मुख्य सामग्रीवर वगळा

5)रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | अल्टिमेटम (Episode 5)

 रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | अल्टिमेटम (Episode 5)

रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | अल्टिमेटम (Episode 5) चे मुखपृष्ठ – एअर रुथरी A-709 बेलवारीस आयलंडवर, जनरल माँटेरोसमोर १२ तासांचे अंतिम अल्टिमेटम, लुईस आणि व्हिक्टर ओलीस, आणि रुथरीच्या भविष्याचा निर्णायक क्षण दर्शवणारी थरारक प्रतिमा.

🔗रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | हायजॅक (Episode 4) 👉

  रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | हायजॅक (Episode 4) मध्ये अनेक महिन्यांपासून आखलेल्या 'ऑपरेशन ट्विन्स'ची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होते.मागील भाग वाचला नसेल तर लिंक वर क्लिक करून अगोदर तो वाचवा त्या नंतर पुढील भाग 5 वाचा..

रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | अल्टिमेटम (Episode 5)

रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | अल्टिमेटम (Episode 5) मध्ये इतिहासातील सर्वात धाडसी मानसशास्त्रीय मोहिमेचा निर्णायक टप्पा सुरू होतो. रुथरी एअर लाइन्सचे A-709 बेलवारीस आयलंडवर सुरक्षित उतरते आणि जनरल माँटेरोसमोर अवघ्या १२ तासांचे अंतिम अल्टिमेटम ठेवले जाते.सत्ता सोडा किंवा परिणामांना सामोरे जा. लुईस आणि व्हिक्टर ओलीस असताना संपूर्ण जगाचे लक्ष एका विमानावर खिळते. बेलवारीस सरकार, रुथरीचे लष्करी मुख्यालय, आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्था आणि जागतिक वृत्तमाध्यमे प्रत्येक क्षणावर नजर ठेवून असतात. दुसरीकडे, लेफ्टनंट जनरल महारथ यांची संयमी पण अचूक रणनीती जनरल माँटेरोच्या सत्तेचा पाया हादरवू लागते. लोकशाही, हुकूमशाही, लष्करी रणनीती, मानसिक दबाव, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि मानवी धैर्य यांचा थरारक संगम असलेला हा भाग संपूर्ण मालिकेला क्लायमॅक्सकडे नेणारा सर्वात महत्त्वाचा अध्याय ठरतो.

अ) जगाचे लक्ष एका धावपट्टीवर..बेलवारीस

सुमारे तीन तासांच्या उड्डाणानंतर रुथरीचे एअर लाइन्सचे A-709 विमान अथांग प्रशांत महासागराच्या मध्यभागी वसलेल्या बेलवारीस आयलंडच्या हवाई हद्दीत प्रवेश करत होते.
खिडकीबाहेर निळ्याशार समुद्रात पाचूसारखे चमकणारे छोटेसे बेट दिसू लागले.
घनदाट हिरवी जंगले..
पांढरा शुभ्र समुद्र किनारा..

आणि समुद्राच्या कुशीत विसावलेला पोर्ट सॅन्टन आंतरराष्ट्रीय विमानतळ.

वरून पाहता ते बेट एखाद्या पर्यटन स्थळासारखे शांत दिसत होते.

परंतु काही मिनिटांतच ते जगातील सर्वात संवेदनशील राजकीय संकटाचे केंद्र बनणार होते.

कॉकपिटमध्ये कॅप्टन पॉलिन यांनी बेलवारीस एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला.

"पोर्ट सॅन्टन एअर कंट्रोल,  रुथरी एअर लाइन्सचे फ्लाइट A-709 हे विमान लँड करायला इमर्जेन्सी परवानगी द्या."

त्यांचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच फ्लाइट पर्सरने मायक्रोफोन आपल्या हातात घेतला.

त्याने काही क्षण डोळे मिटले.

जणू प्रत्येक शब्द आधी मनात तोलून पाहत होता.

मग अत्यंत शांत, स्पष्ट आणि ठाम आवाजात तो बोलू लागला

"मी  रुथरी एअर लाइन्स फ्लाइट A-709 मधून बोलत आहे.

हे विमान आमच्या ताब्यात आहे,आम्ही ते हायजॅक केलेले आहे.

रुथरीचे जनरल माँटेरो यांचे जुळे मुलगे लुईस आणि व्हिक्टर सध्या आमच्या ताब्यात आहेत.

त्यांच्या जीवाला आम्ही विनाकारण धोका निर्माण करणार नाही. आम्हाला पोर्ट सॅन्टन वर उतरायला परवानगी द्या..

उतरल्यावर आमच्याविरुद्ध कोणतीही लष्करी कारवाई, घुसखोरी किंवा फसवणुकीचा प्रयत्न झाला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी जनरल माँटेरो यांच्यावर असेल.त्यांच्या दोन मुलांचा जीव धोक्यात घालू नका.."

कंट्रोल टॉवरमध्ये क्षणात शांतता पसरली.

सर्व अधिकारी एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांनी विमानाला लॅन्ड करायला परवानगी दिली. 

फ्लाईट A-709 ने पोर्ट सॅन्टनच्या धावपट्टीवर उडत येत अलगद स्पर्श केला.

पुढे विमान हळूहळू धावत जाऊन एका दुर्गम स्टँडवर थांबले.

इंजिनांचा आवाज मंदावत गेला.

विमान शांतपणे पोर्ट सॅन्टन या शांत आणि रहदारी नसलेल्या एअर पोर्ट वर उतरले. विमान लँड झाल्यावर फ्लाइट पर्सर ने पुन्हा माईक हातात घेऊन  पुढे तो  म्हणाला..पोर्ट सॅन्टन एअर कंट्रोल रूम स्थानिक वेळेनुसार सध्या दुपारचे बारा वाजले आहेत.

आज मध्यरात्री बारा वाजण्यापूर्वी जनरल माँटेरो यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.

रुथरीच्या सशस्त्र दलाची सूत्रे अधिकृतपणे लेफ्टनंट जनरल महारथ यांच्या हाती सोपवावीत.

अन्यथा..

आम्ही आमच्या मोहिमेचा शेवटचा टप्पा पूर्ण करू."

त्याने शेवटचे वाक्य मुद्दाम सावकाश उच्चारले,

"या संदेशानंतर आम्ही कोणताही पुढील संपर्क साधणार नाही.

बेलवारीस सरकारने हा संदेश कोणताही बदल न करता तातडीने जनरल माँटेरो यांच्यापर्यंत पोहोचवावा."

संदेश संपला.

फ्लाइट पर्सरने रेडिओ संच बंद केला.

कॉकपिटमध्ये पुन्हा एकदा पूर्ण शांतता पसरली.

कंट्रोल टॉवरमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने थरथरत्या हाताने फोन उचलला.

"तात्काळ.."

"बेलवारीसच्या..पंतप्रधान महोदयांना तत्काळ कॉल जोडा."

काही मिनिटांनी..

संपूर्ण विमानतळावर सायरन वाजू लागले.

विशेष पोलीस दल.

कमांडो.

अग्निशमन दल.

रुग्णवाहिका.

स्फोटक निकामी करणारे पथक.

सर्व यंत्रणा काही मिनिटांत धावपट्टीवर दाखल झाल्या.

रुथरी एअर लाइन्सच्या A- 709 विमानाभोवती सुरक्षित अंतर ठेवून एक किलोमीटरचा सुरक्षा घेरा तयार करण्यात आला.

स्नायपर्स एअर पोर्टच्या इमारतींच्या छतांवर तैनात करण्यात आले.

पण त्यांना एकच आदेश देण्यात आला होता

"विमानातून गोळीबार होत नाही, तोपर्यंत ट्रिगर दाबायचा नाही."

दरम्यान..

बेलवारीसच्या संसद भवनात आपत्कालीन बैठक सुरू झाली होती.

पंतप्रधान, संरक्षणमंत्री, लष्करप्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि गुप्तचर प्रमुख एका टेबलाभोवती बसले होते.

टेबलाच्या मध्यभागी फक्त एकच कागद ठेवलेला होता.

त्यावर लिहिले होते

"जनरल माँटेरो यांनी मध्यरात्रीपूर्वी राजीनामा द्यावा."

पंतप्रधानांनी दीर्घ श्वास घेतला.

मग उपस्थित अधिकाऱ्यांकडे पाहत म्हणाले

"मित्रांनो..

आज आपल्या धावपट्टीवर फक्त एक विमान उतरलेले नाही,तर एका सार्वभौम्य राष्ट्राचे भवितव्य उतरले आहे."

ब) बारा तासांची उलटगणना..

बेलवारीसच्या पंतप्रधानांनी आपत्कालीन बैठकीतील सर्व चर्चा थांबवली.

त्यांनी मोठ्या स्क्रीनवर उभ्या असलेल्या A-709 विमानाकडे काही क्षण शांतपणे पाहिले.

मग त्यांनी एकच आदेश दिला.

"जोपर्यंत विमानातील प्रवाशांच्या जीवाला तात्काळ धोका निर्माण होत नाही. तोपर्यंत कोणतीही लष्करी कारवाई केली जाणार नाही."

लष्करप्रमुखांनी विचारले,

"सर.. रुथरीकडून दबाव येईल."

"येऊ द्या."

पंतप्रधान शांतपणे म्हणाले,

"पण आपल्या भूमीवर निष्पाप लोकांचा जीव धोक्यात घालणारा निर्णय आपण घेणार नाही."

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी लगेच पुढचा आदेश दिला.

"विमानाभोवती एक किलोमीटरचा सुरक्षा घेरा कायम ठेवा."

"स्नायपर्स सज्ज राहतील."

"पण गोळीबाराचा आदेश  पंतप्रधानांच्या परवानगीशिवाय दिला जाणार नाही."

धावपट्टीवरील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले.

दरम्यान..

पोर्ट एमेरादो.

रुथरीचे राष्ट्रपती भवन.

युद्ध नियंत्रण कक्षाचा दरवाजा जोरात उघडला.

"सर !"

एक अधिकारी धापा टाकत आत आला.

"बेलवारीस मधून अधिकृत संदेश आला आहे."

जनरल माँटेरोने कागद हिसकावून घेतला.

पहिली ओळ वाचताच त्याच्या चेहऱ्यावरील रक्त डोळ्यात उतरले.

"लुईस आणि व्हिक्टर आमच्या ताब्यात आहेत.."

पुढच्या क्षणी त्याने संतापाने काचेचा ग्लास भिंतीवर आपटला.

"अशक्य!"

"त्यांची सुरक्षा कोणीच भेदूच शकत नाही !"

युद्धकक्षात कोणीच बोलले नाही.

सगळ्यांना माहिती होते..

हे वास्तव होते.

माँटेरोने तात्काळ आदेश दिला.

"रेड अलर्ट!"

क्षणात संपूर्ण रुथरीमध्ये लष्करी यंत्रणा सक्रिय झाली.

हवाई दलाला सज्ज राहण्याचा आदेश देण्यात आला.

नौदलाने प्रमुख युद्धनौका समुद्रात रवाना केल्या.

विशेष कमांडो युनिट्सना हालचालीचे आदेश मिळाले.

राजधानीतील सर्व सरकारी इमारतींवर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली.

तेवढ्यात गुप्तचर प्रमुख पुढे आले.

"सर..एक गंभीर अडचण आहे."

माँटेरोने रागाने विचारले,

"आता आणखी काय?"

"बेलवारीस हे सार्वभौम राष्ट्र आहे."

"त्यांच्या परवानगीशिवाय आपण तेथे सैन्य पाठवू शकत नाही."

"तसे केले तर तो थेट आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग ठरेल."

युद्ध कक्षात पुन्हा शांतता पसरली.

माँटेरोला हे सत्य नाकारता येत नव्हते.

दुसरीकडे..

बेलवारीस सरकारवरही तितकाच दबाव वाढत होता.

रुथरीचे राजदूत सतत संपर्क साधत होते.

"विमानावर तात्काळ कमांडो कारवाई करा."

"अपहरणकर्त्यांना अटक करा."

"आमच्या नागरिकांची सुटका करा."

पण बेलवारीसचे उत्तर प्रत्येक वेळी एकच होते.

"विमानात दोनशेहून अधिक निरपराध प्रवासी आहेत."

"त्यांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले जाईल."

अवघ्या अर्ध्या तासात ही बातमी जगभर पसरली.

आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी नियमित कार्यक्रम थांबवले.

"रुथरीच्या हुकूमशहाच्या जुळ्या मुलांचे अपहरण!"

"बेलवारीस मध्ये रुथेरीचे विमान उतरले!"

"मध्यरात्रीपर्यंत सत्ता हस्तांतराची मागणी!"

हे मथळे प्रत्येक स्क्रीनवर झळकू लागले.

पोर्ट सॅन्टन विमानतळाबाहेर, बेलवारीस मध्ये  त्यावेळी उपस्थित असलेल्या जगभरातील पत्रकारांची  आणि स्थानिक पत्रकारांची बातमी कव्हर करण्यासाठी झुंबड उडाली..

प्रत्येकजण एकाच प्रश्नाचे उत्तर शोधत होता

मध्यरात्री काय होणार?

विमानाच्या आत मात्र चित्र वेगळे होते.

अपहरणकर्त्यांनी प्रवाशांना अन्न आणि पाणी वाटण्यास सुरुवात केली.

एका वृद्ध महिलेला औषधाची गरज होती.

एअर होस्टेसने स्वतः तिची काळजी घेतली.

दोन लहान मुलांना भीती वाटू लागल्यावर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हे दृश्य पाहून एका परदेशी प्रवाशाने हळू आवाजात म्हटले,

"हे लोक दहशतवादी वाटत नाहीत.."

त्याच्या शेजारी बसलेला दुसरा प्रवासी म्हणाला,

"नाही.."

"हे तर आपत्ती निवारक वाटतात.."

VIP केबिनमध्ये लुईस खिडकीबाहेर पाहत होता.

धावपट्टीभोवती उभे असलेले कमांडो, पोलीस आणि स्नायपर्स त्याला स्पष्ट दिसत होते.

त्याने फ्लाइट पर्सरला विचारले,

"तुम्ही खरंच मध्यरात्रीपर्यंत थांबणार आहात?"

फ्लाइट पर्सरने घड्याळाकडे पाहिले.

त्यात दुपारचे बारा वाजून अकरा मिनिटे झाली होती.

तो शांतपणे म्हणाला

"हो."

"कारण आता.."

"उलटगणना सुरू झाली आहे."

त्याच क्षणी..

बेलवारीस, रुथरी आणि जगभरातील प्रत्येक स्क्रीनवर काउंट डाउनचा एकच आकडा झळकत होता.

शिल्लक वेळ: ११ तास ४९ मिनिटे.

क) पहिली चाल, पहिला धक्का

बेलवारीस विमानतळावर दुपारचे ऊन तळपत होते.

A-709 विमान धावपट्टीच्या टोकाला निश्चल उभे होते.

त्याभोवती एक किलोमीटरचा सुरक्षा घेरा उभारण्यात आला होता. विशेष कमांडो दल, स्नायपर्स, स्फोटक निकामी करणारे तज्ज्ञ, अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके पूर्ण सज्ज होती.

मात्र..

सर्वांनाच एकच आदेश होता

"कोणतीही घाई करायची नाही."

विमानातील प्रत्येक प्रवाशाचा जीव आता निर्णयाच्या केंद्रस्थानी होता.

दरम्यान, बेलवारीसच्या पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला विचारले,

"विमानातून आतापर्यंत काय दिसत आहे?"

मोठ्या स्क्रीनवरून थेट दृश्य दाखवले गेले.

प्रवाशांना अन्न दिले जात होते.

लहान मुलांना शांत केले जात होते.

एका वृद्ध प्रवाशाची प्रकृती बिघडल्यावर त्याला औषध देण्यात आले होते.

एकाही प्रवाशाला मारहाण करण्यात आलेली नव्हती.

गोळीबार झाला नव्हता.

कोणताही अनावश्यक गोंधळ नव्हता.

सल्लागार शांतपणे म्हणाला,

"सर.. हे लोक प्रवाशांचा वापर ढाल म्हणून करत आहेत, पण त्यांना इजा करण्याचा त्यांचा हेतू दिसत नाही."

पंतप्रधान काही क्षण विचारात पडले.

"म्हणजे.."

"आपण दहशतवाद्यांसमोर नाही.."

"तर एका नियोजनबद्ध राजकीय कारवाईसमोर उभे आहोत."

याच वेळी विमानाचा पुढचा दरवाजा काही इंच उघडला.

संपूर्ण सुरक्षा दल क्षणात सतर्क झाले.

स्नायपर्सनी रायफलची नळी लक्ष्यावर स्थिर केली.

कमांडो पुढे सरकले.

मात्र दारातून बाहेर आली..

एक एअर होस्टेस.

तिच्या एका हातात पांढरा झेंडा होता.

दुसऱ्या हातात सीलबंद लिफाफा.

ती अतिशय सावकाश चालत सुरक्षा रेषेपर्यंत आली.

थांबली.

आणि म्हणाली,

"हा संदेश फक्त बेलवारीसच्या पंतप्रधानांसाठी आहे."

कमांडोंनी तिला वेढा घातला.

स्फोटक तपासणी करण्यात आली.

काहीच संशयास्पद आढळले नाही.

लिफाफा तातडीने पंतप्रधानांकडे पोहोचवण्यात आला.

आणि त्या एअर होस्टेसला परत विमानात सुरक्षित पाठविण्यात आले,

जर तिला पकडून नेले असते तर विमानातील बाकीचे तिघे काहीतरी आक्रित करतील या संशयाने..

बेलवारीच्या PMO मधील मिटिंग हॉल मध्ये पूर्ण शांतता होती.

बेलवारीस पंतप्रधानांनी लिफाफा उघडला.

आत एकच पान होते.

त्यावर स्वच्छ अक्षरांत लिहिले होते.

"आम्ही दहशतवादी नाही."
"आमचे लक्ष्य कोणत्याही निरपराध प्रवाशाला इजा करणे नाही."
"आमची लढाई एका हुकूमशहाविरुद्ध आहे."

"जनरल माँटेरो यांनी मध्यरात्रीपूर्वी राजीनामा दिल्यास सर्व ओलीस सुखरूप मुक्त केले जातील."

शेवटी फक्त एकच ओळ होती.

"आमच्या मागणीचा राजकीय सौदेबाजीसाठी वापर करू नका."

पत्र वाचून मिटिंग हॉल मध्ये पुन्हा शांतता पसरली.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हळूच म्हणाला,

"सर.."

"हे पत्र लिहिणारा माणूस प्रशिक्षित आहे."

"यातील प्रत्येक शब्द विचारपूर्वक निवडला आहे."

त्याच वेळी..

रुथरीच्या राष्ट्रपती भवनात जनरल माँटेरोने स्वतःची पहिली गुप्त चाल खेळली.

त्याने फक्त तीन शब्द उच्चारले,

"ऑपरेशन आयर्न फँग."

क्षणात युद्धकक्ष जिवंत झाला.

देशातील सर्वोत्तम बारा कमांडो निवडण्यात आले.

त्यांना अत्याधुनिक शस्त्रे, रात्रीच्या कारवायांसाठीचे साहित्य आणि गुप्त प्रवेशासाठी लागणारे उपकरण देण्यात आले.

त्यांचे उद्दिष्ट एकच होते.

बेलवारीसमध्ये गुप्तपणे प्रवेश करायचा..

लुईस आणि व्हिक्टरला जिवंत परत आणायचे.

पण..

माँटेरोला एक गोष्ट माहिती नव्हती.

त्याच युद्धकक्षात बसलेला एक वरिष्ठ अधिकारी अनेक वर्षांपासून महारथचा विश्वासू माणूस होता.

बैठक संपताच त्याने आपल्या मनगटावरील घड्याळाच्या काचेवर तीन वेळा बोट फिरवले.

ते साधे घड्याळ नव्हते.

तो एक सूक्ष्म एन्क्रिप्टेड ट्रान्समीटर होता.

अवघ्या दहा सेकंदांत एक सांकेतिक संदेश बेलवारीसला रवाना झाला.

"ऑपरेशन आयर्न फँग सुरू."

"बारा कमांडो मार्गस्थ."

बेलवारीसमधील एका सुरक्षित ठिकाणी बसलेल्या महारथच्या गुप्तहेराने तो संदेश वाचला.

त्याने तात्काळ विमानातील फ्लाइट पर्सरकडे फक्त तीन शब्दांचा सांकेतिक संदेश पाठवला.

"पाहुणे येत आहेत."

संदेश वाचताच फ्लाइट पर्सरच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले.

त्याने खिडकीबाहेर उभ्या असलेल्या कमांडोंकडे पाहिले..

आणि मनातच पुटपुटला

"जनरल माँटेरो.."

"तुम्ही अजूनही दोन चाली मागे आहात."

