योग्य," असे त्याने मनाशी म्हटले.

त्याने ड्रायव्हरकडे पाहून फक्त एवढेच सांगितले,

"घाई नाही. आरामात आणि सुरक्षित गाडी चालव."

ड्रायव्हरने मान हलवली आणि पुन्हा पूर्ण लक्ष रस्त्यावर केंद्रित केले..

निशांतची आई निकिताचा फोटो मोबाईल उघडून हळूच  पाहत होती "मुंबईला पोहोचल्यावर निशांतला अगोदर निकिताचा फोटो दाखवायचा, असे तीने मनोमन ठरवले होते." राघव सुद्धा जान्हवीने काढलेला फोटो पाहून गालातल्या गालात हसत होता.

राघवचा ड्रायव्हर मधल्या लेनमधून अत्यंत सावधपणे आणि नियंत्रित वेगाने गाडी चालवत होता. आजूबाजूने धावणाऱ्या वाहनांच्या हेडलाईट्सचा प्रकाश त्यांच्या गाडीच्या काचा आणि आरशांवर पडत होता. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या त्या प्रकाशछटा जणू एखादा विचित्र नृत्याविष्कार साकारत असल्याचा भास होत होता. जानकी आणि राघव दोघांनाही कधी डुलकी लागली ही त्या दोघांना कळलेच नाही. 

एक रात्र मायेची -

त्याच वेळी, मुंबईत..

निशांत त्या दिवशी नेहमीपेक्षा थोडा लवकर घरी आला होता. जेवणवाल्या मावशीने जेवण बनवून ठेवले होते आणि सव्वासातच्या सुमारास त्या निघून गेल्या होत्या.

घरात तो एकटाच होता.आई-बाबा परत येईपर्यंत वेळ घालवण्यासाठी त्याने टीव्हीवर एक वेब सिरीज लावली. ती संपेपर्यंत आई-बाबा घरी पोहोचतील, असा त्याचा अंदाज होता.

निशांत टीव्हीवर वेब सिरीज पाहण्यात पूर्णपणे दंग झाला होता. काही वेळापूर्वीच जेवण बनवणाऱ्या मावशी घरी गेल्या होत्या. घाईत जाताना मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद झाला नव्हता. तो किंचितसा उघडाच राहिला होता.

साधारण आठच्या सुमारास निशांतचे लक्ष अचानक दरवाज्याकडे गेले.उघड्या फटीतून धुक्यासारखे दोन पांढुरके लोट हळूहळू घरात शिरताना त्याला दिसले. काही क्षण ते हवेत तरंगल्यासारखे वाटले आणि मग घरभर हलकेसे पसरले.

क्षणभर तो चकित होऊन त्या दिशेने पाहत राहिला.

"हे काय विचित्र आहे?" त्याच्या मनात विचार आला.

तो उठून दरवाजापाशी गेला आणि दरवाजा व्यवस्थित बंद करून घेतला. मग त्याने आजूबाजूला नजर फिरवली.

"पावसाळाही नाही.. खाली कोणी कचरा किंवा लाकूड जाळत असावे का?"

असा विचार करत तो थेट स्वयंपाकघरात गेला. कदाचित मावशी काहीतरी गॅसवर ठेवून गेल्या असतील, अशी शंकाही त्याच्या मनात आली.

पण स्वयंपाकघरात सर्व काही व्यवस्थित होते. गॅस बंद होता. कुठेही धूर नव्हता.

आता मात्र त्याला थोडेसे आश्चर्य वाटू लागले.

वेब सिरीज पाहताना त्याने हॉलमधील मुख्य दिवे बंद ठेवले होते. त्याने उठून सर्व दिवे लावले. उजेड पडताच घर पुन्हा नेहमीसारखे वाटू लागले.

"बहुतेक माझाच भास झाला असेल," तो स्वतःशीच पुटपुटला.

तरीही मनातील हलकीशी अस्वस्थता पूर्णपणे गेली नव्हती.

तो पुन्हा सोफ्यावर येऊन बसला आणि टीव्हीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करू लागला..

 इतक्यात घरातील शांतता भंग करत दरवाजाची बेल वाजली.

"टिंssग... टाँssग..."

बेल वाजवण्याची ती विशिष्ट लकब निशांतला चांगलीच परिचित होती.

"आईच आहे.." त्याच्या मनात विचार चमकून गेला.

त्याने घड्याळाकडे पाहिले.

नुकतेच आठ वाजून गेले होते.

"एवढ्या लवकर? आई तर दुपारी म्हणाली होती की नऊ-साडेनऊच्या आधी पोहोचणे कठीण आहे."

