ही कथा अशाच एका तरुणीच्या आयुष्याची आहे.जिच्या एका निर्णयामागे तिची चूक कमी आणि परिस्थिती अधिक जबाबदार होती. ही केवळ एका व्यक्तीची कथा नाही तर समाजाला स्वतःकडे पाहण्यास भाग पाडणारा एक आरसा आहे.
ही कथा नव्वदच्या दशकातील आहे.
उत्तर प्रदेशच्या एका छोट्याशा जिल्ह्यातील गावात ‘उमा’ नावाची एक तरुणी आई वडिलांसोबत राहत होती. एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेली उमा जसजशी तारुण्यात पदार्पण करू लागली, तसतसे तिचे सौंदर्य अधिकच खुलत गेले. तिचे रूप इतके मोहक होते की, ते तिच्यासाठी वरदान ठरेल की शाप, याचा निर्णय काळच पुढे घेणार आहे.
सध्या मात्र तिचे सौंदर्य तिच्यासाठी शापच ठरत होते. गावातील तरुणांपासून तालुक्यातील प्रभावशाली लोकांपर्यंत अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असायच्या. तिच्या रूपाचे कौतुक करण्याऐवजी त्या नजरा तिच्यासाठी भीती आणि असुरक्षिततेचे कारण बनत होत्या. परिणामी, आपल्या सौंदर्याचाच तिला न्यूनगंड वाटू लागला.
घराबाहेर सहजपणे फिरणे तिच्यासाठी जवळजवळ अशक्य झाले होते. घरात कोणी पाहुणे आले किंवा काही प्रसंग असला तरी ती बाहेर येण्याचे टाळत असे. तारुण्यात पाऊल टाकताच तिचे शिक्षणही अर्धवट बंद झाले. तिची स्वप्ने घराच्या चार भिंतींत कैद झाली.
उमाचे वडील मोहनलाल हे मेहनती शेतकरी होते. त्याचबरोबर ते एका मोठ्या राजकीय पक्षाचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा होते. शेती सांभाळणे आणि पक्षासाठी झटणे, एवढेच त्यांचे आयुष्य होते. वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाकडून त्यांना कोणतेही मोठे पद किंवा लाभ मिळाला नव्हता. गावात मात्र त्यांच्या नावाला मान होता. वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चांगली ओळख आणि उठबस होती पण ती गावच्या राजकारणापुरतीच मर्यादित होती. मोठ्या जबाबदाऱ्या नेहमी दुसऱ्यांच्याच वाट्याला जात आणि मोहनलाल फक्त निष्ठेची किंमत मोजत राहिले.
उमाच्या आयुष्याला मात्र या त्यांच्या राजकीय ओळखीमुळे लवकरच अनपेक्षित वळण मिळणार होते.
एकदा मोहनलालच्या गावातील विशाल मोकळ्या मैदानात त्यांच्या पक्षाचा तीन दिवसांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. संपूर्ण जिल्ह्यासाठी तो एक मोठा राजकीय सोहळा मानला जात होता. मेळाव्याची घोषणा होताच गावाचे रूपच पालटू लागले.
आठवडाभर आधीपासूनच परिसरात पक्षाचे झेंडे, रंगीबेरंगी पताका, मोठमोठे बॅनर आणि स्वागत कमानी उभारल्या गेल्या होत्या. गावातील प्रत्येक चौक, मुख्य रस्ते, वेशी आणि बाजारपेठ पक्षाच्या रंगांनी नटून गेली होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सायकली, मोटारसायकली, जीप आणि लाऊडस्पीकर लावलेल्या वाहनांतून प्रचार फेऱ्या सुरू होत्या. घोषणांनी आणि त्यांच्या पक्षांवर लिहिलेल्या गीतांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
मैदानात लोखंडी सांगाड्यावर उभे राहणारे भव्य स्टेज दिवस-रात्र काम करून तयार केले जात होते. हजारो लोक बसू शकतील अशी आसनव्यवस्था, मोठमोठे ध्वनिक्षेपक, प्रकाशझोत, जनरेटर, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, वैद्यकीय मदत केंद्र आणि सुरक्षा व्यवस्थेची लगबग सुरू होती. प्रत्येक कामाला वेग आला होता.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि शेजारच्या जिल्ह्यांतून हजारो कार्यकर्ते येणार असल्याने त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था स्थानिक शाळा, धर्मशाळा, मंदिरांचे सभामंडप, ग्रामपंचायतीची इमारत आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घरांमध्ये करण्यात आली होती. अनेक कुटुंबांनी आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याची तयारी सुरू केली होती. गावात पाहुणचाराची एक वेगळीच लगबग दिसत होती.
मेळाव्याच्या मैदानाभोवती जत्रेचे स्वरूप निर्माण झाले होते. चहा, भजी, समोसे, जिलेबी, कचोरी, कुल्फी, ऊसाचा रस, कपडे, भांडी, पुस्तके आणि विविध वस्तूंच्या टपऱ्या एकामागोमाग एक उभ्या राहत होत्या. त्या गावाभोवतालच्या सर्व पंचक्रोशीतील लहान मुले आणि त्यांचे पालक त्यांच्या करमणुकीसाठी त्या गावात येणार याचा अंदाज घेऊन खेळण्याचे स्टॉल,आकाश पाळणे, छोट्या झुल्यांची तयारी सुरू झाली होती. संध्याकाळ होताच रंगीबेरंगी दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघत असे.
गावातील हॉटेलवाले, चहाचे स्टॉल, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, वाहनचालक आणि हातगाडीवाले सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. या तीन दिवसांत वर्षभराएवढी कमाई होईल, अशी त्यांची आशा होती. प्रत्येक जण या सोहळ्याकडे केवळ राजकीय कार्यक्रम म्हणून नव्हे, तर गावाच्या उत्सवासारखे पाहत होता.
गावातील लहान मुलांना मेळाव्याची आणि जत्रेची उत्सुकता होती, तर तरुणांना मोठमोठ्या नेत्यांना प्रत्यक्ष पाहण्याची ओढ होती. वयोवृद्ध मंडळी गावात एवढी गर्दी यापूर्वी कधी पाहिली नव्हती, अशा चर्चा करत होती.
संपूर्ण परिसर उत्साह, गडबड, अपेक्षा आणि जल्लोषाने भरून गेला होता. पण या आनंदाच्या वातावरणामागे नियती शांतपणे एका अशा घटनेची तयारी करत होती, जी उमा आणि तिच्या कुटुंबाचे आयुष्य कायमचे बदलून टाकणार होती.
त्या तीन दिवसांच्या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे त्या मेळाव्याला पक्षाचा एक प्रभावशाली राज्यस्तरीय नेता उपस्थित राहणार होता. पक्षातील त्यांचा शब्द अंतिम मानला जात असे. अनेक जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांसाठी त्यांचे दर्शन घेणे आणि त्यांचे दमदार भाषण ऐकणे ही मोठी पर्वणी ठरणार होती. त्यामुळे त्यांच्या आगमनाची तयारी इतर सर्व तयारींपेक्षा अधिक गुप्त आणि काटेकोरपणे सुरू होती.
मूळ नियोजनानुसार त्या नेत्याचा मुक्काम सरकारी डाक बंगल्यात ठेवण्यात आला होता. जिल्हा पदाधिकाऱ्यांनी तेथील स्वच्छता, सुरक्षा आणि भोजनाची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. कारण ते फक्त एका दिवसासाठी येणार होते.दुपारी सभा, संध्याकाळी कार्यकर्त्यांची बैठक आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुढील जिल्ह्याकडे प्रस्थान, असा त्यांचा कार्यक्रम ठरला होता.
मात्र मेळाव्याच्या सकाळी मात्र तो विचार पूर्णतः बदलला.
कार्यकर्त्यांच्या गप्पांमध्ये, की जाणूनबुजून कुणाच्या कान गोष्टीतून, मोहनलालच्या रूपवान मुलीबद्दल चर्चा त्या नेत्याच्या कानावर गेली. "मोहनलालची मुलगी अप्सरेलाही लाजवेल इतकी सुंदर आहे," असे शब्द त्याच्या कानावर पडले. त्या एका वाक्याने त्याची उत्सुकता चाळवली.
त्याच दिवशी दुपारच्या सुमारास मोहनलालला तातडीने नेत्यासमोर बोलावण्यात आले. अचानक आलेल्या निरोपामुळे तो घाईघाईने सभास्थळी पोहोचला. समोर पक्षाचे मोठे नेते, जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठ पदाधिकारी बसलेले पाहून तो आदराने हात जोडून उभा राहिला.
नेत्याने त्याच्याकडे पाहत शांत आवाजात म्हटले,
"मोहनलाल, डाक बंगल्याचा माझा रहाण्याचा कार्यक्रम मी रद्द केलेला आहे. आज मी तुझ्या घरी जेवण करणार आहे आणि आजची रात्रही तुझ्याच घरी मुक्काम करणार आहे. पक्षाची सेवा करण्याची आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी असे माझं मत आहे.ती संधी मी तुला देत आहे.तू लगेच घरी जा आणि पाहुणचाराची सर्व तयारी कर."
हे ऐकताच मोहनलालच्या आनंदाला पारावार उरला नाही. आपल्या घरात एवढा मोठा नेता मुक्कामाला येणार, हा त्याच्यासाठी अभिमानाचा क्षण होता. त्याने क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला.
नेत्याने शेजारी उभ्या असलेल्या एका विश्वासू कार्यकर्त्याला इशारा केला.
"याला आवश्यक ते पैसे दे आणि तयारीत कोणतीही कमतरता राहू देऊ नकोस."
त्या कार्यकर्त्याने रोख रक्कम मोहनलालच्या हातात ठेवली. त्यानंतर तो स्वतः त्याच्यासोबत निघाला. वाटेत त्याने एक यादीच वाचून दाखवली.जेवणात कोणते पदार्थ असावेत, कोणती मिठाई, कोणती फळे, कोणती भांडी, पाहुण्यांच्या विश्रांतीची व्यवस्था, स्वच्छ अंथरुणे, खोलीची सजावट अगदी छोट्यात छोट्या गोष्टींच्या सूचना दिल्या.
मोहनलाल अक्षरशः धावपळ करू लागला. जवळच्या तालुक्याच्या बाजारातून उत्तम तांदूळ, ताज्या भाज्या, मसाले, मिठाई, सुका मेवा, फळे, महागडी क्रॉकरी आणि पाहुणचारासाठी लागणारे सर्व साहित्य तातडीने मागवण्यात आले. घराची साफसफाई सुरू झाली. अंगण सारवले गेले, भिंती धुतल्या गेल्या, नव्या चादरी अंथरल्या गेल्या. घरातील प्रत्येक जण तयारीत गुंतून गेला.
त्या सामानामध्ये काही महागड्या विदेशी मद्याच्या बाटल्याही होत्या. मोहनलालच्या साध्या घरात अशा वस्तू यापूर्वी कधीच आल्या नव्हत्या. पण पक्षाच्या वरिष्ठ कार्यकर्त्याने स्पष्ट सांगितले होते.
"साहेबांच्या पाहुणचारात कोणतीही उणीव राहता कामा नये."
मोहनलालला त्या मागचे कारण कळत नव्हते. त्याच्यासाठी हा केवळ पक्षनिष्ठेचा सन्मान होता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच लिहिलेले होते. त्या रात्रीचा हा पाहुणचार त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्याला अशी कलाटणी देणार होता, ज्याची कल्पना त्या घरातील कोणालाही नव्हती.
मोहनलालच्या मनात त्या दिवशी आनंद, अभिमान आणि महत्त्वाकांक्षा यांचे विलक्षण मिश्रण तयार झाले होते. पक्षातील इतका मोठा नेता स्वतःहून आपल्या घरी मुक्काम करणार, ही गोष्ट त्याच्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होती. गावभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती आणि प्रत्येक जण त्याच्याकडे कौतुकाने पाहत होता. त्यामुळे त्याची छाती अभिमानाने फुगून आली होती.
त्याच्या मनात भविष्यातील अनेक स्वप्ने आकार घेऊ लागली. गावच्या राजकारणातच अडकून राहण्याऐवजी तालुका, जिल्हा आणि कदाचित त्याही पुढे जाण्याची संधी आता मिळेल, असे त्याला वाटत होते. एखादे मोठे पद, एखाद्या मंडळाचे अध्यक्षपद, सहकारी संस्थेची जबाबदारी किंवा निवडणुकीचे तिकीट अशा अनेक शक्यता त्याच्या मनात तरळू लागल्या.
"आज साहेब राज्यातील मोठे नेते आहेत. उद्या ते आणखी उंच पदावर गेले तर? त्या वेळी त्यांनी माझी आठवण ठेवली, तर माझ्या आयुष्याचेच सोने होईल," हा विचार त्याच्या मनात पुन्हा पुन्हा येत होता.
या स्वप्नांच्या नादात त्याला एक गोष्टही जाणवली नाही.मोठ्या माणसांचा अचानक झालेला हा आपुलकीचा वर्षाव नेमका कशासाठी होता?मोहनलालने बाजारातून आणलेले सर्व सामान घरी पोहोचवले. घरात प्रवेश करताच त्याने उत्साहाने आवाज दिला.
"सर्वांनी लवकर तयारीला लागा,आज आपल्या घरी मोठे साहेब येणार आहेत. त्यांच्या पाहुणचारात कोणतीही कमतरता राहता कामा नये."
त्याची पत्नी क्षणभर दचकली. एवढा मोठा पाहुणा घरात येणार, ही गोष्टच तिच्यासाठी अनपेक्षित होती. पण नवऱ्याच्या आनंदात तिनेही स्वतःला झोकून दिले. स्वयंपाकघरात लगेच लगबग सुरू झाली. मसाले वाटले जाऊ लागले, भाज्या चिरल्या जाऊ लागल्या, गोडधोड पदार्थांची तयारी सुरू झाली.
घरातील तसेच शेजारच्या इतर महिलांनाही कामाला लावण्यात आले. अंगण पुन्हा एकदा झाडून स्वच्छ करण्यात आले. पाहुण्यांसाठी वेगळे अंथरूण घालण्यात आले. पितळी भांडी चकाकवण्यात आली. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात स्वच्छतेची आणि नीटनेटकेपणाची धावपळ सुरू होती.
उमालाही आईच्या मदतीला उभे राहावे लागले. तिला पाहुण्यांसमोर कसे वागायचे, काय करायचे याच्या सूचना दिल्या जाऊ लागल्या. घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह होता पण उमाच्या मनात मात्र एक अस्पष्ट अस्वस्थता होती, ज्याचे कारण तिलाही समजत नव्हते.
दरम्यान, नेत्याच्या विशेष पाहुणचारासाठी घरातील एका स्वतंत्र खोलीची निवड करण्यात आली. त्या खोलीत आरामखुर्च्या, टेबल, काचेचे ग्लास, आइस बॉक्स आणि इतर आवश्यक वस्तू ठेवण्यात आल्या. बाजारातून आणलेल्या महागड्या मद्याच्या बाटल्या काळजीपूर्वक त्या टेबलावर मांडल्या गेल्या. बाहेरून पाहता ती खोली एखाद्या मानाच्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सजवलेली होती.
मोहनलाल पुन्हा एकदा सर्व व्यवस्था पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते. त्याला खात्री होती की आजचा दिवस त्याच्या राजकीय आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. परंतु त्याला माहीत नव्हते की, ज्या दारातून तो आपल्या भविष्यातील यश आत येत आहे असे समजत होता, त्याच दारातून त्याच्या कुटुंबाच्या आयुष्यातील सर्वात मोठे संकट प्रवेश करण्याच्या तयारीत होते.
नेत्यांच्या मुक्कामासाठी राखून ठेवलेली खोली आता पूर्णपणे सज्ज झाली होती. नव्या कोऱ्या शुभ्र चादरी अंथरल्या गेल्या होत्या. उशांवर स्वच्छ अभ्रे चढवण्यात आली होती. बाजूला पाण्याचा तांब्या, चांदीचा ग्लास, टॉवेल, अगरबत्ती, डास घालवण्याची व्यवस्था आणि रात्री लागणाऱ्या प्रत्येक वस्तूची नीट मांडणी करण्यात आली होती. पाहुणचारात कोणतीही त्रुटी राहू नये, याची मोहनलाल स्वतः पुन्हा पुन्हा खात्री करून घेत होता.
दरम्यान संध्याकाळ सरू लागली.
दूर मेळाव्याच्या मैदानावरून लाऊडस्पीकरवरून सुरू असलेली नेत्यांची भाषणे आणि घोषणांचा आवाज गावभर घुमत होता. "पक्षाचा विजय असो..!", "नेताजी जिंदाबाद..!" अशा घोषणा वाऱ्यावर तरंगत मोहनलालच्या घरापर्यंत पोहोचत होत्या.
संधिप्रकाश हळूहळू विरत गेला. क्षितिजावरचे शेवटचे केशरी रंगही काळोखात विरून गेले आणि काही क्षणांतच रात्रीने गावाला आपल्या कवेत घेतले.
अचानक मेळाव्याच्या मैदानाभोवती उभारलेले प्रचंड फ्लडलाइट्स एकामागोमाग एक उजळले. क्षणार्धात संपूर्ण परिसर प्रकाशाने न्हाऊन निघाला. गावातील अरुंद रस्ते, झाडे, घरांची कौले, मंदिराचा कळस,सगळेच त्या उजेडात चमकून उठले. जणू एखादा मोठा उत्सव गावात अवतरला होता.
नेहमी सूर्यास्तानंतर शांत होणारे ते गाव त्या रात्री मात्र जागे होते. रस्त्यावर कार्यकर्त्यांची वर्दळ होती. कुठे चहाच्या टपऱ्यांवर चर्चा रंगल्या होत्या, तर कुठे लाऊडस्पीकरवर देशभक्तीपर आणि पक्षाच्या प्रचाराची गीते सुरू होती. लहान मुले अजूनही मैदानाभोवती धावत होती. गावाला जणू नवीनच प्राण मिळाला होता.इतक्यात एक पक्षाचा कार्यकर्ता धापा टाकत मोहनलालच्या घरात आला."मोहनलालजी.. तयार रहा. नेताजी सभा संपवून निघाले आहेत. काही मिनिटांत इथे पोहोचतील."
क्रमश....🖋️📚📖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा