रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | भीतीवर लोकशाहीचा विजय (भाग 7)
🔗रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | अंतिम तास (Episode 6) 👉
रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | भीतीवर लोकशाहीचा विजय (भाग 7)
सहा महिन्यांनंतर..
संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली रुथरीमध्ये अनेक दशकांनंतर प्रथमच मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका पार पडल्या.
जनरल महारथ यांनी प्रेसिडेंट पदाची निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला.
मुक्त वातावरणात निवडणूक झाल्याने रुथरीच्या जनतेने मतदानात उत्साहाने भाग घेतला.त्याचा परिणाम असा झाला की रिपब्लिक ऑफ रुथरी आयलंड मध्ये ऑल रुथरी नॅशनलिस्ट पार्टीचे उमेदवार बहुमताने निवडून आले. अध्यक्षीय पद्धतीची लोकशाही असल्याने ऑल रुथरी नॅशनलिस्ट पार्टीचा प्रेसिडेंट प्रथमच सत्तेवर विराजमान झाला.तब्बल 39 वर्षांनंतर पक्षाचे उमेदवार बहुमताने निवडून आलेत.
लष्कर प्रमुख म्हणून महारथ यांनी केवळ शांततापूर्ण सत्तांतराची जबाबदारी पार पाडली आणि नंतर सत्ता लोकनियुक्त सरकारकडे विधिवत सुपूर्द केली.
जनरल माँटेरोवर न्यायालयात खटला चालला.
त्याला सूडाने नव्हे..
तर कायद्याने शिक्षा झाली.
काही महिन्यांनंतर एका पत्रकार परिषदेत लुईस आणि व्हिक्टर यांनी जगासमोर एकच वाक्य उच्चारले.
"त्या रात्री आमच्या वडिलांनी सत्ता गमावली पण रुथरीने खऱ्या अर्थाने लोकशाही जिंकली."
इतिहासात त्या घटनेची नोंद केवळ एका विमान अपहरणाची म्हणून झाली नाही तर रक्ताचा एक थेंबही न सांडता एका राष्ट्राने हुकूमशाहीवर मिळवलेल्या सहज विजयाची झाली.
रिपब्लिक ऑफ रुथरीमध्ये नव्या सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झाले होते.
देशात पहिल्यांदाच मुक्त प्रसार माध्यमे कार्यरत होती.
राजकीय कैद्यांची सुटका झाली होती.
न्यायालये पुन्हा स्वतंत्रपणे काम करू लागली होती.
लष्कराला पुन्हा संविधानाच्या चौकटीत आणण्यात आले होते.
परदेशी खनिज करारांचे पुनरावलोकन सुरू झाले होते.
रुथरी हळूहळू भीतीतून विश्वासाकडे प्रवास करत होता.
त्या दिवशी "स्वातंत्र्य दिन" नव्हता...
तर तो होता "लोकशाही पुनर्स्थापना दिन."
लोकांनी हातात राष्ट्रीय ध्वज घेतला होता.
त्या व्यासपीठावर नाव नियुक्त राष्ट्रपतींचे भाषण झाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी संविधानाची प्रत उंचावत घोषणा केली
"आजपासून रुथरीमध्ये कोणताही माणूस कायद्यापेक्षा मोठा नाही."
हजारो लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
समारंभाच्या शेवटी जनरल महारथ यांना बोलावण्यात आले.
ते अजूनही साध्याच लष्करी गणवेशात आणि साध्या आवेशात होते.
छातीवर कोणतेही नवीन पदक नव्हते.
त्यांनी व्यासपीठावर येऊन फक्त काहीच वाक्ये बोलली.
"हा विजय माझा नाही."
"ज्यांनी भीतीपुढे गुडघे टेकण्यास नकार दिला आणि शांतपणे आंदोलन करत सत्तांतर केले, कुठेही हिंसेचे गालबोट लागू दिले नाही. रुथरी मधील त्या संयमी जनतेचा हा विजय आहे."
"हा विजय त्या सैनिकांचा आणि पोलिसांचा सुद्धा आहे, ज्यांनी संयमाने परीस्थिती हाताळत, जुलमी हुकूमशाहीला शेवटच्या क्षणी डोके वर काढायला दिले नाही."
"आणि हा विजय त्या चार जणांचा जास्त आहे.."
" ज्यांनी जीवावर उदार होऊन,एकही गोळी न झाडता संपूर्ण इतिहासच बदलला."
संपूर्ण मैदान टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
त्या दिवशी पहिल्यांदाच त्या चार जणांची ओळख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.
दोन एअर होस्टेस.
दोन फ्लाइट पर्सर.
त्यांच्या नावांवर कोणताही चित्रपट बनला नाही.
त्यांनी स्वतःचे आत्मचरित्र लिहिले नाही.
त्यांनी राजकारणात प्रवेश केला नाही.
ते पुन्हा आपल्या सामान्य आयुष्यात परतले.
कारण..
त्यांना प्रसिद्धी नको होती.
त्यांना त्यांच्या देशातील लष्करी हुकूमशाही मुळे होणारी,जनतेची घुसमट संपवायची होती.
लुईस आणि व्हिक्टर यांनीही सार्वजनिक जीवन स्वीकारले.
त्यांनी आपल्या वडिलांच्या राजवटीतील चुका उघडपणे मान्य केल्या.
एका मुलाखतीत पत्रकाराने त्यांना विचारले.
"त्या रात्री तुम्हाला सर्वात मोठा धक्का कशाचा बसला?"
लुईस हसला.
"आम्हाला वाटत होतं.."
" की आम्हाला बंदुकीने ओलीस ठेवलं आहे."
व्हिक्टर पुढे म्हणाला
"पण नंतर समजलं.."
"आम्हाला फक्त आणि फक्त भीतीने ओलीस ठेवलं होतं."
त्या घटने नंतर अनेक देशांच्या लष्करी अकादमींमध्ये आणि नेतृत्व प्रशिक्षण संस्थांमध्ये त्या मोहिमेचा अभ्यास सुरू झाला.
त्याला नाव देण्यात आले,
"ऑपरेशन सायलेंट चेकमेट."
एकही गोळी न झाडता.
कुणाला कोणत्याही प्रकारची क्षती न पोहचवता
एकही बॉम्ब न फुटता..
आणि हजारो लोकांचे प्राण वाचवत..
एका हुकूमशहाला सत्ता सोडण्यास भाग पाडणाऱ्या त्या कारवाईला आधुनिक इतिहासातील सर्वात विलक्षण मानसशास्त्रीय मोहिमांपैकी एक मानले गेले.
त्या नंतर राजधानी पोर्ट एमेरादोच्या एअरपोर्ट वरून अनेक विमानांनी सिडनीच्या दिशेने उड्डाणे केलीत,
तेच आकाश..
तोच प्रशांत महासागर..
पण या वेळी कोणत्याही प्रवाशाच्या मनात भीती नव्हती.
होती फक्त स्वातंत्र्याची जाणीव.
विमान ढगांमध्ये हरवून गेले.
खाली अथांग महासागर शांत होता.
आणि इतिहास..
पुन्हा एकदा सिद्ध करत होता,
साम्राज्ये तलवारीने उभी राहू शकतात..
खरी लोकशाही ही नेहमी लोकांच्या संयमावर आणि शांततेत होणाऱ्या आंदोलनावर उभी असते. हे जगाला रुथरीच्या जनतेने दाखवून दिले..
समाप्त 🖋️📚📖
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
👨🏻💼 Connect With Us
📧 Gmail: sjomkar21@gmail.com
🔗 वरील कोणत्याही सोशल मिडिया नावावर क्लिक करून आमच्या अधिकृत सोशल मीडिया प्रोफाइलला भेट द्या.
ℹ️ सूचना: काही लिंक उघडताना गुगल कडून "Redirect Notice" दिसू शकते. अशा वेळी कृपया "Redirect" वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही आमच्या अधिकृत प्रोफाइलवर पोहोचाल.
© All Rights Reserved


शांततेची ताकद अनेकदा शस्त्रांपेक्षा मोठी असते. रुथरीच्या जनतेने सिद्ध करून दाखवले.
उत्तर द्याहटवाखरे आहे..
हटवालोकशाहीचा खरा विजय हिंसेत नसतो, तर जनतेच्या संयमी आणि अहिंसक लढ्यात असतो. रुथरीची कहाणी प्रेरणादायी आहे.
उत्तर द्याहटवाशांतपणे केलेले आंदोलन हेच खरे लोकशाचे द्योतक आहे..
उत्तर द्याहटवा