मुख्य सामग्रीवर वगळा

“तो अनोळखी, गूढ माणूस: केळवा पुरातील जीवघेणा प्रवास | थरारक सत्यकथा

          तो अनोळखी, गूढ माणूस: केळवा पुरातील जीवघेणा प्रवास | थरारक सत्यकथा..

"तो अनोळखी, गूढ एका जीवघेण्या प्रवासाची कथा” थरारक सत्यकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
गाडी नव्हती ती, लाटांवर हरवलेली नाव,
क्षणोक्षणी जवळ येत होता शेवटचा ठाव |
“जय श्रीराम” म्हणत धरली विश्वासाची आस,
आणि त्या नावातच सापडला जगण्याचा श्वास|


      “रत्नागिरी ते पूर्णगड हा निसर्गरम्य प्रवास, सुंदर कोकणी गावे, किल्ल्याचा इतिहास आणि एक रहस्यमय दंतकथा जाणून घ्या."Ratnagiri Purnagad Travel” स्टोरी मराठीत पुढील प्रमाणे...

   तो अनोळखी, गूढ माणूस: केळवा पुरातील जीवघेणा प्रवास | थरारक सत्यकथा..

           धुवांधार पावसात केळवा परिसरात घडलेला एक जीवघेणा अनुभव अचानक आलेल्या पुरात अडकलेली गाडी, मृत्यूशी झुंज देणारे कुटुंब आणि शेवटच्या क्षणी मिळालेली मदत. “एका जीवघेण्या प्रवासाची कथा” ही धैर्य, संकट आणि देवावरच्या विश्वासाची थरारक खरी कहाणी आहे.
    केळवा परिसरात मुसळधार पावसात घडलेली ही थरारक मराठी सत्यकथा संकटसमयी धैर्य, प्रसंगावधान आणि विश्वास यांची खरी परीक्षा दाखवते. अचानक आलेल्या पुरात एक कुटुंब गाडीसह अडकते आणि प्रत्येक क्षण जीवन-मरणाच्या संघर्षात बदलतो. अशा वेळी अचानक समोर येतो एक गूढ अनोळखी माणूस, जो संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो. तो केवळ योगायोग होता की देवाने पाठवलेला मदतीचा हात? या प्रश्नाचे उत्तर देणारी ही हृदयस्पर्शी आणि थरारक कथा शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवते.
         'केळवा - माहीम' हे पालघर जिल्ह्यामधील पश्चिमेकडील गाव, समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळच आहे. शांत, निवांत, निसर्गसंपन्न वातावरण, आणि समुद्र किनाऱ्या साठी तसेच प्रसिद्ध  “शितला माता” मंदिरासाठी हे गाव जास्त प्रसिद्ध आहे. 
       “शितला देवी ” मंदिराची रचना साधी आणि पारंपरिक आहे, परंतु त्यात भक्तीचा मोठा भाव दडलेला आहे. मंदिर परिसर स्वच्छ, शांत आणि निसर्गरम्य असल्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना मानसिक शांतीचा अनुभव मिळतो. ‘केळवा’ समुद्र किनाऱ्या जवळ असल्यामुळे अनेक पर्यटक देखील या मंदिराला भेट देतात.
        पालघर जिल्ह्यातील 'केळवा बीच' हा महाराष्ट्रातील एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो. मुंबईपासून तुलनेने कमी अंतरावर असल्यामुळे हा बीच विकेंड साठी एक आकर्षक पर्यटनस्थळ बनला आहे. निसर्गरम्य वातावरण, लांब पसरलेला किनारा आणि स्वच्छ हवा यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो. या समुद्र   किनाऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील स्वच्छता आणि कमी गर्दी. मुंबई   जवळील इतर बीच च्या तुलनेत 'केळवा बीच' अधिक शांत आणि निवांत आहे. त्यामुळे येथे येणारे पर्यटक निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण घालवू शकतात. काही ठिकाणी स्थानिक लोक मासेमारी करताना दिसतात, ज्यामुळे कोकणातील पारंपरिक जीवनशैलीचे दर्शन घडते.
         केळवा बीच  जवळच ऐतिहासिक ‘केळवा किल्ला’ आहे, जो या परिसराच्या इतिहासाची साक्ष देतो. तसेच येथे काही छोटे खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही आहेत, जिथे स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेता येतो. पर्यटकांसाठी हा भाग सुरक्षित आणि आनंददायी मानला जातो. 
          ‘केळवा’ या निसर्गरम्य गावाच्या पूर्वेकडे वसलेले ‘झांझरोली’ हे एक छोटे, शांत आणि सुंदर गाव आहे.  पश्चिम रेल्वेवरील "केळवा रोड" स्टेशनच्या पूर्वेला लागूनच हे गाव आहे. स्टेशनच्या बाहेरून रिक्षा सहज उपलब्ध होतात आणि अवघ्या ५ ते १० मिनिटांत गावात पोहोचता येते. शहराच्या गोंगाटा पासून दूर असलेले हे गाव आपल्या साधेपणा मुळे आणि निसर्गरम्य वातावरणामुळे विशेष आकर्षण ठरते. ग्रामीण जीवनशैलीचा खरा अनुभव घ्यायचा असेल, तर ‘झांझरोली’ हे एक उत्तम ठिकाण आहे. 
         ‘झांझरोली’ गावाभोवती हिरवागार परिसर, शेतीची क्षेत्रे आणि झाडांची दाटी दिसून येते. येथील लोक मुख्यतः शेती आणि पारंपरिक व्यवसायांवर अवलंबून आहेत. भातशेती, आणि इतर पिके ही येथील मुख्य उत्पन्नाची साधने आहेत. गावातील वातावरण अत्यंत शांत, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त असल्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांचे जीवन साधे आणि आनंदी आहे. मुंबई, वसई - विरार  कडील अनेकांनी स्वतःच्या जागा घेऊन तेथे बंगले बांधलेले आहेत. सुट्टीच्या दिवसात सर्व घरे आणि बंगले भरलेले असतात. 
        या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील नैसर्गिक सौंदर्य. पावसाळ्यात हा परिसर विशेषतः हिरवाईने नटलेला दिसतो. जवळच असलेले ‘झांझरोली डॅम’ हे या भागातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जिथे लोक सहलीसाठी आणि विश्रांतीसाठी येतात. या ठिकाणा मुळे ‘झांझरोली’ गावाला पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्व प्राप्त झाले आहे. पावसाळी पाणी अडवून त्या पाण्यावरील हे धरण आहे, हे बारमाही पाण्याने भरलेले असते. या धरणाच्या तलावात असलेले पाण्याचे ‘नैसर्गिक झरे’ या विस्तीर्ण तलावातील पाणी कधी आटू देत नाही. या तलावातून  'केळवा'पंचक्रोशीतील अनेक गावांना पाणीपुरवठा होतो.या तलावाच्या मागे असलेल्या ‘तांदुळवाडी’ डोंगर रांगा मधून पावसाळ्यात अनेक झरे आणि धबधबे या तलावाला येऊन मिळत असतात.तांडुळवाडीच्या डोंगर रांगेत ‘तांदुळवाडी किल्ला’ वसलेला आहे.हा मध्ययुगीन काळात म्हणजे १४ ते  १६ व्या शतकात आणि बहुतेक ‘शिलाहार’ राजवटीत बांधला गेलेला असावा.
       अशा प्रकारे केळवा पूर्वेकडील ‘झांझरोली’ गाव हे निसर्ग, साधेपणा आणि ग्रामीण संस्कृती यांचे सुंदर उदाहरण आहे. शहरातील धावपळीच्या जीवनातून काही क्षण शांततेत घालवण्यासाठी हे गाव एक आदर्श ठिकाण आहे. त्यामुळे झांझरोली हे केवळ एक गाव नसून, एक सुंदर आणि शांत अनुभव देणारे ठिकाण आहे.
       मुंबई, विरार आणि पालघरच्या इतक्या जवळ असूनही हे नितांत सुंदर गाव आजही थोडे अलिप्तच वाटते. सध्या केळवा रोडच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी रेल्वे ब्रिज खालून जाणारा एकच रस्ता उपलब्ध असून, तोच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी एकमेव मार्ग आहे. दुसरा कोणताही पर्यायी रस्ता नसल्यामुळे विशेषतः पावसाळ्यातील दोन-तीन महिने परिस्थिती अधिकच कठीण होते. रिक्षा आणि लहान खासगी वाहने गावात पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता या समस्येवर अल्पावधीत दिलासा मिळणार आहे. केळवा रोड पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी नवीन पुलाला मंजुरी मिळाली असून त्याचे भूमिपूजन ही पार पडले आहे. गावातून जाणाऱ्या मुंबई - अहमदाबाद 'बुलेट ट्रेन'चा ब्रिज पूर्ण झाल्यानंतर या नवीन फ्लायओव्हर पुलाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळते.   
           भविष्यात हा पूल तयार झाल्यावर या सुंदर गावाला योग्य ती जोडणी मिळेल आणि विकासाला नवी दिशा मिळेल.  माझ्या परिवारासोबत प्रत्येक पावसाळ्यात मी या रस्त्यावरून अनेक वेळा आमच्या  फोर व्हीलरने  प्रवास केलेला आहे. हा मार्ग माझ्यासाठी बिलकुल नवीन नव्हता. प्रत्येक वळण, प्रत्येक खड्डा, आणि पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याची मला सवय झाली होती. कित्येकदा गुडघाभर पाण्यातून गाडी चालवत आम्ही सुरक्षित बाहेर पडलेलो आहोत. त्यामुळे मनात एक आत्मविश्वास होता.“हा रस्ता आपल्याला चांगलाच माहिती आहे.”
       सन २०२२ चा तो पावसाळा आमच्या साठी काही वेगळाच ठरणार होता.आमचे दर महिन्याला गावाकडे जाणे होते परंतु त्या ‘मे’ महिन्यात बिलकुल जाणे झाले नाही म्हणून आम्ही एक आठवडा राहायला जायच्या  बेताने तयारी केली,तो 'जून २०२२' चा शेवटचा आठवडा होता. पाऊस  चांगल्यापैकी सुरू झालेला होता. मी त्याच महिन्यात म्हणजे  ‘जून २०२२’ ला प्रमोशन ने मुंबईत  चार वर्षानंतर परत आलो होतो. त्यामुळे त्या वर्षीच्या पालघर मधील पावसाचा मला बिलकुल अंदाज आला नव्हता. मुंबईत नाही परंतु पालघर जिल्ह्यात व्यवस्थित पाऊस पडत होता. तलाव, धरणे, ओढे, नाले जोरदार  वाहायला लागले होते. मुंबई  मध्ये पाऊस नाही म्हणजे पालघर मध्ये सुद्धा पाऊस नसेल म्हणून मी पालघर मधील कुणा मित्रांकडे या बाबत चौकशी  केली नाही. 
       आदल्या रात्री जाण्याची सर्व तयारी पूर्ण झाली. त्याच रात्री पासून मुंबईत गोरेगावात जोरदार पाऊस सुरू झाला होता. दुसऱ्या दिवशीही  पावसाने फेर धरला होता. पाऊस थांबेल या आशेवर गाडीत सकाळी सामान भरले आणि पाऊस थांबायची वाट पाहत बसलो आणि तासाभरात पाऊस थांबला म्हणून परिवारासह निघायची तयारी केली. सोबत जवळच्या  एक वृद्ध महिला नातेवाईक सुद्धा होत्या.  रविवार असल्याने जास्त ट्रॅफिक नव्हते. हवा कुंद, थंड आणि धूसर होती. त्या वातावरणाचा आनंद घ्यायचा होता, पण गाडीतील एसी बंद करता येत नव्हता, नाहीतर पुढील काच लगेच धुरकट होऊन वाहन चालवणे कठीण झाले असते.  
        गाडीची 'इंडिकेटर लाईट' आणि 'वायपर' चालू करून  आमची गाडी ७० च्या स्पीडने धावत होती. पावसाळी वातावरणात गाडी स्कीड होण्याची जास्त शक्यता असल्याने गाडीचा वेग वाढवता येत नव्हता. मुंबई-अहमदाबाद हायवे वरून आम्ही ‘वरई’ फाट्यातून ‘केळवे रोड’ कडे जायला शिरलो आणि  जोरदार पाऊस सुरू झाला तो काही थांबायचे नाव घेत नव्हता.
      त्या धुवांधार पावसात माझी गाडी बिनधास्त धावत होती. मध्ये मध्ये रस्त्यावर झाडांच्या फांद्या कोसळलेल्या दिसत होत्या. निसर्गाचे रौद्ररूप हळूहळू जाणवायला लागले होते. मध्येच रस्त्यामध्ये अचानक आमच्या गाडी समोर झाडाची एक फांदी येऊन पडली,नशीब तेव्हा आमची गाडी थोडी लांब होत.ती फांदी लांब लचक असल्याने त्या फांदीने तो निमुळता रस्ता पूर्ण व्यापून टाकला होता. त्यावेळी त्या रस्त्यावर इतर कोणतेही वाहन नव्हते. फांदी हटवायला, गाडीतली छत्री उघडून मी  जरी बाहेर पडलो असलो तरी  ती फांदी हटवताना,मी अर्धा अधिक भिजून गेलो होतो. परत ओल्या अंगाने गाडीत बसल्यावर गाडीतील 'एसी' मुळे माझे पूर्ण अंग थंड पडले होते. 
      दुपारचे तीन वाजले होते. अशा सर्व परिस्थिती आम्ही केळवा रोड रेल्वे ब्रिज खाली पोहोचलो, आज  तर नेहमीपेक्षा खूप जास्त पाणी साचलेले दिसत होते. मी गाडी थांबवून,स्टिअरिंग वर दोन्ही हात ठेवून, पाच मिनिटे फक्त पाण्याकडे बघत  होतो.“ पुढे जायचे का,नाही जायचे ?” या विचारात.
         मनात हा सतत विचार सुरू होता.ते पाणी पाहून बायको आणि मुलगी सुद्धा चिंताग्रस्त झालेत. तसे पहायला गेले तर केळवा रोड रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला गाडी पार्क करायची दोन-तीन सुरक्षित ठिकाणे मला माहिती होती. त्यामुळे मी परत फिरण्याचा विचार सुरू केला.
         मी रिव्हर्स गिअर टाकणार, इतक्यात अचानक,त्या ओस पडलेल्या रस्त्यावर एक माणूस दिसला. पावसात पूर्ण भिजलेला,हळूहळू चालत होता.डोके  खाली वाकवून चालत असलेला.पावसाचे थेंब त्याच्या अंगावर जोरात आपटत होते, पण तो मात्र निर्विकार चालत होता.
        मागील पाच मिनिटांत त्या रस्त्यावर एकही माणूस आम्हाला दिसला नव्हता.धुवांधार पावसामुळे रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य झालेला होता.आणि अशा स्थितीत तो मध्येच अचानक कुठून आला ? हा प्रश्न क्षणभर माझ्या मनात चमकून गेला,पण त्यावर विचार करायला मला  वेळच नव्हता.माझ्यासाठी महत्त्वाचे होते,हा रस्ता कसा पार करायचा ? भीती, शंका, आणि कुतूहल,सगळे बाजूला सारून मी फक्त एकच निर्णय घेण्याच्या तयारीत होतो.
        तत्पूर्वी या स्थानिक माणसाला एकदा या परिस्थिती बाबत विचारून घेऊयात असे मनात आले. तो ड्रायव्हरच्या विरुद्ध बाजूने जात होता.म्हणून मी लगेच बायकोला म्हटले की “त्याला विचार ,या पाण्यातून गाड्या जात आहेत की नाही ?” तिने काच खाली करून आवाज दिला ,“भाऊ, आज या पाण्यातून गाड्या गेल्या आहेत का?”तो माणूस क्षणभर थांबला,आमच्याकडे पाहिले आणि लगेच म्हणाला “हो, हो,खूप गाड्या गेल्या आहेत आज.” त्याचा आवाज खूप ठाम होता,त्याने क्षणाचाही विलंब केला नाही,जणू तो खात्रीनेच सांगत होता आणि आम्ही त्याच्या उत्तरातील आत्मविश्वास पाहता,त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.
      मी रिव्हर्स गिअर काढून फर्स्ट गिअर टाकला.मनात थोडी भीती होती पण मागील दहा वर्षांचा चांगला अनुभव सुद्धा  गाठीशी होता. मी जोरात म्हटले “जय श्रीराम ” आणि मी गाडी पाण्यात उतरवली. सुरुवातीला,सगळे काही  व्यवस्थित सुरू होते,गाडी हळूहळू पुढे सरकत होती. पाण्याचा अंदाजही नियंत्रणात वाटत होता. क्षणभर वाटले,“काही प्रॉब्लेम नाही,जाईल आपली गाडी.”पण काही सेकंदातच, एकूणच परिस्थिती बदलायला लागली आणि जीवघेणा थरार सुरू झाला..
       गाडी त्या खोलगट रस्त्यावरील पाण्यात उतरवल्यावर गाडीच्या बोनेट पर्यंत पाणी आले होते परंतु गाडी बंद पडली नाही. म्हणून बरे वाटले. गाडी फर्स्ट गिअर मध्येच होती. गाडी पाण्याने भरलेल्या रस्त्यावरुन चालत असताना कधीही गाडीला ब्रेक लावायचे नाही, हा माझा शिरस्ता होता. त्याप्रमाणे मी काहीही होवो, गाडीला ब्रेक मारायचाच नाही हा निश्चय केला होता. आमची गाडी तो पाण्याने भरलेला रस्ता लगबग पार करून मोकळ्या,सुक्या रस्त्यावर जाणार इतक्यात भला मोठा पाण्याचा लोंढा आमच्या गाडीवर येऊन आढळला. जशी समुद्रात मोठी लाट येते आणि त्या खाली छोटी बोट लपून जाते. अगदी  तसेच आमच्या गाडीचे झाले होते.
        पाण्याच्या त्या मोठ्या लोंढ्यात आमची गाडी बुडून गेली होती. त्या लोंढ्याचे पाणी बोनेट मध्ये शिरले होते. मोठ्या संकटात जसा ड्रायव्हरचा पाय ब्रेक वर जातो. तसा पाण्याचा मोठा लोंढा पाहून माझा सुद्धा पाय सटकन ब्रेकवर गेला आणि आमची गाडी बंद पडली. पाणी हळूहळू गाडी मध्ये शिरायला सुरुवात झाले होते.एक क्षण असा आला की गाडी पूर्णपणे पाण्यात अडकली आणि तरंगत होती. गाडीवरचे पाणी ओसरून गाडीच्या खिडक्यांच्या काचा पर्यंत आले होते.आमची गाडी पाण्यात पोहत होती. थोडावेळ बोटी सारखा अनुभव आला.बाहेर मुसळधार पाऊस, आजूबाजूला कोणीच नाही. त्या क्षणी जाणवले, हा फक्त प्रवास नव्हता,तर जीव आणि मृत्यू यांच्यातला संघर्ष होता.
         पाणी आत शिरायला लागले तसतसे प्रत्येक सेकंद जड वाटायला लागला.गाडीच्या आतमध्ये थंड पाणी साचत होते. पाय पूर्ण भिजले होते,आम्ही गाडीचे दरवाजे उघडून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतो,पण दार काही केल्या उघडेना.बाहेरचे पाणी इतके प्रचंड होते की दरवाज्यावर दबाव आला होता. आमची भीती वाढत होती,वेळ हातातून निसटत होती.क्षणभर वाटले की आता आपण अडकलो आहोत.सुटका नाही ,पण त्या क्षणी हार मानणे शक्य नव्हते.
        मी क्षणाचाही विलंब न करता माझ्या बाजूची काच खाली केली आणि मागे वळून जोरात म्हणालो, “सगळ्या काचा खाली करा!” काचा खाली होताच आत-बाहेरच्या दाबात थोडासा फरक पडला. मी पूर्ण ताकदीनिशी दरवाजावर जोर लावला,एकदा, दोनदा आणि तिसऱ्याच प्रयत्नात दरवाजा उघडला.क्षणात पाणी आत घुसले पण त्याचक्षणी आम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला.
         एक-एक करत आम्ही सगळे बाहेर आलो,त्या धुवांधार पावसात उभे राहिलो,भिजलेले,हादरलेले पण जिवंत. आता आम्ही तिघेही सुरक्षित झालो होतो, मात्र ती वृद्ध नातेवाईक आणि माझ्या गाडीवरचे संकट अजूनही 'आ' वासून उभे होते. माझी नेहमी एक सवय आहे,पावसाळ्यात गाडी चालवताना माझ्या बाजूची काच मी एक इंचभर उघडी ठेवतो.आज,तीच छोटी सवय आमच्यासाठी जीवनदान ठरली. जर गाडी पूर्णपणे लॉक झाली असती तर निर्मनुष्य रस्त्यावर कोणी मदतीला आले नसते आणि कदाचित, त्यामुळे आम्ही गाडीतच गुदमरून संपलो असतो,पण तसे झाले नाही.कारण त्यादिवशी,त्याक्षणी आणि पुढेही कोणीतरी आमच्यासोबत उभे होते.“प्रभू श्रीरामानेच आम्हाला हात दिला होता”
       मुलगी,बायको आणि नातेवाईक महिलेच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती पण त्याक्षणी मला घाबरून चालणार नव्हते. दिर्घ श्वास घेऊन मी स्वतःला सावरले.“सगळे शांत बसा काही होणार नाही ” मी सर्वांची  मनस्थिती  स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला खरा पण आतून मी जास्त हादरलो होतो.
        मी, बायको आणि मुलगी कसे बसे आम्ही बाहेर पडलो पण आमच्या वृद्ध नातेवाईक महिला अजूनही त्या गाडीत अडकून पडलेल्या होत्या.त्या ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या,वय ८२ आणि वजन खूपच जास्त असल्याने आम्ही तिघांनी मिळून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण,व्यर्थ,काही केल्या त्यांना आम्हाला बाहेर काढता येत नव्हते. जरी तिघांनी आम्ही त्यांना ओढून ताणून बाहेर काढले असते तरी त्या कंबरे भर पाण्यात बुडाल्या असत्या, त्या स्वतःहून उभ्या राहू शकत नसल्याने  त्यांना त्या स्थितीत उचलून उभे करणे,आम्हा तिघांनाही   अशक्यप्राय होते जरी तसे केले असते तरी नको ते आक्रित घडले असते. त्या पाण्यात बुडाल्या असत्या. 
       हातातून वेळ झरझर निसटत होती, गाडी पाण्यात तरंगायला लागली होती आणि समोरून येणाऱ्या प्रचंड प्रवाहाच्या रेट्याने ती हळूहळू मागे ढकलली जात होती.माझ्या डोळ्यासमोर एक भयानक चित्र उभे राहिले.थोड्याच अंतरावर तो रस्ता संपून पाणी प्रचंड वेगाने एका मोठ्या ओढ्यात जात होते. त्या ओढ्याला पुढे नदीचे स्वरूप आले होते.जर गाडी त्या जोरदार प्रवाहा सोबत वाहून  गेली असती तर ती पुढे थेट त्या नदीच्या पाण्यात बुडाली असती.बायको आणि मुलगी जोरजोरात ओरडत होत्या,रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य होता. मदतीचा कुठेही पत्ता नाही,त्याक्षणी आम्ही पूर्णपणे एकटे होतो,पुढून येणाऱ्या पाण्याच्या प्रचंड रेट्यामुळे मागे जाणाऱ्या गाडीला, मागच्या बाजूने थोपविण्याचा  मी अयशस्वी प्रयत्न करत होतो. पायाखालचे शेवाळ आणि घसरडे पाणी यामुळे मला पाय रोवून उभे राहणे कठीण जात होते.
         प्रवाह इतका जोराचा होता की गाडी  माझ्यासह  मागे रेटली जात होती.भरलेले सामान आणि  वृद्ध महिला नातेवाईक आत असल्यामुळे गाडीचे वजन जास्त झाले होते.हीच एक गोष्ट आमच्यासाठी फायदेशीर ठरत होती. गाडी जड असल्याने ती सहज  वाहून जात नव्हती.तरी सुद्धा मी आणि गाडी पुढून येणाऱ्या पाण्याच्या प्रचंड रेट्यामुळे हळूहळू मागे सरकले जात होतो.दरम्यान बायको आणि मुलगी त्या वृद्ध नातेवाईक महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होत्या पण त्यांच्या प्रयत्नाला सुद्धा अपयश येत होते.
       ही जीवघेणी परिस्थिती काही मिनिटे सुरूच होती आणि अचानक माझ्या पायाला काहीतरी घट्ट लागले जणू एखादा सिमेंटचा वीतभर उंचीचा कट्टा. त्यावर मी पटकन माझे दोन्ही पाय घट्ट रोवले, क्षणात माझ्या पायांना मजबूत आधार मिळाला.मी पहिल्यांदाच थोडा नियंत्रणात आलो.मी जोरात ओरडलो.“अरे ! दगड घेऊन या! लगेच!”पण पावसाचा आणि पाण्याचा प्रचंड आवाज त्यांना काही ऐकूच जात नव्हते.मी पुन्हा पूर्ण ताकदीने ओरडलो ,“लगेच दोन मोठे दगड घेऊन या!!!”
        या वेळी  माझा आवाज त्यांना ऐकू गेला.त्या दोघी  कंबरेभर पाण्यातून हळू हळू त्या खोलगट रस्त्यावरून मोकळ्या  रस्त्यावर आल्यात आणि काही क्षणात त्यांनी दोन मोठे दगड आणले. त्यांनी क्षणांचा विलंब न करता दोन्ही चाकाखाली ते दोन दगड घट्ट अडकवले आणि क्षणात गाडी स्थिर झाली.जोरदारा प्रवाह अजूनही सुरूच होता आणि पाऊस सुद्धा अजूनही कोसळतच होता.
       मी पटकन मोबाईल काढला,हात भीतीने आणि थंडीने थरथरत होते.मनात एकच प्रश्न होता आता नेटवर्क असेल का?आणि नशिबाने मोबाईलला नेटवर्क होते. मी एक सेकंदही न घालवता आमच्या बंगल्यासमोर राहणारे आमचे शेजारी,जे सर्व कामात पारंगत आहेत, सिव्हिल आणि फॅब्रिकेटर कॉन्ट्रॅक्टर   'महेश भाऊं'ना फोन लावला. माझ्या आवाजात कंप होता, त्यांना सर्व  परिस्थिती सांगितली. त्यांनी एकच उत्तर दिले.“थांबा  मी लगेच येतो!” त्या दिवशी जोरदार पावसामुळे त्यांच्या साइटचे काम बंद होते आणि कदाचित तेच आमचे नशीब होते.काही मिनिटांतच,पावसाच्या जोरदार धारा चिरत,त्यांचा टाटा टेम्पो येताना दिसला.
       सोबत कामगार सुद्धा होते.त्यांनी सोबत येताना  गाडी ‘टो’ करण्याचे  सगळे  सामान आणले होते ते पाण्याच्या बाहेर टेम्पो उभा करून लगेच कामाला लागले.लोखंडी साखळदंड गाडीला घट्ट बांधला,मला स्टेअरिंग वर बसायला सांगितले आणि एक जोरदार झटका देत गाडी हळूहळू पाण्याबाहेर ओढली जाऊ लागली.प्रत्येक सेकंद महत्त्वाचा होता आणि काही क्षणांतच आम्ही सगळे गाडी सह, त्या मृत्यूच्या दाढेतून सही सलामत बाहेर पडलो..पावसात उभे राहून, दिर्घ श्वास घेत,एकमेकांकडे पाहत,फक्त एकच भावना होती.आपण वाचलो.त्या वृद्ध नातेवाईक महिला सुद्धा सुरक्षित होत्या.मुलगी आणि बायको माझ्या जवळ होत्या.आणि मी आतून पूर्ण हादरलो होतो.
     “त्या दिवशी पाण्याचा प्रवाह खूपच जोरात होता पण आमच्या नशिबाचा प्रवाह त्याहूनही ताकदवान ठरला.” आमची गाडी पूर्णपणे पाण्यात भिजली होती.गाडीतले सगळे  घर सामान , प्रत्येक वस्तू , पूर्ण भिजून वापरण्याच्या पलीकडे गेले होते.
         गाडीची ब्रेक सिस्टमही पूर्ण निकामी झाली होती पण इथेही ‘महेश भाऊ’ आमच्यासाठी मदतगार ठरले .दुसऱ्याच दिवशी त्यांनी गाडी दुरुस्त करून अशी तयार केली की आम्हाला पुन्हा मुंबईला परतता आले.त्यावेळी त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली “जेव्हा ‘झांझरोली डॅम’ ओव्हरफ्लो होतो, तेव्हा त्याचे पाणी अचानक सोडले जाते,आणि त्यामुळे ओढ्याला क्षणात पूर येतो.”म्हणजे ज्या क्षणी आम्ही गाडी पाण्यात उतरवली होती , तेव्हा त्याच कारणाने पाण्याचा प्रचंड लोंढा आला होता. दुर्दैवाने आमची गाठ त्या लोंढ्याशी पडली होती. त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की “तुमचीच गाडी नाही,अशा खूप गाड्या बंद पडतात तिथे.”
        एक आठवड्याने  आम्ही परत मुंबईला निघालो,त्यावेळी पावसाने थोडी उसंत घेतली होती.ब्रिजखालचे पाणी कमी झाले होते. जणू काही तिथे कधी काही घडलेच नव्हते,पण खरी धक्का देणारी गोष्ट काही दिवसांनी समोर आली.पावसाने पुन्हा जोर धरला,आणि टीव्हीवर 'ब्रेकिंग न्यूज' आली “केळव्याच्या रेल्वे ब्रिज खाली एक सामानाने भरलेले वाहन पाण्यासह वाहून गेले. तो व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला.कारण ती परिस्थिती आम्ही स्वतः अनुभवली होती.फरक इतकाच त्यांच्याकडे नुकसान होण्यासारखे वाहन आणि सामान होते आणि आमच्याकडे,आमची सर्वात मौल्यवान ,आमची माणसे होती.ज्यांची किंमत कधीच मोजता येणार नाही.
       त्या दिवशी मी “जय श्रीराम” म्हणत गाडी पाण्यात उतरवली खरी,पण त्या “प्रभू श्रीरामानेच” पुढची सगळी परिस्थिती सांभाळली होती. एक बरे तो रस्ता त्या वेळी निर्मनुष्य होता. नाहीतर कुणा अतिउत्साही व्यक्तीने त्याचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ सर्वत्र प्रसारित केला असता.एका अर्थी ते सुद्धा बरे झाले तेव्हा रस्ता निर्मनुष्य होता. आजही एक प्रश्न अनुत्तरित आहे . निर्मनुष्य रस्त्यावर,अचानक समोर आलेला तो माणूस आणि त्याने दिलेला खोटा आत्मविश्वास,तो अचानक दिसेनासा झालेला गूढ व्यक्ती नेमकी  कोण होती ? त्याच्या रूपाने आमचा काळ तर आला नव्हता ?
      “आमची वेळ आली होती आणि आमचा काळ सुद्धा ,त्या अनामिक,गूढ व्यक्तीच्या रूपाने समोर आला होता. मात्र "प्रभू श्रीरामाचे” नाम घोषाने त्या काळाला कोणतीच संधीच मिळाली नाही कारण “प्रभू श्री रामाचा नाम महिमा.
      ही लघु कथा फक्त एक अनुभव नाही, तर आयुष्याने दिलेला एक मोठा धडा आहे  निसर्गासमोर माणूस किती छोटा आहे आणि संकटाच्या क्षणी धैर्य, योग्य निर्णय आणि देवावरचा विश्वास किती महत्त्वाचा असतो.
       जर तुम्हालाही अशीच थरारक, वास्तव अनुभवांवर आधारित कथा आवडत असतील, तर हा ब्लॉग नक्की फॉलो करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. कदाचित ही कथा कोणासाठी तरी सावधानतेचा इशारा ठरेल.

                                                                               समाप्त 🖋️📖📚
       

 🔗  गेस्ट हाऊस - या गेस्ट हाऊसमध्ये जाण्याची चूक करू नका'| थरारक मराठी भयकथा

     एका पावसाळी रात्री घडलेला खरा अनुभव, जिथे गेस्ट हाऊसमध्ये काहीतरी अनोळखी शक्ती होती. ही Horror Story Marathi वाचल्यावर अंगावर भीतीचा शहारा नक्कीच येईल..वाचा पुढे..👉


✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.


तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी - लोगो






📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook

टिप्पण्या

  1. बंधू,अंगावर शहारे आणणारा अनुभव.नशीब बलवत्तर म्हणून या जीवघेण्या प्रसंगातून श्रीरामाच्या कृपेने सुटका झाली.पाणी आणि अग्नी यांच्याशी खेळू नये म्हणतात ते यासाठीच.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...