अस्वीकरण -
"ही कथा काल्पनिक आहे. पात्रे, स्थळे, संस्था आणि घटना काल्पनिक असून कोणत्याही वास्तविक व्यक्ती, संस्था किंवा घटनेशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा."
लकी बिर्याणी हाऊस - हरवलेला मित्र |भाग 1
झळ दिली नशिबाने,
तरी स्वप्नांची ज्योत विझली नाही,
अंधाऱ्या गल्लीत जन्म झाला,
म्हणून ओळख कधी बदलली नाही.
🔗रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | भीतीवर लोकशाहीचा विजय (भाग 7)
रक्ताचा एक थेंबही न सांडता,शांतपणे एका राष्ट्राने हुकूमशाहीवर विजय मिळवून लोकशाहीची पुनर्स्थापना कशी केली? 'रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट' या मालिकेच्या अंतिम भागात वाचा भीतीवर मात, शांततापूर्ण सत्तांतर आणि इतिहास बदलणाऱ्या एका विलक्षण मानसशास्त्रीय मोहिमेची प्रेरणादायी सांगता. तो भाग वाचला नसेल तर आतच वाचून घ्या,नंतर वाचा पुढील कथा...
'लकी बिर्याणी हाऊस - हरवलेला मित्र भाग 1'
'लकी बिर्याणी हाऊस' ही फक्त कथा नाही..एका जिद्दीची गाथा ठरते.
सन १९८५ या वर्षातील कॉलेज जीवनाची पहिली सुरुवात ,कॉलेज मैत्री,स्लॉट गेमिंग मशीन पार्लर, कामाठीपुरा आणि संघर्षमय वास्तवावर आधारित हृदयस्पर्शी मराठी कथा आहे. 'गौरीशंकर' आणि त्याच्या आयुष्यातील वेदनादायी वास्तवातून मैत्री, स्वाभिमान आणि समाजाचे कठोर सत्य उलगडत जाते. शब्दांची मुशाफिरी या ब्लॉगवरील ही कथा वाचकांना भावनिक प्रवास घडवते..
मी १९८५ रोजी शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन दक्षिण मुंबईतील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला. नुकतेच शाळा संपवून कॉलेजमध्ये आल्यामुळे हिंदी आणि मराठी ही दोन विषय सोडले तर इतर सर्व विषय इंग्रजी माध्यमातून शिकवले जात होते.
सुरुवातीच्या काही महिन्यांत कॉलेजमधील त्या विषयांचे प्रत्येक लेक्चर माझ्यासाठी अक्षरशः बाऊन्सर ठरत होते. वर्गात काय शिकवले जात आहे, हेच मुळी काही समजत नसे. एखादा-दुसरा परिचित इंग्रजी शब्द कानावर पडायचा तेव्हढेच बाकी सर्व काही डोक्यावरून जायचे. इंग्रजी माध्यमातून आलेली मुले मात्र प्राध्यापकांचे बोलणे ऐकत ऐकत भराभर नोट्स लिहून घेत असत. मी आणि माझा मित्र गौरीशंकर मात्र त्यांच्याकडे हताशपणे पाहत बसायचो. ऐकून समजणे तर दूरच, पण त्याच वेळी नोट्स लिहिणेही आम्हाला फार कठीण जात होते.
काळ जसजसा पुढे सरकला, तसतसे रोज कानावर पडणाऱ्या इंग्रजीमुळे माझ्यात हळूहळू सुधारणा होऊ लागली. प्राध्यापकांचे बोलणे थोडेफार समजू लागले. पण गौरीशंकरची परिस्थिती मात्र तशीच होती. त्याला अजूनही लेक्चरमधले फारसे काही कळत नव्हते.
एकदा मी त्याला म्हणालो, "अरे, दुसऱ्या दिवशी जो धडा शिकवणार जाणार आहे. तो आधी एकदा वाचून घेतलास, तर त्या विषयाची साधारण तरी तुला कल्पना येईल. मग वर्गात प्राध्यापक काय शिकवत आहेत, ते समजायला तुला खूप सोपे जाईल."
त्यावर तो हसत म्हणाला, "कॉलेजच्या वेळेव्यतिरिक्त अभ्यासासाठी वेळ काढणे माझ्यासाठीच फारच अवघड आहे आणि जरी वेळ मिळालाच, तरी शांतपणे बसून वाचता येईल अशी जागा घरी नाही. कॉलेजच्या लायब्ररीत जावं तर तिथे नेहमीच सर्व जागा भरलेल्या असतात. कधीतरी नशिबाने एखादी सीट मिळाली तरच अभ्यास करता येतो."
आम्ही दोघे नेहमी मुलांच्या शेवटच्या रांगेत बसायचो. शेवटच्या बाकावर बसण्याचं एकच समाधान होतं.प्राध्यापक सहसा तिथल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत नसत. कॉलेजचे वर्ग शाळेतील वर्गांपेक्षा खूप मोठे असल्यामुळे मागच्या बाकापर्यंत त्यांचं विशेष लक्ष जात नसे.
