मुख्य सामग्रीवर वगळा

"तहान की शाप - धावजी बाबांनी वाचवले"|कमळगड ट्रेकवरील थरारक मराठी भयकथा

 अस्वीकरण  हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेली आहे. याचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी  संबंध असणे किंवा नाम साधर्म्य असणे हा निव्वळ योगायोग आहे.या कथेत वर्णन केलेल्या गोष्टी अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्यासाठी नसून केवळ कथानकाचा भाग आहेत. ही कथा काल्पनिक  भयप्रधान आहे. यास्तव कमकुवत मनाच्या वाचकांनी काळजी घ्यावी.

                     "तहान की शाप - धावजी बाबांनी वाचवले"|कमळगड ट्रेकवरील थरारक मराठी भयकथा

'तहान की शाप - धावजी बाबांनी वाचवले ' थरारक भयकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी

तहान की शाप,क्षणात बदलली सारी कहाणी,

विहिरीच्या त्या पाण्यात दडली होती काळी निशाणी|

जेथे माणूस हरवतो, तिथे श्रद्धा उभी राहते,

धावजी बाबांच्या कृपेनेच जिवाला परत वाट सापडते |

🔗 'शापित गेस्ट हाऊस' - या गेस्ट हाऊसमध्ये जाण्याची चूक करू नका|थरारक मराठी भयकथा

    शापित गेस्ट हाऊसची ही भयानक कथा वाचा…एका पावसाळी रात्री घडलेला खरा अनुभव, जिथे गेस्ट हाऊसमध्ये काहीतरी अनोळखी शक्ती होती. ही Horror Story Marathi वाचल्यावर अंगावर भीतीचा शहारा नक्कीच येईल.
             
                    "तहान की शाप - धावजी बाबांनी वाचवले"|कमळगड ट्रेकवरील थरारक मराठी भयकथा 
       कमळगड ट्रेक दरम्यान घडलेली एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी कथा. तहानेने व्याकूळ झालेल्या सुनीलने विहिरीचे पाणी प्यायल्यावर सुरू होतो एक भयानक अनुभव पण शेवटी धावजी बाबांच्या कृपेने संकटातून सुटका होते.Horror Story Marathi वाचल्यावर अंगावर भीतीचा शहारा नक्कीच येईल.
    कमळगड ट्रेकदरम्यान घडलेली ही थरारक मराठी भयकथा भीती, गूढ अनुभव आणि श्रद्धेची अनोखी सांगड घालते. तहानेने व्याकूळ झालेल्या सुनीलने एका जुन्या विहिरीचे पाणी पिताच त्याच्या आयुष्यात अनाकलनीय घटना घडू लागतात. हा केवळ योगायोग होता की एखाद्या अदृश्य शक्तीचा शाप? संकटाच्या त्या भयावह क्षणी धावजी बाबांची कृपा त्याला कशी वाचवते, याचा अंगावर काटा आणणारा अनुभव या कथेत उलगडतो.
    ट्रेकिंग म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात पायी चालत केलेला साहसी प्रवास. आजच्या धकाधकीच्या जीवनात ट्रेकिंग ही केवळ छंदाची गोष्ट राहिलेली नाही, तर ती एक जीवनशैली बनत चालली आहे. शहरातील गर्दी, प्रदूषण आणि मानसिक ताण यापासून दूर जाऊन शांतता अनुभवण्यासाठी अनेक लोक ट्रेकिंगचा मार्ग निवडतात. डोंगर, किल्ले, जंगल, धबधबे आणि घाटमार्ग यांमधून चालताना माणूस निसर्गाशी एकरूप होतो. निसर्गात वेळ घालवल्यामुळे मन शांत होते. ताणतणाव कमी होतो आणि सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास वाढतो.  
      ‘कमळगड’ हा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्या जवळ असलेला एक रानवट, शांत आणि कमी गर्दीचा किल्ला आहे. इतर प्रसिद्ध किल्ल्यांच्या तुलनेत येथे सोयीसुविधा कमी असल्यामुळे हा ट्रेक अधिकच वास्तविक आणि आव्हानात्मक वाटतो. त्यामुळे सोबत ‘वाटाड्या’ असणे फायद्याचे ठरते.
      कमळगडच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर दिसणारा परिसर अत्यंत सुंदर असतो. चारही बाजूंनी डोंगर रांगा, हिरवळ आणि शांतता यामुळे मन भारावून जाते.किल्ल्यावर किंवा ट्रेकच्या मार्गावर  शुद्ध, पिण्यायोग्य पाणी मिळण्याची कोणतीही खात्री नव्हती. ‘तिथे पाणी मिळेल’ या भरवशावर निघणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे हा ट्रेक करताना प्रत्येकाने स्वतःसोबत पुरेसे पाणी नेणे अत्यंत आवश्यक आहे. किमान २ ते ३ लिटर पाणी प्रत्येकाने सोबत ठेवणे गरजेचे आहे. तरच हा ट्रेक तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल.
        सुरूर (वाई, सातारा) येथील ‘धावजी पाटील समाधी मंदिर’ हे श्रद्धा, लोक विश्वास आणि वास्तव याचे अनोखे संगम मानले जाणारे पवित्र स्थान आहे.  जे केवळ धार्मिक नसून सामाजिक आणि सांस्कृतिक आयुष्याचा सुद्धा भाग बनलेले आहेत. सातारा जिल्ह्यातील 'सुरुर' या गावाजवळ ‘धावजी पाटील’ या नावाने ओळखले जाणारे एक स्थानिक देवस्थान,समाधी स्थळ आहे. हे ठिकाण मोठ्या धार्मिक क्षेत्राप्रमाणे भव्यदिव्य  नसले तरी, स्थानिक लोकांच्या मनात याला विशेष स्थान आहे. श्रद्धा, अनुभव आणि लोकपरंपरा यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो. साधेपणा आणि आध्यात्मिक शांतता यांचा अनुभव येथे येतो. 
     ‘धावजी पाटील समाधी मंदिर’ येथे  लोक विविध कारणांसाठी येतात. इथे भाविक मनोकामना  आणि मनःशांती साठी येतात, तर काही घटना या प्रत्यक्षात मानसिक बदलाशी संबंधित असू शकतात. काही लोक असेही सांगतात की अशा संकटातून या श्रद्धा स्थानी मार्ग नक्कीच मिळतो. “बाधा” किंवा “झपाटलेपण” असलेल्या व्यक्तींना येथे आणल्यास त्यांच्या वागण्यात सुधारणा दिसते. ‘धावजी पाटील’ यांच्या ठिकाणी एक वेगळे वातावरण अनुभवायला मिळते. सामुहिक प्रार्थना, भक्तीभाव ,पवित्र वातावरण आणि लोकांचा आधार या व अशा भक्तिमय वातावरणामुळे अनेक धार्मिक स्थळी बाधित मंडळीची सुधारणा होते. त्यापैकी ‘धावजी पाटील समाधी मंदिर’ हे एक आहे.
    बदलापूर मध्ये सहा मित्रांचा एक हौशी ट्रेकिंग ग्रूप होता. दरवर्षी किमान दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकिंगला जाणे हा त्यांचा नित्यक्रमच झाला होता. यंदाही त्यांनी त्याच परंपरेला अनुसरून ‘विंटर ट्रेक’ला जाण्याचे ठरवले. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा विंटर ट्रेकिंगसाठी उत्तम काळ मानला जातो, त्यामुळे त्यांनी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असलेल्या ‘कमळगड’ येथे जाऊन तिथला सुंदर सूर्यास्त अनुभवण्याचे निश्चित केले. अमोद, निशिकांत, अभिषेक, संजोग, वंदन आणि सुनील असे ते सहा मित्र सकाळी ७ वाजता बदलापूरहून स्वतःच्या खासगी वाहनाने निघाले. वाई मार्गे प्रवास करत ते दुपारी सुमारे २:३० वाजता ‘नांदगणे’ गावात पोहोचले. त्याआधीच त्यांनी जवळच्या गावातून एका जाणकार व्यक्तीला वाटाड्या म्हणून सोबत घेण्याचे ठरवले होते,त्याचे नाव ‘गजानन’.
          'नांदगणे ते कमळगड' हा साधारण २ ते २.३० तासांचा ट्रेक आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्यांनी दुपारी ३ वाजता चढाईला सुरुवात केली. सुनील वगळता इतर सर्वांनी ORS मिसळलेल्या पाण्याच्या बाटल्या सोबत घेतल्या होत्या. घाईगडबडीत सुनील कडून मात्र ही गोष्ट राहून गेली. काही अंतर चालून गेल्यावर त्याच्या लक्षात आले की तो आपली पाण्याची बाटली घ्यायलाच विसरला आहे. ती तर गाडीतच राहिली आहे. परत खाली जाऊन, वर येण्यात किमान एक तास तरी वाया जाईल आणि परतीच्या वेळी अंधार होण्याची शक्यता होती. म्हणून त्याने परत जाण्याचा विचार टाळला. “बाकीच्यांकडे पाणी आहेच, थोडेफार त्यांच्याकडून घेऊ,” असा विचार करून तो थोडासा निराश मनाने पुढे चालू लागला. बाकीचे पाच मित्र मात्र नेहमीप्रमाणे गप्पा मारत, खांद्यावरच्या जड बॅगा सांभाळत हातातल्या काठ्यांचा आधार घेत, चढ असलेला रस्ता  चढत होते. त्यांच्या बॅगांमध्ये ट्रेकिंगच्या सर्व आवश्यक वस्तू व्यवस्थित भरलेल्या होत्या. प्रत्येकाकडे ORS मिसळलेल्या सुमारे २ लिटर पाण्याच्या बाटल्या होत्या. त्यांच्यासोबत असलेला स्थानिक वाटाड्या ‘गजानन’ही त्यांच्या गप्पांमध्ये सामील झाला होता. चालता चालता तो प्रत्येक गोष्टीची माहिती देत होता ही वनस्पती कोणती, ही पायवाट कुठे जाते, इथे कोणते पक्षी पाहायला मिळतात वगैरे,वगैरे.
         “तो बघा वरून मोर उडत गेला!” तो म्हणाला, आणि सगळ्यांनी एकदम वर पाहिले काही अंतरावर तो पुन्हा म्हणाला, “हा पहा मुंगूस, याचा अर्थ इथे सापांचे अस्तित्व जास्त असणार.” हे ऐकताच सगळ्यांनी नकळत आजूबाजूला नजर फिरवली आणि त्यांच्या पावलांचा वेग आपोआप थोडा कमी झाला. दुपारी ३ वाजता ट्रेक सुरू झाला, उन्हाचा कहर  जाणवत होता. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत होती आणि दमछाक जाणवत होती. पण सभोवतालचे निसर्गसौंदर्य आणि निसर्ग मायेची लिला पाहण्यात ते सर्व इतके रममाण झाले होते की त्या त्रासाकडे त्यांचे फारसे लक्षच जात नव्हते. दूरवर कुठेतरी हुप्प्या वानर “हुप्प… हुप्प…”आवाज करीत होता. लांबून कुठून तरी  मोराची ‘केकावली’ ऐकू येत होती. कोणता आवाज कुठून येतोय, कोणत्या पक्ष्याचा आहे, हे सगळे काही गजानन वाटाड्या त्यांना सविस्त सांगत होता. जणू निसर्गाने स्वतःचे एक सुरेल असे संगीत पार्श्वभूमीला लावले होते. विविध किड्यांचे आवाज, पक्ष्यांची किलबिल हे व असे सर्व आवाज एकमेकांत मिसळून एक वेगळीच संध्याकालीन निसर्गसंगीत मैफल रंगायला लागली होती.
          पायवाटेच्या कडेला उभ्या असलेल्या झाडांच्या फांद्या आणि त्यावर पसरलेल्या वेली जणू वाटसरूंचे स्वागत करण्यासाठीच वाकल्या आहेत की काय ? असे क्षणभर भासत होते. आता त्यांच्या लक्षात आले की  सुनील मागे पडत आहे. त्यामुळे ते सगळे जण त्याची वाट पाहत थांबले आणि पुन्हा त्याला सोबत घेऊन एकत्र पुढे चालू लागले.पाण्याची बाटली न आणण्याच्या त्या छोट्याशा चुकीचे शल्य सुनीलच्या मनात सतत टोचत राहिले होते. मध्ये त्यांचे फोटोसेशन सुरूच होते. त्यामुळे दोन ते अडीच तासांचा ट्रेक सहजच तीन तासांपेक्षा जास्त लांबणार हे स्पष्ट होते. 
      साधारण तासभर चालल्यानंतर त्यांनी थोडी विश्रांती घ्यायचे ठरले. एका डेरेदार झाडाखाली, सपाट जागा पाहून त्यांनी पथाऱ्या पसरल्या. सोबत आणलेला नाश्ता त्यांनी बाहेर काढला. सफरचंदाच्या फोडी, जॅम सँडविच, चॉकलेट्स असा हलका खाऊ पहिल्या टप्प्यात उघडला. कारण दुपारी एकच्या सुमारास त्यांनी वाटेतल्या धाब्यावर पोटभर जेवण केले होते. पंधरा मिनिटांत खाणे आटोपले आणि सगळ्यांनी पाण्याच्या बाटल्या उघडल्या. सुनीलने त्यांच्या पाण्याचे दोन-तीन घोट घेतले आणि  लगेचच त्याच्या लक्षात आले.“अरे… यात तर ORS आहे!” “ज्याच्या पाण्यात ORS नाही, असे पाणी  कुणाकडे आहे कां?” त्याने विचारले.सगळे एकमेकांकडे पाहू लागले. कारण प्रत्येकाच्या बाटलीतील पाण्यात ORS मिसळले होते. आधीच्या ट्रेकमध्ये सगळ्यांच्या बाटल्या वेगवेगळ्या असल्याने अशी वेळ कधीच आली नव्हती.सुनीलला ORS च्या पाण्याची अ‍ॅलर्जी असल्यामुळे त्याला लगेच अ‍ॅसिडिटी सारखा त्रास जाणवू लागला. “जाऊ दे… पुढे पाहू,” असे म्हणत त्यांनी पुन्हा चालायला सुरुवात केली.
         आता ते दाट वनराईतून घाटमाथ्याकडे चढत होते. “अजून किती वेळ लागेल?” असा प्रश्न ते गजाननला वारंवार विचारत होते. तो म्हणायचा, “अजून पाऊण तास आहे. तुमच्या चालण्याच्या वेगावर आहे सगळे काही जर असेच चाललात तर साडेसहा पर्यंत वरती पोहोचू. थोडा वेग वाढवलात तर १५ मिनिटे आधी पोहोचाल आणि थोडा गडही तुम्हाला फिरता येईल. चला, पावले उचला सर्वांनी !” त्या सहाही जणांनी यापूर्वी सूर्यास्त ट्रेक कधीच केलेला नव्हता, त्यामुळे चालण्याचा वेग आणि उपलब्ध वेळ याचा यांचा त्यांना मेळ घालता येत नव्हता. ‘गजानन’ने सांगितल्यावर आता सगळ्यांनी झपझप पावले टाकायला सुरुवात केली. जसजसे ते वर चढत गेले, तसा उभा चढ वाढू लागला. त्यामुळे वेळेचे गणित आणखी बिघडू लागले आणि त्यांना दमछाकही अधिक जाणवू लागली. सगळे जण आपापल्या बाटल्या उघडून पाणी पित होते. पण सुनील ? तहान लागूनही तो पाणी पिऊ शकत नव्हता. आधी घेतलेल्या ORS पाण्यामुळे झालेली अ‍ॅसिडिटी अजूनही त्याला जाणवत होती. त्यात पुन्हा तेच पाणी प्यायल्यास त्रास अधिक वाढेल या भीतीने तो पाणी टाळत होता.
       वेग वाढवला, उभा चढ सुरू झाला आणि सगळे घामाघूम झाले पण बिचाऱ्या सुनीलच्या शरीरातील पाणी मात्र झपाट्याने कमी होत होते. आता शेवटचा टप्पा उरला होता,खडकात कोरलेल्या ५५ ते ६० अरुंद, निसरड्या पायऱ्यांची ती अवघड चढाई. संध्याकाळचे सव्वा सहा वाजले होते. सूर्यप्रकाश मंदावू लागला होता आणि उष्णतेची तीव्रता थोडी कमी झाली होती. अजून साधारण पंधरा मिनिटांत सूर्यास्त होणार होता.
         पायऱ्या जरी कमी असल्या तरी त्या निसरड्या आणि अरुंद असल्याने काळजीपूर्वक चढाव्या लागत होत्या. त्यामुळे त्यांना त्या चढायला जवळपास १५ मिनिटे लागली. दमछाक करत करत अखेर साडेसहा वाजता ते गडाच्या माथ्यावर पोहोचले आणि पुढच्याच क्षणी त्यांच्या समोर पसरले एक अवर्णनीय, डोळे दिपवणारे सूर्यास्ताचे नयनरम्य दृश्य. सह्याद्रीतील सूर्यास्त हा शांत आणि मोहक अनुभवांपैकी एक मानला जातो. आकाश हळूहळू निळ्यापासून केशरी, गुलाबी आणि जांभळ्या छटांनी रंगू लागले होते. सूर्य जणू आपल्या अस्ताला जाण्याआधी आकाशात रंगीबेरंगांची उधळण करत होता आणि त्या आकाशी रंगाच्या कॅनव्हासवर निसर्गाने एक अप्रतिम चित्र उभे केले होते.ते दृश्य अतिशय मनमोहक होते. सर्वांनी तो क्षण स्वतःच्या मोबाईल मध्ये लगबगीने टिपला.पण….
          या सगळ्या सौंदर्याच्या मध्यभागी,सुनील मात्र तहानेने अक्षरशः अर्धमेला झाला होता.त्याच्यासाठी त्या क्षणी, ना सूर्यास्त महत्त्वाचा होता, ना निसर्ग. महत्त्वाचे  होते फक्त…‘पाणी’. अंधार पडू लागलेला असल्याने,घाईघाईत “शेवटचा पॉईंट” म्हणून गडावरील ‘बारव विहीर’ पाहून लगेच खाली उतरायचे त्यांनी ठरवले.सगळे जण त्या विहिरीत उतरू लागले. तेवढ्यात गजाननचा आवाज घुमला.“त्या विहिरीतले पाणी मात्र कोणी पिऊ नका. लोक म्हणतात,ती जागा झपाटलेली आहे.” त्यांच्या सोबत असलेल्या गजानन वाटाड्याने त्यांना ओरडून सावध केले. त्याच्या आवाजात एक विचित्र गंभीरपणा होता. ती सूचना मनोमन लक्षात ठेवून बाकीचे पाच जण विहिरीत उतरून विहिरी मधील थंडावा अनुभवून वर आले पण सुनील ? त्याला मात्र पाण्याची ओढ अक्षरशः खाली खेचून नेत होती. जीव गेला तरी बेहत्तर मी ते पाणी पिणारच हा चंग त्याने बांधला.
          मधोमध थांबलेल्या पाच जणांनी  जोरजोरात ओरडायला सुरुवात केली “अरे सुनील, वर ये!,सुनील, वर ये! पाणी पिऊ नकोस !” वरून गजानन ही तितक्याच तीव्रतेने ओरडत होता. “त्या विहिरीचं पाणी पिऊ नका!” पण सुनीलला कोणाचे ही काहीच ऐकू येत नव्हते,फक्त आणि फक्त तहान भागवणे हेच त्याचे लक्ष होते. तो सरळ खाली उतरला आणि पुढच्या क्षणी त्या विहिरीचे पाणी हाताच्या ओंजळीत घेऊन तो गटागटा पिऊ लागला. याक्षणी तहानच फक्त त्याच्यावर राज्य करत होती,विचार करण्याची शक्ती त्याने पूर्ण गमावली होती. कातरवेळी, अनोळख्या ठिकाणी, इशारे आणि हाका दुर्लक्षित करून बारव विहिरीत उतरून पाणी पिण्याचे धाडस फक्त पाण्यावाचून तडफडणारा, व्याकूळ आणि कंठाशी जीव आलेला माणूसच करू शकतो.
        तो पर्यंत सूर्यप्रकाशाचा आकाशात रेंगाळणारा शेवटचा धागा विरळ होत गेला आणि सभोवताली हळूहळू अंधार पसरायला सुरुवात झाली.अंधार दाटून आला होता,बाकी पाच जण  विहिरीच्या थंड वातावरणाचा अनुभव घेऊन लगेच वर आले परंतु पाणी प्यायलेल्या  सुनीलचे विहिरीतून वर येताना पाय जड झालेले दिसत होते. तो हळूहळू पायऱ्या चढत होता पण पाहणाऱ्यांना ते काहीतरी वेगळे वाटत होते,त्याचे पाय लटपटत होते. “सुनील… ठीक आहेस ना?” अभिषेकने विचारले.तो काहीच बोलला नाही.तो जेमतेम वर आला,पण लगेचच त्याच्या शरीराला कंप सुटला. त्याचे डोळे गरगर फिरू लागले, नजर स्थिर राहत नव्हती. चेहऱ्यावर एक विचित्र ताण दिसत होता. पुढच्या क्षणी तो अनाकलनीय, वेगळ्या प्रकारचे हातवारे करू लागला जणू कोणीतरी अदृश्य शक्ती त्याच्यावर ताबा मिळवत होती. गजानन वाटाड्याला सुनीलचे हे बदललेले वागणे स्पष्टपणे अस्वस्थ करून टाकत होते. “इकडून लगेच खाली निघा!” त्याने ठाम आवाजात सगळ्यांना सूचना दिल्या.
     क्षणाचाही विलंब न करता सर्वांनी सुनीलला सावरले. दोघांनी दोन बाजूनी त्याचे हात खांद्यावर घेतले आणि त्याला सांभाळत , बॅटरीच्या प्रखर प्रकाशात त्या ६० पायऱ्यांच्या निमुळत्या, निसरड्या कपारीतून ते खाली उतरायला लागले. पण सुनील त्यांना जोरात विरोध करू लागला.त्याच्या अंगात एक वेगळीच ताकद संचारल्या सारखी वाटत होती. “मला इथेच सोडा ही माझी जागा आहे, माझे स्थान इथेच आहे…!”तो ओरडत होता,पण तो आवाज,त्याचा वाटत नव्हता. जणू त्याच्यातून कुणीतरी दुसरेच बोलत होते. त्याचा प्रत्येक शब्द अधिक राकट ,अधिक भेसूर आणि अधिक विचित्र वाटत होता. खाली उतरताना त्याचा विरोध आणखी तीव्र होत गेला.
         त्याच्या पकडीची ताकद वाढत होती आणि त्याला आवरून ठेवणे कठीण होत चालले होते.गजानन पुढे चालत होता, अधूनमधून मागे वळून पाहत म्हणत होता. “सर्वांनी डोके खाली ठेवा! कुणीही मागे वळून पाहू नका!” तो वारंवार सांगत होता.त्या अंधारात,त्या अरुंद पायऱ्यांमध्ये आणि सुनीलच्या त्या विचित्र आवाजांमध्ये सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न घोळत होता. हा आपला सुनीलच आहे कां ?
         निसरड्या साठ पायऱ्या कशाबशा खाली उतरल्यावर गजानन मध्येच थांबला आणि दम घेत म्हणाला,“वर येताना आपल्याला तीन तास लागले पण आता आपल्याला दोन तासांतच खाली उतरावे लागेल. आता साडेसात वाजलेत आणि अशा अवस्थेत याला अंधारात चालवत नेणे आपल्या सहाही जणांना ते शक्य नाही.” क्षणभर सगळे एकमेकांकडे पाहत राहिले. गजाननने लगेच निर्णय घेतला. “एकच उपाय आहे,तुमच्या कडच्या काठ्या घ्या. त्यांची चटईसारखी बांधणी करा. त्यावर याला झोपवा,इथल्या झाडांच्या वेली कटरने कापा ? त्या वेलींनी याला घट्ट बांधा. आपण सहा जण खांद्यावर पालखी उचलतात तसे याला खाली घेऊन जाऊ.” त्याचा आवाज ठाम होता, त्यातली घाई स्पष्ट जाणवत होती.तो पुढे म्हणाला “आणि एक गोष्ट लक्षात ठेवा  कोणीही मागे वळून पाहायचे नाही. काहीही झाले तरी मागे वळून पहायचे नाही. मागून तुमच्या नावाने हाका मारल्या जातील तरीही नाही.” हे ऐकताच सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. वेळ हळू हळू हातातून निसटत होती.
          क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सर्व काठ्या एकत्र करून चटई सारख्या बांधल्या. आजूबाजूच्या झाडांच्या वेली कटरने कापल्या आणि त्या वेलींनी सुनीलला घट्ट बांधून टाकले.तो अजूनही तडफडत होता, कधी गुरगुरत,कधी विचित्र आवाज काढत होता. “मला सोडा, मला सोडा,मला इथेच राहायचेय…” त्याचा आवाज पुन्हा घुमला, आता तो पूर्णपणे परका वाटत होता. सहाही जणांनी मिळून ती ‘पालखी’खांद्यावर उचलली,आणि ते झपझप खाली उतरू लागले.
         खाली उतरताना त्यांचा वेग जास्तच होता कारण थांबण्याची हिंमत कोणाच्याच मनात उरली नव्हती. प्रत्येकाच्या खांद्यावर जड बॅगा होत्या आणि प्रत्येकाच्या हातातील टॉर्चच्या प्रकाशात ते वाट शोधत होते. काळाकुट्ट अंधार सर्वत्र  पसरला होता.त्या अंधारात, फक्त पायवाट तेवढीच दिसत होती, बॅटरीच्या  प्रकाशाची रेषा जितकी पुढे जात होती तेव्हढीच. कधी कधी, मागून कुणीतरी चालत असल्यासारखा आवाज येत होता. पानांची सळसळ,हलकीशी कुजबुज,आणि एखाद्या ओळखीच्या आवाजात घेतलेले नाव.“निशिकांत…” “अमोद…”क्षणभर त्यांचे पाय थबकले पण गजाननचा आवाज लगेच घुमला,“थांबू नका! मागे वळून पाहू नका!”सगळ्यांनी पावले आणखी वेगाने टाकली.हृदयाचे ठोके वाढले होते,श्वास धापा टाकत होता,पण आता एकच ध्येय होते.कसेही करून खाली लवकर पोहोचायचे,पण सुनीलचे ते वळवळणारे धुड प्रत्येक पावलागणिक अधिक जड होत चालले होते. त्याचे वजन वाढत होते,ते वजन त्या अदृश्य शक्तीचे असावे. आता फक्त पंधरा मिनिटांचे अंतर उरले होते,पण खांद्यावरच्या त्या वाढत्या ओझ्यामुळे एकेक पाऊल पुढे टाकणेही अवघड होत होते. दमछाक,भीती आणि घाई सगळे एकत्र मिसळले होते. 
       शेवटी गावाची वेस लागली. काही घरे दिसायला लागली आणि बाहेर काही पुरुष मंडळी गप्पा मारताना दिसली.गजानन त्यांच्या ओळखीचा असल्याने तो धापा टाकत त्यांच्याकडे गेला आणि त्याने सगळी परिस्थिती थोडक्यात सांगितली.हे ऐकून एक गावकरी तत्काळ म्हणाला “याला लगेच ‘धावजी बाबा पाटलांच्या समाधी’ मंदिरात घेऊन जा!” गजाननने लगेच मदतीची विनंती केली.“आम्हाला हे धुड उचलायला जड जातेय,थोडी मदत करा!”क्षणात दहा-बारा हात पुढे आले.सगळ्यांनी मिळून ते धुड उचलले पण गाडी पर्यंत नेताना ते आणखीच जड होत गेले.एकाने घाबरतच म्हटले“हे गाडीच्या करियरवर ठेवले तर गाडीच चेपून जाईल! त्यापेक्षा ट्रक आणा आणि थेट मंदिरात घेऊन चला!”सुदैवाने गावात एक ट्रक मिळाला.त्या ट्रकमध्ये कसाबसा सुनीलला ठेवण्यात आले.त्या ट्रकच्या मागोमाग यांची गाडी होती. रस्त्याची पूर्ण माहिती असलेल्या गजाननने थेट 'धावजी बाबा मंदिराची' वाट धरली, आणि अवघ्या पंधरा मिनिटांत ते समाधी मंदिरात पोहोचले.
         आता एक नवीनच अडचण उभी राहिली,ट्रकमधून ते धुड बाहेर काढणे  आता  कठीण होऊन बसले होते.ते इतके जड झाले होते की क्षणभर सगळेच हतबल झालेत,तेवढ्यात मंदिराचा पुजारी पुढे आला.त्याने शांतपणे ‘धावजी बाबां’ची उदी घेतली आणि ट्रकमध्ये असलेल्या सुनीलच्या शरीरावर टाकली.आणि क्षणातच त्या धुडाचे  वजन इतके कमी झाले की जणू त्या अमानवीय शक्तीची ताकद क्षीण व्हावी.आता ते धुड पुन्हा सुनीलच्या नेहमीच्या वजना इतके वाटत होते.क्षणाचाही विलंब न करता सर्वांनी  ती ‘पालखी उचलली आणि सुनीलला थेट धावजी बाबांच्या समाधी समोर आणले.
         तिरडी सारखी बांधलेली पालखी सरळ उभी करण्यात आली, आणि सुनीलला त्याच बांधलेल्या अवस्थेत समाधी पुढे उभे केले गेले. पुढच्या क्षणी सुनीलच्या शरीरातली ती अमानवी,पिशाच्च शक्ती भडकली,संतापली,क्रुद्ध झाली. तो जोरजोरात उड्या मारू लागला.आकांत करू लागला,किंचाळू लागला,त्याचा आवाज मंदिर भर घुमू लागला.ते दृश्य पाहून सगळेच थरथर कापत उभे होते.पुजाऱ्याने तात्काळ समाधीचे पवित्र जल हाती घेतले आणि ते सुनीलच्या अंगावर  शिंपडले क्षणात सुनीलने जोरात झटका दिला,सर्व घट्ट बांधलेले बंध तोडले,आणि तो जमिनीवर धाडकन कोसळला.पुजाऱ्याने समाधीवरील एक फूल त्याच्या नाकाजवळ नेले त्या फुलाचा वास घेताच,सुनीलने जीवाच्या आकांताने एक भयंकर कर्णकर्कश,गगनभेदी किंकाळी फोडली.
        त्या क्षणीच त्याच्या शरीरातून एक धुराचा लोट बाहेर पडला.त्या धुराने हवेत एक भयावह आकृती तयार केली आणि ती आकृती हवेत  हळूहळू वर सरकत जात, पाहता पाहता आसमंतात नाहीशी झाली.सगळे काही एकदम शांत, शांत झाले,फक्त धापा टाकणारे श्वास आणि भीतीने गोठलेले चेहरे.काही क्षण मंदिरात पूर्ण शांतता पसरली होती.धावजी बाबांच्या समाधी समोर पडलेला सुनील हळूहळू शुद्धीवर येऊ लागला. त्याचा श्वास स्थिर होत होता, चेहऱ्यावरचा ताण कमी होत होता.पुजाऱ्याने त्याच्या कपाळावर हात ठेवत शांतपणे म्हटले.“बाबांच्या कृपेने संकट टळले आता घाबरण्याचे काहीच कारण नाही.”ते शब्द ऐकताच सगळ्यांच्या मनात एक वेगळीच दिलासा देणारी भावना निर्माण झाली.
         अमोद,निशिकांत, अभिषेक, संजोग आणि वंदन सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि नकळत हात जोडले.त्या रात्री ते सर्व मंदिरातच थांबले.धुपाचा सुगंध, मंद दिव्याचा प्रकाश आणि समाधी समोरची शांतता,थंड वातावरण जणू त्या जागेनेच त्यांना आश्रय दिला होता.सुनील गाढ झोपला होता.यावेळी पूर्णपणे शांत.पहाटेची वेळ मंदिरातल्या घंटांचा नाद घुमू लागला.काकड आरतीचा आवाज वातावरणात पसरला.सुनीलने हळूच डोळे उघडले.तो काही क्षण इकडे-तिकडे पाहत राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला “आपण सर्वजण कुठे आहोत ?”वाटाड्या गजानन हसला आणि म्हणाला.“धावजी बाबांनी परत पाठवलेय तुला.”सुनील उठला आणि थेट समाधी समोर गेला.आपोआप त्याचे दोन्ही हात जोडले गेले ,डोळे मिटले  आणि डोके नतमस्तक झाले.आणि काही क्षण तसाच तो शांतपणे उभाराहिला.त्याच्या डोळ्यांत कृतज्ञता होती आणि मनात एक न बोलता येणारी जाणीव.गाव सोडताना सगळे पुन्हा एकदा मंदिराकडे वळून पाहत उभे राहिले.त्या क्षणी कोणालाही काही बोलायची गरज नव्हती.कारण प्रत्येकाला आतून एकच गोष्ट स्पष्ट जाणवत होती.काही शक्ती अशा असतात, ज्या नजरेला दिसत नाहीत.पण योग्य वेळी त्या आपल्याला वाचवतात.
      त्या दिवसानंतर त्या सहा मित्रांचा ट्रेकिंग ग्रूप पुन्हा अनेक ठिकाणी गेला पण एक गोष्ट मात्र त्यांची कायमची बदलली, प्रत्येक ट्रेकच्या आधी ते पाण्यासोबतच एक गोष्ट न विसरता घेऊ लागले,ती म्हणजे देवावरची श्रद्धा.
    काही प्रवास पायांनी नाही, अनुभवांनी पूर्ण होतात,आणि काही धडे आयुष्यभर लक्षात राहतात.पाणी आणि श्रद्धा, दोन्ही कधीही कुठे विसरू नयेत.
                                                               समाप्त🖋️📖📚

🔗'जाको राखे साईयां आणि सतर्क राहण्याची शिकवण'| साई पदयात्रा, पीक विमा आणि जीवनातील ३ सत्य घटना

       वेंधळेपणामुळे घडलेल्या तीन धक्कादायक घटनांमधून सतर्क राहण्याची शिकवण घ्या. साई पदयात्रा, चुकीची बाटली आणि कीटकनाशकामुळे जीवावर आलेले प्रसंग वाचा.👉
  
   टीप - ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेली आहे.  विहिरीबाबत किंवा त्या स्थानांबाबत उल्लेख केलेल्या गोष्टी या स्थानिक वंदतां वर आधारित असून त्यांना वास्तव मानू नये.

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख
प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.
💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.
👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.
🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com

तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.
धन्यवाद! 🙏
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved


(ओमकार शिवलकर)

SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी - लोगो





📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!


टिप्पण्या

  1. असेच लिहित रहा आम्ही वाचत राहू

    उत्तर द्याहटवा
  2. वाचायला सुरुवात केली की थांबवताच येत नाही, खूपच इंटरेस्टिंग आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा