मुख्य सामग्रीवर वगळा

मचाण शांतता : ‘अरण्यऋषी’ - ‘जंगलाचा अदृश्य रक्षक’ ( एपिसोड -२ ) |ताडोबा जंगलातील थरारक मराठी रहस्यकथा

 मचाण शांतता : ‘अरण्यऋषी’ - ‘जंगलाचा अदृश्य रक्षक’ ( एपिसोड -२ ) |ताडोबा जंगलातील थरारक मराठी रहस्यकथा

                                                         

मचाण शांतता : ‘अरण्यऋषी’ - ‘जंगलाचा अदृश्य रक्षक’ ( एपिसोड -2 ) मराठी रहस्यकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
शिळा तीच,जंगल तेच आणि तीच गूढ शांतता,
वाघाच्या डोळ्यांतही दिसली एका अज्ञाताची भक्तता |
माणूस म्हणावं की सावली, आजही उत्तर सापडलं नाही,
अरण्य ऋषीचं रहस्य अजून अंधारीने उलगडलं नाही |

🔗'मचाण शांतता’ - पिठूर चांदण्यातली ती रानरात्र| एपिसोड १ | ताडोबा जंगलातील थरारक मराठी कथा..

    रात्रीच्या गूढ जंगलात मचाणावरून केलेली प्राण्यांची गणना, स्पॉटलाईटच्या प्रकाशात चमकणारे डोळे, बगळ्यांचे आवाज, घुबडाची हाक, मोराची केकावली आणि चांदण्यांनी न्हालेली भयाण रात्र.. 
   “मचाण शांतता - पिठूर चांदण्यातली ती रानरात्र” हा लेख तुम्हाला जंगलातील एका थरारक आणि रहस्यमय रात्रीचा जिवंत अनुभव देतो. वन्यजीव, निसर्गरात्र, जंगल सफर आणि मचाण संस्कृती आवडणाऱ्यांसाठी हा एपिसोड १ मधील अनुभव अविस्मरणीय ठरेल.

मचाण शांतता : ‘अरण्यऋषी’ - ‘जंगलाचा अदृश्य रक्षक’ ( एपिसोड -२ ) |ताडोबा जंगलातील थरारक मराठी रहस्यकथा

  ताडोबा अंधारीच्या निबीड जंगलातील एक गूढ, थरारक आणि रोमांचकारी अनुभव.अंधारी नदीच्या काठावर आणि जंगलाच्या गाभाऱ्यात, यत्र तत्र सर्वत्र फिरणाऱ्या एका रहस्यमय व्यक्तीची ही कथा..
    ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलावर आधारित ही मराठी रहस्यकथा गूढता, निसर्ग आणि अध्यात्म यांचा अनोखा अनुभव देते. अंधारी नदीच्या काठावर अधूनमधून दिसणारा एक रहस्यमय अरण्यऋषी संकटात सापडलेल्या लोकांचे प्राण वाचवतो, तर पुढच्याच क्षणी जंगलाच्या धुक्यात अदृश्य होतो. तो खरोखरच एक साधू आहे की जंगलाचा अदृश्य रक्षक? या प्रश्नाचे उत्तर शोधताना प्रत्येक वळणावर नवे रहस्य उलगडत जाते.
    ज्याला आदिवासी “अरण्यऋषी” म्हणतात.जो कधी संकटाच्या आधी दिसतो, तर कधी मृत्यूच्या दारातून जीव वाचवून अदृश्य होतो. वनरक्षक बाबूलालच्या अनुभवातून उलगडत जाणारे ताडोबा अंधारीचे रहस्य, वन्य प्राण्यांचे अद्भुत वर्तन, अंधारी नदीचे रौद्र रूप आणि जंगलाशी एकरूप झालेल्या एका अदृश्य रक्षकाची ही थरारक कहाणी.
     जंगल फक्त झाडांनी जिवंत नसते.. कधी कधी ते एखाद्या गूढ आत्म्यामुळेही श्वास घेत असते..निबीड अरण्य आकाशाशी स्पर्धा करणारे उंचच उंच वृक्ष,लता वल्लरी,ओल्या मातीचा मंद दर्प,सुगंध दूरवरून ऐकू येणारे पक्ष्यांचे विविध गुंजन स्वर आणि त्या सगळ्या निसर्गाच्या साम्राज्यात, एखाद्या शांत सावलीसारखा वावरणारा एक गूढ व्यक्ती  तो म्हणजे वन ऋषी किंवा अरण्य ऋषी.
     अरण्य ऋषी हा केवळ जंगलात राहणारा साधू नसतो तो निसर्गाचा रक्षक, प्राणी आणि पशु  मित्र आणि जंगलाच्या प्रत्येक श्वासाशी एकरूप झालेला आत्मा असतो. ज्या जगात माणूस शहरांच्या कोलाहलात स्वतःला हरवत चालला आहे, सर्व परित्याग केलेला आणि अरण्य आणि वन यांच्या सानिध्यात असणारी ऋषितुल्य व्यक्ती. निसर्गाशी असलेली एक अदृश्य नाळ.भारतीय संस्कृतीत जंगलाला नेहमीच पवित्र स्थान दिले गेले आहे. प्राचीन काळातील अनेक ऋषी-मुनी अरण्यातच राहून तपश्चर्या करीत. 
    वाल्मीकी ऋषींनी रामायणाची निर्मिती जंगलात केली, तर व्यास ऋषींनी महाभारताचा महान ग्रंथ घडवला. त्या काळातील आश्रम हे केवळ निवासस्थान नव्हते ते ज्ञान, साधना आणि निसर्गाशी एकरूप होण्याची स्थाने होती. त्या परंपरेतूनच “अरण्य ऋषी” ही कल्पना जन्माला आली.अरण्य ऋषी मात्र त्या प्रत्येक आवाजाचा अर्थ ओळखत असतो. त्याला कळते की कोणता प्राणी कुठे फिरतो आहे, कोणत्या दिशेने वारा वाहतो आहे आणि जंगलात कोणती हालचाल सुरू आहे.त्याचे जंगलाशी असलेले नाते हे शब्दांपलीकडचे असते. तो पक्ष्यांच्या आवाजावरून हवामानाचा अंदाज लावतो. मातीचा सुगंध घेऊन पावसाची चाहूल ओळखतो. एखाद्या तुटलेल्या फांदीकडे पाहून कोणता प्राणी गेला हेही त्याला समजते. त्याच्यासाठी जंगल हे एक उघडे पुस्तक असते आणि त्यातील प्रत्येक खूण तो वाचू शकत असतो.
    अरण्य ऋषीच्या जीवनात एक वेगळाच अध्यात्मिक अनुभव असतो. शहरात माणूस देव शोधण्यासाठी मंदिरात जातो पण अरण्य ऋषीला देव प्रत्येक पानात, प्रत्येक नदीत आणि प्रत्येक सजीवांत दिसतो. त्याच्यासाठी निसर्ग हाच परमेश्वर असतो. वाऱ्याची सळसळ, पाण्याचा खळखळाट आणि पक्ष्यांची किलबिल हेच त्याचे मंत्र असतात.
   अरण्य ऋषी ही केवळ एखादी व्यक्तिरेखा नाही, तर ती एक विचारधारा आहे. ती निसर्गाशी एकरूप होण्याची भावना आहे. जंगल वाचवायचे असेल, पृथ्वीचे संतुलन टिकवायचे असेल आणि माणसाला पुन्हा शांततेचा मार्ग दाखवायचा असेल, तर प्रत्येकाने आपल्या मनात थोडासा “अरण्य ऋषी” जागवण्याची गरज आहे.कारण जंगल फक्त झाडांनी जिवंत नसते, ते जिवंत असते त्या शांत आत्म्यांमुळे, जे स्वतः हरवून अरण्याला जपतात आणि त्यांनाच जग “अरण्य ऋषी” म्हणते.