क्षणभर त्याला आश्चर्य वाटले.

"बहुतेक लग्नातून लवकर निघाले असतील," असे म्हणून तो उठला.

सवयीप्रमाणे त्याने आधी पीहोलमधून बाहेर पाहिले.

दरवाजा बाहेर आई आणि बाबा उभे होते.

त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

"वा! आज तर विक्रमच केलात," असे म्हणत त्याने दार उघडले.

पण पुढच्याच क्षणी त्याला काहीतरी वेगळे जाणवले.

प्रवासावरून परतल्यावर नेहमी हसतमुख दिसणारे आई-बाबा आज शांत आणि गंभीर वाटत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच छटा होती.

"मुलगी आवडली नसावी बहुतेक.." असा विचार त्याच्या मनात आला.

"काय हो, एवढे उदास का दिसताय तुम्ही?" तो हसतच म्हणाला.

पण त्यांनी उत्तर दिले नाही.

दोघांनी पुढे येऊन त्याला प्रेमाने मिठी मारली.

ती मिठी नेहमीपेक्षा थोडी जास्त घट्ट होती.

क्षणभर निशांतला काहीतरी विचित्र जाणवले. पण पुढच्याच क्षणी त्याने तो विचार झटकून टाकला.

"अहो, आधी आत तर या," तो म्हणाला.

दोघेही शांतपणे घरात आले.

निशांतच्या नजरेतून एक गोष्ट मात्र सुटली नाही.

घरात प्रवेश केल्यानंतर नेहमीप्रमाणे देवघरासमोर थांबून नमस्कार करण्याऐवजी ते थेट आत चालत गेले.

क्षणभर त्याला ते विचित्र वाटले.

 दिवसभराचा प्रवासाचा थकवा असेल, असे समजून त्याने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही.

आई-बाबा हळूहळू त्यांच्या खोलीच्या दिशेने निघाले..

आणि घरात एक अनाकलनीय शांतता पसरली.

निशांतला वाटले होते की नेहमीप्रमाणे आता जेवताना गप्पा रंगतील. लग्नात काय झाले, नातेवाईक कोण भेटले, निकिता कशी आहे, तिला मी आवडलो का ? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आलेत.

मात्र आई-बाबा आज वेगळेच वागत होते.

"निशांत," राघव शांतपणे म्हणाला, "आज आम्ही खूप दमलो आहोत. लग्नातही भरपूर जेवण झाले. त्यामुळे आता आम्हाला काही भूक नाही. तू जेवून घे."

जानकीने त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला.

"हो रे बाळा. तू जेव. नंतर आपण थोड्या गप्पा मारू."

क्षणभर थांबून ती म्हणाली,

"आपल्या शेवटच्या गप्पा.."

हे शब्द ऐकताच निशांत दचकला.

"आई!" तो जवळजवळ ओरडलाच. "हे काय बोलतेस तू? शेवटच्या गप्पा म्हणजे काय? आधी नीट सांग."

त्याच्या चेहऱ्यावरची घाबरलेली भावना पाहून जानकीच्या ओठांवर हलकेसे हसू उमटले.

"अरे वेड्या, इतका घाबरतोस कशाला? माझा अर्थ वेगळाच होता."

"कसा ?"

"अरे, आता तुझे लग्न होईल. मग संसार, जबाबदाऱ्या, मुलं..मग तुझ सगळं सुरू होईल. आज जसा तू रोज आमच्यासोबत निवांत बसतोस, गप्पा मारतोस, तसा वेळ लग्नानंतर तुला मिळेलच असे नाही ना, म्हणून म्हटलं.लग्नानंतर मुलं संसारात रमतात."

तिचे बोलणे ऐकताच निशांतच्या जीवात जीव आला.

"आई, कधी कधी तू खरंच घाबरवतेस," तो हसत म्हणाला.

थोड्याच वेळात तो जेवायला बसला.

जानकीने स्वतः त्याला वाढले. इतकेच नव्हे तर लहानपणी जसे भरवायची तसे तिने प्रेमाने दोन घास स्वतःच्या हाताने त्याच्या तोंडात घातले.

"बरं का,आई, मी आता लहान राहिलेलो नाही " तो हसत म्हणाला.

पण जानकी काही बोलली नाही.

ती फक्त त्याच्याकडे पाहून हसली.

राघव आणि जानकी दोघेही त्याच्या शेजारी बसले होते. तो जेवत असताना त्यांची नजर सतत त्याच्यावरच खिळलेली होती.

क्षणोक्षणी त्याला त्यांचे वागणे थोडेसे वेगळे वाटत होते.

जणू ते त्याला डोळ्यांत साठवून घेत होते..

