मुख्य सामग्रीवर वगळा

वादळालाही वाकवणारी गलबतगाथा | समुद्रातील थरारक जीवनसंघर्ष | हृदयस्पर्शी मराठी कथा

“वादळालाही वाकवणारी गलबतगाथा!” समुद्रातील थरारक जीवनसंघर्ष | हृदयस्पर्शी मराठी कथा 

वादळालाही वाकवणारी गलबतगाथा!” एक थरारक जीवन संघर्षकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
भरतीच्या लाटांनी गलबत हलके डोलले,

शिडांत भरलेल्या वाऱ्याने स्वप्न दूर नेले।

नांगर सुटताच सागर ही दूर गेला ,

खलाशांच्या आरोळ्यांनी किनाराच जागा झाला॥

🔗भरकटलेली शिवाई’-पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी.

   पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.    

"वादळालाही वाकवणारी गलबतगाथा!”  समुद्रातील थरारक जीवनसंघर्ष | हृदयस्पर्शी मराठी कथा..

    “एक थरारक जीवन संघर्ष, जिथे प्रत्येक लाट मृत्यूशी झुंज देत होती..”
खाऱ्या समुद्राच्या अथांग पाण्यात, काळ्याकुट्ट वादळात आणि गर्जणाऱ्या लाटांमध्ये एक गलबत आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत होते. शिडांत भरलेला वारा, नांगराचा विश्वास आणि खलाशांची जिद्द यांची ही जिवंत गाथा तुम्हाला समुद्राच्या त्या भयाण दुनियेत घेऊन जाईल जिथे प्रत्येक क्षण हा जीवन आणि मृत्यूमधील संघर्ष होता.
    समुद्रातील जीवनसंघर्षावर आधारित ही थरारक मराठी कथा धैर्य, जिद्द आणि जगण्यासाठीच्या अदम्य इच्छेची कहाणी सांगते. अथांग समुद्रात उसळणारे वादळ, मृत्यूशी दोन हात करणारे खलाशी आणि प्रत्येक प्रचंड लाटेसमोर न झुकणारे एक छोटेसे गलबत यांचा हा रोमांचकारी प्रवास आहे. निसर्गाच्या रौद्र रूपासमोर मानवी धैर्य किती मोठे असते, याचा जिवंत अनुभव या कथेतून मिळेल.
   भारतीय किनारपट्टीच्या समुद्री इतिहासात गलबत किंवा शिडाची बोट यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.गलबत म्हणजे लाकडापासून तयार केलेली मोठी शिडाची समुद्री बोट, या बोटीवर मोठी शिडे (पाल) असत आणि वाऱ्याच्या जोरावर ती समुद्रात चालत असे. भारतात शिडाच्या बोटींचा वापर हजारो वर्षांपूर्वीपासून होत होता. प्राचीन काळात अरब व्यापारी, कोकणातील खलाशी आणि गुजराती व्यापारी अशा गलबतांचा वापर करून व्यापार करत असत.
   छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमार काळात विविध प्रकारची गलबते वापरली जात होती. त्या काळात समुद्री किल्ल्यांपर्यंत सामान पोहोचवणे, युद्ध आणि गस्त घालणे यासाठीही या बोटी महत्त्वाच्या होत्या. मजबूत सागवान किंवा इतर टिकाऊ लाकूड वापरले जाई. मोठे पाल, उंच शिडे, खोल पोट असलेली रचना असे. काही गलबतांमध्ये माल ठेवण्यासाठी खालचा भाग मोठा असे.समुद्रातील मोठ्या लाटांना तोंड देण्यासाठी बोट विशेष पद्धतीने बांधली जाई. 
  आजही पर्यटनासाठी पारंपरिक शर्यतींसाठी सांस्कृतिक वारसा म्हणून या बोटी जपल्या जातात.गलबत ही फक्त बोट नव्हती, तर कोकणच्या समुद्री संस्कृतीची, व्यापाराची आणि खलाशी परंपरेची ओळख होती.
  पूर्वी संपूर्ण भारतात तसेच कोकणात रस्ते विकास आणि पूल बांधणी मोठ्या प्रमाणावर झालेली नव्हती. त्या काळात नद्या, खाड्या आणि सागरी मार्गांवरून शिडाच्या बोटींद्वारे मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जात असे. महाराष्ट्राच्या सुमारे ७२० किमी लांबीच्या किनारपट्टीवरील सागरी मार्गांवर जसजसे एकामागून एक पूल उभे राहू लागले आणि इंजिनाच्या बोटींचा प्रसार वाढू लागला, तसतशी पारंपरिक गलबत संस्कृती हळूहळू लोप पावू लागली.
  कोकणातील आमच्या पिढीने समुद्रात डौलाने विहार करणारी गलबते पाहिलेली आहेत. त्यांच्या जलावतरणाचे सोहळे अनुभवले आहेत. त्या गलबतांशी जोडलेल्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत.
  लहानपणी मी रत्नागिरीतील गावखडी येथील माझ्या आजोळी राहत असताना. अनेक गलबते रत्नागिरीच्या पूर्णगड बंदरात तसेच मुचकुंदी नदीच्या खाडी परिसरात विहार करत असायची.  त्या काळात रत्नागिरी-राजीवडा-भाट्ये आणि पूर्णगड-गावखडी हे खाडीपूल अस्तित्वात नव्हते. पुढचा घोडपोई - आंबेरी येथील पूलही तेव्हा बांधला गेलेला नव्हता.त्या काळी भगवती बंदर रत्नागिरी ते देवगड,आचरा बंदर या सागरी पट्ट्यात रत्नागिरी पंचक्रोशीतील अनेक गलबते मालवाहतूक करीत असत. 
  मुंबई, गोवा किंवा इतर दूरच्या प्रवासाला निघताना गलबतवाले गणेशगुळे येथील गणपतीला सुरक्षित प्रवासासाठी साकडे घालत असत. त्यामुळे त्या देवस्थानाला “गलबतवाल्यांचा गणपती” असेही म्हटले जाई.नंतर हळूहळू गलबत व्यवसाय कमी होत गेला आणि त्या भागातील भाविकांचा ओघ रत्नागिरीतील गणपतीपुळे या प्रसिद्ध श्रद्धास्थानाकडे वळला, असे स्थानिकांकडून सांगितले जाते. या सर्व गोष्टींवरून  रत्नागिरी पंचक्रोशीतील  किनारपट्टीवर गलबत व्यवसाय किती मोठ्या प्रमाणावर होता, याचा सहज अंदाज येतो. 
  या व्यवसायात कोळी, आगरी, गाबीत आणि भंडारी समाज मोठ्या प्रमाणावर गुंतलेला होता. विशेषतः रत्नागिरी आणि मालवण पट्ट्यातील भंडारी समाज गलबत व्यवसायात अधिक सक्रिय होता. ताड-माड उत्पादने, शेती आणि मासेमारी यासोबतच जल वाहतूक तसेच आरमारातील नोकरी हा ही त्यांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा भाग होता.
  माझ्या आईचे चुलते, जे माझे आजोबा लागत होते,ज्यांना आम्ही प्रेमाने “आबा” म्हणत असू, त्यांचा उजवा खांदा थोडा वाकलेला होता. लहानपणी मी त्यांना एकदा निरागसपणे विचारले की,
  “तुमचा हा खांदा असा कां वाकला आहे ?”त्यावर ते हसत म्हणाले,
 “तरुणपणी मी, माझ्या वडिलांच्या म्हणजे तुझ्या पणजोबांच्या गलबतावर काम करत होतो, म्हणून माझा हा खांदा वाकलेला आहे.” त्यांचे ते उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटले. मी पुन्हा विचारले,“पण काम केल्याने खांदा असा कसा वाकू शकतो? ”माझ्या त्या बालसुलभ प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले “नांगरलेल्या गलबताला पाण्यात पुढे रेटण्यासाठी खलाशी खांद्याने जोर लावत आणि त्यांच्या सोबत आम्ही ही त्या कामात सहभागी होत असू.” 
  त्यांचे ते सांगणे पूर्णपणे खरे होते. त्या काळी गलबत किनाऱ्यावर किंवा उथळ पाण्यात नांगरलेले असेल, तर ते हलवण्यासाठी सुरुवातीला मानवी जोर द्यावा लागत असे. खलाशी खांद्याने, हाताने किंवा लांब बांबूच्या साहाय्याने गलबत पुढे ढकलत असत. अशावेळी मदतीसाठी गावातील इतर लोक आणि मुलंही उत्साहाने सहभागी होत असत. 
  आजच्या यांत्रिक युगात ही गोष्ट ऐकताना कदाचित आश्चर्य वाटेल पण त्या काळातील जल वाहतुकीत मानवी श्रम, ताकद आणि सामूहिक सहकार्य यांनाच सर्वाधिक महत्त्व होते. “त्या गलबताचे पुढे काय झाले?” हा माझा प्रश्न ऐकताच आबांनी त्या दिवसांची कहाणी सांगायला सुरुवात केली. 
  एका  वर्षीच्या नारळी पौर्णिमेला  समुद्राला मानाचा नारळ अर्पण करून आम्ही सर्व गलबतवाले कुटुंबीय , गाववाले नेहमीप्रमाणे सागराकडे गाऱ्हाणे घालत होतो. त्या काळी समुद्र हा केवळ पाण्याचा विशाल सागर नव्हता, तर तो आमच्या  दृष्टीने पालनकर्ता, रक्षणकर्ता आणि उदरनिर्वाह करणारा देवच होता. 
    किनाऱ्यावर आणलेल्या गलबताच्या भोवती उभे राहून आम्ही सर्वांनी  हात जोडले आणि समुद्राला साकडे घातले. “रे देवा महाराज्या ! आतापर्यंत तू आमकां सांभाळून घेतलंस. पुढंय ही असाच आमचो सांभाळ करय. आमच्या गलबतांच्या धंद्याक संरक्षण देय, बरकत देय. आमच्या हातून कायता चूक जाली आसल्यार ती पोटात घे रे,महाराज्या!” आणि सर्व पंचक्रोशीतल्या गलबत वाल्यांनी नारळ अर्पण केला. 
  त्या प्रार्थनेत भीती होती, श्रद्धा होती आणि समुद्राशी असलेले एक अदृश्य नातेही दडलेले होते. कारण समुद्र जितका उदार, तितकाच तो रौद्रही असतो, याची जाणीव त्या प्रत्येक खलाशाला होती. खरे तर नारळी पौर्णिमेनंतर पावसाचा जोर कमी होऊ लागतो आणि खवळलेला समुद्रही हळूहळू शांत होत जातो. पण ते वर्ष काही वेगळेच ठरले होते. 
  नारळी पौर्णिमा होऊनही पावसाचा फेरा कमी व्हायचे नाव काही घेत नव्हता आणि त्यामुळे समुद्र सुद्धा शांत व्हायला तयार नव्हता. त्या काळी जणू पाऊस आणि समुद्र यांच्यात एक जुगलबंदीच सुरू होती “तू आधी गप्प रहा, मग मी शांत होतो!” असा त्यांचा अबोल वाद सुरू असल्यासारखे वाटत होते.  
  गलबते नांगरून ठेवलेली असल्यामुळे मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अनेक दुकानांतील आवश्यक सामान संपत आले होते. दुसरीकडे, समुद्राला नारळ अर्पण झाल्यावर गलबते पुन्हा सुरू होतील. या आशेने खाडीच्या दोन्ही तीरांवर वाहतुकीसाठीचा माल अनेक दिवसांपासून येऊन पडला होता. 
  दरवर्षी प्रमाणे समुद्राला नारळ दिल्यावर आम्हीही निश्चिंत झालो होतो. गलबत पुन्हा पाण्यात उतरले होते. रत्नागिरीच्या भगवती बंदरापर्यंत एक-दोन फेऱ्याही व्यवस्थित झाल्या होत्या. तिसरी फेरी आचरा बंदराकडे जाणार होती. 
 'आबा' आजोबा आदल्या रात्री  गलबत आणि खलाशी यांचे बाबतीत काय घडले ते  रंगात आल्या सारखे सांगत होते आणि मी मन लावून त्यांचे बोलणे ऐकत होतो.ते पुढे म्हणाले की ..
  सर्व खलाशी आदल्या दिवसापासूनच गलबतावर राहायला आले होते. मालाची देखरेख करण्यासाठी त्यांना बोट सोडून जाता येत नसे. त्यामुळे त्यांचे जेवण, झोप आणि दैनंदिन कामकाज सगळे गलबतावरच चालत असे. प्रत्येक फेरी पूर्वी गलबताची काळजीपूर्वक तपासणी केली जाई. विशेषतः शिडाचे खांब आणि शिडाच्या कापडाचे बारकाईने निरीक्षण होत असे. कुठे शिवण उसवली असेल किंवा कापड झिजलेले दिसले, तर ते त्वरित शिवून दुरुस्त केले जाई.
  तराफ्यांद्वारे आणलेला माल गलबतामध्ये नीट रचून ठेवला जात असे. पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून त्या सामानावर कताण अंथरले जाई, जेणेकरून पाऊस किंवा समुद्राच्या पाण्याचे शिंतोडे लागून माल भिजणार नाही. पारंपरिक गलबत किंवा मोठ्या शिडाच्या बोटीमध्ये वजनाचे संतुलन सर्वात जास्त मध्यभागी राखले जायचे. कारण गलबताचा मध्यभाग हा त्याचा मुख्य तोल सांभाळणारा भाग असतो. 
  त्यामुळे जड सामान, धान्याच्या पोती, मीठ, मासळीचे खोके किंवा पाण्याची पिंपे बहुतेक वेळा गलबताच्या पोटात आणि मध्यभागी ठेवली जात. यालाच “गलबताचा तोल” ठेवणे असे म्हटले जायचे. जर सर्व वजन पुढच्या टोकाला किंवा मागच्या भागात गेले तर गलबत एका बाजूला झुकू शकते समुद्रात मोठ्या लाटांमध्ये संतुलन बिघडले तर शिडावरचा ताणही वाढतो.
  गलबतांच्या उंच शिडांसाठी जाड सुती किंवा कॅनव्हाससारखे मजबूत कापड वापरले जात असे. समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याला आणि सततच्या ताणाला तोंड देता यावे म्हणून त्या कापडावर तेल आणि राळ यांचा विशेष लेप लावला जाई. त्यामुळे शिडाच्या कापडात पाणी मुरत नसे, ते भिजून जड होत नसे आणि वाऱ्याचा योग्य तो वेग पकडण्यासाठी ते सक्षम राहत असत.     
  आदल्या दिवशी दोन तराफे जोडून सर्व सामान गलबतावर चढवण्यात आले होते. गलबतावरची कामे कधीच संपत नसत. मालक घरी असला तरी रात्रीच्या वेळी गलबताचे खरे मालक जणू खलाशीच असत. मालाची राखण, गलबताची देखभाल, शिडांची तपासणी, नांगराची काळजी अशा असंख्य जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर असत. 
  दारू पिऊन खलाश्यांमध्ये भांडणे होणे हे देखील त्यांच्या जीवनाचा जणू एक भागच होता. गलबतावर गेल्यावर अनेकदा आधी ती भांडणे मिटवावी लागत, मगच नांगर उचलण्याचे काम सुरू होत असे. 
  गलबतावर नाखवा आणि खलाशांसाठी लाकडी बंदिस्त अशी एक छोटी खोली असे. किनारी बोलीभाषेत तिला “कप्पा”, “खोली” किंवा “मांद” असेही म्हटले जाई. त्या छोट्याशा कप्प्यात चार खलाशी दाटीदाटीने झोपायचे. ज्या दिवशी गलबतावर सामान चढले त्या रात्री निसर्गाचा नूरच काही वेगळा होता. परतीच्या पावसाने जणू रौद्र रूप धारण केले होते. 
  जोरजोरात डचमळणारे गलबत, सतत आदळणाऱ्या लाटा आणि पावसाळ्यात खाडी किनारी घुमणारी समुद्राची गाज बोटीवरील वातावरण अधिकच भयाण बनवत होते. खोल समुद्रातील समुद्राची गाज सहसा इतकी भेसूर वाटत नाही; परंतु पावसाळ्यात खाडी लगत ऐकू येणारी ती घुमणारी गर्जना माणसाची मनःस्थिती बिघडवून टाकू शकते. 
  या अशा भयाण वातावरणा मुळे त्या रात्री खलाश्यांच्या मनात नकळत भीतीचे सावट दाटून आले होते. मुसळधार पावसाचा मारा आणि घोंघावणाऱ्या वाऱ्यामुळे खलाश्यांची झोप पूर्णपणे उडाली होती. पोटात गावठी दारू असल्यामुळे तेवढाच त्या थंड आणि बोचऱ्या वाऱ्यापासून त्यांना थोडा आधार मिळत होता.  
  दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि माझे वडील दोघेही  भल्या पहाटे उठून गलबतावर जायच्या तयारीला लागलो.त्या दिवशी छत्री उडवणारा पाऊस असल्याने आम्ही छत्रीऐवजी शेतात वापरले जाणारे इरले डोक्यावरून घेतले होते. घराबाहेर पडलो तर पाऊस भुरभुर पडत होता. वर आकाशाकडे पाहिले, तर आर्द्रा नक्षत्रात जशी ढगांची भाऊ गर्दी उसळते तशी काळ्याकुट्ट ढगांची गर्दी जमली होती. विजा सतत कडकडत होत्या. पावसाची सुरुवात किंवा शेवट होताना जसा विजांचा आणि ढगांचा प्रचंड कडकडाट होतो, तसाच तो परतीच्या पावसाचा आवाज होता. 
  पहाट असूनही  वातावरणात गडद अंधार अजून दाटून राहिलेला होता. नेहमी पहाटे दिसणारे झुंजूमुंजू वातावरण मुसळधार पावसामुळे हरवून गेले होते. गावातील कोंबडे एकामागोमाग एक बांग देत होते. त्यांच्या त्या आरोळ्या ऐकताना जणू “कोणाची बांग जास्त टीपेची ?” अशी त्यांच्यात स्पर्धाच लागली आहे की काय, असे वाटत होते.
  त्याच वेळी खाड़ी पलीकडील पूर्णगड गावातील मशिदीतून पहाटेची अजान ऐकू आली. पक्ष्यांची किलबिल सुरू झाली होती. गावकऱ्यांच्या गोठ्या मधली  गुरे हंबरत होती.अवखळ वारा त्याच्या सोबत पावसाचे थंड तुषार घेऊन आमच्या अंगाला झोंबत होता.
   त्या काळी गावागावांत डांबरी रस्ते नव्हते. बैलगाडीच्या चाकांच्या लोखंडी धावांमुळे रस्त्यावरील मातीची बारीक भुकटी होत असे आणि पावसाळ्यात त्याच मातीचा लोण्यासारखा मऊ चिखल तयार होत असे. आमच्या पायातील वहाणा त्या चिखलाने पूर्ण बरबटून गेल्या होत्या.
  खाडीच्या किनाऱ्या पर्यंत पोहोचेपर्यंत आकाशात थोडा पांढरे फटकपणा आला होता.गावातील एका  होडीने आम्ही गलबतावर पोहचलो. सामान व्यवस्थित लावले आहे की नाही याची वडिलांनी पाहणी केली. सर्व खलाशांना विचारले गलबत सोडायचे की नाही ?सर्व ठीक आहे ना ? “सर्व ठीक आहे” म्हटल्यावर गलबताची शिडे ताणली गेली.
  गलबताची शिडे ताणताच जणू हवेलाच उसंत उरली नव्हती. एखाद्या अवखळ मुलासारखा वारा त्या शिडांत घुसला आणि गलबताला वेड्यासारखा झोके देऊ लागला. शिडे अधिक ताणली असती तर ती फाटण्याचा धोका होता, त्यामुळे ती मर्यादेतच ताणून धरली होती.
  तरीही त्या शिडांत एवढा जोर भरला होता की क्षणभर गलबत नांगरासकट पुढे सरकते की काय, असे वाटले. जणू हात पकडून धरलेल्या एखाद्या माणसाने पकड सोडवून पळण्याचा आटोकाट प्रयत्न करावा, तसे आमच्या गलबताचे झाले होते. हवेवर थुईथुई नाचणाऱ्या पतंगा प्रमाणे नांगराने रोखून धरलेले ते गलबत सतत डचमळत होते. दुसऱ्या बाजूने गलबत इतक्या जोराने ताण देत होते की नांगर वर उचलणे आम्हा पाच जणांनाही जड जात होते.
  वडील त्यावेळी तांडेलाच्या भूमिकेत होते. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र भीतीचा लवलेश नव्हता. अनुभवाने समुद्राला ओळखणाऱ्या त्या मुरब्बी तांडेलाने योग्य क्षण साधत नांगर वर घेतला आणि नांगर वर उचलताच जणू शाळा सुटलेल्या अवखळ मुलासारखे ते गलबत सुसाट धावत सुटले !
  वडील अनुभवी तांडेल होते. त्यांनी त्या अवखळ गलबताला क्षणार्धात वेसण घातली. गलबत पूर्णगड बंदराच्या बाहेर पडताच त्यांनी सुकाणू दक्षिणेकडे, आचरा बंदराच्या दिशेने फिरवले. आमचे गलबत म्हणजे त्या वेळी कानात वारे शिरलेल्या सांडासारखे त्याचे वागणे होते. असा सांड जर शेतीच्या 'जोता'ला किंवा बैलगाडीच्या ' 'जु' ला जोडला, तर त्याच्यावर नियंत्रण घ्यायला गाडीवान आणि औत धरणाऱ्या शेतकऱ्याची जशी गत होते, तशी वडिलांची झाली होती. 
  त्यावेळी समुद्रावर पावसाचा एक फिका पडदा पसरला होता. दूरचा किनाराही नीट दिसत नव्हता. धुक्यामुळे दिशा कळत नव्हती.त्या काळी दिशा दाखवणारे होकायंत्र आमच्याकडे नव्हते पण वडिलांचे दिशांचे ज्ञान विलक्षण अचूक होते. समुद्राचा रंग, वाऱ्याची दिशा, लाटांची चाल, किनाऱ्यावरील डोंगरांची ओळख आणि आकाशातील खुणा पाहून ते सहज मार्ग काढत असत.
  पूर्णगड बंदर ते आचरा बंदरा मधील अंतर हे ज्या प्रकारे वारा वाहत होता.त्या प्रमाणानुसार आठ-नऊ तासांत, म्हणजे संध्याकाळी पाचपर्यंत आचरा बंदर गाठायला हवे होते. दुपारनंतर पावसाचा जोर लक्षणीय कमी झाला. मात्र खाऱ्या वाऱ्याचा समुद्राकडून जमिनीकडे वाहण्याचा जोर राक्षसी होता. स्वतः सोबत हा वारा गलबत सुद्धा किनाऱ्यावर खेचून घेऊन जाईल की काय अशी स्थिती होती. आम्ही सर्वजण गलबताला चिटकून बसलो होतो. वडिलांनी सुकाणू वरची पकड अजून घट्ट केली होती. त्यांच्या हातावरच्या शिरा ताणल्या गेल्या होत्या. मी गलबताच्या पोटातील खोलीत बसलो होतो. 
  गलबताचा सकाळचा अवखळपणा एक वेळ बरा तरी होता, पण आता तर त्याच्या अंगात चक्रमपणा भरला होता. वेडा माणूस कुणाचे ऐकत नाही, तशी परिस्थिती होती. ते किनाऱ्यावर खेचले जात होते. जसे लोखंड चुंबकाजवळ ओढले जाते, तसेच गलबत किनाऱ्यावर फरफटत चालले होते. 
  कापडी शिड ढील सोडावीत तर वारा त्यात भरून अजून वेग घेत होता. शिडे ताणून धरावीत तर ती फाटण्याचा धोका होता. अशा दुहेरी संकटात वडील होते. एका क्षणी गलबत इतके कलंडले की गलबताच्या पोटातील तांदळाच्या गोण्या सरकत असल्याचा आवाज आत पर्यंत ऐकू आला.
  गलबत वेगात किनाऱ्याकडे फरफटत जात होते. काहीच करता येत नव्हते. आधीच “उल्हास मास त्यात फाल्गुन मास” या म्हणी प्रमाणे त्यातच सुकाणू तुटले. प्रचंड लाटा आणि वादळी पावसात दिशा बदलताना सुकाणू हमखास तुटू शकतो आणि तेच झाले. फरफटत ओढले जाणारे गलबत आता एखाद्या कागदी बोटी सारखे वाऱ्यावर उडत किनाऱ्याकडे झेपावत होते की काय असे भासत होते.
गलबत प्रचंड वेगात  किनाऱ्याकडे जात असताना किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या दगडावर शेवटी ते आपटलेच. माणूस जिवाला कंटाळून जसा आत्मघात करून घेतो तसे काहीतरी आमच्या गलबताने केले होते. दगडावर आपटताना “धडामss… धूम… धडाम…” असा प्रचंड कानठळ्या बसवणारा आवाज झाला. त्या आवाजानंतर क्षणभर समुद्रही शांत झाल्या सारखा वाटला आणि डोळ्यांसमोर मिट्ट काळोखी येऊन माझी शुद्ध हरपली.
  जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी एका विचित्र दलदलीत फसलो होतो. बेसन, साखर, तांदूळ या सामानाच्या गोण्या फुटून त्यात समुद्राचे खारे पाणी आणि वाळू मिसळून चिकट दलदल झाली होती. गलबत तोंडावर आपटून फुटले होते; पण गलबताच्या मागच्या भागात सामान जास्त असल्याने त्याचा समतोल राखला गेला नव्हता. त्यामुळे ते मागच्या बाजूला बुडून फुटलेले तोंड आकाशाच्या दिशेने उभे राहिले होते. वर कुठेतरी फुटलेल्या फटीतून पावसाचे थेंब आत टपटपत पडत होते. 
  गलबत फुटले तेव्हा मी गलबताच्या पोटात होतो. त्यामुळे किराणा सामानाच्या राडारोड्यात मी अडकून पडलो होतो. खूप चिखल झाला होता. दलदल परवडली, पण यात बेसन, पीठ आणि साखरेचा पाक झाल्यामुळे सर्व अक्षरशः बुळबुळीत झाले होते.
  शुद्ध आली तेव्हा भरती होती.समुद्राचे पाणी चिखलात बुडालेल्या माझ्या मानेपर्यंत लागत होते. लाट आली की पाणी नाकातोंडात शिरत होते. ओल्या पिठाचा पुट तोंडावर लागल्याने सफेद तोंड्या भुतासारखे माझे तोंड झाले होते. संपूर्ण शरीर त्या दलदलीत फसले होते. पायाला कसला तरी आधार मिळाला होता पण तो कसला आधार होता, काही कळत नव्हते.
   भूक आणि तहान यामुळे पायातली धारणशक्ती कमी होत चालली होती. मानेपर्यंत त्या दलदलीत मी आकंठ खचलेलो होतो. हा चिकटा वेगळाच होता. मी अजून खाली खाली खेचला जात होतो.आता मला कोणी वाचवू शकत नाही. मुखात ‘गुरु दत्ताचे’ नामस्मरण सुरू होते, थकून डोळे मिटून घेतले ,संध्याकाळ सरली,आता रात्र झाली होती. गलबताच्या पोटात मिट्ट अंधार पसरला होता. बाहेर फक्त लाटांचा आवाज आणि अधूनमधून वाऱ्याची शीळ ऐकू येत होती. 
     गलबत किनाऱ्यावर फुटून कलंडल्यावर पुढे काय घडले ? हे 'आबा आजोबा' आता सांगत होते आणि मी स्तब्ध होऊन ते ऐकत होतो..
  कोणीतरी गलबतात शिरण्याचा प्रयत्न करत होता. दोन कंदील त्यांच्या हातात होते. बहुतेक भुरटे चोर असणार. त्यांनी कंदिलाचा प्रकाश आत टाकून वाकून पाहिले, तेव्हा त्या दोघांना माझे पिठुळलेले अर्धे मुंडके दिसले. त्या बरोबर त्यांनी धाडकन खाली उडी मारली. त्या वेळी ती उडी पाण्यात न मारता जमिनीवर मारल्यासारखा ‘धप्प…’ असा  आवाज आला म्हणजेच त्या वेळी ओहोटी असणार, असा मी अंदाज बांधला.
  “थांबा… थांबा… मला सोबत घ्या… असे एकटे जाऊ नका रे…” माझा आवाज ऐकताच, त्यांचा मी भूत असल्याचा संशय अजून बळावला. ते गावात धूम ठोकून पळाले.
  त्यांच्या हातातील कंदिलाचा प्रकाशही थोड्याच वेळात अंधारात विरून गेला.बाहेर पडण्याची एकमेव आशा मावळल्यावर मी पुन्हा मान खाली टाकली. पायातील बळ हळूहळू संपत चालले होते. त्या चिखलाच्या राडारोड्यातच  माझी जिवंत समाधी होईल की काय ? अशी भीती मनाला कुरतडू लागली होती. मी मान टाकून डोळे मिटलेले असताना  खूप वेळाने गलबताच्या फटीतून लांबून किनाऱ्यावर लुकलुणारे अनेक मंद प्रकाश दिसून येत  होते. त्याच फटीतून वारा माझ्यापर्यंत पोहचत होता. 
   ते अनेक मंद दिवे जसजसे जवळ येत गेले तसतसे ते दिवे प्रकाशमान होत पुढे पुढे  येत असल्याचे आणि त्यासोबत अनेक लोकांच्या आवाजाचा गलबला वाढत गेला. काही वेळाने तो आवाज आणि सर्व कंदिलाचा प्रकाश एकत्र येऊन  कलंडलेल्या गलबता नजीक आला.ते सर्वजण खूप जवळ असल्याने ते काय बोलत आहेत हे मला स्पष्ट ऐकायला येत होते.
  एक  शहाणा माणूस म्हणाला “पोलिस पाटलांनो ! सदू आणी मधु ही जोड रातभर गावात कुटे  हात सफाई करूक मिळता का ? ह्याच एका इराद्यान गावभर फिरत असता. तांचें काय पण ऐकू नका, भूत बित काही एक नसता, ह्या लोकांनीच आपलो कोकण बदनाम केलंय,  सुन्दर कोकण म्हणजे भुतांची जहागीर ह्या अशा लोकांच्या खोट्या अफवांनी बनली असा”
   पोलिस पाटील म्हणाले “पाहुयात काय खरा आनी काय खोटा ता ?”  तरुण मुले कंदील घेऊन गलबताच्या उभ्या कलंडलेल्या पोटात शिरलीत तर त्यांना सर्व ओला चिखल, दलदल आणि राड्यारोड्यात सफेद अर्धे मान टाकलेले माझे मुंडके दिसले.  त्या बरोबर त्या पोरांनी सुद्धा भितीने किनाऱ्यावरील ओल्या पुळणीत धडाधड उड्या मारल्या  आणि आत मधली सर्व परिस्थिती पोलिस पाटलाला सांगितली. 
  मी उरल्या सुरल्या आकांताने जोरात बोंब मारली “अरे  मला सोबत घ्या…असे एकटे जाऊ नका “ असे म्हटल्यावर जमलेल्या गावकऱ्यातील अर्धे अधिक गावकरी “भूत… भूत…” म्हणत पळाले. त्यातला तो शहाणा माणूस परत म्हणाला “पोलिस पाटलांनो ! यांच्या नादी लागू नका. मी चढून बघतो आत मध्ये काय आहे ते” पोलिस पाटलांनी मूक संमती दिली. 
  त्या शहाण्या माणसाने कंदीलाच्या प्रकाशात गलबताच्या पोटात वाकून पाहिले. ते विदारक  दृश्य पाहून तो हिंमतबाज माणूस सुद्धा थोडा वेळ गरगरला परंतु आतून ‘गुरू दत्ता’ च्या नावाचा धावा होतोय म्हटल्यावर त्यानं मोठा आवंढा गिळला. 
   ओहोटी असल्याने हवा पडलेली होती. दुपारी द्वाड मुलासारखा धुमाकूळ घालणारा वारा आता शांत मुलासारखा वाहत होता. त्या शहाण्या माणसाने परत एकदा आत डोकावले. त्याला ‘गुरु दत्ताचे’ नामस्मरण माझ्या मान टाकलेल्या  तोंडातून ऐकायला येत होते.  त्याने शांतपणे कंदिलाच्या प्रकाशात आतील परिस्थितीची नीट पाहणी केल्यावर खरी परिस्थिती त्याच्या लक्षात आल्यावर त्याने खाली उडी मारून आतील सर्व परिस्थिती  पोलिस पाटलां पुढे स्पष्ट केली.
   त्याबरोबर त्याने जमलेल्या तरुण मुलांना तात्काळ शिड काठीचा दोरखंड सोडून आतील फसलेल्या व्यक्तीला बाहेर काढायच्या सूचना दिल्यात,मला बाहेर काढणे सोपे नव्हते. एकतर  खूप रात्र होती. भरतीची वेळ सुरू झाली होती, ती पूर्ण व्हायच्या आत मला बाहेर काढले गेले पाहिजे होते. अर्धा तास बाकी होता किनाऱ्यावर पाणी हळू हळू चढू लागले होते,शिड काठीचा दोरखंड सोडण्यात आला.
  तो दोरखंड दोन युवकांनी स्वतः भोवती गच्च बांधून ते आत उतरले. त्या दोघांनी चिखलात खोलवर हात टाकून माझे दोन हात धरून मला बाहेर काढले. त्या दोघांना अडकवलेले दोरखंड ओढायला किनाऱ्यावर २५-३० माणसे जमा झाली होती. त्या दोघांना आणि मला असे तिघांना खालून जोर लावून खेचले जात होते. माझ्या अंगात त्यांना पकडण्याचे सुद्धा बळ नव्हते. मला हळू हळू बाहेर काढले जात होते. मी अर्ध शुद्धीत होतो. 
   गुडघ्या पर्यंत चढलेल्या समुद्राच्या भरतीच्या पाण्याने मला त्यांनी अगोदर व्यवस्थित धुवून काढले. दोघांनी दोन हात माझ्या खांद्यावर टाकून मला भरतीच्या पाण्यातून वाट काढत पोलिस पाटलाच्या घरी नेण्यात आले. कपभर दूध आणि भात दिल्यावर माझ्यात हुशारी आल्यावर मी सर्व त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. 
     माझ्या सांगण्यामुळे  आता त्यांना चार खलाशी आणि माझ्या वडिलांची काय खबर आहे याची काळजी वाटली, दुसऱ्या दिवशी गलबत फुटल्याची पहिली वर्दी आम्ही आचरा पोलिस ठाण्यात दिली.माझ्यासोबत ते पोलिस पाटील सुद्धा होते.      
    “माल आणि गलबताची नोंद रत्नागिरी बंदरात असल्याने पुढील चौकशी तिकडे होईल असे मला सांगण्यात आले.” आचरा पोलिसांनी मला घरापर्यंत आणून सोडले. गलबत फुटल्याची आणि वडील व खलाशी बेपत्ता असल्याचे कळल्यावर गावावर आणि सर्व घरावर  दुःखाची शोककळा पसरली होती.
   मानसिक आणि शारीरिक थकवा असताना सुद्धा मला झोप येत नव्हती. तो प्रसंग रात्रभर मला छळत होता. घरात सगळे झोपले होते, बाहेर कुठेतरी कुत्री भेसूर आवाजात अधूनमधून रडत होती. पहाटेच्या पहिल्या प्रहरी दाराची कडी वाजली. आईने दार उघडले तर दारात थकलेले, वाकलेले वडील उभे होते. त्यांच्या केसांत सुकलेल्या मिठाचे पांढरे कण अडकले होते.त्यांना लगेच आत मध्ये घेऊन बिछान्यावर झोपवले. त्या अगोदर घरच्या गायीचे हळद टाकलेले दूध त्यांना दिले. 
     दुसऱ्या दिवशी वडिलांनी सांगितले “ गलबत फुटल्यावर मी समुद्राच्या पाण्यात फेकला गेलो.पाण्याच्या जोरदार प्रवाहात खूप वेळ पोहत राहिल्यानंतर एका कांदळवनात मी बेशुद्ध होऊन पडलो होतो. एका मासेमार बांधवाने मला त्याच्या घरी नेले आणि  माझ्या जखमांवर मलमपट्टी केली म्हणून मी इथे आलो. 
    त्यानंतर बाकीचे चार खलाशी सुद्धा एका पाठोपाठ घरी परतले. त्या अपघातात खूप मोठी आर्थिक हानी झाली परंतु जीवितहानी मात्र झाली नाही. परंतु त्या नंतर वडील मात्र मनाने खचले ते कायमचे खचले.त्यांचा आत्मविश्वास त्या वादळात पूर्ण बुडाला.
  “लाटा उसळतात… वादळ घोंघावते…त्यातून सावरून स्वतःचा जीव सांभाळतो, तो खरा दर्यावर्दी !”
    ती एक गलबत कथा नव्हती तर ती होती समुद्राच्या छातीवर कोरलेली जिद्दीची, संघर्षाची आणि विजयाची अमर गाथा ! 
   शिडांत भरलेला वारा, डोळ्यांत किनाऱ्याची आशा आणि मृत्यूला डोळ्यात डोळे भिडवणारे खलाशी. त्यांच्या साहसानेच समुद्रालाही शेवटी नतमस्तक व्हावे लागले!
   अशाच थरारक समुद्री कथा, गलबतांचा इतिहास आणि विस्मरणात गेलेल्या खलाशांच्या गाथा वाचण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा…
 “कारण प्रत्येक लाटेमागे दडलेली असते एक न सांगितलेली कहाणी..”
                                                                     समाप्त🖋️📖📚

🔗 'मचाण शांतता’ - पिठूर चांदण्यातली ती रानरात्र| एपिसोड १ | ताडोबा जंगलातील थरारक मराठी कथा..👉

(एपिसोड १)

    रात्रीच्या गूढ जंगलात मचाणावरून केलेली प्राण्यांची गणना, स्पॉटलाईटच्या प्रकाशात चमकणारे डोळे, बगळ्यांचे आवाज, घुबडाची हाक, मोराची केकावली आणि चांदण्यांनी न्हालेली भयाण रात्र.. “मचाण शांतता - पिठूर चांदण्यातली ती रानरात्र” हा लेख तुम्हाला जंगलातील एका थरारक आणि रहस्यमय रात्रीचा जिवंत अनुभव देतो. वन्यजीव, निसर्गरात्र, जंगल सफर आणि मचाण संस्कृती आवडणाऱ्यांसाठी हा (एपिसोड १) अनुभव अविस्मरणीय ठरेल.

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.


तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी - लोगो






📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook









टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...