मुख्य सामग्रीवर वगळा

सौंदर्य : शाप की वरदान | एपिसोड 2 – पाहुणचार की सापळा? | मराठी रहस्यकथा

 अस्वीकरण -

"ही कथा काल्पनिक आहे. पात्रे, स्थळे, संस्था आणि घटना काल्पनिक असून कोणत्याही वास्तविक व्यक्ती, संस्था किंवा घटनेशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा."


एपिसोड २ – पाहुणचार की सापळा?पाहुणचाराच्या हास्यामागे,
दडले होते विषारी डाव...
विश्वास जिथे विकला जातो,
तिथे नियती लिहिते घाव...

🔗सौंदर्य : शाप की वरदान | एपिसोड १ - सौंदर्याची सावली | मराठी रहस्यकथा

सौंदर्य नेहमीच वरदान असते का? की काही वेळा ते आयुष्यभराचा शाप ठरते? 'सौंदर्य : शाप की वरदान?' या रहस्यपूर्ण मराठी कादंबरीच्या 'सौंदर्याची सावली' या पहिल्या भागात आपण भेटणार आहोत.
उत्तर प्रदेशातील एका साध्या शेतकरी कुटुंबात वाढलेल्या उमाला. तिच्या विलक्षण सौंदर्यामुळे तिचे आयुष्य भीती, असुरक्षितता आणि समाजाच्या वाईट नजरेच्या विळख्यात अडकत जाते.
भाग - 1 वाचला नसेल तर अवश्य वाचून घ्यावा.

सौंदर्य : शाप की वरदान | एपिसोड 2 - पाहुणचार की सापळा? | मराठी रहस्यकथा

सौंदर्य : शाप की वरदान' या मालिकेच्या दुसऱ्या भागात एका प्रभावशाली नेत्याचा पाहुणचार हळूहळू एका धोकादायक सापळ्यात बदलत जातो. उमाच्या सौंदर्यावर खिळलेल्या नजरा, मोहनलालची महत्त्वाकांक्षा आणि सत्तेच्या खेळाची सुरुवात अनुभवण्यासाठी वाचा - एपिसोड २,  पाहुणचार की सापळा?

भाग 1 वरून पुढे..

नेताजी' यायला निघालेत हे ऐकताच मोहनलालच्या छातीत धडधड वाढली. तो घाईघाईने पुन्हा एकदा घरभर नजर फिरवू लागला. सर्व काही व्यवस्थित आहे ना, याची त्याने खात्री करून घेतली.

त्याने आत जाऊन  मेहुणी आणि उमाला पुन्हा एकदा बजावले.

"तुम्ही दोघींनी लक्षात ठेवा.. मी बोलावल्याशिवाय कोणीही बाहेर यायचं नाही. जे सांगितलं तेवढंच करायचं."

त्याच्या पत्नीने आधीच स्वागतासाठी ओवाळणीचे ताट सजवून ठेवले होते. ताटात हळद-कुंकू, अक्षता, फुलं, निरांजन आणि गोडधोड ठेवण्यात आले होते. गावची प्रथा म्हणून शेजारच्या एका वयस्कर सुहासिनी महिलेलाही स्वागतासाठी बोलावण्यात आले होते.

घरासमोर आता काही गावकरीही जमू लागले. इतक्या मोठ्या नेत्याला जवळून पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

काही वेळातच दूरवरून घोषणांचा आवाज जवळ येऊ लागला.

"नेताजी की जय..!"

"पक्षाचा विजय असो..!"

कार्यकर्त्यांचा मोठा गराडा हळूहळू मोहनलालच्या घराकडे सरकत होता.

त्या गर्दीच्या मध्यभागी नेताजी चालत येताना दिसले.

त्यांचे वय साधारण पंचावन्न ते साठ वर्षांच्या आसपास असावे. अंगावर स्वच्छ इस्त्री केलेला जाड खादीचा पांढरा सदरा आणि लेंगा होता. डोक्यावर शुभ्र गांधी टोपी, पायात किंमती चामड्याच्या चपला. गोरा वर्ण, धारदार नाक, कपाळावर अनुभवाच्या रेषा आणि ओठांवर कायमस्वरूपी चिकटल्यासारखे वाटणारे एक सौजन्यपूर्ण, पण काहीसे कृत्रिम हास्य. ते जवळ येताच त्यांच्या अंगावरील महागड्या सुगंधी अत्तराचा मंद दरवळ हवेत पसरला.

विशेष म्हणजे, त्यांच्या वापरासाठी आलिशान कार उभी असूनही त्यांनी शेवटचा टप्पा पायी चालतच पार केला होता. कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालत येण्याचा हा साधेपणाचा देखावा पाहून उपस्थित लोक भारावून गेले. प्रत्येकजण त्यांच्या साधेपणाची स्तुती करू लागला.

मोहनलाल तर अक्षरशः भावूक झाला.

"इतका मोठा नेता आणि माझ्या घरात मुक्कामाला!"

त्याची छाती अभिमानाने भरून आली. गावातील लोकांच्या नजरा आता त्याच्याकडे वेगळ्याच आदराने वळल्या होत्या. त्या क्षणी त्याला वाटत होते की आजपासून गावात त्याचा मान, त्याची प्रतिष्ठा आणि त्याचा राजकीय रुबाब अनेक पटींनी वाढणार आहे.

पण त्या कृत्रिम हास्यामागे दडलेला हेतू अजूनही मोहनलालला दिसला नव्हता. आणि याच अंधविश्वासाची किंमत त्याला फार मोठी मोजावी लागणार होती.

मोहनलालच्या पत्नीने आणि शेजारच्या महिलेने पारंपरिक पद्धतीने नेताजींचे औक्षण केले. निरांजनाचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडत होता. औक्षण संपताच नेताजींनी हसतच खिशातून नोटांचे जाड बंडल काढले आणि त्यातील  भरघोस रक्कम ओवाळणीच्या ताटात ठेवली.

क्षणात उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या.

"वा! साहेब किती मोठ्या मनाचे आहेत!" कोणीतरी कौतुकाने म्हणाला.

मोहनलालच्या डोळ्यांत अभिमान दाटून आला. एवढ्या मोठ्या नेत्याने आपल्या घराचा मान ठेवला, याचाच त्याला आनंद होता.

पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेल्या नजरा मात्र सतत घराच्या आत डोकावत होत्या.

नेताजींनी सहज असल्यासारखे विचारले,

"अरे मोहनलाल..तुझी मुलगी दिसली नाही? घरात नाही का? एवढ्या मोठ्या पाहुण्याला ओवाळायला तरी यायला हवं होतं."

हे ऐकताच मोहनलाल क्षणभर गोंधळला. त्याने तर आधीच उमाला बाहेर न येण्याची ताकीद दिली होती.

तो काही बोलणार इतक्यात नेताजी पुन्हा हसत म्हणाले,

"काय रे...इतकं लपवून ठेवतोस? आम्हालाही भेटू दे तुझ्या लेकीला."

त्यांच्या आवाजात आपुलकी होती  पण डोळ्यांत मात्र वेगळीच उत्सुकता चमकत होती.

मोहनलालचा नाइलाज झाला. इतक्या मोठ्या माणसाची इच्छा मोडण्याचे धाडस त्याच्यात नव्हते.

त्याने पत्नीला हळू आवाजात सांगितले,

"जा..उमाला लगेच घेऊन ये. साहेब स्वतः विचारत आहेत."

पत्नी क्षणभर थांबली. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी चिंता उमटली  पण घरात जमलेल्या कार्यकर्त्यांसमोर काही बोलण्याची तिची हिंमत झाली नाही. ती शांतपणे घराच्या आत निघून गेली.

दरम्यान, नेताजी उंबरठ्यावरच थांबले.

"लेकीला येऊ दे.. मगच आत येतो," ते हसत म्हणाले.

घरासमोर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना त्यात काहीच वेगळे वाटले नाही. सर्वांना ते एका प्रेमळ, कुटुंबवत्सल नेत्याचे वागणे वाटत होते.

परंतु नेताजींच्या मनात वेगळाच विचार सुरू होता.

आज दिवसभर अनेक कार्यकर्त्यांच्या तोंडी त्यांनी एकच गोष्ट ऐकली होती."मोहनलालची मुलगी म्हणजे विलक्षण सौंदर्याची मूर्ती. अप्सरेलाही लाजवेल अशी आहे,"

त्यांच्या मनात उत्सुकतेची एक अस्वस्थ ठिणगी पेटली होती.

"इतकी चर्चा आहे.. मग ती दिसत का नाही? खरंच तितकी सुंदर आहे का?"

