मुख्य सामग्रीवर वगळा

बच्चा… मधुबाला मिली क्या? | वेताळ, स्मशान आणि भन्नाट भय-विनोदी मराठी कथा

          “बच्चा ! .. मधुबाला मिली क्या ?”|वेताळ, स्मशान आणि भन्नाट भय-विनोदी मराठी कथा..

"बच्चा !..मधुबाला मिली क्या ?" भन्नाट विनोदी भयकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
गेला तो वेताळाच्या पालखीची पताका तोडायला,
लाथ बसली पेकाटात तरी गेला शूर बनायला |
दुसऱ्या दिवशी वेताळ भेटला खिचडीवर ताव मारत,
“मधुबाला मिळाली कां रे ?” म्हणे फिदीफिदी हसत |


      🔗  “शब्दांच्या पलीकडची साधना” - समर्थ बैठकीतील स्थानिक निरुपणकार | शब्दांच्या पलीकडची साधना | सद्गुरू भक्तीच्या प्रेरणादायी 3 कथा..

         “शब्द हे निमित्त,विचार हा प्रवास आणि साधना हेच अंतिम ध्येय.”
      समर्थ विचार, सदगुरू भक्ती आणि निरपेक्ष सेवेच्या माध्यमातून समाजमनाला दिशा देणाऱ्या समर्थ बैठकीतील सर्व ज्ञात-अज्ञात निरुपणकारांच्या कौतुकास्पद कार्याची माहिती आणि समर्थ रामदास यांच्या विचारांचा प्रकाश आणि सद्गुरूंच्या कृपेचा आधार प्रत्येक साधकाच्या जीवनात आशा, श्रद्धा आणि मानसिक स्थैर्य निर्माण कसे निर्माण होते या विषयीच्या 3 लघु कथा मागील ब्लॉग मध्ये वाचल्या असतील...

    “बच्चा… मधुबाला मिली क्या?”| वेताळ, स्मशान आणि भन्नाट भय-विनोदी मराठी कथा ..

