🔗रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | अल्टिमेटम (Episode 5)👉
रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | अंतिम तास (Episode 6)
Episode 6 : अंतिम तास
अ) दोन जनरल, एक राष्ट्र
रात्रीचे दहा वाजले होते..
मध्यरात्रीची अंतिम मुदत संपायला अवघे दोन तास उरले होते.
रुथरीच्या संरक्षण मंत्रालयाच्या भूमिगत युद्धकक्षात तणाव शिगेला पोहोचला होता.
भिंतीवर लावलेल्या प्रचंड डिजिटल स्क्रीनवर एकाच वेळी अनेक दृश्ये दिसत होती.
बेलवारीस विमानतळावर उभे असलेले फ्लाईट A-709..
राजधानी पोर्ट एमेरादो, मार्सेल, क्लेअर आणि ब्लांशे या शहरात वेगात पसरलेले जनआंदोलन..
देशभरातील लष्करी तळ..
नौदलाच्या युद्धनौका..
आणि हवाई दलाच्या सज्ज स्क्वॉड्रन्स.
प्रत्येक सेकंदाला नव नवे अहवाल येत होते.
पण कोणताही अहवाल जनरल माँटेरोच्या मनाला दिलासा देत नव्हता.
त्याने टेबलावर ठेवलेल्या रिपब्लिक ऑफ रुथरीच्या ध्वजाकडे काही क्षण पाहिले.
मग हळूच स्वतःशीच पुटपुटला,
"हे सगळं कसे घडून आले ?"
तेवढ्यात संचार अधिकाऱ्याने शांतता भंग केली.
"सर.."
"हॉट लाईनवर कॉल आहे."
माँटेरोने चिडून विचारले,
"कोण?"
अधिकाऱ्याने उत्तर दिले,
"लेफ्टनंट जनरल महारथ."
युद्धकक्षात उपस्थित सर्व अधिकारी एकदम शांत झाले.
माँटेरोने काही क्षण रिसीव्हरकडे पाहिले.
उचलू की नको या मनस्थिती मध्ये,तो त्याने उचलला आणि म्हणाला..
"बोल."
दुसऱ्या बाजूला काही सेकंद पूर्ण शांतता होती.
मग महारथ यांचा नेहमीप्रमाणे स्थिर, निर्विकार आणि शांत आवाज पलीकडून ऐकू आला.
"गुड इव्हनिंग, जनरल."
माँटेरो उपहासाने हसला.
"हा सगळा डाव तुझाच आहे, बरोबर ना ?"
त्यावर महारथ लगेच बोलले नाहीत.
काही क्षणांनी ते म्हणाले,
"जर तो माझा डाव असता..
तर मी तुम्हाला फोनच केला नसता."
"मग काय हवं आहे तुला?"
"फक्त रुथरी वाचवा,हेच मला हवे आहे"
माँटेरोचा आवाज कठोर झाला.
"माझ्या मुलांना ओलीस ठेवून तू मला देशप्रेम शिकवणार कां ?"
महारथ शांतपणे म्हणाले,
"तुमचे मुलगे जिवंत आहेत."
"आता पर्यंत तरी त्यांना कोणतीच इजा झालेली नाही."
"कारण आमचं लक्ष्य सूड नाही..
तर रक्तपात टाळून सत्ता बदल घडवणं आहे."
माँटेरो काही क्षण गप्प राहिला.
महारथ पुढे म्हणाले,
"अजूनही वेळ गेलेली नाही."
"राजीनामा द्या."
"घटनात्मक पद्धतीने सैन्याची सूत्रे माझ्याकडे सोपवा.."
"तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची वैयक्तिक जबाबदारी मी घेतो."
"देश सोडायचा निर्णय घेतलात..
तरीही सुरक्षित मार्ग दिला जाईल."
युद्धकक्षातील सर्व अधिकारी तो संवाद मूकपणे ऐकत होते.
माँटेरोने हळू आवाजात विचारले,
"आणि जर मी नकार दिला तर?"
महारथ यांचे उत्तर क्षणाचाही विलंब न करता आले.
"मग उद्या सकाळी.."
"तुमच्याकडे राष्ट्रपती भवन असेल.."
"पण राष्ट्र नसेल.."
"तुमच्याकडे गणवेश असेल."
"पण सैनिक नसतील.."
"आणि तुमच्याकडे सत्ता असेल.."
"पण ती मानणारा एकही नागरिक उरणार नाही.."
"तुम्ही बाप असाल परंतु संतती सोबत नसेल"
या वाक्याने कॉल कट झाला.
शेवटच्या वाक्याने खरे तर जनरल माँटेरोच्या हृदयातील धडधड वाढवली. मुलांच्या काळजीने तो मनाने पार ढेपाळला दोन मुलांपुढे त्याला सत्ता महत्त्वाची नव्हती.
युद्धकक्षात पुन्हा भयाण शांतता पसरली.
तेवढ्यात आणखी एक अधिकारी धावत आत आला.
"सर!"
"दक्षिण कमांडने अधिकृतपणे लेफ्टनंट जनरल महारथ यांच्याशी निष्ठा जाहीर केली आहे."
त्याच्या मागोमाग दुसरा अधिकारी आला.
"सर..
पूर्वेकडील दोन हवाई तळांनी तटस्थ भूमिका घेतली आहे."
तिसरा अधिकारी जवळजवळ धावतच आत आला.
"सर..
सैन्य मुख्यालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी पुढील आदेश स्वीकारण्यास नकार देत आहेत."
पहिल्यांदाच..
जनरल माँटेरो शांतपणे आपल्या खुर्चीत बसलेला दिसत होता खरा परंतु त्याच्या मनात विचार आणि भीतीचे वादळ उठले होते.
त्याने समोर पडलेल्या आपल्या टोपीकडे पाहिले.
तीच टोपी..
जिने त्याला वीस वर्षे निरंकुश सत्ता दिली.
पण आज..
तीच सत्ता त्याच्या हातातून वाळूसारखी निसटत होती.
दूर..
बेलवारीस विमानतळावर..
फ्लाइट पर्सरने घड्याळाकडे पाहिले.
रात्रीचे दहा वाजून अकरा मिनिटे झाली होती.
उरले होते..
फक्त दोन तास.
आणि त्या दोन तासांत..
रुथरीचा इतिहास कायमचा बदलणार होता.
ब)शेवटची रात्र
रात्रीचे अकरा वाजले.
मध्यरात्रीची अंतिम मुदत संपायला अवघा एक तास उरला होता.
बेलवारीस विमानतळावरील वातावरण आता अधिकच तणावपूर्ण झाले होते.
धावपट्टीवरील फ्लडलाइट्समुळे संपूर्ण परिसर दिवसासारखा उजळून निघाला होता. फ्लाईट A-709 विमानाभोवती घेराव घालून उभ्या असलेल्या कमांडो पथकांमध्ये पूर्ण शांतता होती. प्रत्येक जण आपल्या जागेवर स्थिर होता.
कोणालाही माहीत नव्हते..
पुढच्या साठ मिनिटांमध्ये गोळीबार होणार की इतिहास घडणार ?
रुथरीच्या राष्ट्रपती भवनात जनरल माँटेरो पुन्हा एकदा युद्धकक्षात उभा होता.
त्याच्या समोर गुप्तचर प्रमुख उभे होते.
"सर.."
"आमच्या विश्लेषकांनी एक महत्त्वाचा निष्कर्ष काढला आहे."
"बोल."
"विमानातील तथाकथित आत्मघाती बॉम्ब खरे आहेत की नाहीत ? याची अजूनही कोणालाही खात्री देता आलेली नाही."
माँटेरोने त्याच्याकडे रोखून पाहिले.
"म्हणजे?"
"सर.. ते ब्लफ करत असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही."
हे ऐकताच माँटेरोच्या डोळ्यांत पुन्हा एकदा आशेचा क्षीण किरण चमकला आणि दुसऱ्या क्षणीच तो विरला..
"जर ते खोटं असेल..तर माझी मुले ?"
"त्यांना सुरक्षित बाहेर काढता येईल,अजून खेळ संपलेला नाही."
क्षणाचाही विलंब न करता त्याने आदेश दिला.
"बेलवारीस सरकारशी पुन्हा संपर्क साधा."
"त्यांच्या कमांडो दलाला विमानात घुसण्याचा प्रस्ताव द्या."
"आमच्याकडील सर्व गुप्त माहिती त्यांना द्या."
काही मिनिटांनी हॉट लाईनवर बेलवारीसच्या पंतप्रधानांशी संपर्क झाला.
माँटेरोचा आवाज कठोर होता.
"डिअर PM..तुमच्या कमांडोंनी आता कारवाई केलीच पाहिजे."
दुसऱ्या बाजूने शांत उत्तर आले.
"जनरल.."
"तुमच्या मुलांच्या सुरक्षिततेची आम्हाला सुद्धा काळजी आहे.परंतु विषाची परीक्षा घेणार तरी कोण ? मी तरी घेणार नाही."
जनरल माँटेरो जवळ जवळ ओरडून म्हणाले "उशीर करू नका..कारवाई करा ?"
पलीकडून बेलवारीसचे पंतप्रधान ठाम आवाजात म्हणाले
"जनरल..हे तुमचे रुथरी नाही. इथे लोकशाही आहे जर काहीही अघटीत घडले तर माझ्या जनतेला मला उत्तर द्यावे लागणार आहे."
"ही लोकशाही असलेल्या बेलवारीसची भूमी आहे."
"आमच्या मंत्री मंडळाच्या आणि माझ्या परवानगीशिवाय इथे कोणतीही लष्करी कारवाई होणार नाही."
"आणि जोपर्यंत विमानातील निरपराध प्रवाशांचा जीव तातडीने धोक्यात नाही, तोपर्यंत आम्ही हल्ल्याचे कोणतेच आदेश देणार नाही."
हतबल होऊन माँटेरो काही क्षण गप्पच राहिला..
त्याला समजले..
या डावात तो आता एकटाच पडला आहे.
त्याच वेळी..
रुथरीच्या मध्यवर्ती लष्करी मुख्यालयात लेफ्टनंट जनरल महारथ दाखल झाले.
त्यांच्या आगमनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली.
कोणताही आदेश नव्हता.
कोणताही समारंभ नव्हता.
तरीही..
कॉरिडॉरमध्ये उभे असलेले अधिकारी एकामागून एक सावधान झाले.
आणि त्यांनी महारथ यांना सॅल्यूट केला.
त्या सॅल्यूटमध्ये आदेश नव्हता..
आदर होता.
विश्वास होता.
महारथ सभागृहात प्रवेश करताच एक ब्रिगेडियर पुढे आला.
"सर.."
"अकरा ब्रिगेड, चार हवाई तळ आणि नौदलाचा बहुतांश भाग तुमच्या आदेशाची वाट पाहत आहे."
दुसरा अधिकारी म्हणाला,
"सर..आम्ही आजवर शांत राहिलो."
"कारण आम्हाला गृहयुद्ध नको होतं."
महारथ काही क्षण शांत राहिले.
मग त्यांनी सभागृहात उपस्थित प्रत्येक अधिकाऱ्याकडे पाहिले.
"लक्षात ठेवा.."
"आजपासून रुथरीचा सैनिक रुथरीच्या सैनिकावर गोळी झाडणार नाही."
"आपण सत्ता मिळवण्यासाठी उभे नाही."
"आपण राष्ट्र वाचवण्यासाठी उभे आहोत."
सभागृहात टाळ्यांचा आवाज झाला नाही.
उपस्थित प्रत्येक अधिकाऱ्यांनी एकसाथ महारथ यांना पुन्हा एकदा कडक सॅल्यूट ठोकले.
त्या क्षणी महारथ यांना समजले..
निर्णय आता रणांगणावर नव्हे..
तर जनरल माँटेरोच्या मनात होणार होता.
बेलवारीस विमानतळावर..
VIP केबिनमध्ये बसलेल्या माँटेरो पुत्र लुईसने फ्लाइट पर्सरकडे पाहिले आणि म्हणाला..
"एक प्रश्न विचारू?"
तरुण फ्लाईट पर्सर म्हणाला..
"विचारा."
त्यावर लुईस म्हणाला,
"जर माझ्या वडिलांनी राजीनामा दिला नाही.."
"तर तुम्ही खरंच आम्हाला मारणार आहात कां ?"
फ्लाइट पर्सर काही क्षण शांत राहिला.
मग तो हळू आवाजात म्हणाला,
"सैनिकाला प्रत्येक लढाई जिंकायची नसते.."
"त्याला योग्य कारणासाठी ठामपणे उभं राहायचं असतं."
त्या उत्तरानंतर पुन्हा एकदा शांतता पसरली.
बाहेर..
घड्याळाने सव्वा अकराची वेळ दाखवली
आता उरले होते..
अवघे पंचेचाळीस मिनिटे.
आणि इतिहास..
अंतिम निर्णयाची वाट पाहत होता.
रात्रीचे अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे झाली होती.
मध्यरात्रीची अंतिम मुदत संपायला अवघी बारा मिनिटे उरली होती.
रुथरीच्या राष्ट्रपती भवनातील युद्धकक्षात जनरल माँटेरो एकटाच उभा होता.
त्याच्यासमोर देशाचा विशाल डिजिटल नकाशा झळकत होता.
काही तासांपूर्वी हिरव्या रंगात दिसणारे बहुतांश लष्करी तळ आता पिवळ्या रंगात बदलले होते.
त्या रंगाचा अर्थ एकच होता.
"आदेशाची प्रतीक्षा."
सैन्य अजूनही सज्ज होते..
पण ते आता आंधळेपणाने कोणाचेही आदेश पाळणार नव्हते.
तेवढ्यात दार उघडले.
संरक्षणमंत्री आत आले.
त्यांच्या चेहऱ्यावरची गंभीरता सर्व काही सांगून जात होती.
"सर.."
"आणखी तीन डिव्हिजनने लेफ्टनंट जनरल महारथ यांना निष्ठा जाहीर केली आहे."
माँटेरो काहीच बोलला नाही.
तो फक्त स्क्रीनकडे पाहत राहिला.
क्षणभराने गुप्तचर प्रमुख पुढे आले.
"सर.."
"जर आपण आज राजीनामा दिला नाही, तर उद्या सकाळी देशात गृहयुद्ध सुरू होण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे आणि तुमच्या मुलांचा जीव सुद्धा धोक्यात आहे."
माँटेरोने प्रथमच खुर्चीचा आधार घेतला.
त्याचा आवाज आता रागाचा नव्हता.
तो मनाने थकलेला होता.
"मी वीस वर्षे हा देश चालवला आहे.."
गुप्तचर प्रमुख शांतपणे म्हणाले,
"होय, सर."
"पण उद्या जर हा देशच तुटला.."
"तर त्या वीस वर्षांचा इतिहास कोण वाचणार?"
युद्धकक्षात पुन्हा शांतता पसरली.
त्याच वेळी..
बेलवारीस विमानतळावर.
फ्लाईट A 709 मधील VIP केबिनमध्ये माँटेरो पुत्र लुईस आणि व्हिक्टर आणि समोर हात बांधलेल्या अवस्थेत त्याचे सर्व सुरक्षा अधिकारी निशब्द आणि डोळ्यात भय असल्या सारखे वाटत होते.त्यांची सर्व हत्यारे तरुण फ्लाईट पर्सरने अगोदरच ताब्यात घेऊन त्यांना पूर्ण निशस्त्र करण्याची दक्षता घेतली होती.
त्या सर्वांच्या हातांना अजूनही प्लास्टिकचे बंधन होती.
पण त्यांच्याशी कोणतीही गैरवर्तणूक केली जात नव्हती.
फ्लाइट पर्सरने त्यांच्या समोर पाण्याच्या बाटल्या ठेवल्या.
व्हिक्टरने शांतपणे विचारले,
"तुम्हाला आमच्याबद्दल वैयक्तिक द्वेष आहे का?"
"नाही."
"मग आम्हालाच ओलीस का ठेवलंत?"
फ्लाइट पर्सर काही क्षण त्यांच्या डोळ्यांत पाहत राहिला.
मग म्हणाला,
"कारण तुमच्या वडिलांना सत्ता गमावण्याची भीती आहे.."
"पण तुम्हाला गमावण्याची नाही."
दोघेही शांत झाले.
पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा विचार दिसत होता.
काही क्षणांनी लुईस हळू आवाजात म्हणाला,
"जर आमच्या मृत्यूमुळे हजारो लोकांचा जीव वाचणार असेल.."
"तर कदाचित बाबा चुकीच्या बाजूला उभे आहेत."
त्या शब्दांनी VIP केबिनमध्ये हात बांधून ठेवलेले सुरक्षा अधिकारी सुद्धा क्षणभर आश्चर्य चकित झालेत...
त्यांपैकी एकाने नकळत मान खाली घातली.
रिपब्लिक ऑफ रुथरीचे राष्ट्रपती भवन..
रात्रीचे अकरा वाजून पंचावन्न मिनिटे.
माँटेरोच्या टेबलावरील हॉट लाईन फोन जोरात खणाणला
दुसऱ्या बाजूला बेलवारीसचे पंतप्रधान होते.
"जनरल.."
"तुमच्याकडे आता फक्त पाच मिनिटे उरली आहेत."
माँटेरोने शांतपणे उत्तर दिले,
"मी अजून निर्णय घेतलेला नाही."
पंतप्रधानांचा आवाज गंभीर झाला.
"निर्णय तुमचा आहे."
"पण लक्षात ठेवा.."
"उद्या सकाळी इतिहास तुमची ओळख कशी ठेवेल, हे या शेवटच्या पाच मिनिटांत ठरणार आहे."
कॉल संपला.
माँटेरो हळूहळू खिडकीजवळ गेला.
राष्ट्रपती भवनाबाहेर हजारो नागरिक उभे होते.
कोणी दगडफेक करत नव्हते.
कोणी हिंसा करत नव्हते.
ते शांततेत फक्त एकच घोषणा देत होते.."रुथरीला लोकशाही हवी!"
त्या घोषणेचा आवाज जाड काँक्रीटच्या भिंतींमधून सुद्धा युद्धकक्षा पर्यंत पोहोचत होता.
माँटेरोने डोळे मिटले.
पहिल्यांदाच त्याला जाणवले..
की सत्ता बंदुकीने जिंकता येते.
पण लोकांची इच्छा..
कधीच नाही.
भिंतीवरील डिजिटल घड्याळाने वेळ दाखवली,
२३:५८
आता उरली होती...
फक्त दोन मिनिटे.
आणि त्या दोन मिनिटांत..
एका हुकूमशहाचा निर्णय संपूर्ण राष्ट्राचे भविष्य ठरवणार होते.
ड ) मध्यरात्र..
२३:५९
रुथरीच्या राष्ट्रपती भवनातील युद्धकक्षात अशी शांतता पसरली होती की भिंतीवरील घड्याळाची टिकटिकही स्पष्ट ऐकू येत होती.
जनरल माँटेरो खिडकीसमोर उभा होता.
बाहेर हजारो नागरिक शांतपणे उभे होते.
हातात रुथेरीचे ध्वज फडकवत..
ओठांवर एकच घोषणा.
"रुथरीला लोकशाही हवी!"
कोणी दगड मारत नव्हते.कोणताच हलगुल्ला नव्हता.सर्व शांतीने सुरू होते.
कोणी सरकारी वाहने जाळत नव्हते.कोणत्याच सरकारी मालमत्तेचे नुकसान करत नव्हते.त्यांना लोकशाही काय असते आणि हुकूमशाही काय असते याचा अनुभव घेतलेली ती जनता होती.
ते आंदोलन हिंसेचे नव्हते.
तर ती लोकशाहीची मागणी होती.
