मुख्य सामग्रीवर वगळा

संशय : एक धोकादायक प्रवास | मानवी मन आणि चुकीच्या निर्णयांची किंमत | ३ हृदयस्पर्शी लघुकथा

 अस्वीकरण (Disclaimer):

या लेखातील काही घटना लेखकाने प्रत्यक्ष अनुभवलेल्या, ऐकलेल्या किंवा निरीक्षणांतून समोर आलेल्या आहेत. व्यक्तींची नावे, स्थळे किंवा काही ओळख पटविणारे तपशील गोपनीयता जपण्यासाठी आवश्यकतेनुसार बदललेले असू शकतात.
या लेखाचा उद्देश कोणत्याही व्यक्ती, समाज, व्यवसाय, संस्था किंवा समुदायाची बदनामी करणे नसून, "संशय" या मानवी मनोवृत्तीचे विविध पैलू आणि त्याचे परिणाम यांवर चिंतन करणे हा आहे.लेखातील मते, निरीक्षणे आणि निष्कर्ष हे लेखकाचे वैयक्तिक अनुभव व आकलन यांवर आधारित आहेत. वाचकांनी त्यांचा स्वीकार विवेकबुद्धीने करावा.


संशय : एक धोकादायक प्रवास | मानवी मन आणि चुकीच्या निर्णयांची किंमत ( 3 लघुकथा )


संशय : एक धोकादायक प्रवास | मानवी मन आणि चुकीच्या निर्णयांची किंमत | ३ हृदयस्पर्शी लघुकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी

मनातल्या एका प्रश्नाने, संशयाचे रूप घेतले,

विश्वासाच्या मंदिराला, आतूनच तडे गेले.

सत्य उशिरा समोर आले, पश्चात्ताप मात्र खास,

म्हणूनच म्हणतो मित्रा, संशय हा धोकादायक प्रवास.


     🔗 भुssभू, चावे आणि टोळीयुद्ध : कुत्र्यांविषयीचे माझे अनुभवविश्व |भटके कुत्रे, रेबीज आणि निष्ठेच्या कथा

 
    कुत्रा हा माणसाचा सर्वात विश्वासू मित्र मानला जातो. पण कुत्र्यांविषयीचे अनुभव नेहमीच गोड आणि सुखद असतात का? बालपणीच्या आठवणी, मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे टोळीयुद्ध, कुत्र्याचा चावा, रेबीजची भीती, श्वानप्रेमींचे अनुभव आणि निष्ठेच्या भावनिक कथा अशा अनेक पैलूंना स्पर्श करणारा हा अनुभवप्रधान लेख. कुत्र्यांविषयीचे माझे काही विनोदी, काही थरारक तर काही विचार करायला लावणारे अनुभव जाणून घ्या..


संशय : एक धोकादायक प्रवास | मानवी मन आणि चुकीच्या निर्णयांची किंमत ( 3 लघुकथा )

  संशय हा माणसाला सावध करणारा गुण असला तरी तो विवेकावर मात करू लागला की विनाशाला कारणीभूत ठरतो. प्रत्यक्ष घडलेल्या तीन हृदयद्रावक घटनांमधून संशय, विश्वास आणि मानवी मनाचा धोकादायक प्रवास उलगडणारा विचारप्रवर्तक लेख आणि 3 लघु कथा..

संशय हा मानवी मनाचा स्वाभाविक भाग आहे, पण जेव्हा तो विश्वासावर मात करतो, तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत भयंकर ठरू शकतात. या लेखात आणि तीन हृदयस्पर्शी लघुकथांमधून संशयामुळे उद्ध्वस्त झालेली नाती, चुकीचे निर्णय आणि त्यांची मोठी किंमत उलगडली आहे. मानवी मनाचे गुंतागुंतीचे पैलू समजून घेण्यासाठी आणि विश्वासाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी हा विचारप्रवर्तक मराठी लेख नक्की वाचा.

संशय हा प्रामुख्याने मानवी मनाचा गुणधर्म आहे. तो सुरुवातीला अतिशय छोटा असतो. मनाच्या एखाद्या कोपऱ्यात क्षणभर डोकावून पाहतो. "असे का झाले असेल?", "त्याने तसे का बोलले असेल?", "ती गोष्ट माझ्यापासून का लपवली असेल?" अशा साध्या प्रश्नांच्या रूपाने त्याचा जन्म होतो. परंतु त्या प्रश्नांना वेळेवर योग्य उत्तरे मिळाली नाहीत, तर तो वाढू लागतो. एकदा का संशयाने मनात घर केले, की तो केवळ विचारांवरच नव्हे तर नातेसंबंधांवरही परिणाम करू लागतो.

बहुतेक वेळा संशय हा आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती, वस्तू किंवा नाते हातातून निसटून जाऊ नये या भीतीतून जन्म घेतो. कधी तो असुरक्षिततेतून निर्माण होतो, तर कधी एखाद्या व्यक्ती किंवा गोष्टीवर आपला हक्क अथवा मालकी असल्याच्या भावनेतून. त्यामुळे संशय हा केवळ एक विचार राहत नाही. तो हळूहळू विश्वासाला पोखरणारा आणि नात्यांच्या पाया कमकुवत करणारा घटक बनतो.

संशय हा माणसाचा शत्रू आहे की मित्र, याचे उत्तर सरळ देता येत नाही. काही प्रसंगी संशय हे एक उपयुक्त साधन ठरते. संशयामुळेच अनेक फसवणुका उघडकीस आल्या आहेत, अनेक गुन्ह्यांचा तपास लागला आहे आणि अनेक वैज्ञानिक शोधांचाही जन्म "हे खरे आहे का?" या प्रश्नातून झाला आहे. त्यामुळे प्रत्येक संशय वाईट असतो, असे म्हणणे योग्य ठरणार नाही.

मात्र संशयाचे एक दुसरे स्वरूपही असते. त्या वेळी त्याचा उद्देश सत्याचा शोध घेणे नसतो, तर स्वतःच्या कल्पनांना सत्य मानण्याचा असतो. आणि याच रूपात तो सर्वाधिक धोकादायक बनतो. विशेषतः जवळच्या नात्यांमध्ये हे स्वरूप अधिक आढळून येते. पती-पत्नी, मित्र, भावंडे किंवा सहकारी यांच्यातील अनेक तणावांचे मूळ प्रत्यक्ष घटनांपेक्षा संशयातच असते.

संशय हा प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी-अधिक प्रमाणात असतोच. आजूबाजूला एखादी अनुचित घटना घडली, एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे झाली नाही किंवा वर्तनात अचानक बदल दिसला की मनातील संशय जागा होतो. सुरुवातीला तो केवळ एक प्रश्न असतो; परंतु त्याला योग्य दिशा मिळाली नाही तर तो हळूहळू मनावर ताबा मिळवू लागतो.

काही लोकांच्या स्वभावात संशयाचे प्रमाण अधिक असते. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. कधी पूर्वी झालेली फसवणूक, कधी असुरक्षिततेची भावना, कधी आत्मविश्वासाचा अभाव, तर कधी सतत नकारात्मक विचार करण्याची सवय. जखम भरून आली तरी तिचा व्रण कायम राहतो. त्याचप्रमाणे फसवणुकीच्या अनुभवांमुळे काही लोक प्रत्येक व्यक्तीकडे आणि प्रत्येक परिस्थितीकडे संशयाच्या नजरेने पाहू लागतात.

याहूनही दुर्दैवी बाब म्हणजे संशयाचा बळी ठरणारी व्यक्ती अनेकदा स्वतःची निर्दोषता सिद्ध करू शकत नाही. कारण तिला एखादा गुन्हा केलेला नसतो, तर केवळ दुसऱ्याच्या मनात निर्माण झालेल्या शंकेचा सामना करायचा असतो. अशा वेळी नात्यातील विश्वास हळूहळू ढासळू लागतो आणि संशयाने निर्माण केलेली दरी दिवसेंदिवस वाढत जाते.

आजच्या काळात केवळ संशयापेक्षा विवेकाची गरज अधिक आहे. संशयाला पूर्णपणे नाकारता येणार नाही, कारण तो माणसाला सावध राहायला शिकवतो. परंतु त्याला मनाचा मालक बनू देता कामा नये. तो सल्लागार असावा, न्यायाधीश नव्हे.

संशय जेव्हा प्रेम, मैत्री किंवा कौटुंबिक नात्यांच्या आड येतो, तेव्हा अनेक संसार विस्कळीत होतात. अनेक प्रेमबंध तडतड तुटू लागतात. विश्वासाची जागा संशय घेतो आणि नात्यांची उब हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे एखादा संशय खरा ठरला, तरी भावनेच्या भरात स्वतःच न्यायाधीश बनून निर्णय देऊ नये. परिस्थितीचे भान ठेवून, विवेकाने विचार करून आणि आवश्यक असल्यास शांतपणे त्या नात्यातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारावा.

संशयावर आधारित असंख्य घटना समाजात घडलेल्या आहेत आणि आजही घडत आहेत. त्यामुळे पुढे कथन केलेल्या घटना कदाचित पूर्णपणे नवीन वाटणार नाहीत. मात्र त्या कल्पनेतून नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभव, निरीक्षणे आणि वास्तवातून समोर आलेल्या आहेत. म्हणूनच त्या केवळ कथा नसून मानवी मनाच्या एका गुंतागुंतीच्या प्रवृत्तीचे प्रतिबिंब आहेत.


अ)संशयाची शोकांतिका


ही घटना १९९० च्या सुमारास घडलेली आहे.मुंबईतील दीर्घकाळ चाललेल्या गिरणी संपामुळे अनेक कुटुंबे देशोधडीला लागली होती. अशाच एका गिरणी कामगाराच्या कुटुंबालाही उदरनिर्वाहासाठी आपले गाव गाठावे लागले. कुटुंब गावाकडे निघाले खरे, पण त्यांचा मुलगा राजू मात्र मुंबईतच राहिला. त्याला एका हिरे व्यापाऱ्याकडे काम मिळाले होते.

सुवर्ण आणि हिरे व्यवसायात विश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व असते. या व्यवसायात कामगारांची निवड केवळ कौशल्यावर होत नाही; त्यासाठी प्रामाणिकपणा आणि खात्रीशीर पार्श्वभूमीही तितकीच आवश्यक असते. गिरणी कामगाराचे कुटुंब त्या हिरे व्यापाऱ्याच्या परिचयातील होते. इतकेच नव्हे, तर गावाकडे जाताना त्यांनी आपली राहती खोलीही त्याच व्यापाऱ्याला विकली होती. त्या विक्रीतून मिळालेल्या पैशांवरच त्यांचा पुढील उदरनिर्वाह अवलंबून होता.

तो हिरे व्यापारी, विश्वनाथ शेठ, स्वतःही शून्यातून उभा राहिलेला माणूस होता. अथक परिश्रम आणि व्यावसायिक चातुर्य यांच्या जोरावर त्याने आपले साम्राज्य उभे केले होते. परंतु या प्रवासात त्याच्या स्वभावात एक दोषही घट्ट रुजला होता.संशय.

विश्वनाथ शेठला आपल्या कोणत्याच कामगारावर पूर्ण विश्वास नव्हता. प्रत्येकाकडे तो संशयाच्या नजरेने पाहत असे. त्याच्या मते माणूस कितीही प्रामाणिक वाटला तरी संधी मिळाल्यावर तो चुकीचे पाऊल उचलू शकतो.

राजू मात्र याला अपवाद वाटावा असा मुलगा होता. मेहनती, आज्ञाधारक आणि प्रामाणिक. कामात तो कधी कसूर करत नसे. तरीसुद्धा विश्वनाथ शेठच्या मनातील संशयाची सावली त्याच्यावरून दूर होत नव्हती. राजूने विश्वास संपादन करण्यासाठी कितीही प्रयत्न केले, तरी शेठच्या मनात त्याच्याबद्दल एक अनामिक शंका कायम घर करून बसली होती.

त्या दिवशी विश्वनाथ शेठ जव्हेरी बाजारातून काही हिरे घेऊन आला होता. त्या हिऱ्यांची किंमत तब्बल पंचेचाळीस लाख रुपये होती. नेहमीप्रमाणे ते तिजोरीत ठेवण्याऐवजी घाईगडबडीत त्याने ते आपल्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवले. थोड्याच वेळात सुरू असलेली कामे पूर्ण झाल्यावर ते संबंधित कारागिरांकडे पैलू पाडण्यासाठी द्यायचे, असा त्याचा विचार होता.

कारखान्यात त्या वेळी तीन कारागीर काम करत होते. त्यांच्या हातातील जॉबवर्क संपल्यानंतर हे नवीन हिरे त्यांच्याकडे सोपवायचे होते. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते.

अचानक काही महत्त्वाचे काम निघाल्याने विश्वनाथ शेठला पुन्हा तातडीने जव्हेरी बाजारात जावे लागले. कामाच्या घाईत त्याच्या डोक्यातून ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या पंचेचाळीस लाखांच्या हिऱ्यांचा विषय पूर्णपणे निसटून गेला. तो घाईघाईने स्कूटरवर बसला आणि जव्हेरी बाजाराच्या दिशेने निघून गेला.

दरम्यान, कारखान्यातील काम सुरूच होते. संध्याकाळ झाली. दोन कारागीर आपले काम संपवून घरी निघून गेले. मात्र राजू काही काम पूर्ण करण्यासाठी कारखान्यात थांबला होता.

रात्र बरीच झाल्यावर विश्वनाथ शेठ परतला. जव्हेरी बाजारातून आणलेले नवीन हिरे आणि दुपारी आणलेले पंचेचाळीस लाखांचे हिरे सुरक्षित ठेवावेत म्हणून त्याने टेबलाचा ड्रॉवर उघडला.

ड्रॉवर उघडताच त्याच्या छातीत धस्स झाले.नवीन आणलेले हिरे त्याला दिसले, पण दुपारी ठेवलेले पंचेचाळीस लाख रुपये किमतीचे हिरे मात्र गायब होते.

क्षणभर त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्याने पुन्हा ड्रॉवर तपासला. कागदपत्रे हलवून पाहिली. आसपास शोधले. पण हिरे कुठेच दिसत नव्हते.आणि त्याच क्षणी त्याच्या मनातील जुना, सुप्त संशय जागा झाला.कारखान्यात त्या वेळी फक्त राजूच उपस्थित होता.

ड्रॉवरमधून पंचेचाळीस लाखांचे हिरे गायब असल्याचे पाहताच विश्वनाथ शेठच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचे हातपाय लटपटू लागले. कपाळावर घामाच्या धारा फुटल्या. धडधडत्या हृदयाने त्याने राजूकडे पाहिले.

“अरे राजू, दुपारी आणलेले हिरे कुठे आहेत? घेतले असशील तर शांतपणे परत दे. मी काही बोलणार नाही.”

हे शब्द ऐकताच राजू मनोमन हादरला.

‘घेतले असतील तर परत दे म्हणजे काय? शेठ माझ्यावर चोरीचा संशय घेत आहेत का?’ त्याच्या मनात विचार चमकून गेला.

“शेठ, कोणते हिरे? कधी आणलेत तुम्ही? मला काहीच माहिती नाही,” तो घाबरत म्हणाला.

“माझ्याशी शहाणपणा करू नकोस,” विश्वनाथ शेठचा आवाज आता कठोर झाला होता. “कारखान्यात तू एकटाच होतास. बऱ्या बोलाने हिरे परत दे.”

राजू पुन्हा पुन्हा आपली निर्दोषता सांगत होता. पण विश्वनाथ शेठच्या मनावर संशयाने इतका ताबा मिळवला होता की त्याला राजूच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याची क्षमता उरली नव्हती. त्याच्या दृष्टीने संशय आता सत्य बनला होता.

राग, भीती आणि हिरे गमावल्याची घालमेल यांच्या भरात त्याने एक भयंकर निर्णय घेतला.

त्याने राजूला कारखान्यातच डांबून ठेवले. घरी जाऊन मुलाला बोलावून आणले. दोघांनी मिळून राजूचे हातपाय बांधले आणि त्याच्या तोंडात बोळा कोंबला. त्यानंतर कारखान्याचे दरवाजे आणि खिडक्या बंद करून ते निघून गेले.

राजू रात्रभर सुटकेसाठी झगडत राहिला. बांधलेल्या हातपायांनी स्वतःची मुक्तता करण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. पण भूक, तहान, भीती आणि श्वास घेण्यातील अडथळा यांमुळे त्याची शक्ती हळूहळू क्षीण होत गेली.

पहाट जवळ येत असताना त्याची झुंज थांबली.

ज्याने चोरी केली नव्हती, ज्याचा गुन्हा फक्त संशयाच्या भोवऱ्यात अडकणे इतकाच होता, त्या राजूने त्या बंद कारखान्यात अखेरचा श्वास घेतला.त्या रात्री एका मुलाचा मृत्यू झाला नव्हता.संशयाने विवेकावर मिळवलेल्या विजयाची किंमत एका निरपराध जीवाने चुकवली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे दोघे कारागीर कामावर आले. विश्वनाथ शेठने कारखान्याचा दरवाजा उघडला. आत राजू निपचित पडलेला दिसला.शेठला वाटले, रात्रभर ओरडून-आक्रोश करून तो दमला असावा आणि आता गाढ झोपला असावा. त्याने दोन्ही कामगारांना राजूला उठवायला सांगितले. त्यांनी त्याला हाका मारल्या, खांदे हलवले; पण राजूने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

“तोंडावर पाणी मारा त्याच्या,” शेठने चिडून आदेश दिला.

एका कामगाराने त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले. तरीही काहीच हालचाल झाली नाही. आता मात्र सर्वांच्या मनात भीतीची पाल चुकचुकली.

विश्वनाथ शेठने घाईघाईने त्याचे हातपाय सोडण्यास आणि तोंडात कोंबलेला बोळा काढण्यास सांगितले. हातपाय मोकळे होताच राजूचे शरीर निर्जीव ओंडक्यासारखे एका बाजूला कलंडले.

तो क्षण पाहताच विश्वनाथ शेठच्या पायाखालची जमीन सरकली.

छातीत कळ आल्यासारखा तो खाली बसला. चेहऱ्याचा रंग उडाला. डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली.

विश्वनाथ शेठने त्याच्या मुलाला तातडीने बोलावण्यासाठी माणूस पाठविला. तोपर्यंत कारखान्याबाहेर चाळीतील रहिवाशांची गर्दी जमू लागली होती. स्थानिक डॉक्टरांना तात्काळ बोलावण्यात आले. त्यांनी तपासणी करून राजू मृत झाल्याचे घोषित केले.

त्यानंतर पोलिस तपास सुरू झाला.

तपासादरम्यान पोलिसांना विश्वनाथ शेठच्या टेबलाखाली उंदरांच्या विष्ठेच्या खुणा दिसल्या. कारखान्याभोवती जाळ्या बसवलेल्या असताना उंदीर आत येतात तरी कुठून, हा प्रश्न निर्माण झाला.

संपूर्ण कारखाना तपासल्यानंतर एका मोठ्या लोखंडी कपाटामागे संशयास्पद जागा आढळली. कपाट बाजूला सरकवले असता मागील बंद खिडकीच्या लाकडी चौकटीला उंदरांनी कुरतडून बीळ तयार केलेले दिसले.

खिडकी उघडून पाहिली असता बाहेर लोखंडी ग्रील असलेल्या सज्जावर एक लहानशी थैली पडलेली दिसली.

तीच ती पंचेचाळीस लाख रुपये किमतीच्या हिऱ्यांची थैली होती.

बहुधा उंदरांनी ड्रॉवरमधून ती ओढत नेत खिडकीजवळ आणली होती आणि ती तिथे पडून राहिली होती. ज्याच्या चोरीच्या संशयावरून एवढा गहजब झाला, ते हिरे प्रत्यक्षात कारखान्याबाहेर गेलेच नव्हते.

क्षणात सर्व सत्य उघडे पडले.

राजू निरपराध होता.

परंतु ते सिद्ध होण्यासाठी त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला होता.

त्या दिवशी विश्वनाथ शेठने हिरे परत मिळवले खरे पण एका प्रामाणिक मुलाचे आयुष्य कायमचे गमावले. संशयाने त्याला जे दाखवले होते ते सत्य नव्हते. आणि जे सत्य होते, त्याकडे पाहण्याची संधी त्याने स्वतःच्या हाताने नष्ट केली होती.

संशयाचा सर्वात मोठा दोष हाच असतो.तो पुरावे शोधत नाही, तो दोषी शोधतो. आणि कधी कधी त्या शोधाची किंमत एखाद्या निरपराध माणसाला आपल्या प्राणांनी चुकवावी लागते."सज्जावर पडलेली हिऱ्यांची थैली सापडली होती; पण राजू परत सापडणार नव्हता."


ब)संशयाचा न्याय


कॅटरिंग कॉलेजमध्ये शिकत असताना अनुभव मिळवण्यासाठी मी जोगेश्वरी येथील एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये पार्ट-टाईम काम करत होतो. तिथे मला ‘ट्रेनी शेफ’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. माझी ड्युटी रात्री अकरापर्यंत असायची आणि कॉलेजच्या अभ्यासासोबतच मी प्रोफेशनल किचन मधले बारकावे शिकत होतो.

त्या वेळी माझ्या इंडियन सेक्शनमध्ये मोहन नावाचा एक मराठी मुलगा वॉशर म्हणून काम करायचा. मेहनती, हसमुख आणि कोणत्याही कामाला कधीही नकार न देणारा असा त्याचा स्वभाव होता.

  मोहनची जबाबदारी मात्र अधिक कष्टाची होती. किचनमध्ये सतत येणारी मोठमोठी भांडी धुणे, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे आणि कामाच्या गडबडीतही सर्व काही सुरळीत चालेल याची काळजी घेणे, हे त्याचे रोजचे काम होते. तो आपले काम प्रामाणिकपणे आणि कुठलीही तक्रार न करता करत असे.

सुमारे वर्षभर आम्ही एकत्र काम केले. त्यानंतर मला जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये फुल-टाईम ‘ट्रेनी शेफ’ म्हणून संधी मिळाली आणि मी ते रेस्टॉरंट सोडले. पण त्या काळातील अनेक आठवणींमध्ये मोहनचा हसरा चेहरा आजही तितकाच जिवंत आहे.माझे लग्न झाल्यानंतर मी विरार येथे राहायला गेलो. त्या घटनेनंतर साधारण दोन वर्षांनी एके दिवशी रस्त्यात मला मोहन दिसला. त्याच्यासोबत एक महिला होती. एखाद्या पुरुषासोबत महिला दिसली म्हणून ती त्याची पत्नीच असणार, असा समज मी कधीच करून घेत नाही.

मोहनने मला पाहताच हसून विचारले, “सर, इथे कुठे?”

मी समोरच्या इमारतीकडे बोट दाखवत म्हणालो, “या इमारतीत मी राहतो.”

माझ्या इमारतीकडे एक नजर टाकून तो लगेच म्हणाला, “सर, मी त्या बाजूच्या इमारतीत राहतो.”

“होय का? म्हणजे तू माझ्या शेजारच्या इमारतीत राहायला आलास! छान झाले,” मी आनंदाने म्हणालो.

तो हसत म्हणाला, “भाड्याने आलो आहे. लग्न झालं आणि जोगेश्वरीचे घर लहान पडायला लागले.”

मी त्याला विचारले, “तू अजून त्याच रेस्टॉरंटमध्ये काम करतोस का?”

त्यावर त्याने लगेच उत्तर दिले, “नाही, नाही. तुम्ही गेल्यानंतर मीही ती नोकरी सोडली. मला केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळाली आणि मी तिकडे रुजू झालो.”

आमच्या गप्पा रंगत गेल्या. त्याची पत्नी मात्र शांतपणे आमचे संभाषण ऐकत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक साधेपणा आणि निरागसपणा जाणवत होता. कदाचित ती तशीच असावी.

अधूनमधून मोहन दिसायचा पण आता त्याच्या चेहऱ्यावरचं ते जुने हास्य कुठेतरी हरवल्यासारखं वाटू लागलं होतं. "पूर्वी मला पाहिलं की दूरून हात हलवणारा मोहन आता नजर चुकवू लागला होता. त्याच्या चेहऱ्यावरचं ते हसू कायमचं कुठेतरी हरवलं होतं. माणूस तोच होता, पण त्याच्या भोवती एक अदृश्य उदासी गुंडाळली गेल्यासारखी वाटायची."

मला अनेकदा वाटायचं, कदाचित त्याच्या मनात काहीतरी चालू असावं. कदाचित त्याला वाटत असावं की मला त्याच्या आयुष्यातील एखादं गुपित कळलं आहे. कारण तो समोर उभं राहून दोन शब्द बोलायलाही तयार नसायचा. दूरून दिसायचा, पण चेहऱ्यावर एक विचित्र उदासी कायम असायची.

काही दिवसांनी एक संध्याकाळी मी मार्केटमधून घरी परतत होतो. मोहन राहत असलेली इमारत माझ्या इमारतीच्या अगदी शेजारीच होती. ओळख असूनही मी कधी त्याच्या घरी गेलो नव्हतो आणि तोही कधी माझ्याकडे आला नव्हता.

त्या दिवशी त्याच्या इमारतीच्या गेटसमोर दोन पोलिस व्हॅन उभ्या दिसल्या. मी सहजच मनात म्हटलं, कदाचित काहीतरी चौकशी किंवा इतर काम असेल. घरी जाऊन "खिडकीतून खाली पाहत असताना पोलिस मोहनला घेऊन जाताना दिसले. मी लगेच खाली जाण्यासाठी घराचे दार उघडून जिन्याकडे धाव घेतली. पोलिसांचा मोहनबद्दल कदाचित एखादा गैरसमज झाला असेल, त्याला काही मदत करता येईल कां ?, गरज पडली तर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन काय प्रकरण आहे ते समजून घ्यावं,असा विचार मनात आला. परंतु  पुढच्याच क्षणी माझी नजर पोलिस व्हॅनच्या मागे उभ्या असलेल्या शववाहिकेवर गेली आणि माझी पावलं जगाच्या जागीच थबकली"

त्या क्षणी माझ्या मनात विचार आला, हे ओळख दाखवून किंवा विनंती करून सुटण्यासारखं साधं प्रकरण नाही.

मी लगेच त्या इमारतीच्या सेक्रेटरीला फोन लावला.

“काय झालं तुमच्या इमारतीत?” मी विचारलं.

क्षणभर शांत राहून तो म्हणाला,

“आमच्या इमारतीतील एका भाडेकरूने त्याच्या पत्नीचा जीव घेतला आहे.”

हे शब्द कानावर पडताच माझं मन सुन्न झालं.

हे कसं शक्य आहे?

मोहन..तोच मोहन?

मेहनती, हसतमुख, गरिबीतून वर आलेला, आयुष्याशी झुंज देणारा तो मुलगा?

माझा त्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता.

काही दिवसांनी तोच सेक्रेटरी मित्र मला वाटेत भेटला. बोलता बोलता त्याने त्या घटनेमागची संपूर्ण कहाणी सांगितली.

