अस्वीकरण -
🎨 'एक चित्रकार : एका चुकीच्या रेषेची शिक्षा'| हृदयस्पर्शी मराठी कथा | कला, संघर्ष आणि पश्चात्ताप 🖌️
🔗 “भक्तांचा कैवारी : जय सदगुरू शंकर महाराज”| भाग -3| श्रद्धा, चमत्कार आणि गुरुकृपेची सत्यकथा
मृत्यूच्या दाराशी पोहोचलेल्या एका भक्ताला कोमाच्या अंधारातून परत जीवन प्रकाशात आणणाऱ्या सदगुरूंच्या कृपेची हृदयस्पर्शी अनुभूती. श्रद्धा, विश्वास आणि सदगुरूंच्या अमोघ कृपाशक्तीची ही भक्तीकथा मागच्या पोस्ट मध्ये वाचली असेल.आता पुढे..
🎨 'एक चित्रकार : एका चुकीच्या रेषेची शिक्षा'| हृदयस्पर्शी मराठी कथा | कला, संघर्ष आणि पश्चात्ताप 🖌️
एका संवेदनशील चित्रकाराची, विचारांच्या नावाखाली आयुष्यभराची किंमत मोजावी लागलेल्या माणसाची हृदयस्पर्शी कहाणी. कला, अस्मिता, संघर्ष, गुन्हा, तुरुंगवास आणि पश्चात्ताप यांचा वेध घेणारी ही काल्पनिक कथा तुम्हाला अंतर्मुख करेल.
चित्रकार मराठी कथा वाचणाऱ्या प्रत्येक वाचकाला ही कथा विचार करायला भाग पाडेल. एका संवेदनशील कलाकाराच्या आयुष्यातील एका चुकीच्या निर्णयामुळे त्याच्या आयुष्याला मिळालेले अनपेक्षित वळण, समाजाचा दृष्टिकोन, संघर्ष, गुन्हा, तुरुंगवास आणि पश्चात्ताप यांचा हृदयस्पर्शी प्रवास या कथेत उलगडतो. कला माणसाला उंचीवर नेऊ शकते, पण एका चुकीच्या रेषेची किंमत किती मोठी असू शकते, याची जाणीव ही कथा करून देते.
मानवाच्या सर्जनशीलतेची एक सुंदर अभिव्यक्ती म्हणजे चित्रकला. मनातील भावना, विचार आणि कल्पनाशक्ती यांना रंग व रेषांच्या माध्यमातून आकार देण्याचे सामर्थ्य चित्रकारामध्ये असते. म्हणूनच चित्रकार हा केवळ कलाकार नसून मानवी भावविश्वाचा संवेदनशील दुभाषा असतो.
जगप्रसिद्ध चित्रकार ‘लिओनार्डो विंची’ यांनी रेखाटलेल्या ‘मोनालिसा’ या चित्रातील स्मित आजही जगाला आकर्षित करते. त्या स्मितामध्ये आनंद, शांतता, गूढता आणि असंख्य भावना दडलेल्या असल्याचा भास होतो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, कुशल चित्रकार आपल्या कलेतून अनेक भावना आणि विचार एकाच वेळी व्यक्त करू शकतो.
परंतु असा संवेदनशील आणि सर्जनशील कलाकार जेव्हा एखाद्या विचारधारेसाठी किंवा अस्मितेसाठी चुकीच्या मार्गावर जातो, तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात. कला हे परिवर्तनाचे प्रभावी साधन असताना काही कलाकार संघर्षाचा वेगळा मार्ग का निवडतात? अशाच एका प्रतिभावान चित्रकाराची आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या निर्णयाची ही कहाणी आहे.
सन १९९० मधील ही घटना. दक्षिण मुंबईतील एका नामांकित खासगी रुग्णालयात माझ्या जवळच्या नातेवाईकांवर उपचार सुरू होते. त्यांच्या देखरेखीसाठी मला अधूनमधून रुग्णालयात जावे लागायचे. त्यांना विशेष कक्षात (स्पेशल रूम) ठेवण्यात आले होते. त्या खोलीत दोन रुग्णांची व्यवस्था होती.
त्या रात्री त्यांच्या सोबत थांबण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती. माझ्या नातेवाईकांच्या अलीकडच्या बेडवर सुमारे पन्नास-पंचावन्न वर्षांचे एक गृहस्थ ॲडमिट होते. मी येण्यापूर्वीच माझ्या नातेवाईकांनी, त्यांना माझ्याविषयी बरीच माहिती दिली होती. विद्यार्थी संघटनेतील माझी जबाबदारी, स्थानिक पातळीवरील सामाजिक आणि संघटनात्मक कार्य, तसेच माझी राजकीय-सामाजिक सक्रियता यांचे वर्णन त्यांनी बहुधा थोडे रंगवूनच केले असावे.
माझ्या नातेवाईकांनी त्यांच्या विचारधारेचा अंदाज घेऊनच माझ्याबद्दल अधिकचे सांगितले असावे. त्यामुळे मी त्यांना प्रत्यक्ष भेटण्यापूर्वीच त्यांच्या मनात माझ्याविषयी एक सकारात्मक प्रतिमा तयार झाली असावी.
मी त्या रात्री साधारण आठ वाजता रुग्णालयात पोहोचलो. त्या वेळी दोन्ही रुग्णांचे जेवण सुरू होते. रूमच्या दरवाज्यावरील पडदा हलकेच बाजूला सारून मी आत प्रवेश केला. दरवाज्यासमोरील पहिल्या बेडवर ते गृहस्थ बसून जेवत होते. त्यांच्या समोर एका छोट्या टेबलावर त्यांचे ताट ठेवलेले होते.
