मुख्य सामग्रीवर वगळा

गोव्यात फुललेली प्रेमकथा | भाग २ : पलायन, गोंधळ आणि विरह | हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा

 अस्वीकरण-

   ही कथा लेखकाच्या आठवणी आणि अनुभवांवर प्रेरित असली तरी गोपनीयता जपण्यासाठी सर्व पात्रांची नावे, गावाचे नाव, हॉटेलचे नाव आणि ओळख पटवू शकणारे इतर तपशील बदलण्यात आले आहेत. कथेतील काही प्रसंग साहित्यिक मांडणीसाठी विस्ताराने वर्णन केलेले आहेत. या कथेतील कोणतेही पात्र, संस्था किंवा घटना प्रत्यक्ष व्यक्ती अथवा ठिकाणाशी जुळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा - भाग २ : पलायन, गोंधळ आणि विरह ( एपिसोड- २)|हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा

गोव्यात फुललेली प्रेमकथा | भाग २ : पलायन, गोंधळ आणि विरह | हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
  रात्र होती काळी, पण मैत्रीचा दिवा जळत होता,
एक जीव पळत होता, एक जीव तुटत होता |
काळ पुढे सरकला, आयुष्यही बदलले,
पण गोव्याच्या त्या रात्रीचे गुपित मनातच राहिले |

    🔗'सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा' – भाग १ (Episode - १)|सत्यकथेवर प्रेरित हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा

    सन १९९२ मधील कॅटरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे गोव्यातील ट्रेनिंग, फर्ताडो गावातील वातावरण, झुबिन आणि कॅरोलची पहिली भेट, मैत्री, प्रेम आणि पुढे उभे राहिलेले अनपेक्षित वळण. वाचा एका सत्यकथेवर आधारित रोमांचक प्रेमकथेचा 

पहिला भाग १ वरून पुढे....

सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा - भाग २ : पलायन, गोंधळ आणि विरह ( एपिसोड- २)

      सुशेगाद गोव्यातील निसर्गरम्य वातावरणात फुललेल्या प्रेमकथेने अनपेक्षित वळण घेतले. कॅरोलच्या लग्नाच्या स्वप्नांपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी झुबिन, फरहाद आणि होमी यांनी आखलेली मध्यरात्रीची पलायन योजना, मित्रांचे धाडस, ज्युली मॅडमचा संताप, पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलेले प्रकरण आणि शेवटी झालेला विरह. वाचा एका संस्मरणीय गोवा प्रवासातील प्रेम, मैत्री, नाट्य आणि भावनांनी भरलेला दुसरा भाग..
   गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात फुललेली ही मराठी प्रेमकथा आता अनपेक्षित वळणावर येऊन पोहोचते. झुबिन, कॅरोल, फरहाद आणि होमी यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे प्रेम, मैत्री आणि विश्वासाची कठीण परीक्षा सुरू होते. मध्यरात्री आखलेले पलायन, वाढता गोंधळ, पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलेले प्रकरण आणि शेवटी झालेला विरह या भागाला अधिक थरारक आणि भावनिक बनवतो. पुढे या नात्यांचे भवितव्य काय होणार, याची उत्सुकता प्रत्येक वाचकाच्या मनात निर्माण होईल.
        झुबिनला वाटत होते की हा विषय अजून चर्चेच्या टप्प्यात आहे. पण इथे तर प्रत्यक्ष लग्नाची तयारी सुरू झाली होती.अजून पाचच दिवस शिल्लक होते.त्यात आणखी एक धक्कादायक बातमी मिळाली.
     कॅरोलच्या आईला कुठेतरी संशय आला होता की मुलगा पळून जाऊ शकतो.त्यामुळे रात्री डॉर्मिटरीच्या जिन्याखाली एक वॉचमन ठेवण्यात आला होता.
 कोणी रात्री बाहेर पडते का ? यावर त्याची नजर असायची.आमचा कोच ड्रायव्हर हा तिच्या नातेवाईकांपैकीच होता. त्याचेही विशेष लक्ष झुबिनवर होते.झुबिन कुठे जातो, कोणाला भेटतो, किती वेळ बाहेर असतो ? याची माहिती थेट कॅरोलच्या घरी पोहोचत होती.
 आता परिस्थिती अशी झाली होती की झुबिन स्वतःला प्रेमात पडलेला तरुण कमी आणि कैदेत अडकलेला प्रेम कैदी जास्त समजू लागला होता.
 रात्री आम्ही सगळे मित्र डॉर्मिटरीत बसून त्याच्या सुटकेच्या योजना आखत होतो.
 कोणी म्हणत होते मागच्या खिडकीतून पळून जा.
 कोणी म्हणत होते आजारी असल्याचे नाटक करत राहा.
 कोणी म्हणत होते थेट सत्य सांगून टाक.
 पण कोणताच मार्ग सोपा वाटत नव्हता.
 एका बाजूला कॅरोलचे खरे प्रेम होते.
 दुसऱ्या बाजूला झुबिनची भीती.
 एका बाजूला तयार झालेले लग्न.
दुसऱ्या बाजूला पळून जाण्याचे विचार.
आणि या सगळ्याच्या मध्यभागी आम्ही मित्रमंडळी होतो, ज्यांना ही संपूर्ण परिस्थिती एखाद्या विनोदी चित्रपटासारखी वाटत असली तरी झुबिनच्या चेहऱ्यावरचे वाढते टेन्शन पाहून काळजीही वाटत होती.
 शुक्रवार जवळ येत होता.
 चर्चमध्ये तयारी सुरू होती.
 बेला प्राया  गावात कुजबुज सुरू झाली होती.
 कॅरोलच्या डोळ्यांत भविष्याची स्वप्ने होती.
 आणि झुबिनच्या डोक्यात एकच विचार घोंगावत होता
 "या लग्नातून बाहेर कसे पडायचे?"
      दुपारी आम्ही सर्व मित्र एकत्र बसलो आणि झुबिनच्या सुटकेचा अंतिम आराखडा तयार केला. फक्त झुबिनला पळवून उपयोग नव्हता. त्याच्यासोबत फरहाद आणि होमी या दोघांनाही हलवणे आवश्यक होते. कारण झुबिन गायब झाल्यावर सर्वप्रथम संशय त्यांच्यावरच येणार होता.
      समस्या अशी होती की बेला प्राया गाव हे मुख्य रस्त्यापासून थोडे आत होते. रात्री उशिरा कोणतेही वाहन मिळण्याची शक्यता नव्हती. बस, टॅक्सी किंवा रिक्षाचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे गावातून पायी निसटून जवळच्या हमरस्त्यावर पोहोचणे हा एकमेव पर्याय होता.
परंतु त्यापूर्वी एक मोठा अडथळा पार करायचा होता.जिन्याखाली बसवलेला वॉचमन.
त्याच्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी आंद्रेने स्वतःहून स्वीकारली.
"तो माझ्याच गावाकडचा आहे. मी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवतो," आंद्रे आत्मविश्वासाने म्हणाला.
गाववाला म्हणून आंद्रेने वॉचमनशी आधीच ओळख वाढवायला सुरुवात केली होती. हे पथ्यावर पडले.दोन-तीन दिवस तो त्याच्याशी कोकणीत गप्पा मारत बसायचा. 
त्या रात्री अंतिम योजना निश्चित झाली.
झुबिन, फरहाद आणि होमी यांनी कोणतेही सामान सोबत घ्यायचे नव्हते. फक्त अंगावरचे कपडे आणि खिशातील थोडे पैसे. बाकीच्या सर्व बॅगा आम्ही नंतर मुंबईला घेऊन जाणार होतो.
रात्रीचे अडीच वाजले.
     संपूर्ण गाव गाढ झोपेत बुडाले होते. दूरवरून समुद्राच्या लाटांची मंद गाज ऐकायला येत होती. अधून मधून एखाद्या कुत्र्याचे भुंकणे रात्रीच्या शांततेला भेदत होते.कॅरोलचे घर पूर्ण अंधारात बुडाले होते. तिची आई ज्युली मॅडम आणि घरातील इतर मंडळी बहुधा गाढ झोपली असावीत.
जिन्याखाली बसलेला वॉचमनही डुलक्या घेत होता.
याच क्षणाची वाट पाहून आंद्रे खाली उतरला.
तो वॉचमनजवळ जाऊन कोकणीत म्हणाला,
"मला झोप येत नाही रे. थोड्या गप्पा मारूया का?"
वॉचमनने जांभई देत त्याच्याकडे पाहिले.
"या, बसा. मलाही जागंच राहायचं आहे."
थोड्याच वेळात दोघांच्या गप्पा रंगल्या.
गावातील उत्सव, चर्च, नातेवाईक, मासेमारी, शेती अशा विविध विषयांवर चर्चा सुरू झाली.
काही वेळाने आंद्रे मुद्दाम म्हणाला,
"आपण थोडं पुढे जाऊन बसूया. इथे बोललो तर आवाज जाईल आणि ज्युली मॅडम उठतील."
वॉचमनला ते योग्य वाटले.
दोघे थोडे दूर अंधारात जाऊन बसले.
    "तुम्ही माझे गाववाले..कधी काही आम्हाला अडचण आली तर माझ्या वडिलांना संपर्क कर," असे सांगून त्याने त्याच्या हातावर शंभर रुपयांची नोटही टेकवली होती.
१९९२ सालच्या काळात शंभर रुपये ही काही छोटी रक्कम नव्हती.वरच्या मजल्यावर आम्ही सर्वजण खिडकीतून हा सगळा प्रसंग पाहत होतो. प्रत्येकाचे हृदय जोरात धडधडत होते.
आता पुढचा डाव
झुबिनचा होता.
काही क्षणांनी झुबिन, फरहाद आणि होमी सावकाश जिन्याकडे सरकले.
जणू एखाद्या मांजरीप्रमाणे दबक्या पावलांनी ते खाली उतरू लागले.
जिन्याची एक पायरी किरकिरली आणि आमच्या काळजाचा ठोका चुकला.
पण खाली गप्पांमध्ये रंगलेल्या वॉचमनला त्यांचा सुगावा काही लागला नाही.
तिघेही सावकाश बाहेर पडले.
बंगल्याच्या आवारातून बाहेर येऊन त्यांनी अंधाऱ्या रस्त्याकडे धाव घेतली.
आम्ही खिडकीतून त्यांच्याकडे पाहत होतो.
सुरुवातीला त्यांच्या आकृत्या स्पष्ट दिसत होत्या. मग त्या लहान होत गेल्या. आणखी काही वेळाने त्या अंधारात विरून गेल्या.
क्षणभर आम्ही सर्वजण निःशब्द उभे राहिलो.
ऑपरेशन यशस्वी झाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते.
साधारण अर्ध्या तासानंतर आंद्रे वर आला.
त्याच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य होते.
"काम फत्ते झालं," तो हळू आवाजात म्हणाला.
तरीही तो पूर्णपणे निर्धास्त नव्हता.
"जर काही गडबड झाली तर?" मी विचारले.
आंद्रे शांतपणे म्हणाला,
"त्याचीही तयारी केली आहे."
     मग त्याने आम्हाला सांगितले की त्याच्या वडिलांना आधीच परिस्थितीची कल्पना दिली आहे. आमच्या बाबतीत काही समस्या निर्माण झाली तर ते तात्काळ त्याच्या काका आणि मामांना संपर्क करतील."माझे काका उत्तर गोव्यात आहेत आणि मामा दक्षिण गोव्यात. एका तासात दोन्हीकडची मंडळी इथे पोहोचतील."
तो पुढे म्हणाला,
"पीटर, दिएगो आणि विकी यांच्या घरच्यांनाही माहिती दिली आहे. गरज पडली तर त्यांच्या नातेवाईकांनाही बोलावता येईल."
त्याचे बोलणे ऐकून आम्हाला थोडा दिलासा मिळाला.
तरीही प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता.
सकाळी ज्युली मॅडमना झुबिन गायब झाल्याचे कळल्यावर काय होणार?
कॅरोलची प्रतिक्रिया काय असेल?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
झुबिन, फरहाद आणि होमी सुरक्षितपणे मुंबईकडे निघाले असतील ना?
या विचारांमध्येच आम्ही पहाटे चारच्या सुमारास झोपलो.
पण त्या रात्रीची धडधड, तो तणाव आणि अंधारात विरून जाणाऱ्या झुबिनच्या आकृती आजही माझ्या डोळ्यांसमोर तशाच उभ्या राहतात.
आम्ही पहाटे चारच्या सुमारास झोपलो होतो. त्यामुळे सकाळी लवकर उठण्याचा प्रश्नच नव्हता. डॉर्मिटरीमध्ये सगळीकडे शांतता पसरली होती. बहुतेक जण अजून गाढ झोपेत होते.
सकाळचे साधारण आठ वाजले असतील.
अचानक खाली अंगणातून एक ओळखीचा आवाज घुमला.
"झुssबिन.. ये झुssबिन..!"
ती कॅरोल होती.
आमची झोप मात्र त्या पहिल्याच हाकेने उडाली. झुबिन आता कधीच प्रतिसाद देणार नाही हे आम्हाला माहीत होते. पण कॅरोलला त्याची कल्पना नव्हती.
तिने पुन्हा हाक मारली.
"झुssबिन..! नाश्ता तयार आहे..!"
खालून येणाऱ्या तिच्या गोड आवाजात प्रेम होते, आपुलकी होती आणि एका प्रिय व्यक्तीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुलीची निरागस उत्सुकता होती.
पण वर मात्र आम्ही सगळी  मुले पांघरुणात तोंड खुपसून हसू आवरत होतो.
तिसरी हाक आली.
"झुssबिन..!"
तरीही काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
शेवटी ती जिना चढून वर आली आणि दारावरची कडी जोरात वाजवू लागली.
टकटक.. टकटक..
सगळ्यात आधी जागा झाला तो नेपाळी सोमेश्वर.
केस विस्कटलेला, उघडबंब सोमेश्वरने गळ्याभोवती चादर गुंडाळत, डोळे चोळत दार उघडले 
कॅरोलने त्याच्याकडे साधे पाहिलेही नाही.
दारातूनच तिने पुन्हा आत डोकावत हाक मारली.
"ये झुssबिन..! ये झुssबिन..!"
डॉर्मिटरीत शांतता पसरली.
कुणीच उत्तर दिले नाही.
काही क्षण ती गोंधळून उभी राहिली.
तेवढ्यात तिला समोर दिएगो दिसला.
ती त्याच्याकडे वळली आणि कोकणीत विचारले,
"झुबिन खंय आसा? (झुबिन कुठे आहे?) त्याचो नाश्तो थंड जावपाक लागलो."
 (त्याचा नाश्ता थंड होऊ लागला आहे)
दिएगोने शक्य तितका निरागस चेहरा करत उत्तर दिले,
"माका खबर ना. (मला माहीत नाही.)"
ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली.
नंतर म्हणाली,
"ठीक आसा."
आणि हळूहळू खाली उतरून गेली.
खाली अंगणात वॉचमन चहा पित बसला होता.
कॅरोल थेट त्याच्याकडे गेली.
"काल रात्री झुबिन बाहेर गेला होता का?"
वॉचमनने ताबडतोब उत्तर दिले,
"नाही मॅडम. मी रात्रभर इथेच होतो. काल रात्रीपासून कोणीही बाहेर गेलेले नाही."
हे उत्तर ऐकताच तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.
ती थेट घरात गेली.
काही मिनिटांनी तिची आई ज्युली मॅडम बाहेर आल्या.
कॅरोलने त्यांना सगळी हकीकत सांगितली.
आता परिस्थिती त्यांनाही संशयास्पद वाटू लागली.
दोघी पुन्हा जिना चढून वर आल्या.
यावेळी ज्युली मॅडमचा चेहरा गंभीर होता.
त्या डॉर्मिटरीत शिरल्या.
आम्ही सगळे जण जणू नुकतेच झोपेतून उठल्या सारखे नाटक करत होतो.
"झुबिन कुठे आहे?" तिने दमाच्या स्वरात थेट प्रश्न विचारला.
"आम्हाला माहीत नाही."
"आम्ही झोपलो होतो."
"सकाळी उठलो तेव्हा पासून  दिसत नाही."
अशी वेगवेगळी उत्तरे सर्वांनी दिली.
दोघींनी  एकेकाच्या चेहऱ्याकडे संशयाने पाहिले.
मग अचानक त्यांची नजर खोलीतील रिकाम्या बेडवर गेली.
त्यांनी मुलांची संख्या मोजायला सुरुवात केली.
एक..दोन..तीन..
असे करत त्या पुढे गेल्या.
अचानक त्या थांबल्या.
त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
पुन्हा एकदा त्यांनी मुलांना मोजले.
यावेळी त्यांना खात्री पटली.
खोलीत अठरा नव्हे तर फक्त पंधरा मुलगे होते.
क्षणभर संपूर्ण डॉर्मिटरीत शांतता पसरली.
मग ज्युली मॅडमचा आवाज घुमला.
"झुबिन कुठे आहे?"
कोणीच उत्तर दिले नाही.
त्या आणखी कठोर स्वरात म्हणाल्या,
"आणि बाकीचे दोघे कुठे आहेत?"
आता मात्र प्रत्येकाच्या छातीत धडधड वाढली होती.
कारण सत्य त्यांच्या समोर उभे होते.
झुबिन, फरहाद आणि होमी रात्रीच  ‘बेला प्राया’ गावातून गायब झाले होते..
मी फक्त खांदे उडवत "मला काहीच माहीत नाही" असा भाव चेहऱ्यावर आणला.
विकी आणि दिएगोने ही लगेच कोंकणीत उत्तर दिले,
"आमका कंशेच खबर ना." (आम्हाला काहीच माहीत नाही.)
हे ऐकताच ज्युली मॅडमचा पारा चढला.
"असं कसं शक्य आहे? तुम्हाला काहीच माहीत नाही?" त्या संतापून म्हणाल्या. "तुम्ही सगळे त्याचेच मित्र ना?"
त्यांच्या आवाजात संशय स्पष्ट जाणवत होता.
तेवढ्यात पीटरने धाडस करून शांतपणे  म्हटले,
"आंटी, तुम्ही झुबिनला घरचाच माणूस समजत होतात ना? मग त्याला घरीच ठेवायला हवं होतं."
क्षणात ज्युली मॅडम त्याच्यावर खेकसल्या.
"तुला काही कळतंय का ? घरात तरुण मुलगी असताना कुणी परक्या मुलाला घरात झोपवून ठेवतं का ?"
पीटरने पुढे काही बोलणेच टाळले.
त्या तणतणत खाली निघून गेल्या.
त्यांच्या जाण्याबरोबर डॉर्मिटरीत दाबलेले हसू बाहेर पडले.
तेवढ्यात उत्तर प्रदेशचा नंदन सिंह म्हणाला,
"जब दामाद जैसे बर्ताव करते हो, तो घर में रखने में क्या दिक्कत थी?"
त्याचे बोलणे ऐकून काही मुलांना हसू आवरले नाही.
नंबी राजन तर पोट धरून हसत म्हणाला,
"आंटीचंही बरोबर आहे. आपल्या लफडेबाज झुबिनवर कोण विश्वास ठेवणार?"
त्याच्या त्या वाक्यावर पुन्हा एकदा हास्याचा स्फोट झाला.
मात्र ते हसू फार काळ टिकले नाही.
अचानक जिन्यावरून धाडधाड पावले वर येताना ऐकू आली.
क्षणात ज्युली मॅडम पुन्हा दारात उभ्या राहिल्या.
यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा राग आणखी वाढलेला होता.
काही समजायच्या आत त्यांनी बाहेरून दरवाजा ओढून घेतला.
धाडकन्!
आणि पुढच्याच क्षणी दरवाजावर मोठ्ठे टाळे बसले.
ठक्!
आम्ही सगळे एकमेकांकडे पाहत राहिलो.
दाराबाहेरून त्यांचा संतप्त आवाज आला,
"झुबिनचे तुम्ही सगळे साथीदार आहात! आता तुम्हालाच इथे कोंडून ठेवते!"
हे ऐकताच डॉर्मिटरीत एकच गोंधळ उडाला.
"आमचा काय दोष?"
"आम्ही काय केलं?"
"आम्हाला कशाला शिक्षा?"
अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या.
मी उघड्या खिडकीजवळ जाऊन मोठ्याने म्हणालो,
"आंटी, आम्हाला शिक्षा का करता? झुबिनवर विश्वास ठेवताना तुम्ही आम्हाला विचारलं होतं का ? विचारलं असतं तर आम्ही त्याचा स्वभाव आधीच सांगितला असता!"
क्षणभर बाहेर शांतता पसरली.
मग तिचा जोरात आवाज आला,
"झुबिनला पळून जायला मदत कोणी केली? तुम्हीच ना?"
मी पुढे काही बोलणार इतक्यात त्यांनी माझा युक्तिवाद ऐकूनही घेतला नाही.
त्यांच्या दृष्टीने निकाल लागला होता.
आम्ही सर्व आरोपी होतो.
ज्युली मॅडम आणि कॅरोल दोघीही संतापाने तणतणत खाली उतरल्या.
जाताना त्यांच्या तोंडून झुबिनचा चांगलाच उद्धार सुरू होता.
"फसवणूक केली!"
"विश्वासघात केला!"
"कसला मुलगा होता तो !"
त्यांचे आवाज खाली अंगणात बराच वेळ घुमत राहिले.
आणि आम्ही अठरा मुलांच्या जागी उरलेले पंधरा जण, एका डॉर्मिटरीत बाहेरून टाळे लावून बंदिस्त झालेलो, एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत बसलो होतो.
क्षणभर सगळीकडे शांतता पसरली.
मग नंदन सिंहने गंभीर चेहरा करून विचारले,
"दोस्तों.. अब नाश्ता कौन देगा?"
आणि त्या प्रश्नावर संपूर्ण डॉर्मिटरीत पुन्हा एकदा हास्याचा स्फोट झाला.
     हा सर्व गोंधळ रात्रपाळीवरील वॉचमन शांतपणे पाहत होता. त्याला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले होते. सकाळची ड्युटी संपल्यानंतर तो घरी जाण्यासाठी निघाला. त्यावेळी आंद्रे खिडकीत उभा होता.निघताना वॉचमनने त्याच्याकडे पाहून हळूच अंगठा वर केला आणि पाच बोटे हलवत इशारा केला.
"तू सांगितलेली जबाबदारी मी पाच मिनिटांत पूर्ण करतो," असा तो निःशब्द संदेश होता.
आंद्रेनेही मान हलवून त्याला प्रतिसाद दिला.
बोर्डिंग हाऊसपासून थोडे पुढे गेल्यावर वॉचमनने एका पब्लिक कॉल बूथमधून आंद्रेच्या वडिलांना फोन लावला.
"परिस्थिती गंभीर आहे. ज्युली मॅडम मुलांना सोडत नाहीत. लवकर पावले उचला," असा निरोप त्याने दिला.
फोन मिळताच आंद्रेच्या वडिलांनी क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी आपल्या भावाला आणि मेहुण्याला सर्व माहिती दिली.
"तात्काळ माणसे घेऊन ‘बेला प्राया’ ला जा आणि मुलांना बाहेर काढा.” असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला.
त्यानंतर त्यांनी दिएगो, पीटर आणि विकी यांच्या वडिलांनाही संपर्क साधला.
गोव्यातील कॅथॉलिक समाज तुलनेने एकमेकांच्या संपर्कात असतो. 
आणखी काही वेळात ज्युली मॅडमच्या बंगल्यासमोर आंद्रे, पीटर, दिएगो आणि विकी यांच्या नातेवाईकांची चांगलीच गर्दी जमली.
ज्युली मॅडमना सुरुवातीला वाटले होते की ही काही कॉलेजची मुले आहेत. थोडे रागावले की गप्प बसतील.
पण आता परिस्थिती वेगळी होती.
त्यांच्या समोर विविध गावातील अनुभवी, जबाबदार आणि प्रभावशाली मंडळी उभी होती.
त्यांनी शांतपणे विचारणा सुरू केली.
"मुलांना का बंद करून ठेवले आहे?"
"त्यांनी काय गुन्हा केला आहे?"
"त्यांना बाहेर का सोडत नाही?"
सुरुवातीला ज्युली मॅडम काहीच ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या.
त्यांच्यात आणि आलेल्या नातेवाईकांमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली.
काही वेळात ज्युली मॅडमच्या  बाजूची गावातील काही मंडळी ही तेथे जमा झाली.
क्षणभर परिस्थिती तणावपूर्ण बनली.
दोन्ही बाजूचे लोक समोरासमोर उभे ठाकले.
दंगलसदृश वातावरण निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली.
तेवढ्यात कुणीतरी पोलिसांना फोन केला.
काही वेळातच पोलिसांची जीप घटनास्थळी पोहोचली.
पोलिसांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले.
आंद्रे आणि इतर मुलांच्या नातेवाईकांनी स्पष्ट सांगितले की विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध खोलीत बंद करून ठेवण्यात आले आहे.
हे ऐकताच पोलिसांनी ज्युली मॅडमना कठोर शब्दांत सांगितले,
"ताबडतोब मुलांना सोडा."
काही मिनिटांतच दरवाजावरील टाळे काढण्यात आले.
आम्ही सर्वजण बाहेर आलो.
मात्र प्रकरण तेथेच थांबले नाही.
विद्यार्थ्यांना बेकायदेशीररीत्या डांबून ठेवल्याच्या तक्रारीमुळे पोलिसांनी ज्युली मॅडमना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले.
त्यामुळे एक वेगळीच वरात पोलीस स्टेशनकडे निघाली.
एका बाजूला आम्ही विद्यार्थी.
दुसऱ्या बाजूला आमचे नातेवाईक.
आणि तिसऱ्या बाजूला ज्युली मॅडम व त्यांचे समर्थक.
पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण घटनाक्रम उलगडला.
सर्वांचे जबाब नोंदवले गेले.
कायदेशीरदृष्ट्या विद्यार्थ्यांना बंदिस्त करून ठेवणे चुकीचे ठरत होते.
त्यामुळे ज्युली मॅडमविरुद्ध कारवाई होऊ शकत होती.
पण आम्हीच पोलिसांना विनंती केली.
"सोडून द्या त्यांना, त्या वेगळ्या मानसिक अवस्थेतून जात आहेत. मुलीच्या  प्रेमापोटी त्यांनी हे केले."
आमच्या विनंतीमुळे वातावरण काहीसे शांत झाले.
मात्र ज्युली मॅडम अजूनही संतापलेल्या होत्या.
"झुबिनवर केस टाका," त्या वारंवार म्हणत होत्या.
पोलिस अधिकाऱ्यांनी शांतपणे विचारले,
"कशाच्या आधारावर?"
"त्याने आमची फसवणूक केली."
"कशा प्रकारची फसवणूक?"
"त्याने मैत्री केली. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला."
अधिकारी म्हणाले,
"मैत्री करणे हा गुन्हा नाही. तुम्ही दोघांच्या मैत्रीला स्वतः मान्यता दिली होती. लग्न झाले नाही म्हणून गुन्हा ठरत नाही."
थोडा वेळ शांतता पसरली.
मग अधिकाऱ्यांनी पुढचा प्रश्न विचारला,
"त्याने काही अनैतिक कृत्य केले आहे का ? काही पुरावा आहे का?"
ज्युली मॅडम काही क्षण गप्प राहिल्या.
शेवटी त्यांनी नकारार्थी मान हलवली.
त्यावर पोलिसांनी स्पष्ट सांगितले,
"मग कायदेशीर कारवाईचा प्रश्नच येत नाही."
अखेरीस सर्वांना समजावून सांगून पोलिसांनी प्रकरण मिटवले.
रिसॉर्ट ॲडमिनिस्ट्रेशन ला सुद्धा  या घटनेची माहिती मिळाली होती.
त्यांनी कोणताही पुढील वाद होऊ नये म्हणून आमची राहण्याची व्यवस्था दुसऱ्या डॉर्मिटरीमध्ये केली.
      या सगळ्या गोंधळात कॅरोलची अवस्था मात्र सर्वात बिकट झाली होती. आमच्या पैकी अनेकजण झुबिनच्या सुटकेचा आनंद साजरा करत होते, पण कॅरोलच्या मनात काय वादळ उठले होते याचा विचार फार कमी जणांनी केला.
तिच्या दृष्टीने झुबिन हा केवळ काही महिन्यांचा मित्र नव्हता. गेल्या काही महिन्यांत तिने त्याच्यासोबत अनेक स्वप्ने रंगवली होती. समुद्र किनाऱ्यावरच्या संध्याकाळी, चर्चच्या आवारातील गप्पा, गावातील फेरफटके आणि भविष्या विषयी झालेल्या चर्चा तिने मनापासून खऱ्या मानल्या होत्या.
     झुबिन कधीतरी निघून जाईल, असे तिच्या मनाला कधी वाटलेच नव्हते. उलट तो तिच्यासोबत आयुष्य घालवेल अशी खात्री तिच्या मनात निर्माण झाली होती. तिच्या आईनेही त्या नात्याला मान्यता दिल्यामुळे तिची खात्री आणखी दृढ झाली होती.
सकाळी झुबिन गायब झाल्याचे लक्षात आले, तेव्हा सुरुवातीला तिला विश्वासच बसला नाही. तो कुठेतरी मित्रांसोबत गेला असेल असे तिला वाटले. पण जसजसा वेळ पुढे गेला, तसतसे सत्य तिच्यासमोर उभे राहू लागले.
झुबिन तिला न सांगता निघून गेला होता.
तो तिच्यापासून दूर जाण्यासाठीच निघून गेला होता.
ही जाणीव तिच्यासाठी अत्यंत वेदनादायी होती.
     म्हणूनच त्या दिवशी तिच्या डोळ्यांत रागापेक्षा जास्त दुःख होते. तिच्या मनात सूड नव्हता, पण विश्वासघाताची भावना होती. ज्या व्यक्तीवर तिने मनापासून प्रेम केले, त्याने एक शब्दही न बोलता अचानक आयुष्यातून निघून जाणे ती स्वीकारू शकत नव्हती.
     आज अनेक वर्षांनी त्या घटनेकडे पाहताना मला वाटते की झुबिन त्याच्या जागी बरोबर असेल, कॅरोल तिच्या जागी बरोबर असेल आणि ज्युली मॅडमही त्यांच्या मुलीच्या भविष्याच्या काळजीपोटी वागत असतील. चुकीचे असेल तर त्या वेळची परिस्थिती आणि गैरसमज. त्या काळात आम्ही सर्वजण तरुण होतो, भावनांच्या भरात निर्णय घेत होतो परंतु आयुष्य आम्हाला अजून खूप काही शिकवणार आहे हे तेव्हा आम्हाला माहीत नव्हते.
त्यानंतर उरलेले दिवस मात्र शांततेत गेले.
आम्ही आमचे पाच महिन्यांचे इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग पूर्ण केले.
निघताना झुबिन, फरहाद आणि होमी यांचे सामानही आम्ही मुंबईला घेऊन आलो.
रिसॉर्ट मधील मॅनेजरशी गोड बोलून आम्ही त्या तिघांची ट्रेनिंग सर्टिफिकेट्सही मिळवली.
खरे पाहता या संपूर्ण प्रकरणाचे श्रेय आंद्रे आणि त्याच्या मित्रांना द्यायला हवे.
त्यांची तत्परता, धाडस आणि योग्य वेळी केलेली मदत नसती तर पुढे काय घडले असते हे देवच जाणे.
काही दिवसांनी आम्ही मुंबईला परतलो.
आम्हाला रिसीव्ह करण्यासाठी स्टेशनवर "होमी अँड ब्रदर्स" आधीच उपस्थित होते.
होमी, फरहाद आणि झुबिन.
 झुबिन एका मोटार सायकलवर बसून आमची वाट पाहत होता.
आम्हाला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचे ते गोड, मिश्कील हास्य उमटले.
तो काही बोलला नाही.
आम्हीही काही बोललो नाही.
पण त्याच्या त्या एका स्मितहास्यात अनेक शब्द दडलेले होते.
"मित्रांनो..मला वाचवल्याबद्दल धन्यवाद."
आणि आम्हालाही ते शब्द न बोलताच समजले.

     ‘बेला प्राया’ गावातील ती घटना आजही स्मरणात ताजी आहे. काळ पुढे सरकला, प्रत्येकजण आपल्या आयुष्यात व्यस्त झाला, पण गोव्याच्या त्या पाच महिन्यांनी आम्हाला मैत्री, प्रेम, विश्वास आणि वास्तव यांचे अनेक धडे दिले. झुबिन त्याच्या मार्गाने निघून गेला, कॅरोलच्या वाट्याला विरह आला आणि आम्ही मित्र मात्र त्या संपूर्ण प्रसंगाचे साक्षीदार ठरलो.
       आज मागे वळून पाहताना असे वाटते की त्या कथेत कुणी खलनायक नव्हता. प्रत्येक जण आपल्या भावनांनुसार वागत होता. चुकीची होती ती फक्त परिस्थिती आणि अपूर्ण राहिलेली स्वप्ने.
       पण त्या स्वप्नांचे पुढे काय झाले? कॅरोलने तिच्या आयुष्याचा नवा मार्ग निवडला की नियतीने तिला पुन्हा एकदा झुबिनसमोर उभे केले? झुबिनच्या मनातले प्रेम खरोखरच संपले होते की ते काळाच्या पडद्याआड दडून बसले होते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पुढे वाचा..एक प्रेमकथा आणि विरहकथा..👉

🔗 सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा | आठवणींच्या सावलीत | भाग ३ | भावनिक मराठी प्रेमकथा

                                                                क्रमश..(Episode - ३)

📖 ही "सुशेगाद गोव्यात फुललेली प्रेमकथा" मालिकेचा दुसरा भाग आहे. संपूर्ण कथा समजून घेण्यासाठी मागील भागही अवश्य वाचा.

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.


तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो





📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...