माँटेरोने हळूहळू मागे वळून आपल्या अधिकाऱ्यांकडे पाहिले.
त्याच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा विरघळू लागला होता.
"जर मी राजीनामा दिला.."
तो हळू आवाजात म्हणाला,
"तर सैन्य देशाला एकत्र ठेवेल का?"
कोणीच उत्तर दिले नाही.
तेवढ्यात युद्धकक्षाचे दार उघडले.
गुप्तचर प्रमुख आत आले.
त्यांनी सलाम ठोकला.
"सर.."
"लेफ्टनंट जनरल महारथ यांचा संदेश आहे."
माँटेरोने शांतपणे विचारले,
"काय म्हणतो?"
"ते म्हणाले आहेत..."
'रुथरीचा एकही सैनिक दुसऱ्या सैनिकावर गोळी झाडणार नाही. तुमच्या कुटुंबाची संपूर्ण सुरक्षा माझी जबाबदारी असेल.'
माँटेरोने डोळे मिटले.
काही क्षण तो निश्चल उभा राहिला.
मग टेबलावर ठेवलेल्या आपल्या गणवेशावरील सर्वोच्च पदाचे चिन्ह हातात घेतले.
वीस वर्षांचा प्रवास..
एका क्षणात त्याच्या डोळ्यांसमोरून सरकून गेला.
हळूहळू त्याने एक कागद आपल्या समोर ओढला.
पेन हातात घेतला.
काही सेकंद..
संपूर्ण युद्धकक्ष त्याच्याकडे पाहत होता.
आणि मग..
त्याने सही केली.
राजीनामा.
घड्याळाने...
००:००
दाखवले.
काही मिनिटांतच राष्ट्रपती भवनातून अधिकृत निवेदन प्रसारित झाले.
"जनरल माँटेरो यांनी रुथरीच्या सशस्त्र दलाच्या सर्वोच्च पदाचा राजीनामा दिला असून, अंतरिम स्वरूपात लेफ्टनंट जनरल महारथ यांच्याकडे जनरल पदाची सूत्रे सोपविण्यात येत आहेत."
त्या एका घोषणेने संपूर्ण रुथरी हादरला.
रस्त्यांवर उभे असलेले हजारो नागरिक जल्लोष करू लागले.
लोक एकमेकांना मिठ्या मारत होते.
अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.
ती विजयाची नव्हे..
तर भीती संपल्याची रात्र होती.
बेलवारीस विमानतळावर..
फ्लाइट पर्सरच्या मनगटावरील घड्याळाने हलका कंपन दिला.
त्याने सांकेतिक संदेश उघडला.
त्यावर फक्त चार शब्द होते.
"मिशन पूर्ण...सत्ता हस्तांतरित."
फ्लाइट पर्सरने दीर्घ श्वास घेतला.
त्याने आपल्या सहकाऱ्यांकडे पाहिले.
सर्वांनी शांतपणे मान डोलावली.
त्याने इंटरकॉम उचलला.
"सर्व प्रवाशांचे लक्ष असू द्या."
"आमच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत."
"काही मिनिटांत तुम्हा सर्वांना सुरक्षित सोडण्यात येईल."
क्षणभर संपूर्ण विमानात शांतता पसरली.
आणि मग..
प्रवाशांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
काहीजण रडत होते.
काहीजण देवाचे आभार मानत होते.
लुईस आणि व्हिक्टर एकमेकांकडे पाहत राहिले.
त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा नि:श्वास होता.
पण त्याचबरोबर..
त्यांच्या आयुष्यातील एका युगाचा अंतही झाला होता.
विमानाचे दरवाजे हळूहळू उघडू लागले.
बाहेर बेलवारीसचे विशेष सुरक्षा पथक सज्ज उभे होते.
इतिहासातील सर्वात धाडसी मोहिमेचा..
शेवटचा अंक सुरू झाला होता.
ड) भीतीचे सर्वात मोठे शस्त्र
बेलवारीस विमानतळ..
मध्यरात्र उलटून काही मिनिटे झाली होती.
विमानाचे दरवाजे हळूहळू उघडले.
सर्वप्रथम लहान मुले, महिला, वृद्ध आणि इतर प्रवाशांना एकामागोमाग एक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
धावपट्टीवर उभ्या वैद्यकीय पथकाने प्रत्येकाची प्रकृती तपासली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे..
दोनशेहून अधिक प्रवाशांपैकी एकालाही गंभीर दुखापत झाली नव्हती.
जगभरातील वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे त्या प्रत्येक क्षणाचे थेट प्रक्षेपण करत होते.
प्रवासी सुरक्षित बाहेर पडताच बेलवारीसच्या विशेष कमांडो दलाने अत्यंत सावधपणे विमानाचा ताबा घेतला.
आदेश स्पष्ट होता
"सर्वप्रथम स्फोटकांची तपासणी."
बॉम्ब निकामी करणारे तज्ज्ञ विमानात शिरले.
चारही अपहरणकर्त्यांना वेगळे करण्यात आले.
त्यांच्या अंगाला बांधलेली तथाकथित आत्मघाती स्फोटके अत्यंत काळजीपूर्वक काढण्यात आली. त्यांची पिस्तुले आणि त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची हस्तगत केलेली सर्व शस्त्रे ताब्यात घेण्यात आलीत.
संपूर्ण धावपट्टीवर श्वास रोखून प्रतीक्षा सुरू होती.
काही मिनिटांनंतर..
मुख्य स्फोटकतज्ज्ञ विमानातून बाहेर आला.
पत्रकारांनी त्याला वेढा घातला.
कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकू लागले.
त्याने मायक्रोफोनसमोर उभे राहून शांतपणे घोषणा केली.
"आमच्या प्राथमिक तपासणीनुसार अपहरणकर्त्यांकडील उपकरणांमध्ये कोणतेही स्फोटक पदार्थ आढळलेले नाहीत."
क्षणभर संपूर्ण परिसर स्तब्ध झाला.
तो पुढे म्हणाला,
"चार अपहरणकर्ते यांच्या कडील सर्व उपकरणे अत्यंत वास्तववादी पद्धतीने तयार करण्यात आली होती. त्यांवर लावलेले दिवे, वायरिंग आणि इलेक्ट्रॉनिक भाग पाहून ती खरी आत्मघाती स्फोटके असल्याचा भास होत होता."
"पण.."
"ती पूर्णपणे बनावट होती."
एकच खळबळ उडाली.
पत्रकार एकमेकांकडे पाहू लागले.
जगभरातील वृत्तवाहिन्यांनी तात्काळ 'ब्रेकिंग न्यूज' झळकवली.
"आत्मघाती बॉम्ब बनावट निघाले!"
मात्र धक्का इथेच संपला नव्हता.
बॅलिस्टिक तज्ज्ञांनी अपहरणकर्त्यांकडून जप्त केलेल्या पिस्तुलांची आणि बंदुकींची तपासणी सुरू केली.
काही वेळाने त्यांचाही अहवाल आला.
"अपहरणकर्त्यांकडून मिळवलेली पिस्तुले ही बिलकुल कार्यक्षम नव्हती. मात्र लुईस आणि व्हिक्टर यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून अपहरणकर्त्यांनी हस्तगत केलेली शस्त्रे ही खरीखुरी होती. "
"अपहरणकर्त्यांकडून मिळवलेली पिस्तुले आणि स्फोटक उपकरणे हे विशेष पद्धतीने तयार केलेल्या प्रतिकृत्या होत्या."
"यातून गोळी झाडणे किंवा बॉम्ब फोडणे शक्यच नव्हते "
"त्यांची रचनाच अशी करण्यात आली होती की यांत्रिक सुरक्षा तपासणीत सुद्धा ती खरी घातक शस्त्रे वाटत नव्हती, त्यामुळे त्यांचा विमानात सहज प्रवेश शक्य झाला."
आता मात्र संपूर्ण जग हादरले.
इतिहासातील सर्वात धाडसी विमान अपहरण..
एकही खरी गोळी न झाडता..
