मुख्य सामग्रीवर वगळा

गोव्यात फुललेली प्रेमकथा | विरहाच्या पलीकडे : आशेचा किरण | भाग ४ | हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा

 अस्वीकरण-

    ही कथा लेखकाच्या आठवणी आणि अनुभवांवर प्रेरित असली तरी गोपनीयता जपण्यासाठी सर्व पात्रांची नावे, गावाचे नाव, हॉटेलचे नाव आणि ओळख पटवू शकणारे इतर तपशील बदलण्यात आले आहेत. कथेतील काही प्रसंग साहित्यिक मांडणीसाठी विस्ताराने वर्णन केलेले आहेत. या कथेतील कोणतेही पात्र, संस्था किंवा घटना प्रत्यक्ष व्यक्ती अथवा ठिकाणाशी जुळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा - विरहाच्या पलीकडे : आशेचा किरण (भाग ४ )|हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा

गोव्यात फुललेली प्रेमकथा | विरहाच्या पलीकडे : आशेचा किरण | भाग ४ | हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
विरहाच्या पलीकडे जेव्हा आशेचा किरण उगवतो,
तेव्हा प्रत्येक अश्रू नव्या स्वप्नांना जन्म देतो |
खरं प्रेम कधीच हरवत नाही काळाच्या प्रवाहात
ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहत शांतपणे जगत असतं.||

🔗सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा - आठवणींच्या सावलीत | भाग ३ मराठी प्रेमकथा.

     कॉलेजमध्ये परतल्यानंतर ट्रेनिंगच्या आठवणी, नात्यांमधील गुंतागुंत आणि झुबिनच्या मनात पुन्हा जागी झालेली कॅरोलची ओढ हा भाग -3 वाचला असेल तर आता भाग -4 मध्ये पुढील कथा...

सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा - विरहाच्या पलीकडे : आशेचा किरण (भाग ४ )|हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा..

    गोव्यातील विरहानंतर कॅरोल झुबिनला भेटण्यासाठी मुंबईत येते. प्रेम, प्रतीक्षा, परीक्षा आणि आशेच्या किरणाने उजळलेली ही भावनिक प्रेमकथा वाचा..
   मराठी प्रेमकथा वाचणाऱ्या प्रत्येक वाचकासाठी ही कथा प्रेम, विरह आणि आशेच्या नव्या प्रवासाची अनुभूती देणारी आहे. गोव्यातील वेदनादायी विरहानंतर कॅरोल झुबिनला भेटण्यासाठी मुंबईत येते. अनेक महिन्यांपासून मनात साचलेल्या भावना, पुनर्भेटीची ओढ आणि भविष्याबद्दलची धूसर आशा या भागात हळूहळू उलगडत जाते. प्रेमाची खरी परीक्षा अंतराने होते आणि त्यावर मात करण्याची ताकद विश्वासात असते, हे या कथेतून अनुभवायला मिळेल.

मागील भाग 3 वरून पुढे...

मग मी झुबिनकडे पाहिले आणि विचारले,
"मग शेफाली आणि जुईलीचं काय?"
झुबिन हलकेच हसला.
"त्या दोघी माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. पण कॅरोलची सर त्यांना कधीच येणार नाही. आता त्या माझ्या बेस्ट फ्रेंड्स आहेत..एवढंच."
हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर हलकं स्मित उमटलं, पण डोळ्यांत मात्र अजूनही गोव्याच्या आठवणींची ओल दिसत होती.
त्या दिवसांत संपूर्ण कॉलेजवर परीक्षेचे सावट पसरले होते. कॅन्टीनमधील नेहमीचा गोंधळ कमी झाला होता. कॉरिडॉरमध्ये पूर्वीसारख्या टिंगलटवाळ्या किंवा मोठमोठ्याने सुरू असलेल्या गप्पा फारशा ऐकू येत नव्हत्या. प्रत्येकाच्या हातात नोट्स, जर्नल्स किंवा मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका दिसत होत्या.
       आमच्यापैकी अनेक जण पहिल्यांदाच इतक्या गंभीरपणे अभ्यास करत होते. हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम वरवर पाहता सोपा वाटत असला तरी फायनल परीक्षेच्या वेळी प्रत्येक विषयाचे महत्त्व जाणवू लागायचे. कुणी फूड प्रॉडक्शनची उजळणी करत होते, तर कुणी फ्रंट ऑफिसचे चार्ट्स पाठ करत होते.
      पण या सगळ्या वातावरणात झुबिन वेगळाच दिसत होता.तो अभ्यास करत होता, नोट्सही वाचत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचे हसू कुठेतरी हरवले होते. पूर्वी कॅन्टीनमध्ये सर्वात मोठ्याने हसणारा, मित्रांना चिडवणारा आणि कोणत्याही विषयावर चर्चा करणारा झुबिन आता शांत झाला होता.
       सर्व विद्यार्थी प्रॅक्टिकल, व्हायवा आणि अंतिम परीक्षेच्या तयारीत गुंतले होते. पण झुबिनच्या मनात मात्र फक्त कॅरोलचाच विचार सुरू होता. मी त्याला बाजूला घेऊन म्हणालो,“अरे, टेन्शन सोड. पुढचा विचार कर. ती आली नाही तर, नाही आली. परीक्षा झाल्यावर आपण पुन्हा गोव्याला जाऊ आणि तिला भेटण्याचा प्रयत्न करू. पण सध्या तुझ्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. अभ्यास आणि परीक्षा याकडे दुर्लक्ष करू नकोस.”
माझे बोलणे ऐकून तो थोडा सावरला आणि म्हणाला,
“तुझे बरोबर आहे. परीक्षा संपल्यावर आपण आधी आंद्रेच्या गावी जाऊ. तिथून मग बेला प्रायाला जाऊया.”
“ठीक आहे,” मी उत्तर दिले.
       त्यानंतर झुबिनने मनातील सर्व गोंधळ बाजूला सारून पूर्ण लक्ष, परीक्षेच्या तयारीवर केंद्रित केले. प्रॅक्टिकल आणि व्हायवा परीक्षा आटोपल्या होत्या, तर अंतिम परीक्षा अगदी तोंडावर येऊन ठेपली होती. अवघे एक-दोन आठवडेच शिल्लक राहिले होते. आम्ही सर्वजण हॉल तिकीट आणि परीक्षा केंद्राच्या वाटपाची आतुरतेने वाट पाहत होतो. कॉलेजमध्ये उजळणी वर्गही सुरू होते.
         पूर्वी शेफाली किंवा जुईलीकडे लक्ष देणारा झुबिन आता त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून अभ्यासात रमला होता. त्याच आठवड्यातील सोमवारी आम्ही हॉल तिकीट घेण्यासाठी कॉलेजमध्ये आलो. परीक्षेला अवघा एक आठवडा उरला होता.
 नेहमीप्रमाणे पुढच्या प्रवेशद्वाराने येणारा झुबिन  त्या दिवशी कोण जाणे त्याला काय सुचले, तो सकाळीच कॉलेजच्या मागील बाजूने आला. हॉल तिकीट घेतले आणि कोणाशीही फारसे न बोलता त्याच मागच्या दरवाजाने बाहेर निघून गेला.
        आम्ही सर्वजण दुपारी कॉलेजच्या पुढच्या गेटकडे जाणाऱ्या रस्त्याने चाललो होतो. लांब एका झाडाखाली दोन महिला उभ्या असल्याचे दिसले. सुरुवातीला त्या एखाद्या विद्यार्थ्याच्या नातेवाईक असाव्यात असे वाटले. पण जसजसे आम्ही जवळ जाऊ लागलो, तसतशी त्यांची ओळख पटू लागली. मी तर लांबूनच ओळखले,ती कॅरोल असणार..
      झुबिन सकाळीच कॉलेजमध्ये येऊन गेला होता. त्याला काही कामानिमित्त बाहेर जायचे होते. त्या काळात आजच्या सारखे मोबाईल फोन नसल्यामुळे एकमेकांशी लगेच संपर्क साधणे शक्य नव्हते.
      जवळ गेल्यावर पाहिले तर गेटजवळ कॅरोल आणि ज्युली मॅडम उभ्या होत्या. त्यांना पाहताच माझे पाय क्षणभर थबकले. झुबिनने माझ्यासमोर कॅरोलबद्दल  सकारात्मक मत व्यक्त केले होते. त्यामुळे त्यांना भेटण्यात मला काहीच गैर वाटले नाही.
मी जवळ जाताच कॅरोलने मला ओळखले आणि हाक मारली,
“हाय, ओम!”
मीही हसून प्रतिसाद दिला.
“अरे, तुम्ही इथे कुठे?”
       ती काही बोलणार इतक्यात मी हाताची पाच बोटे जवळ आणून म्हणालो,
“प्लीज! तुम्ही थोडा वेळ इथेच थांबू शकाल का? मी अगोदर फायनल परीक्षेचे हॉल तिकीट घेऊन येतो. जर ती घेण्याची वेळ संपली तर परत ती मिळवण्यासाठी  मला कॉलेजच्या ऑफिस मध्ये मिनतवाऱ्या कराव्या लागतील.  मी लगेच परत येतो, मग आपण निवांत बोलू. झुबिन मात्र सकाळीच येऊन हॉल तिकीट घेऊन गेला.”
त्यावर कॅरोलने मिश्कीलपणे विचारले,
“आम्ही येणार आहोत हे कळल्यामुळे तो पळून गेला की काय?”
मी लगेच म्हणालो,
    “नाही, नाही! तसे काहीही नाही. एकतर तुम्ही आज येणार आहात हे कुणालाच माहित नाही. दुसरे म्हणजे त्याला आज काही कामानिमित्त बाहेर जायचे आहे. तसे त्याने काल आम्हा सर्वांना सांगितले आहे.”
ती पुन्हा हसत म्हणाली,
“तू तरी परत येशील ना? की हॉल तिकीट घेऊन कॉलेजच्या मागच्या दरवाजाने निघून जाशील?” त्यावर मी तिला म्हणालो,
   “नाही, नाही. आता असे काहीही होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव,हॉल तिकीटचे काम आटोपून मी लगेच बाहेर येतो" 
मी कॉलेजच्या ऑफिस मधून फायनल परीक्षेचे हॉल तिकीट घेतले.त्यांच्या सोबत चर्चा करायला आंद्रे सोबत असायलाच हवा म्हणून माझी नजर आंद्रेला सर्वत्र शोधत होती. परंतु तो कुठेच दिसून येत नव्हता. शेवटे सरशी मी नेपाळी सोमेश्वरला विचारले,
“अरे, आंद्रे कुठे आहे,तू त्याला पाहिलेस कां ?”
त्यावर तो हसत म्हणाला,
“तो त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर कॅन्टीनमध्ये बसलाय.”
“ओके, सोमेश्वर” असे म्हणत मी पुन्हा लगबगीने गेटकडे निघालो.
मी बाहेर आलो आणि कॅरोल व ज्युली मॅडमना सोबत घेऊन कॉलेजच्या कॅन्टीनकडे निघालो. दुपारची 3.00 ची वेळ असल्यामुळे कॅन्टीनमध्ये नेहमीपेक्षा कमी गर्दी होती. काही विद्यार्थी परीक्षेच्या नोट्स चाळत बसले होते, तर काहीजण शेवटच्या क्षणाची उजळणी करत होते.
सर्व कॉलेज फायनल परीक्षेची तयारी करत होते आणि आंद्रे एका कोपऱ्यात  त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर निवांत गप्पा मारत बसला होता. मी त्याच्या टेबलाजवळ जाऊन त्याच्या कानात हळूच म्हणालो,
“अरे आंद्रे, जरा दोन मिनिटांसाठी मागच्या टेबलवर येतोस कां ?.”
त्याने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिले. मी काही न बोलता मागे इशारा केला. त्याने मागे वळून पाहिले. कॅरोल व ज्युली मॅडमना पाहताच त्याचा चेहरा गंभीर झाला.
परीक्षेला जेमतेम आठवडा उरला असताना, पुन्हा काहीतरी नवीन प्रकरण समोर येते की काय ? अशी सुप्त भीती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
मी हसत त्याच्या खांद्यावर थाप मारली.
“कूल, आंद्रे! तुझ्या मनात काय चाललंय ते मला समजतंय. काळजी करू नकोस. आता तसा काहीही गोंधळ होणार नाही.”
त्याने त्याच्या गर्लफ्रेंडची समजूत काढली "थोड्या वेळात आलोच, मी" या अटीवर तो त्या टेबल वरून उठून शांतपणे आमच्यासोबत मागे येऊन बसला.
आम्ही दोघे त्यांच्या समोर बसलो. क्षणभर कुणीच काही बोलले नाही. त्या शांततेतच माझी नजर कॅरोलकडे गेली. गोव्यात आम्ही शेवटचे भेटलो होतो. तेव्हाची कॅरोल  आणि आजची कॅरोल यामध्ये खूप फरक जाणवत होता. तिचा चेहरा उतरलेला आणि निस्तेज दिसत होता. डोळ्यांखाली थकव्याच्या हलक्या छटा उमटल्या होत्या. ती सतत चाळा म्हणून हातातील रुमालाची घडी घालत होती,मोडत होती. तिच्या या कृतीवरून तिच्या मनात किती तणाव असेल याची कल्पना मला येत होती.
मी वातावरण हलके करण्यासाठी विचारले,
“काही खाणार कां?”
त्यावर त्या दोघींनीही नकारार्थी मान हलवली.
तरीही आम्ही दोन ब्रेड-ऑम्लेट आणि दोन कोल्ड कॉफी मागवल्या. सकाळपासून त्या आमची वाट पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरूनच थकवा जाणवत होता.
थोड्या वेळाने खाणे आले. आम्ही गप्प बसून त्यांना खाऊ दिले. त्यांनीही फार काही न बोलता नाश्ता संपवला.
शेवटी ज्युली मॅडमने खोल श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली.
“तुम्ही गोव्याहून गेल्यापासून कॅरोल पूर्णपणे बदलून गेली.”
तिच्या आवाजात काळजी होती.
“सुरुवातीला मला वाटलं काही दिवसांनी सगळं पूर्ववत होईल. पण जसजसे दिवस जात होते तसतशी ही अधिकच शांत होत गेली. नीट जेवत नव्हती,झोपत नव्हती. रात्री उशिरापर्यंत जागी असायची,सीलिंग कडे एकटक बघत.अनेकदा मी उठून पाहायचे तर हिच्या खोलीतला दिवा सकाळ पर्यंत सुरू असायचा.”
कॅरोल खाली मान घालून बसली होती.
“मी हिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. म्हटलं, ‘झुबिनला आता विसर. आपण गोव्यातील एखादा चांगला मुलगा पाहू.’ पण ही ऐकायलाच तयार नव्हती.”
ज्युली मॅडम थांबल्या.
काही क्षण शांतता पसरली.
मग कॅरोलनेच हळू आवाजात म्हटले,
“मी लग्न करेन तर झुबिनशीच.. नाहीतर कोणाशीच करणार नाही.”
तिचा आवाज मोठा नव्हता, पण त्यातील ठामपणा स्पष्ट जाणवत होता.
ज्युली मॅडम तिच्याकडे पाहून हलकेसे हसल्या.
“पाहिलंत? अजूनही हिचे मत बदललेले नाही.”
मग त्या पुढे म्हणाल्या,
“हिचे वडील गेल्यापासून मीच हिची सर्व काही आहे. हिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला समजत होते की ही मनातून किती तुटली आहे. शेवटी मीच ठरवलं, तिला घेऊन मुंबईला जाऊया.”
“माझी बहीण सांताक्रूझला राहते. आम्ही तिच्याकडे आलो आहोत. आम्हाला फक्त एकदा झुबिनला भेटायचं आहे.”
त्यांचे बोलणे ऐकून मी आणि आंद्रे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिलो.
मला झुबिनने काही दिवसांपूर्वी बोललेले शब्द आठवले, ‘परीक्षा झाल्यावर आपण परत गोव्याला जाऊ.’
तो कॅरोलला विसरला नव्हता, पण परीक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचा तो प्रयत्न करत होता.
शेवटी मी म्हणालो,
“तुम्ही उद्या सकाळी पुन्हा या. मी आजच झुबिनला सगळं सांगतो. पण कृपया त्याच्या घरी फोन करू नका. परीक्षेचा काळ आहे. घरच्यांना विनाकारण काळजी वाटेल.”
ज्युली मॅडमने मान डोलावली.
पुन्हा काही क्षण शांतता पसरली.
कॅरोल समोर ठेवलेल्या कोल्ड कॉफीच्या ग्लासकडे पाहत होती. जणू तिच्या मनात अनेक प्रश्न गर्दी करून उभे होते.
शेवटी तिने धीर एकवटला आणि माझ्याकडे पाहत विचारले,
“झुबिन.. कसा आहे?”
मी तिच्याकडे पाहिले. आता मला समजले होते की ती मुंबईपर्यंत फक्त झुबिनला भेटण्यासाठी आली होती.
मी तिच्याकडे पाहत म्हणालो,
“कॅरोल, तोही गोव्याहून परत आल्यापासून खूप बदलला आहे. कुठल्याच गोष्टीत त्याचं मन लागत नाही. तो कुणाशी नीट बोलत नाही, आमच्यात पूर्वीसारखा मिसळत नाही. सतत काहीतरी विचारात हरवलेला असतो. पूर्वीचा हसरा, उत्साही आणि प्रत्येकाला हसवणारा झुबिन आता राहिलेला नाही.