यदाकदाचित मला जर प्रश्न विचारला गेलाच तर मी हळूच समोरच्या पुस्तकात डोकावून उत्तराचा अंदाज घेत असे. पण गौरीशंकर मात्र मोठे डोळे आणि तोंड उघडे ठेवून प्राध्यापकांचे बोलणे ऐकत बसलेला असायचा. त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ आणि असहायता स्पष्ट दिसायची. त्याची मला मनापासून कीव यायची, कारण तो नेहमीच एकच वाक्य म्हणायचा.
"अरे, मला काहीच समजत नाही रे, मी काय करू ?.."
कॉलेजच्या प्रत्येक मधल्या सुट्टीत गौरीशंकर मला कॉलेजच्या मागच्या गल्लीत घेऊन जायचा. त्या गल्लीत एक गेमिंग पार्लर होता. त्या दुकानातील भिंतीलगत दहा-बारा स्लॉट मशीन लावलेली असायची. दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ काउंटरवर एकच माणूस बसलेला असायचा. त्याच्याकडेच टोकन विकण्यापासून ते दुकान सांभाळण्यापर्यंतची सर्व कामे असायची. बाकी वेगळा नोकर किंवा कर्मचारी नव्हता.
त्या काळात, म्हणजे साधारण १९८५ साली, किती रुपयांना किती टोकन मिळायची हे आता काही आठवत नाही. पण गौरीशंकर नेहमी काही रुपये देऊन साधारण पंधरा टोकन घ्यायचा. मग तो एखादा गेम निवडून स्लॉट मशीनसमोर उभा राहायचा. मशीनवर टोकन टाकण्यासाठी एक अरुंद खाच असायची. तो त्यात एकामागोमाग एक टोकन टाकत राहायचा आणि त्या मशीन मधून निरनिराळे आवाज यायचे.
सुरुवातीची चार-पाच टोकन काहीही न देता गिळंकृत व्हायची. पण अचानक एखाद्या क्षणी मशीनच्या खालच्या भागातून "ठक..ठक..ठक... ठक.." असा आवाज यायचा आणि टोकनांचा अक्षरशः वर्षाव सुरू व्हायचा. पंधरा टोकन लावून त्याला तीस ते चाळीस टोकन मिळायची. त्यातील वीस ते तीस टोकन तो बाजूला ठेवायचा आणि उरलेली दहा पुन्हा मशीनमध्ये टाकायचा.
गौरीशंकरचं नशीब इतकं जबरदस्त होतं की जवळजवळ रोजच त्याचा फायदा व्हायचा. एकही दिवस असा मला आठवत नाही की तो तिथून तोट्यात बाहेर पडला असेल. उलट प्रत्येक वेळी त्याच्या हातात आधीपेक्षा जास्त टोकन असायची.
माझ्यासाठी मात्र हे सगळंच नवीन होतं. शाळेत असताना आमच्या परिसरात अशी स्लॉट गेमिंग पार्लर्स कधीही मी पाहिली नव्हती आणि जरी असली तरी तो आपला विषय नाही म्हणून कधी त्याचा विचार केला नसावा. दुसरे कारण म्हणजे माझ्या हातात फारसे पैसेही दिले जात नसत. घरच्यांचा साधा नियम होता."लहान मुलांच्या हातात जास्त पैसे दिले, तर ती बिघडतात." त्यामुळे माझ्या खिशात नेहमी मोजकेच पैसे असायचे. गौरीशंकर सोबत मी त्या पार्लर मध्ये जेव्हा जायचा तेव्हा त्या चमचमणाऱ्या मशीनकडे मी केवळ कुतूहलाने पाहत उभा राहत असे, तर गौरीशंकर आत्मविश्वासाने त्यांच्यासोबत आपले नशीब आजमावत असे.
विशेष म्हणजे गौरीशंकर कोणत्याही स्लॉट मशीनवर खेळला, तरी त्याला जवळजवळ नेहमीच फायदा व्हायचा. त्याचं नशीब इतकं जोरावर होतं की मी ते अनेकदा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं.
एकदा तो कॉलेजला आला नव्हता. कुतूहल म्हणून मीही बारा टोकन विकत घेतली आणि एकट्याने मशीनसमोर उभा राहिलो. मनात विचार होता, "आज आपलंही नशीब आजमावून पाहू."
पण झालं अगदी उलट. बारा टोकन टाकल्यानंतर मशीनने मला फक्त पाच टोकन परत दिली. "आता कदाचित पुढच्या खेळात जास्त मिळतील," असा विचार करून ती पाचही टोकन पुन्हा मशीनमध्ये टाकली. पण यावेळी तर मशीनने एकही टोकन परत दिलं नाही. क्षणात माझी सर्व टोकन संपली.
त्या दिवशी मी मनाशी पक्कं ठरवलं कानाला खडा! पुन्हा कधीही अशा कोणत्याही स्लॉट मशीनसमोर नशीब आजमावायचं नाही.पैसे हरवणं आणि पैसे हरणं या दोन गोष्टी मला नेहमीच मनाला टोचणी देतात. गरजेच्या किंवा योग्य कारणासाठी पैसे खर्च झाले, तर त्याचं मला कधीही वाईट वाटले नाही. उलट त्यांचा काही तरी उपयोग झाला याचे समाधानच वाटायचे. पण जुगारात पैसे गमावणं मग तो स्लॉट मशीनचा जुगार असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचा ते हरण किंवा जिंकणे माझ्या मनाला कधीच पटलेलं नाही. मेहनतीने कमावलेल्या पैशाचं नशीबावर लावलेलं दांव मला तेव्हाही मान्य नव्हतं आणि आजही नाहीत.
गौरीशंकर स्वभावाने अतिशय दिलदार होता. त्याला जॅकपॉट लागला की तो कधीही एकट्याने आनंद साजरा करत नसे. खरं तर, त्याला जवळजवळ रोजच काही ना काही जिंकायला मिळायचं. जिंकल्यानंतर त्यातील काही पैसे तो कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये माझ्यावर खर्च करायचा.
सुरुवातीला एक-दोन वेळा मी त्याच्यासोबत कॅन्टीनमध्ये गेलो. पण रोजच दुसऱ्याच्या पैशाने खाणं मला आवडत नव्हतं. माझा स्वाभिमान त्याला आडवा यायचा. त्यामुळे मीच त्याला म्हटलं, "आता कॅन्टीनमध्ये जाणं बंद करू या."
त्यानंतर दुपारच्या सुट्टीत तो मला गेमिंग पार्लरमध्ये घेऊन जाणंही बंद झालं. कॉलेज सुटल्यानंतरच तो तिकडे जायचा. पण संध्याकाळी त्या दुकानात खूप गर्दी होत असल्यामुळे पुढे पुढे दुपारच्या वेळेत तो एकटाच तिथे जाऊ लागला.
एकदा सहज मी त्याला विचारलं, "अरे, एवढे पैसे आणतोस तरी कुठून?"
त्यावर तो शांतपणे म्हणाला, "मी आणि आमच्या भागातला एक मोठा मुलगा मिळून वर्तमानपत्रांची लाईन सुरू केली आहे. रोज सकाळी पाच वाजता उठावं लागतं. घरोघरी वर्तमानपत्रं टाकत नऊ वाजेपर्यंत काम चालतं. त्यानंतर घरी जाऊन आवरून कॉलेजला येतो."हे ऐकून मला त्याच्याबद्दल आणखी आदर वाटला. स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या पैशातून तो खेळायचा, मित्रांवर खर्च करायचा आणि तरीही चेहऱ्यावर कायम हसू असायचं.
मी त्याला त्याच्या घराबद्दल, कुटुंबाबद्दल असे अनेक प्रश्न विचारायचो. तो मात्र प्रत्येक वेळी हसून विषय बदलायचा. शेवटी एकदा तो गंभीर होत म्हणाला,
"एक दिवस तुला माझ्या घरी घेऊन जाणार आहे पण त्यानंतर तू मला मित्र म्हणून स्वीकारशील की नाही, याची मला शंका आहे."त्याचं ते वाक्य ऐकून मी क्षणभर गप्पच झालो. त्याने असं का म्हटलं असेल, हा प्रश्न मात्र माझ्या मनात कायमचा घर करून राहिला.
दिवसामागून दिवस सरत होते आणि आमची मैत्री अधिक घट्ट होत होती.
एके दिवशी गौरीशंकर मला म्हणाला, "आमच्या भागात खूप छान कबाब मिळतात. तुला एकदा खायला घेऊन जातो."त्या काळी "कबाब" हा शब्द ऐकताच माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण व्हायची. आमच्या घरच्या संस्कारांनुसार तो पदार्थ माझ्यासाठी जणू निषिद्धच होता. मी लगेच म्हणालो, "कबाब हा पदार्थ माझ्यासाठी निषिद्ध आहे. मी तो खाऊ शकणार नाही."
तो हसला आणि म्हणाला, "हो, ते माझ्या लक्षात आलं आहे. म्हणूनच मी तुला अशा रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाणार आहे, जिथे खात्रीने बोकडाच्या मटणाचे कबाब मिळतात. ते खायला तुला काही हरकत नसावी."
"बोकडाचे" हे शब्द कानावर पडताच माझी शंका दूर झाली.
"त्यात काही हरकत नाही," मी म्हणालो.
ठरल्याप्रमाणे एका बुधवारी संध्याकाळी आम्ही कबाब खायला जाणार होतो.तिथूनच पुढे त्याच्या घरी जाणार होतो.
बसमध्ये चढल्यावर गर्दी प्रचंड होती. कसाबसा मार्ग काढत आम्ही डबल डेकर बसच्या वरच्या मजल्यावर पोहोचलो. काही वेळाने आम्हा दोघांनाही खिडकीजवळ जागा मिळाली.
बस पुढे धावत होती आणि माझ्या मनात मात्र गौरीशंकरच्या घराचं एक सुंदर चित्र रंगत होतं. मला वाटत होतं.एखादंसं छोटंसं पण टापटीप घर असेल. घरात एखादी प्रेमळ आई स्वयंपाक करत असेल, वडील निवांत बसून वर्तमानपत्र वाचत असतील, एखादी आजी जपमाळ ओढत असेल, आणि मोठी किंवा लहान बहीण घरभर वावरत असेल. अशाच एका साध्या, उबदार कुटुंबाची मी मनोमन कल्पना करत होतो.
खिडकीतून बाहेर पाहताना लक्षात आलं की बस ज्या भागातून जात होती, तो परिसर माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होता. त्या आधी त्या भागात जाण्याचा कधी प्रसंगच आला नव्हता. प्रत्येक चौक, प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक इमारत माझ्यासाठी नवीन होती. मला अजूनही कल्पना नव्हती की काही वेळातच मी अशा वास्तवासमोर उभा राहणार होतो, की ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.
जशी जशी बस त्या भागात शिरू लागली, तसतशी रस्त्यांवरील गर्दी वाढत असल्याचं जाणवू लागलं. तो हिंदू-मुस्लिम लोकवस्तीचा संमिश्र परिसर होता. अरुंद रस्ते, गजबजलेली दुकाने, सततची वर्दळ आणि माणसांचा अखंड ओघ सगळंच माझ्यासाठी नवीन होतं.
काही वेळाने गौरीशंकर म्हणाला, "चल, आलं माझं घर."त्याचं वाक्य ऐकताच आम्ही बसच्या दाराजवळ जाऊन उभे राहिलो. दरवाजातून बाहेर नजर टाकली आणि मी क्षणभर स्तब्धच झालो.
रस्त्याच्या दुतर्फा जुन्या इमारती होत्या. त्यांच्या खाली अनेक स्त्रिया नटून-थटून उभ्या होत्या. काहीजणी येणाऱ्या-जाणाऱ्यांना नजरेने खुणावत होत्या, तर काही पुरुष त्यांच्याशी उभं राहून बोलत होते. जवळजवळ प्रत्येक इमारती खाली असंच दृश्य दिसत होतं.
अशा प्रकारचं वातावरण मी आयुष्यात प्रथमच पाहत होतो. त्यामुळे मी पूर्णपणे गोंधळून गेलो. मनात विचारांचं काहूर माजलं.
"हा गौरी, मला कुठे घेऊन आला आहे? मी डोळ्यांसमोर रंगवलेलं त्याचं साधंसुधं घर इथेच असणार आहे का..की अजून काही वेगळंच वास्तव माझी वाट पाहत आहे?"
इतक्यात कंडक्टरने बेल वाजवली आणि मोठ्याने हाक मारली.
"चला..उतरायचं..कामाठीपुरा!"
"कामाठीपुरा" हे नाव कानावर पडताच मी आणखीच अवाक् झालो. त्या आधी या भागात येण्याचा कधी प्रसंगच आला नव्हता. त्या परिसराविषयी फक्त ऐकिव माहिती होती प्रत्यक्षात मात्र मी पहिल्यांदाच तिथे जाणार होतो.
संपूर्ण वातावरणात कबाब भाजल्याचा दरवळ पसरला होता.कारण तेथील प्रत्येक रेस्टॉरंट आणि रस्त्यावरील ठेले यावर कबाब भाजले जात होते.तो सुगंध माझ्या परिचयाचा होता. आमच्या चिराबाजातील सोनापूर गल्लीत 'शब-ए-बारात'च्या दिवशी कबाबचे अनेक स्टॉल लागायचे आणि संपूर्ण गल्ली अशाच वासाने भरून जायची. अगदी तसाच दरवळ त्या संध्याकाळी माझ्या नाकात शिरला पण यावेळी त्या गंधाबरोबर मनात एक अनामिक अस्वस्थताही दाटून आली होती. आता पुढे काय दिसणार आहे, त्याची कल्पना सुद्धा करता येत नव्हती.
गौरीशंकर एकदा म्हणाला होता की "जर तु माझ्या घरी आलास, तर मला मित्र म्हणून स्वीकारशील की नाही माहीत नाही" असं त्याने का म्हटलं होतं? त्या प्रश्नांचे उत्तर कामाठीपुराच्या त्या गल्लीत माझी वाट पाहत होतं.."
मी त्या दिवशी कामाठीपुरात कबाब खायला जात होतो पण परतताना माझ्यासोबत कबाबची चव नव्हती. सोबत होती एका मित्राच्या आयुष्याची वेदना, त्याचा स्वाभिमान आणि समाजाकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी. त्या संध्याकाळी मी फक्त गौरीशंकरचं घर पाहिलं नाही, तर माणुसकीचा एक अनोळखी चेहराही पाहिला.
गौरीशंकर मला कामाठीपुरातील एका प्रसिद्ध कबाब सेंटरमध्ये घेऊन गेला. बाहेर मोठ्या अक्षरांत एक फलक लावलेला होता
"Strictly No Use of Beef."
गौरीशंकर म्हणाला, "पाहिलंस ना? म्हणूनच तुला इथे मी आणलं."
कबाब खरंच अप्रतिम होते. इतके चविष्ट कबाब मी त्या आधी कधी खाल्ले नव्हते. जेवण झाल्यावर त्याने बिल भरलं आणि सहज म्हणाला,
"चल..आता घरी जाऊ."
रेस्टॉरंटमधून बाहेर पडून आम्ही पुढे चालू लागलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नटून-थटून उभ्या असलेल्या अनेक स्त्रिया दिसत होत्या. त्यांच्यापैकी काहीजणी गौरीशंकरला पाहून हसत हाक मारत होत्या. मला वाटलं, लहानपणापासून तो याच भागात राहतो, शिवाय वर्तमानपत्रांची लाईन असल्यामुळे या परिसरात त्याची ओळख असणं स्वाभाविकच होतं.
आम्ही आणखी पुढे गेलो. एका अरुंद गल्लीत शिरलो. दोन्ही बाजूंना जुन्या चाळींची रांग होती. प्रत्येक चाळीवर आणि प्रत्येक खोलीबाहेर वेगवेगळ्या क्रमांकांच्या पाट्या लावलेल्या होत्या. काही घरांतून मुजऱ्याची गाणी ऐकू येत होती, तर काही ठिकाणी संगीतबद्ध शायरीचे सूर कानावर पडत होते. त्या परिसरात एक वेगळंच वातावरण होतं.
त्या सगळ्या अनोख्या दृश्यांनी माझं बालिश मन अक्षरशः गोंधळून गेलं होतं. प्रत्येक पावलागणिक माझ्या मनात एकच प्रश्न घुमत होता.
"हा गौऱ्या, मला नेमकं कुठे घेऊन चाललाय..?"
मी शांतपणे त्याच्या मागोमाग चालत राहिलो.
शेवटी त्या चिंचोळ्या गल्लीतल्या शेवटच्या टोकाला असलेल्या एका जुन्या चाळीसमोर गौरीशंकर थांबला.
चाळीबाहेर उभ्या असलेल्या काही स्त्रियांनी आमच्याकडे पाहिलं. गौरीशंकरला ओळखल्यासारखं त्या मंद हसल्या. मी मात्र त्याच्या शेजारी गप्प उभा होतो. गौरीशंकर सोबत असल्यामुळे कोणीही आमच्याशी विनाकारण बोलण्याचा किंवा छेडण्याचा प्रयत्न केला नाही.
माझ्या मनात मात्र आता उत्सुकता आणि धडधड दोन्ही वाढत चालल्या होत्या. काही क्षणांतच गौरीशंकरच्या त्या गूढ वाक्याचा अर्थ माझ्यासमोर उलगडणार होता.
"माझ्या घरी आल्यानंतर तू मला मित्र म्हणून स्वीकारशील की नाही, याची मला शंका आहे.."
आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. त्या चाळीतील जवळजवळ प्रत्येक खोलीच्या बाहेर एखाद्या अंगरक्षकाप्रमाणे काही पुरुष उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर सतर्कता होती, जणू ते कोणाचं तरी रक्षण करत उभे होते.
मी हळूच गौरीशंकरला विचारलं, "हे बाहेर उभे असलेले लोक कोण आहेत?"
तो शांतपणे म्हणाला, "हे मामा लोक आहेत. आम्ही मुलं त्यांना 'मामा' म्हणतो आणि इथल्या बायका त्यांना 'भय्या' म्हणतात."
एवढंच बोलून तो गप्प झाला.
आम्ही एका खोलीत शिरलो. आत पाऊल टाकताच अगरबत्तीचा मंद सुगंध नाकात भरला. पार्श्वभूमीला हिंदी चित्रपटातील एक जुने गाणे अगदी हळू आवाजात वाजत होते. बाहेरच्या खोलीत काही स्त्रिया नटून सवरून बसल्या होत्या. आम्ही त्यांच्या जवळून पुढे चालत गेलो.
आत सलग चार-पाच खोल्या होत्या. बहुतेक सर्व खोल्यांमध्ये लाल रंगाचा मंद दिवा पेटलेला होता. एक खोली मात्र बंद होती. त्या सगळ्यांतून जात आम्ही शेवटच्या खोलीत पोहोचलो.
ती खोली इतरांपेक्षा थोडी मोठी होती. साधीच व्यवस्था होती. दोन लोखंडी पलंग, एक कपाट, भिंतीवर देवांचे फोटो आणि कोपऱ्यात काही घरगुती सामान ठेवलेले होते. त्या खोलीत घरपणाची जाणीव होत होती.
आत जाताच गौरीशंकरने मोठ्याने हाक मारली.
"अम्मा..अक्का..फ्रेंड वच्चाडू!"
मला ती भाषा समजली नाही. मी विचारलं, "ही कोणती भाषा?"
तो म्हणाला, "तेलुगू." पुढे तो म्हणाला " मी आई आणि बहिणीला म्हणालो की माझा मित्र आला आहे."
क्षणभरात दोन स्त्रिया आत आल्या. एक साधारण पन्नाशीच्या आसपासची आणि दुसरी वीस-बावीस वर्षांची तरुणी. दोघीही नीटनेटके कपडे घातलेल्या होत्या. केसांत गजरा, अंगावर मंद सुगंधाचा परफ्यूम आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप होता.
गौरीशंकरने माझ्याकडे बोट दाखवत म्हटलं,
"हा माझा मित्र..ओमकार."
त्यावर त्या दोघी तेलुगूमध्ये त्याच्याशी काहीतरी बोलू लागल्या. मला भाषा समजत नव्हती पण त्यांच्या आवाजातील काळजी स्पष्ट जाणवत होती. त्यांच्या बोलण्याच्या सुरावरून मला असं वाटलं की त्या त्याला विचारत असाव्यात,
"अरे, मित्राला इथे का घेऊन आलास? त्याला या वातावरणात आणायची काय गरज होती?"
गौरीशंकरने शांतपणे उत्तर दिलं,
"मित्राला कबाब खायला आणलं होतं, म्हणून सोबत घेऊन आलो."
त्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील ताण थोडासा कमी झाला. त्यांनी माझी जुजबी चौकशी केली, हसून स्वागत केलं आणि काही क्षणांनी त्या दोघी पुन्हा बाहेर निघून गेल्या.
मी मात्र त्या खोलीत शांत बसलो होतो. माझ्या मनात एकामागून एक प्रश्न निर्माण होत होते. गौरीशंकरच्या आयुष्याचं वास्तव माझ्यासमोर हळूहळू उलगडत होतं, आणि मी कल्पना केली होती त्यापेक्षा ते पूर्णपणे वेगळं होतं.
त्या दोघी बाहेर गेल्यानंतर गौरीशंकरने कपाटातून त्याचा व्हिडिओ गेम काढला आणि मला उत्साहाने दाखवू लागला. पण माझं लक्ष त्यात अजिबात नव्हते. त्या घरात, त्या चाळीत आणि त्या परिसरातील वातावरणात मी पाहिलेल्या प्रत्येक गोष्टीने माझं मन अस्वस्थ झालं होतं.
मी वरवरच तो व्हिडिओ गेम पाहिला आणि म्हणालो,
"गौऱ्या, चल.. खूप उशीर झाला आहे. घरी माझी वाट पाहत असतील."
खरं तर मला तिथून शक्य तितक्या लवकर बाहेर पडायचं होतं. ते वातावरण माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. त्या वयात ते समजून घेण्याची माझी मानसिक तयारीही नव्हती.
आम्ही दोघे बाहेर पडलो.
तोपर्यंत रात्र पूर्णपणे उतरली होती. पण कामाठीपुराच्या त्या गल्ल्यांमध्ये रात्रीचा अंधार कुठेच जाणवत नव्हता. सर्वत्र रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई होती. विशेषतः लाल रंगाचे दिवे अनेक ठिकाणी लावलेले होते. त्या प्रकाशात संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. क्षणभर तर असं वाटलं की रात्र नसून दुसरी एखादी सकाळच उगवली आहे.
आजूबाजूला सतत लोकांची ये-जा सुरू होती. काही जण गप्पा मारत उभे होते, काहीजण घाईघाईने चालत होते, तर काहीजण नव्यानेच आपला दिवस सुरू करत असल्यासारखे दिसत होते. संपूर्ण परिसरात एखाद्या गजबजलेल्या बाजारपेठेसारखी रेलचेल होती.
गौरीशंकर मला बसस्टॉपपर्यंत सोडायला आला. त्याने मला १६९ क्रमांकाच्या बसमध्ये बसवून दिलं. ती बस गिरगावच्या चिराबाजारकडे जाणारी होती.मी नेहमीप्रमाणे डबल डेकर बसच्या वरच्या मजल्यावर जाऊन अगदी पुढच्या भागात, चालकाच्या वर असलेल्या सीटवर बसलो. बस हळूहळू त्या परिसरातून बाहेर पडू लागली आणि बसच्या खिडकीतून थंडगार वारा चेहऱ्यावर येऊ लागला. पण माझ्या मनात मात्र विचारांचं वादळ सुरूच होतं.
खिडकीतून मागे सरकणाऱ्या त्या उजळलेल्या गल्ल्या पाहताना मला मात्र वारंवार एकच प्रश्न पडत होता
"हा नेमका कसला बाजार आहे? इथे नक्की काय विकलं जात असेल?"
त्या रात्री त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही.
काळ पुढे सरकला. वय वाढलं. वाचनालयातील अनेक पुस्तके, मासिके आणि समाज जीवनावरील लेख वाचताना त्या रात्रीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं हळूहळू मिळत गेली. तेव्हा समजलं की त्या दिवशी मी फक्त एका वेगळ्या परिसरात गेलो नव्हतो तर समाजाच्या अशा वास्तवाला स्पर्श करून आलो होतो, ज्याची कल्पनाही माझ्या निरागस मनाला तेव्हा नव्हती.
दुसऱ्या दिवशी गौरीशंकर कॉलेजमध्ये भेटला. कालचा प्रसंग माझ्या मनात अजूनही ताजा होता पण त्याच्याकडे पाहताना मला तो पूर्वीचाच गौरीशंकर दिसला.साधा, मनमिळावू आणि दिलदार मित्र.
त्याच्या राहत्या परिसरामुळे किंवा त्याच्या घरामुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल कोणताही गैरसमज निर्माण झाला नाही. उलट त्या दिवसानंतर एक गोष्ट माझ्या मनात कायमची कोरली गेली
माणूस कुठे राहतो, यापेक्षा तो कसा आहे, हेच अधिक महत्त्वाचं असतं.
त्यामुळे त्याच्या कुटुंबाबद्दल मी कधीही खोदून-खोदून प्रश्न विचारले नाहीत. काही गोष्टी जर विचारल्या नाहीत तरच त्या नात्याचा खऱ्या अर्थाने आदर राखला जातो, असे मला वाटू लागले. त्यालाही कदाचित त्याच्या आयुष्याबद्दल फार बोलायचं नव्हतं आणि मलाही त्याला असे प्रश्न विचारून दुखवायचं नव्हतं.
असेच दिवस सरत गेले.
कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या (एफ.वाय.जे.सी.) वार्षिक परीक्षा झाल्या. परीक्षा संपल्यावर गौरीशंकर स्वतःच म्हणाला की त्याचा एकही पेपर त्याच्या मनासारखा गेला नाही. आमची परीक्षाही संपली आणि मी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी निघून गेलो.
तो मोबाईल फोन पूर्वीचा काळ होता. त्यामुळे संपर्कात राहण्यासाठी फारसे पर्याय नव्हते. प्रत्यक्ष भेट, पत्र किंवा घरात लँडलाईन दूरध्वनी असेल तरच फोनवर बोलता यायचं. आमच्यापैकी बहुतेकांकडे या तिन्ही गोष्टी त्यावेळी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे शाळा किंवा कॉलेजच्या सुट्ट्या लागल्या की तब्बल दोन-तीन महिने मित्रमंडळींचा एकमेकांशी पूर्णपणे संपर्क तुटून जायचा.
त्या वर्षीची उन्हाळ्याची सुट्टी संपली. मी उत्तीर्ण होऊन दुसऱ्या वर्षाच्या (बारावी) वर्गात प्रवेश केला,
वर्गात शिरताच सहज माझी नजर मागच्या बाकांकडे गेली. पहिल्या वर्षी आमच्या वर्गात सुमारे पंचवीस मुलं आणि पस्तीस मुली होत्या. पण आता मुलांच्या रांगेकडे पाहिलं तर फक्त पाच-सहा मुलंच दिसत होती. मुली मात्र जवळजवळ सगळ्याच होत्या.
क्षणभर मी थबकलो.
माझ्या मनात विचार आला.बाकीची मुलं कुठे गेली असतील?
बहुधा काही जण नापास झाले असतील, तर काहींनी कॉलेजच सोडलं असावं. त्या काळात आर्थिक अडचणी, अभ्यासातील अडथळे किंवा घरच्या जबाबदाऱ्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागायचं. वर्गातील रिकामे बाक त्या वास्तवाची नि:शब्द साक्ष देत होते.
माझी नजर मात्र एका चेहऱ्याचा शोध घेत होती.
गौरीशंकरचा.
आमच्या वर्गात दुसऱ्या वर्षापर्यंत टिकून राहिलेल्या त्या पाच-सहा मुलांपैकीही शेवटी फक्त तीन-चार जणच बारावी उत्तीर्ण होऊन पुढे गेले,त्यात मी सुद्धा होतो.
पण कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून माझी साथ करणारा, मला त्या अनोख्या वातावरणात आधार देणारा माझा मित्र गौरीशंकर मात्र माझ्या सोबत नंतर राहिला नाही. तो दुसऱ्या वर्षी कधीच वर्गात दिसला नाही आणि पुढेही दिसला नाही..
सुरुवातीला मला वाटलं, कदाचित त्याने दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला असेल. त्या काळी मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे एखादा मित्र अचानक संपर्कातून निघून जाणं ही फार मोठी गोष्ट नव्हती. दिवस, महिने आणि वर्षे सरत गेली पण गौरीशंकरची पुन्हा कधीच भेट झाली नाही.
नंतर अनेक वर्षांनी योगायोगाने कॉलेजमधील एका ओळखीच्या कर्मचाऱ्याशी बोलण्याचा प्रसंग आला. सहजच मी गौरीशंकरबद्दल विचारलं. त्याने कॉलेजच्या नोंदी तपासल्या.
रेकॉर्ड पाहिल्यावर तो म्हणाला,
"गौरीशंकर पहिल्या वर्षाच्या परीक्षेत सर्व विषयांत नापास झाला होता. पण त्यानंतर तो पुन्हा कॉलेजमध्ये कधीच आला नाही. विशेष म्हणजे त्याने कॉलेजमधून आपलं नावही काढलं नव्हतं."
हे ऐकून मला अक्षरशः धक्का बसला.
माझा पहिला अंदाज चुकीचा ठरला होता. तो कॉलेजच बदलून गेला नव्हता.
मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. एवढा संघर्ष करून शिकणारा, रोज पहाटे उठून वर्तमानपत्रं टाकणारा, स्वतःच्या कष्टाने पैसे कमावणारा गौरीशंकर अचानक शिक्षणाच्या प्रवाहातून का बाहेर पडला?
या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला.
परंतु ते उत्तर त्यावेळी मला मिळालेच नाही..
गौरीशंकरबद्दल अधिक जाणून घ्यावं, त्याची भेट घ्यावी, अशी इच्छा मनात अनेकदा निर्माण झाली. पण त्याच्या घरी, त्या परिसरात पुन्हा जाण्याचं धाडस मी काही केलं नाही. त्या काळच्या सामाजिक वातावरणात तिथे ये-जा करताना कोणी, ओळखीच्या लोकांनी पाहिलं असतं, तर "चांगला मुलगा वाईट संगतीला लागला" असा निराधार शिक्का माझ्या पाठीवर बसला असता. तो धोका पत्करण्याची माझी कोणतीच तयारी नव्हती. त्यामुळे मनावर दगड ठेवून तो विचार मी कायमचा बाजूला ठेवला.
