अस्वीकरण-
"ही कथा मानवी नात्यांतील गुंतागुंत दाखवणारी काल्पनिक कथा आहे. यातील पात्रे आणि घटना कोणत्याही व्यक्ती किंवा घटनेशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा."
क्रॉस कनेक्शन : चार हृदयांची नियतीने बदललेली हृदयस्पर्शी प्रेमकथा…
🔗चुकीच्या वाटेवरचं पहिलं पाऊल | झटपट पैशाचा मोह, गुन्हेगारी आणि दुसऱ्या संधीची मराठी कथा..👉
क्रॉस कनेक्शन : चार हृदयांची नियतीने बदललेली हृदयस्पर्शी प्रेमकथा…
चार व्यक्ती, दोन प्रेमकथा आणि नियतीने घडवलेले अनपेक्षित क्रॉस कनेक्शन! प्रेम, विश्वास, मैत्री आणि नात्यांच्या गुंतागुंतीवर आधारित हृदयस्पर्शी मराठी कथा..
ही कथा चार व्यक्तींमधील प्रेमाच्या गुंतागुंतीच्या नात्यांची आहे. अशी कथा पहिल्यांदाच घडली असेल, असे मुळीच नाही. मानवी आयुष्यात अशा प्रकारच्या अनेक प्रेमकथा घडल्या असतील काही काळाच्या पडद्याआड गेल्या, तर काही लोकांच्या आठवणीत आजही जिवंत आहेत.
मी गिरगावात राहत असताना, रात्री हातात काठी घेऊन "जागते राहो.." अशी जोरदार हाळी देत फिरणारे नेपाळी गुरखे आम्ही लहानपणापासून पाहत आलो. खरं तर गिरगाव सारख्या गजबजलेल्या परिसरात त्यांच्या पहाऱ्याची फारशी गरज नव्हती.कारण मुंबई कधीच झोपत नाही, असे म्हणतात आणि त्याचा प्रत्यय घ्यायचा असेल, तर एकदा मध्यरात्री गिरगावात फेरफटका मारलाच पाहिजे. तेव्हाच लक्षात येते की, रात्रीची मुंबई झोपलेली नसते, तर ती एका वेगळ्याच लयीत जागी असते.
आमच्यासारखे रात्री जागणारे निशाचर तरुण त्या जागत्या गिरगावात आणखी रंग भरायचो. आमचे टोळके कधी चाळीच्या खिडकीत, तर कधी एखाद्या बंद दुकानाच्या ओट्यावर किंवा इमारतीच्या मोकळ्या जागेत गप्पांचा फड रंगवून बसायचे. त्या परिसरातून जाणारा एखादा वैशिष्ट्यपूर्ण माणूस दिसला की, त्याला थांबवून गप्पा मारणे, त्याच्या आयुष्यातील गोष्टी ऐकणे किंवा अगदी त्याची 'मुलाखत' घेणे, हा आमच्या रात्रीच्या जागरणाचा अविभाज्य भाग होता.
त्या गप्पांमध्ये कधी चंपी मॉलिश करणारा, कधी चहा-कॉफीवाला, कधी कुल्फीवाला, तर कधी मदिरागृहातून परतणारा एखादा नशेतला माणूस सहभागी व्हायचा. प्रत्येकाकडे सांगण्यासारखी एक वेगळी गोष्ट असायची, आणि आम्ही त्या गोष्टी मन लावून ऐकायचो.
आज जर विचार केला तर त्या मुलाखती ह्या आताच्या 'पॉडकास्ट' च्या प्रकारातील होत्या.त्या गप्पांच्या मुलाखतीत कोण कोण आले नाही ? त्यांची नावे घेऊ तेव्हढी कमी पडतील. फरक एवढाच, की तेव्हा सोशल मीडिया नव्हता. नाहीतर कदाचित आम्ही त्यावेळचे लोकप्रिय पॉडकास्टर, रिलमेकर किंवा यूट्यूबर म्हणून ओळखले गेलो असतो!
त्या रात्री आमच्या विभागातील 'जागता पहारा' देणारा नेपाळी गुरखा "जागते राहो.." अशी जोरदार हाळी देत आमच्या समोर आला, आम्ही त्याला थांबवले “क्यो बहादूरजी, कैसे हो| कैसी चल रही है आपकी जिंदगी| ?”
आम्हाला पाहताच तो नेहमीसारखा हसला. आणि नंतर म्हणाला की
“सब ठिकठाक चल रहा है| शाबजी,आप लोग कैसे हो|?" त्याने सुद्धा आपुलकीने आमची ख्याली खुशाली विचारली.त्यावर आम्ही सुद्धा म्हणालो “बहादुरजी..एकदम बढिया|”
तो जेव्हा हसला तेव्हा बीएमसीच्या सफेद मंद स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात मला क्षणभर त्याचे डोळे उघडे नसून मिटल्यासारखे वाटले. गुरख्यांचे मुळातच बारीक डोळे..त्यात हसताना गाल वर उचलले गेले की ते आणखीच लपून जायचे.परंतु त्या हसण्यात एक वेगळीच निरागसता होती.
"ये.. थोडा वेळ आमच्यासोबत बस," आम्ही त्याला आग्रह केला.
जवळच शेगडीवर मोठी पितळी किटली ठेवून एक भैय्या कॉफी विकत बसला होता. त्याच्याकडून आम्ही गुरख्यासाठी गरमागरम कॉफी मागवली.
त्याने दोन्ही हातांनी कप धरला. थंडगार रात्रीत गरम कॉफीचे दोन-चार घोट घेताच त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान उमटले.
कॉफी संपेपर्यंत आमच्या नेहमीच्या 'मुलाखतीची' सुरुवात झाली.
आमच्यातील एकाने सहज विचारले,
"रात्रभर 'जागते राहो' म्हणत गल्लीबोळात फिरतोस..त्यातून तुला मिळतं तरी काय?"
तो हलकेच हसला.
"महिना संपला की मी या भागातील दुकानदार आणि व्यापाऱ्यांकडे जातो. त्यांना कडक सॅल्यूट मारतो. मग प्रत्येक जण आपल्या इच्छेनुसार बिदागी देतो. त्यावरच आमचा उदरनिर्वाह चालतो."
त्याचे उत्तर ऐकून माझ्या मनात एक विचार चमकून गेला.
मुंबई हे शहर खरंच विलक्षण आहे. इथे कष्ट करण्याची तयारी असेल, तर माणूस उपाशी राहत नाही.
त्यानंतर गप्पांचा ओघ सुरूच राहिला.
नेपाळ..त्याचे गाव..त्याचे कुटुंब..मुंबईतील त्याचे आयुष्य..अशा अनेक विषयांवर तो मनमोकळ्या गप्पा मारत राहिला.
आणि मग..
नकळत गप्पांचा विषय एका वेगळ्याच दिशेने वळला.
तो विषय कसा त्या दिशेने वळला, हे आजही मला आठवत नाही. पण त्या रात्री त्याने सांगितलेली गोष्ट अजून पर्यंत माझ्या लक्षात आहे.
कॉफीचा शेवटचा घोट घेत त्याने रिकामा कप बाजूला ठेवला. क्षणभर आजूबाजूला नजर फिरवली आणि मंद आवाजात म्हणाला,
"शाबजी..मी रात्रभर मुंबईच्या रस्त्यांवर फिरत असतो. त्यामुळे माणसांच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टी माझ्या नजरे समोरून जातात. काही गोष्टी अभिमान वाटावा अशा असतात.. तर काही अशा, की त्या पाहून माणसाच्या मनातच प्रश्न निर्माण होतात."
तो काही क्षण थांबला.
आमची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती.
तो पुढे म्हणाला,
"मी कुणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही. जे पाहतो ते माझ्यापुरतंच ठेवतो. पण एक गोष्ट मात्र नक्की सांगतो..लोक समजतात तसे प्रकार फक्त मुंबईत घडत नाहीत. तर माणूस हा जिथे जिथे आहे, तिथे तिथे प्रेम आहे..विश्वास आहे आणि विश्वासघात सुद्धा आहे. सोबत नियतीचे विचित्र खेळही आहेत."
तो पुन्हा एकदा हसला.
"आज तुम्हाला तशीच एक नेपाळ मध्ये घडलेली गोष्ट सांगतो."
एवढे बोलून तो शांत झाला.
काही क्षण कुणीच काही बोलले नाही.
रात्रीच्या त्या शांत वातावरणात दूरवरून एखाद्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. रस्त्यावरून एखादी-दुसरी टॅक्सी भरधाव वेगाने निघून जात होती.मध्येच रस्त्यावर झोपलेल्या लोकांपैकी कुणाचा तरी जोरजोरात खोंकण्याचा आवाज येत होता.परंतु आमचे लक्ष मात्र त्या गुरख्यावरच खिळले होते.
तो नेमके काय सांगणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती.
त्याने हळूच एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली.
"नेपाळमध्ये जिथे मी राहत होतो, तिथे माझे ओळखीचे दोन मित्र होते. एक होता पुरण आणि दुसरा इंदर..
पुरण व्यवसायाने टॅक्सीचालक होता. पण तो फक्त टॅक्सीचालकच नव्हता तर तो पर्यटकांना नेपाळ फिरवणारा एक उत्तम गाईडही होता. बोलका, मनमोकळा, दिलखुलास आणि कायम हसतमुख.
इंदर त्याच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा. शांत, मितभाषी आणि विचार करून बोलणारा. एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्याही तो पुरणपेक्षा बऱ्याच चांगल्या स्थितीत होता.
