मुख्य सामग्रीवर वगळा

लिपुतारा टनेल रेस्क्यू : “मृत्यूच्या पलीकडचा श्वास” एपिसोड -१ |थरारक मराठी रहस्यकथा

 अस्वीकरण -

    ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजन आणि साहित्यिक उद्देशाने लिहिण्यात आली आहे. कथेमधील पात्रे, ठिकाणे, संस्था आणि घटना यांचा प्रत्यक्ष व्यक्ती किंवा घटनांशी संबंध मानू नये. काही प्रसंग वास्तवातील बचाव मोहिमा आणि भुयारी दुर्घटनांपासून प्रेरित असू शकतात.

     लिपुतारा टनेल रेस्क्यू : “मृत्यूच्या पलीकडचा श्वास” (एपिसोड -१)|थरारक मराठी रहस्यकथा

      

लिपुतारा टनेल रेस्क्यू : “मृत्यूच्या पलीकडचा श्वास” थरारक रहस्यकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
   न मातीच्या ढिगाऱ्याखाली श्वास अजून जिवंत होते,
अंधाराच्या पोटातही आशेचे दिवे पेटत होते,
मृत्यू समोर उभा राहूनही हार मानली नाही त्यांनी,
कारण भुयारात अडकलेले ते फक्त कामगार नव्हते,
तर जगण्यासाठी झगडणारे निडर योद्धे होते..!

🔗मचाण शांतता : अरण्याचा हुंकार (एपिसोड -३)| ताडोबा जंगलातील थरारक मराठी रहस्यकथा

  अंधारी नदी, ताडोबाचे निबीड जंगल आणि एका गूढ अरण्यऋषीची थरारक कथा.ताडोबा अंधारीच्या घनदाट जंगलात घडणाऱ्या रहस्यमय घटनांवर आधारित “मचाणशांतता : अरण्याचा हुंकार” ही एक रोमांचकारी मराठी जंगलकथा आहे.
    

लिपुतारा टनेल रेस्क्यू : “मृत्यूच्या पलीकडचा श्वास”(एपिसोड -१)|थरारक मराठी रहस्यकथा..  

      माणसाच्या जगण्याच्या दुर्दम्य इच्छेपुढे संकटालाही कधीतरी मागे हटावंच लागतं.हिमालयाच्या कुशीत घडलेली एक थरारक काल्पनिक भुयारकथा जी अंधार, मृत्यू आणि जगण्यासाठीच्या संघर्षाचा थरार पुढे आणते.हिमालयातील ‘लिपुतारा टनेल’ दुर्घटनेत ३९ कामगार तब्बल १८ दिवस भुयारात अडकले होते. मृत्यू, अंधार, ऑक्सिजनची झुंज आणि बचाव पथकांच्या अदम्य प्रयत्नांची ही थरारक आणि प्रभावी मराठी कथा वाचा.जी फक्त दुर्घटनेची कथा नाही,तर आशा, धैर्य, मैत्री आणि मानवी जिद्दीचा जिवंत दस्तऐवज आहे..
   हिमालयाच्या कुशीत घडणारी ही थरारक मराठी रहस्यकथा मानवी जिद्द, जगण्यासाठीचा संघर्ष आणि आशेची अखंड ज्योत यांचा प्रवास उलगडते. ‘लिपुतारा टनेल’ दुर्घटनेत ३९ कामगार तब्बल १८ दिवस भुयारात अडकून पडतात. अंधार, ऑक्सिजनची कमतरता, मृत्यूची चाहूल आणि बचाव पथकांचे अथक प्रयत्न यांच्यामध्ये प्रत्येक क्षण जीवन-मरणाची परीक्षा बनतो. ही केवळ टनेल दुर्घटनेची कथा नाही, तर मानवी धैर्य, मैत्री आणि आशेच्या विजयाची रोमांचक कहाणी आहे.

(एपिसोड -१)

     देशातील आघाडीची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ‘Bobcon Infra' ची, 'लिपुतारा ते रुद्रखिंड' दरम्यान भुयारी टनेल तयार करण्याची निविदा उत्तरेकडील एका राज्य सरकारने स्वीकारली. हिमालयाच्या कुशीतून जाणारा हा बोगदा भविष्यातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता.
     प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर त्या परिसरात “बचाव पुरातत्त्वशास्त्र” (Rescue Archaeology) प्रक्रिया सुरू करण्यात आली. विकासकामांमुळे नष्ट होण्याच्या धोक्यात असलेल्या पुरातत्त्वीय स्थळांचे तातडीने संरक्षण, नोंद आणि अभ्यास करणे, यालाच बचाव पुरातत्त्वशास्त्र म्हटले जाते.