त्या क्षणी..

हे स्पष्ट झाले की संघर्ष आता फक्त विमानातील अपहरणकर्ते आणि हुकूमशहा यांच्यात राहिला नव्हता.

तो दोन विलक्षण बुद्धिमान सेनानीं मधील बुद्धिबळाचा डाव बनला होता.

आणि पटावरची पुढची चाल..

कोणाचा इतिहास लिहिणार होती.

ड) हुकूमशहाच्या पायाखालची वाळू सरकायला सुरवात झाली.

संध्याकाळचे सहा वाजले होते.

मध्यरात्रीची अंतिम मुदत संपायला अवघे सहा तास उरले होते.

बेलवारीस विमानतळावरील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होते. सूर्य हळूहळू क्षितिजाकडे झुकत होता. धावपट्टीवर उभे असलेले A-709 आता फ्लडलाइट्सच्या प्रकाशात न्हाऊ लागले होते.

बाहेर जगातील जवळपास प्रत्येक मोठ्या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कॅमेरे फक्त एका विमानावर खिळले होते.

आणि संपूर्ण जग..

एका निर्णयाची वाट पाहत होते.

दरम्यान..

रुथरीच्या राष्ट्रपती भवनातील युद्धकक्षात जनरल माँटेरो सतत पुढे-मागे फेऱ्या मारत होता.

मोठ्या डिजिटल स्क्रीनवर देशाचा नकाशा दिसत होता.

प्रत्येक लष्करी तळाची स्थिती, प्रत्येक ब्रिगेडची हालचाल आणि प्रत्येक गुप्त अहवाल त्याच्यासमोर येत होता.

तेवढ्यात एक वरिष्ठ अधिकारी धावत आत आला.

"सर.."

"राजधानीच्या मध्यभागी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत."

माँटेरोने त्याच्याकडे पाहिले.

"पोलीस?"

"त्यांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला."

"मग?"

"सर..लोक मागे हटले नाहीत."

दुसरा अधिकारी आत आला.

"सर.."

"पश्चिम विभागातही निदर्शने सुरू झाली आहेत."

काही क्षणांत तिसरा अधिकारी आला.

"सर.. विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी वर्ग बंद करून मोर्चा काढला आहे."

युद्धकक्षातील वातावरण अधिकच गंभीर झाले.

माँटेरोने कठोर आवाजात आदेश दिला.

"जमाव पांगवा."

"गरज पडली तर अश्रुधूर वापरा."

"तरीही ऐकले नाहीत तर अटक करा."

आदेश क्षणात देशभर पोहोचले.

पण..

पंधरा मिनिटांनी आलेला अहवाल अपेक्षेपेक्षा वेगळाच होता.

"सर.."

"काही सैनिकांनी आंदोलकांवर कारवाई करण्यास नकार दिला आहे."

माँटेरो क्षणभर जागेवरच थांबला.

"काय म्हणालास?"

"सर.. त्यांनी सांगितले की ते निःशस्त्र नागरिकांवर गोळी झाडणार नाहीत."

युद्धकक्षात उपस्थित सर्व अधिकारी एकमेकांकडे पाहू लागले.

हे पहिल्यांदाच घडत होते.

त्याच वेळी..

रुथरीच्या मध्य लष्करी मुख्यालयात लेफ्टनंट जनरल महारथ आपल्या कार्यालयात शांतपणे बसले होते.

त्यांच्यासमोर देशाचा डिजिटल नकाशा उघडा होता.

एकामागून एक सांकेतिक संदेश त्यांच्या सुरक्षित टर्मिनलवर येत होते.

दक्षिण ब्रिगेड - शांत.

पूर्व विभाग - प्रतीक्षेत.

नौदल -आदेशाची वाट पाहत आहे.

महारथ प्रत्येक संदेश वाचत होते..

पण त्यांनी अजूनही कोणताही आदेश दिला नव्हता.

त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या ब्रिगेडियरने विचारले,

"सर.."

"आता आपण पुढे जाऊ का?"

महारथने नकारार्थी मान हलवली.

"नाही."

"पहिली गोळी आपण झाडणार नाही."

"इतिहासात आपल्या नावासमोर रक्ताचे डाग नकोत."

ब्रिगेडियर शांत झाला.

दरम्यान..

बेलवारीस विमानतळावर.

लुईस खिडकीतून बाहेर पाहत होता.

दूरवर उभ्या असलेल्या पत्रकारांच्या व्हॅन्स, कमांडो आणि हेलिकॉप्टरकडे त्याची नजर खिळली होती.

तो हळू आवाजात म्हणाला,

"आमच्या वडिलांनी कधीच माघार घेतली नाही."

फ्लाइट पर्सर शांतपणे त्याच्यासमोर बसला.

"प्रत्येक हुकूमशहा एक चूक करतो."

"कोणती?"

लुईसने विचारले.

फ्लाइट पर्सर उत्तरला,

"त्याला वाटतं.."

"लोक त्याला घाबरतात."

"प्रत्यक्षात.."

"ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असतात."

याच क्षणी..

रुथरीतील सरकारी दूरचित्रवाणीवर अचानक विशेष प्रसारणाची घोषणा झाली.

"आज रात्री नऊ वाजता जनरल माँटेरो देशाला संबोधित करणार."

ही बातमी काही मिनिटांत संपूर्ण देशात पसरली.

रस्त्यांवर उभे असलेले आंदोलक थांबले.

लष्करी तळांवर सैनिकांनी टीव्ही सुरू केले.

बेलवारीसच्या पंतप्रधानांनीही आपल्या कार्यालयात स्क्रीन सुरू करण्याचा आदेश दिला.

विमानातील प्रवाशांनीही इंटरकॉमवर ती घोषणा ऐकली.

सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता

माँटेरो झुकणार..

की रुथरी गृहयुद्धाच्या दिशेने जाणार?

रात्रीचे आठ वाजायला अजून काही मिनिटे बाकी होती..

आणि इतिहास..

श्वास रोखून वाट पाहत होता.

इ ) राष्ट्राला केलेले अखेरचे आवाहन

रात्रीचे नऊ वाजले.

रुथरीच्या प्रत्येक शहरात..

प्रत्येक लष्करी तळावर..

प्रत्येक सरकारी कार्यालयात..

आणि बेलवारीस विमानतळावरील नियंत्रण कक्षात..

सर्व स्क्रीन एकाच वेळी उजळल्या.

राष्ट्रीय ध्वजाची पार्श्वभूमी दिसली.

काही क्षणांनी कॅमेरा स्थिर झाला.

त्याच्या समोर उभा होता..

जनरल माँटेरो.

नेहमीप्रमाणे त्याने लष्करी गणवेश परिधान केला होता.

छातीवर पदकांची रांग होती.

पण आज त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचा आत्मविश्वास नव्हता.

आणि आवाजात थकवा दडला होता.

त्याने राष्ट्राला संबोधित करण्यास सुरुवात केली.

"माझ्या प्रिय देशबांधवांनो..

आज आपल्या राष्ट्रासमोर अत्यंत गंभीर संकट उभे आहे.

काही देशद्रोह्यांनी माझ्या मुलांचे अपहरण करून संपूर्ण राष्ट्राला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांचा उद्देश लोकशाही नाही..

त्यांचा उद्देश अस्थिरता निर्माण करणे आहे."

तो काही क्षण थांबला.

मग ठाम आवाजात म्हणाला

"मी कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद्यांसमोर झुकणार नाही.

रुथरीचा सैनिक शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या राष्ट्राचे संरक्षण करेल.

आपण घाबरणार नाही.

आपण झुकणार नाही."

भाषण संपले.

सरकारी वाहिनीवर टाळ्यांचा कडकडाट दाखवण्यात आला.

पण..

रुथरीच्या रस्त्यांवर पूर्णपणे वेगळे चित्र होते.

लोकांनी टीव्ही संच बंद केले.

काही ठिकाणी संतापलेल्या नागरिकांनी माँटेरोचे पोस्टर्स खाली खेचले.

विद्यार्थ्यांनी हातात मेणबत्त्या घेतल्या.

कामगारांनी कारखान्यांबाहेर मोर्चे काढले.

राजधानी पोर्ट एमेरादोमध्ये हजारो नागरिक शांतपणे चालत होते.

त्यांच्या हातात फक्त एकच फलक होता.

"आम्हाला हुकूमशहा नको, लोकशाही हवी."

याच वेळी..

राष्ट्रपती भवनाच्या तळमजल्यातील युद्धकक्षात एक अधिकारी धावत आत आला.

"सर!"

माँटेरोने त्याच्याकडे वळून पाहिले.

"तिसऱ्या बख्तरबंद ब्रिगेडने आंदोलकांवर कारवाई करण्यास नकार दिला आहे."

उत्तर येण्यापूर्वीच दुसरा अधिकारी आत शिरला.

"सर..

सातव्या हवाई संरक्षण रेजिमेंटने तटस्थ भूमिका घेतली आहे."

माँटेरोचा चेहरा गंभीर झाला.

क्षणभरात तिसरा अधिकारी धावत आला.

"सर..

नौदलातील दोन फ्रिगेट्सनी तुमच्या आदेशाची अंमलबजावणी स्थगित केली आहे."

युद्धकक्षात भयानक शांतता पसरली.

मोठ्या स्क्रीनवरील हिरवे चिन्ह एकामागोमाग एक पिवळे होत होते.

त्याचा अर्थ स्पष्ट होता

सैन्य विभागू लागले होते.

त्याच वेळी..

बेलवारीस विमानतळावर.

फ्लाइट पर्सरच्या मनगटावरील घड्याळाने हलकासा कंपन दिला.

एक सांकेतिक संदेश प्राप्त झाला होता.

"पहिला टप्पा पूर्ण."

"अनेक लष्करी युनिट्स तटस्थ."

त्याने शांतपणे संदेश वाचला.

मग खिडकीबाहेर अंधारात चमकणाऱ्या धावपट्टीकडे पाहिले.

व्हिक्टर त्याच्याकडे पाहत होता.

तो हळू आवाजात म्हणाला,

"तुम्हाला खरंच वाटतं..

तुम्ही जिंकणार आहात?"

फ्लाइट पर्सर हलकेसे हसला.

त्याने उत्तर देण्याआधी काही क्षण डोळे मिटले.

मग अत्यंत शांत स्वरात म्हणाला

"नाही.."

व्हिक्टरच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले.

फ्लाइट पर्सर पुढे म्हणाला,

"आम्ही जिंकणार नाही.."

"आम्ही आधीच जिंकलोच आहोत."

"आज आम्ही विमान पळवले नाही.."

"आज आम्ही लोकांच्या मनातील भीती पळवली आहे."

त्या शब्दांनंतर संपूर्ण केबिनमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली.

लुईसने प्रथमच खिडकीबाहेर पाहिले.

त्याला दूरवर उभे असलेले कमांडो दिसत होते..

पण त्याच्या मनात पहिल्यांदाच वेगळाच प्रश्न निर्माण झाला होता

जर लोकच माझ्या वडिलांच्या बाजूला उरले नाहीत..

तर सत्ता नक्की कोणाच्या हातात आहे?

बाहेर..

रात्रीचा अंधार अधिक गडद होत होता.

आत..

घड्याळाचे काटे निर्दयपणे पुढे सरकत होते.

मध्यरात्रीची अंतिम मुदत आता फार दूर नव्हती.

क्रमशः...🖋️📚📖

वरील एपिसोड 5 आवडला असेल, तर तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. पुढील एपिसोड 6 साठी 'Sjomkar Blog | शब्दांची मुशाफिरी'ला अवश्य भेट द्या..
आम्हाला फॉलो करण्यासाठी 🔍 ☰ मधील Follow वर कृपया क्लिक करा.

🔗रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | अंतिम तास (Episode 6) 👉

हा संपूर्ण मालिकेचा उत्कर्षबिंदू आहे. जनरल माँटेरो आणि लेफ्टनंट जनरल महारथ यांच्यातील बुद्धी, संयम आणि नेतृत्वाचा अंतिम सामना येथे घडतो. मध्यरात्रीच्या काही मिनिटांपूर्वी संपूर्ण रुथरी गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर उभा असतो; पण एका निर्णयामुळे रक्तपात टळतो. जनरल माँटेरो सत्तेचा राजीनामा देतो या साठी वाचावा पुढील भाग..

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.
💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.
👍 पुढील भाग वाचण्यासाठी या ब्लॉगच्या 🔍 ☰ मधील FOLLOW वर कृपया क्लिक करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.

🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा. धन्यवाद! 🙏
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)
SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो


𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook

📌 Pinterest वर फॉलो करा

📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...