मुख्य सामग्रीवर वगळा

सोनापूर - अंत्य नव्हे, अनंत यात्रा | जीवन, मृत्यू आणि वास्तवाचा विचारप्रवर्तक मराठी लेख..

                'सोनापूर - अंत्य नव्हे, अंतिम यात्रा'|जीवन, मृत्यू आणि वास्तवाचा विचारप्रवर्तक मराठी लेख  

सोनापूर - अंत्य नव्हे, अनंत यात्रा | जीवन, मृत्यू आणि वास्तवचा विचारप्रवर्तक मराठीसोनापूर - अंत्य नव्हे, अनंत यात्रा | जीवन, मृत्यू आणि वास्तव  कथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
जीवन जगण्यासाठी
मनुष्य झगडत असतो, धडपडत असतो
रामनामाला मात्र कायम विसरत असतो।
क्षणभंगुर जीवनी ठसा उमटावा अमिट
असे कर्म आणि कार्य करावे उचित।
सर्वांच्या मनी उरावे चिरस्मृतीत॥
      🔗 पक्का बदाम| गिरगावातील जपानी गार्डन, कब्रस्तान आणि बालपणीच्या आठवणींची मराठी कथा..


मी माझ्या मागच्या लेखात बडा कब्रस्तान, हिंदू स्मशानभूमी आणि सोनापूर या नावाचा उल्लेख केला होता. प्रत्यक्षात सोनापूर गल्ली काय आहे, हे वाचकांना स्पष्ट व्हावे म्हणून तिची रंजक माहिती पुढे देत आहे.

       "सोनापूर - अंत्य यात्रा नव्हे ,एक अंतिम यात्रा"|जीवन, मृत्यू आणि वास्तवाचा विचारप्रवर्तक मराठी लेख..

   'सोनापूर-अंत्ययात्रा नव्हे, एक अंतिम यात्रा' हा लेख जीवनाच्या अंतिम सत्याकडे शांत आणि विचारपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करतो. मुंबईतील सोनापूर श्मशानभूमी, तेथील अनुभव, अंतिम प्रवासाचे वास्तव आणि मृत्यूकडे पाहण्याचा मानवी दृष्टिकोन यांचा या लेखात संवेदनशील वेध घेतला आहे. आयुष्याचे क्षणभंगुर सत्य, नात्यांचे महत्त्व आणि माणुसकीची जाणीव करून देणारा हा भावनिक आणि विचारप्रवर्तक मराठी लेख प्रत्येक वाचकाला अंतर्मुख करतो

       या लेखाच्या शीर्षकाचा अर्थ अंत्ययात्रा ही त्या निचेतन कलेवरची असते.  आत्मा मात्र अनंत यात्रेवर निघालेला असतो.हा शेवट नाही तर,अनंत( कधीही न संपणाऱ्या) प्रवासाची  सुरुवात आहे.ज्या प्रवासाला कुठे अंत असतो का ? हे कुणालाच अजून माहित  पडलेले नाही .अशा अर्थी या लेखाचे शिर्षक आहे.मानवाच्या शेवटच्या प्रवासाला अंत्य यात्रा, शवयात्रा, प्रेतयात्रा असे म्हटले जाते. उर्दूत जनाजा, ख्रिश्चन धर्मात फ्युनरल प्रोसेशन, तर पारशी धर्मात दख्मा विधी असे संबोधले जाते. दक्षिण मुंबईतील पारशी लोकांचे ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ हे मलबार हिल येथे आहे, तर ख्रिश्चन धर्मियांची दफनभूमी वरळी येथे आहे.
    ख्रिश्चनांच्या अंतिम यात्रेत मृत व्यक्तीला कॉफिनमध्ये ठेवून, पुरुषांना सूट-बूट तर महिलांना पांढरे वस्त्र परिधान केले जाते. शांत फ्युनरल बँडच्या सुरात त्यांना Hearse व्हॅनमधून नेले जाते. पारशी समाजाची अंत्ययात्रा प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव नाही फक्त रतन टाटा यांच्या निधनावेळी टीव्हीवर जी पाहिली, तेवढीच.
    कधी तरी गिरगाव चौपाटीवर गेल्यावर उत्तरेकडे मलबार हिल वरील टॉवर ऑफ सायलेन्सवर गिधाडे घिरट्या घालताना दिसायची. आता मात्र गिधाडांची संख्या घटल्यामुळे त्यांच्या विधींमध्ये बदल होत असल्याचे ऐकिवात आहे.
    दक्षिण मुंबईतील एकमेव विद्युत दाहिनी ही चंदनवाडीत आहे, जी आमच्या सोनापूर लेनजवळ आहे. पूर्वी चंदन उपलब्ध होत असल्यामुळेच कदाचित त्या भागाला चंदनवाडी हे नाव पडले असावे.
    गिरगावातील वाड्यांची नावे ही व्यक्ती विशेष, स्थान, व्यवसाय किंवा इतर विशेषणावरून ठेवली जात होती. सोनापूर हे नाव फक्त स्मशानभूमी भागाला दिले जाई,जीवनाचा शेवट सोन्यासारखा मूल्यवान ठरावा, या अर्थाने.
   मी सोनापूर लेनमध्ये वयाच्या आठव्या वर्षापासून वयाच्या जवळपास २८वर्षे पर्यंत राहिलो. नंतर विरारला स्थलांतर केले. १९७७-७८ च्या सुमारास या गल्लीत प्रसिद्ध पत्रकार श्रीकांत पालेकर यांच्या नावाने सोनापूर गल्लीचे नामकरण झाले. त्या नामफलकाचे अनावरण तत्कालीन महापौर मुरली देवरा यांच्या हस्ते झाले,तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे.
    मी आठव्या वर्षी गावावरून मुंबईला आलो तेव्हा मला मुंबईत बिलकुल करमेना, माझे मन सतत दुःखी असायचे. गावाकडची सतत आठवण यायची तेव्हा मनातील दुःख विसरण्यासाठी मी घरातील खिडकीतून रस्त्यावर एकटक पाहत राहायचो,तेव्हा अनेक प्रेते त्या रस्त्यावरून जाताना मला दिसायची, या पूर्वी कधीही न पाहिलेली भयकारी दृश्ये एकसारखी पाहून सुद्धा, माझे बालमन त्यावेळी विदीर्ण झाले नाही. हे  माझे सुदैव.
    ही सोनापूर गल्ली म्हणजे पूर्ण स्मशान नव्हे,हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्या भागात सुशिक्षित, मध्यमवर्गीय मराठी कुटुंबे राहत होती. एकनाथ सोलकर, दीपक शिर्के, जयवंत वाडकर यांसारखे अनेक नामवंत सेलिब्रिटी तिथे राहत होते.
    हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम बडा कब्रस्तान यांचा प्रवेश सोनापूर गल्लीतूनच होता. दोन्ही स्मशाने गल्लीच्या शेवटी, मरीन लाईन्स स्टेशनसमोर पूर्वेकडे आहेत. सेलिब्रिटींच्या अंत्ययात्रेला तिथे प्रचंड गर्दी होत असे.
    आम्हाला मरीन लाईन्स किंवा चौपाटीला जायचे असेल तर त्या स्मशानातूनच जावे लागे,वेळ कोणतीही असो. त्या वाटेवर तिरडी ठेवलेली असायची, आणि दुःखी नातेवाईकांच्या गर्दीतून वाट काढत आम्हाला पुढे जावे लागायचे.
     हिंदू धर्मात प्रेतयात्रेतून आल्यावर आंघोळ करण्याची पद्धत आहे, पण आमच्यासाठी ती रोजचीच बाब असल्याने कोणीही तसे करत नसे. काही गोष्टी या अपवादात्मक असतात,ही सुद्धा त्यापैकीच एक असावी.
      वेगवेगळ्या धर्मांच्या प्रेतयात्रा पाहत आम्ही मोठे झालो. “जय राम श्रीराम”, “जय जिनेंद्र”, “बुद्धं शरणं गच्छामि”, “ला इलाहा इल्लल्लाह” हे सारे स्वर आजही कानात घुमतात. वैष्णव पंथीय गोविंदा, गोविंदा म्हणत जायचे.
   मुस्लिम जनाजा मध्ये नियाझ किंवा फतेहा म्हणून अन्न वाटले जाते.मुस्लिम जनाज्यात मोठी गर्दी असते तर हिंदू प्रेतयात्रेत त्या तुलनेने मर्यादित लोक असतात, काही प्रेतयात्रा अत्यंत साध्या, तर काही अतिशय भव्य असत. 
      लहान मुले किंवा अर्भके यांची प्रेत यात्रा नसते.वडील किंवा इतर तीन - चार नातेवाईक पातळ चटई मध्ये गुंडाळलेले ते शव घेऊन शांतपणे घेऊन जात असतात.बहुतेक वेळा हे सुद्धा कळत नसायचे,की ते हातातून काय घेऊन चालले आहेत ते. हिंदू स्मशान भूमीत असलेल्या मोकळ्या जागेत त्याचे दफन व्हायचे.ती प्रेते जाळली जात नाहीत.
   काही वेळा पैसे प्रेतावर पैसे उधळले जायचे. आणि ते वेचायला गरीब मंडळीची धावपळ असायची. आम्हाला कधी गल्लीत पैसे पडलेले दिसले तरी आम्ही ते उचलायचे नाहीत. किन्नर समाजाच्या अंत्ययात्रा रात्री उशिरा येत, आणि आम्हाला त्या पाहण्यास घरच्यांची बंदी होती.
     BMC च्या Hearse व्हॅनमधून बेवारस प्रेते नेली जात असत. त्या गाडी मधून येणाऱ्या विशिष्ट वासा वरून आम्हाला ती ओळखू यायचे.
    सोनापूरच्या आसपास ३-४ मोठ्या बाजारपेठ असल्याने तो रस्ता कायम गजबजलेला असायचा. त्या गर्दीतून प्रेतयात्रा सावकाशपणे मार्ग काढत जायच्या तेव्हा जीवन आणि मृत्यू यांचा संगम कसा असतो ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.प्रेत यात्रांना त्या गर्दीतून वाट काढत जावे लागायचे. पादचारी कोण आणि आणि त्या यात्रेत सामील झालेले नातेवाईक कोण ? हे ओळखणे मुश्किल होते.
      शब-ए-बरातच्या रात्री तर वातावरण जत्रेसारखे व्हायचे. शेकडो स्टॉल्स, मटणाचे विविध प्रकार, कबाबचा वास, विविध सरबते, वस्तूंचे स्टॉल्स अजून खूप काही,सगळे काही वेगळेच असायचे. आम्ही मात्र त्या स्टॉल्सपासून दूर राहायचो. त्या ऐवजी घरच्या किंवा चाळीच्या खिडकीतून सर्व मजा पाहत असायचो.
    चाळी मध्ये “खिडकीमधली पोरा ” म्हणून आमची चेष्टा व्हायची, कारण आमच्या पैकी कोणी नाही, कोणी तरी खिडकीत असायचे. चाळीतील सगळ्यात व्यस्त ठिकाण म्हणजे चाळीची रस्त्या बाजूची खिडकी.रात्रभर तर गप्पांचे फड रंगायचे. मध्यरात्री कधी कधी पोलिस खालून दम द्यायचे. "झोपा रे आता, बस झाले"
    घरात जागा नसल्याने बाहेर झोपण्याची आम्हाला सवय होती. पण त्या गप्पांमधून, अनुभवांमधून आम्हाला जीवन समजत गेले.
  आजू बाजूला गुंडगिरीचे भयानक वातावरण असून सुद्धा आम्ही त्यापासून दूर राहिलो,त्यात ओढलो गेलो नाही,हीच आमची खरी कमाई.
     सोनापूरमध्ये राहिल्यामुळे मृत्यू हा आमच्यासाठी भीतीदायक विषय कधीच राहिला नाही, तर तो जीवनाचा एक भाग वाटू लागला. लहानपणी जेव्हा इतर मुलांना स्मशान, कब्रस्तान यांची भीती वाटायची, तेव्हा आम्ही मात्र त्या वातावरणात सहज वावरत होतो.
     यामुळे कदाचित जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला असवा. माणूस कितीही मोठा असो, शेवटी त्याचा शेवट एकाच मार्गाने होतो,ही जाणीव लहानपणीच मनावर कोरली गेली.
     त्या वाटेवरून जाताना कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या प्रेताकडे पाहून मनात विचार यायचा “हा कोण असेल? याचे आयुष्य कसे गेले असेल?” याच्या किती इच्छा अतृप्त राहिल्या असाव्यात,मनुष्य आपल्या सोबत काय घेऊन जातो ? या व अशा एक नाही अनेक विचारांनी मन अधिक संवेदनशील झाले.
    जीवनातील छोट्या गोष्टींचे महत्त्व कळायला लागले. कारण रोजच मृत्यू जवळून पाहणारा माणूस जीवन अधिक मनापासून जगतो, हे खरे आहे.
    सोनापूरने आम्हाला केवळ आठवणी दिल्या नाहीत, तर एक वेगळीच जीवनदृष्टी दिली. भीतीऐवजी समज, तटस्थता आणि स्वीकार शिकवला.
   आज मागे वळून पाहताना वाटते,त्या वातावरणाने आम्हाला मजबूत बनवले. मृत्यूची भीती नाहीशी केली, आणि जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितला. म्हणूनच आमची ही सोनापूर गल्ली फक्त एक जागा नव्हती,ती आमची अनुभव देणारी शाळा होती.जिथे आम्ही जगायला शिकलो, समजायला शिकलो.
    सोनापूरमध्ये राहण्याचा आणखी एक वेगळा पैलू म्हणजे तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतलेली माणसं. रोजच्या आयुष्यात मृत्यू इतक्या जवळून पाहूनही सोनापुरकरांच्या चेहऱ्यावर कधी उदासी दिसली नाही, उलट जीवन जगण्याची उर्मीच जास्त दिसायची. हेच त्या भागाचे खरे वैशिष्ट्य होते.
    एखादी प्रेतयात्रा जात असताना सुद्धा तो रस्ता थांबलेला नसायचा, माणसांच्या गर्दीने फुललेला असायचा. जीवन आणि मृत्यू यांचा हा जवळून अनुभव आम्हाला एक गोष्ट शिकवून गेला की जीवन हे थांबत नाही.
     त्या गल्लीत राहणारी माणसं खूप कणखर होती. संकटे, दुःख, अडचणी यांना सामोरे जाण्याची त्यांची ताकद वेगळीच होती. कारण रोजच आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याला पाहणारा माणूस छोट्या-छोट्या गोष्टींना घाबरत नाही.
   लहानपणी आम्हाला कधी कधी प्रश्न पडायचा ? आपण ज्या रस्त्यावर खेळतो, त्याच रस्त्यावरून इतकी प्रेते जातात, तरीही आपल्याला काहीच का वाटत नाही? पण जसजसे मोठे होत गेलो, तसतसे त्या प्रश्नाचे उत्तर सापडत गेले. कारण ती जागा आमच्यासाठी भीतीची नव्हती, तर वास्तवाची होती.
     सोनापूरने आम्हाला एक वेगळीच जाणीव दिली,माणूस कितीही मोठा असो, शेवटी सगळ्यांचा शेवट एकाच ठिकाणी होतो. त्यामुळे अहंकाराला काहीच स्थान नाही. ही शिकवण कुठल्याही पुस्तकातून मिळाली नसती, ती फक्त त्या अनुभवातूनच मिळू शकली.
      आजही कधी त्या भागातून जाण्याचा योग आला, तर पाय आपोआप मंदावतात. डोळ्यासमोर ते जुने दिवस उभे राहतात. तीच गल्ली, तेच रस्ते, पण आता बदललेले वातावरण,तरीही आठवणी मात्र ताज्याच आहेत.
     पुनर्विकासामुळे आज त्या भागाचे रूप पालटले असेल, पण सोनापूरची ओळख अजूनही तशीच आहे. त्या गल्लीत राहिलेल्या प्रत्येकाच्या मनात ती कायमची कोरलेली आहे.
   कधी कधी वाटते आपण जिथे वाढलो, ते ठिकाण आपल्याला घडवत असते. सोनापूरने आम्हाला धाडस दिले, समज दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनाकडे बघण्याची खरी दृष्टी दिली.
     म्हणूनच माझ्यासाठी सोनापूर ही केवळ स्मशानाजवळची गल्ली नाही, तर जीवन समजावणारी आणि अनुभव देणारी एक शाळा आहे,जिथे प्रत्येक दिवस एक नवीन धडा शिकवून जातो.

   या पुढच्या  लघुकथेत  लहान मुलांचे प्रेम किती निरागस असते की त्याचा  परिणाम त्यांच्या पुढील जीवनात दिसून येतो. ती कथा भाऊंचा कोंबडा या लघुकथेतून दिसून येईल,पुढील लेख...👉

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा

पुढील भागासाठी ब्लॉगला Follow करा.आणि आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.

sjomkar.blogspost.com ब्लॉगला Follow करा.

तुमचे मत नक्की, अभिप्राय नक्की कळवा


SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी © All Rights Reserved


🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com

(ओमकार शिवलकर )

J Omkar| शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो






📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!


𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook

टिप्पण्या

  1. एक वेगळा दृष्टिकोन आयुष्याकडे बघण्याचा

    उत्तर द्याहटवा
  2. जीवनाचे वास्तव रेखाटले आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच मनाला भिडणारा आणि वास्तवाशी जोडलेला लेख 🙏
    मृत्यूकडे इतक्या समजूतदारपणे आणि निर्भय नजरेने पाहण्याची दृष्टी या लेखातून स्पष्ट दिसते.
    “जीवन थांबत नाही” हा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे.
    अशा अनुभवातून मिळालेली जीवनदृष्टी खूप मौल्यवान आहे 🙌

    उत्तर द्याहटवा
  4. अंतर्मुख करणारा लेख, सोनापूर लेन जीवन शिकवणारी एक शाळा

    उत्तर द्याहटवा
  5. खूप खोल आणि अंतर्मुख करणारा लेख 🙏
    जीवन आणि मृत्यू यांचा इतका जवळून अनुभव सांगताना जी समज आणि स्वीकार दिसतो, तो खूप काही शिकवून जातो.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...