मला रूमचा क्रमांक माहिती होता. मात्र माझे नातेवाईक मला लगेच दिसले नाहीत. म्हणून मी त्या गृहस्थांना माझ्या रुग्णाचे नाव सांगून त्यांच्याविषयी विचारले. त्यांनी काही न बोलता फक्त हलकेच मान वर केली आणि आतील बाजूकडे बोट दाखवले. त्यावरून मला समजले की माझे नातेवाईक आतल्या बेडवर आहेत.
मी आत गेलो, माझे नातेवाईक माझ्या कडे पाहून गोड हसले. त्यांचे सुद्धा जेवण सुरू होते. रुग्णालयातील नेहमीच्या पथ्याच्या जेवणासारखेच ते जेवण दिसत होते.कमी तेल, कमी मसाला, पातळ डाळ, मूदभर पसरलेला भात, थोडेसे सॅलड, एक पातळ भाजी आणि एक सुकी भाजी. रंगरूपावरून तरी ते अतिशय साधे आणि पथ्यकारी वाटत होते.
मी आत जाऊन माझ्या नातेवाईकांची चौकशी केली. त्यांच्या काही गरजा आहेत का ते पाहिले. थोड्या वेळाने त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि विचारले,
“ तू,जेवून आलास का?”
“हो,” मी उत्तर दिले, “आज इथे यायचे होते म्हणून घरून लवकरच,जेवून निघालो.”
माझे उत्तर ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित उमटले. थोड्याच वेळात दोघांचेही जेवण आटोपले. माझे नातेवाईक पाठ टेकता येईल अशा बेडवर डोळे मिटून शांतपणे पहुडले. खोलीत हळूहळू शांतता पसरू लागली.
काही वेळाने नर्स आली. तिने नेहमीप्रमाणे दोन्ही रुग्णांना त्यांच्या वेळेची औषधे दिली, तब्येतीची चौकशी केली आणि पेशंट चार्ट वर आवश्यक नोंदी करून ती निघून गेली. माझ्या समोरच एक लहानसा अटेंडंट साठीचा बेड होता. रात्री अकराच्या सुमारास,मी घरून आणलेली चादर अंथरून त्यावर झोपायचा माझा विचार होता.
तोपर्यंत वेळ घालवण्यासाठी मी वर्तमानपत्र वाहत बसलो होतो. रात्रीची वेळ वाढत होती आणि रुग्णालयातील हालचालीही कमी होत चालल्या होत्या. कॉरिडॉरमधून येणाऱ्या पावलांच्या आवाजातही आता विरळपणा जाणवत होता.
काही वेळाने मी समोरील प्रखर दिवा बंद केला. रुग्णांना झोपताना त्रास होऊ नये म्हणून पेशंटच्या बेड जवळचे कर्टन ओढले.रूम मधला झीरो बल्ब लावून फक्त मंद पिवळसर प्रकाश सुरू ठेवला. त्या सौम्य प्रकाशात रुम मधील सर्व वस्तू धूसर दिसत होत्या. वातावरणात एक प्रकारची शांतता होती.
मी झोपण्याची तयारी करत असतानाच समोरील गृहस्थांनी हलकेच माझ्याकडे वाकून पाहिले. त्यांच्या डोळ्यांत काहीतरी सांगण्याची इच्छा स्पष्ट दिसत होती.
“अरे ओमकार, इकडे ये जरा..”
ती हाक ऐकताच मी क्षणभर दचकलो. माझे नाव घेऊन मला हाक मारणारे या खोलीत कोण असू शकते? माझे ओळखीचे तर समोरच्या खाटेवर झोपले होते. मग मला नावाने कोण बोलावत होते?
म्हणून मी मागे वळून पाहिले. आवाज शेजारच्या बेडवर असलेल्या त्या गृहस्थांचाच होता. क्षणभर माझ्या मनात प्रश्न आला, हे मला कसे ओळखतात?
मी उठलो आणि त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिलो. त्यांच्या नजरेत दिसलेली उत्सुकता पाहून मला वाटले की ते माझीच वाट पाहत असावेत.
क्षणभर थांबून त्यांनी माझ्याकडे स्मित नजरेने पाहिले.
माझ्या चेहऱ्यावरील प्रश्न त्यांनी ओळखला असावा. हलकेसे हसत ते म्हणाले,
“घाबरू नकोस ओमकार. मीच तुला हाक मारली. तुझे नाव मला तुझ्या नातेवाईकांनी सांगितले आहे. तुझ्याबद्दलची बरीच माहिती त्यांनी मला दिली आहे. तू कोणत्या विचारांच्या वातावरणात वाढला आहेस, कोणत्या प्रकारचे काम करतोस, हेही त्यांनी सांगितले आहे.”
“म्हणूनच मला तुझ्याशी बोलायचे आहे,” ते शांतपणे म्हणाले. “माझे विचार, माझी भूमिका आणि माझ्या आयुष्यातील शेवटच्या काही गोष्टी तुला इतरांपेक्षा लवकर समजतील असे मला वाटते.”ते काही क्षण थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरता दिसत होती.
“तू लेखन करतोस, असे तुझ्या नातेवाईकांकडून कळले. भविष्यात कधीतरी माझ्याबद्दल दोन शब्द लिहिशील तरी, तेवढेच पुरेसे आहेत माझ्यासाठी. त्या शब्दांपुरता कां होईना, मी जगाच्या स्मरणात जिवंत तरी राहीन,म्हणून मला तुझ्याशी बोलायचे आहे.”
“मी काही मोठा नेता नाही, समाजसुधारक नाही आणि वर्तमानपत्रांच्या मथळ्यांत झळकणारा प्रसिद्ध माणूसही नाही. माझ्यासाठी कोणी लेखण्या झिजवणार नाही, ना माझ्यावर ग्रंथ लिहिले जातील. मी एक साधा चित्रकार आहे..”
हे बोलताना त्यांनी क्षणभर नजर खिडकीबाहेर वळवली.
“पण माझ्या नावापुढे आणखी एक ओळख जोडली गेली आहे. अशी ओळख जी माझ्या चित्रांपेक्षा लोकांना जास्त आठवते.”
मी त्यांच्या चेहऱ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागलो.
त्यांनी माझ्याकडे पाहिले, हलकेसे हसले आणि म्हणाले,
“मी चित्रकार आहे आणि शिक्षा भोगलेला गुन्हेगारही..मुकुंद माधव”
त्या एका वाक्याने खोलीतील शांतता अधिक गडद झाली. काही क्षणांपूर्वी माझ्यासमोर एक साधा रुग्ण बसला होता. आता मात्र त्याच्या आयुष्याभोवती रहस्य, संघर्ष आणि वेदनांचे एक वेगळेच वलय निर्माण झाले होते.
त्यांच्या आवाजात अहंकार नव्हता.उलट एक प्रकारची खंत आणि मनात साचलेले काहीतरी सांगण्याची तीव्र इच्छा होती. ते त्याचे बोलणे ऐकून माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. समोर बसलेली प्रौढ,दाढी वाढवलेली, उणीपुरी उंची असलेली, सावळ्या रंगाची व्यक्ती कोण बरे असेल ? तिला मला काय बरे सांगायचे असेल ? हा प्रश्न माझ्या मनात उभा राहिला.माझी उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती.
“आजवर माझ्याबद्दल अनेकांना मी सांगितले,पण त्या गोष्टींच्या मागचा माणूस समजून घेण्याचा प्रयत्न फार कमी लोकांनी केला. कदाचित म्हणूनच आज मला तुझ्याशी बोलावेसे वाटत आहे. तू नक्कीच समजून घेशील आणि कधीतरी दोन शब्द माझ्यासाठी खर्ची टाकशील ”
त्या वेळी मला कल्पनाही नव्हती की माझ्यासमोर बसलेली ही व्यक्ती एका विलक्षण आयुष्याची आणि तितक्याच विलक्षण संघर्षाची कहाणी घेऊन आली होती. प्रथमदर्शनी तरी तो एक साधासुधा आणि सामान्य माणूस वाटत होता परंतु त्याच्या बोलण्यात आणि नजरेत काहीतरी वेगळे जाणवत होते. त्या रात्री त्याच्या आयुष्याचा एक अनोखा प्रवास माझ्यासमोर उलगडणार होता.
त्या क्षणी मला स्पष्टपणे जाणवले की तो केवळ एक सामान्य रुग्ण नव्हता. त्याच्या मनात अनेक वर्षे दडवून ठेवलेली एक मोठी कहाणी होती.संघर्षाची, विचारांची, कलेची आणि कदाचित अपराधाचीही. त्या कहाणीला शब्द देण्यासाठी तो एखाद्या योग्य श्रोत्याच्या शोधात होता आणि नियतीने त्या रात्री माझी निवड केली असावी.
मी त्यांच्या समोर ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसलो. त्यांच्या बाजूची ट्यूबलाईट सुरू असल्याने त्या भागात पुरेसा प्रकाश होता. ते काहीतरी बोलायला सुरुवात करणार इतक्यात माझे लक्ष त्यांच्या साईड टेबलावर ठेवलेल्या एका जाडसर वहीकडे गेले.
ती साधी वही वाटत नव्हती. तिचा आकार, बांधणी आणि वापरलेला कागद पाहून माझ्या मनात लगेच विचार आला.हे बहुधा स्केचबुक असावे. समोर बसलेली व्यक्ती चित्रकार असल्याचे नुकतेच कळले होते, त्यामुळे माझा अंदाज चुकीचा असण्याची शक्यता कमीच होती.
मी त्यांच्याकडे पाहून हलकेच विचारले,
“हे तुमचे स्केचबुक आहे का?”
त्यांनी स्मितहास्य करत मान डोलावली.
मी ते हळूच हातात घेतले. पहिल्याच स्पर्शात जाणवले की ते खरोखरच एक स्केचबुक होते. त्यातील कागदांवर पेन्सिलीच्या रेषांचे अस्पष्ट ठसे उमटलेले दिसत होते. माझी उत्सुकता आणखी वाढली.
मनात विचार आला, त्यांची कहाणी ऐकण्यासाठी तर पूर्ण रात्र आपल्याकडे आहे. पण एकदा का दिवे बंद झाले, तर हे स्केचबुक नीट पाहता येणार नाही.
म्हणून मी प्रथम त्या स्केचबुकची पाने चाळण्याचे ठरवले. कदाचित त्या चित्रांमधूनच त्या माणसाची ओळख, त्याचे मन आणि त्याच्या आयुष्याचे काही अनकथित पैलू समोर येणार होते.
मी स्केचबुकची पाने हळूहळू उलटू लागलो. प्रत्येक पानागणिक माझी उत्सुकता वाढत होती. त्यामध्ये अत्यंत सुंदर आणि जिवंत वाटणारी पेन्सिल स्केच काढलेली होती. त्या चित्रांमध्ये एक वेगळीच ताकद आणि निरीक्षणशक्ती दिसून येत होती.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी ती स्पेशल रूम जशीच्या तशी कागदावर उतरवली होती. बेड्स, खिडक्या, पडदे, सलाईन स्टँड, अगदी खोलीतील प्रकाश आणि सावल्यांचाही अचूक वेध त्यांनी घेतला होता. माझ्या नातेवाईकांचे एक सुंदर रेखाचित्र त्यात होते. रोज येणाऱ्या नर्सचेही त्यांनी हुबेहूब स्केच काढले होते. त्या चित्रांमधून त्यांच्या चेहऱ्यावरील भावसुद्धा स्पष्टपणे जाणवत होते.
मी एकामागोमाग एक पाने उलटत राहिलो. प्रत्येक चित्र काहीतरी वेगळे सांगत होते. अचानक एका पानावर मला डरकाळी फोडणाऱ्या वाघाचे प्रभावी चित्र दिसले. त्या वाघाच्या डोळ्यांतील आक्रमकता आणि चेहऱ्यावरील आवेश इतका जिवंत वाटत होता की क्षणभर तो वाघ पाहणाऱ्यांच्या मनात धडकीच भरावी”
पुढच्या काही पानांवर मुंबईच्या गिरणगावातील दृश्ये होती. उंचच उंच चिमण्या -धुरांडी, गिरण्यांच्या इमारती, धुराने भरलेले आकाश आणि त्या परिसरातील जीवन यांचे त्यांनी केलेले चित्रण विलक्षण होते. त्या रेखाटनांमध्ये केवळ दृश्य नव्हते, तर एका काळाचा इतिहास आणि असंख्य कामगारांचे जीवन दडलेले होते.
स्केचबुक बंद करून मी ते अलगद टेबल वर ठेवले. तेवढ्या वेळात त्या व्यक्तीची अर्ध्याहून अधिक ओळख मला त्या चित्रांमधून झाली होती. समोर बसलेला माणूस केवळ चित्र काढणारा नव्हता तर तो एक तीक्ष्ण निरीक्षक, संवेदनशील मनाचा कलाकार आणि आपल्या सभोवतालच्या जगाला कागदावर जिवंत करणारा चित्रकार होता.
स्केच बुक मधील चित्रे पाहून मी अक्षरशः भारावून गेलो होतो. काही क्षण मी त्या चित्रांकडे पाहतच राहिलो. शेवटी माझ्या मनातील भावना शब्दांत व्यक्त केल्याशिवाय राहवल्या नाहीत.
“सर,” मी म्हणालो, “तुमची चित्रे पाहताना मला असा भास होत होता की ती एखाद्या सामान्य माणसाने नव्हे तर प्रत्यक्ष ब्रह्मदेवानेच रेखाटली आहेत. जसा एखादा छायाचित्रकार कॅमेऱ्यातून क्षण टिपतो, तसाच अनुभव तुमची स्केच पाहताना येतो.”
ते शांतपणे माझे बोलणे ऐकत होते.
मी पुढे म्हणालो, “हा डरकाळी फोडणारा वाघ इतका जिवंत वाटतो की पाहणाऱ्यांच्या मनात क्षणभर धडकी भरलीच पाहिजे. त्याचीच तर ती निशाणी आहे आणि आमच्या काकांचे स्केच तर अगदी विलक्षण आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आजारपण, थकवा आणि भाव अगदी जसेच्या तसे उतरले आहेत. ते चित्र पाहिले की ते आजारी असल्याचेही जाणवते. इतके हुबेहूब चित्र मी आजवर पाहिले नाही.”
माझे कौतुक ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित उमटले. त्या स्मितामध्ये समाधान होते, पण त्याचबरोबर आयुष्यभर दुर्लक्षित राहिलेल्या कलाकाराची वेदनाही दडलेली होती.
मी काकांच्या स्केचबद्दल त्यांना म्हणालो,
“उद्या त्यांचा मुलगा भेटायला येईल. शक्य असेल तर ते स्केच त्याला द्या. त्यांच्यासाठी ती तुमची खूप मोठी आठवण ठरेल.”
माझे बोलणे ऐकून त्यांनी लगेच मान हलवली.
“होय,मी नक्की देईन,” ते शांत स्वरात म्हणाले, “काळजी करू नकोस.”
त्या एका वाक्यात आश्वासन होते, आत्मीयता होती आणि कलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या कलाकाराची संवेदनशीलताही होती.
मला तेव्हा जाणवले की चित्रकार फक्त चित्रे काढत नाही तो क्षणांना, आठवणींना आणि माणसांना काळाच्या पलीकडे जपून ठेवण्याचे काम करतो.
आता मला त्याची कहाणी ऐकण्याची आणखीच उत्सुकता लागली होती.
ते बोलण्या अगोदर माझे लक्ष त्यांच्या बेडच्या बाजूला ठेवलेल्या दोन छोट्या गठ्ठ्यांकडे गेले. एका गठ्ठ्यात साड्या होत्या, तर दुसऱ्यात पॅन्ट पीसेस व्यवस्थित पॅकिंग करून ठेवलेली दिसत होती.
क्षणभर मला वाटले की कदाचित त्यांचा कपड्यांचा व्यवसाय असावा.
मी सहजच विचारले,
“तुमचा गारमेंटचा व्यवसाय आहे कां ?”
माझा प्रश्न ऐकून ते हलकेसे हसले.
“नाही रे,” ते पुढे म्हणाले, “माझा कपड्यांच्या व्यवसायाशी काहीही संबंध नाही.”
थोडा श्वास घेत त्यांनी पुढे सांगितले,
“मला या रुग्णालयात येऊन जवळजवळ महिना झाला आहे. आणखी दोन-तीन दिवसांत मला टाटा हॉस्पिटलमध्ये हलवणार आहेत. या काळात इथल्या डॉक्टरांनी, नर्सनी, वॉर्डबॉयनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी माझी खूप सेवा केली. माणूस म्हणून त्यांचे काहीतरी ऋण फेडावेसे वाटते.”
त्यांच्या आवाजात कृतज्ञतेचा भाव स्पष्ट जाणवत होता.
“माझा एक मित्र गारमेंटचा व्यापारी आहे. काही दिवसांपूर्वी तो भेटायला आला होता. तो म्हणाला, ‘मुकुंद, तुला काय हवे आहे ते सांग. मी आणून देतो.’”
“मी त्याला म्हटलं, द्यायचंच असेल तर काही साड्या आणि पॅन्ट पीसेस पाठव. इथल्या स्टाफला वाटण्यासाठी. त्यांनी माझी मनापासून सेवा केली आहे. म्हणून माझ्याकडून त्यांना छोटीशी भेट देता येईल.”
हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान दिसत होते.
“मोठं काही देण्याची माझी ताकद नाही,” ते पुढे म्हणाले, “पण जेव्हा या वस्तू त्यांच्या पर्यंत पोहोचतील, तेव्हा कदाचित काही दिवस तरी त्यांना माझी आठवण राहील. माणूस शेवटी किती दिवस जगतो हे महत्त्वाचं नसतं कोणाच्या स्मरणात किती दिवस जिवंत राहतो, हे जास्त महत्त्वाचं असतं.”
त्यांचे शब्द ऐकून मी क्षणभर नि:शब्द झालो. समोर बसलेला माणूस स्वतःच्या आजाराशी झुंज देत होता, पण त्याच्या मनात स्वतःच्या वेदनांपेक्षा त्याची सेवा करणाऱ्या अनोळखी लोकांबद्दलची कृतज्ञता अधिक होती.
त्या क्षणी त्या माणसाविषयी माझ्या मनात एक वेगळाच आदर निर्माण झाला..
काही वेळाने त्यांनी आपल्या बेडजवळील ट्यूबलाईटचे बटण दाबून ती बंद केली आणि झिरो बल्ब सुरू केला. क्षणभर खोली अंधारात बुडाल्यासारखी वाटली. मग त्या झिरो बल्बचा मंद पिवळसर प्रकाश हळूहळू संपूर्ण खोलीत पसरला. त्या अंधुक प्रकाशात भिंती, फर्निचर आणि माणसांचे चेहरे वेगळेच भासत होते.
त्या मंद प्रकाशात त्यांचा चेहरा अधिकच गंभीर दिसत होता. पिवळसर उजेडामुळे त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा, काळी पांढरी दाढी, डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि आजारपणाची छटा अधिक स्पष्टपणे जाणवत होती.
ते आपल्या बेडवर मांडी घालून बसले होते. तेव्हाच माझ्या लक्षात आले की त्या हॉस्पीटल मधील ते एकमेव रुग्ण असावेत. ज्यांच्या अंगावर रुग्णालयाचा युनिफॉर्म नव्हता. त्यांनी साधी पांढरी फुल बनियन घातली होती आणि सफेद लेंगा घातला होता. त्या वेषात ते एखाद्या रुग्णापेक्षा आपल्या घरात निवांत बसलेल्या माणसासारखे वाटत होते.
क्षणभर माझ्या मनात प्रश्न आला, रुग्णालयात असूनही यांना युनिफॉर्म कां दिला नसेल?
पण तो प्रश्न विचारणे मला योग्य वाटले नाही. कदाचित तो त्यांच्या खासगी आयुष्याशी संबंधित असू शकत होता. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, ते त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगण्याच्या मनःस्थितीत दिसत होते. अशा वेळी असंबद्ध प्रश्न विचारून त्यांचा मूड घालवण्याची माझी इच्छा नव्हती.
म्हणून मी तो प्रश्न मनातच ठेवला.
तथापि, स्केचबुकमधील काही चित्रे पाहिल्यानंतर माझ्या मनात एक वेगळाच अंदाज तयार झाला होता. त्या चित्रांमध्ये काही व्यक्ती, काही प्रतीके आणि काही दृश्ये अशी होती की त्यांचा एखाद्या विशिष्ट सामाजिक किंवा राजकीय प्रवाहाशी संबंध असावा असे वाटत होते. त्यामुळे हे गृहस्थ सर्वसामान्य नसून काहीसे प्रभावशाली किंवा विशेष ओळख असलेले व्यक्तिमत्त्व असावे, असा माझा समज होत चालला होता.
परंतु तो अंदाज कितपत खरा होता, याचे उत्तर आता त्यांच्या पुढील शब्दांतूनच मिळणार होते. मुकुंद माधव यांनी त्यांची कहाणी कथन करायला सुरुवात केली.
“मी कोकणातील एका खेड्यातून मुंबईत आलो.लहानपणापासून चित्रकलेची आवड होती.लहान मोठया नोकऱ्या करून मी आर्टस् स्कूल मधून डिप्लोमा घेतला. एका वर्तमान पत्राच्या प्रेस मध्ये मी चित्रकार म्हणून कामाला लागलो.त्या कामात मी खूप एन्जॉय करत होतो. चित्रकारीचे काम असल्याने जीव ओतून काम करणे आलेच. त्यासाठी माझे मनच स्वतः दबाव घ्यायला लागले आणि त्यात मला धुम्रपानाचे व्यसन लागले.सतत चित्रकारी करावी लागत असल्याने सतत धूम्रपान आले.त्या मुळे ते व्यसन आयुष्यभर लागले ते कायमचे. बहुतेक त्याच्या परिणामांमुळे मला लुकेमिया झाला असावा”
असे म्हटल्यावर “अरे बाप रे’ असे हळूच तोंडातल्या तोंडात उदगार निघाले. मनात म्हटले शेवटी त्यांच्या आवडत्या कलेनेच त्यांचा घात केला की पुढे येणाऱ्या घटनांनी ? हे पुढे कळेलच,असे म्हणत त्यांचे बोलणे मी पुढे ऐकत राहिलो. थोडा वेळ डोळे बंद करून ते पुढे बोलायला लागले "त्या प्रेसमध्ये दुसऱ्या सेक्शनला एक वरिष्ठ चित्रकार होते. वयाने आणि अनुभवाने आमच्यापेक्षा मोठे. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळत असे. आमच्यासाठी ते मोठ्या भावासारखे होते. त्यांच्या विचारांचा आमच्यावर प्रभाव पडू लागला होता.”
“मुंबईतील गिरणी कामगार अनेक वर्षे भरडला जात होता. स्थानिक तरुणांना नोकऱ्यांमध्ये डावलले जात असल्याची भावना वाढत होती. कामगार वर्गात आणि गिरण गावातील जनते मध्ये त्यांच्याच विद्यमान लोकप्रतिनिधी विषयी असंतोष निर्माण झाला होता.”
“माझ्या सोबत काम करणाऱ्या वरिष्ठ चित्रकारांचा एका उदयोन्मुख प्रादेशिक पक्षाच्या सर्वोच्च नेत्याशी जवळचा संबंध होता. सभा, बैठका आणि सामाजिक उपक्रमांच्या निमित्ताने ते त्यांच्या सतत संपर्कात असत. त्यांच्या मार्फत माझी त्या सर्वोच्च नेत्याशी ओळख झाली. सुरुवातीला ती केवळ एक साधी ओळख होती पण पुढे ती माझ्या आयुष्याला अनपेक्षित वळण देणारी ठरली."
“प्रेसमध्ये काम करणारा चित्रकार, कामगार आणि स्थानिक जनतेच्या चळवळीबद्दल संवेदनशील असणारा कार्यकर्ता आणि राजकारणात नकळत ओढला गेलेला मी एक तरुण”
थोडा वेळ शांत राहून त्यांनी आपल्या आयुष्याच्या एका निर्णायक वळणाची कहाणी पुढे सांगायला सुरुवात केली.
“ही गोष्ट आहे सत्तरच्या दशकातील गिरणगावातील,” ते म्हणाले. “मुंबईच्या गिरणी कामगार बहुल भागात त्या काळात राजकीय आणि कामगार चळवळींचे वातावरण तापलेले होते. एका बाजूला कामगारांचा लाडका नेता कॉम्रेड देशमुख आणि दुसऱ्या बाजूला नव्याने उभी राहत असलेली प्रादेशिक विचारसरणीची जन मराठी सेना. या दोन्ही विरोधी बाजूंमधला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला होता.”
ते काही क्षण थांबले,मोठा सुस्कारा सोडत पुढे म्हणाले..
“त्या काळात आमच्यापर्यंत एक संदेश पोहोचला.कॉम्रेड देशमुख यांचा राजकीय प्रभाव संपवणे आवश्यक आहे. आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहतो तेव्हा जाणवते की त्या निर्णयामागे केवळ राजकारण नव्हते. त्यामागे राग, अस्मिता, अन्यायाची भावना आणि तरुण रक्ताची उर्मी सुद्धा होती.”
त्यांच्या आवाजात पश्चात्ताप आणि आत्मपरीक्षण दोन्ही जाणवत होते.
“मी स्वभावाने कलाकार होतो. चित्र काढणारा, स्वप्ने पाहणारा आणि भावनांनी भारावून जाणारा तरुण. माझ्या हातात कुंचला अधिक शोभत होता. पण त्या काळातील परिस्थितीने आमच्या मनात संतापाचा ज्वालामुखी पेटवला होता. स्थानिक माणसांवर अन्याय होत असल्याची भावना आमच्या मनात खोलवर रुजली होती. त्या भावनेने आम्हाला विवेकापेक्षा कृतीकडे अधिक ढकलले.”
ते पुढे म्हणाले,
“आमच्यावर कोणीही कोणतीच जबरदस्ती केली नव्हती. कोणी बंदूक रोखून आदेश दिले नव्हते. किंवा पैसे चारून वश केले होते.आम्ही आमच्या इच्छेने त्या प्रवाहात वाहत गेलो. त्या काळातील वातावरण, विचारधारा आणि सतत कानावर पडणाऱ्या घटनांनी आमचे विद्रोही विचार घडत गेले.”
झिरो बल्बच्या मंद प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावरच्या सावल्या दिसत होत्या.
“आमच्या मते कॉम्रेड देशमुख हे त्या परिस्थितीला काही अंशी जबाबदार होते. ते त्या असंतोषाचा राजकीय फायदा घेत आहेत, असे आम्हाला वाटत होते. आज ते योग्य होते की अयोग्य, हा वेगळा प्रश्न आहे पण त्या वेळी आम्हाला तेच सत्य वाटत होते.”
त्यांनी एक खोल श्वास घेतला.
“मग निर्णय झाला. सुरुवात त्यांच्यापासूनच करायची. माझ्या सोबत आणखी तीन जण होते. आम्ही चौघे त्या मोहिमेवर निघालो..तसे पाहिले तर पाठीमागून काम करणारी बरीच मुले होती..आघाडीवर मात्र आम्ही चार जण होता.”
हे बोलून ते क्षणभर शांत झाले. खोलीत पुन्हा एकदा निःशब्दता पसरली. त्यांच्या पुढील शब्दांमध्ये त्यांच्या आयुष्याचा सर्वात काळाकुट्ट अध्याय दडलेला होता.
“जून महिन्याची ती पावसाळी रात्र होती. गिरण गावच्या एका अरुंद गल्लींमध्ये नेहमीप्रमाणे कामगारांची वर्दळ ओसरली होती. रात्रीचे दहा वाजून गेले होते. बहुतेक घरांचे दिवे बंद झाले होते, पण कॉम्रेड देशमुख यांच्या घरात मात्र अजूनही लोकांची ये-जा सुरू होती.
कामगारांचा नेता म्हणून त्यांची ओळख होती. अनेकांसाठी ते आधार होते, तर काहींसाठी ते मोठा अडथळा.
जून महिन्यातील एका पावसाळी रात्री गिरणगाव हादरले. कामगारांचे लोकप्रिय नेते कॉम्रेड देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याची बातमी दुसऱ्या दिवशी सकाळी वाऱ्यासारखी पसरली.
संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली. दुकाने बंद राहिली, गिरण्यांमधील कामगार रस्त्यावर उतरले आणि शहरभर चर्चांना उधाण आले. पोलिस यंत्रणा तातडीने कामाला लागली. तपासाचे चक्र वेगाने फिरू लागले.
काही दिवसांतच अनेक संशयित तरुणांना अटक करण्यात आली. त्यामध्ये मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांचाही समावेश होता. एका गुणी चित्रकाराची ओळख आता एका गाजलेल्या खटल्यातील आरोपी म्हणून होऊ लागली होती.
त्यांच्यात एक नाव विशेष चर्चेत होते.’मुकुंद माधव”
“आम्ही तरुण आणि गरम रक्ताचे होतो. आमच्या डोळ्यांत महत्त्वाकांक्षा होती. काही जण आम्हाला गुन्हेगार म्हणत होते. तर काही जण म्हणत होते की आम्ही राजकीय खेळातील प्यादे आहोत”
“तुरुंगाच्या कोठडीत बसलेल्या माझ्या मनात मात्र एकच प्रश्न घुमत होता”.
"खरंच मी माझं आयुष्य निवडलं होतं, की कोणीतरी माझ्यासाठी आधीच ते लिहून ठेवलं होतं?"
"एका अंधाऱ्या रात्री कॉम्रेडची निर्घृण हत्या होते. पोलिस अनेक तरुणांना अटक करतात. त्यामध्ये माझ्या सारख्या कलासक्त आणि विद्रोही विचारांच्या भोवऱ्यात अडकलेला तरुणही होता."
“आमच्या खटल्यासाठी देशातील नामांकित वकील उभे करण्यात आले,” ते पुढे सांगू लागले. “तरीही न्यायालयाने आम्हाला दोषी ठरवले आणि मला चौदा वर्षांची शिक्षा सुनावली गेली.”
त्यांच्या आवाजात कटुता नव्हती, उलट आयुष्याचा निकाल स्वीकारलेल्या माणसाची शांतता होती.
पुढे ते म्हणाले ,“तुरुंगात असताना आमचे वर्तन चांगले होते. शिस्त पाळली, कोणताही त्रास दिला नाही. त्यामुळे पुढे आमच्या शिक्षेत काही प्रमाणात सवलत मिळाली. पण शिक्षा किती वर्षांची होती यापेक्षा त्या वर्षांनी आमच्याकडून काय हिरावून घेतले, हे अधिक महत्त्वाचे होते.”
ते काही क्षण विचारात हरवले.
“खटला सुरू असतानाच झालेल्या पोटनिवडणुकीत मराठी जनसेनेचा उमेदवार निवडून आला. त्यानंतर संघटना वाढत गेली, विस्तारत गेली आणि पुढे मोठी शक्ती बनली. त्यानंतरचा इतिहास तुला माहीतच असेल.”
त्यांनी एक कडवट हसू केले.
“पण त्या इतिहासात आमच्यासारख्या लोकांची नावे कुठेच उरली नाहीत. संघटना उभी राहिली, अनेकांना पदे मिळाली, प्रतिष्ठा मिळाली, सत्ता मिळाली. मात्र आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची आयुष्ये तुरुंगाच्या भिंतींमध्येच अडकून पडली.”
झिरो बल्बच्या पिवळसर प्रकाशात त्यांचा चेहरा अधिकच थकलेला दिसत होता.
“बाहेर आलो तेव्हा जग बदलले होते. माझे वय बदलले होते. माझी स्वप्ने बदलली होती. सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे माझ्या हातातील कलाकार हरवला होता.”
त्यांनी आपल्या हातांकडे पाहिले.
“कधीकाळी हे हात कागदावर जिवंत माणसे उतरवत होते. भावनांना आकार देत होते. पण आयुष्याची उमेदीची वर्षे तुरुंगात गेल्यानंतर या हातांतील जादू तशी राहिली नाही. चित्रे अजूनही काढतो, पण त्यात पूर्वीचा उत्साह, पूर्वीची स्वप्ने आणि पूर्वीचे तारुण्य उरलेले नाही.”
त्यांचा आवाज आता अधिक मंद झाला होता.
“आजही माझे मन मला एकच प्रश्न विचारत असते. अस्मितेसाठी केलेस, विचारांसाठी केलेस, अन्यायाविरुद्ध उभा राहिलास.हे सर्व ठीक आहे. पण स्वतःसाठी काय केलेस?”
