मुख्य सामग्रीवर वगळा

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

    'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी

भरकटलेली शिवाई | भारतीय मच्छीमारांची थरारक कथा मुखपृष्ठ | SJ Omkar :शब्दांची मुशाफिरी
क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले
शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले |
हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला
दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला |

🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”

      माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.

      ‘भरकटलेली शिवाई’-पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..

   पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.    
   भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना हवामान, तांत्रिक बिघाड आणि सागरी सीमा यांचा चुकीचा अंदाज त्यांना जीवघेण्या संकटात ढकलू शकतो. पालघर जिल्ह्यातील मोपणवारा गावातील 'शिवाई' बोटीची ही थरारक मराठी कथा अशाच एका अनपेक्षित प्रवासाची आहे. GPS बंद पडल्यामुळे पाकिस्तानी सागरी हद्दीत नकळत प्रवेश झाल्यानंतर सुरू झालेला संघर्ष, कैद आणि मायदेशी परतण्याची आशा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
     समुद्र हा मानवासाठी कायमच आकर्षण, आस्था आणि भीतीचा विषय राहिला आहे. जगातील विविध भाषांमध्ये समुद्रासाठी अनेक समानार्थी शब्द आढळतात परंतु त्याच्याशी असलेले मानवाचे नाते मात्र सर्वत्र समान आहे. पृथ्वीवर मानवाची उत्क्रांती झाल्यापासून समुद्र किनाऱ्याजवळ राहणारा मनुष्य समुद्राच्या लहरींवरच आपले जीवन अवलंबून ठेवत आला आहे. त्यामुळेच समुद्राकडे तो केवळ जलस्रोत म्हणून नव्हे, तर कधी दाता, कधी पालनकर्ता, तर कधी देवत्वाच्या भावनेतून पाहतो. अनेक किनारी समाजांमध्ये समुद्राला “दर्यादेव” मानण्याची परंपरा आजही आढळते.

    समुद्राने मानवाला अन्न, व्यापार आणि उपजीविकेची साधने उपलब्ध करून दिली. मासे, मीठ, शिंपले, मोती तसेच सागरी मार्गांद्वारे होणारी देवाणघेवाण यांमुळे मानवी जीवन अधिक समृद्ध झाले. या गरजेतून मानवाने पाण्याशी मैत्री केली, पोहणे आणि समुद्रावर तरंगण्याचे कौशल्य आत्मसात केले. पुढे मानवी बुद्धिमत्तेच्या बळावर विविध प्रकारच्या होड्या, गलबते आणि नौका निर्माण झाल्या आणि त्यातून मच्छीमारी व सागरी वाहतुकीचा विकास झाला.

   बोटीवरील कारभार सांभाळणाऱ्या प्रमुख व्यक्तीस “तांडेल” म्हटले जाई. तांडेल हा बोटीचा प्रमुख, मार्गदर्शक आणि निर्णय घेणारा मानला जात असे. त्याचबरोबर तो समुद्राचा अभ्यासक, हवामानाचा जाणकार तसेच संकटसमयी योग्य निर्णय घेणारा धाडसी अनुभवी नायकही असतो.त्याचा विश्वासू वरिष्ठ सहकारी म्हणजे “सारंग”. बोटीवरील खलाशी, माल, जाळी, दिशा आणि शिस्त यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सारंग पार पाडत असे. त्यामुळे तांडेल प्रमाणेच सारंगलाही मोठा मान आणि अधिकार प्राप्त असे. काही ठिकाणी “सारंग” हा शब्द जहाजावरील अनुभवी मार्गदर्शक किंवा प्रमुख सहाय्यक या अर्थानेही वापरला जात असे.

   कोकण किनारपट्टीवर परंपरेने समुद्राशी निगडित व्यवसाय आणि मासेमारी करणारे अनेक समाज वास्तव्य करत आले आहेत. त्यामध्ये विशेषतः कोळी समाज व त्यांच्या विविध उपजाती, तसेच आगरी आणि गाबीत समाजांचा समावेश होतो. याशिवाय मुस्लिम समाजातील दालदी समाज आणि ख्रिश्चन कोळी समाज प्रामुख्याने मासेमारी व्यवसायाशी संबंधित आहेत. तसेच काही प्रमाणात भंडारी समाजातील लोकही मासेमारी, गलबत व्यवसाय आणि सागरी वाहतुकीशी निगडित असल्याचे आढळते.
   मासेमारी असो, मालवाहतूक असो, नौकानयन असो किंवा आरमार , या सर्व सागरीय व्यवसाय क्षेत्रांत समुद्राशी निगडित समाजातील सर्व तांडेल, सारंग आणि खलाशी यांचे योगदान आजही अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. समुद्राच्या लाटा, वादळे आणि अनिश्चित परिस्थितींशी सामना करत त्यांनी आपल्या कौशल्य, धैर्य आणि अनुभवाच्या बळावर सागरी जीवन आणि व्यापार सुरळीत ठेवला. कोकणच्या समृद्ध सागरी संस्कृतीला आकार दिला. त्यामुळे समुद्र हा केवळ पाण्याचा अथांग साठा नसून, कोकणातील अनेक समाजांच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि अस्तित्वाचा अविभाज्य भाग बनला आहे.

    बोटीवरील सर्व मंडळींचे जीवन अत्यंत कष्टमय असते. समुद्राच्या मध्यभागी अनेक दिवस कुटुंबापासून दूर राहावे लागते. सतत हलणारी-डुलणारी बोट, वादळी लाटांचे तडाखे, जोरदार वारे, अंग करपवून टाकणारे उन्हे तसेच रात्रीची बोचरी थंडी अशा अनेक नैसर्गिक संकटांना तोंड देत त्यांना आपले दैनंदिन जीवन जगावे लागते. अशा प्रतिकूल परिस्थितीत झोप, जेवण आणि इतर दैनंदिन गरजा पूर्ण करणेही अत्यंत कष्टदायक ठरते.

   खलाशी हा बोटीवरील हरकाम्या, कष्टकरी आणि विश्वासू मदतनीस असतो. जसे तांडेल आणि सारंग यांचे कार्य महत्त्वाचे मानले जाते, तसेच खलाश्याच्या कामालाही तितकेच महत्त्व असते. बोटीवरील अनेक कामांची जबाबदारी खलाशी पार पाडत असतो. समुद्री जीवनात प्रत्येक पावलावर धोका दडलेला असतो; तरीही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत चालावा यासाठी ते मृत्यूची पर्वा न करता समुद्रात उतरतात.

    या निडर, मेहनती आणि काटक स्वभावाच्या तांडेल, सारंग व खलाश्यांमुळे मानवाचा समुद्राशी असलेला संबंध अधिक दृढ झाला. त्यांच्या धैर्य, अनुभव आणि अथक परिश्रमांमुळे सागरी जीवन, व्यापार आणि नौकानयनाची परंपरा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहिली. यांच्याशी संबंधित ही लघु कथा…

    पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात समुद्रकिनाऱ्याला खेटून वसलेले मोपणवारा हे छोटेसे गाव. गावात बहुतांश वस्ती मच्छीमार समाजाची. समुद्र, होड्या, जाळी आणि माशांचा वास  हेच त्या गावाचे दैनंदिन जीवन होते. दर्याशी जणू त्या गावाचे रक्ताचे नाते जुळलेले होते.
   रात्रीची अंधार छाया हळूहळू ओसरत होती. पूर्वेकडे झुंजूमुंजू व्हायला लागली होती. क्षितिजावर लालसर छटा पसरू लागल्या होत्या मात्र अजून सूर्याच्या सोनेरी किरणांनी सूर्योदयाची वर्दी दिली नव्हती. आकाशात शुक्राची चांदणी तेजाने लुकलुकत होती. तिच्याच थोड्या अंतरावर लालसर-पिवळ्या रंगाची बारीक चंद्रकोर जणू आकाशाच्या कपाळावर रेखाटल्यासारखी उठून दिसत होती. समुद्रकिनाऱ्यालगत उभी असलेली ताड-माडाची झाडे मतलई वाऱ्याने डोलत होती. काही झाडे जमिनीकडे झुकल्यासारखी भासत होती, तर काही ताठ उभी असली तरी जमिनीवरून समुद्राकडे वाहणारे मतलई वारे त्यांचा ताठा कमी करत होते.
    पूर्व दिशेकडून सोनेरी किरणांवर स्वार होत सूर्यदेव अवतीर्ण झाले. मोपणवाराच्या किनाऱ्यावर सोनेरी प्रकाशाचे साम्राज्य पसरले. लाटांवर चमकणारी सूर्यकिरणे पाहून समुद्र जणू वितळलेल्या सोन्यासारखा भासत होता. किनाऱ्यावर बांधलेल्या होड्या हलक्या लाटांबरोबर डुलत होत्या. गावात दर्यावर्दी मच्छीमारांची लगबग सुरू झाली. कुणी जाळी तपासत होते, कुणी डिझेलच्या कॅनची व्यवस्था करत होते, तर कुणी बोटीत बर्फाच्या लाद्या चढवत होते. स्त्रियाही मागे नव्हत्या; कुणी नवऱ्यांच्या हातात चहाचे ग्लास देत होते, तर कुणी देवघरात नारळ ठेवून सुखरूप परतीसाठी प्रार्थना करत होते.

   पोटाची क्षुधा शांत करून सर्व जण कामाला सज्ज झाले होते; पण मन्या तांडेलच्या चेहऱ्यावर मात्र समाधान नव्हते. खूप दिवस झाले  बोटीच्या पागाला मनासारखे म्हावरं लागत नव्हते. मासळी कमी मिळत असल्याने बोटीच्या भागीदारांना समाधानकारक हिस्सा देता येत नव्हता. डिझेल, बर्फ, जाळीची दुरुस्ती,बोटीत गुंतवणूक करणाऱ्यांचे हिस्से, खलाश्यांचे हिस्से हे सर्व खर्च भागवताना मन्या तांडेलाची अक्षरशः कुतरओढ होत होती. दिवसेंदिवस वाढणाऱ्या खर्चाने आणि घटणाऱ्या उत्पन्नाने तो आतून पोखरला जात होता.

   शेवटी नाईलाजाने त्याने खोल समुद्रात जाण्याचा निर्णय घेतला. खोल समुद्र म्हणजे अधिक धोका, अधिक खर्च आणि जीवाची शाश्वती नाही परंतु अधिक मासळी गावन्याची जास्त शक्यता,म्हणून दुसरा कोणताही पर्यायही उरला नव्हता. कारण पर्ससीन जाळ्यांच्या मोठमोठ्या बोटी समुद्र अक्षरशः फावड्याने उपसल्यासारखी मासेमारी करत होत्या. त्यांच्या प्रचंड जाळ्यांमुळे छोट्या मच्छीमारांच्या वाट्याला फारच कमी मासळी उरत होती. शासन कितीही नियम करत असले तरी धनाढ्य पर्ससीन बोटीवाल्यांना कुणाची भीती उरली नव्हती. सामान्य मच्छीमारांच्या पोटावरच जणू गदा आली होती.

   मन्या तांडेल समुद्राकडे एकटक नजरेने पाहत उभा होता. त्याच्या डोळ्यांत चिंता स्पष्ट दिसत होती. खोल समुद्रात जाणे म्हणजे नशिबाशी आणि मृत्यूशी सामना करण्यासारखेच होते. समुद्र कधी मायेने कुशीत घेतो, तर कधी रौद्र रूप धारण करून सर्व काही हिरावून घेतो. याची त्याला पूर्ण जाणीव होती. म्हणूनच समुद्रात उतरण्यापूर्वी त्याने समुद्राचा मानाचा नारळ देवाचे नाव घेत वाढवला. नारळाचे पाणी वाळूत सांडले आणि उपस्थित सर्वांनी हात जोडून दर्यादेवाला मनोमन साकडे घातले, “दर्या राजा, आम्हाला सुखरूप परत आण.”

   त्याचवेळी आजूबाजूच्या सर्व बोटी पाण्यात उतरण्यास सज्ज झाल्या होत्या. कुठे इंजिनांचा घरघराट सुरू होता, तर कुठे खलाशी जाळी, दोरखंड आणि बर्फाच्या लाद्या नीट लावत होते. समुद्रकिनारा एका वेगळ्याच उत्साहाने आणि धावपळीने भरून गेला होता. दर्यावर्दी बांधव एकमेकांना जोरदार हाळी देत होते 

“हैssय्या… हो… हैssय्या…हो !”

   त्या हाळ्यांनी सारा किनारा दणाणून गेला. जणू त्या आवाजात समुद्राशी दोन हात करण्याची जिद्द आणि जगण्याची धडपड दडलेली होती. क्षणात एकामागून एक बोटी लाटांना चिरत समुद्राच्या दिशेने झेपावू लागल्या.

    मन्या तांडेलाची “शिवाई” बोट आज खोल समुद्रात जाणार असल्याने गणू सारंग व इतर खलाशी आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना बंदरावर निरोप द्यायला जमले होते. कुणाच्या हातात नारळ होता, कुणी ओवाळणीचे ताट आणले होते, तर काही वृद्ध स्त्रिया देवाचे नामस्मरण करत होत्या. लहान मुले अजूनही बाबांच्या हाताला घट्ट धरून उभी होती. त्यांना कदाचित एवढेच कळत होते की, बाबा पुन्हा कित्येक दिवस दिसणार नाहीत.

   जसा बोटीच्या इंजिनाने वेग घेतला, तसा किनाऱ्यावर उभ्या बायकापोरांचा बांध फुटला. त्यांच्या डोळ्यांतले अश्रू आवरत नव्हते. कुणी पदराने डोळे पुसत होते, तर कुणी दोन्ही हात जोडून देवाला साकडे घालत होते. समुद्रावर जाणाऱ्या प्रत्येक माणसाबरोबर त्यांचेही काळीज बोटीमध्ये बसले होते.

   बोट हळूहळू किनाऱ्यापासून दूर जाऊ लागली. लाटा उसळत होत्या, समुद्रावर सकाळचे सूर्यकिरण चमकत होते आणि त्या अथांग पाण्यात “शिवाई” बोट लहान होत चालली होती. किनाऱ्यावर उभ्या बायका आणि लेकरं हात उंचावत निरोप देत राहिली. बोट क्षितिजाच्या दिशेने दूर दूर जाऊ लागली, तशी ती माणसेही धूसर होत गेली; पण त्यांच्या नजरा मात्र शेवटपर्यंत त्या बोटीचा पाठलाग करत राहिल्या.

   समुद्रावर जाणाऱ्या प्रत्येक दर्यावर्दी माणसाच्या निरोपामागे अशीच एक निःशब्द भीती दडलेली असते  “तो सुखरूप परत येईल ना ?” मन्या तांडेलाची बोट डौलात समुद्राच्या लाटा चिरत पुढे सरकत होती. अनुकूल वारा असल्याने कमी इंधनात अधिक अंतर कापता येईल, असा त्यांचा अंदाज होता. त्यामुळे बोटीला चांगलाच वेग देण्यात आला होता. वेगामुळे बोट लाटांवर जोरात डचमळत होती. अजून ऊन डोक्यावर आले नव्हते. थोडे खोल पाण्यात पोहोचताच तांडेलने धाडी जाळे समुद्रात सोडण्याचा आदेश दिला. खलाशी लगबगीने कामाला लागले. जड जाळे सावधपणे पाण्यात उतरवले जात होते. समुद्राच्या लाटांवर  तरंगणाऱ्या त्या जाळ्याकडे सर्वांच्या आशेच्या नजरा लागल्या होत्या. पहाटे भरती ओसरल्यानंतर ते जाळे वर काढायचे ठरले होते.” हा त्या दिवसाचा समुद्रात पडणारा पहिलाच होता.

   अंगाची लाहीलाही करणारी दुपार आता ओसरत आली होती. दुपारच्या रणरणत्या उन्हामुळे काही खलाशी डेक सोडून व्हील हाऊसमध्ये जाऊन बसले होते, तर काहींनी थोडी वामकुशी घेतली होती. आता मात्र उन्हाचा तडाखा सौम्य झाला होता. समुद्रावरून वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे वातावरणात थोडासा गारवा जाणवू लागला तसतसे एकामागून एक सर्वजण पुन्हा व्हील हाऊसमधून बाहेर येत डेकवर जमा झाले.

   बोटीच्या डेकवर स्टोव पेटवण्यात आला. काळपट झालेल्या अँल्युमिनियमच्या पातेल्यात कडक, कोरा चहा उकळू लागला. चहाचा वास साऱ्या बोटीत दरवळला. समुद्राच्या मध्यभागी असा कडक चहा म्हणजे थकलेल्या अंगात पुन्हा प्राण फुंकणारा आधारच असतो. प्रत्येकाने गरमागरम चहाचे घोट घेतले आणि अंगात पुन्हा चेतना संचारल्यासारखे वाटले.

   चहा झाल्यावर काहींनी आपल्या पान-तंबाखूच्या चंच्या उघडल्या. कुणी चुना-कात लावून पानाचा विडा रंगवला, तर कुणी तंबाखूची मळी तळहातावर जोरजोरात चोळून गालफडात सणसणीत बार भरला. काही जण तांडेलाच्या खोलीजवळ बसून विड्या ओढत होते. समुद्रावरची दमट हवा असल्याने त्यांच्या विड्या सारख्या विझत होत्या आणि ते पुन्हा पुन्हा काडी पेटवत होते. धुराचे लोट हवेत मिसळून जात होते.

   मन्या तांडेल मात्र तंबाखूच्या बाबतीत निर्व्यसनी होता. ना पान, ना तंबाखू, ना विडी. त्याची एकच सवय होती  रात्रीच्या वेळी थकवा घालवण्यासाठी थोडीशी गावठी दारू. दिवसाचा सारा ताण, समुद्राची चिंता आणि जबाबदाऱ्यांचे ओझे विसरण्यासाठी तो तेवढाच आधार घेत असे. संध्याकाळ जवळ येत होती आणि खलाश्यांमध्ये रात्रीच्या स्वयंपाकाची तसेच पुढच्या पागाची तयारी सुरू झाली होती.