जेवण संपल्यानंतर तिघेही हॉलमध्ये बसले.

राघव लग्नातील गमतीजमती, नातेवाईकांच्या भेटीगाठी आणि प्रवासातील अनुभव सांगत होता. निशांतही उत्सुकतेने सर्व ऐकत होता.

"परत येताना एक्सप्रेसवे वर आम्हां दोघांना इतकी शांत झोप लागली की इथे येईपर्यंत आम्हाला काहीच कळले नाही”

इतक्यात त्याला जोराचा ठसका लागला.

त्याने समोरचा पाण्याचा ग्लास उचलला परंतु पाणी न पिता तो ग्लास तसाच त्याने खाली ठेवला

"अहो, सावकाश," जानकी म्हणाली.

राघवने मान हलवली.

पण त्या घटनेबद्दलचे त्याचे बोलणे तिथेच थांबले.

पुढे विषय निघालाच नाही.

जानकीने लगेच निकिताचा विषय काढला. तिचे कौतुक, लग्नातील गंमतीजमती, नातेवाईकांच्या प्रतिक्रिया आणि भविष्यातील योजना सांगण्यात ती रमून गेली.

वेळ कसा गेला ते कोणालाच कळले नाही.

रात्र बरीच झाली होती.

"चल, आता झोप," जानकीने प्रेमाने सांगितले.

निशांत उठला आणि आपल्या खोलीकडे निघाला.

त्याच्या मागोमाग जानकीही आत आली.

लहानपणापासूनची तिची एक सवय अजूनही कायम होती. निशांत कितीही मोठा झाला तरी अधूनमधून त्याच्या डोक्याला तेल लावणे किंवा केसांतून हात फिरवणे ती सोडत नसे.

त्या रात्रीही तिने कपाटातून सुवासिक तेलाची छोटी बाटली काढली आणि त्याच्या डोक्याला हलकेच तेल चोळू लागली.

"आई, मी आता लहान मुलगा नाही," निशांत हसत म्हणाला.

"माझ्यासाठी तर तू कायम लहानच राहशील," ती सुद्धा हसत म्हणाली.

काही वेळ ती तशीच त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली.

निशांतने हसत तिच्याकडे पाहिले.

निशांत आईच्या मायेने सुखावला होता.

त्याला फक्त एवढेच जाणवले की आज आईच्या हातात नेहमीपेक्षा जास्त ताकद होती.

"लग्नाचे जेवण चांगले झाले असणार," तो मनातल्या मनात हसला.

जानकीने खोलीतील दिवा बंद केला आणि काही मिनिटांतच निशांत गाढ झोपी गेला.

त्या रात्री झोपण्यापूर्वी निशांतने कधी नव्हे ते मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला होता. वेब सिरीज, दिवसभराचा थकवा आणि आईने केलेली डोक्याची मालिश यामुळे त्याला गाढ झोप लागली होती.

  दुसऱ्या दिवशीची सकाळ..

सकाळी साधारण सहाच्या सुमारास दरवाजाची बेल सतत वाजत होती.

"टिंssग टाँssग... टिंsssग टाँsssग..."

बेलचा आवाज थांबतच नव्हता.

अर्धवट झोपेतच निशांत चिडला.

"आई-बाबा उठत का नाहीयेत? एवढ्या सकाळी दार कोण वाजवत असेल?"

घरात सकाळी दार उघडण्याची जबाबदारी त्याच्यावर क्वचितच येत असे. बहुतेक वेळा आई किंवा बाबा आधीच जागे असत.

त्रागा करत तो उठला.

आई-बाबांच्या खोलीकडे त्याची सहज नजर गेली.

दार बंद होते.

"काल खूप दमले असतील. अजून झोपले असतील," त्याने मनाशी म्हटले.

बेल मात्र अजूनही वाजत होती.

तो दरवाजापाशी गेला आणि सवयीने पी होलमधून बाहेर पाहिले.

बाहेर शेजारचे काका आणि काकू उभे होते.

त्यांच्या मागे दोन पोलीस हवालदार उभे होते.

क्षणभर निशांतच्या कपाळावर आठ्या पडल्या.

"सकाळी सकाळी पोलीस?"

"काकांच्या घरी काही चोरीबिरी झाली की काय?"

त्याला काहीच समजेना.

त्याने दरवाजा उघडला.

काका आणि काकू एक शब्दही न बोलता सरळ घरात आले.

हे पाहून तो अधिकच गोंधळला.

"हे दोघे असे थेट घरात कसे आले? काही गंभीर प्रकार आहे का?"

त्याच्या मनात एकामागून एक प्रश्न निर्माण होत होते.

काकांनी पुढे होऊन त्याचा हात धरला.

"ये.. इथे बस आधी," त्यांनी हलक्या आवाजात म्हटले.

निशांत, अजूनही काही समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.

"काय झालं काका?" त्याने विचारले.

काकांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्याच्या मनात नकळत भीतीची एक लहर उमटली.

"अरे, खूप वेळ पोलिस तुमची बेल वाजवत होते. तू दार उघडत नव्हतास म्हणून त्यांनी आम्हाला उठवले म्हणून आम्ही त्यांना घेऊन आलो आहोत.."

तेवढ्यात त्यांच्या मागोमाग दोन्ही हवालदारांनीही घरात प्रवेश केला.

घरातील वातावरण अचानक गंभीर झाले.

काकांनी थरथरत्या आवाजात बोलायला सुरुवात केली.

"निशांत.. धीर धर बाळा."

त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.

"काल संध्याकाळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तुमच्या आई-बाबांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. त्यात जानकी वहिनी, राघव आणि ड्रायव्हर.. तिघेही जागीच गेले." आणि ते शांत राहिले.

हायवे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते दोन पोलिस हवालदार निशांतला आता सर्व घटनाक्रम समजावून सांगू लागले..

"तुमचे आई-वडील काल संध्याकाळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून मुंबईच्या दिशेने येत होते. त्याच वेळी पुण्याच्या दिशेने जाणारी एक कार विहित वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावत होती. कारमध्ये एक तरुण आणि त्याची वाग्दत्त वधू प्रवास करत होते.

अचानक त्या कारचे नियंत्रण सुटले. कारने दुभाजक ओलांडला आणि झुडपे उखडत ती पलट्या मारत विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर आली

धोका ओळखताच तुमच्या ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा उद्देश समोरून येणाऱ्या त्या कारपासून बचाव करणे हाच होता.

मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते.

गाडीचा ताबा सुटला. तुमच्या आई-वडिलांची कार दुभाजकावर आदळली आणि पलटी मारत त्या दुसऱ्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर गेली. त्याच क्षणी त्या लेनमधून येणाऱ्या एका जड वाहनाने तिला जोरदार धडक दिली.

काही क्षणांत सर्व काही संपले.

संध्याकाळी साधारण पावणे आठच्या सुमारास झालेल्या त्या अपघातात राघवजी, जानकीताई आणि ड्रायव्हर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांची कोणतीही चूक नव्हती. दुसऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला.

मात्र तुमच्या ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे त्या तरुण जोडप्याचे मात्र प्राण वाचले.” हा वृत्तांत सांगताना पोलिस सुद्धा भावुक झाले होते.

 निशांतने भीतीने मोठा श्वास घेतला आणि अविश्वासाने तो त्यांच्याकडे पाहत राहिला.

मग अचानक त्याच्या चेहऱ्यावर राग उमटला.तो त्या दोन्ही पोलिसांना म्हणाला 

"काका, काय बोलताय तुम्ही?" तो जवळजवळ ओरडलाच.

"सकाळी-सकाळी अशा कसल्या बातम्या घेऊन आलात तुम्ही ? कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल तुम्हाला.नीट माहिती करा."

तो थरथरत उभा राहिला.

"माझे आई-बाबा कालच रात्री आठच्या सुमारास घरी आले आहेत. त्यांच्या सोबत मी जेवलो. त्यांच्याशी मी बराच वेळ गप्पा मारल्या. आईने झोपताना माझ्या डोक्याला तेल लावलं, प्रवासाने दमले आहेत म्हणून बहुदा ते गार झोपले असावेत. नाहीतर बेल वाजल्यावर तेच उठतात. "

आता त्याचा आवाज थरथरू लागला होता.

हॉलमध्ये क्षणभर स्मशानशांतता पसरली.

काका, काकू आणि दोन्ही हवालदार एकमेकांकडे पाहू लागले.

निशांतने कोणाचेही काही न ऐकता आई-बाबांच्या खोलीकडे तडक धाव घेतली.

त्याने दरवाज्याचे हँडल पकडले.

त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती.

क्षणभर त्याला वाटले, दार उघडेल आणि आई नेहमीप्रमाणे म्हणेल,

"काय रे, एवढ्या सकाळी आरडाओरडा कशाला करतोस?"

पण..

दार हलक्या धक्क्यानेच उघडले.

खोलीत कोणीच नव्हते.

बेड नीटनेटका होता.खिडक्या बंद होत्या.

उशीवर डोक्यांचे ठसे सुद्धा नव्हते.

रात्री कोणी झोपल्याची एकही खूण नव्हती.