त्याची नजर पुन्हा पुन्हा घराच्या आतील प्रकाशमान दाराकडे वळत होती. त्या दारातून उमा बाहेर येण्याची ते आतुरतेने वाट पाहत होते.

घरात मात्र उमा अनभिज्ञ होती. बाहेर तिच्या एका दर्शनाची वाट पाहणाऱ्या त्या नजरेत आदर नव्हता. तर काहीतरी अधिक गडद आणि धोकादायक इप्सित दडलेले होते.

घरासमोरील गर्दीतून उमा हळूहळू पुढे आली. तिच्या डोक्यावर लांब घुंगट होता. बाहेर उभ्या असलेल्या लोकांच्या कुजबुजीत तिची पावले आणखीच संथ झाली. जवळ येताच हवेत दरवळणाऱ्या महागड्या अत्तराचा सुगंध तिच्या नाकात शिरला. फुलांच्या सुगंधाव्यतिरिक्त असा दरवळ तिने यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता.

नेताजी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले. घुंगटामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता. त्यांनी हलकेसे हसत म्हटले,

"अगं, एवढा संकोच कशाला? आम्हालाही तुझा चेहरा पाहू दे."

मोहनलाल लगेच म्हणाला,

"नेताजी, हिचं नाव उमा."

"अरे वा!" नेताजी हसले. "योगायोग बघ..माझं नावही उमाशंकर."

घरातील वातावरण क्षणभर हलके झाले. रमादेवींनी उमाच्या कानाशी हळूच सांगितले,

"बाळ, घुंगट थोडासा वर कर."

उमाने संकोचाने घुंगट हलकेच मागे सारला.

क्षणभर वेळ जणू थांबला.

उपस्थित काही कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले. अनेकांनी ऐकलेल्या तिच्या सौंदर्याच्या चर्चा अतिशयोक्ती नव्हत्या, हे त्यांच्या नजरेतून स्पष्ट होत होते.

नेताजींच्या चेहऱ्यावरचे हसू क्षणभर स्थिरावले. त्यांनी स्वतःला सावरत दुसऱ्या खिशातून नोटांचे अख्ख बंडल काढले आणि औक्षणाच्या ताटात ओवाळणी म्हणून शंभर रुपयांच्या नोटांची गड्डी ठेवली.

"सुखी रहा," एवढेच ते म्हणाले.

परंतु त्यांच्या नजरेतील चमक मोहनलालच्या लक्षात आली नाही. तो तर त्या सन्मानाने भारावून गेला होता. त्याला वाटत होते की, आज त्याच्या आयुष्याची दिशा बदलत आहे.

नेताजी शांतपणे घराच्या उंबरठ्यातून आत आले. बाहेर अजूनही घोषणांचा गजर सुरूच होता पण त्या घराच्या चार भिंतींच्या आत एक वेगळाच ताण हळूहळू आकार घेत होता.

नेताजी शांतपणे घराच्या उंबरठ्यातून आत आले. गावात लाऊडस्पीकर वर दणदणाट वाजणारी गाणी  आणि मेळाव्याच्या रोषणाईचा भगभगणारा झगमगाट सुरूच होता पण त्या घराच्या चार भिंतींच्या आत मात्र एक वेगळेच वातावरण तयार होऊ लागले होते. बाहेर उत्सव होता, तर आत शांततेच्या आड काहीतरी अज्ञात दडलेले होते.

घरात प्रवेश करताच मोहनलालने आदराने चहापाण्याची व्यवस्था केली. काही क्षणांतच ट्रेमध्ये चहा, नाश्ता आणि पाण्याचे ग्लास आणले गेले. नेताजींनी मात्र फक्त पाण्याचा ग्लास हातात घेतला. त्यांनी एक घोट घेतला आणि उरलेला नाश्ता बाहेर उभ्या असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांकडे पाठवण्यास सांगितला.

थोड्याच वेळात ते स्वतः अंगणात आले. बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांकडे पाहून त्यांनी शांत पण अधिकारपूर्ण आवाजात म्हटले,

"आता तुम्ही सगळे तुमच्या मुक्कामाच्या ठिकाणी जा. माझी काळजी घ्यायला मोहनलाल आहे. उद्या सकाळी आपण सर्वजण सभेत भेटू."

नेत्यांचा आदेश ऐकताच कोणीही काही बोलले नाही. सर्वांनी नम्रपणे हात जोडले आणि एकामागून एक निघून गेले.

त्यानंतर चालकाला त्यांची गाडी डाक बंगल्यावर घेऊन जाण्यास सांगितले.

"उद्या सकाळी बरोबर आठ वाजता इथे हजर राहा," असे त्यांनी सांगितले.

"जी साहेब," असे म्हणत चालक गाडी घेऊन निघून गेला.

या सर्व गडबडीत रात्रीचे जवळजवळ आठ वाजले होते. बाहेरच्या रस्त्यांवर अजूनही मेळाव्याची वर्दळ सुरू होती पण मोहनलालच्या घरात आता पाहुणचाराचा दुसरा टप्पा सुरू होणार होता.

नेताजींचा खासगी शिपाई मात्र त्यांच्या सांगण्यावरून तिथेच थांबला होता.

"व्यवस्था करा," एवढाच आदेश नेताजींनी दिला.

घरातील स्वतंत्र खोलीत आधीच तयारी करून ठेवण्यात आली होती. मधोमध लाकडी टेबल ठेवले होते. त्यावर दोन स्वच्छ काचेचे ग्लास, आइस बॉक्स, सोडा वॉटर आणि पाण्याची बाटल्या आणि महागड्या उंची मद्याच्या बाटल्या नीट मांडलेल्या होत्या. बाजूला हॉटेलमधून मागवलेले तोंडी लावायचे पदार्थ, भाजलेले काजू, सॅलड आणि इतर खाद्यपदार्थ आकर्षक डिशमध्ये सजवले होते. खोलीतील तेजस्वी दिवे बंद करून फक्त मंद पिवळसर प्रकाश देणारा दिवा लावण्यात आला. त्या प्रकाशात खोली अधिक शांत आणि बंदिस्त वाटत होती.

नेताजी आपल्या खोलीत गेले. त्यांनी अंगावरील खादीचा सदरा, लेंगा आणि गांधी टोपी काढून काळजीपूर्वक खुंटीवर टांगली. चेहऱ्यावर पाणी मारून ते ताजेतवाने झाले आणि नंतर सुती कापडाचा सैल लेंगा व अर्ध्या बाह्यांचा साधा सदरा परिधान करून ते बाहेर आले.

ते निवांतपणे मदिरापानासाठी सजवलेल्या खोलीत जाऊन खुर्चीत बसले.

समोर टेबल, बाजूला शांतता आणि बाहेरून मंद स्वरात येणाऱ्या घोषणांचा आवाज.

मोहनलाल आदराने थोड्या अंतरावर उभा होता. खासगी शिपाईही आदेशाची वाट पाहत उभा होता.

नेताजींनी त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि शांत स्वरात त्याला म्हणाले,

"तू बाहेर थांब."

शिपायाने मान हलवली, दरवाजा अलगद बंद केला आणि बाहेर जाऊन उभा राहिला.

आता त्या खोलीत फक्त दोनच व्यक्ती उरल्या होत्या.एक सत्तेच्या शिखरावर पोहोचलेला वरिष्ठ नेता आणि दुसरा त्या सत्तेवर अढळ विश्वास ठेवणारा, आपल्या भवितव्याची स्वप्ने पाहणारा एक स्वप्नाळू कार्यकर्ता.

मोहनलाल अजूनही आदराने उभाच होता. नेताजींनी समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत शांतपणे म्हटले,

"अरे मोहनलाल, उभा का आहेस? समोर बस.. आज मी तुझा पाहुणा आहे."

मोहनलाल गडबडला.

"नको नेताजी..मी इथेच बरा."

नेताजी हलकेच हसले.

"हा आदेश समज. बस समोर."

नाईलाजाने मोहनलाल समोरच्या खुर्चीवर बसला.बसताना मात्र त्याने त्याचे संपूर्ण शरीर आखडून घेतले होते. इतक्या मोठ्या नेत्यासमोर बसण्याची त्याला सवयच नव्हती. खुर्चीच्या अगदी टोकावर बसून त्याने त्याचे दोन्ही हात दुमडून छातीजवळ घेतले.

नेताजींनी स्वतः मद्याची बाटली उघडली. काचेच्या दोन ग्लासांमध्ये मद्य ओतले. बर्फाचे दोन तुकडे टाकले, त्यात थोडे पाणी मिसळले आणि एक ग्लास मोहनलाल समोर सरकवला.

मोहनलालने घाबरतच हात मागे घेतला.

"नेताजी.. मी दारू पीत नाही."

नेताजी पुन्हा हसले.

"आजपर्यंत पीत नव्हतास, पण आयुष्यात काही दिवस असे येतात की माणसाला स्वतःलाच बदलावं लागतं."

क्षणभर थांबून त्यांनी त्याच्याकडे पाहिले.

"मोहनलाल..तुझे ग्रहमान आजपासून फिरायला लागले आहेत. इतकी वर्षे तू पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केलेस. आता वेळ तुझी आहे. लवकरच तुला वरच्या पदावर पाहायचं आहे."

ही वाक्ये ऐकताच मोहनलालच्या मनात आनंदाची लहर पसरली. ज्या शब्दांची तो वर्षानुवर्षे वाट पाहत होता, ते आज स्वतः नेताजींच्या तोंडून ऐकायला मिळत होते. त्याला वाटले, आपल्या निष्ठेचे चीज होणार याची हीच तर पावती आहे.

नेताजींनी आपला ग्लास उंचावला.

"चिअर्स.. तुझ्या उज्ज्वल भविष्याकरिता."

मोहनलालनेही थरथरत्या हाताने ग्लास उचलला. त्याच्या काचेचा ग्लास नेताजींच्या ग्लासला हलकेच स्पर्शून गेला.

"टssण.."

त्या शांत खोलीत तो आवाज अधिकच स्पष्ट ऐकू आला.

नेताजींनी डोळे मिटून पहिला घोट घेतला. क्षणभर मद्याची कडवट चव चेहऱ्यावर उमटली. लगेच त्यांनी समोरच्या ताटातील काजू तोंडात टाकले आणि निवांतपणे खुर्चीला टेकले.

मोहनलाल मात्र अजूनही ग्लास हातात धरून बसला होता. घ्यावा की नको, याच विचारात तो अडकला होता.

नेताजींनी त्याच्याकडे पाहिले आणि फक्त नजरेनेच इशारा केला.

"घे.."

त्या एका इशाऱ्यात आग्रहापेक्षा आदेश अधिक होता.

मोहनलालने एक दीर्घ श्वास घेतला. आयुष्यात प्रथमच त्याने मद्याचा ग्लास ओठांशी नेला. अपरिचित वासानेच त्याला किळस आली. त्याने नकळत नाक दाबले, डोळे मिटले आणि एक मोठा घोट घेतला.

क्षणातच त्याच्या घशात आणि छातीत तीव्र जळजळ झाली. त्याला ठसका लागला. डोळ्यांत पाणी आले. चेहरा लालबुंद झाला. समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलून त्याने घाईघाईने दोन घोट पाणी प्यायले.

नेताजी मंद हसले.

"पहिला घोट हा नेहमीच असाच असतो,पण सवय झाली की माणूस कडूपणातही गोडवा शोधायला शिकतो."

हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित उमटले. त्या स्मिताचा अर्थ मोहनलालला समजला नाही पण त्या रात्रीची खरी परीक्षा अजून सुरूही झाली नव्हती.

नेताजींनी आणखी एक घोट घेतला आणि ग्लास अलगद टेबलावर ठेवला. आता त्यांनी मोहनलालला पुन्हा मद्य घेण्याचा आग्रह केला नाही. तो पूर्ण शुद्धीत असणे त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे होते.

काही क्षण शांतता पसरली. मग ते खुर्चीत मागे रेलले आणि म्हणाले,

"मोहनलाल, तुझी निष्ठा मी विसरलो नाही. अनेक वर्षे पक्षासाठी तू कोणतीही अपेक्षा न ठेवता काम केलंस. आता तुझ्या भविष्याचा विचार करण्याची वेळ माझी आहे."

ते पुढे म्हणाले,

"घाईघाईने तुला मोठं पद दिलं, तर लोक संशय घेतील. योग्य वेळ आल्यावर आधी तालुकाध्यक्ष, मग जिल्ह्यात जबाबदारी आणि त्यानंतर निवडणुकीचाही विचार करता येईल. राजकारणात प्रत्येक पाऊल योग्य वेळी टाकावं लागतं."

मोहनलालच्या डोळ्यांत आशेची चमक दाटली. वर्षानुवर्षे मनात दडवून ठेवलेली स्वप्ने जणू प्रत्यक्षात उतरणार होती.

नेताजींनी पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहिले.

"मोठ्या माणसाचं आयुष्यही मोठं दिसलं पाहिजे. हे घर बदल. पक्का बंगला बांध. त्यासाठी लागणारी मदतही केली जाईल."

हे ऐकताच मोहनलाल अक्षरशः भारावून गेला. त्याला वाटले, आयुष्यभराच्या मेहनतीचे फळ अखेर मिळत आहे.

मात्र पुढच्याच क्षणी नेताजींचा आवाज किंचित गंभीर झाला.

"पण प्रत्येक मदतीची एक किंमत असते, मोहनलाल."

तो चटकन म्हणाला,

"हुजूर, तुम्ही आदेश द्या. माझ्याकडून जे शक्य आहे ते मी नक्की करीन."

नेताजी काही क्षण त्याच्याकडे निरखून पाहत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट स्मित उमटले.

"घाई नको. आधी विचार कर. कारण मी जे मागणार आहे, त्यानंतर मागे फिरणं सोपं नसेल."

त्या शब्दांनी खोलीतील वातावरण अचानक जड झाले. बाहेर मेळाव्यात घोषणांचा गजर सुरू होता पण त्या चार भिंतींच्या आत एक वेगळीच परीक्षा सुरू होण्याची चाहूल लागली होती.

नेताजी काही क्षण शांत बसले. मग त्यांनी ग्लास टेबलावर ठेवला आणि मोहनलालकडे रोखून पाहत म्हणाले,

"मोहनलाल, मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. ती ऐकून लगेच उत्तर देऊ नकोस.विचार कर"

मोहनलाल सावध झाला.

"हुजूर, आदेश करा."

नेताजी शांत स्वरात म्हणाले,

"तुझी मुलगी मला आवडली आहे. माझ्या मनात तिच्याशी विवाह करण्याचा विचार आला आहे. वयाचा विचार करण्यापेक्षा आयुष्यभराचा विचार कर. माझ्याकडे मान आहे, प्रतिष्ठा आहे, संपत्ती आहे. तिच्या आयुष्याला सुरक्षित भविष्य मिळेल आणि तुझ्याही कुटुंबाची स्थिती बदलेल."

त्या नंतर क्षणभर खोलीत शांतता पसरली..

क्रमश..🖋️📚📖


या भागात मोहनलाल सत्तेच्या पाशवी मोहात अडकत जातो, तर उमा खोट्या स्वप्नांच्या जाळ्यात ओढली जाते. मेणबत्ती विझण्यापूर्वीची स्वप्नांची पेरणी पुढे येणाऱ्या भीषण घटनांची चाहूल देते. रहस्य, थरार आणि सामाजिक वास्तव यांचा संगम असलेला पुढील भाग नक्की वाचा...

🔗सौंदर्य : शाप की वरदान | एपिसोड ३ : मेणबत्ती विझण्यापूर्वी..

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

  👨🏻‍💼  Connect With Us

📧 Gmail: sjomkar21@gmail.com

🌐 Follow & Connect


📌 Pinterest

✍️ Quora

🧵 Threads

📖 Medium

💬 WhatsApp Channel

🔗 वरील कोणत्याही सोशल मिडिया नावावर क्लिक करून आमच्या अधिकृत सोशल मीडिया प्रोफाइलला भेट द्या. 

ℹ️ सूचना: काही लिंक उघडताना गुगल कडून  "Redirect Notice" दिसू शकते. अशा वेळी कृपया "Redirect" वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही आमच्या अधिकृत प्रोफाइलवर पोहोचाल.


💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.
👍 पुढील भाग वाचण्यासाठी या ब्लॉगच्या 🔍☰ मधील FOLLOW वर कृपया क्लिक करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.

तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा. धन्यवाद! 🙏
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)
SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो

📩 Subscribe करा
नवीन पोस्ट लगेच मिळवा!






टिप्पण्या

  1. उमाच्या आयुष्यातील हे वादळ नेमकं शाप ठरेल की वरदान? जाणून घेण्यासाठी पुढचा भाग वाचायलाच हवा

    उत्तर द्याहटवा
  2. कथा सुरुवातीपासूनच खिळवून ठेवते. पुढे काय घडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे!"

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...