  माती आणि भूगर्भीय स्तरांच्या सखोल अभ्यासाचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर कंपनीने कामाला वेग दिला. पुढील दोन वर्षांत सुमारे पाच किलोमीटर लांबीचा बोगदा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

  हा प्रकल्प हिमालयीन भागात असल्यामुळे TBM (Tunnel Boring Machine) वापरण्यात आली नव्हती. कारण हिमालयातील भूभाग अत्यंत कठीण, अस्थिर आणि अनिश्चित स्वरूपाचा असतो. अचानक पाण्याचे झरे लागणे, प्रचंड कठीण खडक, भूगर्भातील दाब आणि दरडी कोसळण्याचा धोका यामुळे TBM मशीन बंद पडण्याची शक्यता अधिक असते. शिवाय एवढी प्रचंड यंत्रणा हिमालयातील अरुंद आणि धोकादायक रस्त्यांतून नेणे हेही अत्यंत खर्चिक आणि अवघड काम होते.

   मुंबईसारख्या भुसभुशीत जमिनीतील मेट्रो बोगद्यांमध्ये TBM प्रभावी ठरत असली, तरी हिमालयातील अनेक भुयारी प्रकल्पांमध्ये आजही ड्रिलिंग, ब्लास्टिंग आणि एक्सकेवेशन हीच पारंपरिक पद्धत वापरली जाते.

    देशाच्या उत्तरेकडील हिमालयाच्या कुशीत वसलेल्या त्या राज्यात ‘लिपुतारा ते रुद्रखिंड’ या भागातील भुयारी बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्या दिवशी सकाळपासूनच बोगद्याच्या आत कामगारांची नेहमी प्रमाणे लगबग सुरू होती. काही जण ड्रिलिंग करत होते, तर काही जण ढिगारा हटवण्याच्या कामात व्यस्त होते.

  दुपारचे तीन वाजायला काही मिनिटे बाकी होती.भुयारात फ्लडलाईट्सचा पिवळसर उजेड पसरला होता. बाहेर ठेवलेल्या जनरेटरचा “घररर..घररर..” आवाज सतत वातावरणात घुमत होता. त्यात ड्रिल मशीनचा “ढुंग.. ढुंग.. ढुंग..” थरथरणारा आवाज मिसळला होता. एक बाजू बंदिस्त असलेल्या भुयारामुळे तो आवाज भुयारात आणखीच भेसूर वाटत होता आणि अचानक..

एक प्रचंड आवाज झाला.

जमीन हादरल्यासारखी वाटली.

  क्षणात भुयाराच्या छतातून माती झडू लागली. काही सेकंदांतच दगड, ओलसर माती आणि काँक्रीटचा प्रचंड थर प्रवेशमार्गात कोसळला. आत काम करणारे ३९ कामगार त्या ढासळलेल्या भागाच्या पलीकडे अडकले.क्षणात संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला.

    धुळीचा इतका प्रचंड लोट उठला होता की काही काळ कुणालाच काही दिसत नव्हते. बाहेर उभ्या असलेल्या कामगारांनी घाबरून आरडाओरड सुरू केली. काहींनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली, तर काही जण जीव धोक्यात घालून आत जाण्याचा प्रयत्न करू लागले. पण सतत ढासळणाऱ्या मातीमुळे पुढे जाणे अशक्य होत होते.

  दुर्घटनेची बातमी समजताच संपूर्ण सर्वत्र चिंतेची लाट पसरली.अडकलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अनेक जण दूरदूरच्या भागातून घटनास्थळी पोहोचू लागले. त्यांच्या डोळ्यांत भीती, असहाय्यता आणि आशेची एक क्षीण ज्योत दिसत होती.मात्र राज्य सरकार,स्थानिक प्रशासन, बाबकॉन कंपनी आणि बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
   देशातील विविध आपत्ती निवारण दले, अभियंते, भूगर्भतज्ज्ञ आणि खासगी बचाव संस्था तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सुरुवातीला मोठ्या ड्रिल मशीनद्वारे ढिगारा हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण कठीण खडक, अरुंद जागा आणि सतत निर्माण होणारे अडथळे यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण बनले.दरम्यान सर्वात मोठे आव्हान होते ते आत अडकलेल्या कामगारांशी संपर्क कायम ठेवण्याचे.

   बचाव पथकांनी एका अरुंद पाइपद्वारे अन्न, पाणी, औषधे आणि ऑक्सिजन आत पाठवण्यास सुरुवात केली. कॅमेरे आणि वायरलेसच्या सहाय्याने त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. बंदिस्त अंधारात अनेक दिवस अडकून पडलेल्या त्या कामगारांना मानसिक धीर देणेही तितकेच महत्त्वाचे होते.

   सुदैवाने कामगार ज्या भागात अडकले होते, त्या ढिगाऱ्याच्या पलीकडे त्यांच्याकडे सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा सुरक्षित टनेलचा भाग उपलब्ध होता. त्यामुळे त्यांना बसण्यासाठी, चालण्यासाठी आणि हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा मिळाली होती. काही प्रमाणात अन्न, पाणी आणि ऑक्सिजनची सुविधा ही त्या भागात उपलब्ध झाली. त्यामुळेच ते अनेक दिवस सुरक्षित राहू शकले.

    दिवसामागून दिवस जात होते..कधी कधी ड्रिल मशीन बंद पडत होती, तर कधी पुन्हा ढिगारा कोसळण्याचा धोका निर्माण होत होता. अनेक वेळा बचावकार्य थांबवावे लागत होते. पण तरीही बचाव पथकांनी हार मानली नाही.शेवटी अत्यंत अरुंद भागातून हाताने Excavation करण्याचा निर्णय घेण्यात आला.
    “Rat Miners” म्हणून ओळखले जाणारे काही अनुभवी खाण कामगार त्या अरुंद पाइपमधून आत शिरले. जसा उंदीर आपल्या बिळात हळूहळू मार्ग तयार करत शिरतो, तसं ते मातीच्या ढिगाऱ्यातून पुढे सरकत होते.
   धूळ, अंधार आणि प्रत्येक क्षणी कोसळू शकणाऱ्या मृत्यूच्या सावलीतही त्यांनी काम थांबवलं नाही.ढिगाऱ्यात पुढे ढकलल्या जाणाऱ्या लोखंडी पाइपच्या टोकाशी जेवढी जागा तयार होत होती, तेवढ्याच अपुऱ्या जागेत शिरून ते माती कुरतडत पुढे जात होते. फावड्यांनी, हातांनी आणि अक्षरशः शरीराच्या जोरावर जमा होणारी माती बाहेर काढली जात होती.त्या अरुंद जागेत श्वास घेणंसुद्धा कठीण होतं.
     प्रत्येक इंच पुढे जाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत होता आणि प्रत्येक फूट पार करण्यासाठी मृत्यूशी झुंज द्यावी लागत होती. लिपुतारा बोगदा दुर्घटनेत कामगारांच्या मार्गात सुमारे पासष्ट मीटर लांबीचा माती आणि दगडांचा प्रचंड ढिगारा निर्माण झाला होता. तो पार करण्यासाठी बचाव पथकांना तब्बल सतरा दिवस संघर्ष करावा लागला.

आणि अखेर..

तो क्षण आला.

   सुमारे पासष्ट मीटरचा ढिगारा पार करून बचाव पथक कामगारांपर्यंत पोहोचले.जेव्हा पहिला कामगार सुरक्षितपणे बाहेर आला, तेव्हा घटनास्थळी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेकांनी देवाचे आभार मानले. कामगारांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा दीर्घ नि:श्वास सोडला.
   सतरा दिवस मृत्यूच्या सावलीत राहूनही त्या कामगारांनी आशा सोडली नव्हती.भारतीय तज्ज्ञांचे कौशल्य, बचाव पथकांची जिद्द आणि कामगारांचा अदम्य आत्मविश्वास यामुळे ही मोहीम यशस्वी ठरली.लिपुतारा टनेल रेस्क्यू ही केवळ एक बचाव मोहीम नव्हती..

तर तो मानवी धैर्य, विज्ञान, संयम आणि एकतेचा विजय होती.

कारण संकट कितीही मोठं असलं..

तरी आशेचा किरण कधीच पूर्ण विझत नसतो..

पण त्या सतरा दिवसांत..

त्या अंधारात..

त्या बंदिस्त भुयारात..

नेमकं काय घडलं होतं..?

    बाहेर आल्यानंतर काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली विश्रांती घेतल्यानंतर त्या कामगारांना हळूहळू सामान्य आयुष्यात परत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र संपूर्ण देशाला एकच प्रश्न सतावत होता.

“त्या सतरा दिवसांत बोगद्याच्या आत नेमकं काय घडलं होतं..?”

अखेर त्या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी सरकारने त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली.

     काही दिवसांनी अडकलेल्या कामगारांपैकी अर्जुन, राजू, शब्बीर, शिवा आणि बाबू या पाच जणांना समितीसमोर हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले.त्या पाच जणांनीच आता ढिगाऱ्याच्या पलीकडे घडलेल्या प्रत्येक क्षणाचा जिवंत साक्षीदार म्हणून आपला “आँखो देखा हाल” सांगायचा होता..

आणि शेवटी..

आणि शेवटी तो दिवस उजाडला.

    एका मोठ्या रूम मध्ये चौकशी समितीसमोर ते पाचही कामगार शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यांवर अजूनही त्या भयाण दिवसांच्या सावल्या स्पष्ट दिसत होत्या. काहींच्या डोळ्यांत भीती अजूनही जिवंत होती, तर काहींच्या चेहऱ्यावर मृत्यूला हरवून परत आल्याचा विचित्र निर्विकारपणा दिसत होता.

त्या रूम मध्ये काही क्षण शांतता पसरली.

मग समितीचे अध्यक्ष हळू आवाजात बोलू लागले.

“तुम्हाला येथे कुणाला दोषी ठरवण्यासाठी किंवा आरोप ठेवण्यासाठी बोलावलेले नाही.

आम्हाला फक्त त्या घटनेमागची वस्तुस्थिती समजून घ्यायची आहे.

   “भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी योग्य कार्यपद्धती आणि सुरक्षा उपाय विकसित करणे, तसेच या दुर्घटनेमागे कोणताही घातपात, निष्काळजीपणा किंवा मानवी हलगर्जीपणा होता का याची सखोल चौकशी करणे, हा या समितीचा उद्देश आहे.”

त्यांनी थोडा विराम घेतला.

“तुम्ही जे अनुभवलं.. ते सांगणं महत्त्वाचं आहे.

कारण भविष्यात दुसऱ्या कोणत्याही कामगारावर अशी वेळ येऊ नये.”

समितीचे शब्द ऐकून सभागृह पुन्हा काही क्षण शांत झाले.

आणि मग अर्जुनने थरथरत्या आवाजात बोलायला सुरुवात केली.

    “साहेब ! तो दिवस रोजच्यासारखाच उजाडला होता. ऑक्टोबर महिना होता. सकाळ-संध्याकाळ हवेत गारवा जाणवत होता. त्या दिवशी तर थंडी जरा जास्तच होती. उबदार दुलईत पडून राहावं आणि बाहेरच पडू नये असंच वाटत होतं. आदल्या दिवशी काम जरा जास्तच झालं होतं. अंगातला थकवा अजूनही उतरला नव्हता.

एक मन म्हणत होतं, ‘आज जाऊ नको कामावर..’

पण दुसरं मन म्हणत होतं. ‘असं करून पोट भरत नाही अर्जुना.. उठ !’

ते दुसरं मन जरा जोरातच बोलले आणि माझी झोप खाडकन उडाली.

     लगबगीने सकाळची आन्हिकं आटोपली. न्याहारी केली. कामावर जायला निघणार इतक्यात माझी बायको वरच्या मांडणीवरचा डबा काढताना घसरून पडली. थोडा मुका मार लागला. मी म्हटलं, ‘आज मी तुझी सेवा करायला घरी राहतो..’

पण तीच उलट हसत म्हणाली,

‘कामावर जा. आळस करू नका.’

तिच्या त्या लाडिक हट्टापुढे नाईलाज झाला. मी सायकलला पायंडेल मारलं आणि सरळ लिपुताराची वाट धरली..”

अर्जुन शांत झाला.

मग शब्बीर बोलू लागला.

   “माझ्या घराजवळच्या मशिदीतून सकाळची अजान झाली होती. खरं तर ती होण्याआधीच मी उठलेलो असतो. नमाज अदा करून मी नेहमी वेळेवर साइटवर पोहोचतो. पण त्या दिवशी उशीर झाला. आदल्या दिवशी काम फार झालं होतं. डोळे उघडायलाच तयार नव्हते.

माझ्या मुलाने मला त्याच्या बाईकवरून लिपुतारा साइटवर सोडलं..”

नंतर शिवा बोलायला लागला.

“माझीही तीच अवस्था होती, साहेब ! अंगात कसकस जाणवत होती. क्रोसिन घेऊन थोडा वेळ झोपलो, मग बरं वाटलं म्हणून निघालो.

पण खरं सांगू त्या दिवशी मन सतत सांगत होतं .‘आज घराबाहेर पडू नकोस..’

जेव्हा जेव्हा संकट जवळ येतं ना साहेब ! तेव्हा माझं मन मला आधीच ओढतं..”

समितीतील एक अधिकारी हलकेच म्हणाला.

“उसे ‘सिक्स्थ सेन्स’ कहते हैं..छठा इंद्रिय..”

शिवा लगेच मान हलवत म्हणाला.

“हाँ साबजी.. वही.. वही..”

थोडा वेळ शांत राहून तो पुन्हा म्हणाला

“मग मनालाच म्हटलं..चलो, शिवशंकरजी का नाम लेकर काम पे चलते हैं..”

चौकशी रूम मधील वातावरण आता पूर्णपणे त्या कथेत ओढलं गेलं होतं.

मग बाबू बोलू लागला

    “साहेब ! मला तर कामावर जातोय असं कधी वाटलंच नाही. आम्ही सगळे जण मित्रांसारखे होतो. एकत्र काम, एकत्र जेवण,दुपारी फुटबॉल, क्रिकेट काही जण झोपायचे, काही खेळायचे..आमचं जगणंच तिथे होतं.”

तो काही क्षण थांबला.

सर्वांचे डोळे आता त्याच्यावर खिळले होते.

    “त्या दिवशी सकाळी आठ वाजता आम्ही ड्युटीवर हजर झालो. भुयारात अंधार असल्यामुळे फ्लडलाईट्स पेटलेले होते. बाहेर ठेवलेल्या जनरेटरचा ‘घररर.. घररर..’ आवाज सतत घुमत होता. त्यात ड्रिल मशीनचा ‘ढुंग..ढुंग..ढुंग..’ आवाज मिसळला होता

  एका बाजूने भुयार बंदिस्त असल्यामुळे तो आवाज अधिकच भेसूर वाटत होता..”“दुपारी बारा-साडेबारा वाजता आम्ही जेवायला बसलो. पंधरा मिनिटांत जेवण आटोपलं कारण त्या दिवशी फुटबॉलचा सामना होता. आम्ही दोन टीम बनल्या. बाकीचे काही साथीदार पथारी टाकून झोपले होते. त्यांनी आम्हाला निक्षून सांगितलं की..

‘खेळा पण फार आवाज करू नका..’

“पण आवाजाशिवाय कधी कोणता खेळ होतो कां ? “

सभागृहात हलकीशी कुजबुज झाली.

   “दुपारी दोन वाजता खेळ संपवून आम्ही पुन्हा कामाला लागलो. जसजसं आम्ही पुढे खोदकाम करत होतो, तसतसे सुरक्षात्मक काँक्रीटचे ‘टनेल आर्च’ मागून पुढे आणले जात होते. पण ते आमच्यापर्यंत फक्त पंधरा मीटरच पुढे आले होते.

    आम्ही तर तेव्हापर्यंत जवळपास अडीच किलोमीटरपर्यंत भुयार वेगाने खणून पुढे गेलो होतो. आमच्या कामाचा वेग आणि भूभागाची परिस्थिती पाहता ते आर्च किमान सत्तर मीटरपर्यंत पुढे यायला हवे होते.

पण आम्ही त्या सुरक्षात्मक आर्चच्या खूप पुढे, अक्षरशः उघड्या डोंगराच्या पोटात काम करत होतो…”

जर ते टनेल आर्च सुरक्षित अंतरा पर्यंत पुढे आले असते..

तर कदाचित ती घटना घडलीच नसती..”

सभागृहात पुन्हा शांतता पसरली.

“दुपारचे बरोबर तीन वाजले होते.

पुढे काय आक्रित वाढून ठेवले आहे. याची त्या क्षणी आम्हाला काहीच कल्पना नव्हती.

    “आदल्या दिवसापासून भुयाराच्या छतातून अगदी थोडीथोडकी सुकी माती खाली झिरपू लागली होती. जणू कुणीतरी वरून हलक्या हाताने धूळ उधळत होतं. आमच्यासाठी ते दृश्य पूर्णपणे नवीन नव्हतं.भुयारात खोदकाम करताना अशा किरकोळ घडामोडी अधूनमधून होतच असत. तरीही त्या दिवशी काहीतरी वेगळं जाणवत होतं.
     आमच्या डोक्यावर सतत माती पडत असल्याची तक्रार आम्ही साईट इंजिनियर आणि सुपरवायझरकडे केली होती. मात्र त्या इशाऱ्याकडे त्यांनी ‘सामान्य बाब’ म्हणूनच पाहिलं. ना काम थांबवलं गेलं, ना अतिरिक्त सुरक्षेची कोणतीही उपाययोजना करण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही सुद्धा ती बाब नेहमी सारखीच आहे, असं गृहित धरून पुन्हा काम करत राहिलो.”

पण नंतर

भिंतीतून माती वाहायला लागली.

जसं विहिरीच्या भिंतीतून पाण्याचे झरे वाहतात ना..

तसं..”

 आवाज मंद झाल्यासारखा बाबू पुढे बोलू लागला.

भिंतीतून अशी माती वाहणे सुद्धा आमच्या साठी सामान्यच होते.म्हणून आम्ही विशेष ते मनावर घेतले नाही..आणि अचानक..

‘धम्म्म.. धम्म्म..धडाम्म्म..!’

असा दबका परंतु मोठा आवाज झाला.

क्षणात भगभगणारा प्रकाश सोडणारे सर्व फ्लडलाईट्स बंद झाले.

भुयारात काळाकुट्ट अंधार पसरला.

सुकी माती हवेत उडाली. काहीच दिसेनासं झालं. फक्त दूरवरून एका अरुंद फटीतून पांढरट प्रकाश येत होता.

आम्ही जीवाच्या आकांताने त्या प्रकाशाकडे धाव घेतली..

पण तिथे पोहोचलो तेव्हा..

समोर फक्त अवाढव्य मातीचा ढिगारा उभा होता.”

चौकशी अधिकाऱ्यांपैकी एकाने नकळत जोरात श्वास सोडल्याचा “हम्म..” आवाज ऐकू आला.. बाबू पुढे सांगू लागला.. 

    “ढिगाऱ्यावर एक छोटीशी वाट उरली होती. एक माणूस कसाबसा सरपटत जाईल एवढीच. आम्ही सगळे लाइन लावून उभे राहिलो. कारण धक्का-बुक्की झाली असती तर तो मार्गही बंद झाला असता.

बारक्या कुंजाम पहिल्यांदा वर चढला.

तो त्या फटीतून बाहेर पडणार इतक्यात..

बाहेरून पुन्हा माती कोसळली.

आणि आशेचा शेवटचा किरणही मिटला..”

बारक्याला लगेच खाली उतरवण्यात आले.

    अर्जुन नेतामने क्षणाचाही विलंब न करता सर्वांना ढिगाऱ्यापासून शक्य तितक्या दूर, भुयाराच्या आतल्या बाजूला जिथे नवीन खोदकाम सुरू होते तिकडे जाण्याची सूचना केली. आम्ही जीवाच्या आकांताने त्या दिशेने धावत सुटलो. सर्वजण आत जाऊन एकत्र उभे राहताच…

अचानक बाहेरच्या भागात अजून एक मोठा आवाज झाला.

“धम्म्म.. धडाम्म्म..!”

मोठा मातीचा थर कोसळला.

     एक बरं झालं अर्जुनने आम्हाला त्या भागापासून वेळेत दूर केलं होतं. नाहीतर आम्ही तिथेच गाडलो गेलो असतो.पुन्हा एकदा माती हवेत उडाली. पण यावेळी ती माती आधीसारखी कोरडी नव्हती. हवेत अचानक दमटपणा पसरला. ओलसर मातीचा एक विचित्र दर्प संपूर्ण भुयारात भरून राहिला होता.

    सभागृहातील सर्वजण मंत्रमुग्ध होऊन फक्त बाबूचे बोलणे ऐकत होते. बोलता बोलता त्याला दमल्यासारखे वाटू लागले. त्याने पाण्याचा घोट घेतला आणि शांत बसला.

मग अर्जुन पुढे बोलू लागला,

    “साहेब !..त्या वेळी संपूर्ण भुयारात फक्त मातीच माती झाली होती. आमच्या अंगावर मातीची पुटं चढली होती. घामाचा नाही तर ओलसर मातीचा वास शरीराला येत होता.

पावसाळ्यात हाच मातीचा वास माणसाला सुखावतो..

पण ढिगाऱ्याखाली अडकल्यावर तोच वास मनात एक वेगळी भीती निर्माण करतो..

आपण जिवंत कबरीत अडकलो आहोत का..? अशी..” अशी अनाहुत भीती मनात दाटून राहिली होती.

सभागृहात पूर्ण शांतता पसरली होती.

अर्जुन पुढे म्हणाला..

    “पहिल्या टप्प्यात पडलेली माती सुकी होती. ती असती तर कदाचित बारा-तेरा तासांत बुलडोझर लावून हटवता आली असती. पण नंतर कोसळलेला थर पूर्णपणे ओलसर, चिकट आणि दमट होता. ती माती हटवणं खूप कठीण आहे हे आमच्या सारख्या अनुभवी खुदाई कामगारांच्या लगेच लक्षात आलं.

त्या क्षणी आमच्या मनात दोनच शक्यता उभ्या राहिल्या..

एकतर खूप दिवस बाहेर पडण्याची वाट पाहावी लागणार..

किंवा..

हीच आमची जिवंत कबर ठरणार..”

त्याने काही क्षण डोळे मिटले.

“मातीचा धुरळा खूप वेळ खाली बसत नव्हता. खोकून खोकून जीव जायला लागला होता. मी सगळ्यांना लगेच सांगितलं,

‘ज्यांच्याकडे रुमाल आहेत त्यांनी तोंडावर बांधा.’

   सुदैवाने ढिगारा सुरुवातीच्या पासष्ट मीटर भागात पडला होता. आम्ही काही सामान, खेळाचं साहित्य आणि पाण्याची टाकी आतल्या बाजूला आणून ठेवली होती. त्यामुळे दोन दिवस तरी पाण्याची चिंता नव्हती.

मी सगळ्यांना थोडं पाणी वापरून रुमाल ओले करायला सांगितले आणि नाक-तोंड झाकायला सांगितलं. सगळ्यांनी तसं केलं.

खूप वेळानंतर धुरळा खाली बसला पण हवेतला दमटपणा कायम होता.”

अर्जुनचा आवाज आता अधिक गंभीर झाला होता.

“ढिगारा आणि शेवटचं सुरू असलेलं खोदकाम यामध्ये जवळपास अडीच किलोमीटर अंतर होतं. तीच आमच्यासाठी सर्वात मोठी जमेची बाजू होती.

   हळूहळू भुयारातील प्राणवायू कमी होत असल्याची जाणीव होऊ लागली. आमचे श्वास संथ होत गेले. पण पूर्णपणे बंद पडले नाहीत कारण भुयारात साठलेला प्राणवायू अजून आम्हाला साथ देत होता.

मी सगळ्यांना सांगितलं,

‘सगळे एकाच जागी बसू नका. दूरदूर बसा. जोरात श्वास घेऊ नका. शांत रहा. तुमच्या भोवतीचं वातावरणच आता तुमचा आधार आहे..’

मग आम्ही सगळे अडीच किलोमीटरच्या त्या लांब भुयारात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसलो.

काही जण गुडघ्यात डोकं घालून शांत बसले होते.

काही जण देवाचं नाव घेत होते.

आणि काहींच्या डोळ्यांत स्पष्ट मृत्यू दिसत होता..”

सभागृहातील वातावरण आता पूर्णपणे स्तब्ध झाले होते.

“माझ्या मनातही सतत एकच प्रश्न होता,

आता पुढे काय..?

पाणी आणि अन्न एखादा-दुसरा दिवस पुरेल..

पण त्यानंतर..?

“ही ओलसर माती काढणं जवळजवळ अशक्य वाटत होतं.

पण साहेब ! मला परमेश्वरावर आणि मानवी प्रयत्नांवर पूर्ण विश्वास होता.

    थायलंडमध्ये पाण्याने भरलेल्या गुहेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढल्याची बातमी मी टीव्हीवर पाहिली होती. मग आम्हालाही कुणीतरी बाहेर काढणार ही आशा मनात जिवंत होती.

सरकार, प्रशासन आणि आमची कंपनी प्रयत्नात कोणतीही कसर ठेवणार नाही याची मला खात्री होती.”

अर्जुन काही क्षण शांत झाला आणि पुढे बोलू लागला..

“शरीराने आणि मनाने आम्ही पूर्णपणे थकलो होतो. भुयारात खूप खोलवर आम्ही अडकलेलो होतो. शेवटी थकव्याने कधी झोप लागली तेच कळलं नाही.

पण..

झोपेतून जाग आली तेव्हा काहीतरी वेगळं जाणवलं..

हवेत अचानक प्राणवायूचं प्रमाण वाढल्यासारखं वाटत होतं.

आम्ही सगळे घाबरतच आजूबाजूला पाहू लागलो.

तो वारा कोणत्या दगडाच्या फटीतून येतोय याचा शोध सुरू असतानाच एका कामगाराच्या लक्षात आलं,

‘अरे.. हवा ढिगाऱ्याच्या बाजूने येतेय..!’

आम्ही सगळे तिकडे धावलो.

आणि मग…

पहिल्यांदा आम्हाला तो दिसला.

ढिगाऱ्याच्या वरच्या बाजूने आत आलेला एक मोठा लोखंडी पाइप..”

त्यातून प्रसन्न,उत्साही वाटणारा प्राणवायू बाहेर येत होता..बरेच दिवस उपाशी असलेला माणूस

   “जसा माणूस पोटभर जेवतो ना साहेब! तसं त्या क्षणी मी छातीच्या पिंजऱ्यात मावेल तेवढा प्राणवायू भरून घेतला. खोल श्वास घेतला आणि स्वतःचं मन शांत करण्याचा प्रयत्न केला.

त्या क्षणी आम्हाला पहिल्यांदा असं वाटलं…

कदाचित बाहेरच्या लोकांपर्यंत आम्ही जिवंत असल्याची बातमी पोहोचली असावी..”

अर्जुन थोडा वेळ शांत झाला.

सभागृहात बसलेले सर्वजण त्याच्याकडे एकटक पाहत होते.

तो पुढे बोलू लागला.

     “दुसऱ्या दिवशी ढिगाऱ्यातून एक लोखंडी पाइप आत सोडण्यात आला. त्या पाइपमधून अन्न आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुसऱ्या पाइपमधून छोटा कॅमेरा आत पाठवण्यात आला.

पहिल्यांदा त्या कॅमेऱ्यातून बाहेरचा प्रकाश दिसला..

आणि आम्हाला खात्री पटली

आम्हाला बाहेर काढण्यासाठी बाहेरची दुनिया अजूनही झगडते आहे..”

अर्जुनच्या आवाजात आता हलकी ऊब जाणवत होती.

“त्या कॅमेऱ्यातून आम्ही आमच्या कुटुंबीयांशी बोलू शकत होतो. त्यांच्या आवाजाने आमच्या अंगात पुन्हा जीव यायला लागला.

मरणाची पहिली भीती जरी कमी झाली होती..

तरी मृत्यूची टांगती तलवार पूर्णपणे दूर झाली नव्हती.

कारण त्या अडीच किलोमीटरच्या भुयारात कुठेही पुन्हा ढिगारा कोसळू शकतो.अशी अनामिक भीती सतत मनात असायची.

रात्री झोप सुद्धा लागत नव्हती.

कधी एखादा दगड किरकिरला तरी आम्ही दचकून जागे व्हायचो..”

सभागृहातील वातावरण पुन्हा गंभीर झालं.

“पण हळूहळू आम्ही त्या अंधाराशी जगायला शिकलो.

नंतरचे पंधरा दिवस..

कधी कधी आम्हाला असं वाटायचं की त्या अडीच किलोमीटरच्या भुयाराचे आम्ही राजेच आहोत की काय..अशी भावना निर्माण झाली होती.

कारण त्या अंधारात आता आमचंच जग तयार झालं होतं.”

अर्जुनच्या चेहऱ्यावर हलकीशी आठवणीची रेष उमटली.

“वेळ काढण्यासाठी आम्ही क्रिकेट खेळायचो, फुटबॉल खेळायचो,खूप गप्पा मारायचो.

हळूहळू सगळ्यांचे छोटे छोटे गट तयार झाले. कोण देवाचं नाव घेत बसायचं,कोण जुन्या गोष्टी सांगायचं.. कोण बाहेर गेल्यावर काय करायचं याची स्वप्नं रंगवायचो.

आमचा पाच जणांचा वेगळाच ग्रुप झाला होता..”

तो हलकेच हसला.

   तीन सदस्य चौकशी अधिकारी,कंपनीचे अधिकारी, जमलेली पंच मंडळी.अर्जुनचे ते बोलणे ऐकून चकित झाले होते.मातीच्या ढिगाऱ्या मागची सर्व परिस्थिती आता सर्वच मंडळींना कळून चुकली होती..पुढे अर्जुन म्हणाला..

“बाहेर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचं आम्हाला कॅमेऱ्यातून समजत होतं. जेवणही व्यवस्थित मिळत होतं.

मग एके दिवशी आम्हाला सांगण्यात आलं.

‘Rat Miners’ दुसऱ्या बाजूने खोदकाम करत तुमच्यापर्यंत येत आहेत..’

त्या दिवसानंतर आमच्या मनातली आशा आणखी मजबूत झाली.

आणि मग..

अठराव्या दिवशी..

त्या अरुंद पाइपच्या पलीकडून पहिल्यांदा एका माणसाचा हात आम्हाला दिसला..

त्या क्षणी आम्हाला समजलं,

आम्ही वाचलो..”

आमचे परिवारजन खुशीत होते दोन आठवड्याचे त्यांचे दुःख आणि काळजी दूर झाली.

    “आमचे परिवारजनही आता थोडे निर्धास्त झाले होते. तब्बल दोन आठवडे त्यांच्या डोळ्यांत साचलेली भीती, काळजी आणि असहाय्यता हळूहळू दूर होत होती. प्रत्येक वेळी कॅमेऱ्यातून आमचा चेहरा दिसला की त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा जगण्याचा उजेड परत यायचा.

  आईच्या डोळ्यांतले अश्रू कमी झाले होते.पत्नीच्या चेहऱ्यावर हसू फुटले होते..

                                                                               क्रमश:..एपिसोड - २

    हिमालयातील लिपुतारा टनेल दुर्घटनेत ३९ कामगार तब्बल १८ दिवस भुयारात अडकले होते. मृत्यू, अंधार, ऑक्सिजनची झुंज आणि भारतीय बचाव पथकांच्या अदम्य प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे ‘लिपुतारा टनेल रेस्क्यू’ : “मृत्यूच्या पलीकडचा श्वास !..” ही थरारक मराठी कथा वाचली असेल तर पुढच्या भागात ही घटना घडण्यामागची काळी बाजू उलगडून पुढे येणार आहे.जी मन सुन्न करणारी असेल त्या वस्तुस्थितीची शोध कथा..

🔗लिपुतारा टनेल रेस्क्यू : “गुप्तधनाच्या हव्यासाची रक्तरंजित किंमत” (एपिसोड - २)| थरारक मराठी रहस्यकथा👉

 अस्वीकरण -ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजन आणि साहित्यिक उद्देशाने लिहिण्यात आली आहे. कथेमधील पात्रे, ठिकाणे, संस्था आणि घटना यांचा प्रत्यक्ष व्यक्ती किंवा घटनांशी संबंध मानू नये.
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.


तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो





📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...