दिवस पुढे सरकत गेले.
कॉलेजमध्ये माझे अनेक नवीन मित्र झाले. विविध उपक्रमांमध्ये सहभाग वाढला. विद्यार्थी निवडणुका लढवल्या, त्यात जिंकलो,नवनव्या सहकाऱ्यांचा पाठिंबा लाभला. कॉलेजचं आयुष्य वेगळ्याच रंगात रंगू लागलं.
पण या सगळ्या गजबजाटात एक रिकामी जागा मात्र कायम होती.
कॉलेजच्या पहिल्याच दिवशी माझ्या शेजारी बसलेला, इंग्रजी भाषेत असलेल्या सर्व विषयांच्या लेक्चरमध्ये माझ्याइतकाच गोंधळलेला, सकाळी वर्तमानपत्रं टाकून कॉलेजला येणारा, स्लॉट मशीनवर वारंवार त्याचे नशीब आजमावणारा आणि रोज जिंकणारा, मनाने दिलदार आणि मला आयुष्याचं वेगळं वास्तव दाखवणारा गौरीशंकर पुन्हा कधीच माझ्या आयुष्यात दिसला नाही.
काळ पुढे गेला. मी पदवीधर झालो. शेवटचा दिवस उजाडला.
कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारातून शेवटचं पाऊल बाहेर टाकताना अनेक आठवणी डोळ्यांसमोर तरळत होत्या. विजयाचे क्षण होते, नवीन मित्र होते, निवडणुकांची धामधूम होती, असंख्य अनुभव होते पण त्या सगळ्या आठवणींमध्ये एक चेहरा मात्र सतत डोळ्यांसमोर येत होता.गौरीशंकरचा.
आजही कधी त्या दिवसांची आठवण झाली की मनात एकच प्रश्न उमटतो.
गौरीशंकरचं पुढे काय झालं असेल?
कदाचित तो आज कुठेतरी आपल्या आयुष्याशी झुंज देत असेल कदाचित त्याने आयुष्यात वेगळी वाट निवडली असेल किंवा कदाचित तो या जगातही नसेल.
उत्तर आजही माहीत नाही.
पण एक गोष्ट मात्र नक्की
माणसं आयुष्यातून निघून जातात आठवणी मात्र कधीच निरोप घेत नाहीत. गौरीशंकर हा माझ्या आयुष्यातील तसाच एक मित्र आहे, जो हरवला पण आठवणीतून कधीच विसरला गेला नाही.
असेच दिवस, महिने आणि वर्षे सरत राहिली. अनेक पावसाळे आले, गेले. आयुष्याने अनेक वळणे घेतली. शिक्षण पूर्ण झाले, नोकरी, संसार आणि जबाबदाऱ्या वाढत गेल्या. कॉलेजचे दिवस आता फक्त आठवणींच्या पानांवर उरले होते.
क्रमशः..🖋️📚📖
त्या मित्राचे म्हणजे गौरीशंकरचं पुढे काय झालं असेल ?
कदाचित तो आज कुठेतरी आपल्या आयुष्याशी झुंज देत असेल कदाचित त्याने आयुष्यात वेगळी वाट निवडली असेल किंवा कदाचित तो या जगातही नसेल.याचे
उत्तर लेखकाला पुढे मिळते कां? ते उत्तर मिळाले तर कसे मिळाले? कोणत्या परिस्थित मध्ये ते मिळाले ? ते उत्तर या पूर्वी कां मिळत नव्हते..या साठी वाचा 🔗पुढील भाग बिर्याणी हाऊस - नशिबाची साथ | भाग 2
मराठी कथा, सामाजिक वास्तव, कॉलेज जीवन, जुन्या मुंबईच्या आठवणी आणि प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी SJ Omkar|शब्दांची मुशाफिरी या ब्लॉगला नियमित भेट द्या. अशाच हृदयस्पर्शी कथा, प्रवासवर्णने आणि माहितीपूर्ण लेखांसाठी 🔍 ☰ मधील FOLLOW वर क्लिक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख
प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.
👨🏻💼 Connect With Us
📧 Gmail: sjomkar21@gmail.com
🌐 Follow & Connect
🔗 वरील कोणत्याही सोशल मिडिया नावावर क्लिक करून आमच्या अधिकृत सोशल मीडिया प्रोफाइलला भेट द्या.
ℹ️ सूचना: काही लिंक उघडताना गुगल कडून "Redirect Notice" दिसू शकते. अशा वेळी कृपया "Redirect" वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही आमच्या अधिकृत प्रोफाइलवर पोहोचाल.
💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.
👍 पुढील भाग वाचण्यासाठी या ब्लॉगच्या 🔍☰ मधील FOLLOW वर कृपया क्लिक करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.
🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com
तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.
धन्यवाद! 🙏
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved
© All Rights Reserved
(ओमकार शिवलकर)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा