मुख्य सामग्रीवर वगळा

बिर्याणी हाऊस - नशिबाची साथ | भाग 2

अस्वीकरण -

"ही कथा काल्पनिक आहे. पात्रे, स्थळे, संस्था आणि घटना काल्पनिक असून कोणत्याही वास्तविक व्यक्ती, संस्था किंवा घटनेशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा."

बिर्याणी हाऊस - नशिबाची साथ | भाग 2

लकी बिर्याणी हाऊस - नशिबाची साथ | भाग २ | हरवलेल्या मित्राची अनपेक्षित भेट, हैदराबाद, कामाठीपुरा, संघर्षातून उभा राहिलेला यशस्वी उद्योजक गौरीशंकर आणि मैत्रीची हृदयस्पर्शी मराठी कथा | SJ Omkar Blog

  ही संघर्ष, नशीब, मैत्री आणि पुनर्भेट यांची हृदयस्पर्शी मराठी कथा आहे. तीस वर्षांनंतर हैदराबादमध्ये घडलेल्या एका अनपेक्षित भेटीत गौरीशंकर आपल्या आयुष्यातील वेदनादायी प्रवास, कामाठीपुरातील बालपण, आईचा संघर्ष, बहिणीचा विरह आणि स्वतःच्या कष्टाने उभारलेल्या 'लकी बिर्याणी हाऊस' साम्राज्याची कहाणी सांगतो. ही कथा सिद्ध करते की माणसाचा जन्म त्याचे भविष्य ठरवत नाही तर त्याची जिद्द, मेहनत आणि योग्य वेळी मिळालेली नशिबाची साथ त्याची खरी ओळख घडवते. पुढील कथेचा भाग 2 वाचण्यापूर्वी,  वरील शिर्षकावरील लिंक क्लिक करून अगोदर भाग 1 वाचून घ्यावा..

बिर्याणी हाऊस - नशिबाची साथ | भाग 2

मागील भाग 1 वरून पुढे..

एकदा मी परिवारासह हैदराबादला फिरायला गेलो होतो. हैदराबादला गेल्यावर तिथली प्रसिद्ध बिर्याणी खाल्ली नाही, तर ती सफरच अपुरी राहील, म्हणून तिचा आस्वाद घेण्याचे आम्ही ठरवले.

हॉटेलच्या स्वागतकक्षावर मी विचारले,

"हैदराबाद मध्ये चविष्ट बिर्याणी कुठे मिळेल?"

काउंटरवरील गृहस्थाने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले,

"लकी बिर्याणी हाऊसला जा. तुम्ही निराश होणार नाही.लाजवाब बिर्याणी करिता ते खूप फेमस आहे"

आम्ही बाहेर येऊन एका ऑटोरिक्षाला हात दाखवला. मी फक्त एवढेच म्हणालो,

"लकी बिर्याणी हाऊस."

एवढे ऐकताच रिक्षाचालकाने काहीही न विचारता आम्हाला थेट त्या रेस्टॉरंटच्या प्रवेशद्वाराजवळ आणून सोडले. ते नावच इतके प्रसिद्ध असावे की आणखी पत्ता सांगण्याची गरजच पडली नाही.

रेस्टॉरंटमध्ये शिरताच बिर्याणीचा दरवळ सर्वत्र पसरलेला जाणवत होता. त्यातच तव्यावर भाजल्या जाणाऱ्या मटण कबाबचा लाजवाब गंध हवेत मिसळला होता. त्या गंधाने आमची भूक आणखीच चाळवली.

आत नजर फिरवली, तर भिंतीवर काही ठिकाणी मोठ्या अक्षरांत लिहिलेलं दिसलं

"Strictly No Use of Beef."

ते वाचताच नकळत माझ्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. क्षणभरात माझं मन जवळजवळ तीस वर्षे मागे गेलं..

कामाठीपुरातील त्या छोट्याशा कबाब सेंटरमध्ये.

तिथेही अगदी असाच फलक लावलेला होता. आणि त्याच फलकामुळे गौरीशंकरने मला पहिल्यांदा निर्धास्तपणे कबाब खायला तयार केलं होतं.

एका क्षणात त्याचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर तरळून गेला.

रेस्टॉरंटमध्ये मी परिवारासोबत बसलो होतो पण मन मात्र त्या जुन्या मुंबईत, त्या अरुंद गल्लीत आणि माझ्या हरवलेल्या त्या मित्राच्या आठवणीत हरवून गेलं होतं.

कधी बिर्याणी आणि कबाब टेबलावर येते, याची आम्ही सगळे वाट पाहत होतो पण त्या दिवशी मला कबाबच्या गंधापेक्षा जास्त दरवळत होती ती माझ्या कॉलेजच्या दिवसांची आठवण आणि त्या आठवणींच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा उभा होता गौरीशंकर उभा..कबाब म्हटले की कॉलेज मित्र गौरीशंकर हमखास डोळ्यासमोर येतो.

मी ,पत्नी आणि मुलीसोबत एका टेबलावर बसलो आणि हैदराबादी बिर्याणी व कबाबचा आस्वाद घेऊ लागलो.

बिर्याणी खरोखरच अप्रतिम आणि लाजवाब होती. प्रत्येक घासात मसाल्यांचा सुरेख समतोल, मऊसर मटण आणि दरवळणारा सुगंध होता. कबाबचे तुकडे सुद्धा तोंडात टाकताच विरघळत होते. त्या दिवशी मला कळले "बिर्याणी खायची तर हैदराबादचीच!" असे लोक का म्हणतात ?याचा प्रत्यक्ष अनुभव आला.

पोटभर जेवण झाल्यावर मी हात वर करून वेटरला म्हणालो,

"बिल आणा."

वेटरने माझ्याकडे पाहून हसत उत्तर दिलं,

"सर, बिल राहू द्या. त्याची काळजी करू नका. अजून काही मागवायचं असेल तर जरूर मागवा."

त्याचं उत्तर ऐकून मी क्षणभर गोंधळलो.

"हा असं का बोलतोय?" मनात विचार आला.

मी पुन्हा म्हणालो,

"नाही..आम्ही अगदी पोटभर जेवलो आहोत. आता पोटात आणखी काही ठेवायला जागाच उरलेली नाही."

तो पुन्हा नम्रपणे म्हणाला,

"ठीक आहे सर. आधी हात धुवून या. लिंबूपाणी येईल. त्यानंतर भेटू."

हात धुऊन परत आल्यानंतर मी पुन्हा बिलाची मागणी केली.

यावेळी तो म्हणाला,

"सर..तुमचं बिल मालकांच्या केबिनमध्ये मिळेल."

हे ऐकताच माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. बिल काउंटरवर न देता थेट मालकाकडे का ? क्षणभर मला थोडा रागही आला पण तो मी आवरला.

मी शांतपणे पत्नी आणि मुलीसह त्या आलिशान केबिनकडे निघालो.

दारावर हलकंसं टकटक करून आत शिरलो.

समोर बसलेल्या मालकाकडे नजर गेली आणि मी काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिलो.

त्याचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता.

मनात विचार आला,

"असे कितीतरी चेहरे आयुष्यात जागोजागी भेटत असतात. कदाचित तशाच एखादा परिचित चेहऱ्याचा मला भास झाला असावा."

तो मात्र माझ्याकडे एकटक पाहत हसत होता.

त्याने हाताने समोरील खुर्चीकडे इशारा करत शांत आवाजात म्हटलं,

"या.. बसा."

त्या एका स्मितहास्यामागे एक अशी ओळख दडलेली होती, ज्याचा उलगडा होण्यासाठी अजून काही क्षण बाकी होते..

मी माझ्या सोबत पत्नी आणि मुलीलाही केबिनमध्ये घेऊन गेलो. आम्ही तिघेही त्याच्या समोरील खुर्चीत बसलो.

त्याने हसत विचारलं,

"बिर्याणी कशी वाटली?"

आम्ही तिघेही एकाच सुरात म्हणालो,

"अप्रतिम! लज्जतदार आणि खूपच चविष्ट."

तो समाधानाने हसला. मग त्याने दुसरा प्रश्न विचारला,

"आणि कबाब? असे कबाब याआधी कधी कुठे खाल्ल्याचं आठवतंय का?"

हा प्रश्न ऐकताच, माझ्या मनातील काळाचं चक्र गरगरा उलटं फिरू लागलं.

कबाब..

"Strictly No Use of Beef"..

कामाठीपुरा..

ती अरुंद गल्ली..

आणि..

गौरीशंकर!

क्षणभरात माझ्या डोळ्यांसमोर कॉलेजमधला मित्र गौऱ्या उभा राहिला. मी समोर बसलेल्या त्या व्यक्तीकडे पुन्हा एकदा निरखून पाहिलं.

वय वाढलं होतं. चेहऱ्यावर अनुभवांच्या अनेक रेषा उमटल्या होत्या. व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास आला होता. पण त्या डोळ्यांतील आपुलकी.. ते हसू..ती नजर..

हो.. तोच होता तो!

मी खुर्चीतून जवळजवळ उठतच मोठ्याने ओरडलो,

"गौऱ्या..!"

माझ्या आवाजाने पत्नी आणि मुलगी दोघीही दचकल्या. त्या आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागल्या. त्यांना काहीच समजत नव्हतं.

समोर बसलेला तो माणूस हसत उठला.

क्षणभर आम्ही दोघेही एकमेकांकडे नुसते पाहत राहिलो.

मी भावुक होत म्हणालो,

"अरे.. मित्रा,तू किती बदललास!"

तो हसला आणि म्हणाला,

"तू मात्र अजूनही आहेस,तसाच आहेस, पण मी तुला रेस्टॉरंटमध्ये पाऊल टाकताच ओळखलं होतं."

त्या क्षणी तीस-बत्तीस वर्षांचं अंतर जणू एका क्षणात नाहीसं झालं.

आमच्या गप्पांना अक्षरशः उधाण आलं. पत्नी आणि मुलगीही आता उत्सुकतेने आमचं बोलणं ऐकत होत्या. मी त्यांना गौरीशंकरबद्दल थोडक्यात सांगितलं. त्या दोघींनाही हा योगायोग अविश्वसनीय वाटत होता.

काही वेळाने गौरीशंकर शांत झाला.

त्याने खुर्चीला पाठ टेकवली.

केबिनमधील वातानुकूलित थंड हवा वातावरणात एक वेगळाच गारवा निर्माण करत होती. बाहेरच्या रेस्टॉरंटमधील ग्राहकांचा मंद गजबजाट अधूनमधून आत ऐकू येत होता.

इतक्यात भिंतीवरच्या जुन्या घड्याळातून एक छोटासा पक्षी बाहेर आला.

"पिक.. पिक..पिक.."

असा दहा वेळा आवाज करत त्याने रात्रीचे दहा वाजल्याची वर्दी दिली.

गौरीशंकर काही क्षण निःशब्द राहिला.

त्याने खोल श्वास घेतला.

त्याच्या डोळ्यांत आठवणींची हलकीशी ओल दाटली होती.

आवाज किंचित दाटून आला.

तो माझ्याकडे पाहत म्हणाला,

"ओमकार.. अरे,त्या दिवशी तू माझ्या घरी आलास तेव्हा  तुला फक्त माझ्या आयुष्याची ओझरती झलक दिसली होती. आज इतक्या वर्षांनी भेटलाच आहेस, तर आता उरलेली कहाणीही सुद्धा ऐक.."

आणि तो त्याच्या आयुष्याचं एक एक  पान उलगडू लागलं, ज्याची कल्पना मी त्या कॉलेजच्या दिवसांत कधीच केली नव्हती..

गौरीशंकर काही क्षण शांत राहिला. त्याने पाण्याचा एक घोट घेतला आणि जड झालेल्या आवाजात बोलू लागला.

"ओमकार..मी एफ.वाय.जे.सी.ची परीक्षा दिली खरी पण माझा एकही पेपर मनासारखा गेला नाही. खरे तर इंग्रजीच व्यवस्थित समजत नव्हतं. त्यामुळे प्रत्येक पेपर कठीणच गेला. मलाही वाटत होतं की मी हमखास नापास होणार.

पण खरं सांगू का? माझा तो निकाल काय लागला, हे पाहायची कधी वेळच माझ्यावर आली नाही.

कारण त्याआधीच माझ्या आयुष्यात अशी शोकांतिका घडली की जिने माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं.

तुला वेगळं काही सांगायची गरज नाही. लहानपणी तू माझं घर आणि तिथलं वातावरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहेस.

माझी आई आंध्र प्रदेशातील एका छोट्या गावची. तिला चांगल्या आयुष्याचं आमिष दाखवून तिची फसवणूक करण्यात आली आणि तिला मुंबईतील रेड लाईट परिसरात आणून विकण्यात आलं. परत गावाकडे जावं, असं तिच्या मनात अनेकदा आलं असेल पण तिथेही दारिद्र्याशिवाय काहीच नव्हतं. गावात फक्त एक मोडकळीस आलेलं घर होतं आणि थोडी शेती होती. हातात पैसा नव्हता, आधार देणारं कोणी नव्हतं. शेवटी परिस्थितीपुढे हतबल होऊन तिला त्या व्यवसायात राहणं भाग पडलं.

काळ पुढे सरकत गेला. अनेक लोक तिच्या आयुष्यात आले. काहींनी संसाराची, लग्नाची आणि सुखी आयुष्याची खोटी स्वप्नं तिला दाखवली. पण ती स्वप्नं कधीच खरी ठरली नाहीत.

त्या काळात माझी मोठी बहीण वंदना जन्माला आली आणि नंतर माझा जन्म झाला. पण आमच्या जन्माला कारणीभूत असलेल्या व्यक्तींनी आमची जबाबदारी कधीच स्वीकारली नाही.

मी माझ्या वडिलांना कधीच पाहिलेलं नाही. ते कोण होते, कुठले होते, आज जिवंत आहेत की नाहीत ?..यापैकी कोणत्याच प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीत.

मी आणि माझी मोठी बहीण,आम्ही दोघे जण ज्या घरात,ज्या खोलीत ज्या वातावरणात मोठे झालो.ते तू पाहिले आहेस..

वय वाढत गेलं आणि समाजाने आमच्या भोवती आखलेल्या मर्यादा अधिक स्पष्ट होत गेल्या. आईने आम्हाला त्या आयुष्यापासून दूर ठेवण्याचा शक्य तितका प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी ती परिस्थिती पुढे हरत गेली,निराश होत गेली.

बहिण वंदना जसजशी मोठी होत गेली तसतशी ती सुद्धा,

तो तिचा किंवा माझ्या आईचा निवडलेला मार्ग नव्हता..

तो त्यांच्या आयुष्याने त्यांच्यावर लादलेला मार्ग होता."

गौरीशंकर काही क्षण शांत झाला. त्याने डोळे मिटले, जणू जुन्या आठवणी तो पुन्हा एकदा जगत होता.

"वंदना त्या व्यवसायात येण्यापूर्वीच आईने स्वतःचं काम कमी केलं होतं. पुढे ती त्या कोठीची मावशी झाली. त्या ठिकाणचा मालक वेगळा होता. आई त्याच्याकडे नियमित हिशोब आणि पैसे जमा करायची. आमचे आयुष्य जेमतेम पुढे चालत होतं.

पण नियतीला ते सुद्धा मंजूर नव्हतं.

वंदना त्या व्यवसायात आल्यानंतर तिच्याकडे एका सराईत गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या नेहमी येऊ लागला. त्याला तिच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं होतं. एक दिवस त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने संपूर्ण योजना आखली आणि वंदनाला तिथून पळवून नेलं.

आईने पोलिसांत तक्रार केली. चौकशी झाली. शोध घेण्यात आला. पण वंदनाचा ठावठिकाणा कधीच लागला नाही.

बहिणीच्या अपहरणाचा धक्का आईला  सहन झाला नाही. ती आतून पूर्णपणे खचली. त्यातच तिला एक गंभीर आणि असाध्य आजार असल्याचं समजलं. डॉक्टरांनीही उपचारांच्या मर्यादा स्पष्ट केल्या होत्या.

तेव्हा आईने मला जवळ बसवून एकच गोष्ट सांगितली

'गौरी.. मला माझ्या गावाकडे घेऊन चल. शेवटचे दिवस मला माझ्या मातीत घालवायचे आहेत.'

बहिणीचं अपहरण..आईचं आजारपण आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता..

या सगळ्या घटना इतक्या वेगाने घडल्या की कॉलेज, अभ्यास आणि परीक्षेचा निकाल या गोष्टी माझ्यासाठी पूर्णपणे गौण ठरल्या. मनातून शिक्षणाची ओढच निघून गेली.

आईने आयुष्यभर कष्ट करून जमवलेली थोडीफार पुंजी सोबत घेतली आणि आम्ही आंध्र प्रदेशातील तिच्या गावाकडे निघालो.

मला वाटलं होतं, आता तरी नातेवाईक आम्हाला आपलं मानतील.

पण तसं झालं नाही.

गावात पोहोचल्यानंतर आईच्या भूतकाळामुळे तिच्या घरच्यांनी आम्हाला घरात घेण्यास नकार दिला. त्यांच्याही मनात समाजाची भीती होती, पूर्वग्रह होते. त्या क्षणी आईच्या डोळ्यांतलं दुःख मी शब्दांत कधीच सांगू शकणार नाही.

शेवटी गावाच्या बाहेर एका मोकळ्या जागेवर आम्ही छोटीशी झोपडी बांधली आणि तिथेच राहू लागलो.

आईची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली.

काही महिन्यांतच तिने माझा हात हातात घेतला..शेवटचा आशीर्वाद दिला आणि तिने कायमचा या जगाचा निरोप घेतला.

त्या दिवशी मी खऱ्या अर्थाने पूर्णपणे एकटा पडलो.

माझ्यामागे उभं राहील असं कोणी पाठीशी उरलं नव्हतं.

आईच्या अंत्यसंस्कारानंतर काही दिवस गावात काढले. पण तिथे माझ्यासाठी भविष्य नव्हतं.

एक सकाळी मी एक छोटीशी बॅग खांद्यावर टाकली..

आणि माझी पावलं हैदराबादच्या दिशेने वळली.

माझ्याकडे पैसा नव्हता, ओळखी नव्हत्या, शिक्षण अपुरं होतं..

पण एक गोष्ट मात्र होती

जगायचं परंतु आईने भोगलेलं आयुष्य पुन्हा कधीच जगायचं नाही, हा माझा निर्धार होता.

गौरीशंकर पुढे सांगू लागला,

"हैदराबादला आल्यावर सुरुवातीचे काही महिने अक्षरशः जगण्यासाठी धडपड करण्यात गेले. शेवटी एका बिर्याणी सेंटरमध्ये मला किचनमध्ये काम मिळालं. सुरुवातीला कांदे चिरण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत जे काम मिळेल ते करत होतो. हळूहळू मसाले, दम बिर्याणीची पद्धत, कबाब बनवण्याचं कौशल्य, ग्राहकांची आवड-निवड सगळं शिकत गेलो. काही वर्षांतच मी त्या कामात पूर्णपणे वाकबगार झालो.

राहण्याची आणि जेवणाची सोय हॉटेलकडूनच होती. त्यामुळे पगारातील जवळजवळ प्रत्येक रुपया माझ्याकडे शिल्लक राहत होता.

त्या काळात पुन्हा एकदा मला स्लॉट मशीन आणि गॅम्बलिंगचं वेड लागलं. कधी जिंकायचो, कधी हरायचो  पण नशीबाने मला कधी पूर्णपणे कंगाल होऊ दिलं नाही.

एक दिवस मी आयुष्यातला सर्वात मोठा धोका पत्करला. अनेक वर्षांची बचत आणि गेमिंग पार्लर मध्ये जिंकलेले पैसे एकत्र करून मी एका प्रसिद्ध गॅम्बलिंग हाऊस मध्ये  एका मोठ्या रकमेच्या जॅकपॉट खेळलो.

त्या दिवशी नशीब माझ्या बाजूने उभं राहिलं.

मला मोठा जॅकपॉट लागला.

अचानक माझ्या हातात इतके पैसे आले, जितके मी आयुष्यात कधी पाहिलेही नव्हते.

पण त्या पैशांचं मी उधळपट्टीत रूपांतर केलं नाही.

मी स्वतःला एकच प्रश्न विचारला'हे पैसे संपवायचे की त्यांचं आयुष्यभर उत्पन्न देणाऱ्या व्यवसायात रूपांतर करायचं?'

मी दुसरा मार्ग निवडला.

"मला नशिबाने आयुष्यभर साथ दिली. त्यामुळे यश मिळाल्यावर मी त्या नशिबाला कधीच विसरलो नाही.

ज्या जॅकपॉटने मला आयुष्यात पहिल्यांदा उभं राहण्याची संधी दिली, त्याच नशिबाच्या स्मरणार्थ मी माझ्या पहिल्या रेस्टॉरंटचं नाव 'लकी बिर्याणी हाऊस' ठेवलं.

किचनमध्ये अनेक वर्षे केलेली मेहनत, बिर्याणी आणि कबाब बनवताना मिळालेलं कौशल्य, ग्राहकांची आवड समजून घेण्याची सवय आणि प्रामाणिकपणे केलेली सेवा या सगळ्यांच्या जोरावर ते रेस्टॉरंट अल्पावधीतच लोकप्रिय झालं.

व्यवसायातून मिळालेला प्रत्येक नफा मी पुन्हा व्यवसायातच गुंतवत गेलो. पहिल्या रेस्टॉरंटनंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं आणि आज हैदराबादमध्ये माझ्या पाच 'लकी बिर्याणी हाऊसच्या' शाखा आहेत.

लोक म्हणतात, मी नशीबवान आहे.

मीही ते मान्य करतो.

पण मला एक गोष्ट कायम वाटते,नशीब दार उघडू शकतं त्या दारातून आत जाऊन स्वतःचं स्थान निर्माण करावं लागतं ते मात्र स्वतःच्या मेहनतीनेच."

आज देवाच्या कृपेने पैसा आहे, नाव आहे, स्वतःचं घर आहे. माझी पत्नी, मुलगा आणि मुलगी हेच आता माझं छोटंसं जग आहे.

पण एक गोष्ट आजही मनाला टोचते..

हे सगळं पाहायला माझी आई नाही..माझी बहीण वंदना कुठे आहे, हे आजही माहीत नाही आणि वडील कोण होते, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे.

माझं बालपण दुर्दैवी होतं रे, ओमकार..

पण माझं नशीब मात्र नेहमी माझ्या पाठीशी उभं राहिलं.

त्याने मला अनेकदा कठीण परीक्षा द्यायला लावल्या परंतु आयुष्यात कधीच मान खाली घालण्याची मात्र माझ्यावर वेळ येऊ दिली नाही."

गौरीशंकर काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं.

नंतर हळूच आवाजात तो म्हणाला,

"ओमकार..मी एका वारांगनेचा पुत्र होतो. आयुष्यभर दुःख, अपमान आणि समाजाच्या तिरस्काराला सामोरं गेलो. पण देवाने, नशिबाने आणि काही चांगल्या माणसांनी मला कधीच एकट पडू दिलं नाही.

तू माझ्या आयुष्यातला पहिला माणूस होतास, ज्याने माझा पत्ता पाहिला माझे सभोवतीचे वातावरण पाहिले तरी सुद्धा माझी मैत्री सोडली नाही."

हे ऐकताच माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहिला..

आमच्या दोघांच्या डोळ्यांतून शब्दांपेक्षा जास्त बोलणारे अश्रू वाहत होते.

थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही.

नंतर तो हळूच म्हणाला,

"उद्या घरी ये. माझी बायको, मुलगा आणि मुलगी तुम्हा सर्वांना भेटून खूप आनंदी होतील. तुला घ्यायला माझी गाडी पाठवतो."

त्याला हस्तांदोलन करत मी म्हणालो,

"मित्रा..परत कधी तरी..उद्या आम्ही रामोजी फिल्म सिटीला जाणार आहोत. परवा सकाळी मुंबईला परतायचं आहे. परंतु जर कधी परत हैदराबादला आलो, तर सर्वप्रथम तुझ्याच घरी येईन."

तो फक्त हसला..

आम्ही बाहेर पडलो.

आश्चर्य म्हणजे गौरीशंकर स्वतः आम्हाला रेस्टॉरंटच्या बाहेर, गाडीपर्यंत सोडायला आला.

हे पाहून रेस्टॉरंटमधील सर्व कर्मचारी क्षणभर स्तब्ध झाले. त्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता.

"ही कोण अशी मानाची पाहुणी मंडळी आहेत, ज्यांना निरोप देण्यासाठी स्वतः गौरी शेठ बाहेर आला आहे?"

मी मात्र मनात हसलो.

त्यांना काय माहीत.

आम्ही दोन जुने मित्र एकेकाळी कॉलेजच्या शेवटच्या बाकावर एकत्र बसणारे होतो.

मी त्याच्या श्रीमंतीचा नाही, तर त्याच्या संघर्षाचा साक्षीदार आहे.

गाडीचं दार बंद झालं. गौरीशंकरने हात हलवून निरोप दिला.

त्या क्षणी त्याच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू मला स्पष्ट दिसत होते.

ते अश्रू आजच्या यशाचे नव्हते

गाडी सुरू झाली.

मी मागे वळून पाहिलं.

गौरीशंकर अजूनही तिथेच उभा होता.

त्याचा हात हवेत हलत होता..

पण डोळ्यांतून वाहणारे अश्रू लपवण्याचा त्याचा प्रयत्न स्पष्ट दिसत होता.

त्या क्षणी मला जाणवलं..

काही माणसं आयुष्यातून दूर जातात, पण मनातून कधीच जात नाहीत.

काळ बदलतो..

शहरे बदलतात..

नशिब बदलतं..

पण खरी मैत्री बदलत नाही.

गाडी रस्त्यावरून पुढे निघाली.

हैदराबाद शहर मागे सरकत होतं..

 अंधाऱ्या गल्ल्यांत हरवलेले बालपण, आईच्या मायेचे, बहिणीच्या विरहाचे दुःख घेऊन जगणारा आणि कॉलेज मधून अचानक दिसेनासा झालेला तो  जिवलग मित्र पुन्हा भेटल्याचे समाधान मात्र होते.

गाडी पुढे पुढे जात होती..

आणि माझ्या मनात एकच विचार घुटमळत राहिला..

माणसाचा जन्म त्याच्या हातात नसतो पण त्याने उभं केलेलं आयुष्य मात्र त्याची खरी ओळख बनतं.

                  समाप्त..🖋️📚📖
लकी बिर्याणी हाऊस' मालिकेतील हा दुसरा भाग मैत्री, संघर्ष, सामाजिक वास्तव आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या नशिबाच्या प्रवासाची भावनिक कहाणी सांगतो. अशाच दर्जेदार मराठी कथा, सामाजिक वास्तव, कॉलेज जीवन, जुन्या मुंबईच्या आठवणी आणि प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी SJ Omkar|शब्दांची मुशाफिरी या ब्लॉगला नियमित भेट द्या. अशाच हृदयस्पर्शी कथा, प्रवासवर्णने आणि माहितीपूर्ण लेखांसाठी 🔍 ☰ मधील FOLLOW वर क्लिक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

  👨🏻‍💼  Connect With Us

📧 Gmail: sjomkar21@gmail.com

🌐 Follow & Connect


📌 Pinterest

✍️ Quora

🧵 Threads

📖 Medium

💬 WhatsApp Channel

🔗 वरील कोणत्याही सोशल मिडिया नावावर क्लिक करून आमच्या अधिकृत सोशल मीडिया प्रोफाइलला भेट द्या. 

ℹ️ सूचना: काही लिंक उघडताना गुगल कडून  "Redirect Notice" दिसू शकते. अशा वेळी कृपया "Redirect" वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही आमच्या अधिकृत प्रोफाइलवर पोहोचाल.


💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.
👍 पुढील भाग वाचण्यासाठी या ब्लॉगच्या 🔍☰ मधील FOLLOW वर कृपया क्लिक करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.

🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा. धन्यवाद! 🙏
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)
SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो

📩 Subscribe करा
नवीन पोस्ट लगेच मिळवा!






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...