मुख्य सामग्रीवर वगळा

सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा | दोन मनांचे पुनर्मिलन | भाग ५ | हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा

अस्वीकरण-

    ही कथा लेखकाच्या आठवणी आणि अनुभवांवर प्रेरित असली तरी गोपनीयता जपण्यासाठी सर्व पात्रांची नावे, गावाचे नाव, हॉटेलचे नाव आणि ओळख पटवू शकणारे इतर तपशील बदलण्यात आले आहेत. कथेतील काही प्रसंग साहित्यिक मांडणीसाठी विस्ताराने वर्णन केलेले आहेत. या कथेतील कोणतेही पात्र, संस्था किंवा घटना प्रत्यक्ष व्यक्ती अथवा ठिकाणाशी जुळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा - दोन मनांचे पुनर्मिलन (भाग ५)|हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा

सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा | दोन मनांचे पुनर्मिलन | भाग ५ | हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
अंतर वाढलं म्हणून प्रेम कधी कमी होत नाही,
विरह सहन केला म्हणून नातं कधी तुटत नाही|
ज्यांच्या मनात एकमेकांसाठी खरं स्थान असतं

त्यांचं पुनर्मिलन काळसुद्धा रोखू शकत नाही 

🔗सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा - विरहाच्या पलीकडे : आशेचा किरण (भाग ४) हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा..

  गोव्यातील विरहानंतर कॅरोल झुबिनला भेटण्यासाठी मुंबईत येते. प्रेम, प्रतीक्षा, परीक्षा आणि आशेच्या किरणाने उजळलेली ही भावनिक प्रेमकथा वाचली नसेल तर वाचा...

 सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा - दोन मनांचे पुनर्मिलन (भाग ५)|हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा

 अनेक महिन्यांच्या विरहानंतर झुबिन आणि कॅरोल पुन्हा एकमेकांच्या संपर्कात येतात. फोनवरील भावनिक संवाद, जुहू बीचवरील पुनर्भेट आणि भविष्यासाठी घेतलेले निर्णय यांची हृदयस्पर्शी कहाणी वाचा..

  गोव्याच्या शांत आणि रम्य वातावरणात फुललेली ही मराठी प्रेमकथा विरह, प्रेम, विश्वास आणि पुनर्मिलनाचा भावनिक प्रवास सांगते. अनेक महिन्यांच्या दुराव्यानंतर झुबिन आणि कॅरोल पुन्हा एकमेकांसमोर उभे राहतात. त्यांच्या मनातील न बोललेले शब्द, जुन्या आठवणी आणि नव्याने सुरू होणाऱ्या नात्याचा हा हृदयस्पर्शी टप्पा प्रत्येक प्रेमकथा आवडणाऱ्या वाचकाला भावूक करून जाईल

 मागील भाग 4 वरून पुढे...

   कॅरोलच्या विषयावर माझ्याशी फोनवर बोलत असतानाच झुबिन अचानक इतक्या मोठ्याने ओरडला, जणू काही त्याला लॉटरीचा जॅकपॉटच लागला होता.

 त्याचा आवाज ऐकून घरातून त्याची आजी धावत बाहेर आली आणि पारशी-गुजरातीत विचारू लागली,

“शुं थयू, डिकरा?”

झुबिन लगेच सावरला.

“दादी, कशुं नथी...”

 पण त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद लपवणे त्याला शक्य नव्हते. अनेक दिवसांनी त्याच्या डोळ्यांत पुन्हा चमक दिसत होती.

मी त्याला कॅरोलच्या मावशीच्या घरचा फोन नंबर दिला आणि कॉल संपवला.

फोन ठेवला खरा, पण आता झुबिनच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं.

 कॉल करू की नको? ती माझ्याशी बोलेल का? ती माझ्यावर रागावलेली असेल का? ज्युली मॅडम काय म्हणतील? इतक्या दिवसांनी अचानक फोन केला तर तिला कसं वाटेल?

असे कितीतरी प्रश्न त्याच्या मनात गर्दी करत होते.

 फोनसमोर बसून त्याने अनेकदा नंबर फिरवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी शेवटचा अंक फिरवण्याआधीच तो थांबत होता. मन धजावत नव्हते.

तिकडे कॅरोलची अवस्था काही वेगळी नव्हती.

 झुबिन खरंच फोन करेल का? की फक्त माझं समाधान करण्यासाठी 'ओम'ने तसं सांगितलं असेल? तो अजूनही माझ्यावर प्रेम करतो कां? तो माझ्याशी नीट बोलेल ना?

 ती सतत फोनकडे पाहत बसली होती. घरातील फोनची घंटी किंचित जरी वाजली, तरी तिचं हृदय धडधडू लागायचं. प्रत्येक वेळी तिला वाटायचं  हा झुबिनचाच फोन असेल!

 ज्युली मॅडम तिच्याकडे पाहत होत्या. कॅरोलची अस्वस्थता त्यांच्या नजरेतून सुटणारी नव्हती.

“कॅरोल, थोडा धीर धर,” त्या प्रेमाने म्हणाल्या.

“मला भीती वाटतेय,” कॅरोल हळू आवाजात म्हणाली.

“प्रेमात भीती असतेच. पण विश्वासही असतो,” ज्युली मॅडम उत्तरल्या.

बराच वेळ निघून गेला.

 खूप वाट पाहून शेवटी तिच्या मनात आले, की "मीच झुबिनला  फोन करावा का ?" असा विचार ती करत होती. इतक्यात फोनची दीर्घ घंटी वाजली. "ट्रिंssग..ट्रिंssग.."

तिने घाईघाईने रिसिव्हर उचलला.

“हॅलो..” ती हळू आवाजात म्हणाली.

काही क्षण शांतता होती.

मग समोरून परिचित आवाज आला.

“कॅरोल आहे का?”

 समोरून येणारा,तो हवाहवासा आवाज ऐकताच,तिचा ऊर  भरून आला, तिचे डोळे अश्रूंनी  डबडबले..एक हलकासा हुंदका बाहेर पडला..

 अनेक महिन्यांपासून ज्या आवाजासाठी ती आसुसली होती, तो आवाज पुन्हा तिच्या कानावर पडत होता.

क्षणभर ती काहीच बोलू शकली नाही.

“हॅलो..? कॅरोल?” झुबिन पुन्हा म्हणाला.

शेवटी तिने स्वतःला सावरले.रडक्या आवाजात विचारले..

“झुबिन.. तू कसा आहेस?”

 इतकं बोलताच तिचा आवाज पूर्ण थरथरला. तिने दाबून धरलेला हुंदका तिला आता आवरता आला नाही.

तो हुंदका झुबिन पर्यंत पोहोचलाच.

क्षणभर तोही गप्प झाला.

मग हळू आवाजात म्हणाला,

“कॅरोल.. डोन्ट क्राय.. प्लीज..डोन्ट क्राय”

तिचे रडणे थांबत नव्हते.

झुबिन पुन्हा म्हणाला,

“तू जर रडलीस तर मी सुद्धा आता रडेन.”

त्या एका वाक्याने कॅरोलच्या चेहऱ्यावर अश्रूं मधूनही हलकंसं हसू उमटलं.

हाताने डोळे पुसत ती म्हणाली,

“मग तू मला इतके दिवस फोन कां केला नाहीस?” तिने रडक्या स्वरात विचारले.

झुबिन काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला.

“माझ्यात धैर्य नव्हतं..आणि तशी परिस्थितीही नव्हती.”

“मला तुझी खूप आठवण येत होती..माझे कशातच लक्ष लागत नव्हते ”

“माझे मन सांगत होते, तू मला शोधत मुंबईला नक्की येणार आणि जर तू आली नसतीस तर मी गोव्याला परत येणार होतो"

"तू आलीस,यावरून तुझे माझ्यावर किती जिवापाड प्रेम आहे ते मला कळून आले आहे.आता हे प्रेम मी कसा बरे विसरेन ?"

 कॅरोल म्हणाली "माझी सुद्धा अवस्था खूप वाईट झाली होती..मम्मीने जर मुंबईला आणले नसते तर मला वेडच लागले असते"

“कारण मी सुद्धा तुझी तेव्हढीच आतुरतेने वाट पाहत होते.”

 त्या उत्तरानंतर दोघे काही क्षण शांत राहिले. पण त्या शांततेतही अनेक भावना दडल्या होत्या.

 त्यानंतर बराच वेळ दोघे एकमेकांशी बोलत राहिले. विरहाच्या मधील काळात साचलेले प्रश्न, तक्रारी, काळजी आणि प्रेम हळूहळू त्यांच्या शब्दांमध्ये व्यक्त होत गेले.

शेवटी त्यांनी दोघांनी निर्णय घेतला.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जुहू बीचवर भेटायचे.

 दुसऱ्या दिवशी झुबिन मोटारसायकल घेऊन चेंबूरहून सांताक्रूझला पोहोचला. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरची ती भेट होती.

 कॅरोल घराबाहेर उभी होती. झुबिनची मोटारसायकल थांबताच तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

काही क्षण दोघे फक्त एकमेकांकडे पाहत राहिले.

अनेक महिन्यांचे अंतर त्या काही क्षणांत विरघळून गेले.

कॅरोल मागे बसल्यानंतर मोटारसायकल हळूहळू जुहू बीचच्या दिशेने निघाली.

 वाऱ्याच्या झुळका तिच्या केसांत खेळत होत्या. ती शांतपणे बसली होती. पण तिच्या चेहऱ्यावरचे समाधान स्पष्ट दिसत होते.

त्यांना जाताना पाहून ज्युली मॅडमच्या डोळ्यांत समाधान दाटून आले.

 गेल्या काही महिन्यांपासून ज्या चिंतेने त्यांना पोखरून काढले होते, ती चिंता आता हळूहळू दूर होत असल्याचे त्यांना वाटू लागले.

"आता गाडी योग्य मार्गावर आली आहे," त्यांनी मनाशी म्हटले.

जुहू बीचवर पोहोचेपर्यंत संध्याकाळ सरकत आली होती.

 क्षितिजावरचा सूर्य आता शांत झाला होता. दिवसभर प्रखर तेजाने तळपणारा तोच सूर्य आता लालबुंद आणि प्रसन्न दिसत होता. त्याचा शांत प्रकाश समुद्राच्या लाटांवर पसरला होता.

 संधिप्रकाशाची चाहूल लागताच आकाशाच्या विशाल कॅनव्हासवर निसर्गाने रंगांची उधळण सुरू केली. केशरी, सोनेरी, गुलाबी आणि जांभळ्या रंगांच्या छटा एकमेकांत मिसळत होत्या.

 समोर अथांग समुद्र, किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा आणि त्या रंगोत्सवाने भारलेले आकाश सगळेच वातावरण एखाद्या स्वप्नासारखे भासत होते.

दोघेही काही काळ शांत बसून तो नजारा पाहत राहिले.

शेवटी कॅरोलने हळू आवाजात विचारले,

“परत मला कधी सोडून जाणार नाहीस ना?”

झुबिन तिच्याकडे पाहून हलकेसे हसला.

“तुला सोडून जाणार नाही..उलट तुला घेऊन जाणार आहे.”

कॅरोलच्या चेहऱ्यावर स्मित उमटले.

“खरंच?”

“हो, यावेळी मी कोणतीही चूक करणार नाही.”

तिने हळूच आपले डोके त्याच्या खांद्यावर टेकवले.

 त्या क्षणी तिच्या मनातील अनेक भीती विरघळून गेल्या. विरहाचे दिवस, अश्रू, अस्वस्थता आणि प्रतीक्षा सगळे काही जणू मागे पडले होते.

 समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येत होत्या आणि परत जात होत्या पण त्या दोघांच्या मनातील अंतर मात्र आता कायमचे मिटले होते.

 हळूहळू सूर्य क्षितिजाआड गेला. रंगांची उधळण ओसरली आणि आकाशावर काळोखाची चादर पसरू लागली. पण त्या दोघांना वेळेचे भानच राहिले नव्हते.

काही वेळाने कॅरोल म्हणाली,

 “आम्ही उद्या गोव्याला परत जात आहोत. परीक्षा संपल्यावर तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे. तू, ओम आणि आंद्रे..तुम्ही आलंच पाहिजे. नाहीतर मीच मुंबईला येईन.”

झुबिन लगेच म्हणाला,

“नको, नको. तू मुंबईला येऊ नकोस.”

ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली.

झुबिन तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला,

“मीच येईन.. आधी एंगेजमेंट करायला आणि परीक्षा पास झाल्यावर पुन्हा येईन, यावेळी कायमचं तुला माझ्यासोबत घेऊन जाण्यासाठी.”

कॅरोलच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले.

“मी त्या दिवसाची वाट पाहीन,” ती हळू आवाजात म्हणाली.

 समोर समुद्राच्या लाटा अखंडपणे किनाऱ्याशी खेळत होत्या, आणि त्या संध्याकाळी दोन मनांनीही आपल्या भविष्याची नवी स्वप्ने विणायला सुरुवात केली होती.

 गोव्यावरून  परत आल्यापासून झुबिनने शेफाली आणि जुईलीपासून स्वतःहून अंतर राखले होते. कॅरोलशी झालेल्या पुनर्भेटीनंतर तर त्याच्या मनातील सर्व संभ्रम दूर झाला होता. आयुष्यात नेमके काय हवे आहे आणि कोणाला प्राधान्य द्यायचे आहे याची त्याला स्पष्ट जाणीव झाली होती.

 कॅरोलची भेट त्याच्यासाठी एखाद्या नव्या उर्जास्रोतासारखी ठरली. तिच्या आठवणींनी आणि एका भेटीने त्याच्या मनात एक वेगळाच उत्साह संचारला होता. त्यामुळे तो नव्या आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरा गेला. मनावरील ताण आणि संभ्रम दूर  झाल्याने दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या परीक्षेवर त्याने पूर्ण लक्ष केंद्रित केले आणि त्या उत्साहात त्याचे सर्व पेपर अपेक्षेपेक्षाही उत्तम गेले.

 शेफाली आणि जुईली यांनाही हळूहळू त्या परिस्थितीची जाणीव झाली. त्यांनी सुद्धा कोणताही गाजावाजा न करता झुबिनच्या निर्णयाचा आदर केला.

 मैत्री तशीच कायम राहिली, पण त्यापलीकडील सर्व शक्यता त्या तिघांनी शांतपणे मागे सोडल्या.

 हॉटेल मॅनेजमेंटची अंतिम परीक्षा संपल्यानंतर झुबिनसोबत मी, आंद्रे आणि त्याचे काही जवळचे व विश्वासू मित्र गोव्यातील बेलाप्राया येथे कॅरोलला भेटण्यासाठी गेलो. परीक्षेच्या धावपळीनंतरचा तो प्रवास झुबिनसाठी विशेष होता, कारण आता त्याच्या आयुष्याला एक नवे वळण मिळणार होते.

 बेलाप्रायातील कॅरोलच्या घरी त्या दिवशी अतिशय आनंदी आणि घरगुती वातावरण होते. कॅरोलच्या काही जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत झुबिन आणि कॅरोल यांचा वाड:निश्चय साधेपणाने पण अत्यंत उत्साहात पार पडला. दोघांच्याही चेहऱ्यावर भविष्यातील सुंदर स्वप्नांची झलक स्पष्ट दिसत होती.

 मात्र हा वाड:निश्चय फार गाजावाजा न करता, अत्यंत गुप्तपणे आयोजित करण्यात आला होता. त्यामागे झुबिनचे ठरलेले पुढील नियोजन होते. आयुष्यातील काही महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत ही गोष्ट मर्यादित लोकांनाच माहीत राहावी, अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे त्या समारंभाला केवळ मोजकीच आणि विश्वासू माणसे उपस्थित होती. तरीही त्या छोटेखानी सोहळ्यात प्रेम, आपुलकी आणि भविष्यातील आशा यांचे सुंदर वातावरण भरून राहिले होते आणि अशा प्रकारे त्यांच्या आयुष्यातील तो अध्याय झुबिनच्या घरच्यांच्या कटुतेचा ठसा उमटवून कायमचा संपला. तो पुढे असा..

  झुबिन आणि कॅरोलने गोव्यात गुप्तपणे केलेल्या वाडनिश्चयाची गोष्ट फार काळ लपून राहिली नाही. होमीला त्या समारंभाचे आमंत्रण नसतानाही त्याची खबर त्याच्या कानावर आली. ती त्याच्यापर्यंत नेमकी कशी पोहोचली, हे देवच जाणे! खरं तर होमीने शेफ होण्याऐवजी रिपोर्टर किंवा खासगी गुप्तहेर व्हायला हवे होते. कुठलीही खबर शोधून काढण्याची त्याची कला विलक्षण होती.
  होमीमार्फत ही बातमी मनदीप कौर मॅडमपर्यंत पोहोचली आणि तिथून ती इन्स्टिट्यूटचे प्रिन्सिपल नवरोज चटईवाला यांच्यापर्यंत गेली. नवरोज चटईवाला हे झुबिनच्या कुटुंबाचे जुने पारिवारिक मित्र होते. मैत्रीचा धर्म पाळत त्यांनी इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंगवरून परतल्यानंतर योग्य वेळी झुबिनच्या घरच्यांना याबाबत सूचक इशारा दिला होता.
  त्या वेळीही झुबिनचे घरच्यांशी जोरदार वाद झाले होते. मात्र तो घरातील एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांनी तो विषय फार ताणला नाही. पण आता साखरपुडा झाल्याचे समजल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. काही दिवस घरात तणावाचे वातावरण होते. मात्र रागाच्या भरात कठोर निर्णय घेण्याऐवजी त्याच्या घरच्यांनी परिस्थितीकडे समंजसपणे पाहण्याचा मार्ग स्वीकारला.
  त्या तणावानंतर एक दिवस झुबिनने घरच्यांशी पुन्हा या विषयावर मनमोकळेपणाने चर्चा केली. कॅरोलवरील त्याचे प्रेम, त्याचे भविष्याचे नियोजन आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची त्याची तयारी पाहून अखेर घरच्यांनी उदारमतवादी भूमिका घेतली आणि त्यांच्या विवाहाला संमती दिली.
  “हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करणार?” असा प्रश्न जेव्हा घरच्यांनी त्याला विचारला, तेव्हा झुबिनने आपले स्पष्ट विचार मांडले.
सुरुवातीला ब्रिटनमधील एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये शेफ किंवा फूड अँड बेव्हरेज मॅनेजर म्हणून अनुभव घ्यायचा आणि त्यानंतर स्वतःचा केटरिंग व्यवसाय उभारायचा, असा त्याचा मानस होता. त्याच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला घरच्यांनी केवळ संमतीच दिली नाही, तर आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही दिले.
दरम्यान, झुबिनसोबत आम्ही सर्व मित्र हॉटेल मॅनेजमेंटची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालो. काही महिन्यांनंतर झुबिन आणि कॅरोल विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे स्वागत समारंभ गोवा आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी मोठ्या थाटामाटात पार पडले.
  अनेक अडथळे, गैरसमज आणि संघर्षांना सामोरे गेल्यानंतर अखेर त्यांच्या प्रेमकथेचा हा सुखद अध्याय पूर्णत्वास पोहोचला.
    काही प्रेमकथा काळाच्या ओघात हरवून जातात, तर काही विरहाच्या वादळातून अधिक मजबूत बनून बाहेर येतात. झुबिन आणि कॅरोलच्या आयुष्यातील हा क्षण तसाच होता. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या पुनर्मिलनाने त्यांच्या नात्याला नवी दिशा मिळाली होती आणि त्यांच्या सुखी संसाराचे स्वप्न अखेर पूर्ण झाले होते.

                                                                              क्रमशः..           

  📖 ही "सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा" मालिकेचा पाचवा भाग आहे. संपूर्ण कथा समजून घेण्यासाठी मागील भागही अवश्य वाचा.

 🔗 

पद्माकर शिवलकर : भारतीय कॅपपासून वंचित राहिलेला महान फिरकीपटू | क्रिकेट कारकीर्द आणि माझी अविस्मरणीय भेट..

     भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या पद्माकर शिवलकर यांना भारतीय संघाची कॅप लाभली नाही, ही क्रिकेटविश्वातील मोठी विसंगती मानली जाते. ५८९ प्रथम श्रेणी बळी, मुंबई क्रिकेटवरील अमिट छाप आणि एका शाळकरी मुलाशी त्यांनी जपलेली आपुलकी,या सर्व आठवणींना उजाळा देणारा हा लेख. क्रिकेटमधील त्यांच्या जादुई कारकिर्दीचा आणि माझ्या त्यांच्याशी झालेल्या अविस्मरणीय भेटींचा भावपूर्ण प्रवास पुढील लेखात..👉

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."


📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.



तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो






📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram

📘 Follow on Facebook                                                                                                                     

                                                                                                               

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...