मुख्य सामग्रीवर वगळा

जाको राखे साईयां आणि सतर्क राहण्याची शिकवण | साई पदयात्रा, पीक विमा आणि जीवनातील ३ सत्य घटना

 अस्वीकरण.या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात  आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे .              
                 जाको राखे साईयां आणि सतर्क राहण्याची शिकवण| साई पदयात्रा, पीक विमा आणि जीवनातील ३ सत्य घटना..
"जाको राखे साईयां मार सकेना कोई आणि सतर्क राहण्याची शिकवण भक्तीकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी "
तहान भागवायला घेतला एक घोट,
निघाले विष आणि जीवावर आली खोट,|
वेंधळेपणाची किंमत मोठी असते रे भाई,
म्हणूनच म्हणतात “सांभाळ साई… सावकाश साई…” |

       कमळगड ट्रेक दरम्यान घडलेली एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी कथा. तहानेने व्याकूळ झालेल्या सुनीलने विहिरीचे पाणी प्यायल्यावर सुरू होतो एक भयानक अनुभव पण शेवटी धावजी बाबांच्या कृपेने संकटातून सुटका होते.Horror Story Marathi वाचल्यावर अंगावर भीतीचा शहारा नक्कीच येईल.

          'जाको राखे साईयां आणि सतर्क राहण्याची शिकवण'| साई पदयात्रा, पीक विमा आणि जीवनातील ३ सत्य घटना

         दिसते पाणी  पण नसते ते पाणी ! साई पदयात्रा, पीक विमा आणि दैनंदिन जीवनातील धक्कादायक अनुभव वेंधळेपणामुळे घडलेल्या तीन धक्कादायक घटनांमधून सतर्क राहण्याची शिकवण घ्या. साई पदयात्रा, चुकीची बाटली आणि कीटकनाशकामुळे जीवावर आलेले प्रसंग वाचा पुढील लघु कथेत..
   दैनंदिन जीवनात एका क्षणाचा निष्काळजीपणा कधी मोठ्या संकटाचे कारण ठरू शकतो. ही विचारप्रवर्तक मराठी कथा आणि सत्य अनुभवांचा संग्रह साई पदयात्रा, पीक विमा आणि दैनंदिन आयुष्यात घडलेल्या तीन धक्कादायक घटनांमधून सतर्क राहण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देतो. योग्य वेळी घेतलेली काळजी, प्रसंगावधान आणि ईश्वरावरील विश्वास यामुळे संकटावर कशी मात करता येते, याचा अनुभव या लेखातून मिळेल.
     बाहेरचे पाणी पिताना,सीलबंद बाटलीच घ्या. कॅपची सील तुटलेली नसावी.अनोळखी ठिकाणचे पाणी टाळा,विहीर, टाकी, नदी, पाणवठे इत्यादी.स्वतःच्या पाण्याच्या बाटलीवर लक्ष ठेवा, खूप वेळ ठेवलेले (शिळे) पाणी ,उघड्यावरचे अस्वच्छ पाणी ,दुसऱ्यांच्या बाटलीतील पाणी पिणे, या व अशा अनेक कारणांमुळे  आजार,जिवाला धोका  होण्याची शक्यता असते.

      ‘साईची पदयात्रा’  ही एक प्रकारची श्रद्धा, सबुरी आणि आत्मिक प्रवास याचा उत्कट अनुभव असतो. देशात ‘साईबाबाचे शिर्डी’ हे स्थान अत्यंत श्रेष्ठ आहे. शिर्डीची पदयात्रा ही केवळ सहज किंवा प्रवास  नसून ती एक आध्यात्मिक साधना आहे.साईची पदयात्रा बहुतेक वेळा भक्तांच्या गावातून किंवा शहरातून सुरू होते. “साई राम” या नामाचा गजर करत ते प्रवास करत असतात. या प्रवासा मध्ये भक्तांमध्ये उत्साह, भक्ती आणि एकात्मतेची भावना दिसून येते.

         साईबाबांचा “श्रद्धा आणि सबुरी” हा  संदेश प्रत्यक्ष पदयात्रे दरम्यान अनुभवायला मिळतो. लांबचा प्रवास, उन्हाची काहीली, उष्माघात,मानसिक व शारीरिक थकवा, पायांवर होणारे फोड,पाण्याची तहान या सर्व अडचणींना तोंड देत साई भक्त निश्चयाने पुढे मार्गक्रमण करत असतात पण त्यांची साईबाबांवरील    

     निस्सिम भक्ती आणि सबुरीमुळे ते सर्व संकटाना तोंड देतात. त्यामुळे शिर्डी पदयात्रा ही केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक आणि आत्मिक परीक्षा सुद्धा असते.साईची पदयात्रा ही श्रद्धा, सबुरी आणि सेवाभाव यांचे सुंदर उदाहरण आहे. या प्रवासातून भक्तांना केवळ साईबाबांचे दर्शनच मिळत नाही, तर जीवन जगण्याची नवी दिशा मिळते. 

       ‘पीक विमा कंपनी’ म्हणजे अशी संस्था जी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान (दुष्काळ, पूर, कीड, रोग इ.) झाल्यास आर्थिक भरपाई देते. भारतात ही सेवा प्रामुख्याने सरकारी योजनेतून दिली जाते.भारतातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची योजना  ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ ही आहे.शेतकऱ्यांना  परवडणारा कमी विमा हप्ता आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळते,सर्व प्रकारच्या पिकांना संरक्षण,केंद्र व राज्य सरकारचा यात सहभाग असतो.भारतामध्ये सरकारी आणि खासगी दोन्ही प्रकारच्या कंपन्या पीक विमा देतात.पीक विमा कंपनी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे कारण ती नुकसानीच्या वेळी आर्थिक आधार देते. आजच्या बदलत्या हवामानात प्रत्येक शेतकऱ्याने पीक विमा घेणे गरजेचे आहे.

         ‘वेंधळेपणा’ म्हणजे एखाद्या व्यक्तीने काम करताना किंवा वागताना वारंवार विसरणे, वरचेवर चुका करणे, लक्ष न देणे किंवा काळजी न घेणे ही सवय होय. वेंधळेपणा हा काही वेळा निरुपद्रवी असतो, पण तोच सवयीचा गुण झाला तर तो आयुष्यात अनेक अडचणी निर्माण करू शकतो.वेंधळेपणाचे परिणाम अनेकदा त्रासदायक ठरतात. कामात आणि आयुष्यात चुका होतात.  काही वेळा तर यामुळे आर्थिक किंवा जीवित नुकसानही होऊ शकते. त्यामुळे वेंधळेपणा ही केवळ एक सवय नसून त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.शेवटी, वेंधळेपणा हा प्रत्येकामध्ये थोड्याफार प्रमाणात असतोच. मात्र, तो आपल्या प्रगतीच्या आड येऊ नये यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे. योग्य सवयी लावून आणि शिस्त पाळून आपण वेंधळेपणावर मात करू शकतो. त्यामुळे “वेंधळेपणा” हा दोष नसून सुधारता येणारी एक सवय आहे, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. प्रयत्न पूर्वक त्याच्यावर मात करता येते. आजच्या धावपळीच्या युगात वेळे अभावी वेंधळेपणा हा माणसांच्या अंगवळणी पडलेला आहे. आणि तो वेळप्रसंगी जीवावर सुद्धा बेतू शकतो.

           वरील तिन्ही प्रसंगांवर आधारित, ‘वेंधळेपणा’ या मध्यवर्ती संकल्पनेला अधोरेखित करणाऱ्या खालील तीन लघुकथा पुढील प्रमाणे.

              अ ) “सांभाळ साई..सावकाश साई”|साई पदयात्रेतील प्रसंग


"सांभाळ साई...सावकाश साई"