निशांत काही क्षण जागच्या जागी थबकलाच.

त्याच्या डोळ्यांसमोर काल रात्रीचे सर्व प्रसंग भराभर फिरू लागले..

आईची मिठी..

बाबांचे बोलणे...

निकिताबद्दलच्या गप्पा..

डोक्याला केलेली मालिश..

"शेवटच्या गप्पा.."

अचानक त्याच्या तोंडून एक हृदय पिळवटून टाकणारी किंकाळी बाहेर पडली.

"आईऽऽऽ..!"

"बाबाऽऽऽ..!"

म्हणत त्याने जोराचा हंबरठा फोडला.

त्याचा तो आक्रोश संपूर्ण इमारतीत घुमला.

एकामागोमाग एक घरांची दारे उघडू लागली.

गाढ झोपेत असलेली इमारत क्षणात जागी झाली.

तो कोसळण्याच्या बेतात असताना, त्याला दोन पोलिसांनी अलगद सावरले. 

अडखळत आणि रडत रडत निशांत आपल्या खोलीत गेला.

उशीवर डोके ठेवताच त्याला काल रात्री आईने लावलेल्या तेलाचा मंद सुगंध पुन्हा जाणवला.

आठवणीने त्याने गच्च डोळे मिटून घेतले आणि अश्रूंना वाट केली.

आईचा हात अजूनही केसांवरून फिरत असल्याचा भास त्याला झाला.

बाहेर सूर्य उगवत  होता,नव्या दिवसाची सुरुवात होत होती. पण निशांतच्या आयुष्यातील मायेची सावली कायमची हरपली होती.त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय कायमचा संपला होता."त्याच्या मनात मात्र आयुष्यभर एकच प्रश्न घोळत राहिल - त्या भविष्य सूचनेचा आणि या घटनेचा काही संबंध होता का, की तो केवळ योगायोग होता?"

                                                          समाप्त.🖋️📖📚

🖋️ लेखकाची टीप :-

मृत्यूनंतर प्रिय व्यक्ती आपल्या आप्तांना भेटण्यासाठी येते, अशी कल्पना अनेक संस्कृतींतील लोककथा, साहित्य आणि चित्रपटांमध्ये विविध स्वरूपात आढळते. या कथेतील मांडणी मात्र स्वतंत्र असून ती मानवी भावना, आई-वडिलांचे अपार प्रेम आणि काही ऐकीव अनुभवांपासून प्रेरित साहित्यिक स्वरूपात साकारण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणत्याही अलौकिक दाव्याला पुष्टी देणे नसून, मुलावरील आई-वडिलांच्या निस्सीम प्रेमाची भावनिक अनुभूती व्यक्त करणे हा आहे.

वैधानिक सूचना / Disclaimer :

ही कथा केवळ साहित्यिक आणि मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिण्यात आली आहे. कथेमधील अलौकिक अनुभव, श्रद्धा किंवा प्रसंग हे लेखकाचे वस्तुनिष्ठ किंवा वैज्ञानिक दावे नसून, कथानकाच्या गरजेनुसार सादर केलेले साहित्यिक चित्रण आहे.कथेतील राशीभविष्याचा उल्लेख हा कथानकाचा एक भाग असून त्याद्वारे ज्योतिषशास्त्र किंवा भविष्यकथनाची सत्यता सिद्ध करण्याचा कोणताही हेतू नाही.

   आई-वडिलांच्या प्रेमाची ही कथा तुमच्या मनालाही स्पर्श करून गेली असेल, तर तुमचे मत कमेंटमध्ये जरूर लिहा.
  अशाच रहस्यमय, हृदयस्पर्शी आणि दर्जेदार मराठी कथा वाचण्यासाठी "शब्दांची मुशाफिरी" ला नियमित भेट देत राहा.
धन्यवाद! 🙏

🔗चुकीच्या वाटेवरचं पहिलं पाऊल| झटपट पैशाचा मोह, गुन्हेगारी आणि दुसऱ्या संधीची मराठी कथा..👉

क्षणिक मोह, चुकीचा निर्णय आणि आयुष्याला मिळालेली दुसरी संधी..
झटपट पैसा कमावण्याच्या मोहाने सात तरुणांनी उचललेले एक चुकीचे पाऊल त्यांना गुन्हेगारीच्या उंबरठ्यावर घेऊन गेले. पुढे काय घडले? पुढे वाचा त्या घटनेचा थरारक प्रवास..

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.
💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा. 👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा. 🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com
तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा. धन्यवाद! 🙏
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)
SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो






📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook

📌 Pinterest वर फॉलो करा





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...