एकही खरे स्फोटक न वापरता..
एका हुकूमशहाला सत्ता सोडण्यास भाग पाडण्यात यशस्वी झाले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी..
बेलवारीसच्या लष्करी तळावर एक विशेष लष्करी विमान उतरले.
त्यातून रिपब्लिक ऑफ रुथरीचे जनरल महारथ स्वतः खाली उतरले.
बेलवारीस सरकारचे लष्करी अधिकारी त्यांच्या स्वागतासाठी उभे होते.
पाचही अपहरणकर्त्यांना सुरक्षा वर्तुळातून बाहेर आणण्यात आले.
त्या चौघांनी एका मागोमाग एक मान तुकवून, जनरल महारथ यांना वंदना दिली
महारथ काही क्षण त्यांच्याकडे न बोलता पाहत राहिले.
मग ते पुढे आले.
त्यांनी स्वतः त्यांच्या हातांवरील त्यांचा हातावरील बांधलेली बंधने दूर केली.
त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते..
पण गर्व नव्हता.
ते शांतपणे म्हणाले,
"आज जग तुम्हाला अपहरणकर्ते म्हणत आहे."
"कदाचित काही जण तुम्हाला गुन्हेगारही म्हणतील."
"पण मला माहीत आहे.."
"आज तुम्ही हजारो सैनिकांचे आणि लाखो नागरिकांचे प्राण वाचवले आहेत."
काही क्षण शांतता पसरली.
महारथ पुढे म्हणाले,
"खरे शौर्य म्हणजे शत्रूचा नाश करणे नव्हे.."
"तर रक्ताचा एक थेंबही न सांडता, शांतपूर्ण पद्धतीने युद्ध जिंकणे होय.."
तरुण फ्लाइट पर्सर हलकेसे हसला.
तो म्हणाला,
"सर.."
"जर त्यांना सुरुवातीलाच समजलं असतं की आमच्याकडे ना खरे बॉम्ब आहेत.."
"ना खरी पिस्तुले..तर ? "
महारथ त्याचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच म्हणाले,
"मला माहीत होते."
ते क्षणभर थांबले.
मग प्रशांत महासागराकडे नजर लावत म्हणाले
"युद्धात सर्वात प्रभावी शस्त्र बंदूक नसते.."
"तर शत्रूच्या मनात निर्माण केलेली भीती असते."
विशेष लष्करी विमानाने पुन्हा आकाशात झेप घेतली.
खाली अथांग प्रशांत महासागर शांत होता.
आणि वर..
रिपब्लिक ऑफ रुथरीच्या इतिहासातील नव्या पर्वाची पहाट उगवत होती..
क्रमशः-... 🖋️📚📖
🔗पुढील एपिसोड 7 या उपसंहार भागात भेटूया..
जिथे रुथरीच्या नव्या लोकशाहीचा प्रवास, महारथ यांचा निर्णय आणि या मोहिमेचा इतिहासावर झालेला कायमस्वरूपी प्रभाव उलगडेल.👉
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
👨🏻💼 Connect With Us
📧 Gmail: sjomkar21@gmail.com
🔗 वरील कोणत्याही सोशल मिडिया नावावर क्लिक करून आमच्या अधिकृत सोशल मीडिया प्रोफाइलला भेट द्या.
ℹ️ सूचना: काही लिंक उघडताना गुगल कडून "Redirect Notice" दिसू शकते. अशा वेळी कृपया "Redirect" वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही आमच्या अधिकृत प्रोफाइलवर पोहोचाल.
© All Rights Reserved


शस्त्रांपेक्षा बुद्धिमत्ता मोठी असते, हे या कथेने प्रभावीपणे दाखवून दिले आहे.
उत्तर द्याहटवाखरे आहे..तेच महत्त्वाचं आहे
हटवालोकशाही, धैर्य आणि नेतृत्वाचा इतका प्रभावी संगम क्वचितच वाचायला मिळतो. उत्कृष्ट
उत्तर द्याहटवाधन्यवाद...
उत्तर द्याहटवा