   भर समुद्रातील संधिप्रकाश हा जमिनीवरील संध्याकाळच्या संधीप्रकाशा पेक्षा खूप वेगळा असतो. जमिनीवरचा संधिप्रकाश हा  झाडाझुडपांत, डोंगरकपाऱ्यांत आणि घरांच्या आडोशाला हळूहळू रेंगाळत असतो पण समुद्राच्या मध्यभागी मात्र आकाशरूपी अथांग पडद्याकडे पाहतच उजेड, संधिप्रकाश आणि अंधार यांचा अद्भुत लपंडाव अनुभवावा मिळतो.

  क्षितिजावर पसरलेल्या लाल, केशरी, जांभळ्या आणि करड्या रंगांच्या छटा क्षणाक्षणाला बदलत असतात. समुद्राच्या लाटांवर त्या रंगांचे प्रतिबिंब पडून सारा दर्या जणू रंगांच्या खेळात न्हाऊन निघतो. काही काळ आकाशात निसर्गाचा हा देखणा खेळ रंगत राहतो आणि नकळत तो कधी संपतो हेही कळत नाही. मग जणू सिनेमा संपल्यावर थिएटरमध्ये अचानक अंधार पसरावा तशी विशाल, गूढ रात्र आ वासून समुद्रावर उभी ठाकते.रात्र झाल्यावर मन्या तांडेल सोबत बसून इतर खलाश्यांनी दारूचे दोन तीन पेज रिचवले तेव्हा दारू पिताना मन्या तांडेल खलाश्यांना म्हणाला “तुमाला खरास हंगतो मी, हकाळ पासून GPS बंद पडलो.पण अजून काय चालू नय जालो,जेवून झालंय की बघता” सर्व खलाशी म्हणाले “मन्या भाव,जेवून झालंय की पाहिला काम ते करा ना ss “

   लहान जाळे टाकून मिळालेल्या ताज्या मासळीचे कालवण भात आणि तळलेली कोळंबीचे जेवण लज्जतदार झाले होते. जेवताना हाताची बोट सुद्धा तोंडात जात होती कारण ताजी मासळी आणि घरच्या मसाल्यांने जेवणात रंगत आणली होती.जेवण आटोपल्यानंतर मन्या तांडेलाने दारूच्या सौम्य नशेत बोटीचा बंद पडलेला GPS सुरू करण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळपासून कितीही प्रयत्न केला तरी तो सुरू होत नव्हता. त्यामुळे मन्या तांडेलाच्या मनात अस्वस्थता होती. खोल समुद्रात GPS म्हणजे दिशादर्शक डोळाच असतो.

   त्याने पुन्हा एकदा बटण दाबले. काही क्षण स्क्रीन काळीच राहिली आणि अचानक त्या यंत्राच्या पडद्यावर प्रकाश उमटला. GPS सुरू झाला होता. स्क्रीनवर चमकणारे आकडे आणि दिशादर्शक चिन्हे पाहताच मन्या तांडेलाला थोडे बरे वाटले. त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे समाधान उमटले. जणू अंधारात हरवलेल्या माणसाला अचानक दूरवर दिवा दिसावा तसे त्याला वाटले.

  त्याचे ते समाधान क्षणिकच ठरले. GPS वर दिसणाऱ्या स्थानांकांकडे नजर जाताच त्याच्या छातीत धस्स झाले. आपली बोट GPS बंद पडल्याने भरकटून नकळत पाकिस्तानच्या सागरी हद्दी जवळील खोल पाण्यात पोहोचली होती. समुद्र शांत दिसत असला तरी त्या शांतते मागे  अदृश्य धोक्यांची चाहूल दडलेली होती.

वायरलेस सेटवर अधूनमधून तुटक आवाज घुमू लागले.

“ कराची पोर्ट..” आणि उर्दू मधील संभाषण 

   उर्दू मिश्रित ते अस्पष्ट आवाज रात्रीच्या शांततेत अधिकच भेसूर वाटत होते. मन्या तांडेल ते सर्व शब्द ऐकताच चपापला. त्याच्या डोक्यातील दारूची सौम्य नशा क्षणात खाडकन उतरली. त्याने घाईघाईने GPS कडे पुन्हा नजर टाकली. स्क्रीनवरील दिशा रेषा आणि आकडे आता त्याच्या डोळ्यांसमोर धूसर न राहता धोक्याची घंटाच वाजवत होते.

   क्षणभर त्याने समुद्राच्या काळ्याकुट्ट पाण्याकडे नजर फिरवली. दूरवर अंधारात एखाद्या बोटीचा मंद दिवा लुकलुकत होता पण ती कोणाची बोट होती,मित्र की शत्रू  ? याचा अंदाज येत नव्हता.मन्या तांडेलाने घाईघाईने सर्व खलाश्यांना जवळ बोलावले आणि GPS बंद पडल्यामुळे आपली बोट भरकटत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचल्याची जाणीव करून दिली. त्याचे शब्द ऐकताच सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. काही क्षणांपूर्वी अंगात असलेली दारूची नशा क्षणार्धात उतरली. थंडगार आणि वाहत्या वाऱ्यातही भीतीमुळे सर्वांच्या अंगातून दरदरून घाम फुटला. कुणी काळजीने समुद्राकडे पाहू लागले, तर कुणी निरभ्र आकाशाकडे.

   दरम्यान, दूरवर दिसणारा तो दिवा हळूहळू त्यांच्या दिशेने सरकत होता. जसजसे ते प्रकाशाचे ठिपके जवळ येऊ लागले, तसतसा बोटी वरील तणाव वाढत गेला. अचानक त्या समोरच्या बोटीवरून एक प्रखर सर्च लाईट त्यांच्या दिशेने झोत मारत पेटला. त्या तीव्र प्रकाशाने मन्या तांडेलाच्या बोटीवरील सर्वांची अक्षरशः दृष्टी दिपून गेली. काही क्षण तर कोणालाच समोर काही दिसेनासे झाले.

   तो प्रकाश एवढा प्रखर होता की समोरची बोट नेमकी कुणाची आहे, तिच्यावर किती माणसे आहेत किंवा कोण उभे आहे, हे काहीच स्पष्ट दिसत नव्हते. फक्त काळ्याकुट्ट समुद्रात पांढरा फटक प्रकाशाचा झोत आणि त्यात अडकलेली ‘शिवाई’ बोट, एवढेच चित्र आता त्यांच्या समोर होते.

   मन्या तांडेल आणि इतर सर्व खलाश्यांनी त्या प्रखर सर्चलाईटच्या पलीकडे कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. डोळ्यांवर हाताचा पंजा धरून त्यांनी समोर नजर रोखली. थोड्याच वेळात समोरच्या सफेद रंगाच्या बोटीवरील हिरव्या अक्षरांमध्ये लिहिलेले नाव स्पष्ट दिसू लागले  ‘Pakistan Maritime Security Agency’

   ते शब्द दिसताच मन्या तांडेलाच्या काळजात धस्स झाले. क्षणात त्याच्या लक्षात आले की, आपण पाकिस्तानी कोस्ट गार्डच्या चुंगुलात अडकलो आहोत. समोरच्या बोटीवरून उर्दूमधून जोरजोरात आदेश आणि शिव्यांची लाखोली सुरू होती. काही क्षणांतच ती बोट ‘शिवाई’ला खेटून उभी राहिली आणि आता समोरचे दृश्य स्पष्ट दिसू लागले.

  समोर उभे असलेले सैनिक पूर्ण शस्त्रसज्ज होते. त्यांच्या हातातील बंदुकांची नळी थेट मन्या तांडेल आणि खलाश्यांच्या दिशेने रोखलेली होती. जहाजाला लावलेल्या बोर्डिंग शिडीवरून आठ-दहा सैनिक वेगाने “शिवाई”च्या डेकवर उतरले. बोटीवर पाऊल ठेवताच त्यांनी सर्वांना हात वर करण्याचा आदेश दिला 

“हँड्स अप…!”

   घाबरलेल्या खलाश्यांनी क्षणात दोन्ही हात वर केले. प्रथम सर्वांची अंगझडती घेण्यात आली. त्यानंतर काही सैनिकांनी संपूर्ण बोटीची कसून तपासणी सुरू केली. जाळी, डिझेलचे कॅन, माशांचे होल्ड, तांडेलाची खोली सर्व काही तपासण्यात आले पण त्यांना काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही.

   तेवढ्यात एका अधिकाऱ्याने समुद्रात टाकलेला पाग वर काढण्याचा आदेश दिला. खलाशी भीतीने थरथरतच पाग ओढू लागले पण तो इतका जड झाला होता की पाच-सहा जणांनी मिळूनही तो सहज वर येत नव्हता. अखेर प्रचंड मेहनतीनंतर संपूर्ण पाग बोटीवर आला आणि ते दृश्य पाहून क्षणभर सर्वच थक्क झाले.

  खापरी पापलेट, कोळंबी, सुरमई, हलवा  अशी मोठमोठी मासळी जाळ्यात तडफडत होती. इतकी मासळी कधीच पागाला लागली नव्हती. संपूर्ण डेक मासळीने भरून गेला होता. त्या मासळीमध्ये दोन समुद्री सापही  वेटोळे घालून पडले होते. सैनिकांनी ती सर्व मासळी बोटीच्या होल्डमध्ये, बर्फामध्ये साठवून ठेवण्यास सांगितले.

भरकटलेली शिवाई

    त्यानंतर मन्या तांडेलाला ‘शिवाई’ बोट त्यांच्या जहाजाच्या मागोमाग चालवण्याचा आदेश देण्यात आला. सर्व खलाश्यांना एकत्र बसवण्यात आले आणि त्यांच्यावर नऊ सैनिक बंदुका रोखून उभे राहिले. समुद्राच्या काळ्याकुट्ट अंधारात आता “शिवाई” एका कैद्याप्रमाणे त्या जहाजाच्या मागे चालली होती.
   सुमारे दीड तासांच्या प्रवासानंतर दूरवर बंदराचे दिवे दिसू लागले. काही वेळातच त्यांची बोट कराची बंदरात पोहोचली. बंदरावर आधीच मोठी हालचाल सुरू होती. सर्व खलाश्यांना बोटीखाली उतरवण्यात आले आणि ‘शिवाई’जप्त करण्यात आली.
   त्यानंतर सर्वांना एका मोठ्या हॉलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांना गुडघ्यात बसण्याचा आदेश देण्यात आला. भीतीने आणि थकव्याने सर्वांची अवस्था बिकट झाली होती. तेवढ्यात कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकू लागले. मीडियाचे लोक कचकच आवाज करत फोटो काढत होते. उर्दू भाषेत एक कोस्टल ऑफिसर पत्रकारांना माहिती देत होता.
    त्या चमकणाऱ्या फ्लॅशलाईटमध्ये मन्या तांडेल आणि त्याचे खलाशी गुन्हेगारांसारखे बसवले गेले होते; पण त्यांच्या चेहऱ्यावर फक्त एकच प्रश्न होता  “आता पुढे काय?”
     चौकशी आणि छायाचित्रणाचा तो तमाशा संपताच सैनिकांनी सर्वांच्या डोक्यावर काळ्या रंगाच्या जाड कापडी पिशव्या चढवल्या. त्या काळ्या हुडमुळे कोण कुठे आहे, कुठे नेत आहेत, याचा काहीच अंदाज येत नव्हता. भीतीने काहींचे श्वास जोरात चालू होते, तर काही जण देवाचे नाव मनातल्या मनात घेत होते.
   बराच वेळ वाहनाचा आवाज, लोखंडी दरवाजे उघडझाप होण्याचे आवाज आणि उर्दूमधील आदेश ऐकू येत राहिले. अखेर जेव्हा त्यांच्या डोक्यावरील काळ्या पिशव्या काढण्यात आल्या, तेव्हा सर्वांच्या अंगावर काटा आला. ते एका तुरुंगातील लोखंडी सळ्यांमागे बंदिस्त होते. बाहेर दोन पोलिस बंदुका खांद्यावर टांगून पहारा देत उभे होते. दमट भिंती, कुबट वास आणि कैद्यांच्या दबक्या कुजबुजीने वातावरण अधिकच भयाण झाले होते.
   GPS दिवसभर बंद असल्याने ‘शिवाई’भरकटत सर क्रीक परिसरातील अस्पष्ट सागरी सीमेकडे पोहोचली होती. सर क्रीक हा समुद्री भाग वर्षानुवर्षे वादग्रस्त मानला जातो. समुद्रात कोणतीही स्पष्ट सीमारेषा नसल्याने अनेकदा भारतीय मच्छीमार नकळत पाकिस्तानी हद्दीत शिरतात, तर पाकिस्तानी कोस्ट गार्ड त्यांना ताब्यात घेऊन बेकायदेशीररीत्या सागरी सीमा ओलांडल्याचे गुन्हे दाखल करतात.
   अनेक भारतीय मच्छीमारांना अशा प्रकरणांत वर्षानुवर्षे पाकिस्तानातील तुरुंगांत शिक्षा भोगावी लागते. काही जण तर चाळीस-बेचाळीस महिन्यांहून अधिक काळही कैदेत राहतात. मलीर जेल सारख्या तुरुंगांमध्ये आजही अनेक मच्छीमार सुटकेच्या प्रतीक्षेत दिवस मोजत असतात. आजारपण, अपुरी वैद्यकीय सुविधा आणि मानसिक ताण यांमुळे काहींचा कैदेतच मृत्यूही होतो.


