मुख्य सामग्रीवर वगळा

भूssभू, चावे आणि टोळीयुद्ध | कुत्र्यांविषयीचे माझे अनुभवविश्व | भटके कुत्रे, रेबीज आणि निष्ठेच्या कथा

 अस्वीकरण

 या लेखातील सर्व अनुभव, निरीक्षणे आणि मते लेखकाची वैयक्तिक आहेत. लेखाचा उद्देश कोणत्याही प्राण्याबद्दल द्वेष, हिंसा किंवा क्रूरतेचे समर्थन करणे हा नाही. कुत्र्यांबद्दलचे उल्लेख हे लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांवर आणि निरीक्षणांवर आधारित आहेत. प्राण्यांशी नेहमी दयाळूपणे आणि जबाबदारीने वागावे. कोणत्याही प्राण्याने चावा घेतल्यास किंवा संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय अथवा पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

भुssभू, चावे आणि टोळीयुद्ध : कुत्र्यांविषयीचे माझे अनुभवविश्व|भटके कुत्रे, रेबीज आणि निष्ठेच्या कथा

भूssभू, चावे आणि टोळीयुद्ध | कुत्र्यांविषयीचे माझे अनुभवविश्व | भटके कुत्रे, रेबीज आणि निष्ठेच्याकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
चावा, माया, टोळीयुद्धे, अनुभवांचे विश्व अफाट,
कधी अंगावर काटा आणणारे, कधी हसू फुलवणारे प्रसंग दाट |
श्वानांच्या सहवासातून एकच धडा मिळाला खास,
निष्ठा ओळखणे सोपे, पण माणुसकीचीच असते खरी कसोटी त्यास ||

🔗पद्माकर शिवलकर : भारतीय कॅपपासून वंचित राहिलेला महान फिरकीपटू|क्रिकेट कारकीर्द आणि माझी अविस्मरणीय भेट

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या पद्माकर शिवलकर यांना भारतीय संघाची कॅप लाभली नाही, ही क्रिकेटविश्वातील मोठी विसंगती मानली जाते. ५८९ प्रथम श्रेणी बळी, मुंबई क्रिकेटवरील अमिट छाप आणि एका शाळकरी मुलाशी त्यांनी जपलेली आपुलकी,या सर्व आठवणींना उजाळा देणारा हा लेख.

भुssभू, चावे आणि टोळीयुद्ध : कुत्र्यांविषयीचे माझे अनुभवविश्व|भटके कुत्रे, रेबीज आणि निष्ठेच्या कथा

  कुत्रा हा माणसाचा सर्वात विश्वासू मित्र मानला जातो. पण कुत्र्यांविषयीचे अनुभव नेहमीच गोड आणि सुखद असतात का? बालपणीच्या आठवणी, मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे टोळीयुद्ध, कुत्र्याचा चावा, रेबीजची भीती, श्वानप्रेमींचे अनुभव आणि निष्ठेच्या भावनिक कथा अशा अनेक पैलूंना स्पर्श करणारा हा अनुभवप्रधान लेख. कुत्र्यांविषयीचे माझे काही विनोदी, काही थरारक तर काही विचार करायला लावणारे अनुभव पुढे जाणून घ्या..
  कुत्रा हा माणसाचा सर्वात विश्वासू मित्र म्हणून ओळखला जातो, पण प्रत्येक अनुभव आनंददायीच असेल असे नाही. भटक्या कुत्र्यांचे टोळीयुद्ध, कुत्र्याचा चावा, रेबीजची भीती, श्वानप्रेमींचे अनुभव आणि कुत्र्यांची अतूट निष्ठा या सगळ्या पैलूंना स्पर्श करणारा हा अनुभवप्रधान मराठी लेख आहे. विनोदी, थरारक आणि भावनिक प्रसंगांतून कुत्र्यांशी माणसाचे नाते किती गुंतागुंतीचे असू शकते, याचा वेध या लेखात घेतला आहे.
  बालपणी ज्या प्राण्यांची माणसाला सर्वप्रथम ओळख होते, त्यामध्ये कुत्रा अग्रस्थानी असतो. लहान बाळाला कुत्रा दिसला की घरातील मोठी माणसे प्रेमाने, “बघ भुssभू!” असे म्हणत त्याची ओळख करून देतात. त्यानंतर तेच बाळ आपल्या बाळबोध भाषेत “भुssभू” असा आवाज काढण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे कुत्रा हा अनेकांच्या बालपणीच्या आठवणींचा अविभाज्य भाग बनतो.
  भारतीय संस्कृतीतही कुत्र्याला विशेष स्थान आहे. अनेक धार्मिक कथा आणि लोकपरंपरांमध्ये कुत्र्याचा उल्लेख आढळतो. निष्ठा आणि कर्तव्यपरायणतेचे उदाहरण म्हणून कुत्र्याचा उल्लेख केला जातो.  कुत्रा हा केवळ पाळीव प्राणी नसून माणसाचा विश्वासू मित्र, रक्षक आणि साथीदार आहे. त्याची निष्ठा, प्रेम आणि सेवाभाव मानवाला नेहमीच प्रेरणा देतात. त्यामुळे आपण कुत्र्यांशी प्रेमाने व दयाळूपणे वागले पाहिजे. त्यांच्या संरक्षणासाठी आणि कल्याणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कुत्रा हा खऱ्या अर्थाने माणसाचा सर्वात विश्वासू मित्र आहे.
  कुत्र्यांचे महत्त्व केवळ घरापुरते मर्यादित नाही. आपत्तीच्या काळात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठीही प्रशिक्षित कुत्र्यांचा उपयोग केला जातो. भूकंप, पूर किंवा इतर नैसर्गिक संकटांच्या वेळी अनेक जीव वाचविण्यात त्यांचे मोठे योगदान असते. त्यामुळे कुत्रा हा मानवाचा खरा सहकारी आहे.
  कुत्र्याची घाणेंद्रिय अत्यंत तीव्र असतात. तो मानवापेक्षा अनेक पटींनी जास्त प्रभावीपणे वास ओळखू शकतो. याच गुणामुळे पोलीस दल, सैन्य आणि बचाव पथके कुत्र्यांची मदत घेतात. गुन्हेगारांचा शोध घेणे, स्फोटके किंवा अमली पदार्थ शोधणे, हरवलेल्या व्यक्तींना शोधून काढणे यांसारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये कुत्रे मोठी भूमिका बजावतात.
   कुत्रा हा सस्तन प्राण्यांच्या वर्गातील असून जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर, डॉबरमन, मुधोळ अशा अनेक जाती जगभर प्रसिद्ध आहेत.आधुनिक शास्त्रीय संशोधनानुसार पाळीव कुत्रा हा लांडग्याचा थेट वंशज मानला जातो. 
   कुत्रा हा अनेकांचा आवडता प्राणी असला तरी काही लोकांना त्याची भीती वाटते. कुत्रा दिसला की रस्ता बदलणे, त्याच्यापासून दूर पळणे किंवा घाबरून जाणे अशा प्रतिक्रिया अनेकांच्या मनात दिसून येतात. विशेषतः काही महिला आणि लहान मुले रस्त्यावरील कुत्रे पाहून इतकी घाबरतात की समोरून वाहने येत आहेत,याचाही त्यांना विसर पडतो.
  माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर मला कुत्र्यांबद्दल ना विशेष प्रेम आहे, ना द्वेष. “तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जातो” या भूमिकेतून मी त्यांच्यापासून योग्य ते अंतर ठेवणे पसंत करतो. मात्र कुत्र्यांच्या विविध जातींबद्दल मला कुतूहल आहे. विशेषतः मुधोळ जातीचा सडपातळ, चपळ आणि वायुवेगाने धावणारा शिकारी कुत्रा मला खूप आवडतो. अर्थात, त्याला लांबून पाहणेच मला अधिक पसंत आहे!
  शहरांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये श्वानप्रेमी तसेच कुत्र्यांमुळे त्रस्त असलेले रहिवासी यांच्यात अनेकदा वाद होताना दिसतात. भुंकणे, स्वच्छतेच्या समस्या किंवा सुरक्षेच्या चिंता यांमुळे काही रहिवासी तक्रारी करतात. पाळीव कुत्र्यांपासून सुद्धा रेबीज झाल्याच्या काही घटना समाजमाध्यमांवर अधूनमधून पाहायला मिळतात. त्यामुळे ज्यांना आधीच कुत्र्यांची भीती वाटते, त्यांच्या मनातील भीती आणखी वाढली आहे.
 कुत्र्यांना माणसाची भाषा काही प्रमाणात समजत असावी, असा मला दाट संशय आहे. यावर अधिक संशोधन व्हायला हरकत नाही. मालकाने दिलेल्या तोंडी सूचना ते ज्या इमानेइतबारे पाळतात, ते पाहून अनेकदा आश्चर्य वाटते.
कुत्र्यांचे स्वभावही माणसांप्रमाणे वेगवेगळे असतात. काही श्वान इतके भोळे आणि गरीब दिसतात की जणू शाळेत शिक्षक काय शिकवत आहेत हे काहीच न समजलेल्या विद्यार्थ्यासारखा त्यांचा आविर्भाव असतो. तर काही कुत्रे मात्र अशा खुनशी नजरेने पाहतात की, "फक्त हात लावून तर बघ!" असा त्यांचा मूक इशाराच वाटतो.
  काही इतके लाजाळू असतात की एखाद्या भित्र्या तरुण कोंबडीप्रमाणे पळत जाऊन मालकाच्या मागे लपतात. तर काही कुत्रे इतके प्रेमळ असतात की तुम्ही थोडे जरी प्रेमाने जवळ गेलात तरी "तुझ्यापेक्षा मला जास्त प्रेम करता येते" अशा भावनेने अंगाला घासून, शेपटी हलवून आपला लाडिकपणा व्यक्त करू लागतात.
   काही कुत्रे मात्र पूर्णपणे निर्विकार असतात. त्यांच्या चेहऱ्यावर ना आनंद दिसतो ना राग. त्यांच्या दृष्टीने या जगात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाणे. पोट भरले की जगाशी त्यांना काहीही देणेघेणे नसते!
  "मुंबई जागी असते", "मुंबई कधीच झोपत नाही" असे नेहमी म्हटले जाते. खरे तर हा शब्दप्रयोग मुंबईकर जनतेसाठी वापरला जातो, परंतु मला तो मुंबईतील कुत्र्यांसाठी अधिक योग्य वाटतो. रात्री मुंबईतील कोणत्याही गल्लीबोळातून फिरा किंवा उशिरा घरी परत या, कुत्र्यांच्या भुंकण्याशिवाय तुमचे स्वागत होणार नाही.
 सुरुवात एका कुत्र्यापासून होते. मग दुसरे, तिसरे आणि पाहता पाहता संपूर्ण परिसरातील कुत्र्यांची जणू मैफलच रंगते. एका कुत्र्याने सूर लावला की बाकीची कुत्री त्याच्या सुरात सूर मिसळतात. रात्री मुंबईत फिरताना भुतांपेक्षा कुत्र्यांची भीती अधिक वाटते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
  मराठीत एक म्हण आहे, "जो गरजतो तो बरसत नाही." त्याच धर्तीवर "भुंकणारा कुत्रा चावत नाही" असेही म्हटले जाते. पण विषाची परीक्षा जशी घेतली जात नाही, तशीच भुंकणाऱ्या कुत्र्याच्या अगदी जवळ जाऊन स्वतःचा शहाणपणा सिद्ध करण्यात काही अर्थ नाही.
  रात्री उशिरा अनेक ठिकाणी कुत्री एकत्र बसून रडत असल्यासारखे आवाज काढताना दिसतात. लहानपणी आम्हाला सांगितले जायचे की कुत्रा रडला तर त्याला एखादा अशुभ संकेत जाणवतो. पण मुंबईत तर कुत्री जवळपास रोजच असे आवाज काढतात. मग त्यांना रोजच असे काही संकेत मिळत असतील का ?, असा प्रश्न पडतो.आणि जर ती रडत नसतील, तर एकमेकांशी भांडत तरी असतात. 
 त्यांच्या भुंकण्याचे, केकाटण्याचे आणि झटापटीचे आवाज इतके सवयीचे झाले आहेत की काही वेळा ते ऐकू आले नाहीत तरच काहीतरी चुकल्यासारखे वाटते. उलट आजकाल त्या आवाजांशिवाय झोपच येत नाही, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल! 
  भटके कुत्रे दिवसभर सावली शोधून निवांत झोप काढतात आणि रात्र झाली की जणू त्यांची ड्युटी सुरू होते. मग भुंकणे, रडणे, एकमेकांचा पाठलाग करणे आणि अधूनमधून भांडणे असे त्यांचे उद्योग सुरू होतात. त्यामुळे लहानपणापासून माझ्या मनात एक प्रश्न पडत आला आहे की रात्र ही निसर्गाने कुत्र्यांच्या भुंकण्यासाठीच राखून ठेवली आहे का?
  पालघरमध्ये असताना मी एक विलक्षण गोष्ट अनेकदा पाहिली होती. संध्याकाळी पोलिस मुख्यालयात झेंडा उतरविण्याच्या वेळी सलामीसाठी बिगुल वाजवला जायचा. बिगुलचे स्वर कानावर पडताच त्या परिसरातील सहा-सात कुत्री एकाच वेळी रडल्यासारखे आवाज काढू लागायची. हा प्रकार इतका नियमित होता की एकही दिवस असा गेला नाही की बिगुल वाजला आणि ती कुत्री प्रतिसाद म्हणून रडली नाहीत.
  यामागचे नेमके कारण काय असावे, हे मला आजही माहीत नाही. कदाचित बिगुलच्या विशिष्ट उच्च पट्टीतील आवाजामुळे त्यांना प्रतिसाद द्यावासा वाटत असावा. आजही जेव्हा बिगुलचा आवाज ऐकतो, तेव्हा पालघरच्या त्या संध्याकाळी, बिगुलच्या सुरात रडणारी ती कुत्री आठवतात.
   माझा एक मित्र एकदा मला म्हणाला, "भटका असो किंवा पाळीव, कुत्र्याने एकदा का तुमची ओळख करून घेतली, की तो तुम्हाला आयुष्यभर विसरत नाही." त्याचे हे विधान ऐकून माझ्या मनात थोडी शंका निर्माण झाली. म्हणून मी स्वतःच त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले.
  आमच्या परिसरात एक कुत्रा होता. मला पाहताच तो नेहमी भुंकायला सुरुवात करायचा. मग मी विचार केला, "चला, याच्याशी मैत्री करून बघूया." सलग चार-पाच दिवस मी त्याला बिस्किटे खायला दिली. तोही ती अगदी आनंदाने खायचा. मला वाटले, आता आपली मैत्री पक्की झाली असावी.
  मात्र त्यानंतर काही दिवस तो दिसलाच नाही. जेव्हा पाच-सहा दिवसांनी पुन्हा त्याची आणि माझी भेट झाली, तेव्हा मला पाहताच त्याने पूर्वीप्रमाणेच भुंकायला सुरुवात केली! त्या क्षणी मला दोन गोष्टींपैकी एक खरी असावी असे वाटले .एकतर माझ्या मित्राचे कुत्र्यांच्या स्मरणशक्तीबद्दलचे ज्ञान चुकीचे होते, किंवा त्या कुत्र्याने बिस्किटे लक्षात ठेवली होती पण बिस्किटे देणारा माणूस विसरला होता!
   त्या दिवसापासून कुत्र्यांच्या मैत्रीबाबत माझा संशय अजून थोडा वाढला. मात्र त्या कुत्र्याच्या दृष्टीने पाहिले तर कदाचित त्याने आपले भुंकण्याचे  कर्तव्यच पार पाडले असेल.
   पिसाळलेल्या कुत्र्यांबद्दल समाजात अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत. एखाद्या कुत्र्याच्या तोंडातून सतत लाळ गळत असेल, त्याच्या वागण्यात अचानक बदल झाला असेल, तो अस्वस्थपणे इकडेतिकडे फिरत असेल किंवा अनपेक्षितपणे आक्रमक वागत असेल, तर लोक त्याला रेबीज झाल्याची शक्यता व्यक्त करतात. तथापि अशा प्रकारचे असामान्य वर्तन दिसणाऱ्या कुत्र्यापासून सुरक्षित अंतर राखणे आणि अनावश्यक संपर्क टाळणे हे नेहमीच शहाणपणाचे ठरते.
   रस्त्यावर अनेकदा जखमी, आजारी किंवा इतर कुत्र्यांशी झालेल्या भांडणांमुळे जखमा झालेली कुत्री दिसतात. अशा वेळी त्यांची अवस्था पाहून वाईट वाटते. प्रत्येकाला प्रत्यक्ष मदत करणे शक्य नसले तरी आजकाल अनेक प्राणीप्रेमी आणि स्वयंसेवक औषधे, जंतुनाशके आणि प्राथमिक उपचाराचे साहित्य सोबत बाळगतात. एखादा जखमी कुत्रा दिसला की त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करतात. ही भूतदया आणि प्राणिमात्रांबद्दलची करुणा निश्चितच कौतुकास्पद आहे.
  आमच्या लहानपणी अधूनमधून "कुत्रे पकडणारी गाडी" दिसायची. त्या गाडीत अनेक भटकी कुत्री पकडून नेली जात असत. तेव्हा त्यांना कुठे नेतात किंवा पुढे त्यांचे काय होते, याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. नंतर समजले की अशा मोहिमांमागे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करणे, लसीकरण करणे आणि नसबंदी करणे हे उद्देश असतात. आज अनेक महानगरांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी नसबंदी आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण हा महत्त्वाचा उपाय मानला जातो.
   काही बंगल्यांच्या, फार्महाऊसच्या किंवा घरांच्या बाहेर मोठ्या अक्षरांत "BEWARE OF DOG" असा फलक लावलेला दिसतो. तो पाहिल्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या मनात लगेच भीती निर्माण होते. मात्र माझ्या निरीक्षणानुसार अशा फलकांपैकी निम्म्याहून अधिक फलक हे प्रत्यक्ष धोक्यापेक्षा "फुकटची भीती" निर्माण करण्यासाठी लावलेले असतात.
   अनेक वेळा फलक पाहून मनात एखाद्या प्रचंड आकाराच्या, रागीट आणि खुनशी कुत्र्याची प्रतिमा तयार होते. पण गेट उघडल्यावर आतून शेपटी हलवत एखादा लहानसा, निरागस आणि पाहुण्यांशी मैत्री करण्यास उत्सुक कुत्रा बाहेर येतो. अशा वेळी फलक आणि वास्तव यातील तफावत पाहून हसू आवरत नाही.
  काही ठिकाणी तर कुत्रा असतो खरा, पण तो इतका प्रेमळ असतो की चोराला पकडण्याऐवजी त्याच्याशी मैत्रीच करेल की काय अशी शंका यावी! त्यामुळे कधी कधी असे वाटते की त्या फलकाचा उद्देश कुत्र्यापासून सावध करणे नसून, अनोळखी लोकांना थोडे अंतर राखण्याचा इशारा देणे हा असावा.
  अर्थात, प्रत्येक फलकाकडे विनोद म्हणून पाहणे योग्य नाही. काही ठिकाणी खरोखरच प्रशिक्षित किंवा आक्रमक कुत्रे असू शकतात. त्यामुळे "BEWARE OF DOG" हा फलक दिसला की थोडी सावधगिरी बाळगणे केव्हाही शहाणपणाचेच असते.
  कुत्र्यांबद्दल माझी "तू लांब रहा, मी लांब राहतो" ही भूमिका कां आहे ?, यामागे एक वैयक्तिक अनुभव सुद्धा आहे.

अ)"दबक्या पावलांनी आलेला शिकारी"

   
   एकदा मी एका परिचित व्यक्तीला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. घराबाहेर "BEWARE OF DOG" असा कोणताही फलक नव्हता. मी त्यांच्या दिवाणखाण्यात बसून त्यांची वाट पाहत होतो. घरात एक कुत्रा आहे. याची पुसटशी कल्पना होती, पण तो घरात कुठे आहे, हे दिसत नव्हते.
   मला एखादी शिकार किंवा संशयित व्यक्ती समजून तो कुत्रा माझ्या मागून दबक्या पावलांनी, कोणताही आवाज न करता हळूच आला. मला काही समजायच्या आत त्याने खुर्चीच्या बाहेर आलेल्या माझ्या डाव्या हाताच्या कोपरखळीला सणसणीत चावा घेतला. त्याचे चारही सुळे माझ्या कोपरखळीत घुसले. क्षणात रक्त वाहू लागले.
    त्या कुत्र्याचा मालक माझा परिचित आणि स्वभावाने चांगला माणूस असल्यामुळे त्यावेळी मी काही बोलू शकलो नाही. उलट तेच मला समजावत म्हणाले, "काळजी करू नका, आम्ही त्याला रेबीजची नियमित लस देतो."पण विषाची परीक्षा घेणार कोण ? कुत्र्याला लस दिली आहे हे खरे असेलही, पण स्वतःच्या आरोग्याचा धोका पत्करण्याइतका मी धाडसी नव्हतो.
  दुसऱ्याच दिवशी मी महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन रेबीज प्रतिबंधक उपचार सुरू केले. त्या काळी ही लस खासगी डॉक्टरांकडे सहज उपलब्ध होत नसे. त्यामुळे कोणतीही जोखीम न पत्करता, आवश्यक असलेली सर्व वैद्यकीय खबरदारी मी घेतली.
   त्या घटनेला आज जवळजवळ तीस वर्षे झाली असतील. जखम केव्हाच भरून निघाली, तिची खूणही फारशी उरली नाही. पण त्या प्रसंगाची आठवण मात्र अजूनही ताजी आहे. कधी कधी आजही त्या जागी हलकेसे डसल्यासारखे वाटते. तो वेदनेचा भास असतो की मनावर कोरल्या गेलेल्या आठवणींचा परिणाम, हे सांगता येत नाही. मात्र त्या कुत्र्याने केलेला तो अनपेक्षित हल्ला आजही स्मरणात तितकाच जिवंत आहे
  त्या घटनेनंतर कुत्र्यांबद्दलचा माझा दृष्टिकोन बदलला नाही, पण सावधगिरी मात्र नक्कीच वाढली. कारण शांत दिसणारा आणि शेपटी हलवणारा कुत्रा कधी मित्र ठरेल आणि कधी अचानक दात दाखवेल, याचा भरवसा नसतो.

ब) "पहाटेचे श्वान टोळीयुद्ध"


"आमच्या लहानपणी कुत्रा भुंकत अंगावर आला तर त्याला पळवून लावण्याची एक युक्ती आम्हाला माहीत होती. खाली वाकून दगड उचलण्याचे फक्त नाटक करायचे,मारायचे बिलकुल नाही.अनेकदा एवढे करताच कुत्रा भुंकणे थांबवून मागे सरकायचा. आणि जर ते नाटक थोडे प्रभावीपणे केले, तर तो शेपूट घालून दूर निघून जायचाही."
   असाच एक प्रसंग माझ्या बाबतीत घडला होता. मला पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील उपकोषागार कार्यालयात ऑडिट इन्स्पेक्शनसाठी जायचे होते. त्यावेळी मी गोरेगाव येथे राहत होतो. अंधेरीहून पहाटे ५.३० वाजताची डहाणू लोकल पकडायची असल्याने मी पहाटेच घराबाहेर पडलो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे काळ्या रंगाचे विंडचिटर, काळी रेन पँट, डोक्यावर काळे हेल्मेट ,काळे शुज आणि काळ्या रंगाची बाईक असा पूर्ण काळ्या रंगाचा जामानिमा केला होता.     बाहेर अजूनही अंधार होता. रस्त्यावर चिटपाखरूसुद्धा दिसत नव्हते. बीएमसीच्या काही दिव्यांचा पिवळसर प्रकाश रस्त्यावर पसरला होता, तर काही दिवे बंद होते. खड्ड्यांनी भरलेला तो रस्ता पूर्णपणे मोकळा असल्याने मी बाईक चांगल्याच वेगात चालवत होतो.
   तेवढ्यात माझ्या मागे एक-दोन नव्हे, तर तब्बल दहा-बारा कुत्रे लागले. ते माझ्या बाईकची पाठ सोडायलाच तयार नव्हते. त्यांना चकवा देण्यासाठी मी बाईकचा वेग आणखी वाढवला. मात्र अचानक समोर पाण्याने भरलेला एक मोठा खड्डा आला. साधारणपणे अशा खड्ड्यातून वेगात असलेली बाईक सहज निघून जाते, पण हा खड्डा अपेक्षेपेक्षा खूपच खोल होता. बाईक त्यात आदळताच इंजिन बंद पडले.       
    क्षणार्धात त्या दहा-बारा कुत्र्यांनी माझ्याभोवती वेढा घातला. जणू एखाद्या हिंदी चित्रपटात खलनायकाचे गुंड नायकाला गोल रिंगण करून कोंडीत पकडतात, तशीच अवस्था माझी झाली होती. त्या अंधाऱ्या, निर्मनुष्य रस्त्यावर मी आणि माझ्याभोवती गोलाकार उभे असलेले ते कुत्र्यांचे टोळके ,हा प्रसंग अंगावर काटा आणणारा होता.
 बाईक खड्ड्यात अडकून बंद पडली होती. ती सुरू करायची तर आधी खड्ड्यातून बाहेर काढणे गरजेचे होते. इकडे त्या दहा-बारा कुत्र्यांनी माझ्याभोवती असा वेढा घातला होता की जणू ते म्हणत होते, “खूप पळत होतास ना? आता कसा आलास आमच्या तावडीत!” एकूणच त्यांच्या भुंकण्याचा सूर तरी तसाच वाटत होता.
  त्या क्षणी मला महाभारतातील कर्णाची आठवण झाली. युद्धभूमीवर त्याच्या रथाचे चाक चिखलात रुतले होते आणि तो असहाय्य अवस्थेत उभा होता. आधुनिक काळातील तसाच अनुभव मी त्या अंधाऱ्या, पावसाळी रस्त्यावर घेत होतो. मनातल्या मनात मीही म्हणत होतो, “अरे कुत्र्यांनो, मला जरा माझ्या गाडीचे चाक खड्ड्यातून बाहेर काढू द्या, मग पाहू काय करायचे ते!” पण त्यांना माझे काही ऐकायचेच नव्हते.
  एक कुत्रा भुंकत भुंकत पुढे येई, चावण्याचा आव आणे, तो मागे सरकताच दुसरा पुढे येई, मग तिसरा. मात्र प्रत्यक्ष चावा घेण्याची हिंमत कोणाचीच होत नव्हती. कदाचित काळा विंडचिटर, काळी रेनकोट पँट, काळे हेल्मेट, काळे शुज आणि काळी बाईक पाहून त्यांना मी एखादा काळा ड्रॅक्युला सारखा वाटत असावा! माझ्याबद्दल त्यांना भीतीही वाटत होती आणि मला सोडून पळून जाण्याची त्यांची तयारीही नव्हती.
  “हाड.. हाड..!” करून त्यांना हुसकावण्याचा माझा प्रयत्नही निष्फळ ठरला. शेवटी मी थकलो. तेवढ्यात मला माझ्या लहानपणीची ती जुनी युक्ती आठवली खाली वाकून फक्त दगड उचलण्याचे नाटक करायचे! पण समस्या अशी होती की आजूबाजूला दगडच नव्हता..
 तेवढ्यात मला दुसरी युक्ती सुचली. मी बाईकचे हँडल घट्ट पकडले, तिची मागची बाजू खूप वर उचलली आणि जोरात खाली आपटली. क्षणार्धात खड्ड्यातील पाणी आणि चिखल “छssपाssक!” असा मोठा आवाज करत सर्व दिशांना उडाला. त्याच वेळी मीही जोरात ओरडलो. माझा आवाज, चिखल उडण्याचा आवाज आणि बाईक आपटल्याचा आवाज,या सगळ्या विचित्र गोंधळामुळे ती सर्व कुत्रे एकदम दचकले.
  बहुधा त्यांच्या मनात असा काहीतरी विचार आला असावा की हा काळा हेल्मेटधारी माणूस म्हणजे एखादा विचित्र आणि प्रचंड ताकदवान प्राणी आहे. जो बाईकसारखी जड वस्तू उचलून आपटतो आणि अनोळखी आवाज काढतो! बाईक जमिनीवर आपटताच एका क्षणात त्यांचा वेढा उठला. जो तो वाट फुटेल त्या दिशेने शेपूट घालून पळू लागला. काही क्षणांपूर्वी माझ्याभोवती गोल कोंडीत उभे असलेले ते शूरवीर आता जीवाच्या आकांताने धूम ठोकत होते.
  मी बाईक सुरू करून थोडा पुढे गेलो. मागे वळून पाहिले तर ते पुन्हा एकत्र जमले होते आणि सुरक्षित अंतरावरून वाकून-वाकून माझ्याकडे पाहत होते. मी पुन्हा बाईक त्यांच्याकडे वळवली, आणि काय, ते पुन्हा एकदा शेपूट घालून पसार झाले.
  मुंबईतील टोळीयुद्धे आता इतिहासजमा झाली असतील पण प्रत्येक गल्ली, नाका आणि नुक्कडवर दररोज रात्री एक वेगळेच टोळीयुद्ध रंगत असते. जसा एखादा गुंड म्हणायचा, “हा माझा एरिया आहे, इथे दुसऱ्याने यायचे नाही,” तसाच काहीसा नियम या श्वानजगतातही लागू असावा. फरक एवढाच की ही युद्धे माणसांची नसतात, ती असतात आपापल्या परिसराचे रक्षण करणाऱ्या श्वानांच्या टोळ्यांची.
   "दुसऱ्या एरियातील एखाद्या श्वानाने त्यांच्या हद्दीत घुसण्याची हिंमत तरी कशी करावी? त्या परिसरातील दिव्यांचे खांब, उभ्या असलेल्या गाड्यांची चाके, झाडांचे बुंधे,सगळीकडे त्यांच्या हद्दीच्या खुणा उमटलेल्या असतात. जणू प्रत्येक इंच जागेची त्यांनी व्यवस्थित परिसीमा निश्चित केलेली असते. अशा हद्दीत एखादा परका श्वान चुकून जरी शिरला, तर त्याचे काही खरे नसते. क्षणार्धात संपूर्ण टोळी त्याच्या मागे लागते आणि त्याला तेथून पळ काढल्याशिवाय पर्याय राहत नाही."

क) "टायगरची शोकांतिका"


 काही श्वानप्रेमी हे खरे प्रेम करणारे नसतात, तर केवळ दिखाऊ प्रेम करणारे असतात. माझ्या लहानपणी आमच्या परिसरात असेच एक कुटुंब होते. त्यांनी एक लहानसे कुत्र्याचे पिल्लू आणले आणि मोठ्या लाडाकोडात त्याला वाढवले. त्याचे नावही प्रेमाने "टायगर" ठेवले. टायगर त्यांचा आज्ञाधारक साथीदार झाला होता. त्याला ते अभिमानाने सर्वत्र फिरवायचे आणि त्याचे कौतुक करायचे.
पण काळ कुणासाठी थांबत नाही. टायगर ही हळूहळू म्हातारा झाला. त्याची ताकद कमी झाली, शरीर गलितगात्र झाले. आणि ज्या घरासाठी त्याने आयुष्यभर निष्ठा जपली, त्याच घराने त्याला एक दिवस दाराबाहेर हाकलून दिले.
  टायगर अनेक दिवस दाराबाहेर उभा राहून भुंकत राहिला. कदाचित त्याला वाटत असेल की आपले मालक पुन्हा आपल्याला आत घेतील. पण त्या निष्ठुर मनांना पाझर फुटला नाही. शेवटी उपाशीपोटी आणि निराधार अवस्थेत तो रस्त्यावर भटकू लागला. उकिरड्यांवर अन्न शोधत जगणारा तो एक सामान्य भटका कुत्रा बनला.
अखेरीस एका उकिरड्याजवळच त्याने अखेरचा श्वास घेतला. दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाडीने त्याचे निर्जीव शरीर कचऱ्यासोबत उचलून नेले.
  त्या वेळी माझ्या मनात एक प्रश्न सतत घोळत राहिला.ज्या प्राण्याने आयुष्यभर तुमच्यावर निःस्वार्थ प्रेम केले, त्याच्याशी वृद्धापकाळात अशी वागणूक देणारे लोक स्वतःला श्वानप्रेमी कसे म्हणवू शकतात? आणि जर निष्ठावान कुत्र्याची अशी उपेक्षा केली जाऊ शकते, तर उद्या घरातील वृद्ध माणसांचे काय? लहानपणी हा प्रश्न मला त्यांना थेट विचारावासा वाटत होता. पण तेव्हा तो प्रश्न लहान तोंडी मोठा घास ठरला असता. 

ड) "खरे श्वानप्रेम कोणते?"

 
 गोरेगावात आमच्या समोरच्या इमारतीत एका कुटुंबाने श्वान पाळला होता. घरातील सर्वजण घरी असले की तो अगदी शांत असायचा. मात्र सकाळी कामावर जाताना त्याला घरात एकटे बंद करून जायचे. त्यानंतर दिवसभर त्याचे भुंकणे सुरू असायचे. अक्षरशः संपूर्ण इमारत आणि परिसर त्याने डोक्यावर घेतल्यासारखी अवस्था व्हायची.
  अनेक रहिवाशांनी त्या कुटुंबाला याबाबत समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे उत्तर ठरलेले असायचे "त्याला एकटे राहण्याची सवय व्हायला हवी. काही दिवस भुंकेल, तुम्हीही थोडे सहन करा."
  प्रश्न श्वानाचा नव्हता प्रश्न इतरांच्या गैरसोयीचा विचार करण्याचा होता. प्राण्यांवर प्रेम करणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्या प्रेमामुळे शेजाऱ्यांना, समाजाला किंवा परिसराला त्रास होणार नाही याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे.म्हणूनच कधी कधी मला वाटते, असे अडेलतट्टू श्वानप्रेमी होण्यापेक्षा आमच्यासारखे चार हात दूर राहून त्यांच्याबद्दल कणव बाळगणारे लोक बरे.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते.
"श्वान पाळा. त्यांच्यावर प्रेम करा. त्यांना आयुष्यभर आधार द्या. त्यांच्या सुख-दुःखाची जबाबदारी घ्या. पण आपल्या श्वानप्रेमाचा त्रास समाजाला होणार नाही, याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे."
  कुत्र्यांविषयीच्या या अनुभवविश्वात आपण निष्ठा, माया, भीती, जबाबदारी आणि माणुसकीचे विविध पैलू पाहिले. कुत्रे हे केवळ पाळीव प्राणी नसून मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. मात्र त्यांच्याशी संबंधित प्रश्न, आव्हाने आणि सामाजिक जबाबदाऱ्या यांकडेही दुर्लक्ष करता येत नाही. श्वानप्रेम आणि सामाजिक भान यांचा समतोल राखत प्राणिमात्रांशी दयाळूपणे वागणे, हाच या लेखाचा मुख्य संदेश आहे.
                                                                                       ...🖋️📖📚

🔗संशय : एक धोकादायक प्रवास | मानवी मन आणि चुकीच्या निर्णयांची किंमत ( 3 लघुकथा )

  संशय हा माणसाला सावध करणारा गुण असला तरी तो विवेकावर मात करू लागला की विनाशाला कारणीभूत ठरतो. प्रत्यक्ष घडलेल्या तीन हृदयद्रावक घटनांमधून संशय, विश्वास आणि मानवी मनाचा धोकादायक प्रवास उलगडणारा विचारप्रवर्तक लेख आणि 3 लघु कथा पुढील लेखात..👉
                                                                                
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.


तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो






📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook

टिप्पण्या

  1. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मानवीय दृष्टीकोन, निर्बीजीकरण आणि प्रभावी व्यवस्थापनाद्वारे सोडवणे गरजेचे आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. निर्बीजीकरण, लसीकरण आणि जनजागृती हा दीर्घकालीन उपाय आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...