   मोहन आणि त्याची पत्नी दोघेच राहत होते. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांच्या इमारतीत राहणाऱ्या एका महिलेची मोहनच्या पत्नीशी मैत्री झाली होती. त्या दोघी अल्पावधीतच जवळच्या मैत्रिणी बनल्या. त्या महिलेचा एक मित्र होता, जो समोरच्या इमारतीत राहत होता. काही कारणाने त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.

मोहनची पत्नी स्वभावाने सरळ आणि मदतीला धावून जाणारी होती. त्या दोघांमध्ये पुन्हा सलोखा व्हावा म्हणून ती मध्यस्थी करत होती. कधी खिडकीतून हातवारे करून बोलावणे, कधी काही निरोप पोहोचवणे, एवढेच तिचे काम होते. तिच्या मनात कोणताही गैरविचार नव्हता. उलट दोन तुटलेली माणसं पुन्हा एकत्र यावीत, एवढीच तिची इच्छा होती.

तिने याबाबत मोहनला थोडीफार कल्पनाही दिली होती. पण संशयाने एकदा मन व्यापले की वास्तव दिसेनासे होते.

मोहनच्या मनात वेगळेच चित्र तयार झाले. त्याला वाटू लागले की त्याच्या डोळ्यांसमोर काहीतरी अनैतिक घडत आहे. पत्नीचे प्रत्येक वागणे, प्रत्येक हालचाल त्याला संशयास्पद वाटू लागली. एखाद्या दिवशी जेवण नीट बनले नाही, एखाद्या दिवशी तिचे लक्ष दुसरीकडे गेले, तरी त्याच्या संशयाला नवे खाद्य मिळत गेले.

दुर्दैवाने त्याने एकदाही शांतपणे बसून पत्नीला विचारले नाही की सत्य काय आहे. संवादाच्या जागी संशय आला आणि संशयाच्या जागी राग.

एके दिवशी वाद वाढला. मारहाण झाली. त्या गोंधळात तिचा पाय घसरून ती पडली की तिला ढकलण्यात आले, हे आजही निश्चितपणे कोणाला माहीत नाही. पण त्या पडण्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

कथा ऐकून मी बराच वेळ निशब्द झालो.

माझ्या डोळ्यांसमोर तोच जुना मोहन उभा राहिला  मेहनती, हसतमुख, गरिबीतून वर आलेला, आयुष्याशी झुंज देणारा.

एका संशयाने दोन जीव उद्ध्वस्त केले होते. एकाचा जीव गेला आणि दुसऱ्याचे आयुष्य.

त्या दिवशी मला पुन्हा एकदा जाणवले की कोणतीही शहानिशा न करता, सत्य पडताळून न पाहता, स्वतःच न्यायाधीश बनून दिलेला निर्णय किती भयंकर ठरू शकतो.

संशय हा अनेकदा सत्यापेक्षा अधिक घातक असतो.

कारण तो फक्त नातेसंबंधच नाही, तर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्याची ताकद बाळगून असतो.


क)"भीतीच्या सावटाखाली"


सन १९९६ ते २००१ चा तो काळ असावा. मी विरारला राहत होतो. त्या दिवसांत घरफोड्यांच्या बातम्या इतक्या सामान्य झाल्या होत्या की महिन्यातून एक-दोन घटना कानावर पडल्याशिवाय राहत नसत. आज अमुक ठिकाणी घरफोडी झाली, उद्या तमुक सोसायटीत चोरी झाली, अशा चर्चा नेहमी ऐकू यायच्या.

काही घरफोड्यांचे प्रकार तर ऐकूनच अंगावर काटा यायचा. लोखंडी ग्रीलचे दरवाजे असले तरी ते तोडले जायचे. लाकडी दरवाजे असले तर एखाद्या कुशल सुताराने काम केल्यासारखे कापून उघडलेले दिसायचे. चोरी झाल्यानंतरची घरे पाहिली की आश्चर्य आणि भीती दोन्ही वाटायची.

या घरफोड्यांमागे नेमके कोण आहेत, याबाबत अनेक तर्कवितर्क रंगायचे. कोणी त्यांना “चड्डी गँग” म्हणायचे, तर कोणी “नेपाळी गँग”. काही जण तर नेपाळमधून आलेले तडीपार गुन्हेगार इथे वॉचमन म्हणून नोकऱ्या करतात आणि संधी मिळताच घरफोड्या करतात, अशाही गोष्टी सांगायचे. त्यात किती तथ्य होते, हे माहीत नाही पण अफवा मात्र भरपूर होत्या.

त्या काळात वातावरणात एक प्रकारची दहशत पसरलेली होती. वर्तमानपत्रातही अधूनमधून घरफोड्यांच्या बातम्या झळकत असत. आम्ही घर बंद करून बाहेरगावी गेलो की परत येईपर्यंत मनात कुठेतरी धाक असायचाच. घरी परतल्यावर दरवाज्याचे कुलूप, कडी-कोंडे आणि खिडक्या व्यवस्थित जागेवर दिसल्या की जीव भांड्यात पडायचा.

  तसं पाहिलं तर आमच्या इमारतीबाबत आम्हाला बराच आत्मविश्वास होता. सर्व फ्लॅटमध्ये चांगला राबता होता. एखाद्या घरात जरी काही संशयास्पद हालचाल झाली, तरी काही क्षणांत सगळ्या इमारतीला त्याची खबर लागेल आणि लोक जागे होतील, अशी खात्री होती. आणि ती काही अंशी खरीही होती.

पण त्या काळातील घरफोड्यांच्या घटनांमुळे लोक इतके सावध झाले होते की कोणत्याही सोसायटीत एखादा अनोळखी माणूस दिसला, की त्याची चौकशी केल्याशिवाय कोणी स्वस्थ बसत नसे.

याचा अनुभव मलाही आला होता.

एकदा संध्याकाळी मी जवळच राहणाऱ्या नातेवाईकांकडे गेलो होतो. मी त्यांच्या सोसायटीत शिरताच काही रहिवाशांनी मला अडवलं. कुठे चाललात, कोणाकडे आलात ?, अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. माझ्यासाठी हा अनुभव नवीनच होता.

मी नातेवाईकांचे नाव सांगितले, फ्लॅट नंबरही सांगितला. तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा संशय काही कमी होत नव्हता. उलट माझ्याकडे अधिकच बारकाईने पाहिलं जात होतं.

शेवटी मलाच हसू आलं.

  त्यांना मी समजावण्याचा प्रयत्न करत होतो की “मी मराठी माणूस आहे,” पण त्यांना माझं म्हणणं काही पटतच नव्हतं.

 त्यापैकी एकाने मला विचारले,

“ठीक आहे, मग तुझ्या नातेवाईकांचा हुलिया सांगा.”

अगोदर मी हा सर्व प्रकार सौम्यपने घेत होतो पण हा मूर्ख प्रश्न ऐकताच माझा संयम सुटू लागला. मी इतकी माहिती सांगत होतो, तरी त्यांचा माझ्यावर विश्वास बसत नव्हता.

नंतर मी थोड्या चढ्या आवाजात म्हणालो,

“जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल, तर माझ्यासोबत त्यांच्या घरी चला. ते शेवटच्या मजल्यावर राहतात. तिथे गेल्यावर तुम्हाला सर्व स्पष्ट होईल.”

माझा आवाज चढला आणि वातावरण अधिकच तंग झालं. बोलाचालीतून हलकी धक्काबुक्कीही सुरू झाली.

सुदैवाने हा सगळा प्रकार वरून माझ्या नातेवाईकांच्या लक्षात आला. त्यांनी गॅलरीतून मला ओळखलं आणि खाली आवाज दिला. त्यानंतर कुठे तो वाद थांबला.

आज विचार केला तर ते दोघे नेमके कोण होते, काय काम करत होते, हे मला माहीत नाही. कदाचित ते सोसायटीचे पदाधिकारी असतील, कदाचित जागरूक रहिवासी. पण त्यांच्याही बाजूने विचार केला तर त्यांचा संशय पूर्णपणे चुकीचा होता, असंही म्हणता येत नाही.

माझ्या नंतर त्यांनी माझ्या नातेवाईकांना प्रसंग रंगवून सांगितला.

“आजकाल घरफोडे आणि दरोडेखोर आधी अचूक माहिती काढतात. चांगल्या कपड्यांत येतात, सभ्यपणे बोलतात आणि बंद घरांची रेकी करून जातात. हीसुद्धा त्यांची एक पद्धत असते.”

त्यांचं म्हणणं मला नातेवाईकांकडून समजले तेव्हा मी म्हणालो,

“ते सर्व मान्य आहे. पण जर मी खरोखरच संशयास्पद व्यक्ती असतो, तर त्यांनी माझ्यासोबत वर येऊन खरे खोटे करून घ्यायला हवं होतं? मी स्वतःच त्यांना वरती घेऊन येण्याची तयारी दाखवत होतो.”

त्यावर मात्र त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं.

त्या घटनेनंतर विरारमध्ये राहिलेल्या पुढच्या चार वर्षांत मी शक्यतो इतर सोसायट्यांमध्ये कोणाकडे जाणं टाळलं. त्या काळात वातावरणच असं होतं की लोकांचा अनोळखी माणसांवर संशय घेतला जायचा, त्याचा अनेक ठिकाणी अतिरेक सुद्धा व्हायला लागला.

तरीही, मागे वळून पाहताना मला असं वाटतं की त्या लोकांना पूर्णपणे दोष देणंही योग्य ठरणार नाही. कारण तो काळच भीतीचा होता. रोज कानावर पडणाऱ्या घरफोड्यांच्या बातम्या आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटना यामुळे लोक सतत सावध आणि साशंक झाले होते.

कधीकधी परिस्थिती अशी असते की माणसं चुकीची नसतात, पण त्यांची भीती त्यांना चुकीचं वागायला भाग पाडते.

याच काळात घडलेली आणखी एक घटना माझ्या लक्षात आहे.

माझ्या एका मित्राच्या सोसायटीत एका रात्री तळमजल्यावरील एका घरात घरफोडी झाली. योगायोगाने त्याच संध्याकाळी त्या घराजवळील परिसरात सोसायटीचा वॉचमन आणि त्याचा एक अनोळखी नेपाळी मित्र उभे राहून बराच वेळ गप्पा मारत असल्याचे काही रहिवाशांनी पाहिले होते.

घरफोडी उघडकीस आल्यानंतर संशयाची सुई थेट त्या वॉचमनकडे वळली. कोणतीही ठोस माहिती किंवा पुरावा नसताना काही रहिवाशांनी त्याला पकडून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

सुदैवाने परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी हस्तक्षेप झाला. अन्यथा बेदम मारहाणीत त्याचा जीवही जाऊ शकला असता. आणि जर तो निरपराध निघाला असता, तर केवळ संशयाच्या आधारावर एका माणसाचा जीव घेतल्याची वेळ त्या लोकांवर आली असती.

संशय असणे वेगळे आणि दोष सिद्ध होणे वेगळे.