मी झुबिनला खूप समजावून त्याचं लक्ष पुन्हा अभ्यासाकडे वळवलं आहे. आमच्यासाठी हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. फायनल परीक्षा अगदी तोंडावर आली आहे.
तुला सोडून आल्यापासून त्यालाही चैन पडलेली नाही, निराश असतो. त्याच्या घरचे खूप ऑर्थोडॉक्स आहेत. तुमच्या नात्याला ते सहजपणे मान्यता देणार नाहीत, याची त्याला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच तो परिस्थितीला घाबरला आहे. तो तुझ्यापासून पळाला असेल, पण तुझ्या प्रेमाचा विश्वासघात करून तरी नाही.
म्हणून त्याच्यावर राग धरू नकोस. त्याला समजून घे. तुझी जशी अवस्था झाली आहे, तशीच त्याचीही झाली आहे. फक्त तो ती भावना मनात दाबून ठेवतो आहे.
खरं तर परीक्षा संपल्यानंतर आम्ही तिघेही गोव्याला येऊन तुला भेटणारच होतो. झुबिनने तुमच्या भविष्याबद्दल काहीतरी योजना आखली आहे. ती नेमकी काय आहे, हे मलासुद्धा माहीत नाही. ती फक्त तोच तुला सांगू शकेल.
असं कर, तुझ्या मावशीच्या घरचा फोन नंबर मला दे. मी आजच झुबिनशी रात्री बोलतो. तो  उद्या तुला फोन करेल. मग तुम्ही दोघं निवांतपणे बोलू शकता.”
माझं बोलणं ऐकून कॅरोल काही क्षण गप्प बसली. तिच्या डोळ्यांत आशा आणि काळजी दोन्ही दिसत होत्या.
शेवटी ती हळू आवाजात म्हणाली,
“ओम..तू हे खरं बोलतो आहेस ना?”
“होय..अगदी खरं,” मी उत्तर दिलं. “तुला माझ्यावर विश्वास नसेल तर हा माझा घरचा फोन नंबर लिहून घे.”
तिने लगेच पर्समधून एक छोटा कागद आणि पेन काढलं. मी नंबर सांगत गेलो आणि ती तो काळजीपूर्वक लिहून घेत राहिली.
नंबर लिहून झाल्यावर तिने तो पुन्हा एकदा तपासला. मग माझ्याकडे पाहिलं.
त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी थोडंसं समाधान दिसत होतं. काही वेळापूर्वी अस्वस्थ दिसणाऱ्या तिच्या डोळ्यांत आता आशेचा एक नवा किरण चमकत होता.
कॅरोल फोन नंबर लिहित असताना मी तिच्याकडे बारकाईने पाहत होतो.
गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर आनंदाने धावणारी, सतत हसणारी आणि प्रत्येक गोष्टीत उत्साह दाखवणारी, झुबिनला गोड आवाजात प्रेमाने हाक मारणारी तीच मुलगी आज माझ्यासमोर उभी होती पण तिच्या डोळ्यांतील चमक कुठेतरी हरवली होती.
तिच्या चेहऱ्यावरचा थकवा केवळ प्रवासाचा नव्हता.
तर तो प्रतीक्षेचा होता.तो विरहाचा होता.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो अनिश्चिततेचा होता.
झुबिन तिला भेटेल की नाही ?, त्याच्या मनात अजूनही तिच्यासाठी जागा आहे की नाही ?, त्यांच्या नात्याचे पुढे काय होणार ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ती शेकडो किलोमीटरचा प्रवास करून मुंबईत आली होती.
म्हणूनच जेव्हा मी तिला, झुबिन अजून सुद्धा तुझी आठवण काढतोय असे सांगितले, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आलेले समाधान मी विसरू शकणार नव्हतो.
ते समाधान एखाद्या प्रेमात पडलेल्या मुलीचे नव्हते. तर ते अनेक दिवस अंधारात भरकटत असताना अचानक दूरवर दिसलेल्या प्रकाशकिरणाने दिलेल्या आश्वासक धीरासारखे होते. जणू दिशाहीन भटकणाऱ्या नौकेला अखेर किनारा दिसावा आणि जीवात नवी उमेद संचारावी, तसे काहीसे तिच्या मनात घडत होते.
                                                                                                                                                                                 क्रमशः - एपिसोड 5

📖 ही "सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा" मालिकेचा चौथा भाग आहे. संपूर्ण कथा समजून घेण्यासाठी मागील भागही अवश्य वाचा.
     

🔗सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा - दोन मनांचे पुनर्मिलन (भाग ५)|हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा👉

          कधी कधी प्रेमाला शब्दांची गरज नसते. विरह, अंतर आणि काळ यांच्या पलीकडे जाऊनही काही नाती मनात जिवंत राहतात. कॅरोलच्या मनातील प्रेमाने तिला गोव्याहून मुंबईपर्यंत आणले होते, तर झुबिनच्या मनातही तिच्या आठवणी अजून ताज्याच होत्या.
      या भेटीने त्यांच्या आयुष्यात आशेचा एक नवा किरण निर्माण केला होता. पण पुढचा प्रवास अजून सोपा नव्हता. परीक्षा, कुटुंबाचा विरोध आणि भविष्याबद्दलचे अनेक प्रश्न अजूनही त्यांच्या समोर उभे होते.झुबिन कॅरोलला फोन करेल का? त्यांची भेट होईल का? आणि त्यांच्या प्रेमकथेचे पुढे काय होणार?दोन मनांचे पुनर्मिलन होणार का ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचा पुढील 5 वा भाग...
      
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.


तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो






📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook






टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...