     वनरक्षक बाबूलाल, शामक बावा आणि मी  आम्ही तिघेही सकाळी साधारण सातच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वारपाशी पोहोचलो. रात्रभराच्या पायपिटीने अंग अक्षरशः थकून गेले होते. विभागाच्या गेस्ट हाऊसवर पोहोचताच आम्ही फ्रेश झालो. गरमागरम चहा आणि साधी न्याहारी झाल्यावर थोडे तरतरीत वाटू लागले.शामक बावा मात्र पूर्णपणे दमला होता. त्याच्या डोळ्यांवर झोपेची जड सावली स्पष्ट दिसत होती.
    “मी थोडा वेळ विसावतो..” एवढेच म्हणत तो खोलीत जाऊन आडवा झाला.पण माझ्या मनात मात्र वेगळीच अस्वस्थता धुमसत होती. “अरण्य ऋषी” बाबतची उत्सुकता आता अक्षरशः शिगेला पोहोचली होती. रात्रीच्या त्या गूढ प्रसंगानंतर मनात असंख्य प्रश्न उभे राहिले होते.
    शामक बावाची झोपमोड होऊ नये म्हणून मी आणि वनरक्षक बाबूलाल गेस्ट हाऊसच्या बाहेर आलो. समोरच एक प्रचंड जुने पिंपळाचे झाड होते. त्याच्या पारावर सकाळची थंड सावली अलगद पसरली होती. वाऱ्याने पिंपळाची पाने सळसळत होती आणि अधूनमधून एखादा कोकीळेचा स्वर शांततेला छेद देत होता.
      आम्ही दोघे त्या पारावर जाऊन बसलो.माझ्या डोळ्यात ‘अरण्य ऋषी’ ची कहाणी ऐकण्याची उत्सुकता त्याला दिसून येत होती.बाबूलाल काही क्षण शांत राहिला. त्याने कमरेला अडकवलेली पाण्याची बाटली बाजूला ठेवली, घसा खाकरला आणि जंगलाच्या दिशेने एक दीर्घ नजर टाकली. त्याच्या चेहऱ्यावर अचानक गंभीर छटा उमटली.“साहेब..” तो मंद आवाजात म्हणाला,
      “काल रात्री तुम्ही जे पाहिलंत. ते प्रत्येकाला दिसत नाही. त्या माणसाला इथले आदिवासी ‘अरण्य ऋषी’ म्हणतात. पण तो नेमका कोण आहे, कुठून आला.हे आजवर कुणालाच कधी समजलं नाही.”पिंपळाची पाने पुन्हा सळसळली.
     “जंगलातल्या हिंस्त्र जनावरांना सुद्धा त्याची भीती नाही. उलट ती त्याच्या आसपास शांत होतात. अनेक वनरक्षकांनी त्याला पाहिलंय. पण विशेष गोष्ट म्हणजे  तो नेहमी फक्त संकटाच्या आधी किंवा नंतरच दिसतो..” बाबूलाल बोलत होता आणि माझ्या अंगावर नकळत शहारे उठत होते.वनरक्षक बाबूलाल शांतपणे सांगू लागला. “ही गोष्ट साधारण बारा वर्षांपूर्वीची असेल. तेव्हा मी या रेंजमध्ये नवीनच वनरक्षक म्हणून रुजू झालो होतो. जंगलाची फारशी ओळख नव्हती, पण उत्साह मात्र भरपूर होता.
     एके दिवशी मला याच परिसरात सकाळची पेट्रोलिंग ड्युटी लागली होती. साधारणपणे प्रत्येक गस्तीवेळी माझ्यासोबत एखादा वनमजूर असायचाच. पण त्या दिवशी माझा तो मदतनीस आला नव्हता. त्याच्या मुलीची तब्येत बिघडली होती.म्हणून त्या दिवशी मला एकट्यालाच जंगलात उतरावे लागले. मी मजबूत दंडुका, कॅमेरा, वॉकी-टॉकी आणि पाण्याची बाटली घेतली. कमरेला छोटा चाकू अडकवला आणि पायात जाड लेदरचे जंगल बूट चढवले. मनात म्हटलं "आज जवळच्याच भागात गस्त घालूयात.."आणि मी एकटाच जंगलाच्या वाटेने निघालो.उन्हाळ्याचे दिवस होते. मे महिन्याचा शेवटचा आठवडा असावा. वातावरण अगदी आज सारखेच वाटत होते. सकाळची ताजी प्रसन्न हवा झुळूझळू वाहत होती. कुठे तरी दूर कोकिळेची कुहू-कुहू तान ऐकू येत होती, तर बांबूच्या बनातून येणारा मंद वारा सुकलेल्या पानांना अलगद हलवत होता.
      सकाळचे साधारण दहा वाजले असतील.कोवळं ऊन आता सरलं होतं आणि उन्हाची मंद आच अंगाला जाणवू लागली होती. विदर्भातल्या उन्हाळी दिवसाची सुरवात अशीच असते. सुरुवातीला ऊन मऊ वाटतं पण काही वेळातच ते अंगाला चटके देऊ लागतं. जंगलातल्या लालसर मातीवरून चालताना बुटा खालची धूळ उडत होती. अधून मधून एखाद्या वाळलेल्या सागाच्या पानावर पाय पडला की करकर, चुरचुर असा आवाज शांततेला छेद देत होता.
