"दोन इशारे आणि वाचलेले प्राण"- श्री शंकर महाराज लीला| भाग -2| सत्य घटनांवर प्रेरित भक्तीकथा
मृत्यूचा सापळा पुलाखाली सजला होता..
पण कृपेचा हात पाठीशी उभा राहिला त्या क्षणी,
दोन इशारे मिळाले आणि वाचले प्राण जीवनी.. ✨
🔗 “भक्तवत्सल सदगुरू श्री शंकर महाराज : जीवन, लीला आणि अनुभूती” भाग -1
"दोन इशारे आणि वाचलेले प्राण" - श्री शंकर महाराज लीला | भाग -2| सत्य घटनांवर प्रेरित भक्तीकथा
सावित्रीच्या प्रलयंकारी रात्रीत घडलेली एक थरारक आणि गूढ कथा
मुसळधार पाऊस, सावित्री नदीचा रौद्र अवतार, अंधाराने गिळलेला महामार्ग आणि मृत्यूची चाहूल देणारे दोन अनाकलनीय इशारे..
श्री शंकर महाराजांच्या लीलांवर श्रद्धा असलेल्या हजारो भक्तांना आजही त्यांच्या अदृश्य कृपेचे अनुभव येत असतात. ही कथा महाडजवळील सावित्री नदीच्या महापुराच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या एका थरारक प्रसंगाची आहे. दोन अनाकलनीय इशाऱ्यांमुळे एका दाम्पत्याचे प्राण कसे वाचले आणि त्या इशाऱ्यांमागे सदगुरूंची कृपा होती का, याचा रोमांचक अनुभव या भागात उलगडणार आहे.
महाडच्या त्या भयावह रात्री वसंत आणि त्याची पत्नी नकळत एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभे होते पण नियतीने पाठवलेले ते दोन इशारे कोणाचे होते? तो निव्वळ योगायोग होता की सदगुरु ची अदृश्य कृपा होती?
वाचा मृत्यूच्या दाढेतून सुटलेल्या एका भक्ताच्या अविस्मरणीय अनुभवाची थरारक कहाणी..
त्या दिवशी 'वसंत' नेहमीपेक्षा थोडा लवकर ऑफिसमधून बाहेर पडला होता. कारण त्या रात्री त्याला त्याच्या गावी, देवगडला, निघायचे होते. ऑफिसच्या व्यापातून रजा घेण्यासाठी वेळच मिळात नव्हता. खरं तर त्याने शुक्रवार पासूनच रजा घ्यायचे ठरवले होते पण नाईलाजाने त्याला थांबावे लागले. सोमवारी ऑफिसमध्ये परदेशी प्रतिनिधींचे आगमन होणार होते आणि काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्याच्यावर सोपवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मंगळवारपर्यंत त्याला कार्यालयात उपस्थित राहणे भाग होते.
त्याची पत्नी वर्षाही त्याच्यासोबत जायला तयार होती. तिच्या सल्ल्याशिवाय वसंताने आयुष्यात कधीच मोठा व्यवहार केला नव्हता. त्यामुळे या प्रवासातही त्याची अर्धांगिनी त्याच्या सोबत असणार होती.त्याच्याकडे स्वतःची चारचाकी असल्याने आणि कधी रजा मिळेल याचा काही भरवसा नसल्याने, त्याने स्वतःच्या गाडीनेच देवगडला जाण्याचे ठरवले होते. गाडीत इंधन भरून, टायरमधील हवा तपासून आणि इतर आवश्यक तयारी करून त्याने ती शुक्रवारीच सज्ज ठेवली होती.
त्या दिवशी दुपारी तीनच्या सुमारास ऑफिसमधून घरी आल्यानंतर त्याने विचार केला, "प्रवासाला निघण्यापूर्वी दीड-दोन तास झोप घेऊया." रात्रभर गाडी चालवायची असल्याने दमलेल्या अवस्थेत प्रवास करणे योग्य नव्हते. त्यावेळेत पत्नीला तयारीत राहण्यास सांगून तो थोडा वेळ विश्रांतीसाठी आडवा झाला.
दीड तासांच्या झोपेनंतर चहा आणि हलकासा नाश्ता करून तो तयार झाला. संध्याकाळी पाचच्या सुमारास त्याने गाडी बाहेर काढली. आई-वडिलांसोबत मुले घरीच राहणार होती. मुलांनीही सोबत येण्यासाठी हट्ट धरला होता पण त्यांची शाळा असल्याने त्यांना घेऊन जाणे शक्य नव्हते. देवगडातील जमिनीचा व्यवहार पूर्ण झाल्यावर पुढे तीन-चार दिवस मामाकडे, कणकवलीत राहण्याचा त्यांचा विचार होता.
दरम्यान, आकाश काळ्याकुट्ट ढगांनी गच्च भरून आले होते. संध्याकाळची पाचची वेळ असूनही दिवस मावळतीकडे झुकल्यासारखा वाटत होता. उजेडाची संध्याकाळ असायला हवी होती पण त्या दिवशी तसे कोणतेच संकेत नव्हते. दाट अंधारामुळे सर्वत्र दिवे लागले होते. जणू रात्रच वेळेआधी अवतरली होती. इमारतीच्या बाहेर पडताच पावसाच्या सरींनी त्यांचे स्वागत केले. गाडीपर्यंत पोहोचण्यासाठीही त्यांना छत्री उघडावी लागली.
खिडकीतून आई-बाबा आणि मुलांना हात दाखवत निरोप देईपर्यंत वसंत आणि त्याची बायको अर्धे-अधिक भिजलीच होती. वसंतने मनोमन ‘सदगुरू दत्तप्रभूंचे’ स्मरण केले आणि गाडी सुरू केली.
पाऊस सुरू असल्याने मुंबईतील वाहतूक नेहमीपेक्षा अधिक संथ होती. मुंबईच्या ट्रॅफिकला जाम व्हायला किंवा मंदावायला तसे फारसे कारण लागत नाही.त्यात पावसाचे निमित्त मिळाले की मग विचारायलाच नको. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. त्या पाण्यातून मार्ग काढत त्यांची गाडी हळूहळू नवी मुंबईच्या दिशेने धावू लागली.
सायन परिसरात रस्त्यांवर तुंबलेले पाणी पाहून वर्षा थोडी चिंतित झाली.
“अहो, ऐकलंत का?” ती म्हणाली, “आज निघणं खरंच गरजेचं आहे का?”
वसंत तिच्याकडे पाहून हलकेसे हसला.
“अगं वर्षाराणी,” तो म्हणाला, “हा पाऊस अजून दोन महिने बरसणार आहे. त्याची वाट पाहत बसलो, तर आपल्या हातून एक चांगला व्यवहार निसटून जाईल. आणि तसंही, आपण काळजीपूर्वक जाऊ. चिंता करू नकोस.”
वसंताच्या बोलण्याने वर्षाचे मन थोडे शांत झाले. बाहेर पावसाचा जोर कायम होता, पण तिच्या मनातील काळजी मात्र थोडी कमी झाली होती.आता नवी मुंबई मागे पडून त्यांची गाडी वडखळ नाक्याच्या दिशेने वळली. वडखळच्या रस्त्यावर जागोजागी चिखलाने भरलेले खड्डे होते. ते खड्डे चुकवत वसंत सावधपणे गाडी चालवत होता. त्यामुळे वडखळ नाक्याजवळ पोहोचे पर्यंत दोघेही थोडे थकले होते.
तुलनेने इतर ऋतूंमधील प्रवास आणि पावसाळ्यातील प्रवास यामध्ये खूप फरक असतो. मुसळधार पावसामुळे रस्ते अनेक ठिकाणी उखडलेले असतात. कुठे झाडांच्या तुटलेल्या फांद्या पडलेल्या असतात, तर कुठे पाणी रस्त्यावरून वाहत असते. अशा परिस्थितीत मनात कितीही वेगाने जाण्याची इच्छा असली, तरी वाहन सावधगिरीनेच चालवावे लागते. अशा वातावरणात गाडी घसरण्याचा धोका कायमच डोळ्यासमोर असतो.
वसंत मात्र पूर्ण लक्ष देऊन नियंत्रित वेगात वाहन चालवत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पाण्याचे ओहोळ खळाळत वाहत होते. रस्त्याखालच्या मोरीतून नाले, परे आणि छोटे प्रवाह दुथडी भरून वाहत होते. सर्वत्र पावसाच्या पाण्याने जणू निसर्गालाच नवे रूप दिले होते.
लहानपणी ST च्या लालपरीतून गावाहून परतताना त्याने अनेकदा पावसाळ्यात प्रवास केला होता. त्या वेळी बसच्या खिडक्यांवर ताडपत्री लावलेली असल्याने बाहेरचा निसर्ग पाहायला मिळत नसे.स्वतःच्या गाडीतून प्रवास करतानाही भोवतालचा मिट्ट अंधार आणि पावसामुळे त्यांना आता बाहेरचे फारसे दिसत नव्हते पण हेडलाईटच्या प्रकाशात जेवढा परिसर उजळून दिसत होता, तेवढाही नजारा मनाला मोहून टाकणारा होता.
बाहेरचे वातावरण आल्हाददायक आणि गारठलेले होते. त्या थंड हवेत मनसोक्त श्वास घ्यावा, पावसाचा सुगंध अनुभवावा असे त्यांना वाटत होते पण ते शक्य होत नव्हते. पावसाळ्यात एसी असलेल्या गाडीत एक जरी खिडकी उघडी ठेवली, तरी गाडीच्या सर्व काचांवर धुक्याचा (फॉगचा) थर जमा होऊ लागतो. एकदा का गाडीच्या समोरच्या काचांवर धुरकटपणा जमा झाला की पुढचा रस्ता भुरकट आणि धूसर दिसू लागतो. अशा वेळी वाहन चालवणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे असते. त्यामुळे बाहेरचे मोहक वातावरण डोळ्यांनी अनुभवत असतानाही, गाडीचा एसी सुरू ठेवणे अपरिहार्य होते.
माणगाव ओलांडले आणि ते महाडकडे आगेकुच करत होते. जसजसे ते कोकणात शिरत होते, तसतसा कोकणचा पाऊस अधिक उग्र होत चालला होता. नागोठणे ओलांडल्यावर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बरीच काय, खूपच विरळ झाली होती.
गाडीच्या रिअर व्ह्यू मिरर मधून मागे पाहिले तर मागचा रस्ता अंधारात पूर्णपणे गुडूप झाल्यासारखा भासत होता. संपूर्ण महामार्गावर त्यांचीच गाडी एकटी धावत असल्याचा त्यांना भास होत होता. पुढील रस्ता मात्र त्यांना गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात स्पष्ट दिसत होता. महामार्गाला खेटून असलेल्या गावांजवळ ते आलेत की उजेडाचे ठिपके त्यांच्या नजरेस पडत होते. अंधाराच्या अथांग समुद्रात ती उजेडाची गावे म्हणजे जणू रखरखत्या वाळवंटातील हिरवळच वाटत होती.
दरम्यान ते महाड शहराच्या हद्दीत प्रवेश करत होते. बहुतेक रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या तयारीत होती. पावसाळी आणि गारठलेल्या वातावरणामुळे त्या दोघांनाही सडकून भूक लागली होती. रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते. जेवणासाठी महाड शहरात त्यांनी चौकशी केली, पण धुवांधार पावसामुळे बहुतांश हॉटेल्स नेहमीपेक्षा लवकर बंद झाली होती.
भूक, पाऊस आणि रात्रीचा वाढता अंधार या तिघांनी मिळून प्रवास अधिकच अनिश्चित बनवला होता. आता महाडमध्ये उघडे असलेले एखादे हॉटेल शोधणे, हेच त्यांच्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान होते.
पावसाळ्यात बहुतेकदा सावित्री नदी पूर नियंत्रण रेषा ओलांडत असते.. पावसाळ्यात हीच नदी अनेकदा रौद्ररूप धारण करून महाड शहराला वेढा घालते. महाबळेश्वरच्या डोंगररांगांतून आलेले पावसाचे प्रचंड पाणी सावित्रीच्या पात्रात उतरते. नदी दुथडी भरून वाहत असते. कधी कधी ती आपली मर्यादा ओलांडून शहरात कधी शिरेल याचा नेम कुणालाच नसतो.
जेवणासाठी बरीच विचारपूस केल्यानंतर त्यांना एक खानावळ सुरू असल्याचे समजले. आणखी थोडा उशीर झाला असता तर त्याचे काहीही खरे नव्हते. पाच तासाच्या प्रवासानंतर त्यांच्या पोटात कावळे ओरडत होते. त्या खानावळीतील जेवण अगदी साधे होते, पण त्याची चव मात्र अप्रतिम होती. प्रत्येक घासागणिक भूक भागण्याऐवजी जणू आणखी वाढतच होती.
मनातल्या मनात वसंताने स्वतःलाच समजावले, "बाबा रे, तू अजून प्रवासात आहेस. चवीच्या नादात पोटाला तड जाईपर्यंत जेवू नकोस." मग मोठ्या कष्टाने त्याने जेवण आवरते घेतले.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे वीज गेली होती. त्यामुळे त्यांचे जेवण जणू एखाद्या कॅन्डल लाईट डिनर सारखेच झाले होते. मात्र येथे मेणबत्ती नव्हती एका कंदिलाच्या मंद उजेडात ते जेवत होते. त्या पिवळसर प्रकाशात खानावळीचे वातावरण अधिकच प्रसन्न वाटत होते.
कंदिलाकडे पाहताच बालपणीच्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर तरळल्या. कोकणात वीज नसलेल्या काळात अशाच कंदिलांच्या उजेडात अभ्यास, जेवण आणि घरातील इतर सर्व कामे व्हायची. त्या जुन्या दिवसांच्या आठवणी त्याच्या डोळ्यांसमोर सहजच उभ्या राहिल्यात.
जेवण आटोपून ते दोघे बाहेर आले, तोपर्यंत पावसाने थोडी उघडीप दिली होती. पण आकाशात अजूनही काळेकुट्ट ढग जमलेले होते आणि पुढच्या प्रवासात निसर्ग आणखी काय रंग दाखवणार आहे, याची सुप्त भिती त्यांच्या मनात दाटून आली होती.
ते दोघे खानावळीतून बाहेर पडले. पावसाने जरी थोडी उघडीप दिली होती, तरी रिमझिम सरी अजूनही सुरूच होत्या. त्या तुषारांपासून बचाव करण्यासाठी ते धावतच गाडीकडे निघाले
तो गाडीचे दार उघडण्यासाठी हात पुढे करणार इतक्यात पावसाळी वातावरणातील दाट आर्द्रतेला भेदत चंदनाचा मंद आणि विलक्षण मोहक सुगंध त्याच्या भोवती दरवळला. आणि त्याच वेळी जवळच्याच एका कोकणी घराच्या ओसरीतून आलेल्या आवाजाने त्यांचे लक्ष तिकडे वेधले."
ओसरीवर एक व्यक्ती बसली होती. दोन्ही गुडघे छातीशी ओढून, हातांनी त्यांना घट्ट मिठी मारून त्यातच डोके खुपसून ती शांतपणे बसली होती. कंदिलांच्या मिणमिणत्या प्रकाशात तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता.
अचानक त्या व्यक्तीने किंचित डोके वर केले आणि गंभीर स्वरात म्हटले,
"पुढे जाऊ नकोस.. इथेच थांब!"
क्षणभर ते दोघेही स्तब्ध झाले. अंधार, पावसाचा आवाज आणि कंदिलांचा मंद उजेड यामुळे तो नेमका कुणाला उद्देशून बोलत होता, याचा काहीच अंदाज त्यांना आला नाही
"अहो, ती व्यक्ती काय म्हणाली ते ऐकलंत का?"
वसंत हसत म्हणाला,
ते महामार्गावर आले. रस्ता सुनसान होता. एका खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केले आणि दणदणत पुढे निघून गेली. काही क्षणांतच ती अंधारात विरून गेली. आता त्यांच्या सोबतीला पुन्हा एकदा फक्त काळोख आणि रिमझिम पाऊस उरला होता.
वळणावळणाचा रस्ता मागे टाकून त्यांची गाडी अंदाजे पाच किलोमीटर पुढे आली असावी. शहरी भागात वाहनांची हेडलाईट साधारणपणे डिपरवर ठेवली जाते मात्र अशा निर्जन, वळणदार आणि चढ-उतार असलेल्या रस्त्यांवर दूरवरचा मार्ग स्पष्ट दिसावा म्हणून ड्रायव्हर हेडलाईट अप्परवर ठेवतात.
त्या अप्पर हेडलाईटच्या प्रकाशात त्यांना दूरवर एक आकृती दिसली. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखालून सफेद धोतर-सदरा घातलेला एक माणूस पुढे आला आणि लांबूनच हात करून गाडी थांबवण्याचा इशारा करू लागला.
महामार्गावर एखादी अनोळखी व्यक्ती अशा प्रकारे वाहन थांबवण्याचा प्रयत्न करत असेल, तर गाडी थांबवायची नाही, हा बहुतेक वाहन चालकांचा अलिखित नियमच असतो. त्याच्याकडे वसंतने एक तिरपा कटाक्ष टाकला आणि गाडीचा वेग कमी करत तो तसाच थोडा पुढे गेला..
त्याच्यासोबत त्याची पत्नी असल्यामुळे निर्जन ठिकाणी गाडी थांबवणे वसंत साठी धोक्याचे ठरू शकत होते. म्हणून त्याने गाडी जागेवर न थांबवता थोडी पुढे नेऊन उभी केली आणि थोड्या वेळातच करकर करत "कssडssकssडsकssड" मोठा आवाज आसमंतात घुमला आणि काहीतरी पाण्यात पडल्या सारखा "धssप्प" आवाज झाला.तो आवाज सावित्रीच्या काठावरील एखाद्या मोठ्या डेरेदार झाडाची फांदी करकरत पाण्यात कोसळावी असा तो आवाज असावा असा समज त्या दोघांनी केला.पावसात असे जागोजागी होते.खरेतर त्या आवाजाने वसंताचे लक्ष वेधले होते.परंतु तेवढ्यात त्याची पत्नी म्हणाली,
"अहो, तो आवाज जावुंद्यात हो ! ती हात दाखवणारी व्यक्ती कोणीतरी अडचणीत असलेली आणि थकलेली वाटते. अशा भर पावसात त्यांना तिथेच सोडून जाणे आपल्या सारख्यांना शोभणार नाही. 'सदगुरूं'चे नाव घेऊन चला, गाडी मागे घ्या."
घरच्या हाय कमांडचे आदेश मिळाल्यावर त्या पडझड झालेल्या विचित्र आवाजाचा लक्षवेध सोडून वसंत त्याच्या पत्नीला म्हणाला "अग! थोडावेळ थांबून अगोदर त्याच्यावर नीट लक्ष ठेवतो,मग पाहुयात, त्यापूर्वी घाई नको" त्याप्रमाणे पुढे आणलेल्या गाडीच्या रिअर व्ह्यू मिरर मधून वसंत मागे लक्ष ठेवून होता. याचे काही साथीदार आसपासच्या झाडीत दबा देऊन लपून बसले आहेत कां ? याचा अंदाज येतो कां ? हे तो पाहत होता, तसे असेल तर गाडीही सटकन पळता येईल अशा तयारीत त्याने सुरू ठेवली होती.परंतु इतका वेळ झाला तरी मिट्ट अंधारात सफेद कपडे घातलेल्या त्या व्यक्ती शिवाय कोणीही पुसटसे सुद्धा त्याला दिसले नाही. म्हणजेच हा खरोखरच अडचणीत असलेला एकटा-दुकटा माणूस असावा. याची खात्री पटल्याने त्याने गाडी रिव्हर्स गिअरमध्ये घेतली आणि हळूहळू त्या व्यक्तीजवळ गाडी मागे नेऊन उभी केली.
काचेची खिडकी खाली करताच ती अनामिक व्यक्ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली,
"पुढे जाऊ नकोस..इथेच थांब!"
त्या अनपेक्षित शब्दांनी वसंत क्षणभर चकित झाला.
"तुम्हाला कुठे जायचे आहे कां ?" त्याने विचारले.
पण त्या व्यक्तीने उत्तर दिले नाही. त्याने फक्त हाताने मुंबईच्या दिशेने इशारा केला.
त्याचे ते विचित्र हातवारे पाहून वसंतच्या मनात आले,
"हा एखादा अवलिया मुसाफिर असावा.."
म्हणून त्याने त्या इशाऱ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र उत्सुकता म्हणून त्याने गाडी परत थोडी पुढे नेऊन उभी केली, जेणेकरून ती व्यक्ती त्याच्या नजरेच्या टप्प्यात राहील अशा बेताने.
"पाहू या, हा पुढे काय करतो ते.."
गाडी पुढे आणून त्याने रिअर व्ह्यू मिररमधून त्या व्यक्तीकडे लक्ष ठेवले. तो अजूनही त्याच जागी, भुरभुरत्या पावसात भिजत, निश्चलपणे उभा होता..