  "अमावस्येच्या रात्री वेताळाच्या पालखीच्या शोधात गेलेल्या आमच्या टोळीची भन्नाट भय-विनोदी कथा! स्मशान, वेताळ, मधुबाला आणि खिचडी पार्टी यांचा जबरदस्त कॉमेडी संगम.”
    भय आणि विनोद यांचा अनोखा संगम अनुभवायचा असेल, तर ही मराठी भय-विनोदी कथा नक्की वाचा. अमावस्येच्या रात्री वेताळाच्या पालखीचा शोध घेण्यासाठी निघालेल्या मित्रांच्या टोळीसमोर घडणारे गमतीदार आणि अंगावर काटा आणणारे प्रसंग या कथेला वेगळीच रंगत देतात. स्मशानातील रहस्यमय वातावरण, अनपेक्षित घटना, भन्नाट संवाद आणि खिचडी पार्टीचा धमाल शेवट यामुळे ही कथा शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
     मुंबईत गिरगाव येथे एकत्र कुटुंबपद्धतीत राहत असताना, आमच्या घरातील रात्रीच्या गप्पा म्हणजे एखाद्या मालिकेच्या अखंड चालणाऱ्या भागांसारख्या असायच्या. दिवसभर घरात एकत्र नसणारी सर्व मंडळी मात्र रात्री जेवण झालं की सगळे पुन्हा एकत्र यायची. कोणी पंख्याखाली जागा पकडायचं, कोणी उशी घेऊन पाय पसरून बसायचं, तर कोणी बिस्तऱ्यावर आडवा होऊन म्हणायचा “आज भारी गोष्ट सांगतो,भुताची..” अशी सुरुवात करायची.गप्पा सुरू झाल्या की वेळेचं भान राहत नसे.पण खरी मजा सुरू व्हायची ती गावाला गेल्यावर.
      उन्हाळी सुट्टीत रत्नागिरीत  गावी पोहोचलो की मुंबईची सगळी स्टाईल उतरून जायची. वडाच्या झाडा वरच्या सूर पारंब्या, आंबे पडल्याचा आवाज झाला की तो पडलेला आंबा ढास मारून एका दमात गट्ट करायचो,डोक्यावर टॉवेल ठेवून विहिरीवर आंघोळीला जाणारे आणि शेताडात किंवा समुद्राच्या पुळणी वरील क्रिकेट ,गायी बैलांना चरायला सड्यावर सोडणे असा आमचा गावातील दिनक्रम असायचा. 
दिवसभर खेळ आणि दंगा झाल्यावर रात्री जेवण उरकलं की खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची सुरुवात व्हायची  “महागजाली!”
       खळ्यात चटया टाकल्या जायच्या. मिट्ट अंधार असेल तर मध्ये एक कंदील किंवा कधी फक्त चंद्रप्रकाश. दूरवर झाडीतून येणारे विचित्र आवाज. वातावरण इतकं सिनेमॅटिक असायचं की रामसे बंधूंनी तिथे शूटिंग केलं असतं तर त्याचे बजेटच वाचलं असते.आणि मग कोणीतरी मुद्दाम विषय काढायचं, “तुम्हाला माहितीय कां ? आपल्या वाडीच्या मागे एक हडळ आहे..”हे ऐकताच सगळे थोडे पुढे सरकायचे.
     त्यात गावामधील आमच्या वाडीतील काही मुलं एवढी टारगट होती की त्यांनी आम्हा मुंबईकरांना घाबरवणं हे आयुष्याचं ध्येयच बनवलं होतं. एकदा एका मुलाने पांढरी चादर घेऊन झाडामागून हळूच चालत येण्याचा प्रयोग केला. पण दुर्दैवाने त्याचा पाय शेणात घसरला आणि “हडळ” थेट तोंडावर पडली. आम्ही घाबरण्याऐवजी एवढं हसलो की दुसऱ्या दिवशीपर्यंत पोट दुखत होतं.
    गणपतीच्या दिवसांत मात्र भुतांच्या गोष्टींना धार्मिक संरक्षण मिळालेलं असायचं. घरात बाप्पा, आरत्या, दिवे आणि मोदकांचा सुगंध असल्याने आम्हाला वाटायचं की भुतांनी सुद्धा त्या दिवसांत सुट्टी घेतलेली असते.
पण अमावस्येच्या रात्री?
     बापरे!त्या दिवशी तर साधे मांजर जरी अंधारातून गेला तरी कोणीतरी म्हणायचं, “पाहिलंत? काहीतरी गेलं!”
     एकदा तर आमच्या एका बहिणीच्या अंगावर पाल पडली. त्या एका पालीने असा धिंगाणा घातला की आजीने थेट गंगाजलच आणले. शेजारच्या काकूंनी विचारलं, “काय झालं?” तर कोणीतरी जोरात हसत उत्तर दिलं, “ गजाली मधली भुतं धिंगाणा घालत होती!” पण सर्वात ऐतिहासिक घटना घडली ती “माळ्यावरील भूत” प्रकरणात.त्या रात्री आम्ही नेहमीप्रमाणे भुतांच्या गोष्टी ऐकून अर्धमेले झालो होतो. अचानक माळ्यावरून “धडाम.. धुडूम.. खसखस..” असे आवाज यायला लागले. क्षणात वातावरण गोठलं.

     आमच्या गजाली मध्ये अशी वंदता होती की भावकीत जर कोणी मरण पावलं तर दहाव्या दिवसाच्या विधी पर्यंत त्याचा आत्मा त्या माळ्यावर फिरतो. त्यामुळे आमच्या घरचा तो माळा अशा कथित  कहाण्या मुळे बदनाम झाला होता.त्या आवाजांनंतर आम्हाला खात्रीच पटली  “आज काहीतरी आहे वर!”

       एक बहिण तर रडायलाच लागली. दुसरीने डोळे बंद करून “श्रीराम जय राम जय जय राम” सुरू केलं. दुसरी तर भीतीनेच उड्या मारायला लागली होती.इतक्यात वरून पुन्हा “धुडूम!” आवाज आला आणि जिन्यातून कोणीतरी लटपटत खाली आलं,तो आमचा घरगडी धोंडू होता !

      बिचारा रात्री माळ्यावर जुना कंदील शोधायला गेला होता. पण त्याआधी त्याच्या पोटात गावठी दारूची प्रेरणा गेल्यामुळे त्याचा तोल सतत जात होता. त्यामुळे वरती तो जिथे पाय ठेवेल तिथे काही ना काही पडत होते आणि आवाज येत होता.धोंडू खाली आला आणि आम्हाला घाबरलेलं पाहून स्वतःच घाबरला. “काय झालं ?” तो म्हणाला.आम्ही त्याच्याकडे बघतच राहिलो. कारण पाच मिनिटांपूर्वी आम्ही त्याला थेट “माळ्यावरील आत्मा” घोषित केलं होतं!
     त्या रात्री अख्ख्या वाड्यात जितका आरडाओरडा झाला तितका कदाचित खऱ्या भुतानेसुद्धा केला नसता. पण शेवटी सगळे इतके हसलो की दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जागी बसून नव्या भुतांच्या गजाली सुरू झाल्या!
     अशाच एका भन्नाट गजालीत रात्रीचा कार्यक्रम रंगात आलेला होता. खळ्यात चटया टाकून आम्ही सगळे गोल बसलो होतो. वर काळाकुट्ट आकाश, मध्येच नारळाच्या झाडांचा आवाज आणि दूर समुद्राची गाज, वातावरण इतकं भारी तयार झालं होतं की भूत नसतानाही माणूस स्वतःच घाबरावा!
        इतक्यात आमच्या शेजारचा आमच्यापेक्षा थोडा मोठा आणि स्वतःला गावचा “हॉरर स्पेशालिस्ट” समजणारा भाऊ तिथे येऊन बसला. त्याचा चेहरा इतका गंभीर होता की आम्हाला वाटलं हा आत्ताच एखाद्या भुताशी मिटिंग करून आलाय.तो बसताच म्हणाला, “अरे बाबांनो, इथे काय शूर वीरांसारखे बसलात? इथे तर लोकांची घरं हाकेच्या अंतरावर आहेत. भूत काय, हडळसुद्धा इकडे फिरकत नाही !” ती इथल्या माणसांना घाबरतात.
       हे ऐकताच, भितीच्या जागी आमच्या अंगात थोडी हिंमत भरुन आली.
तो पुढे म्हणाला, “खरी मजा बघायची असेल ना तर आज रात्री तीन वाजता सड्यावर जा. आज अमावस्या आहे!”
       “अमावस्या” हा शब्द ऐकताच दोन बहिणींनी नकळत एकमेकींचे हात पकडले.
आवाज एकदम खाली करून,हळू आवाजात तो म्हणाला, “भुतांचा खरा दंगा स्मशानात असतो. अमावस्या आणि पौर्णिमेला तर त्यांचा खास कार्यक्रम असतो.”
“म्हणजे काय असतं रे भाऊ?” एका बहिणीने घाबरत विचारलं.तो लगेच डोळे मोठे करून म्हणाला, “अगं बाई, दंगा कसला? धुमशान असतं धुमशान! त्या रात्री भुतांचा राजा वेताळाची पालखी निघते !”
बस्स!
“वेताळाची पालखी” ऐकताच आमच्यातील एक भाऊ थेट उशी जवळ ओढून बसला.
     तो शेजारचा भाऊ आता पूर्ण रंगात आला होता. “पालखीच्या पुढे भूतांची सेना असते. कुणी उलट्या पायाने चालतं,कुणी झाडावरून झाडावर उड्या मारतं  कुणी ‘हाऽऽऽय’ असा आवाज काढतं.. नुसता धांगडधिंगा!”तो आवाज काढताना स्वतःच असा किंचाळला की आम्ही सगळे दोन इंच हवेत उडालो.
      तो पुढे म्हणाला, “आणि त्या पालखीला लाल भडक पताका असते. ती जर कुणी पकडली ना..तर त्याच्या मनातलं सगळं खरं होतं!”
       हे ऐकताच आमच्यातील एक आळशी भाऊ लगेच उत्साहात म्हणाला, “आयला! मग कामधंदा करायची गरजच काय? आयुष्यात एकदाच ती पताका धरायची आणि मग पैसा, बंगला, गाडी, सगळं मिळणार!”त्याचं बोलणं ऐकून बाकीच्यांनी त्याच्याकडे असा कटाक्ष टाकला जणू हा उद्यापासून थेट वेताळाचा जावईच होणार होता.
     गजाली सांगणारा भाऊ लगेच त्याच्यावर भडकला. “ये वेड्या! तू काय वडा-पावच्या गाडीवर वडा-पाव  घ्यायला जातोयस का? अरे,ते कुणा येरागबाळ्याचं काम नाही. धाडस लागतं धाडस!”मग अचानक त्याने आव्हान दिलं, “चल..आधी या वेळेला मधल्या  वाड्याच्या  विहिरीवरून एकट्याने फेरी मारून ये. मग समजेन तुझ्यात धमक आहे की नाही ते.”