      मी मन लावून बाबुलालचे बोलणे ऐकत होतो. बाबुलाल न थांबता पुढे बोलायला लागला. सावध नजरेने मी आजूबाजूचा परिसर न्याहाळत पुढे चाललो होतो पण त्या दिवशी माझ्या आयुष्यात काहीतरी विलक्षण घडणार आहे, याची मला तेव्हा अजिबात कल्पना नव्हती..”
     विदर्भात उन्हाळा कितीही कडक असला तरी मुंबईसारखा घामाघूम करणारा दमटपणा तिथे नसतो. मुंबईची हवा चिकट आणि दमट, तर विदर्भाची हवा कोरडी. त्यामुळे अंगाची लाही लाही होते, पण घाम मात्र फारसा येत नाही. डोक्याला ऊन लागू नये म्हणून मी सावलीची टोपी घातली होती. खांद्यावर दुर्बीण अडकवलेली होती. जंगलात गस्त घालताना पक्षी निरीक्षण हा माझा जुना छंदच होता.
    आसमंतात कोकिळेची मधुर कुहू-कुहू तान घुमत होती. त्या आवाजात एक विचित्र मोहिनी होती. प्रजनन काळात नर कोकिळ वारंवार अशाच जोरदार स्वरांत मादी कोकिळेला हाका मारत असतो. कोकिळ हा स्वतः घरटे न बांधणारा पक्षी. विशेषतः कावळ्याच्या घरट्यात अंडी घालण्याची त्याची सवय सर्वश्रुत आहे. मादी कोकिळ संधी साधून कावळ्याच्या अंड्यांसारखंच दिसणारं स्वतःचं अंडं त्या घरट्यात ठेवते.
      पक्षी निरीक्षक म्हणून मी असे अनेक प्रकार दुर्बिणीतून पाहिले होते. त्या आठवणी मनात तरळत असतानाच मी सावकाश पुढे चालत होतो.काही अंतर पार केल्यानंतर माझी नजर अचानक एका झाडाकडे खिळली.त्या झाडाच्या फांद्यांवर अनेक सुगरण पक्ष्यांची घरटी वाऱ्यावर हलके हलके डोलत होती. गवताच्या बारीक काड्या, तंतू आणि पानांचे तुकडे विणून तयार केलेली ती घरटी म्हणजे जणू निसर्गातील अप्रतिम कलाकृतीच वाटत होती.
     सुगरण पक्ष्याच्या घरट्याकडे पाहिलं की नेहमी एकच विचार मनात येतो.देवाने या छोट्याशा जीवाला किती विलक्षण कौशल्य दिलं असेल! त्या घरट्यांच्या विणकामात सौंदर्यही होतं आणि अद्भुत कारागिरीही. एखाद्या कुशल कारागिराने काळजीपूर्वक विणलेल्या कलाकृतीप्रमाणे ती झोके घेत होती.
    मी काही क्षण तिथेच थांबलो. दुर्बीण डोळ्यांवर लावून त्या घरट्यांकडे बारकाईने पाहू लागलो.पक्षी म्हणजे निसर्गाला पडलेलं सुंदर स्वप्नच असावं असं मला नेहमी वाटतं. प्रत्येक पक्ष्याची ठेवण, त्याचं रूप, त्याचे रंग, त्याचा स्वभाव  सगळंच विलक्षण वेगळं. जणू निसर्गाने प्रत्येकाला अगदी निवांत बसून घडवलं असावं.
        काही पक्ष्यांना त्याने अप्रतिम रंगरूप दिलं, तर काहींना मोहून टाकणारे स्वर.     काहींना आक्रमकता दिली, तर काहींना कावळ्यासारखी विलक्षण धूर्त बुद्धी. पण एक गोष्ट मात्र प्रत्येकामध्ये समान होती  घरटी बांधण्याचं अद्भुत कौशल्य. इतक्या छोट्याशा जीवांनी बांधलेली ती घरटी पाहिली की कोणताही माणूस थक्क होईल.अर्थात गरुड, गिधाड, घार यांसारखे राक्षसी शिकारी पक्षी वेगळेच. त्यांच्या डोळ्यांत कायम एक भयचकित करणारी धार दिसते.
         मी पुढे चालत राहिलो.काही अंतरावर मला भुरकट-राखाडी रंगाचे ‘सातभाई’ पक्षी दिसले. बहुतेक वेळा ते सातांच्या समूहातच आढळतात म्हणून लोक त्यांना “सातभाई” म्हणतात. पण प्रत्यक्षात त्या सात बहिणी किंवा भाई नसतात. त्यातील दोन हे आई-वडील असतात आणि उरलेली त्यांची पिल्लं.त्यांची गंमत म्हणजे ते एखाद्या गोड सुरात गात नाहीत उलट सतत एकमेकांशी भांडत असल्यासारखे कर्कश केकाटत राहतात.
तेवढ्यात जवळच्या एका झुडपातून माझ्या कानावर एक अतिशय विचित्र आवाज पडला..”
“टर्रर्रर्र..”
असा आवाज आला.
     तो आवाज माझ्या चांगलाच परिचयाचा होता. तो टवऱ्या सापाचा इशारा होता. मी सावधपणे त्या दिशेला नजर टाकली, पण तोपर्यंत तो सुकलेल्या पानांमध्ये सरसरत अदृश्य झाला होता.थोडं पुढे गेल्यावर एक मध्यम उंचीचं वाळवीचं वारूळ दिसलं. मी त्याच्याकडे पाहत उभा राहिलो, इतक्यात दोन घोरपडी सर्रकन आत शिरल्या.उन्हाळ्यात अशी वारुळं अनेक प्राण्यांसाठी थंड निवारा बनतात. साप, घोरपड, मुंगूस  असे अनेक जीव उष्णतेपासून बचाव करण्यासाठी त्यात आसरा घेतात. 
      आणखी पुढे एका मोठ्या झाडावर आग्या मोहळ लटकलेलं दिसलं. हजारो मधमाशा त्याभोवती अखंड घिरट्या घालत होत्या. त्यांच्या पंखांच्या कंपनातून निर्माण होणारा आवाज अगदी भ्रमरी प्राणायाम करताना येणाऱ्या गंभीर गुंजना सारखा वाटत होता.त्या जंगलात प्रत्येक क्षणी काही ना काही घडत होतं.माझं निरीक्षण आणि गस्त दोन्ही एकाच वेळी सुरू होतं आणि नकळत मी जंगलाच्या अधिक आत शिरत चाललो होतो.
    बाबुलाल आपल्या शब्दांच्या जादूने माझ्या डोळ्यांसमोर अक्षरशः संपूर्ण जंगल उभे करत होता. त्याच्या प्रत्येक वर्णनात ओलसर मातीचा गंध, पावसाचा आवाज आणि पक्षी जीवन उभे करत होता.तो एखाद्या सराईत लेखकासारखा बोलत होता आणि मी मंत्रमुग्ध होऊन त्याचे बोलणे शांतपणे ऐकत होतो.
    वैशाखातील वणव्यांमुळे जंगलात पावसाळ्यात माणसा एवढं वाढणारं गवत पूर्णपणे सुकून गेलेलं असतं. त्यामुळे उन्हाळ्यात गस्त घालताना फारसा त्रास होत नाही. दृष्टी बर्‍यापैकी लांब पर्यंत जाते आणि समोरचं सहज दिसत राहतं.असंच निरीक्षण करत मी पुढे चाललो होतो.
     तेवढ्यात समोरच्या विरळ झाडीत अचानक एक वृद्ध व्यक्ती दिसली.कंबरेला विटभर फाटकं कापड गुंडाळलेलं, अंगावर वस्त्र म्हणावं असं काहीच नाही.कमरेपर्यंत वाढलेली सफेद दाढी, उन्हाने काळपट झालेलं शरीर आणि हातात एक उंच, मजबूत, टोकदार काठी.क्षणभर माझे पाय जागीच थबकले.तोच तो माणूस होता,ज्याला तुम्ही काल रात्री मचाणावरून पाहिलंत.तो अनेक वर्षापासून मला तसाच दिसतोय.
       त्या वृद्धाची आणि माझी नजरानजर झाली. त्याच्या डोळ्यांत एक विचित्र दिव्य तेज होतं. करारी पण शांत. त्या नजरेत भीती नव्हती, घाई नव्हती, अपराधीपणाही नव्हता. उलट जंगलावरचं एखादं अदृश्य अधिराज्य असल्यासारखी स्थिरता होती.
ते पाहताच माझ्या मनात पहिला विचार आला ‘हा शिकारी असूच शकत नाही..’त्याच्या हातात कोणतंही हत्यार नव्हतं. त्याचा हुलिया मात्र आदिवासी साधु सारखा वाटत होता. त्यामुळे त्याला थांबवून चौकशी करण्याची मला गरज वाटली नाही.पण पुढच्याच क्षणी त्याने अचानक दिशा बदलली.समोरून जाणारी वाट सोडून तो डावीकडे वळला आणि एका “सगरी”कडे चालू लागला. प्राण्यांच्या भूलभुलैया सारख्या पायवाटेकडे.त्या वाटा म्हणजे जंगलातील हिंस्त्र प्राण्यांचे नियमित मार्ग. अशा वाटेवरून अगदी अनुभवी आदिवासी सुद्धा सहजा सहजी जाण्याचं धाडस करत नाहीत.
    मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिलो.तो मात्र क्षणाचाही विलंब न करता शांतपणे त्या वाटेवरून पुढे चालत राहिला जणू जंगलातील प्रत्येक वळण त्याला पाठ होतं.माझ्या मनात उत्सुकतेची एक ठिणगी पेटली.‘हा माणूस नेमका आहे तरी कोण ?’मी निर्णय घेतला.दुर्बीण छातीला घट्ट धरली, दंडुका हातात आवळला आणि सावधपणे त्या वृद्धाच्या मागोमाग चालू लागलो.पण पुढे जे घडलं, त्याने माझ्या आयुष्यभराच्या जंगलाच्या अनुभवाला हादरा दिला.”
      लगबगीने त्याच्या मागोमाग जात होतो. जाताना पाठमोऱ्या आकृतीचे जवळच्या कॅमेऱ्याने काही फोटो टिपले. त्याची चाल जणू विद्युत वेगाने धावणाऱ्या वाऱ्यासारखी होती. त्या वेगाशी बरोबरी करणे मला सहज शक्य नव्हते. तरीही मी कसाबसा त्याच्या मागे टिकून होतो. आमच्यात जवळपास शंभर मीटरचे अंतर होते.
       माझी नजर ना आजूबाजूच्या जंगलावर होती, ना पायाखालच्या वाटेवर ती खिळली होती. फक्त त्या साधूसदृश व्यक्तीच्या पाठमोऱ्या आकृतीवर. कारण तो जर क्षणभर नजरेआड झाला असता, तर या अनोळखी ‘सगरी’ पायवाटेमुळे मला चकवा लागणे किंवा भुलभुलैय्यात अडकणे अगदी सहज शक्य होते. निदान तो जिथे थांबेल, तो भाग तरी मानवी पायवाटे जवळचा असेल, एवढीच मनाला एक किरकोळ दिलासा देणारी आशा होती.
    दम लागून छाती धडधडत होती, घशाला कोरड पडली होती  तरीही त्याचा पिछा सोडण्याचा विचारही माझ्या मनात येत नव्हता.तो चालत होता..चालत होता..चालत होता आणि चालतच होता..अखंड.. न थांबता..आणि मी…त्या गूढ सावलीच्या मागोमाग, जणू नकळत एखाद्या अज्ञात रहस्याच्या दिशेने ओढला जात होतो..
     शेवटी आम्ही एका अशा सपाट आणि विस्तीर्ण ठिकाणी येऊन पोहोचलो, जिथे उभे असलेले प्रत्येक वृक्ष एकमेकांपासून बर्‍याच अंतरावर होते. त्या परिसरात कोणत्याही दिशेने पाहिले तरी नजरे आड होणे अशक्य होते. त्या मोकळ्या जागेच्या मध्यभागी असलेल्या एका प्रचंड शिळेवर तो साधू जाऊन शांतपणे बसला.
       मी काही अंतरावर, एका जुन्या रुंद खोडाच्या आड लपून त्याच्याकडे पाहत होतो. हळूच कॅमेऱ्याने त्याचे काही फोटो टिपत होतो. वातावरणात एक अनाकलनीय शांतता पसरली होती. ना वाऱ्याचा आवाज.. ना पक्ष्यांची हालचाल..
आणि अचानक..बसलेल्या अवस्थेतच तो अंतर्धान पावला !
    क्षणभर माझा श्वासच थांबला. अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. भीतीने संपूर्ण अंग घामाने डबडबून गेले. छातीची धडधड इतकी वाढली होती की, त्या शांत जंगलात माझ्या हृदयाचे ठोकेच मला स्पष्ट ऐकू येत होते. डोळ्यासमोरची एखादी व्यक्ती क्षणार्धात अदृश्य होणे म्हणजे नेमके काय ? तो मनुष्य होता ? जादुगार ? पिशाच्च ? देवदूत ? एखादा अरण्यऋषी ? की या जंगलाचा अदृश्य रक्षक ?
मनात विचारांचे वादळ उसळत असतानाच, समोरच्या झुडपा आडून तोच वाघ सावकाश पुढे आला.  जो काल आपण रात्री मचाणावरून पाहिलेला T-9 तेव्हा तो  तरुण बछडा C-3 होता
     तो दबक्या पावलांनी त्या शिळेजवळ आला. काही क्षण शांत उभा राहिला आणि मग पुढचे दोन पाय पुढे करत, जणू एखाद्या पूज्य व्यक्ती समोर नतमस्तक व्हावे तसे तो खाली झुकला ! ते दृश्य पाहून माझ्या अंगातील रक्तच गोठल्यासारखे झाले.
एक वनराज जंगलाचा अधिपती, कोणाच्या तरी अदृश्य उपस्थिती समोर मस्तक झुकवत होता !
     इतक्यात वरच्या झाडांवर विहार करणारी माकडे देखील अचानक उपस्थित झाली. जणू कुणीतरी त्यांना हाक दिली होती. ती भराभर त्या शिळे जवळच्या वृक्षांवर जमा झाली. “ची..ची ss.. ची ss..” करत ती खाली उतरली आणि त्या शिळेभोवती  फेर धरून बसली.थोड्याच वेळात एक मोर संथ डौलात पुढे आला. त्याने आपला भव्य पिसारा फुलवला काही क्षण त्या शिळेसमोर मयूर नृत्य केले आणि तो पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून गेला.
   बगळ्यांचे थवे आकाशातून खाली झेपावले. त्यांनी शिळे भोवती काही क्षण विसावा घेतला आणि पुन्हा उडून गेले. पोपटांचा थवा आसपासच्या झाडांवर येऊन बसला. त्यांच्या “की ss.. की ss..” अशा गोंगाटाने सारा परिसर भरून गेला आणि क्षणात तेही आकाशात विरून गेले.अगदी एक कोल्हादेखील सावधपणे पुढे आला. त्याने शेपटी खाली झुकवत, जणू आदराने सलामी द्यावी तसे त्या शिळेकडे मान झुकवली आणि शांतपणे निघून गेला.
      त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर एक विलक्षण दृश्य उभे होते.जंगलातील विविध प्राणी आणि पक्षी, जणू आपल्या तारणहाराला, आपल्या अदृश्य स्वामीला आदरांजली अर्पण करत होते.ते दृश्य मन मोहून टाकणारे, गूढ आणि अंगावर रोमांच उभे करणारे होते.परंतु त्या सर्वांपेक्षा माझ्या मनाला एकच प्रश्न सतत छळत होता
ती अदृश्य व्यक्ती नेमकी कोण होती.?
   अचंबा आणि गूढ भीतीमुळे, तसेच पुढचा रस्ता माहीत नसल्याने मी क्षणभर डोळे मिटून ध्यानमुद्रेत आजुबाजूच्या परिस्थितीचा वेध घेऊ लागलो. मनाला त्या दोन प्रश्नांची उत्तरे हवी होती. त्यातील एक उत्तर अखेर सापडले चकव्यातून बाहेर पडण्याचा मार्ग..ध्यान मुद्रेत निसर्गाचे मधुर पार्श्वसंगीत आणि अंधारी नदीच्या पाण्याचा संथ, मंद  खळखळाट कानावर पडू लागला. मी मनाशीच म्हटले,
“बस्स.. मार्ग सापडला !”
    त्या खळखळणाऱ्या आवाजाच्या दिशेने माझी पावले वळली आणि अंधारी नदीचे पात्र हळूहळू दृष्टीक्षेपात येऊ लागले.नदी पात्राचा मार्ग दाखवणारी ती वाट आता मला सोबत करणारी निःशब्द साथीदारच भासत होती.क्षणभरापूर्वी मनात उसळणारी गूढ भीती आता सावध शांततेत रूपांतरित झाली होती.
    वैशाख महिन्याच्या दिवसांत अंधारी नदीचे पात्र एक वेगळेच रूप धारण करते. चंद्र जसा आपल्या कला दाखवत आकार बदलत राहतो, तशी ही नदीसुद्धा ऋतूनुसार तिची अनेक रूपे उलगडत असते. पावसाळ्यात कधी कधी पात्र सोडून दुथडी भरून वाहणारी अंधारी, उन्हाळ्यात मात्र शुक्ल पक्षातील पहिल्या चंद्रकोरीसारखी रोडावलेली दिसते.
     ती चंद्रकोर कृष्णवर्णीय नभांगणात शोभून दिसते परंतु रोडावलेली अंधारी दगड, गोटे आणि मृत्तिकेच्या भाऊगर्दीतून जीव टाकत वाहताना पाहिली की मन विषण्ण होते. पावसाळ्यात रौद्र आणि उत्साही भासणारी अंधारी उन्हाळ्यात मात्र शांत, निवांत, थकलेली आणि काहीशी गूढ वाटू लागते.
     नदीतील पाणी कमी झाल्यामुळे ठिकठिकाणी मोठे दगड, वाळूचे पट्टे आणि ओलसर चिखल नजरेस पडतो.. काही खोल डोहांमध्ये अजूनही थंडगार हिरवे लव्हाळीचे पाणी साचलेले असते. त्या डोहांकडे जंगली प्राणी तृष्णा भागवण्यासाठी येतात आणि पुन्हा अरण्यात अदृश्य होतात.
    पावसाळा किंवा इतर दिवसात नदीत कुठेही सहज पाणी पिणारी ही गरीब जनावरे, उन्हाळ्यात मात्र अशाच उरलेल्या पाण्याच्या डोहांजवळ दबा धरून बसलेल्या शिकाऱ्यांचे किंवा हिंस्र पशूंचे सावज बनतात. कधी कधी उन्हाळ्यातील तहानच त्यांच्या मृत्यूचे कारण ठरते.
बाबुलाल मध्येच थांबून पुढे बोलू लागला.
     दुपारच्या कडक उन्हात नदीकाठचे वातावरण वरकरणी शांत भासत असले, तरी त्या शांततेतही निसर्गाचे सूक्ष्म संगीत अखंड सुरूच असते. गरम वाऱ्याच्या झळांमुळे वाळू तप्त झालेली असते, तर नदीकाठची हिरवीगार झाडे थकलेल्या जीवांना थोडासा गारवा देत निश्चल उभी असतात.
     अधूनमधून पाण्यावरून भरारी घेणारे पिटूकले पक्षी, दुरून ऐकू येणारी मोराची केकावली, कोकिळेची तार सप्तकातील तान, झाडांच्या पानांची मंद सळसळ, झुडपांत होणारी खसखस आणि पायाखाली सुकलेल्या पानांचा कुरकुर आणि  चुरचुर करणारा आवाज  हे सारे मिळून उन्हाळ्यातील रुक्ष वातावरण जिवंत असल्याची सतत जाणीव करून देत असतात.
     अंधारी नदी आमच्या कार्यक्षेत्राचा भाग असल्याने तिचा प्रत्येक वळणावळणाचा काठ आमच्या अभ्यासातला होता. त्यामुळे नदीकाठी चुकूनसुद्धा एखाद्या वनकर्म्याला रानभूल बसण्याचा प्रश्नच नव्हता.
     नदीचा काठ धरत मी रेंज ऑफिसच्या दिशेने चालू लागलो. वाटेत सहज म्हणून कॅमेऱ्यातून काढलेले फोटो पाहावेत म्हणून कॅमेरा उघडला पण स्क्रीनवर नजर पडताच माझ्या अंगावर अक्षरशः शहारा आला. काढलेला एकही फोटो त्यात उमटलेला नव्हता.ते पाहताच मनोमन मी हादरलो. क्षणभर डोक्यात विचारांचे वादळ उठले मात्र दुसरे आश्वासक मन स्वतःलाच समजावत म्हणाले  “ अरे ! घाईगडबडीत क्लिक करताना काहीतरी चूक झाली असावी  म्हणूनच ते फोटो टिपले गेले नसतील..”त्या विचाराने मनाला थोडासा धीर मिळाला पण कुठेतरी आत खोलवर एक अस्पष्ट भीती अजूनही जागी होती..