त्या ठिकाणाहून काही अंतरावर पुढे असलेला सावित्री नदीवरील पूल, त्याला त्याच्या गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात धूसर दिसत होता. दरम्यान, काही वेळा पूर्वी रिमझिम पडणारा पाऊसही आता फक्त भुरभुरत होता. गाडीच्या काचेवर पडणाऱ्या थेंबांचे “टपटप” आवाज केव्हाच बंद झाले होते.
त्याने गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून पार्किंग लाईट सुरू ठेवली आणि तो भुरभुरत्या पावसात खाली उतरला.
"मी जरा सिगारेट ओढून घेतो," असे त्याने पत्नीला सांगितले.
संध्याकाळी मुंबईहून निघाल्यापासून तब्बल सहा तास उलटले होते, पण त्याला एकदाही सिगारेट ओढण्याची उसंत मिळाली नव्हती. त्यामुळे खाली उतरण्यामागे सिगारेट हे कारण होतेच पण त्याचबरोबर मोकळ्या हवेत काही क्षण उभे राहता येईल आणि त्या गूढ व्यक्तीवर सुद्धा लक्ष ठेवता येईल, हा विचारही त्याच्या मनात होता.
त्याने खिशातून सिगारेट काढली. लाईटरची ज्योत पेटली आणि क्षणार्धात सिगारेटच्या टोकावर लालभडक जाळ पेटला. एक खोल, दमदार झुरका घेत त्याने धूर छातीत भरून घेतला आणि काही क्षण कुंभक केल्यासारखा रोखून धरला.
धूर बाहेर सोडताच जणू सहा तासांचा सारा थकवा एका क्षणात विरघळून गेला. शरीरात पुन्हा नवचेतना संचारल्यासारखी वाटली.डोके हलके-फुलके झाले आणि मनही प्रसन्न झाले.अंधारात त्याच्या सिगारेटचा पांढरा धूर गोल गोल वलय घेत हवेत विरत होता.त्याच्या बायकोने सहज विश्रांती म्हणून डोळे मिटून घेतले होते.
त्याने मनगटावरील घड्याळाकडे नजर टाकली.
रात्रीचे साडेअकरा वाजून गेले होते.
महामार्गावर गडद अंधार पसरला होता. अधूनमधून वाहणारा वारा आणि दूरवरून ऐकू येणारा सावित्री नदीच्या दुथडी भरून वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट वातावरण एक वेगळेच दडपण निर्माण करत होता.
ते त्या ठिकाणी उभे असल्यापासून तोपर्यंत एकही वाहन त्या रस्त्यावरून गेले नव्हते. मात्र आता दूरवर दोन-तीन वाहनांचे प्रखर प्रकाशझोत अंधाराला भेदत त्यांच्या दिशेने येताना दिसत होते.
वसंतचे लक्ष मात्र सतत त्या अनोळखी व्यक्तीकडेच होते.
"आता हा काय करतो ते पाहूया.." त्याने मनाशी विचार केला.
सर्वात पुढे लाल रंगाची एसटी कोकणवासीयांची लाडकी लालपरी भरधाव वेगाने येत होती. तिच्या हेडलाईटचा तीव्र प्रकाश काही क्षण त्या परिसरावर पसरला.
एसटीच्या मागोमाग दोन-तीन चारचाकी वाहनेही आली. त्या प्रत्येक वाहनासमोर तो तितक्याच आर्जवाने हात दाखवत उभा राहिला परंतु एकाही वाहनाने त्यांचा वेग कमी केला नाही.
महामार्गावर रात्रीच्या वेळी एखाद्या अनोळखी व्यक्तीसाठी थांबणे अनेकांना धोक्याचे वाटत असते. कदाचित म्हणूनच ती वाहने पुढे निघून गेली असावीत.
मात्र एक गोष्ट वसंतच्या लक्षात आली होती.
त्या माणसाचे प्रयत्न केवळ आमची गाडी थांबवण्यासाठी नव्हते. तर तो प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाला तितक्याच तळमळीने इशारा करत होता. त्याच्या हालचालींमध्ये स्वार्थ नव्हता उलट एखादा मोठा धोका टाळण्यासाठी तो जीवाचे रान करत असल्याची भावना निर्माण होत होती.
"कssडकssड... कsडाsक... कsडऽकsड... धssडाम... धूम!.."
असा प्रचंड मोठा आवाज आसमंतात घुमला.
त्यानंतर लगेचच पाण्यात काहीतरी कोसळल्याचे लागोपाठ दोन प्रचंड पाणी डचमळणारे आवाज आसमंतात घुमले
"धssप्प... धssप्प...!"
जणू एखादी अवाढव्य वस्तू दुथडी भरून वाहणाऱ्या नदीच्या पात्रात कोसळली असावी..
वसंत क्षणभर जागच्या जागी थिजून गेला. त्या आवाजाने जणू आसपासची जमीनच हादरल्यासारखी वाटली. रस्त्याच्या कडेला उभी असलेली त्याची गाडीसुद्धा किंचित थरथरली. काळोख, पावसाळी वातावरण आणि नदीच्या लाटांचा खळखळाट यामध्ये अचानक घुमलेल्या त्या पडझडीच्या भेदक आवाजाने त्या दोघांच्या अंगावर अक्षरशः काटे उभे राहिले. भीतीने वसंत मनात पुटपुटला " एखादी बस किंवा मोठे वाहन पुलाचे कठडे तोडून नदीत गेले की काय?" अचानक विज चमकावी असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. त्याचे हृदय जोरजोराने धडधडू लागले. नेमके काय घडले होते, याची कल्पना नसली तरी काहीतरी भीषण अनर्थ घडल्याची जाणीव त्याला होत होती.
गाडीत डोळे मिटून क्षणभर विश्रांती घेत असलेली त्याची पत्नीही त्या आवाजाने दचकून उठली."वसंत.. वसंत..!"करत ती घाबरून किंचाळली. कानठळ्या बसवणाऱ्या त्या आवाजापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तिने दोन्ही हात कानांवर घट्ट दाबून धरले होते.
"काय झालं?" वर्षाने काळजीने विचारलं.
"काहीतरी नदीत कोसळल्यासारखं वाटलं.." वसंत हळू आवाजात म्हणाला.
वसंतच्या हातातील सिगारेट आता जवळजवळ थोटूक झाली होती. आवाज कानावर पडताच त्याने ती घाईघाईने पायाखाली चिरडून ओल्या रस्त्यावर विझवली.
त्याच्या हृदयाचे ठोके प्रचंड वेगाने धडधडू लागले होते. हातांना सौम्य कंप सुटला होता.
"हे काय झाले असेल?"
"तो आवाज कसला होता?"
"पुढे काही अपघात झाला आहे का?"
एकामागून एक प्रश्न त्याच्या मनात गर्दी करू लागले.
अंधार इतका दाट होता की काही अंतरापलीकडे काहीच दिसत नव्हते. काही वेळापूर्वी हातवारे करणारी ती अनोळखी व्यक्ती अजून तिथेच आहे की नाही, हेही ओळखणे अशक्य होते.
पुढे जाऊन अपघात स्थळी पाहावे कां..काय घडले आहे ते?
पण पत्नीला अशा निर्जन अंधाऱ्या ठिकाणी एकटे सोडून जाणे योग्य नव्हते.
"ती सोबत नसती तर मी क्षणाचाही विलंब न करता पुढे गेलो असतो.." त्याच्या मनात आले.
गाडी घेऊन पुढे गेलो तर परत फिरता येईल की नाही, याचीही खात्री नव्हती. मुसळधार पावसामुळे रस्त्याची स्थिती काय असेल, याचाही नेम नव्हता.
म्हणून काही क्षण तो जागच्या जागी उभा राहिला.समोर अंधार, थोड्या अंतरावर दुथडी भरून वाहणारी सावित्री आणि कानात अजूनही घुमणारा तो भयावह आवाज..काय घडले होते, याचे उत्तर त्या काळोखाच्या पडद्यामागे लपलेले होते.
काही वेळाने सावित्री नदीच्या काठावर असलेल्या गावातील मंडळींनी अंधाराची पर्वा न करता,सावित्रीच्या त्या जुन्या पुलावर धाव घेतली.त्यातील एकाला त्याने विचारले “काय झाले आहे, तुम्ही असे सर्व जण धावत कां आला आहात ?” त्या वर तो म्हणाला “आम्ही झोपलो होतो,मोठा भयंकर आवाज झाला म्हणून घराबाहेर आलो आणि नदी कडे पाहिले तर नदीवरील हा पूल मध्यभागी कोसळलेला दिसला.सावित्रीच्या प्रचंड आणि बेभान प्रवाहासमोर हा जुना पूल अनेक वर्ष झुंज देत होता.आज त्याची शेवटची झुंज कमी पडली”. त्या भागातील बऱ्यापैकी ग्रामस्थ मंडळी आता अपघात स्थळी जाताना पाहिल्यावर मी गाडी बंद करून,बायकोला सोबत घेऊन ,गाडीतील प्रखर झोताची बॅटरी काढून त्या ‘अवलिया मुसाफिराचा’ शोध घेण्यासाठी त्याच्या जागेवर गेलो तर तिथे तो नव्हता.परंतु त्या जागी त्याच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून त्या जागेवर तो तसाच मघाच सारखा चंदनाचा मंद आणि मनमोहक सुगंध दरवळत होता.त्या वरून तो कोणी तरी ‘अवलिया मुसाफिर’ नाही तर ‘अवलिया संत’ असणार.आज त्याने आपल्याला दोन वेळा रोखण्याचा प्रयत्न केला.कोण असेल बरे तो ‘अवलिया संत’? हा प्रश्न त्याला सतावत होता.त्याचा गूढ आवाज अजूनही वसंत आणि त्याची बायको वर्षां यांच्या कानात घुमत होता.
"पुढे जाऊ नकोस.. इथेच थांब.."
सावित्री पुलावरील दुर्घटनेनंतर तो मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यामुळे वसंत आणि त्याच्या पत्नीला पुढे जाण्याचा प्रश्नच नव्हता.त्यांनी परत महाड शहरात येऊन एका छोट्याशा हॉटेलमध्ये त्या रात्रीचा मुक्काम केला. रात्रभर डोळ्यांसमोर तो अनोळखी माणूस, त्याचे हातवारे आणि पुलाच्या दिशेने ऐकू आलेला तो भयावह आवाज घोळत राहिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी दुर्घटनेची सविस्तर बातमी समजली तेव्हा त्यांच्या अंगावर पुन्हा एकदा काटा आला. काही क्षणांचा फरक आणि एका अनोळखी व्यक्तीचा इशारा यामुळे ते मृत्यूच्या दारातून परत आले होते.
पुढील प्रवासासाठी त्यांनी मार्ग बदलला. महाडहून ताम्हिणी घाट मार्गे पुणे, तेथून कोल्हापूर आणि पुढे देवगड असा लांबचा फेरा घेत त्यांनी आपला प्रवास पूर्ण केला.
या अनपेक्षित विलंबामुळे जमीन व्यवहाराच्या नियोजित वेळेत बदल होणार होता. मात्र सावित्री पुलावरील दुर्घटनेची बातमी सर्वत्र पसरली होती. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन जमीन मालकाने समजूतदारपणा दाखवला आणि वसंतच्या उशिराबद्दल कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही.देवगडला पोहोचल्यावरही मात्र वसंतच्या मनातून त्या पावसाळी रात्रीचे गूढ काही केल्या जात नव्हते.
ती सफेद धोतर-सदरा घातलेली व्यक्ती नेमकी कोण असावी?
आजही त्या प्रश्नाचे उत्तर वसंतकडे नाही.
पण एक गोष्ट मात्र तो खात्रीने सांगतो..
त्या रात्री सावित्रीच्या तीरावर कुणीतरी त्याला मृत्यूच्या दाढेतून परत खेचून आणले होते,एवढे मात्र खरे.
काम पूर्ण करून मुंबईला येताना, परतीचा मुंबई गोवा मार्ग बंद असणार म्हणून त्याने कणकवली येथे मामाकडे राहण्याचा विचार बदलून, येताना कोल्हापूर मार्गे पुण्यात शिवाजीनगर येथे आपल्या साडूंच्या घरी जाण्याचा विचार केला. त्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्या पारिवारिक गप्पा रंगल्या असताना सांडूनी अचानक प्रस्ताव मांडला.
"चला, मी तुम्हाला उद्या धनकवडीला ‘श्री दत्त’ संप्रदायातील सदगुरु शंकर महाराजांच्या समाधी मंदिरात घेऊन जातो."
हे ऐकताच वसंत आणि त्याची पत्नी आनंदित झाली. ‘श्री दत्त’ संप्रदायातील एका महान संताच्या समाधीचे दर्शन घेण्याची संधी त्यांना मिळणार होती.
"धनकवडी येथील समाधी मंदिरात प्रवेश करताच वातावरणातील विलक्षण शांतता आणि चैतन्य वसंतच्या मनाला स्पर्शून गेले. मंदिरातील प्रत्येक क्षण जणू एखाद्या अदृश्य दैवी शक्तीच्या उपस्थितीची साक्ष देत होता. सभोवताली चंदनाचा मंद, मनमोहक आणि कुठेतरी परिचित वाटणारा सुगंध दरवळत होता.
समाधीसमोर नतमस्तक होताच वसंताचे लक्ष महाराजांच्या भव्य प्रतिमेकडे गेले आणि तो क्षणभर जागच्या जागी स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यांत आश्चर्य आणि भावनांचा एकच कल्लोळ उसळला. त्याने घाईघाईने वर्षाला ती प्रतिमा दाखवत उदगार काढले, “अगं वर्षा!.. बघ, हेच ते अवलिया संत! त्या दिवशी महाडमध्ये, सावित्री पुलाच्या दुर्घटनेच्या अगोदर आपल्याला भेटले होते, ते हेच ते आणि हाच तो चंदनाचा मनमोहक सुगंध.. तोही अगदी तसाच!”
वर्षानेही प्रतिमेकडे एकटक पाहिले. तिच्या अंगावर शहारा आला. त्या दिवशीचा प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर तरळून गेला. क्षणभर दोघेही निःशब्द झाले. मंदिरातील त्या पवित्र आणि आध्यात्मिक वातावरणात ते इतके तल्लीन झाले की जणू काळच थांबून राहिला होता. त्यांच्या मनातील अनेक प्रश्न अनुत्तरितच होते, पण त्या क्षणी त्यांना एका अदभुत दैवी अनुभूतीची जाणीव होत होती."
प्रतिमेकडे पाहताना त्याच्या मनात तीन दिवसा पूर्वीची ती भयावह रात्र पुन्हा जिवंत झाली. महाडजवळील त्या कोकणी घराच्या ओसरीवर दोन्ही पाय हातात ओढून बसलेली आणि इशारा देणारी गूढ व्यक्ती आणि त्यानंतर सावित्री पुलाच्या सुरुवातीला भेटलेला तो अनोळखी मनुष्य..जेव्हा पहिला कडकड आवाज झाला तेव्हाच सावित्रीच्या पुलाचा काही भाग कोसळून तो पुल फेंदारला असावा आणि तीच वेळ बरोबर आमच्या पुलावरून जाण्याची होती.त्यावेळी त्या अंधाऱ्या जागी तिथेच थांबून राहण्यामागे सदगुरूंचीच कृपा असावी," अशी श्रद्धा त्याच्या मनात निर्माण झाली."पुलाचा उर्वरित भाग नंतरच्या काही वेळात कोसळला असावा.पांढरे शुभ्र धोतर, साधा सदरा, चेहऱ्यावरचे विलक्षण तेज आणि डोळ्यांतील अथांग करुणा सगळे काही अगदी तसेच होते. वसंतच्या अंगावर रोमांच उभे राहिले. योगायोग इतका विलक्षण असू शकतो कां? "क्षणभर त्याच्या मनात विचार चमकून गेला.याचे निश्चित उत्तर त्याच्याकडे नव्हते. मात्र ती व्यक्ती सदगुरू शंकर महाराज असावेत, अशी वसंतची श्रद्धा निर्माण झाली.
त्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. पण समाधीसमोर उभा असताना त्याच्या डोळ्यांत नकळत अश्रू दाटून आले आणि त्याचे हात आपोआप जोडले गेले. त्या क्षणी त्याच्या अंतःकरणात केवळ कृतज्ञतेची भावना दाटून आली होती.
तो योगायोग होता की सदगुरूची कृपा, हे तो सांगू शकत नव्हता.
मात्र समाधीसमोर हात जोडून उभा असताना त्याच्या डोळ्यांतून अश्रू निरंतर ओघळत होते.
मनात एकच भावना दाटून आली होती,
"महाराज, त्या रात्री सावित्रीच्या काठावर आम्हाला वाचवायला तुम्हीच प्रत्यक्ष आला होता कां? तुमचे इशारे मिळून सुद्धा माझ्या बालक बुद्धीने तिकडे दुर्लक्ष केले..माफी असावी..".
पण श्रद्धेच्या विश्वात काही प्रश्नांची उत्तरे शब्दांत मिळत नाहीत. ती फक्त अनुभवावी लागतात.
महाडच्या त्या रात्री त्याचा जीव वाचवणारी व्यक्ती नेमकी कोण होती ? याचे उत्तर वसंतला त्यावेळी मिळाले नव्हते.परंतु आता धनकवडीतील महाराजांच्या समाधीसमोर उभा असताना त्याच्या मनात एकच भावना दाटून आली.त्या रात्री संकटातून सुखरूप बाहेर पडण्यामागे एखादी अदृश्य कृपाशक्ती कार्यरत असावी, असे वसंतला मनोमन वाटू लागले."
"त्या रात्री सावित्रीच्या काळ्या- मातकट पाण्यात नेमके काय कोसळले हे आता काळाच्या पडद्याआड गेले. पण एक गोष्ट मात्र वसंतच्या मनात कायमची कोरली गेली. कधी कधी सदगुरूंची कृपा अशा अनाकलनीय स्वरूपात अनुभवास येते, असे वसंतला वाटत होते."
त्या समाधी मंदिरात वसंत उभयतांचे सर्व संभाषण आणि हरकून व भारावून गेलेली हालचाल, सदगुरू शंकर महाराजांचे निस्सिम भक्त रामनाथ हे कुतूहल नजरेने पाहत होते. बहुतांशी त्यांचा वेळ ते दररोज त्या समाधी मंदिरात व्यतीत करत असत.
आजही सावित्रीच्या वाटेवरच्या त्या रात्रीची आठवण झाली की वसंतच्या अंगावर काटा उभा राहतो. त्या इशाऱ्यांमागे काही गूढ अर्थ दडलेला असावा, असे वसंतला वाटत होते.
🔗भाग 3: "भक्तांचा कैवारी : जय सदगुरू शंकर महाराज"|भाग -3| श्रद्धा, चमत्कार आणि गुरुकृपेची सत्यकथा
त्या रात्री मिळालेले दोन इशारे दुर्लक्षित केले असते तर काय झाले असते? आता पुढे वाचा भक्तवत्सल सदगुरू शंकर महाराज स्वयं, मृत्यूच्या दाराशी पोहोचलेल्या एका भक्ताला कोमाच्या अंधारातून परत जीवनप्रकाशात आणतात ? सदगुरू कृपेची हृदयस्पर्शी अनुभूती. श्रद्धा, विश्वास आणि सदगुरूच्या अमोघ कृपाशक्तीची ही भक्तीकथा,पुढील भाग -3 मध्ये..👉
वैधानिक सूचना / Disclaimer
सदर कथा भक्तांच्या अनुभवांवर, ऐकीव माहितीवर आणि उपलब्ध संदर्भांच्या आधारे साहित्यिक स्वरूपात मांडण्यात आली आहे. कथेमधील काही पात्रांची नावे, संवाद आणि प्रसंग गोपनीयता व कथानकाच्या गरजेनुसार बदललेले अथवा काल्पनिक स्वरूपात सादर केलेले असू शकतात.
कथेमध्ये वर्णन केलेले आध्यात्मिक अनुभव, दैवी संकेत अथवा सदगुरूच्या कृपेशी संबंधित उल्लेख हे संबंधित व्यक्तींच्या श्रद्धा, विश्वास आणि वैयक्तिक अनुभूतींवर आधारित आहेत. याचा कोणताही वैज्ञानिक किंवा वस्तुनिष्ठ दावा करण्याचा उद्देश नाही.


Khup sundar 🙏
उत्तर द्याहटवाTHANX
उत्तर द्याहटवासंकट कितीही मोठे असले तरी सद्गुरूंचा आशिर्वाद आणि श्रद्धा भक्ताला नवजीवन देऊ शकतात. पुढील भाग वाचण्याची उत्सुकता अधिकच वाढली
उत्तर द्याहटवाखरे आहे..
हटवाभागातून सद्गुरूंच्या कृपेची आणि भक्तावरील त्यांच्या अपार प्रेमाची प्रचीती येते.
उत्तर द्याहटवाबरोबर..
उत्तर द्याहटवा