  कधी भारत-पाकिस्तानमधील राजनैतिक चर्चांमधून, तर कधी पकडलेल्या पाकिस्तानी मच्छीमारांच्या बदल्यात भारतीय मच्छीमारांची सुटका केली जाते. नशिबाने आणि सरकारी प्रयत्नांनी सुटका झाली तर हे मच्छीमार पुन्हा आपल्या मातीत परततात.अन्यथा काही वेळा पाकिस्तानकडून फक्त त्यांचे  मृतदेहच परत केले जातात.
   कराचीच्या 'मलीर' जेलच्या लोखंडी सळ्यांआड बसलेला मन्या तांडेल रात्री आकाशाकडे पाहत होता. त्या आकाशात त्याला मोपणवाराचा किनारा दिसत होता. बायकोचा ओला पदर, पोरांचे निरोप देणारे हात आणि समुद्र किनाऱ्यावर उभे राहून त्याच्या परतीची वाट पाहणारे डोळे दिसत होते.
   दिवसामागून दिवस जात होते. चौकशी, कैद, अनोळखी भाषा आणि सुटकेची अनिश्चित प्रतीक्षा  हेच त्यांचे जग झाले होते. तरीही प्रत्येक सकाळी जेलच्या गजांमधून दिसणाऱ्या सूर्यकडे पाहून मन्या स्वतःलाच एकच गोष्ट सांगत असे 
  “दर्या आपला आहे, तो एक दिवस आपल्याला परत आपल्या मातीत घेऊन जाईल..”
      काही महिन्यांनंतर भारत-पाकिस्तान दरम्यान मच्छीमारांच्या सुटके संदर्भात चर्चा सुरू झाली. एका पहाटे जेलच्या आवारात नावांची यादी वाचली गेली. त्या यादीत “मनोहर उर्फ मन्या तांडेल” हे नाव ऐकताच त्याच्या डोळ्यांत नकळत पाणी आले.
   वाघा सीमेजवळ भारताची माती पुन्हा पायाखाली लागताच मन्या तांडेल खाली वाकला दोन्ही हातांनी ती माती उचलून कपाळाला लावली. त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा त्याचा अथांग समुद्र उभा राहिला.

🔗 "वादळालाही वाकवणारी गलबतगाथा!”  समुद्रातील थरारक जीवनसंघर्ष | हृदयस्पर्शी मराठी कथा..

    “एक थरारक जीवन संघर्ष, जिथे प्रत्येक लाट मृत्यूशी झुंज देत होती..”
खाऱ्या समुद्राच्या अथांग पाण्यात, काळ्याकुट्ट वादळात आणि गर्जणाऱ्या लाटांमध्ये एक गलबत आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत होते. शिडांत भरलेला वारा, नांगराचा विश्वास आणि खलाशांची जिद्द यांची ही जिवंत गाथा तुम्हाला समुद्राच्या त्या भयाण दुनियेत घेऊन जाईल जिथे प्रत्येक क्षण हा जीवन आणि मृत्यूमधील संघर्ष होता.👉

टीप- सर्व इमेजेस AI निर्मिती आहेत 

आणणारी कथा. तहानेने व्याकूळ झालेल्या सुनीलने विहिरीचे पाणी प्यायल्यावर सुरू होतो एक भयानक अनुभव पण शेवटी धावजी बाबांच्या कृपेने संकटातून सुटका होते.Horror Story Marathi वाचल्यावर अंगावर भीतीचा शहारा नक्कीच येईल.पुढे वाचा..👉   

📖 🌐 भरकटलेली शिवाई’-पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा इतर भाषांमध्ये वाचा.. 


🌍 English

✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी

"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."

📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख

प्रत्येक कथा तुम्हाला एका नव्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाईल. रहस्य, भावना, इतिहास आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी सोबत नक्की जोडलेले रहा.

💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा.

👍 पुढील भाग वाचण्यासाठी ब्लॉगला Follow करा आणि ही कथा आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की Share करा.


तुमचे मत, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया नक्की कळवा.

धन्यवाद! 🙏

SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved

(ओमकार शिवलकर)

SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी - लोगो





📩 Subscribe करा

नवीन पोस्ट लगेच मिळवा!



𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...