        तो प्रसंग घडून गेला आणि त्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांत एक रात्र मचाण निरीक्षण मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्या मोहिमेत माझ्यासोबत वनपाल साहेब होते.
    जंगल पावसाने पूर्ण ओलेचिंब झालेले होते. पहिल्या पावसाने भिजलेल्या मृत्तिकेचा मंद, आल्हाददायक गंध हवेत दरवळत होता. झाडांच्या पानांवरून अजूनही पाण्याचे थेंब टपटपत होते, तर ओलसर आणि थंड वाऱ्याची झुळूक अधूनमधून अंगाला स्पर्शून जात होती.त्या शांत, धूसर वातावरणात जंगल जणू नव्याने श्वास घेत असल्यासारखे भासत होते.
      आसमंतात काजव्यांची मंद लुकलुक सुरू होती, तर दूरवर एखाद्या रातकिड्याचा एकसुरी आवाज त्या गडद शांततेला अधिकच गूढ बनवत होता. त्या काळोखात जंगल जणू जागे असूनही निःशब्द भासत होते.
      रात्रीचा तिसरा प्रहर सुरू होता. रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात जंगल अधिक भयाण भासत होते.आम्ही दोघेही मचाणावर निःशब्द बसून जंगलातील हालचाली टिपत होतो. इतक्यात अचानक अंधुक प्रकाशात तोच अवलिया, तोच अरण्य ऋषी पुन्हा नजरेस पडला.
    साहेब त्याला पाहताच काहीतरी ओरडून दम देणार इतक्यात मी घाईघाईने हात जोडत त्यांना विनवणी केली “सर.. कृपया गप्प राहावे,ओरडू नका.. मचाणावर शांतता ठेवावी, ही विनंती.”कधी कधी कनिष्ठांना सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशी विनवणी करावी लागते. खरे तर चूक माझीच होती कारण त्या अरण्य ऋषि बाबत माझ्या बाबतीत घडलेला विचित्र प्रसंग मी त्यांना यापूर्वी सांगितलाच नव्हता.
     त्यांनीही माझी विनंती मान्य केली, हे त्यांच्या थोरपणाचे लक्षण होते.नंतर योग्य वेळ साधून मी त्यांना सगळा प्रसंग सविस्तर सांगितला. त्यांनी माझे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. काही क्षण तेही मनोमन विचारात हरवलेले दिसले.आणि शेवटी फक्त एवढेच म्हणाले..
“बाबुलाल..ठीक आहे. तू त्या वेळी जे केलंस, ते अगदी बरोबर होतं.”
                                                                                                                                                                                  क्रमश…(एपिसोड ३)
“मचाण शांतता : अरण्यऋषी - जंगलाचा अदृश्य रक्षक”
        ही कथा ताडोबा अंधारीच्या निबीड जंगलात घडणाऱ्या गूढ घटनांवर आधारित एक थरारक मराठी जंगल मालिका आहे. अंधारी नदी, वनरक्षकांचे अनुभव, जंगलातील रहस्यमय व्यक्तिमत्त्व आणि निसर्गाच्या अदृश्य शक्ती यांचा संगम असलेली ही कथा वाचकाला एका वेगळ्याच अरण्यविश्वात घेऊन जाते.
       जर तुम्हाला जंगल, वन्यजीव, गूढ कथा, थरारक अनुभव आणि आध्यात्मिक रहस्य यांची आवड असेल, तर “मचाण शांतता”

🔗 मचाण शांतता : अरण्याचा हुंकार (एपिसोड -३) | ताडोबा जंगलातील थरारक मराठी रहस्यकथा👉

अस्वीकरण -

   या कथेत वर्णन केलेले प्रसंग, व्यक्तिरेखा आणि अनुभव हे साहित्यिक मांडणीचा भाग आहेत. कोणत्याही व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी 
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.


तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो





📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook


टिप्पण्या

  1. कथेमधील वातावरण इतके जिवंत वाटते की आपण स्वतः जंगलात फिरत असल्याचा भास होतो.

    उत्तर द्याहटवा
  2. कथेमधील वातावरण इतके जिवंत वाटते की आपण स्वतः जंगलात फिरत असल्याचा भास होतो.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे

    1. प्रत्येक प्रसंग उत्सुकता वाढवणारा आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आहे.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...