दोघांची मैत्री मात्र बालपणापासूनची होती. स्वभाव, राहणीमान आणि आर्थिक परिस्थिती वेगळी असली तरी त्यांची मैत्री कधीच बदलली नाही."
तो क्षणभर थांबला.
"पुरणचे लग्न होऊन दोन वर्षे झाली होती. त्याची पत्नी सुषमा. त्यांना अजून मूलबाळ नव्हते. सुषमाचे महिलांच्या इमिटेशन ज्वेलरीचे छोटेसे दुकान होते.
गुरखा पुढे म्हणाला,
"दुसरीकडे इंदर एका परधर्मीय मुलीवर मनापासून प्रेम करत होता. तिचं नाव चंदा.
दोघांनी लग्न करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण इंदरच्या घरचे अत्यंत रूढीवादी होते. त्या नात्याला ते कधीच स्वीकारणार नाहीत, याची त्याला पूर्ण कल्पना होती.
तरीही दोघं त्या आशेवर जगत होते.
पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं."
गुरख्याचा आवाज आता अधिक धीरगंभीर झाला.
"एके दिवशी चंदाच्या घरी त्यांच्या प्रेमप्रकरणाचा भांडाफोड झाला.
घरात प्रचंड गोंधळ उडाला.
रागाच्या भरात चंदाने दोन मोठ्या बॅगा भरल्या आणि सरळ इंदरच्या ऑफिसमध्ये जाऊन उभी राहिली."
"इंदर..मी तुझ्यासाठी घर सोडलं आहे. आता आपण लगेच लग्न करूया." या त्याच्या मिमिक्रीवर आम्ही सर्वजण हलकेसे हसलो..
हे शब्द ऐकताच इंदरच्या पायाखालची जमीनच सरकली.
त्याने चंदाकडे पाहिले..
दोन भरलेल्या बॅगा..
डोळ्यांत भीती आणि अश्रू..
सर्वस्वाचा निर्णय घेऊन त्याच्यासमोर उभी ठाकलेली ती मुलगी.
त्याच्या मनात विचारांचं प्रचंड काहूर माजलं,
"आता काय करायचं?"
घरच्यांची संमती नव्हती..
राहायला घर नव्हतं..
भविष्यासाठी कोणतीही तयारी नव्हती..
क्षणभर त्याला स्वतःचाच राग आला.
"हे असं होणार आहे, याची जर आधी कल्पना असती तर मी आधीच एखादं भाड्याचं घर घेऊन सगळी तयारी करून ठेवली असती.."
पण आता पश्चात्ताप करून काहीही उपयोग नव्हता.
कारण..
चंदा घर सोडून आली होती.
पण आता वेळ त्याच्या हातातून निसटली होती.
"आता पुढे ,करायचं तरी काय?"
हा एकच प्रश्न त्याच्या डोक्यात घोंगावत होता.
क्षणभर त्याच्या मनात विचार आला,चंदाला एखाद्या हॉटेल किंवा लॉजमध्ये ठेवावे तर..
पण लगेच दुसरा विचार डोकावला.
"ती तिथे एकटी कशी राहील? तिच्यासोबत मलाही थांबावं लागेल. आणि मी घरी गेलो नाही, तर घरच्यांना संशय यायला वेळ लागणार नाही."
प्रत्येक वाट बंद झाल्यासारखी वाटत होती.
इकडे ऑफिसच्या गेस्ट लॉबीमध्ये दोन मोठ्या बॅगा जवळ घेऊन बसलेली चंदा हुंदके देत रडत होती. येणारा-जाणारा प्रत्येकजण तिच्याकडे कुतूहलाने पाहत होता. काहींच्या नजरेत दया होती, तर काहींच्या नजरेत संशय.
इंदरने दूरूनच तिच्याकडे पाहिले.
"तिला इथून लगेच बाहेर काढायलाच हवं.. पण कुठे?"
तो आपल्या टेबलाजवळ येऊन बसला. दोन्ही हातांनी डोके धरून तो उपाय शोधत राहिला.
मिनिटामागून मिनिटं सरत होती.
आणि अचानक..
जणू दाट धुक्यातून एखादी वाट दिसावी, तसा एक विचार त्याच्या मनात चमकून गेला.
"पुरण!"
तो जवळजवळ खुर्चीतूनच उठला.
"या संकटातून मला बाहेर काढू शकतो, तर तो फक्त पुरणच ."
पुरण हा त्याचा बालपणापासूनचा जिवलग मित्र होता. त्याच्यावर इंदरचा डोळे झाकून विश्वास होता.
पण लगेच दुसरा विचार मनात आला आणि तो खाली बसला.
मित्र मदत करेल पण त्याच्या घरात एका परक्या तरुणीला काही दिवस आश्रय द्यायचा म्हणजे त्या घरातील गृहलक्ष्मीची संमती सर्वांत महत्त्वाची होती.
त्याच्या डोळ्यांसमोर सुषमाचा चेहरा तरळून गेला.
आणि नकळत त्याच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले.
"सुषमा वहिनी नाही म्हणणार नाहीत.."
ही खात्री त्याला का वाटत होती, याचं स्पष्ट उत्तर त्याच्याकडे नव्हतं.
कदाचित तिचा स्वभाव..
किंवा माणसाला ओळखण्याची तिची नजर..
किंवा गरज पडल्यावर दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्याची तिची वृत्ती..
पण एवढं मात्र खरं होतं की, मित्राची पत्नी म्हणून इंदरच्या मनात तिच्याविषयी नेहमीच नितांत आदर होता.
ऑफिसला येताना-जाता त्यांचा रस्ता एकच असल्याने रोज भेट व्हायची.
समोरासमोर आले की दोघेही एकमेकांकडे पाहून हलकेसे हसायचे.
"काय, ऑफिसला निघालात?"
"हो आणि तुम्ही दुकानात?"
असे दोन-चार सहज शब्द व्हायचे आणि दोघेही आपल्या वाटेने निघून जायचे.
ते स्मित कधी मैत्रीपलीकडे गेलं नव्हतं.
किमान..
इंदरला तरी तसंच वाटत होतं.
सुषमाकडे दुर्लक्ष करून पुढे जाणे इंदरला कधीच योग्य वाटत नसे. मी तिला जर हाक मारली नाही तर ती मला उद्धट किंवा अहंकारी समजेल आणि रोज रोज तिला हाक मारून स्मितहास्य केले तर विनाकारण तिच्या मनात माझ्याबद्दल वेगळाच गैरसमज निर्माण होईल,ही भीती त्याला सतवत होती. रोजच्या भेटीत समोरासमोर आल्यानंतर एक सहज स्मित देणे हा केवळ सभ्यतेचा भाग आहे, असेच तो मानत असे.सुषमा हसली की तोही तितक्याच सहजतेने हसून पुढे निघून जायचा. त्या स्मित हास्यांमागे त्याच्या मनात कधीच दुसरा हेतू डोकावला नाही.
म्हणूनच समोरासमोर भेट झाली की तो तिच्या प्रत्येक स्मितला तितक्याच सहजपणे उत्तर द्यायचा.
आजवर त्या नात्याकडे त्याने कधीही वेगळ्या नजरेने पाहिले नव्हते.
ती आपल्या जिवलग मित्राची पत्नी होती..
आणि ती मर्यादा त्याने मनापासून जपली होती.
म्हणूनच या कठीण प्रसंगी त्याला खात्री वाटत होती की, सुषमा वहिनी त्याच्या अडचणीत नक्कीच मदतीचा हात पुढे करतील.
पुरण आणि सुषमा दिवसभर आपापल्या कामात व्यस्त असायचे. त्यामुळे काही दिवस चंदाला त्यांच्या घरी सुरक्षित ठेवता येईल, असा विचार त्याच्या मनात दृढ झाला.
त्याला तेव्हा माहीत नव्हते..
हा निर्णय केवळ एका मुलीला आश्रय देण्याचा नव्हता.
तो चार आयुष्यांची दिशा बदलणारा निर्णय ठरणार होता.
इंदरने चंदाला ऑटोमध्ये बसवले आणि थेट पुरणच्या घरी पोहोचला.
घरासमोर उभी असलेली पुरणची टॅक्सी पाहताच त्याच्या जीवात जीव आला.
"नशीब... पुरण घरीच आहे." त्याने सुटकेचा निःश्वास सोडला.
चंदा दोन मोठ्या बॅगांसह घराबाहेरच थांबली.
इंदरने बेल वाजवली.
काही क्षणांतच दार उघडले.
समोर पुरण उभा होता.
तो डायरीत दिवसाचा हिशोब लिहित बसला होता. ऑफिस सुटताच इंदर थेट आपल्या घरी आलेला पाहून तो आश्चर्यचकित झाला.
"अरे.. एवढ्या घाईत? सगळं ठीक आहे ना?" त्याने काळजीने विचारले.
इंदर काही क्षण शांत राहिला.
मग त्याने चंदाच्या घरात घडलेल्या घटनेपासून ते ती दोन बॅगा घेऊन ऑफिसमध्ये येईपर्यंतचा संपूर्ण प्रसंग सांगितला.
पुरण शांतपणे ऐकत राहिला.
त्याला इंदर आणि चंदाच्या प्रेमाची थोडीफार कल्पना आधीपासूनच होती.
सगळं ऐकून झाल्यावर त्याने काही क्षण डोळे मिटून विचार केला.
मग तो शांत आवाजात म्हणाला,
"इंदर.. मित्र म्हणून माझी काही हरकत नाही. पण हे घर माझं एकट्याचं नाही."
तो क्षणभर थांबला.
"सुषमा आली की तिचंही मत घेऊ. तिची संमती असेल, तर चंदा इथे राहू शकते."
इंदरनेही मान हलवली.
पुरणने लगेच एका शेजारच्या मुलामार्फत सुषमाला बोलावणे पाठवले.
"आज दुकान थोडं लवकर बंद करून घरी ये. एक महत्त्वाचं काम आहे."
तो निरोप ऐकून सुषमा थोडी चकित झाली.
पुरण कधीच अशा प्रकारे घाईने घरी बोलवत नसे.
तिने आणखी काही न विचारता दुकान आवरले..
आणि शक्य तितक्या लवकर घरी निघाली.
घरात प्रवेश करताच सुषमाची नजर समोरच्या दृश्यावर खिळली.
घरात एक अनोळखी तरुणी..
तिच्या शेजारी ठेवलेल्या दोन मोठ्या बॅगा..
आणि समोर गंभीर चेहऱ्याने बसलेले पुरण आणि इंदर.
क्षणभर ती जागच्या जागीच थबकली.
घरातील वातावरण काहीतरी वेगळंच सांगत होतं.
पुरणने तिला शांतपणे संपूर्ण घटना सांगितली. चंदाने घर सोडल्यापासून ती इथे येईपर्यंतचा सगळा प्रसंग तिने न बोलता ऐकून घेतला.
काही क्षण घरात शांतता पसरली.
सुषमाच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.
पण त्या नाराजीचं कारण नेमकं काय होतं..
एका अनोळखी मुलीला घरात ठेवायचं होतं म्हणून?
की इंदर इतक्या मोठ्या संकटात सापडला होता म्हणून?
की आणखी अजून काही?
त्या क्षणी त्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं.
शेवटी तिने हळूच इंदरकडे पाहिलं.
त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता, डोळ्यांतील चिंता आणि चंदासाठीची काळजी तिच्या नजरेतून सुटली नाही.
क्षणभर डोळे मिटून तिने स्वतःला सावरलं.
मग शांत आवाजात म्हणाली,
"ठीक आहे..काही दिवस ती इथे राहू दे."
ते शब्द ऐकताच इंदरच्या मनावरील जणू डोंगरच हलका झाला.
"धन्यवाद, वहिनी.." एवढंच त्याच्या तोंडून बाहेर पडलं.
इंदरने लगेच भाड्याचं घर शोधायला सुरुवात केली.चंदा घर सोडून गेल्याची कुणकुण त्यांच्या घरच्यांना लागल्यामुळे परिस्थिती अधिक नाजूक बनली होती. त्यात दुसरे घर शोधतोय हे जर घरच्यांना कळाले तर काही खैर नाही. म्हणून तूर्त त्याने घर शोधायची मोहीम थांबवली.
अशा वेळी घाईघाईने कोणताही निर्णय घेणं योग्य नव्हतं.
म्हणून काही दिवस वाट पाहण्याचं त्याने ठरवलं.
पण...
नियतीला ते काही मंजूर नव्हते,त्या काही दिवसांतच तिने त्या चार आयुष्यांचा संपूर्ण पटच बदलून टाकला.
पुरण व्यवसायाने टॅक्सीचालक होता, परदेशी पर्यटकांना नेपाळ फिरवणं हा त्याचा खरा व्यवसाय परंतु त्या सोबत गाईडगिरी करणे ही त्याची खरी आवड होती.
दिवसभर घरात एकटी बसून चंदाला कंटाळा येऊ नये म्हणून तो तिला अधूनमधून फिरायला बाहेर घेऊन जाऊ लागला.
कधी पशुपतिनाथ मंदिर..
कधी डोंगरदऱ्या..
कधी स्थानिक बाजारपेठा..
तर कधी सागरमाथा राष्ट्रीय उद्यानच्या परिसरातील निसर्गरम्य भाग.
नेपाळचा इतिहास, तिथल्या लोककथा, प्रत्येक ठिकाणाशी जोडलेल्या आठवणी..
पुरण इतक्या रंगतदार पद्धतीने सांगायचा की चंदा त्याच्या बोलण्यात हरवून जायची.
सुरुवातीला तो फक्त वेळ घालवण्यासाठीचा सहवास होता.
नंतर त्या सहवासाचं रूपांतर मैत्रीत झालं.
आणि नकळत..
त्या मैत्रीच्या मुळाशी काहीतरी वेगळंच रुजू लागलं.
ते प्रेम आहे, की केवळ भावनिक आधार..
याचा विचार करण्याइतका वेळ त्यांनी स्वतःलाच दिला नव्हता.
दुसरीकडे इंदर पूर्णपणे निर्धास्त होता.
चंदा सुरक्षित आहे..
पुरण तिची मनापासून काळजी घेत आहे..
आणि आपल्याला योग्य घर शोधण्यासाठी वेळ मिळत आहे..
त्याच्या दृष्टीने एवढंच महत्त्वाचं होतं.
सुषमा दिवसभर दुकानात असायची.
इंदर ऑफिसमध्ये.
आणि त्या दोघांच्या अनुपस्थितीत पुरण आणि चंदा रोज थोडे थोडे एकमेकांच्या अधिक जवळ येत होते.
नियती शांतपणे आपलं काम करत होती..
पण तिच्या पुढच्या डावाची कल्पना त्या चौघांपैकी एकालाही आली नाही.
काळ पुढे सरकत गेला.
पुरण आणि चंदा यांच्यातील सहवास आता केवळ सहवास राहिला नव्हता.
एकमेकांची वाट पाहणे..
एकमेकांच्या आवडी-निवडी लक्षात ठेवणे..
छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये काळजी घेणे..
हे सगळं इतकं सहजपने घडत होतं की, त्यांना स्वतःलाही त्यामागचं कारण उमगत नव्हतं.
पण सुषमाच्या नजरेतून मात्र काहीच सुटलं नाही.
पुरणच्या चेहऱ्यावरचं बदललेलं हास्य..
चंदा बोलत असताना त्याच्या डोळ्यांत दिसणारी चमक..
आणि एकमेकांकडे नकळत वळणाऱ्या त्यांच्या नजरा..
पत्नीच्या नजरेतून हे सगळं लपणं अशक्य होतं.
पहिल्यांदा ते पाहिलं आणि त्या मागचे वास्तव कळाले, तेव्हा सुषमाच्या छातीत धस्स झाले.
तेव्हा तिने स्वतःलाच समजावलं.
" हा कदाचित माझाच गैरसमज असेल.."
पण दिवसामागून दिवस जात राहिले आणि तिचा गैरसमज हळूहळू वास्तवात बदलत गेला.
एका रात्री पुरण झोपल्यानंतर ती बराच वेळ जागीच बसून राहिली.
तिच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता.
"ज्याच्या सोबत संसाराची स्वप्नं पाहिली..त्याचं मन जर आता दुसरीकडे गुंतलं असेल, तर मी कोणासाठी हे नातं एकटी जपत बसायचं?"
त्या प्रश्नाने तिच्या मनात वर्षानुवर्षे बंद असलेले अनेक कप्पे उघडू लागले.
सगळा प्रकार ऐकून इंदर बराच वेळ शांत बसून राहिला.
त्याच्या चेहऱ्यावर रागापेक्षा जास्त वेदना दिसत होती.
"चंदाने तिच्यावरचं माझं प्रेम गमावलं आणि पुरणने मैत्रीचा विश्वास.."
ही भावना त्याच्या मनात घुसमट निर्माण करत होती.
तो सूड घ्यायचा विचार करत नव्हता.
पण एक गोष्ट मात्र त्याला स्पष्ट जाणवत होती.
ज्या नात्यांवर त्याने डोळे झाकून विश्वास ठेवला होता..
ती नाती आता पूर्वीसारखी राहिलेली नव्हती. ती नाती स्वार्थी आहेत.
त्याच क्षणी त्याची नजर समोर बसलेल्या सुषमाच्या डोळ्यांकडे गेली.
आजवर तो तिच्याकडे फक्त आपल्या मित्राच्या पत्नीच्या नात्याने आदर म्हणून पाहत आला होता.
आदर..
मर्यादा..
आणि मैत्री..
यापलीकडे त्याने कधीच तिच्या बाबतीत अविचार केला नव्हता.
पण आज परिस्थिती पूर्ण बदलली होती.
सुषमानेही आपल्या मनातील वेदना त्याच्यासमोर पहिल्यांदाच मोकळ्या केल्या होत्या.
त्या वेदनेत त्याला सुद्धा स्वतःचीच वेदना दिसली.
दोघेही एकाच प्रकारच्या विश्वासघातातून जात होते.
आणि कदाचित..
याच क्षणी त्यांच्या आयुष्यात एका नव्या नात्याचं पहिलं, अजून नावही न मिळालेलं बीज शांतपणे रुजलं.
दोघांमध्ये बराच वेळ शांतता होती.
शब्द संपले होते.
फक्त दोन जखमी मनं एकमेकांसमोर बसली होती.
सुषमाने अश्रूंना वाट करून दिली नंतर हळूच डोळे पुसले. सुषमा काही बोलणार इतक्यात त्याचा हात तिला समजावण्यासाठी नकळत पुढे आला आणि मागे गेला.
क्षणभर तो थांबला.
मर्यादेची जाणीव अजूनही त्याच्या मनात होती. सुषमाची समजूत काढणे हे सुद्धा तेव्हा महत्त्वाचे होते. क्षणभर मागे घेतलेला हात पुढच्याच क्षणी परत तिची समजूत काढावी म्हणून पुढे आला, त्याने त्याचा हात तिच्या हातावर हळूच ठेवत ,तिला थोपटले.
तो स्पर्श होताच सुषमा क्षणभर मनातल्या मनात दचकली.ते दचकणे हे रागाचे नव्हते तर आश्चर्याचे होते.
इंदरला वाटलं, ती लगेच हात मागे घेईल.
पण तसं काहीही झालं नाही.
तिने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं.
त्या नजरेत राग नव्हता..
प्रश्न होते.
वेदना होती.
विश्वास तुटल्याची हुरहूर होती.
मागील दोन वर्षं तिच्या मनाच्या कप्प्यात इंदरच्या बाबतीत दडलेली एक सुप्त भावना आता डोकं वर काढायला लागली होती, यापूर्वी त्या भावनेकडे तिने स्वतःही कधी नीट पाहिलं नव्हतं.
इंदरनेही नंतर तो हात मागे घेतला नाही.
आणि सुषमानेही तो हात झिडकारला नाही.
काही क्षण तसेच निघून गेले.
मग तिने हळूच आपला दुसरा हात त्याच्या हातावर ठेवला.
त्या स्पर्शात वासना नव्हती..
सूड नव्हता..
फक्त दोन तुटलेल्या मनांना मिळालेला एक नि:शब्द आधार होता.
हॉटेलच्या टेबलावर एकमेकांच्या हातात विसावलेल्या त्या दोन हातांमध्ये शांतता होती.त्या निःशब्द स्पर्शातून दोघांच्या मनात दडून राहिलेल्या अबोल आठवणी हळूहळू जाग्या होत होत्या.
ऑफिसला येताना-जाता होणाऱ्या सहज भेटी..
रस्त्यात एकमेकांना दिलेलं ते निरागस स्मित..
"दुकान कसं चाललंय?"
"ऑफिसमध्ये कामाचं कसे काय?"
असे साधेसे संवाद..
आजवर तो त्या प्रत्येक गोष्टीकडे केवळ आपल्या मित्राच्या पत्नीबद्दलचा आदर म्हणून पाहत आला होता.
पण काही भावना अशा असतात..
त्या कधी शब्द मागत नाहीत.
त्या कोणावर लादल्या जात नाहीत.
त्या फक्त मनाच्या एखाद्या शांत कोपऱ्यात वर्षानुवर्षे न बोलता जगत राहतात..
आणि आयुष्य एखाद्या अनपेक्षित वळणावर येऊन उभं राहतं, तेव्हा त्या स्वतःच आपलं अस्तित्व जाणवून देतात.
कदाचित..
त्या दोघांच्या आयुष्यात तो क्षण आता आला होता.
काही दिवस दोघांनीही कोणताही उतावळा निर्णय घेतला नाही.
भावनांच्या भरात घेतलेले निर्णय आयुष्यभर टोचत राहतात, याची जाणीव आता दोघांनाही झाली होती.
शेवटी सुषमा आणि इंदर यांचे एकमत झाले.
"आधी पुरण आणि चंदा त्यांच्या मनाचा निर्णय स्पष्ट करू देत. त्यानंतरच आपण आपल्या आयुष्याचा विचार करू."
एका संध्याकाळी सुषमाने पुरण आणि चंदाला समोर बसवले.
घरात विलक्षण शांतता होती.
बराच वेळ कुणीच काही बोलले नाही.
शेवटी सुषमानेच ती शांतता भंग केली.
"मी फक्त एकच प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं उत्तर मनापासून द्या."
ती क्षणभर थांबली.
"तुमच्या दोघांच्या मनात जर खरंच एकमेकांविषयी प्रेम असेल आणि उरलेलं आयुष्य तुम्हाला एकत्र जगायचं असेल तर माझ्याकडून कोणतीही हरकत नाही. फक्त दया किंवा अपराधा पोटी कुणी ही निर्णय घेऊ नका."
हे शब्द ऐकताच पुरणचा चेहरा फिकट पडला.
सुषमा इतक्या मोठ्या मनाने हा प्रश्न विचारेल, याची त्याला कल्पनाही नव्हती.
चंदाने हळूच पुरणकडे पाहिलं.
पुरणनेही तिच्या डोळ्यांत पाहिलं.
त्या दोघांच्या नजरेतलं उत्तर सुषमाने आधीच ओळखलं होतं.
चंदाने शांतपणे पुरणचा हात हातात घेतला.
"हो..मला पुरणसोबतच आयुष्य जगायचं आहे."
पुरणने काही क्षण मान खाली घातली.
नंतर त्यानेही शांतपणे मान डोलावली.
त्या एका क्षणात चारही जणांच्या आयुष्याचा पुढचा मार्ग निश्चित झाला.
त्यानंतर त्यांनी घाईघाईने कोणताही निर्णय घेतला नाही.
दोन्ही कुटुंबांशी चर्चा झाली.
मतभेद झाले.
रागही व्यक्त झाला.
पण शेवटी चारही जणांनी वास्तवाचा स्वीकार केला.
परस्पर संमतीने पुरण आणि सुषमा यांनी आपलं वैवाहिक नातं सन्मानाने संपवलं.
इंदर आणि चंदानेही एकमेकांना दोष न देता आपापल्या नात्याला पूर्णविराम दिला.
काळाने जुन्या जखमांवर हळूहळू फुंकर घातली.
सुषमाच्या अनुपस्थिती मध्ये सुषमाची बहीण तिचे दुकान पाहू लागली.
संध्याकाळी कधी एखाद्या उद्यानात, तर कधी एखाद्या शांत कॅफेमध्ये सुषमा आणि इंदर वारंवार भेटू लागले.
त्या भेटींमध्ये प्रेमाच्या शपथा नव्हत्या..
कोणाला जिंकण्याची धडपड नव्हती..
फक्त दोन तुटलेल्या मनांचे प्रामाणिक संवाद होते.
एकमेकांच्या वेदना समजून घेताना त्यांच्यात विश्वास निर्माण झाला.
त्या विश्वासाने मैत्रीचा हात धरला..
आणि त्या मैत्रीतून नकळत प्रेम जन्माला आलं.
यावेळी ते प्रेम आकर्षणातून नव्हतं.
ते एकमेकांच्या स्वभावाचा, संघर्षाचा आणि आयुष्याने दिलेल्या जखमांचा स्वीकार करून जन्माला आलं होतं.
इंदरने हा निर्णय आपल्या घरच्यांसमोर मांडला.
सुषमा त्याच समाजातील, स्वावलंबी आणि समंजस असल्यामुळे यावेळी घरून विशेष विरोध झाला नाही.
काही महिन्यांनी इंदर आणि सुषमाही विवाहबंधनात अडकले.
पुरण आणि चंदानेही आपल्या नव्या संसाराची सुरुवात केली.
चारही जणांच्या आयुष्याने वेगवेगळे वळण घेतले.
कोणी जिंकले नव्हते..
कोणी हरलेही नव्हते..
जिंकल्या होत्या, त्यांच्या मनात निर्माण झालेल्या सुप्त भावना
आणि मला त्या नेपाळी गुरख्याचं शेवटचं वाक्य आजही आठवतं..
"शाबजी.. दुनिया में रास्ते हरदम बदलते हुए, मैंने बहुत देखे हैं...मगर दिलों का रास्ता कब बदल जाए...यह कोई नहीं जानता."
एवढं बोलून तो गुरखा उठला. हातातली काठी जमिनीवर आपटत आणि नेहमीप्रमाणे..
"जाsगsते रsहो.. जाsगsते रsहो.."
अशी जोरदार हाळी देत तो रात्रीच्या अंधारात हळूहळू अदृश्य झाला.
आम्ही मात्र बराच वेळ निःशब्द बसून राहिलो.
त्या रात्री तो गुरखा निघून गेला..
पण त्याने सांगितलेली चार व्यक्तींच्या आयुष्यातील ती विलक्षण गोष्ट माझ्या मनात कायमची घर करून राहिली.
वर्षानुवर्षांनी सुद्धा त्या कथेतला एक प्रश्न मला सतत अस्वस्थ करत राहिला.
प्रेम खरंच आपण ठरवतो.. की नियती?
कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचाच हा माझा प्रयत्न..
"क्रॉस कनेक्शन."
क्रॉस कनेक्शन ही चार व्यक्तींच्या आयुष्यातील प्रेम, विश्वास, मैत्री, सहवास आणि नियतीच्या अनपेक्षित खेळावर आधारित हृदयस्पर्शी मराठी कथा आहे. माणसाच्या आयुष्यात नाती कधी, कशी आणि कोणत्या वळणावर बदलतात, याचा भावनिक प्रवास या कथेत अनुभवायला मिळतो.
जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, तर ती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच वेगळ्या मराठी कथा, रहस्यकथा, ऐतिहासिक लेख आणि प्रेरणादायी वाचनासाठी Sjomkar Blog | शब्दांची मुशाफिरीला नियमित भेट द्या..
...समाप्त 🖋️📖📚
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved


उत्तर द्याहटवानियतीचे खेळ आणि माणसांच्या निर्णयांचा परिणाम प्रभावीपणे मांडला आहे.
THANK YOU
हटवानात्यांमधील गुंतागुंत आणि भावनांचे सूक्ष्म चित्रण खूप आवडले.
उत्तर द्याहटवाधन्यवाद !
उत्तर द्याहटवाखूपच छान मांडलेले आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद गणेशजी..कृपया सर्व कथा वाचाव्यात आणि आपले असेच सुन्दर अभिप्राय मिळोत 🙏
उत्तर द्याहटवा