एखाद्या व्यक्तीवर संशय वाटत असेल, तर त्याची चौकशी करण्यासाठी कायदेशीर यंत्रणा आहे. त्याला पोलिसांच्या ताब्यात देणे, माहिती पुरवणे किंवा साक्ष देणे हा योग्य मार्ग आहे. पण स्वतःच न्यायाधीश बनून शिक्षा देण्याचा अधिकार कोणालाच नसतो.

त्या काळातील भीती खरी होती. घरफोड्यांचे प्रमाणही चिंताजनक होते. पण भीती आणि संशय यांच्या भरात जेव्हा माणूस कायदा स्वतःच्या हातात घेतो, तेव्हा अन्याय होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.

कधीकधी गुन्ह्यापेक्षा संशयाची शिक्षा अधिक भयंकर ठरू शकते.

वरील घटना वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या माणसांबाबत घडल्या. पण त्यांचा धागा एकच होता.. संशय.

राजूचा जीव गेला, कारण त्याच्यावर चोरीचा संशय घेतला गेला.

मोहनचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, कारण त्याने संशयाला सत्य मानले.

विरारमधील वॉचमनचा मारहाणीतून जीव वाचला, कारण काही लोक वेळेवर शहाणपणाने वागले.

संशय हा नेहमी खोटाच असतो असे नाही. अनेकदा तो सावध राहण्याची सूचना देतो. पण संशय आणि सत्य यांच्यामध्ये एक महत्त्वाचा पूल असतो..पडताळणी.

तो पूल ओलांडण्याआधीच आपण निर्णय दिला, तर न्याय होत नाही,अन्याय होतो.

मानवी इतिहासात अनेक गुन्हेगार संशयामुळे पकडले गेले असतील. पण तितकीच निरपराध माणसेही संशयाची बळी ठरली आहेत.

म्हणूनच संशयाला मनात स्थान द्यावे परंतु डोक्यावर बसवू नये.

कारण संशय सल्लागार म्हणून उपयोगी असतो,न्यायाधीश म्हणून नाही.

वरील तीन लघुकथा वाचल्यानंतर संदर्भ म्हणून पंचतंत्रातील पुढील नीतीकथा सहज आठवते.

   एका शेतकऱ्याने एक मुंगूस पाळले होते. ते मुंगूस घरातील सदस्यासारखेच होते. एके दिवशी शेतकरी आणि त्याची पत्नी कामानिमित्त बाहेर गेले. त्यांचे लहान बाळ घरात झोपलेले होते.

तेवढ्यात घरात एक विषारी साप शिरला. मुंगसाने सापाशी झुंज देऊन त्याला ठार मारले आणि बाळाचा जीव वाचवला. थोड्या वेळाने शेतकऱ्याची पत्नी घरी आली. दारात तिला मुंगसाच्या तोंडाला रक्त लागलेले दिसले. तिला वाटले की मुंगसाने बाळाला मारले असावे.

रागाच्या भरात आणि कोणतीही खात्री न करता तिने मुंगसाला ठार मारले. घरात गेल्यावर तिने बाळ सुखरूप पाहिले आणि बाजूलाच मेलेला साप दिसला. तेव्हा तिला आपली भयंकर चूक समजली. पण तोपर्यंत उशीर झाला होता.

मुंगसाची कथा ही केवळ एक नीतीकथा नाही. ती मानवी मनाच्या घाईघाईने निष्कर्ष काढण्याच्या प्रवृत्तीचे प्रतीक आहे.

काळ बदलला, माणसे बदलली, घटना बदलल्या पण संशयाच्या आधारे निर्णय घेण्याची मानवी सवय मात्र आजही तशीच आहे.

म्हणूनच संशयाला प्रश्न विचारण्याचा अधिकार असावा पण निर्णय देण्याचा अधिकार कधीही नसावा.

"संशयाचे खरे सामर्थ्य सत्य शोधण्यात नसते तर सत्य न पडताळता निर्णय देण्यात असते. आणि तेव्हाच तो सर्वाधिक घातक ठरतो."

या लेखातील घटना वेगवेगळ्या काळात आणि परिस्थितीत घडलेल्या असल्या, तरी त्यांचा समान धागा एकच आहे, संशय. माणसाला सावध राहण्यासाठी संशयाची गरज असते परंतु विवेक हरवून तोच न्यायाधीश बनला, तर त्याची किंमत अनेकदा निरपराधांना चुकवावी लागते..

                                                                            समाप्त  📚📖🖋️ 


🔗भक्तवत्सल सदगुरू श्री शंकर महाराज : जीवन, लीला आणि अनुभूती” भाग -1

श्री शंकर महाराज यांचे संपूर्ण जीवनचरित्र, कार्य, तत्त्वज्ञान, महासमाधी, भक्तांच्या अनुभूती, चमत्कारकथा आणि अध्यात्मिक संदेश जाणून घ्या. अवलिया सदगुरू श्री शंकर महाराज यांच्यावरील सविस्तर मराठी लेख पुढे..👉



✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.


तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो






📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X

📸 Follow on Instagram

📘 Follow on Facebook

📌 Pinterest वर फॉलो करा





टिप्पण्या

  1. अत्यंत समर्पक आणि विचार करायला लावणारा लेख. संशय आवश्यक आहे, पण विवेकाशिवाय केलेला संशय विनाशाला कारणीभूत ठरू शकतो.

    उत्तर द्याहटवा
  2. संशय आणि सत्य यामधील सीमारेषा ओळखणे आजच्या काळाची मोठी गरज आहे. उत्कृष्ट मांडणी.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...