मुख्य सामग्रीवर वगळा

सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा | आठवणींच्या सावलीत | भाग ३ | भावनिक मराठी प्रेमकथा

अस्वीकरण-

    ही कथा लेखकाच्या आठवणी आणि अनुभवांवर प्रेरित असली तरी गोपनीयता जपण्यासाठी सर्व पात्रांची नावे, गावाचे नाव, हॉटेलचे नाव आणि ओळख पटवू शकणारे इतर तपशील बदलण्यात आले आहेत. कथेतील काही प्रसंग साहित्यिक मांडणीसाठी विस्ताराने वर्णन केलेले आहेत. या कथेतील कोणतेही पात्र, संस्था किंवा घटना प्रत्यक्ष व्यक्ती अथवा ठिकाणाशी जुळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

           सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा – आठवणींच्या सावलीत ,  भाग 3|भावनिक मराठी प्रेमकथा..

सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा | आठवणींच्या सावलीत | मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी भाग ३ | भावनिक मराठी प्रेम
सुशेगाद गोव्याच्या वाटेवर प्रेम अलगद फुललं,
काळाच्या वादळातही त्याचं अस्तित्व टिकून राहिलं.|
विरहाने जखमा दिल्या, आठवणींनी आधार दिला,
आणि शेवटी दोन मनांनी एकाच स्वप्नाला किनारा दिला ||

  🔗 सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा - भाग २ : पलायन, गोंधळ आणि विरह ( एपिसोड- २)

      सुशेगाद गोव्यातील निसर्गरम्य वातावरणात फुललेल्या प्रेमकथेने अनपेक्षित वळण घेतले. कॅरोलच्या लग्नाच्या स्वप्नांपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी झुबिन, फरहाद आणि होमी यांनी आखलेली मध्यरात्रीची पलायन योजना, मित्रांचे धाडस, ज्युली मॅडमचा संताप, पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलेले प्रकरण आणि शेवटी झालेला विरह. वाचा एका संस्मरणीय गोवा प्रवासातील प्रेम, मैत्री, नाट्य आणि भावनांनी भरलेला दुसरा भाग वाचला असेलच आता पुढचा भाग 3..

सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा – आठवणींच्या सावलीत ,  भाग 3|भावनिक मराठी प्रेमकथा..

     कॉलेजमध्ये परतल्यानंतर ट्रेनिंगच्या आठवणी, नात्यांमधील गुंतागुंत आणि झुबिनच्या मनात पुन्हा जागी झालेली कॅरोलची ओढ...
    मराठी प्रेमकथा आवडणाऱ्या वाचकांसाठी ही कथा प्रेम, विरह, मैत्री आणि आठवणींच्या भावविश्वात घेऊन जाणारी आहे. गोव्यातील अविस्मरणीय दिवस संपल्यानंतर झुबिन पुन्हा कॉलेजच्या आयुष्यात परततो; पण मन मात्र कॅरोलच्या आठवणींमध्येच अडकून राहते. काळ पुढे सरकत असला तरी काही नाती आणि काही क्षण मनातून कधीच पुसले जात नाहीत. या भागात आठवणी, भावनिक संघर्ष आणि पुन्हा उमलणाऱ्या प्रेमाची चाहूल अनुभवायला मिळेल.
मागील भाग 2 वरून आहे..
        
   गोव्यातून परतल्यावर दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर आम्ही पुन्हा कॉलेजच्या लेक्चर्सना उपस्थित राहिलो. आमच्या बॅच को-ऑर्डिनेटर मनदीप कौर मॅडम यांनी सर्वांचे सुरक्षित परतल्याबद्दल अभिनंदन केले. त्यानंतर प्रत्येकाला त्यांनी  इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंगचे अनुभव थोडक्यात सांगण्याची संधी दिली.
       सुरुवात होमीपासून करण्यात आली. तो दिव्यांग विद्यार्थी असल्यामुळे शिक्षकांपासून मुलींपर्यंत सर्वजण त्याच्यावर विशेष प्रेम करायचे. त्यात त्याची मोठी बहीण पेरीन ही सुद्धा आमच्या वर्गात असल्याने त्याच्याबद्दल सगळ्यांनाच आपुलकी वाटायची. त्यामुळे तो वर्गातील सर्वांचा लाडका ‘भाऊराया’ बनला होता. बहिणी सोबत जवळपास सगळेच त्याला ‘ब्रदर होमी’ म्हणून हाक मारायचे.
      खरे तर त्याला ते संबोधन फारसे आवडत नसे, पण ही व्यथा तो कोणाला सांगणार? त्याच्या मनातील ती खंत फक्त मलाच जाणवायची. बहिणीच्या उपस्थितीमुळे त्याच्या वागण्यात एक प्रकारचा संकोच असायचा. तो कायम तिच्या नजरेखाली असल्यासारखा वावरायचा.मात्र कॉलेजच्या बाहेर पडताच आमचा हा ‘सीसीटीव्ही’ एकदम सक्रिय व्हायचा आणि दिवसातील सगळ्या घडामोडींचे अपडेट आम्हाला रंगवून सांगायचा.
      होमी बोलण्यासाठी उभा राहिला. अपेक्षेप्रमाणे त्याने ट्रेनिंगमधील कामकाजापेक्षा गोव्याचे समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य आणि तेथील वातावरण यांचे वर्णन सुरू केले. तो इतका रंगून गेला होता की जणू काही ट्रेनिंग रिपोर्ट नव्हे तर प्रवासवर्णनच सादर करत होता.
       तेव्हा मनदीप कौर मॅडम हसत इंग्रजीत म्हणाल्या, "Beta Homi, you're a chef, not an author, writer, or poet. Focus on sharing your training experience."
        एका अर्थी मॅडमचे म्हणणे योग्यच होते. हॉटेल मॅनेजमेंट किंवा कॅटरिंगच्या ट्रेनिंगमध्ये विद्यार्थ्यांनी किचन ऑपरेशन्स, टीमवर्क, टाइम मॅनेजमेंट, गेस्ट हँडलिंग, फूड सेफ्टी आणि प्रत्यक्ष कामातील अनुभव याबद्दल बोलणे अपेक्षित असते.
   यानंतर मॅडम पुढे म्हणाल्या, "द्रोणाचार्यांनी जेव्हा आपल्या शिष्यांना पोपटाचा डोळा दिसतो कां ? असे विचारले, तेव्हा बहुतेकांना झाड, फांद्या आणि आजूबाजूच्या अनेक गोष्टी दिसत होत्या. पण अर्जुनला फक्त पोपटाचा डोळा दिसत होता. मला सुद्धा तुमच्याकडून विषयाबाहेरच्या गोष्टी ऐकायच्या नाहीत. तुमच्या ट्रेनिंगचा अनुभव ऐकायचा आहे."
      हे बोलताना त्यांची नजर झुबिनच्या दिशेने वळली. दुसऱ्या बाजूला बसलेल्या शेफाली आणि जुईलीकडेही त्यांनी अर्थपूर्ण कटाक्ष टाकला. त्यानंतर त्या म्हणाल्या, "विषयाबाहेरच्या काही गोष्टींबाबत प्रिन्सिपल सर काही मुला-मुलींशी लवकरच चर्चा करणार आहेत."
      मॅडमचे बोलणे ऐकताच माझ्या मनात एकच विचार चमकून गेला ‘लव्ह स्टोरी इन गोवा’ या चित्रपटाची स्क्रिप्ट कॉलेजपर्यंत पोहोचलेली दिसतेय!
      सर्वांनी आपापले अनुभव सांगितले. अखेर माझी पाळी आली.मी म्हणालो, "हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याची आवड आणि कौशल्य जाणून घेतले. माझी नियुक्ती तंदूर शेफ म्हणून तंदूर सेक्शनमध्ये करण्यात आली होती. खरे तर गोवा तंदूरी पदार्थांसाठी फारसा प्रसिद्ध नाही. तेथील ओळख मुख्यतः सी-फूडमुळे आहे. तरीही अनेक पर्यटक आणि स्थानिक ग्राहक तंदूरी पदार्थांची मागणी करतात. त्यामुळे माझ्यासोबत काम करणाऱ्या कुक्सकडून मी 'रेचादो मसाला' लावून तंदूरमध्ये बार्बेक्यू केलेली मासळी तसेच गोवन शैलीतील चिकन कॅफ्रियल तयार करण्याचे कौशल्य शिकलो."माझे बोलणे संपताच मनदीप कौर मॅडम म्हणाल्या, "Perfect answer!"
       त्यानंतर नंबी, फरहाद, आंद्रे, पीटर, सोमेश्वर आणि इतर विद्यार्थ्यांनीही आपापल्या विभागातील अनुभव सांगितले.आता फक्त झुबिन बाकी होता.त्याच्याकडे पाहत मॅडम म्हणाल्या, "झुबिनजी..आप बोलते रहिए..हम सुनते रहेंगे.. चलो, स्टार्ट करो."
      मनदीप मॅडम स्वभावाने अतिशय फ्रेंडली होत्या. त्या विद्यार्थ्यांमध्ये मिसळून वावरणाऱ्या आणि नेहमी हसतमुख असायच्या. त्यांना आम्ही कधीही तुसडेपणाने बोलताना पाहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या आवाजातील तो उपरोधिक सूर आमच्यासाठी पूर्णपणे नवीन होता.मुलींच्या रांगेत तर सगळ्यांची तोंडे 'आ' वासलेली होती. त्यांच्या चेहऱ्यांवर एकच प्रश्न स्पष्ट दिसत होता हे काय घडते आहे?
'झुबिनशी मॅडम अशा कशा काय बोलू शकतात ?'
     मॅडम आणि झुबिन यांच्यातील संवादानंतर मुलींच्या बाजूला कुजबुज आणि चुळबुळ सुरू झाली. सर्वजणी एकमेकींकडे पाहत काहीतरी चर्चा करत होत्या.तेवढ्यात झुबिन उठून म्हणाला, "मॅडम, माझी तब्येत ठीक नाही. थोडं अस्वस्थ वाटतंय."असे म्हणत तो पुन्हा खाली बसला.मॅडम त्याच्याकडे पाहत म्हणाल्या, "तुझी तब्येत नेमकी कधी बिघडू शकते, हे संपूर्ण वर्ग सांगू शकेल."वर्गात हलकासा हशा पिकला. तेव्हा झुबिनने मान खाली घातली. "ठीक आहे," मॅडम म्हणाल्या आणि त्यांनी विषय तिथेच थांबवला.
      आता मुलींची पाळी आली. आमच्या वर्गातील बावीस मुली दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंगसाठी गेल्या होत्या. त्या एकामागोमाग एक आपले अनुभव सांगू लागल्या.
      सर्वप्रथम होमीची बहीण पेरीन उभी राहिली. तिच्यानंतर सुप्रिया, प्राची, वैखरी, शुभदा आणि इतर मुलींनी त्यांच्या ट्रेनिंगमधील अनुभव कथन केले.मात्र शेफाली आणि जुईली यांना मॅडमने मुद्दाम शेवटसाठी राखून ठेवले होते.जरी मनदीप कौर मॅडम बॅच को-ऑर्डिनेटर असल्या तरी वर्गातील घडामोडींची त्यांना नेहमीच अचूक माहिती असायची. त्यांच्या नकळत फार कमी गोष्टी घडायच्या.  मुलांच्या बाजूला होमी आणि मुलींच्या बाजूला पेरीन हे त्यांच्या विश्वासातील विद्यार्थी असल्याचा माझा तरी ठाम समज झाला होता. वर्गात काय सुरू आहे, कोण कुणाशी बोलते आहे आणि कोणत्या गोष्टींची चर्चा चालू आहे, याची खबर त्यांच्यापर्यंत वेळेवर पोहोचत असावी, असा माझा अंदाज होता.
        शेवटी मॅडमने शेफाली आणि जुईली या दोघींना एकत्र उभे केले."चला, आता तुम्ही सांगा. ट्रेनिंगमध्ये काय शिकलात? तुमचे अनुभव काय आहेत?"जुईली उठली खरी, पण तिची नजर नकळत झुबिनकडे वळू लागली.ते पाहताच मॅडम म्हणाल्या, "जुईली, मला अनुभव सांगायचा आहे, झुबिनला नाही."क्षणात संपूर्ण वर्गात हशा पिकला. त्यात होमीचा आवाज इतरांपेक्षा जरा जास्तच उठून दिसत होता.
मॅडमने लगेच वर्गाकडे पाहिले.
      "मी हे सगळं ॲक्ट म्हणून करत नाही. त्यामुळे ही हसण्यासारखी गोष्ट नाही."
त्यांच्या आवाजातील कठोरपणा स्पष्ट जाणवत होता. कालपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये मिसळून वावरणाऱ्या, हसतखेळत शिकवणाऱ्या मनदीप मॅडम आज पूर्णपणे वेगळ्याच भासत होत्या.
      मी मनात विचार करू लागलो. 'लव्ह स्टोरी इन गोवा' आणि ' कॉर्रेल इन फाइव्ह स्टार' या दोन्ही घटनांच्या चर्चा कॉलेजपर्यंत पोहोचल्या आहे तर. या घटनांवरून प्रिन्सिपॉल सरांना असे दिसून आले असावे की विद्यार्थी हे मनदीप मॅडमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात म्हणुन त्यांनी मॅडमची बहुतेक कानउघडणी  केली असावी.
     कोणी त्यांचा थेट अपमान केला नव्हता. मात्र या दोन्ही प्रसंगांमुळे कॉलेजची प्रतिमा मलिन झाल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली असावी. निदान त्या क्षणी तरी मला तसेच वाटत होते.
      शेफाली आणि जुईली दोघीही उभ्या होत्या, पण बोलण्याची त्यांची काहीच तयारी दिसत नव्हती.मॅडम त्यांच्याकडे पाहत म्हणाल्या, "असं दिसतंय की तुमचीही तब्येत आज फारशी ठीक नाही."मुलींच्या रांगेतून हलकासा हशा उमटला.अखेर शेफालीने धीर करून उत्तर दिले, "मॅडम, माझी पहिली पोस्टिंग बेकरी सेक्शनमध्ये नंतर गार्द मॉन्जे मध्ये होती."
"ओके," मॅडम म्हणाल्या. मग त्यांनी जुईलीकडे पाहिले.
"जुईली, तू कुठे होतीस?"
जुईलीने हळू आवाजात उत्तर दिले, "मॅडम, मीसुद्धा बेकरी सेक्शनमध्ये आणि नंतर गार्द मॉन्जे होती."
क्षणभर शांतता पसरली.
      मॅडमने भुवया उंचावत मिश्कीलपणे म्हटले, "वा !.. एक म्यान में दो तलवार!"
आणि त्याबरोबर संपूर्ण वर्गात जोरदार हशा पिकला. मुलं-मुली एकमेकांकडे पाहत हसू लागली. काही जणींनी तर चेहऱ्यावर हात ठेवून हसू दाबण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे यावेळी मॅडमच्या चेहऱ्यावरही हलकेसे स्मित उमटलेले दिसले. काही क्षणांपूर्वी वर्गावर दडपण आणणाऱ्या त्या, पुन्हा आपल्या जुन्या मिश्कील आणि फ्रेंडली रूपात परतल्यासारख्या वाटत होत्या.
 "हं..आता सांगा, तिथे नेमकं काय विशेष शिकलात?" मॅडमने विचारलं.
शेफाली म्हणाली, "मॅडम, आम्ही केक बनवायला शिकलो."
जुईलीने तिच्या बोलण्याला दुजोरा दिला.
"आणि आयसिंग बनवून केकवर कसं सजवायचं तेही शिकलो."
मॅडम शांतपणे म्हणाल्या, "हे तर आपल्या कॉलेजच्या बेकरी सेक्शनमध्येही शिकवलं जातं. मला सांगा, तिथे काही विशेष काय शिकलात?"
दोघीही गप्प राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती.
ते पाहून मॅडम म्हणाल्या, "बरोबर. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊच शकणार नाही. कारण तुमचं लक्ष कामात नव्हतंच मुळी. तुमचं लक्ष एकमेकींवर राग धरण्यात आणि वाद घालण्यात जास्त होतं."
संपूर्ण वर्ग शांत झाला.
     मॅडम पुढे म्हणाल्या, "तिथे तुम्ही टीम म्हणून काम केलं नाही. उलट एकमेकींचं काम कसं बिघडेल, याकडेच जास्त लक्ष दिलंत. तुमचे प्रोग्रेस रिपोर्ट्स माझ्याकडे आले आहेत. त्यात स्पष्टपणे नमूद केलं आहे की टीमवर्कच्या बाबतीत तुमची कामगिरी समाधानकारक नव्हती."शेफाली आणि जुईली दोघीही मान खाली घालून उभ्या होत्या.
      "कॉलेजच्या बाहेर गेल्यावर तुम्ही सगळ्या एकत्र राहण्याऐवजी गटबाजी केलीत. आणि बाकीच्या मुलींबरोबर तुम्ही कधी एकत्र आल्या की तुमच्या मध्ये एका विशिष्ट विषयावरून वारंवार वाद असायचा. तो विषय नेमका कोणता होता, हेही आता मला समजलं आहे."
हे बोलताना त्यांनी डोळ्याच्या कोपऱ्यातून झुबिनकडे एक कटाक्ष टाकला.
तो कटाक्ष इतका बोलका होता की त्यानंतर वर्गात कुणालाही काही विचारण्याची गरज उरली नव्हती.
      "आता उद्या प्रिन्सिपल सर काही मोजक्या विद्यार्थ्यांची परेड घेणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. कॉलेजचे शेवटचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे कोणीही गैरहजर राहू नये. तुमच्या इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंगचा लेखी अहवाल परवा सादर करायचा आहे. त्यानंतर दोन आठवड्यांत व्हायवा, प्रॅक्टिकल परीक्षा, ॲन्युअल गॅदरिंग, फूड फेस्टिव्हल आणि फायनल परीक्षा असतील. उद्या टाइमटेबल लावण्यात येईल."इतकं सांगून मनदीप मॅडम वर्गातून बाहेर पडल्या.
      झुबिन मात्र आपल्या जागेवरच उभा राहिला. त्याचे पाय जणू काही जड झाले होते. समोर शेफाली आणि जुईली उभ्या होत्या. दोघींची नजर झुबिनवर खिळलेली होती, तर त्याची नजर त्यांच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत होती.कॉलेज सुटल्यानंतर आम्ही सगळे नेहमीप्रमाणे घोळक्याने बाहेर पडू लागलो. मुलींचेही वेगवेगळे गट गप्पा मारत गेटकडे जात होते.
       अचानक त्या घोळक्यातून शेफाली आणि जुईली तडक झुबिनकडे आल्या. त्यांच्या मैत्रिणी काही अंतरावर थांबून काय घडतंय ते पाहू लागल्या. वातावरणात एक विचित्र तणाव पसरला होता.शेफालीने थेट प्रश्न केला."तू आम्हा दोघींना झुलवतोयस का ? एकदाचा निर्णय घे. मी की जुईली?"झुबिनने त्रासलेल्या नजरेने दोघींकडे पाहिले."कॉलेज संपल्यावर ठरवू. सध्या मी त्या मनःस्थितीत नाही."इतकंच बोलून त्याने स्वतःला त्या प्रसंगातून बाजूला काढलं. मोटारसायकलला किक मारली आणि काही क्षणांत तो नजरेआड झाला.
       शेफाली आणि जुईली दोघीही त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तिथेच उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर राग, अपेक्षा, अस्वस्थता आणि अनिश्चितता यांचं विचित्र मिश्रण दिसत होतं.त्या दोघींच्या मनात एक गोष्ट मात्र समान होती."त्या दोघींच्या नजरेत झुबिनबद्दल काहीतरी खास भावना असल्याचे स्पष्ट झाले होते."आणि म्हणूनच त्याला गमावण्याची भीती त्यांना सतावत होती.
       दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपल सरांनी झुबिन,मला, आंद्रेला, होमी, फरहाद आणि तीन गोवन विद्यार्थ्यांना केबिनमध्ये बोलावले.प्रिन्सिपल नवरोज चटईवाला हे होमी आणि झुबिनच्या कुटुंबाचे जुने परिचित होते. गोव्यात घडलेल्या घटनांची त्यांना सविस्तर माहिती मिळाली होती. त्यांनी ही बाब झुबिनच्या घरच्यांपर्यंतही पोहोचवली होती.
      झुबिन गोव्यात ज्युली मॅडमच्या तावडीतून सहीसलामत बाहेर पडला होता, पण त्या घटनेचे पुढील परिणाम टाळणे त्याच्या हातात नव्हते. त्याच्यावर कोणतीच कठोर कारवाई होणार नाही, याची आम्हाला कल्पना होती. मात्र गोव्यात कॉलेजचे नाव चर्चेत आल्यामुळे त्याला चांगलाच दम मिळणार, हे निश्चित होते.
    प्रिन्सिपल सर त्याच्यावर स्पष्टपणे नाराज होते."तुझ्यामुळे होमी, फरहाद आणि इतर मुलांना त्रास झाला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार होता?" ते कठोर आवाजात म्हणाले."या मुलांनी योग्य वेळी सावधगिरी बाळगली म्हणून तुम्ही सर्वजण सुरक्षितपणे घरी परतलात. आणि कॉलेजमध्ये परत आल्यावरही तुझं वर्तन फारसं जबाबदार वाटत नाही. तुझ्या या वागण्यामुळे कॉलेजची आणि अप्रत्यक्षपणे आमचीही बदनामी होत आहे."
      झुबिन शांतपणे मान खाली घालून त्यांचे बोलणे ऐकत होता.नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रिन्सिपल सरांचा स्वर थोडा मवाळ झाला. त्यांनी माझ्याकडे, आंद्रेकडे आणि इतर मुलांकडे पाहिले.
     "तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानतो. तुम्ही योग्य वेळी समजूतदारपणा दाखवला नसता तर मोठा बाका प्रसंग ओढवला असता."त्यांच्या त्या शब्दांनंतर आम्ही एकमेकांकडे पाहिले. गोव्यात घडलेल्या घटनांचा अध्याय संपला नव्हता, पण निदान त्याचे गंभीर परिणाम टळले होते, एवढे मात्र निश्चित होते.
       कॉलेजमध्ये झुबिन बद्दलच्या चर्चा अजूनही सुरू होत्या. गोव्यावरून परत आल्यापासून तो नाराज आणि हरवलेला वाटत होता. पूर्वीसारखा सतत हसणारा, गप्पा मारणारा झुबिन आता बराच शांत झाला होता.त्या दिवशी कॉलेज सुटल्यानंतर तो मुद्दाम थोडा रेंगाळला.आम्हाला थांबण्याची खूण केली. होमी आणि फरहाद निघून गेल्यावर तो मला आणि आंद्रेला जवळच्या टपरीवर चहा प्यायला घेऊन गेला.
चहाचा कप हातात घेत तो काही क्षण शांत बसला. शेवटी तो म्हणाला,
"मला तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे. माझं कॅरोलवर प्रेम आहे."
      आम्ही दोघेही शांतपणे त्याच्याकडे पाहत होतो.तो पुढे म्हणाला, "हो.. मी तिच्याशी विश्वासघात केलाच. परिस्थिती काय होती, हे तुम्हाला पुन्हा सांगायची गरज नाही. पण जर मी त्या वेळी कबूल केलं असतं की माझं तिच्यावर प्रेम आहे, तर तुम्हीही माझ्या मागे लागला असता की तिच्याशी लग्न कर, नातं पुढे ने."
त्याने दीर्घ श्वास घेतला.. "जे झालं ते चुकीचं होतं, याची मला जाणीव आहे. त्याचा मला पश्चात्तापही आहे. पण एक गोष्ट ठरवली आहे."
तो क्षणभर थांबला.
      "जर मला शोधत कॅरोल इथपर्यंत आली, तर मी समजेन की तिचं माझ्यावर खरंच जिवापाड प्रेम आहे. आणि तसं झालं तर मी तिला कधीच सोडू शकणार नाही. माझ्या ऑर्थोडॉक्स कुटुंबाचा कितीही विरोध झाला तरी."त्याच्या आवाजात पहिल्यांदाच ठामपणा जाणवत होता."पुढे काय करायचं ते मी ठरवलं आहे. फक्त ही गोष्ट तुम्ही कुणालाही सांगू नका."काही क्षण शांतता पसरली.मग तो हळू आवाजात म्हणाला,
   "मला कॅरोलची खूप आठवण येते आहे."
                                                                                                                                                                                      क्रमशः.. एपिसोड 4

📖 ही "सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा" मालिकेचा तिसरा भाग आहे. संपूर्ण कथा समजून घेण्यासाठी मागील भागही अवश्य वाचा.

   🔗सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा - विरहाच्या पलीकडे : आशेचा किरण (भाग ४ )|हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा..

    गोव्यातील विरहानंतर कॅरोल झुबिनला भेटण्यासाठी मुंबईत येते. प्रेम, प्रतीक्षा, परीक्षा आणि आशेच्या किरणाने उजळलेली ही भावनिक प्रेमकथा वाचा..   
   गोव्यातील त्या पाच महिन्यांनी आमच्या आयुष्यात अनेक बदल घडवून आणले होते. काही नाती अधिक घट्ट झाली, काही गैरसमज अधिक गहिरे झाले, तर काही निर्णय अजूनही काळाच्या स्वाधीन होते. झुबिनच्या मनात कॅरोलची आठवण दिवसेंदिवस अधिक तीव्र होत होती. परंतु नियतीने त्यांच्या प्रेमकथेकरिता पुढे काय वाढून ठेवले होते,देव जाणे ? पुढे काय घडले हे जाणून घेण्यासाठी वाचा पुढील भाग 4 वाचा...👉


✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.

तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो





📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...