      मुंबईतून दरवर्षी थंडीच्या मोसमात साईभक्तांच्या अनेक पदयात्रा शिर्डीकडे निघत असतात. भक्ती, श्रद्धा आणि संयम यांची सुंदर सांगड घालत हा प्रवास अनेकांसाठी एक आध्यात्मिक अनुभव ठरतो.ते सन २०१८ चे वर्ष असावे. मुंबईच्या बोरिवली भागातील ‘सांभाळ साई’ नावाच्या  साईभक्त मंडळाने दरवर्षी प्रमाणे त्या वर्षी सुद्धा शिर्डी पदयात्रेचे आयोजन केले होते. त्या पदयात्रेत त्यांच्या मंडळातील नियमित भक्तगण तर सहभागी होतेच, पण जे इच्छुक भाविक असतात त्यांनाही संधी दिली जाते.
         मात्र, ही संधी सहज मिळत नव्हती. प्रत्येक इच्छुक भाविकांने डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. कारण हा प्रवास फक्त श्रद्धेचा नसून शरीराच्या क्षमतेचीही मोठी परीक्षा असते. त्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये आणि संपूर्ण पदयात्रा सुरक्षितपणे पार पडावी, यासाठी मंडळाकडून ही काळजीपूर्वक अट ठेवली जात असे.मुंबईतील बोरिवलीहून शिर्डीपर्यंत पायी जाणारी ही पदयात्रा अनेक भक्तांसाठी श्रद्धेची आणि आत्मशोधाची वाट आहे. साई बाबा यांच्या दर्शनासाठी भक्तगण दोन प्रमुख मार्ग निवडतात.
          एक म्हणजे ‘नाशिक हायवे मार्ग’, आणि दुसरा म्हणजे ‘जव्हार मार्गे’ जाणारा डोंगराळ-निसर्गरम्य मार्ग. या दोन्ही मार्गांचे स्वरूप, अनुभव आणि आव्हाने वेगवेगळी आहेत. त्यामुळे या दोन मार्गांची तुलना करणे महत्त्वाचे ठरते.नाशिक हायवे मार्ग हा सर्वाधिक वापरला जाणारा आणि सोयीचा मार्ग आहे. बोरिवलीहून ठाणे, भिवंडी, शाहापूर, कसारा घाट, इगतपुरी, घोटी, सिन्नर असा हा सरळ मार्ग शिर्डीकडे जातो. या मार्गावर सतत आढळून येणाऱ्या नागरी वस्त्या,हॉटेल्स, पाण्याची सोय आणि वैद्यकीय मदत सहज उपलब्ध असते. अनेक पदयात्री गट, पालख्या आणि सेवा देणारे लोक या मार्गावर आढळतात. त्यामुळे हा मार्ग सुरक्षित आणि सोयीस्कर मानला जातो. मात्र, या मार्गावर वाहनांची गर्दी, धूळ आणि आवाज जास्त असल्याने कधी कधी थकवा अधिक जाणवतो.
            याच्या उलट, जव्हार मार्ग हा शांत, निसर्गरम्य आणि थोडा कठीण आहे. बोरिवलीहून विरार, सफाळे, विक्रमगड,जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक, सिन्नर असा हा मार्ग पुढे जातो. या वाटेवर घनदाट जंगल, डोंगर, वळणदार रस्ते आणि कमी वस्ती आढळते. त्यामुळे हा प्रवास अधिक शांत आणि आत्मिक अनुभव देणारा ठरतो. मात्र, पाण्याची आणि अन्नाची सोय कमी असल्याने त्यासाठी योग्य तयारी आवश्यक असते. काही ठिकाणी मोबाईल नेटवर्कही नसते, त्यामुळे गटानेच प्रवास करणे योग्य ठरते.
        दोन्ही मार्गांमध्ये अंतर जवळपास सारखेच (२५० ते ३०० किमी) असले तरी अनुभव मात्र वेगळा आहे. हायवे मार्गावर सोयी-सुविधा जास्त असल्यामुळे नवख्या पदयात्रेकरूंना तो अधिक योग्य वाटतो. तर जव्हार मार्गावर निसर्गाचा सान्निध्य, शांतता आणि एकांत अनुभवायला मिळतो, जो अनुभवी आणि साहसी यात्रेकरूंना तो मार्ग आकर्षित करतो. त्या मुळे बोरिवलीचे ‘सांभाळ साई’ हे मित्रमंडळ दरवर्षी ‘मुंबई-जव्हार’ मार्गे पदयात्रा करत असतात. यंदाही त्यांनी हाच मार्ग निवडला होता. गुरुवारचा शुभ दिवस पाहून संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली.
       बोरिवलीहून निघालेला हा श्रद्धेचा प्रवास सफाळे, वरई फाटा, पालघरमधील मस्तान नाका, वाडा-पाली मार्गे पुढे सरकत विक्रमगडकडे वाटचाल करू लागला. तब्बल १०५ किलोमीटरचा हा खडतर प्रवास त्यांनी अविरत पायी चालत पूर्ण केला आणि मध्येच एके ठिकाणी दुपारची झोप परत चालणे असे करत ते तिसऱ्या दिवशीच्या पहाटे सहाच्या  सुमारास ते विक्रमगड येथे पोहोचले.
         दिवसभर विश्रांती घेऊन संध्याकाळी तीन वाजता पुन्हा प्रवास सुरू करण्याचे त्यांचे ठरले होते. त्या प्रमाणे सर्वांनी आराम करून नव्या उर्जेने पायपीट सुरू केली. मात्र, एक अडचण निर्माण झाली होती. आवश्यक सामान आणि पाण्याच्या बाटल्या असलेला टेम्पो विक्रमगड येथे बिघाडामुळे मागेच अडकून पडला होता,त्याची दुरुस्ती सुरू होती. ‘थोड्याच वेळात तो दुरुस्त होऊन येईल आणि आपल्याला गाठेल’ या आशेवर  साईभक्त थांबले नाहीत. श्रद्धेच्या जोरावर सर्व पदयात्रेकरू पुढे निघाले. प्रत्येकाकडे फक्त एक लिटर पाण्याची बाटली होती,तीच त्यांच्या सोबतची एकमेव साथ होती.
      लवकरच विक्रमगड-जव्हार मार्गावरील ‘जव्हार घाट’ सुरू झाला. डोंगराळ, वळणावळणाचा आणि काही ठिकाणी उभा चढ असलेला हा घाट शरीराची खरी परीक्षा घेणारा होता. प्रत्येक पाऊल जड होत चालले होते, धाप लागायला लागली होती. अशा वेळी पाण्याचा प्रत्येक घोट अमृतासारखा वाटत होता. या कठीण चढाईत सोबत पुरेसे पाणी असणे किती गरजेचे आहे, याची जाणीव प्रत्येकाला प्रकर्षाने होत होती.
        सफेद पॅन्ट, शर्ट, भगव्या रंगाची टी-शर्ट, मंडळाचे नाव छापलेली सफेद टोपी आणि पायात कॅनव्हासचे बूट असा प्रत्येक साईभक्तांचा एक समान  पेहराव होता. एकूण ११८ साईभक्त या पदयात्रेत सहभागी झाले होते.
       पुढे आणि मागे मंडळाचे मुख्य कार्यकर्ते सतत लक्ष ठेवून होते, जेणेकरून कोणी खूप पुढेही जाऊ नये किंवा मागेही राहू नये. या यात्रेत ‘आलोक’ नावाचा एक वय वर्ष 45 चा नवीन यात्रेकरू प्रथमच सहभागी झाला होता. पदयात्रेतील भक्तिमय वातावरण, उत्साह आणि स्फूर्ती पाहून तो अक्षरशः भारावून गेला होता.
         “साई राम…बाबा साई…जय साई…” या जयघोषांनी वातावरण दुमदुमत होते. तर साईबाची गाणी सुद्धा म्हटली जात होती. इतर भाविक ज्या आवेशाने जय घोष करत होते, त्याच आवेशाने ‘आलोक’ही त्यात सहभागी होत होता. साधारण १५ ते २० जणांचे छोटे-छोटे ग्रुप तयार झाले होते, आणि ‘आलोक’ शेवटच्या गटांपैकी एका गटात चालत होता.
       सर्वांच्या चालण्यात एक वेगळीच ऊर्जा होती. त्यांच्या चेहऱ्यावरून किंवा शरीरबोलीवरून ते थकले आहेत, असे अजिबात वाटत नव्हते. प्रत्येक जण एकमेकांना आधार देत होता. कोणी चालताना थोडा अडखळला तर “सावकाश साई…” असा आवाज यायचा, आणि कोणी रस्ता चुकून बाजूला जाऊ लागला तर “सांभाळ साई…” असा प्रेमळ इशारा हमखास मिळायचा.
        अशा या पदयात्रेत एकमेकांशी अतूट जिव्हाळा निर्माण झाला होता. गळ्यात टाळ आणि मुखी साईरामाचा अखंड जयघोष,संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. किती चाललो, किती दमलो याची जाणीव कोणालाही होत नव्हती.जव्हारचा उभा चढ पार करून आता सगळे सरळ, सपाट रस्त्यावर आले होते. “आता जव्हार तास - दिड तासावर असेल,” असा त्यांनी अंदाज बांधला.संध्याकाळचे सहा वाजत आले होते. उन्हाचा तडाखा ओसरला होता आणि हवेत एक हलकी थंडगार झुळूक जाणवू लागली होती. जणू जव्हार जवळ येत असल्याची ती चाहूलच होती. 
           आलोकच्या हातातली पाण्याची बाटली केव्हाच संपली होती. कोणाकडे पाणी मागावे, असा विचार त्याच्या मनात आला; पण प्रत्येक जण स्वतःची तहान भागवण्यासाठीच झगडत असेल, हे त्याला ठाऊक होते. म्हणून तो गप्पच राहिला. पाण्याचा आणि सामानाचा टेम्पो अजूनही मागेच होता.तहान आता असह्य होत चालली होती. घसा कोरडा पडला होता, पाय जड झाले होते, आणि प्रत्येक पाऊल टाकताना अंगातली शक्ती कमी होत असल्याची जाणीव होत होती.
      अशाच अवस्थेत, रस्त्याच्या कडेला असलेले एक विस्तीर्ण शिवार त्याच्या नजरेस पडले. तिथे पाण्याचा पंप जोरात सुरू होता आणि दुधाळ, फेसाळ पाणी बाहेर उडत होते. त्या पाण्याचे ते दुधाळ, झुळझुळणारे ते रूप पाहून तहानेने व्याकुळ झालेलाच माणूस नव्हे, तर तृप्त असलेला माणूसही क्षणभर थांबून ते पाणी पिईल, असे ते पाणी दिसत होते.
        पंप अगदी जवळ असल्यासारखा वाटत होता.जणू हाकेच्या अंतरावर. आलोकने लगेच चालण्याचा वेग कमी केला, ग्रुपमधील मंडळींना पुढे जाऊ दिले आणि तो पाण्यासाठी त्या दिशेने वळला.पण जवळ वाटणारा तो पंप प्रत्यक्षात थोडा लांब होता. वेळ वाया जाऊ नये म्हणून तो धावतच तिथे पोहोचला. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की त्याची प्लास्टिकची पेट बॉटल  त्या जोरा पुढे  नीट तग धरत नव्हती. पाणी भरायचा प्रयत्न वारंवार अयशस्वी होत होता. खाली वाहणारे माती मिश्रित गढूळ पाणी घेण्याची त्याची इच्छा नव्हती.क्षणभर तो गोंधळला, वेळ निघून जात होती आणि तहान आणखी वाढत होती.
       तेवढ्यात त्याच्या नजरेस विहीर आणि पंप यांच्या मधोमध ठेवलेली एक पत्र्याची बादली दिसली,त्यात स्वच्छ पाणी भरलेले होते. एक क्षणही न दवडता त्याने ती बाटली त्या बादलीत बुडवली, पाणी भरून घेतले आणि लगेच त्याने मागे वळून सुसाट धावायला सुरुवात केली.पण तोपर्यंत त्याचा ग्रुप खूपच पुढे निघून गेला होता.‘आलोक’ आता पूर्ण ताकदीने धावत होता. तहान, थकवा, दमछाक,सगळे  काही बाजूला ठेवून तो फक्त एकाच ध्येयाने धावत होता. “ग्रुपला गाठायचे!” शेवटी त्याने ग्रुपला गाठलेच.  थोडा दम शांत झाल्या नंतर ते विहिरीचे दुधाळ, थंड पाणी निवांत पिऊया,असे आलोकने ठरवले.
         थोडा श्वास सावरताच त्याने कोणताही मागचा पुढचा विचार न करता गटागटा पाणी पिण्यास सुरुवात केली.पण त्या पाण्याची चव काहीतरी वेगळीच होती.जणू काही केमिकल मिसळल्यासारखी! क्षणभर त्याच्या मनात शंका आली, पण लगेचच त्याने स्वतःलाच समजावले,“कदाचित पाणी शुद्ध करण्यासाठी काहीतरी टाकले असावे  म्हणूनच ते दुधाळ दिसत असेल.” आणि त्या विचाराने त्याने अजून अर्ध्याहून अधिक पाणी संपवले.तहान तर भागली पण लगेचच काहीतरी बिघडले.
         घशापासून पोटापर्यंत जळजळ सुरू झाली. अंगात एक वेगळीच आग पेटल्यासारखे वाटू लागले मळमळ, तळमळ वाढू लागली.पोट जोरात दुखायला लागले,डोके गरगरू लागले , पाय डगमगायला लागले,डोळ्यांसमोर मिट्ट काळोख दाटून आला.“सावकाश साई… सांभाळ साई…” ग्रुपमधील सहभक्त त्याला सावरत होते. पण आता त्याच्या शरीरावर त्याचाच ताबा राहिला नव्हता. ग्लानीने पूर्णपणे त्याला ग्रासले आणि अचानक त्याचा तोल गेला.तो रस्त्यातच कोसळला.क्षणात सगळे साईभक्त धावत त्याच्याभोवती जमा झाले. कोणीतरी त्याला उचलून बसवले, कोणीतरी तोंडावर पाणी मारले  पण आलोक काही शुद्धीवर येत नव्हता. तेवढ्यात कोणाच्या तरी लक्षात आले त्याच्या तोंडातून केमिकलसारखा तीव्र वास येत होता!
       परिस्थिती गंभीर होती,ताबडतोब टेम्पोवाल्याला फोन केला गेला, पण तो अजून लांब होता. वेळ घालवणे धोक्याचे होते. मग रस्त्याने जात असलेली एक बोलेरो जीप थांबवली गेली आणि त्यात आलोकला बसवून जवळच्या रुग्णालयाकडे धाव घेतली.रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. काही वेळातच सगळा साईभक्त परिवार तिथे जमला. प्रत्येकाच्या ओठांवर एकच प्रार्थना,“बाबा, याला वाचवा…” “ साई, याला वाचवा…”साईबाबांच्या कृपेने आलोक हळूहळू धोक्याच्या बाहेर आला.डॉक्टरांनी सांगितले,त्याच्या पोटात पाण्यासारखे दिसणारे बुरशी विरोधी केमिकल गेले होते!“आजचा दिवस त्याला अ‍ॅडमिट ठेवावे लागेल.
        “उद्या यांना डिस्चार्ज देऊ,” असे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले.पण आलोक मात्र भावूक झाला होता. डोळ्यात पाणी आणत तो म्हणाला,“माझा जीव बाबांच्या कृपेने वाचला… मला तुमच्या सोबत साईंच्या दर्शनाला जायचेच आहे!” त्याचा तो हट्ट, ती श्रद्धा पाहून सगळेच भारावले. मग सर्वांनी एकमताने निर्णय घेतला,एक दिवस जव्हारमधील एका शाळेत थांबायचे.दुसऱ्या दिवशी आलोकला डिस्चार्ज मिळाला आणि मग सर्व साईभक्त पुन्हा एकत्र निघाले.आपल्या अंतिम ध्येयाकडे.शेवटी, साईबाबांच्या पवित्र भूमीत पोहोचल्यावर आलोकने भक्तिभावाने समाधीसमोर नतमस्तक होत डोके टेकवले,त्याच्या पाणावलेल्या डोळ्यात आणि  मनात एकच भावना होती.
       "बाबा ! मला पुनर्जन्म मिळाला, ही तुमचीच कृपा!”

                              ब)  चुकीच्या बाटलीमुळे जीवावर आलेले संकट

"साई तारी,त्याला कोण मारी"

        नाशिक जिल्ह्यातील ‘पिंगारा’ गावातील ‘सखाराम’ हा एक सीमांत भूधारक शेतकरी. अवघ्या २.५ एकर जमिनीवर त्याचा संसार आणि आशा दोन्ही उभ्या होत्या.मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने त्याच्या शेतातील कांद्याचं संपूर्ण पीक अक्षरशः कुजून गेले. एका क्षणात त्याच्या कष्टांचे सोने मातीमोल झाले. बियाणे, खते, औषधे आणि आधीचे कर्ज फेडण्यासाठी त्याने सावकाराकडून दीड लाख रुपये उचलले होते. या हंगामातील कांद्याच्या पिकावरच त्याची सारी मदार होती.पण आता हातात काहीच उरले नव्हते.सावकाराचा तगादा वाढत होता. दुसरीकडे, एका खासगी विमा कंपनीकडून २.५ एकराच्या पिकासाठी सुमारे एक लाख रुपयांचा दावा मिळवण्यासाठी त्याला वारंवार  त्या कार्यालयामध्ये  खेटे मारावे लागत होते. प्रत्येक वेळी नवे कारण, नवा विलंब आणि आता तर सखारामचा संयमच सुटत चालला होता.त्या दिवशी तो ठरवूनच आला होता.
        “आज निकाल लागलाच पाहिजे नाहीतर मी स्वतःला संपवेन!”आपल्या बायकोला सोबत घेऊन तो विमा कंपनीच्या कार्यालयात पोहोचला. मनातली असहायता आणि राग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्याने सोबत एक प्लास्टिकची पाण्याची बाटली आणली होती.त्यात त्याने पाण्यासारखा दिसणारे Roundup नावाचे तणनाशक केमिकल भरले होते.सुरुवातीलाच विमा डेस्कवरील मॅडमशी त्याची खूपवेळ जोरदार वादावादी झाली. वातावरण तापले.शेवटी तिने त्याला ब्रँच मॅनेजरकडे पाठवले.
       या सगळ्या धावपळीमध्ये आणि झालेल्या वादामुळे त्या मॅडमचा रक्तदाब वाढला होता. हात किंचित थरथरत होते. घसा कोरडा पडला होता आणि तीव्र तहान लागली होती. टेबलवर ठेवलेली बाटली तिने स्वतःचीच आहे असे समजून उचलली आणि कोणताही विचार न करता त्यातील पाणी (द्रव)अर्ध्याहून अधिक गटागट पिऊन टाकले.काही क्षणातच तिची अवस्था बदलू लागली.छातीत जळजळ,पोटात तीव्र वेदना, डोके गरगरू लागले, डोळ्यांसमोर अंधार दाटू लागला आणि अचानक ती खुर्चीतच कोसळली!
      तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आले,ती बाटली तिची नव्हती. ती सखारामने आणलेली पाणी मिश्रित केमिकलची बाटली होती!कार्यालयात एकच गोंधळ उडाला. तात्काळ तिला नाशिकमधील जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.डॉक्टरांनी तातडीने इमर्जन्सी ट्रीटमेंट सुरू केली.सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला.पण या घटनेनंतर सखाराम वर पोलिस चौकशीचा ससेमिरा लागला. त्याचा राग, त्याची असहायता आता एका गंभीर कायदेशीर प्रकरणात बदलली होती.कधी कधी परिस्थिती माणसाला टोकाला नेते पण त्या एका चुकीच्या निर्णयाने अनेक आयुष्यांवर परिणाम होऊ शकतो.
                     क)कीटकनाशक आणि प्रसंगावधानाची शिकवण
"जाको राखे साई मार सकेना कोई "

            डॉक्टर ‘सुजित’ हे पालघरमधील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. ते दररोज अंधेरीहून पालघर स्टेशनपर्यंत लोकलने प्रवास करत असत. त्यानंतर डहाणूहून येणारे त्यांचे डॉक्टर मित्र ‘सचिन’ यांच्यासोबत ते बाईकने पुढे हॉस्पिटलकडे जात. त्यामुळे सुजित यांना रोज स्टेशनवर सचिनची वाट पाहावी लागत असे.त्या दिवशीही ते नेहमीप्रमाणे वेळेवर आले होते. हातातली पाण्याची बाटली उघडून त्यांनी दोन घोट घेतले आणि स्टेशनवरील सिमेंटच्या चौकोनी बैठकीवर बसून मोबाईल मध्ये ते गुंतले.
        त्यांच्या मागे ‘नम्रता’ही सुद्धा मोबाईल पाहत बसली होती. तिच्या जवळही पाण्याची बाटली होती. दोघांच्या बाटल्या नकळत अगदी जवळ ठेवल्या गेल्या होत्या पण त्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते.दोघेही आपल्या-आपल्या जगात मग्न होते.अजित आपल्या डॉक्टर मित्राच्या पोस्ट पाहत होते आणि नम्रता तिच्या नवऱ्याच्या,मयांकच्या मेसेजमध्ये गुंतली होती.
        ‘मयांक’ हा भारतीय हवामान खात्यातील तज्ञ होता. काही महिन्यांपूर्वी त्याची बदली जयपूर येथे झाली होती. खूप दिवसांनी तो मुंबईत येणार होता, म्हणून नम्रता त्याला स्टेशनवर घेण्यासाठी आली होती. तिच्या मनात उत्साह, घाई आणि आनंद सगळेच एकत्र मिसळले होते.पण घरातून निघताना घाईघाईत एक मोठी चूक झाली होती.
        तिच्या सासूबाईंनी झाडांसाठी वापरायचे पाण्यासारखे दिसणारे कीटकनाशक एका प्लास्टिकच्या बाटलीत मिक्स करून भरून ठेवले होते. “नंतर फुरसतीने ‘स्प्रे’ च्या बाटलीत भरता येईल म्हणून”  ती बाटली तशीच ठेवली होती. नम्रताने घाई घाईने  आणि उतावीळ होऊन चुकून ती पाण्याची बाटली आहे.असे समजून ती पर्समध्ये टाकली आणि लगबगीने पालघर रेल्वे स्टेशनला यायला निघाली.स्टेशनवर पोहोचल्यावर ‘मयांक’शी तिचे फोनवर सतत बोलणे सुरू होते.“मी आली आहे,तू कुठे आहेस,आता ट्रेन कुठे आहे ?”
         या सगळ्या गडबडीत तिने पर्समधून बाटली काढली. झाकण उघडले आणि ती पाणी पिणार इतक्यात मयांकची ‘जयपूर- बांद्रा एक्सप्रेस’ पालघर स्टेशन मध्ये आली.ते पाहताच क्षणात तिने उघडलेल्या पाण्याच्या बाटलीचे झाकण बंद करून ती बाजूला ठेवली,मांडीवर असलेला महागडा मोबाईल अगोदर पर्समध्ये ठेवला आणि आणि आनंदाच्या भरात ती उठून नवऱ्याला भेटायला धावली.आणि त्या धुंदीत, ते दोघेही सामान उचलत स्टेशन बाहेर पडले. त्या घाईत तिची बाटली तिथेच सीटवर राहिली.
      ती एक्सप्रेस गेल्यावर,त्या मागोमाग डहाणूहून डॉक्टर सचिनची लोकल येऊन थांबली. त्याला पाहताच मोबाईलमध्ये गुंतलेला डॉक्टर सुजित उठला आणि घाईघाईत हाताशी आलेली बाटली उचलून सचिन सोबत स्टेशनच्या बाहेर पडला. इथेच खरी चूक झाली होती..
      सुजितने न पाहताच नम्रताने ठेवलेली बाटली उचलली ,दोघेही बाईक वरून  निघाले. सुजित मागे बसला होता. थोड्याच वेळात त्याला तहान लागल्याची जाणीव झाली. त्याने बाटली उघडली आणि गटागटा ते पाणी पिऊ लागला. ते प्यायल्या नंतर त्याला पाण्याची चव वेगळी वाटली. हे काही बरोबर नाही, हे त्याला जाणवले, उरलेले थोडे पाणी त्याने लगेच रस्त्यावर फेकून दिले. पण तो पर्यंत उशीर झाला होता. सचिन पुढे बाईक चालवत, गप्पा मारत होता, आणि सुजित फक्त “हूं ! हूं !” एवढेच  उत्तर देत होता.
        अचानक सुजितच्या छातीत जळजळ सुरू झाली,पोटात आगीचा वणवा उठला.डोके गरगरू लागले.डोळ्यांसमोर अंधार दाटून आला.वाऱ्याच्या झोताने त्याची अवस्था अजूनच बिकट झाली. त्याचा तोल जाऊ लागला म्हणून त्याने नकळत सचिनच्या पाठीवर डोके टेकवले.त्या मुळे सचिनच्या लगेच लक्षात आले की ‘सुजितचे काही तरी बिघडले आहे’त्याने तात्काळ बाईक बाजूला घेतली आणि पुढच्याच क्षणी सुजित बाईकवरून खाली कोसळला!त्या क्षणी सुजितच्या तोंडातून  कीटकनाशकाचा तीव्र भपका आला.
        “विषबाधा!” झटक्यात सचिनच्या लक्षात आले. त्याने क्षणाचाही विलंब न करता बाईक रस्त्याच्या बाजूला पार्क केली, रिक्षा थांबवली आणि अजितला घेऊन थेट हॉस्पिटलमध्ये त्याने धाव घेतली. तिथे पोहोचताच डॉक्टर सचिन ने स्वतःडॉक्टर सुजितवर इमर्जन्सी ट्रीटमेंट सुरू केली.दिवसभर जीवाचा थरार चालू होता पण सुदैवाने दुसऱ्या दिवशी उपचारा नंतर डॉक्टर सुजित पूर्णपणे शुद्धीवर आले.डोळे उघडताच त्यांनी एकच वाक्य म्हटले “माझ्या वेंधळेपणामुळे हे सगळे झाले मी चुकीची पाण्याची बाटली उचलली कारण माझ्या बाटली मधील दोन घोट पाणी त्या अगोदर मी प्यायलो होतो, तेव्हा काही झाले नाही. नंतर झाले म्हणजेच मी दुसरीच कुणाची तरी बाजूची बाटली उचलली असावी” ते ऐकून क्षणभर सगळा हॉस्पिटल स्टाफ आणि त्याचे कुटुंबीय स्तब्ध झाले.
       पुढील पोलीस तपासात ‘नम्रता’ च्या चौकशीअंती तिला कुणाला मारण्याचा किंवा स्वतःचा आत्मघात करण्याचा तिचा प्रयत्न नव्हता हे सिद्ध झाले.  या घटनेला निव्वळ दोघांचा ‘हलगर्जीपणा’ आणि ‘वेंधेळपणा’ कारणीभूत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.एक छोटीशी चूक आणि जीवावर बेतलेली घटना.
      पाण्यासारखे दिसणारे प्रत्येक द्रव पाणी नसते आणि घाईत घेतलेला एक चुकीचा निर्णय आयुष्य बदलू शकतो. पाणी पिताना तरी वेंधेळपणा नसावा हे वरील तिन्ही लघु कथांवरून दिसून येते.
                                                                                      समाप्त🖋️📖📚

🔗"बंधन विवाहाचे आणि मन कैदेतले"| जबरदस्तीचा विवाह, संमती आणि भारतीय कायदा | विचारप्रवर्तक मराठी कथा

      जबरदस्तीचा विवाह, विवाहातील संमती, कौटुंबिक दबाव, मुलींचे हक्क, भारतीय विवाह कायदा आणि सामाजिक वास्तव या विषयांवर आधारित हा लेख समाजातील एका गंभीर वास्तवाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. विवाह हा फक्त परंपरा नसून दोन मनांची स्वेच्छेने झालेली साथ असावी, हा संदेश या लघु कथेतून मांडण्यात आलेला आहे.पुढे वाचा 👉

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख
प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.

तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.
धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी - लोगो





📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!


टिप्पण्या

  1. छोटासा निष्काळजीपणा किती मोठे परिणाम करू शकतो, हे अतिशय साध्या पण प्रभावी पद्धतीने मांडले आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्येक कथा विचार करायला भाग पाडते आणि सावध राहण्याची जाणीव करून देते.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...