      हे ऐकताच आत्तापर्यंत “पताका पकडणार” म्हणणाऱ्या भावाचा चेहरा असा खाडकन पडला जणू त्याचं लालपरी बसचे  तिकीटच रद्द झालं.
तो अडखळत म्हणाला, “अरे..म्हणजे..आता? या वेळेला?”
“हो! आत्ताच! जा की..वेताळ काय सकाळी येतो कां पालखी घेऊन ?”तो शेजारचा भाऊ म्हणाला.
क्षणात वातावरण शांत झालं.
      कारण ती मधल्या  वाड्या वरची  विहीर म्हणजे आमच्या कल्पनेत भुतांचं हेड ऑफिसच होतं. दिवसा सुद्धा तिकडे जाताना दोनदा रामनाम घ्यावं लागायचं, आणि हा म्हणत होता रात्री अमावस्येला तिकडे जाऊन या!
तो पुढे अजून भर घालत म्हणाला, “आजपर्यंत गावात फक्त भिकुशेठलाच वेताळाच्या पालखीची पताका मिळालेली आहे.”
“तोच ना.. गावचा मोठा श्रीमंत माणूस ?” कोणीतरी विचारलं.
“हो!..हो.. तोच तो ! त्याने फक्त हातच नाही लावला तर थेट पालखीची लाला पताकाच तोडून आणली म्हणे! म्हणून त्याच्या घरात पैसा पाण्यासारखा वाहतो!”
हे ऐकताच आम्ही सर्व मनातल्या मनात भिकुशेठकडे नव्या आदराने बघायला सुरुवात केली. आम्हाला वाटायचं तो हुशारीने श्रीमंत झाला पण हा तर थेट वेताळाशी कॉन्ट्रॅक्ट करून बसला होता!
      आता मात्र आमच्या गजालीत पूर्ण शांतता पसरली होती. प्रत्येकाला वाटत होतं की आत्ता कुठून तरी लाल पताका घेऊन एखादं भूतच समोर येईल.
त्या काळ्याकुट्ट अंधारात फक्त समुद्राची जोरात आदळणारी गाज ऐकू येत होती. मध्येच एखादं पान हललं तरी आमच्या छातीत धडधड वाढायची.
शेवटी तो भाऊ उठला, अंग ताणलं आणि अगदी सिनेमातल्या शेवटच्या डायलॉगसारखा म्हणाला, “जा आता, झोपा सगळे. खूप रात्र झाली..”
पण त्या रात्री आम्हाला झोप लागली असेल तर शप्पथ! कारण प्रत्येकाला स्वप्नात कुठे ना कुठे लाल पताका घेऊन वेताळाची पालखी दिसतच होती!
      “मला तर आता डोळे उघडे ठेवणं सुद्धा कठीण झालं होतं. सड्यावर जाण्याचा प्रश्नच नव्हता. एवढा काळाकुट्ट अंधार की डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही! त्यात पायाखाली अचानक एखादा बेडूक, कुत्रा की दुसरंच कोणतं जनावर येईल याची काही शाश्वती नव्हती.
      झोप मात्र अशी काही अंगावर येत होती की डोक्यात वेगळेच विचार सुरू होते. गावात वेताळ असतो हे ठीक आहे, पण आपल्या सोनापूर गल्लीतील स्मशानातसुद्धा वेताळ येत असणार! आपलं गाव काय त्याची जहागीर आहे का? भुतांचं राज्य फक्त इथेच आहे का?
     मुंबईत काय भूत नाहीत कां ? मुंबईत जर भूतं असतील तर त्यांचाही एखादा वेताळ असणारच! जसा राजा विक्रम वेताळाला खांद्यावर घेऊन फिरायचा, तसाच मुंबईचा एखादा वेताळ असेलच की.आपल्या गावात भिकूशेठला भेटलेला वेताळ आहे, तर मुंबईतसुद्धा नक्की एखादा वेताळ असेलच. मग मी  ठरवलं  आता थेट मुंबईच्या वेताळाची पताका आणायची, मनात पक्के केले.इतक्यात निद्रादेवीने अलगद माझ्या पापण्यांवर रेशमी हात फिरवला आणि मुंबईचा वेताळ, गावचा वेताळ, भिकूशेठ आणि पताका सगळेच धाडकन स्वप्नात आले!”
       काही दिवसांनी आम्ही मुंबईला परत आलो. सोनापूर म्हणजेच स्मशान आमच्या इमारतीपासून अगदी हाकेच्या अंतरावर होते. पण त्या स्मशानाचं आम्हाला कधीच काही भय वाटलं नाही. उलट हिंदू जिमखान्यावर क्रिकेट खेळून आलो की मातीने माखलेले हात-पाय धुवायला आम्ही थेट स्मशानातल्या पाण्याच्या नळावर जायचो! जणू काही ते आमचं अधिकृत “स्पोर्ट्स वॉशरूम”च होतं.

       स्मशानातल्या शंकराच्या मंदिरात दर सोमवारी जाणंही ठरलेलंच असायचं. त्यामुळे स्मशान, शिव मंदिर आणि क्रिकेट या तिन्ही गोष्टी आमच्या बालपणी इतक्या मिसळल्या होत्या की आम्हाला त्यात काहीच भीतीदायक वाटत नव्हतं.

       एक दिवस मी चाळीतल्या मुलांना गावातल्या वेताळाची गोष्ट रंगवून सांगितली. गोष्ट इतकी रंगली की लगेच सहा मुलं मोहिमेसाठी तयार झाली! पण खरी अडचण पुढे आली  “पहिली पताका कोण तोडणार?”कारण वेताळाची पालखी आली आणि आपणच आपसात धिंगाणा घालायला लागलो तर वेताळ म्हणेल, “तुमचं ठरलं की मला बोलवा,” आणि पालखी घेऊन पुढे निघून जाईल!

     मग आम्ही अत्यंत गंभीर चेहऱ्याने चिठ्ठ्या टाकल्या,त्या प्रमाणे नंबर लागले. माझा तिसरा नंबर आला. म्हणजे ठरलं, तिसऱ्या अमावस्येला वेताळाच्या पालखीची पताका ओढण्याचा मान माझा!

     पहिल्या दोन अमावस्या बाकी मुलांच्या, आणि तिसऱ्या अमावस्येला मी स्वतः वेताळाला भेटणार कार्यक्रम अगदी फिक्स झाला होता! पुढच्या आठवड्यात अमावस्या होती आणि आम्ही सगळेच जण स्वतःला अर्धवेळ भूत संशोधक समजू लागलो होतो.

झालं.. अखेर ती कयामतची रात्र आलीच!
       आम्ही सगळी मुलं चाळीबाहेरच झोपायचो. त्यामुळे रात्री कोण कुठे जातंय, काय करतंय याकडे फारसं कुणाचं लक्ष नसायचं. फक्त माझे वडील मध्येच एकदा दार उघडून एक कटाक्ष टाकायचे. त्यावेळी  ‘फक्त बिस्तऱ्यात दिसायला हवे. आज त्यांनी एकदा पाहिलं, मी बिस्तऱ्यात आहे म्हटल्यावर त्यांनी दार आतून बंद केले आणि ते झोपून गेले.पण आम्हाला झोप येणार तरी कशी? आमच्या डोक्यात फक्त एकच विचार  “आज वेताळ भेटणार कां ?”

      अडीच वाजायची वाट पाहता पाहता मी बिस्तऱ्यात अक्षरशः मासोळीसारखा तडफडत होतो. बाजूला झोपलेली मंडळी मात्र निद्रादेवीच्या अधीन होऊन स्वप्ननगरीत पोहोचली होती. कोणी झोपेत बरळत होतं, तर कोणाच्या घोरण्याचा आवाज असा येत होता. जणू जुना खटारा ट्रक  घाट चढतोय. त्या घोरण्याला दुसऱ्याच्या शिट्टीसारख्या श्वासाचा सुंदर तबला साथ देत होता.

       आज वेळसुद्धा मुद्दाम हळू चालतेय असं वाटत होतं. घड्याळाचे काटे जणू संपावर गेले होते.इतक्यात बाजूच्या घरातल्या जुन्या घड्याळाने “ठणं..ठणं” दोनचे टोले दिले. आम्ही लगेच सावध झालो. म्हणजे अजून अर्धा तास बाकी! त्या अर्ध्या तासात आम्ही एवढी वळवळ केली की बिस्तऱ्यानेसुद्धा बहुतेक कंटाळून म्हटलं असेल, “जा रे बाबा,जा बाहेर जा!”

      शेवटी अंदाजाने मी उठलो आणि दबक्या पावलांनी सगळ्यांना उठवायला लागलो. सहा पैकी चार जण मात्र निद्रादेवीचे कट्टर भक्त निघाले. त्यांना उठवताना असं वाटत होतं जणू स्मशानातून वेताळ नाही तर कुंभकर्णालाच उठवतोय.

     एक जण तर डोळे मिटूनच म्हणाला, “वेताळाला सांग उद्या येतो…”कसेबसे सगळे उठले. डोळे चोळत, अंग ताणत बाहेर आलो. मी हळू आवाजात म्हटलं, “चला मंडळी.. वेळ झाली!”

     सहा जण रस्त्यावर उतरलो. रस्ता पूर्ण सुनसान. महापालिकेचे दिवे मंदपणे लुकलुकत होते. काही दिवे असे चमकत होते जणू त्यांनाही भीती वाटत होती. “आज अमावस्या आहे बाबा, आम्ही पण पूर्ण पेटणार नाही!”

      रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उत्तर प्रदेशी भय्ये पथाऱ्या टाकून झोपले होते. त्यातला एक निद्रादेवीचा कोप म्हणजेच निद्रानाश झालेला भैया निवांत विडी फुंकत बसला होता. धूर हवेत गोल गोल सोडत आमच्याकडे बघत होता.

आम्हाला सहाजणांना एकत्र पाहून त्याने हाताने खूण केली .

“कुठे चाललात रे एवढ्या रात्री?”

आज ज्याचा नंबर होता तो छाती काढून म्हणाला,

“हम मधुबाला देखने जा रहे है!”

भैय्याने दोन सेकंद आमच्याकडे पाहिलं, मग स्वतःच्या डोक्यावर हात मारला आणि म्हणाला,

“जा बेटा.. मैं नहीं आता!”

आम्ही पुढे चालत राहिलो.

आज रस्त्यातली कुत्रीही जरा जास्तच भावनिक झाली होती. ती रडवेल्या आवाजात भुंकत होती. जणू आम्हाला शेवटचा इशारा देत होती  काय  “जाऊ नका रे पोरांनो!”

स्मशानात जाणाऱ्या वाटेवरचे काही दिवे बंद होते. बाकीचे उघडझाप करत होते. ते पाहून असं वाटत होतं की दिव्यांना सुद्धा ठरवता येत नव्हतं की  पेटायचं की बंद पडायचं !

रात्री तो भाग हा कुत्र्यांचाच असल्याच्या आविर्भावात ती आमच्या मागे लागली होती. पण त्यांना गप्प करण्याचं तंत्र आम्हाला माहित होतं. खाली वाकल्याचा अभिनय केला की लगेच ती “गुपगुमान” जागेवर बसायची. कारण त्यांना वाटायचं आता दगड येणार!

एकदाचे आम्ही स्मशानात शिरलो, आतले काही दिवे बंद होते. बहुतेक पालिकेच्या कारकुनाने “आज अमावस्या आहे, वीज वाचवा” मोहिम काढली असावी.

आत गेल्यावर पहिलं काम केलं, रात्रपाळीचा पालिका कारकून जागा आहे का ते पाहिलं. पण तो केबिनमधल्या बाकावर असा झोपला होता जणू जगात काहीच घडत नाही.

डोंबराज मंडळी त्यांच्या घरात गाढ झोपली होती. पाच सरण वेदी आज थंड होत्या. त्यातील एका सरण वेदित पेटते अंगार धगधगत होते,लाल तप्त होऊन जळत होते. 

 तेवढ्यात स्मशानातल्या घड्याळाने तीनचे टोले दिले..

आम्ही एकमेकांकडे पाहिलं..

आता खरी वेताळ भेट मोहीम सुरू होणार होती!

       गिरगावात, विशेषतः सोनापूर गल्लीत, एक मोठं वैशिष्ट्य होतं, तिथे मच्छर बिलकुल नव्हते! बहुतेक भूतलावरचा असा हा एकमेव भाग असावा जिथे डास सुद्धा येताना दोनदा विचार करत असतील. कदाचित त्यांनाही वाटत असावं. “इथे आधीच ढेकणांची गर्दी आहे, त्यात आपण कशाला उगाच?”

      पण निसर्ग कधीच जागा रिकामी ठेवत नाही. डासांची उणीव भरून काढायला ढेकूण मात्र अक्षरशः सैन्य उभं करून बसले होते. स्मशानातल्या त्या लाकडी बाकड्यांमध्ये त्यांची पायदळ फौज दडून बसायची. दोन मिनिटं शांत बसलात की लगेच “आक्रमण!”

    आम्ही तिथे बाकड्यांवर  बसलो होतो. अर्धवट पेंगुळलेल्या अवस्थेत. डोळे मिटत होते, वेताळाची वाट पाहायची म्हणून जागे राहण्याचा आमचा प्रयत्न चालू होता.

      इतक्यात अचानक कुठूनतरी जोरजोरात ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज यायला लागला. सुरुवातीला वाटलं एखादं भूत वॉर्मअप करतंय. पण आवाज जसजसा जवळ येऊ लागला तसं आमचं धाडस पोटात जाऊ लागलं.आणि अचानक अंधारातून दहा-बारा “भुते” वेताळाची सजवलेली पालखी घेऊन स्मशानात शिरली!

पालखी एवढ्या घाईघाईत डुलत चालली होती की पाहून वाटत होतं वेताळालाच उशीर झाला आहे.

      पहिला नंबरवाल्याने लगेच शूरवीरा सारखी धाव घेतली. पण पालखीला वेगवेगळ्या रंगांच्या कागदी पताका इतक्या लागलेल्या होत्या की आता त्यात लाल पताका कोणती ? हे शोधण्यात त्याचा वेळ जात होता.तो सारखा पायात येत होता म्हणून बहुतेक मागच्या पालखीवाल्या भूताचा संयम संपला त्याने अचानक त्याच्या पेकाटात जोरदार लाथ मारली !

     स्मशानात मिट्ट अंधार असल्यामुळे ती लाथ कुणी मारली ते दिसलं नाही. पण आमच्या मित्राचा चेहरा पाहून मात्र कळलं  भूत असो वा माणूस, लाथ मात्र खरी होती!

लाथ बसताच त्याने घाईघाईत लाल पताका पकडली आणि पूर्ण ताकदीने ओरडला.

“मला मधुबाला पाहिजेऽऽऽ!”

आणि पटकन पताका तोडून आमच्याकडे तो धावत आला.

तो येईपर्यंत वेताळाची पालखी अंधारात कुठे गायब झाली ते आम्हाला काहीच कळलं नाही. जणू एखादी लोकल दोन सेकंद थांबून निघून जाते तशी!

आम्ही त्याला धरून विचारलं,

“अरे वेड्या! मधुबाला का मागितलीस रे ? तिची कबर इथंच जवळ आहे म्हणतात!”

हे ऐकताच त्याचा रंग उडाला. थरथरत म्हणाला,

“अरे त्या भैय्याला चिडवायला बोललो होतो ना, तेच आयत्या वेळी तोंडातून बाहेर पडलं!”

बस्स! एवढं ऐकल्यावर आमचं धाडस पूर्ण संपलं.

“चला पळा! नाहीतर आता मधुबाला स्वतः भेटायला येईल!”

असं म्हणत आम्ही सहाही जण स्मशानातून अशी धूम ठोकली की आमच्या मागे रस्त्यातील कुत्रे भुंकत मागे लागलेत. पहिले कोण कुत्रे की आम्ही,ऑलिम्पिकची शर्यतसुद्धा फिकी पडेल.

चाळीत परत आल्यावर कसेबसे झोपलो. पण त्या रात्री पहिल्या नंबरवाल्याची मात्र कढी पातळ झाली. तो झोपेतच ओरडत होता. 

“अगं मधुबाले..खाली उतर! उरावर बसू नकोस!”

सकाळी उठल्यावर आम्ही विचारलं,

“काय झालं रे?”

तो घाबरलेल्या चेहऱ्याने म्हणाला,

“रात्री स्वप्नात मधुबाला आली होती आणि म्हणत होती  ‘इतक्या रात्री वेताळा कडे मला कोण मागत होतं ? आयला,आता ही रोज येणार कां मला पिडायला ?” तो घाबरलेल्या स्वराने बोलत होता.

    दुसऱ्या दिवशी आमची क्रॉस मैदानावर क्रिकेट मॅच होती. आम्ही बॅट, स्टंप्स घेऊन टीमसकट चालत निघालो होतो.

अचानक मला,रस्त्याच्या कडेला एका भिंतीला उभी केलेली कालच्या सारखी दोन बांबू वर सजवलेली वेताळा सारखी  पालखी दिसली. त्याला त्याच कागदी पताका सुद्धा लावलेल्या होत्या.

मी लगेच हळू आवाजात म्हटलं,

“अरे..ती  पालखी इथे आहे म्हणजे वेताळ पण इथेच जवळ पास असणार!”

आम्ही थोडे पुढे गेलो आणि जे दृश्य दिसलं ते पाहून आमचे डोळेच विस्फारले.

कालची तीच दहा-बारा “भुते” एका दर्ग्यासमोर बसून, वाटली जाणारी खिचडी खात होते!

आणि मध्ये बसलेला वेताळ तर ताटात अजून खिचडी वाढून घेत होता!

क्षणभर आम्ही एकमेकांकडे पाहत तिकडे उभे राहिलो आणि पुढच्या क्षणी आमच्यातले सहाही जण खो-खो हसायला लागलो.

बाकीच्या टीमला काहीच कळेना.

“काय झालं रे तुम्हाला?”

मग आम्ही काल रात्रीची पूर्ण वेताळ मोहीम सांगितली.

ते ऐकून ते सुद्धा पोट धरून हसायला लागले.

समोर खिचडी खाणारा वेताळ आणि ती सगळी “भुते” आमच्याकडे पाहून फिदीफिदी हसत होती.

इतक्यात वेताळाने हातातला चमचा हवेत वर करत मोठ्याने विचारलं,

“बच्चा..मधुबाला मिली क्या?”

हे ऐकताच आमचा “मधुबाला मित्र” बॅट घेऊन असा पळाला की …

जणू आता खऱ्या वेताळानेच त्याच्या मागे धाव घ्यायची बाकी होती!

      संध्याकाळी मॅच खेळून आल्यावर नेहमीप्रमाणे मळलेले हात-पाय धुवायला आम्ही  स्मशानातील ‘नळाच्या मोरीवर’ गेलो ती आमची  “पॅव्हेलियन बाथरूम” झाली होती.

तिथेच एका डोंबराजाकडे मी जरा रहस्यमय चेहरा करून वेताळाच्या पालखीचा विषय काढला.

तो आमच्याकडे दोन सेकंद बघत राहिला आणि मग मोठ्याने हसायला लागला.

म्हणाला,

“कसलं वेताळ-फेताळ रे! ती गर्दुल्ल्या भिकाऱ्यांची टोळी आहे. दर अमावस्येला अशी पालखी काढतात!”

हे ऐकताच आमच्या पोटातला सगळा वेताळ एकदम खाली बसला.

आणि आमचा “मधुबाला मित्र” तर जागेवरच खो-खो हसायला लागला.

आम्ही त्याला रागाने विचारलं,

“आता काय हसतोस?”

तो पोट धरून म्हणाला,

“आयला… म्हणजे काल रात्री माझ्या स्वप्नात आलेली मधुबाला पण या गर्दुल्ल्या टोळीच्या कॉन्टॅक्ट मध्ये होती की काय?”

हे ऐकताच आम्ही सगळेच पोट धरून हसायला लागलो!

       ही वेताळ, स्मशान आणि अमावस्येवरील मराठी भय-विनोदी कथा तुम्हाला आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच जुन्या मुंबई, गिरगाव, चाळ संस्कृती, वेताळ कथा, भुतांच्या गोष्टी आणि कॉमेडी आठवणी वाचण्यासाठी ब्लॉगला भेट देत रहा.

    🔗 'गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर ,बर्फवृष्टी आणि जीवघेणा थरार” 

      माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.👉


✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.


तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

SJ Omkar|शब्दांची मुशाफिरी -अधिकृत लोगो






📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा !
   

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...