क्षणभर त्यांनी डोळे मिटले.
“त्या प्रश्नाचे उत्तर आजही माझ्याकडे नाही. कदाचित म्हणूनच आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन मला माझ्या चित्रांमध्ये, आठवणींमध्ये आणि तुझ्या सारख्या अनोळखी श्रोत्यांना माझी कहाणी सांगून स्वतःला शोधावे लागते.”
त्या शब्दांनंतर खोलीत पुन्हा शांतता पसरली. बाहेर कुठेतरी नर्सच्या सँडलचा हलका आवाज ऐकू येत होता. पण माझ्या मनात मात्र एक वेगळाच गोंधळ सुरू झाला होता. समोर बसलेल्या त्या कलाकाराने आपल्या आयुष्याचा सर्व हिशोब माझ्या समोर मांडला होता. त्या हिशोबात विजयापेक्षा त्याग अधिक होता, अभिमानापेक्षा वेदना अधिक होत्या.
खूप रात्र झाली होती. औषधाची गुंगी असल्याने बोलता बोलता मुकुंद सर बेडवरच पाय पसरून झोपी गेले. मीही समोरील अटेंडंटच्या बेडवर चादर अंथरून झोपून गेलो.
सकाळी जाग आली तेव्हा हॉस्पिटलमध्ये नेहमीची लगबग सुरू झाली होती. नर्सेसची ये-जा, औषधांची वेळ आणि रुग्णांची हालचाल सुरू झाली होती. मी निघण्यापूर्वी त्यांच्या जवळ गेलो.
“मुकुंद सर, शुभ प्रभात. मी निघतो,काळजी घ्या.” मी म्हटले.
त्यांनी माझ्याकडे पाहून हलकेसे स्मित केले.
“अरे हो,” ते म्हणाले, “तुझ्या काकांचे चित्र मी विसरणार नाही. त्यांचा मुलगा आला की त्याला आठवणीने देईन. आणि हो,तू जर परत आलास तर त्या वेळी मी इथे नसेन.”
मी त्यांचा निरोप घेतला आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडलो.
काही दिवसांनी आमचे नातेवाईक पूर्णपणे बरे होऊन घरी आले. आयुष्य पुन्हा नेहमीच्या गतीने सुरू झाले. मुकुंद सरांची भेट हळूहळू आठवणींच्या कप्प्यात जाऊन बसली.
साधारण महिनाभरानंतर एका कामानिमित्त मी मुकुंद सर राहत असलेल्या भागात गेलो. सकाळची वेळ होती. त्यांच्या भागात शिरताच सर्व नाक्यावर लावलेले मोठे फलक माझ्या नजरेस पडले.
“दिवंगत श्री. मुकुंद माधव यांचे दुःखद निधन..भावपूर्ण श्रद्धांजली.”
क्षणभर माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली.
मी जागच्या जागी थबकलो. हॉस्पिटलमधील ती रात्र, स्केचबुक, डरकाळी फोडणाऱ्या वाघाचे चित्र, कृतज्ञतेने वाटण्यासाठी आणलेल्या साड्या, आणि आयुष्याबद्दल त्यांनी केलेले आत्मपरीक्षण, सगळे एका क्षणात डोळ्यांसमोर उभे राहिले.
माझ्या डोळ्यांत नकळत पाणी आले. एखादा जवळचा माणूस गमावल्यावर जशी पोकळी निर्माण होते, तशीच काहीशी भावना मनात दाटून आली.
त्या दिवशी मला त्यांच्या एका वाक्याची आठवण झाली
“कधीतरी माझ्याबद्दल दोन शब्द लिहिशील. तेवढाच मी त्या शब्दांपुरता का होईना, अमर होईन.”
आज अनेक वर्षांनंतर लेखणी हातात घेताना जाणवते की मुकुंद सरांची ती इच्छा अपूर्ण राहू नये. ही कथा त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र नाही, ना या द्वारे त्यांच्या कृतीचे समर्थन आहे. हा फक्त एका संवेदनशील चित्रकाराचा, एका चुकलेल्या वळणावर आयुष्य बदलून गेलेल्या माणसाचा आणि शेवटपर्यंत स्वतःच्या निर्णयांचा अर्थ शोधत राहिलेल्या व्यक्ती वरचा लघुपट आहे.
कदाचित त्यांना हे असे काही शब्दच अपेक्षित असावेत.
आणि कदाचित याच काही शब्दांमध्ये ‘मुकुंद माधव’ नावाचा तो चित्रकार आजही जिवंत आहे.
समाप्त..🎨🖌️✏️ 🔗'महापूर : एका शापाची सुरुवात' भाग - १🌊⚡🌧️
काळे ढग, वाढणारी नदी आणि संकटाची चाहूल... एका शांत गावावर ओढवणाऱ्या महाभयंकर महापूराची थरारक कहाणी पुढे वाचा..👉
वैधानिक सूचना: धूम्रपान आरोग्यासाठी घातक आहे. कथेमधील धूम्रपानाचे उल्लेख हे केवळ पात्रांच्या चित्रणासाठी आहेत.
𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook


विषयाची निवड, कथानकाची उभारणी आणि रहस्याची हाताळणी अत्यंत प्रभावी आहे. प्रत्येक टप्प्यावर वाचकाची उत्सुकता वाढवत नेणारी शैली हे या लेखनाचे विशेष वैशिष्ट्य आहे.
उत्तर द्याहटवासुंदर अभिप्राय..धन्यवाद..
उत्तर द्याहटवा