'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी
शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले |
हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला
दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला |
🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”
‘भरकटलेली शिवाई’-पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..
समुद्राने मानवाला अन्न, व्यापार आणि उपजीविकेची साधने उपलब्ध करून दिली. मासे, मीठ, शिंपले, मोती तसेच सागरी मार्गांद्वारे होणारी देवाणघेवाण यांमुळे मानवी जीवन अधिक समृद्ध झाले. या गरजेतून मानवाने पाण्याशी मैत्री केली, पोहणे आणि समुद्रावर तरंगण्याचे कौशल्य आत्मसात केले. पुढे मानवी बुद्धिमत्तेच्या बळावर विविध प्रकारच्या होड्या, गलबते आणि नौका निर्माण झाल्या आणि त्यातून मच्छीमारी व सागरी वाहतुकीचा विकास झाला.
बोटीवरील कारभार सांभाळणाऱ्या प्रमुख व्यक्तीस “तांडेल” म्हटले जाई. तांडेल हा बोटीचा प्रमुख, मार्गदर्शक आणि निर्णय घेणारा मानला जात असे. त्याचबरोबर तो समुद्राचा अभ्यासक, हवामानाचा जाणकार तसेच संकटसमयी योग्य निर्णय घेणारा धाडसी अनुभवी नायकही असतो.त्याचा विश्वासू वरिष्ठ सहकारी म्हणजे “सारंग”. बोटीवरील खलाशी, माल, जाळी, दिशा आणि शिस्त यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सारंग पार पाडत असे. त्यामुळे तांडेल प्रमाणेच सारंगलाही मोठा मान आणि अधिकार प्राप्त असे. काही ठिकाणी “सारंग” हा शब्द जहाजावरील अनुभवी मार्गदर्शक किंवा प्रमुख सहाय्यक या अर्थानेही वापरला जात असे.
बोटीवरील सर्व मंडळींचे जीवन अत्यंत कष्टमय असते. समुद्राच्या मध्यभागी अनेक दिवस कुटुंबापासून दूर राहावे लागते. सतत हलणारी-डुलणारी बोट, वादळी लाटांचे तडाखे, जोरदार वारे, अंग करपवून टाकणारे उन्हे तसेच रात्रीची बोचरी थंडी अशा अनेक नैसर्गिक संकटांना तोंड देत त्यांना आपले दैनंदिन जीवन जगावे लागते. अशा प्रतिकूल परिस्थितीत झोप, जेवण आणि इतर दैनंदिन गरजा पूर्ण करणेही अत्यंत कष्टदायक ठरते.
खलाशी हा बोटीवरील हरकाम्या, कष्टकरी आणि विश्वासू मदतनीस असतो. जसे तांडेल आणि सारंग यांचे कार्य महत्त्वाचे मानले जाते, तसेच खलाश्याच्या कामालाही तितकेच महत्त्व असते. बोटीवरील अनेक कामांची जबाबदारी खलाशी पार पाडत असतो. समुद्री जीवनात प्रत्येक पावलावर धोका दडलेला असतो; तरीही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत चालावा यासाठी ते मृत्यूची पर्वा न करता समुद्रात उतरतात.
या निडर, मेहनती आणि काटक स्वभावाच्या तांडेल, सारंग व खलाश्यांमुळे मानवाचा समुद्राशी असलेला संबंध अधिक दृढ झाला. त्यांच्या धैर्य, अनुभव आणि अथक परिश्रमांमुळे सागरी जीवन, व्यापार आणि नौकानयनाची परंपरा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहिली. यांच्याशी संबंधित ही लघु कथा…
पोटाची क्षुधा शांत करून सर्व जण कामाला सज्ज झाले होते; पण मन्या तांडेलच्या चेहऱ्यावर मात्र समाधान नव्हते. खूप दिवस झाले बोटीच्या पागाला मनासारखे म्हावरं लागत नव्हते. मासळी कमी मिळत असल्याने बोटीच्या भागीदारांना समाधानकारक हिस्सा देता येत नव्हता. डिझेल, बर्फ, जाळीची दुरुस्ती,बोटीत गुंतवणूक करणाऱ्यांचे हिस्से, खलाश्यांचे हिस्से हे सर्व खर्च भागवताना मन्या तांडेलाची अक्षरशः कुतरओढ होत होती. दिवसेंदिवस वाढणाऱ्या खर्चाने आणि घटणाऱ्या उत्पन्नाने तो आतून पोखरला जात होता.
शेवटी नाईलाजाने त्याने खोल समुद्रात जाण्याचा निर्णय घेतला. खोल समुद्र म्हणजे अधिक धोका, अधिक खर्च आणि जीवाची शाश्वती नाही परंतु अधिक मासळी गावन्याची जास्त शक्यता,म्हणून दुसरा कोणताही पर्यायही उरला नव्हता. कारण पर्ससीन जाळ्यांच्या मोठमोठ्या बोटी समुद्र अक्षरशः फावड्याने उपसल्यासारखी मासेमारी करत होत्या. त्यांच्या प्रचंड जाळ्यांमुळे छोट्या मच्छीमारांच्या वाट्याला फारच कमी मासळी उरत होती. शासन कितीही नियम करत असले तरी धनाढ्य पर्ससीन बोटीवाल्यांना कुणाची भीती उरली नव्हती. सामान्य मच्छीमारांच्या पोटावरच जणू गदा आली होती.
मन्या तांडेल समुद्राकडे एकटक नजरेने पाहत उभा होता. त्याच्या डोळ्यांत चिंता स्पष्ट दिसत होती. खोल समुद्रात जाणे म्हणजे नशिबाशी आणि मृत्यूशी सामना करण्यासारखेच होते. समुद्र कधी मायेने कुशीत घेतो, तर कधी रौद्र रूप धारण करून सर्व काही हिरावून घेतो. याची त्याला पूर्ण जाणीव होती. म्हणूनच समुद्रात उतरण्यापूर्वी त्याने समुद्राचा मानाचा नारळ देवाचे नाव घेत वाढवला. नारळाचे पाणी वाळूत सांडले आणि उपस्थित सर्वांनी हात जोडून दर्यादेवाला मनोमन साकडे घातले, “दर्या राजा, आम्हाला सुखरूप परत आण.”
त्याचवेळी आजूबाजूच्या सर्व बोटी पाण्यात उतरण्यास सज्ज झाल्या होत्या. कुठे इंजिनांचा घरघराट सुरू होता, तर कुठे खलाशी जाळी, दोरखंड आणि बर्फाच्या लाद्या नीट लावत होते. समुद्रकिनारा एका वेगळ्याच उत्साहाने आणि धावपळीने भरून गेला होता. दर्यावर्दी बांधव एकमेकांना जोरदार हाळी देत होते
“हैssय्या… हो… हैssय्या…हो !”
त्या हाळ्यांनी सारा किनारा दणाणून गेला. जणू त्या आवाजात समुद्राशी दोन हात करण्याची जिद्द आणि जगण्याची धडपड दडलेली होती. क्षणात एकामागून एक बोटी लाटांना चिरत समुद्राच्या दिशेने झेपावू लागल्या.
जसा बोटीच्या इंजिनाने वेग घेतला, तसा किनाऱ्यावर उभ्या बायकापोरांचा बांध फुटला. त्यांच्या डोळ्यांतले अश्रू आवरत नव्हते. कुणी पदराने डोळे पुसत होते, तर कुणी दोन्ही हात जोडून देवाला साकडे घालत होते. समुद्रावर जाणाऱ्या प्रत्येक माणसाबरोबर त्यांचेही काळीज बोटीमध्ये बसले होते.
बोट हळूहळू किनाऱ्यापासून दूर जाऊ लागली. लाटा उसळत होत्या, समुद्रावर सकाळचे सूर्यकिरण चमकत होते आणि त्या अथांग पाण्यात “शिवाई” बोट लहान होत चालली होती. किनाऱ्यावर उभ्या बायका आणि लेकरं हात उंचावत निरोप देत राहिली. बोट क्षितिजाच्या दिशेने दूर दूर जाऊ लागली, तशी ती माणसेही धूसर होत गेली; पण त्यांच्या नजरा मात्र शेवटपर्यंत त्या बोटीचा पाठलाग करत राहिल्या.
समुद्रावर जाणाऱ्या प्रत्येक दर्यावर्दी माणसाच्या निरोपामागे अशीच एक निःशब्द भीती दडलेली असते “तो सुखरूप परत येईल ना ?” मन्या तांडेलाची बोट डौलात समुद्राच्या लाटा चिरत पुढे सरकत होती. अनुकूल वारा असल्याने कमी इंधनात अधिक अंतर कापता येईल, असा त्यांचा अंदाज होता. त्यामुळे बोटीला चांगलाच वेग देण्यात आला होता. वेगामुळे बोट लाटांवर जोरात डचमळत होती. अजून ऊन डोक्यावर आले नव्हते. थोडे खोल पाण्यात पोहोचताच तांडेलने धाडी जाळे समुद्रात सोडण्याचा आदेश दिला. खलाशी लगबगीने कामाला लागले. जड जाळे सावधपणे पाण्यात उतरवले जात होते. समुद्राच्या लाटांवर तरंगणाऱ्या त्या जाळ्याकडे सर्वांच्या आशेच्या नजरा लागल्या होत्या. पहाटे भरती ओसरल्यानंतर ते जाळे वर काढायचे ठरले होते.” हा त्या दिवसाचा समुद्रात पडणारा पहिलाच होता.
अंगाची लाहीलाही करणारी दुपार आता ओसरत आली होती. दुपारच्या रणरणत्या उन्हामुळे काही खलाशी डेक सोडून व्हील हाऊसमध्ये जाऊन बसले होते, तर काहींनी थोडी वामकुशी घेतली होती. आता मात्र उन्हाचा तडाखा सौम्य झाला होता. समुद्रावरून वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे वातावरणात थोडासा गारवा जाणवू लागला तसतसे एकामागून एक सर्वजण पुन्हा व्हील हाऊसमधून बाहेर येत डेकवर जमा झाले.
बोटीच्या डेकवर स्टोव पेटवण्यात आला. काळपट झालेल्या अँल्युमिनियमच्या पातेल्यात कडक, कोरा चहा उकळू लागला. चहाचा वास साऱ्या बोटीत दरवळला. समुद्राच्या मध्यभागी असा कडक चहा म्हणजे थकलेल्या अंगात पुन्हा प्राण फुंकणारा आधारच असतो. प्रत्येकाने गरमागरम चहाचे घोट घेतले आणि अंगात पुन्हा चेतना संचारल्यासारखे वाटले.
चहा झाल्यावर काहींनी आपल्या पान-तंबाखूच्या चंच्या उघडल्या. कुणी चुना-कात लावून पानाचा विडा रंगवला, तर कुणी तंबाखूची मळी तळहातावर जोरजोरात चोळून गालफडात सणसणीत बार भरला. काही जण तांडेलाच्या खोलीजवळ बसून विड्या ओढत होते. समुद्रावरची दमट हवा असल्याने त्यांच्या विड्या सारख्या विझत होत्या आणि ते पुन्हा पुन्हा काडी पेटवत होते. धुराचे लोट हवेत मिसळून जात होते.
मन्या तांडेल मात्र तंबाखूच्या बाबतीत निर्व्यसनी होता. ना पान, ना तंबाखू, ना विडी. त्याची एकच सवय होती रात्रीच्या वेळी थकवा घालवण्यासाठी थोडीशी गावठी दारू. दिवसाचा सारा ताण, समुद्राची चिंता आणि जबाबदाऱ्यांचे ओझे विसरण्यासाठी तो तेवढाच आधार घेत असे. संध्याकाळ जवळ येत होती आणि खलाश्यांमध्ये रात्रीच्या स्वयंपाकाची तसेच पुढच्या पागाची तयारी सुरू झाली होती.
भर समुद्रातील संधिप्रकाश हा जमिनीवरील संध्याकाळच्या संधीप्रकाशा पेक्षा खूप वेगळा असतो. जमिनीवरचा संधिप्रकाश हा झाडाझुडपांत, डोंगरकपाऱ्यांत आणि घरांच्या आडोशाला हळूहळू रेंगाळत असतो पण समुद्राच्या मध्यभागी मात्र आकाशरूपी अथांग पडद्याकडे पाहतच उजेड, संधिप्रकाश आणि अंधार यांचा अद्भुत लपंडाव अनुभवावा मिळतो.
क्षितिजावर पसरलेल्या लाल, केशरी, जांभळ्या आणि करड्या रंगांच्या छटा क्षणाक्षणाला बदलत असतात. समुद्राच्या लाटांवर त्या रंगांचे प्रतिबिंब पडून सारा दर्या जणू रंगांच्या खेळात न्हाऊन निघतो. काही काळ आकाशात निसर्गाचा हा देखणा खेळ रंगत राहतो आणि नकळत तो कधी संपतो हेही कळत नाही. मग जणू सिनेमा संपल्यावर थिएटरमध्ये अचानक अंधार पसरावा तशी विशाल, गूढ रात्र आ वासून समुद्रावर उभी ठाकते.रात्र झाल्यावर मन्या तांडेल सोबत बसून इतर खलाश्यांनी दारूचे दोन तीन पेज रिचवले तेव्हा दारू पिताना मन्या तांडेल खलाश्यांना म्हणाला “तुमाला खरास हंगतो मी, हकाळ पासून GPS बंद पडलो.पण अजून काय चालू नय जालो,जेवून झालंय की बघता” सर्व खलाशी म्हणाले “मन्या भाव,जेवून झालंय की पाहिला काम ते करा ना ss “
लहान जाळे टाकून मिळालेल्या ताज्या मासळीचे कालवण भात आणि तळलेली कोळंबीचे जेवण लज्जतदार झाले होते. जेवताना हाताची बोट सुद्धा तोंडात जात होती कारण ताजी मासळी आणि घरच्या मसाल्यांने जेवणात रंगत आणली होती.जेवण आटोपल्यानंतर मन्या तांडेलाने दारूच्या सौम्य नशेत बोटीचा बंद पडलेला GPS सुरू करण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळपासून कितीही प्रयत्न केला तरी तो सुरू होत नव्हता. त्यामुळे मन्या तांडेलाच्या मनात अस्वस्थता होती. खोल समुद्रात GPS म्हणजे दिशादर्शक डोळाच असतो.
त्याने पुन्हा एकदा बटण दाबले. काही क्षण स्क्रीन काळीच राहिली आणि अचानक त्या यंत्राच्या पडद्यावर प्रकाश उमटला. GPS सुरू झाला होता. स्क्रीनवर चमकणारे आकडे आणि दिशादर्शक चिन्हे पाहताच मन्या तांडेलाला थोडे बरे वाटले. त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे समाधान उमटले. जणू अंधारात हरवलेल्या माणसाला अचानक दूरवर दिवा दिसावा तसे त्याला वाटले.
त्याचे ते समाधान क्षणिकच ठरले. GPS वर दिसणाऱ्या स्थानांकांकडे नजर जाताच त्याच्या छातीत धस्स झाले. आपली बोट GPS बंद पडल्याने भरकटून नकळत पाकिस्तानच्या सागरी हद्दी जवळील खोल पाण्यात पोहोचली होती. समुद्र शांत दिसत असला तरी त्या शांतते मागे अदृश्य धोक्यांची चाहूल दडलेली होती.
वायरलेस सेटवर अधूनमधून तुटक आवाज घुमू लागले.
“ कराची पोर्ट..” आणि उर्दू मधील संभाषण
उर्दू मिश्रित ते अस्पष्ट आवाज रात्रीच्या शांततेत अधिकच भेसूर वाटत होते. मन्या तांडेल ते सर्व शब्द ऐकताच चपापला. त्याच्या डोक्यातील दारूची सौम्य नशा क्षणात खाडकन उतरली. त्याने घाईघाईने GPS कडे पुन्हा नजर टाकली. स्क्रीनवरील दिशा रेषा आणि आकडे आता त्याच्या डोळ्यांसमोर धूसर न राहता धोक्याची घंटाच वाजवत होते.
क्षणभर त्याने समुद्राच्या काळ्याकुट्ट पाण्याकडे नजर फिरवली. दूरवर अंधारात एखाद्या बोटीचा मंद दिवा लुकलुकत होता पण ती कोणाची बोट होती,मित्र की शत्रू ? याचा अंदाज येत नव्हता.मन्या तांडेलाने घाईघाईने सर्व खलाश्यांना जवळ बोलावले आणि GPS बंद पडल्यामुळे आपली बोट भरकटत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचल्याची जाणीव करून दिली. त्याचे शब्द ऐकताच सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. काही क्षणांपूर्वी अंगात असलेली दारूची नशा क्षणार्धात उतरली. थंडगार आणि वाहत्या वाऱ्यातही भीतीमुळे सर्वांच्या अंगातून दरदरून घाम फुटला. कुणी काळजीने समुद्राकडे पाहू लागले, तर कुणी निरभ्र आकाशाकडे.
दरम्यान, दूरवर दिसणारा तो दिवा हळूहळू त्यांच्या दिशेने सरकत होता. जसजसे ते प्रकाशाचे ठिपके जवळ येऊ लागले, तसतसा बोटी वरील तणाव वाढत गेला. अचानक त्या समोरच्या बोटीवरून एक प्रखर सर्च लाईट त्यांच्या दिशेने झोत मारत पेटला. त्या तीव्र प्रकाशाने मन्या तांडेलाच्या बोटीवरील सर्वांची अक्षरशः दृष्टी दिपून गेली. काही क्षण तर कोणालाच समोर काही दिसेनासे झाले.
तो प्रकाश एवढा प्रखर होता की समोरची बोट नेमकी कुणाची आहे, तिच्यावर किती माणसे आहेत किंवा कोण उभे आहे, हे काहीच स्पष्ट दिसत नव्हते. फक्त काळ्याकुट्ट समुद्रात पांढरा फटक प्रकाशाचा झोत आणि त्यात अडकलेली ‘शिवाई’ बोट, एवढेच चित्र आता त्यांच्या समोर होते.
मन्या तांडेल आणि इतर सर्व खलाश्यांनी त्या प्रखर सर्चलाईटच्या पलीकडे कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. डोळ्यांवर हाताचा पंजा धरून त्यांनी समोर नजर रोखली. थोड्याच वेळात समोरच्या सफेद रंगाच्या बोटीवरील हिरव्या अक्षरांमध्ये लिहिलेले नाव स्पष्ट दिसू लागले ‘Pakistan Maritime Security Agency’
ते शब्द दिसताच मन्या तांडेलाच्या काळजात धस्स झाले. क्षणात त्याच्या लक्षात आले की, आपण पाकिस्तानी कोस्ट गार्डच्या चुंगुलात अडकलो आहोत. समोरच्या बोटीवरून उर्दूमधून जोरजोरात आदेश आणि शिव्यांची लाखोली सुरू होती. काही क्षणांतच ती बोट ‘शिवाई’ला खेटून उभी राहिली आणि आता समोरचे दृश्य स्पष्ट दिसू लागले.
समोर उभे असलेले सैनिक पूर्ण शस्त्रसज्ज होते. त्यांच्या हातातील बंदुकांची नळी थेट मन्या तांडेल आणि खलाश्यांच्या दिशेने रोखलेली होती. जहाजाला लावलेल्या बोर्डिंग शिडीवरून आठ-दहा सैनिक वेगाने “शिवाई”च्या डेकवर उतरले. बोटीवर पाऊल ठेवताच त्यांनी सर्वांना हात वर करण्याचा आदेश दिला
“हँड्स अप…!”
घाबरलेल्या खलाश्यांनी क्षणात दोन्ही हात वर केले. प्रथम सर्वांची अंगझडती घेण्यात आली. त्यानंतर काही सैनिकांनी संपूर्ण बोटीची कसून तपासणी सुरू केली. जाळी, डिझेलचे कॅन, माशांचे होल्ड, तांडेलाची खोली सर्व काही तपासण्यात आले पण त्यांना काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही.
तेवढ्यात एका अधिकाऱ्याने समुद्रात टाकलेला पाग वर काढण्याचा आदेश दिला. खलाशी भीतीने थरथरतच पाग ओढू लागले पण तो इतका जड झाला होता की पाच-सहा जणांनी मिळूनही तो सहज वर येत नव्हता. अखेर प्रचंड मेहनतीनंतर संपूर्ण पाग बोटीवर आला आणि ते दृश्य पाहून क्षणभर सर्वच थक्क झाले.
खापरी पापलेट, कोळंबी, सुरमई, हलवा अशी मोठमोठी मासळी जाळ्यात तडफडत होती. इतकी मासळी कधीच पागाला लागली नव्हती. संपूर्ण डेक मासळीने भरून गेला होता. त्या मासळीमध्ये दोन समुद्री सापही वेटोळे घालून पडले होते. सैनिकांनी ती सर्व मासळी बोटीच्या होल्डमध्ये, बर्फामध्ये साठवून ठेवण्यास सांगितले.
🔗 "वादळालाही वाकवणारी गलबतगाथा!” समुद्रातील थरारक जीवनसंघर्ष | हृदयस्पर्शी मराठी कथा..
“एक थरारक जीवन संघर्ष, जिथे प्रत्येक लाट मृत्यूशी झुंज देत होती..”खाऱ्या समुद्राच्या अथांग पाण्यात, काळ्याकुट्ट वादळात आणि गर्जणाऱ्या लाटांमध्ये एक गलबत आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत होते. शिडांत भरलेला वारा, नांगराचा विश्वास आणि खलाशांची जिद्द यांची ही जिवंत गाथा तुम्हाला समुद्राच्या त्या भयाण दुनियेत घेऊन जाईल जिथे प्रत्येक क्षण हा जीवन आणि मृत्यूमधील संघर्ष होता.👉
टीप- सर्व इमेजेस AI निर्मिती आहेत
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
📩 Subscribe करा
𝕏 Follow on X
📸 Follow on Instagram
📘 Follow on Facebook




Thrilling story
उत्तर द्याहटवाTHANX !
उत्तर द्याहटवाअतिशय सुरेख कथा
उत्तर द्याहटवाखुप खूप धन्यवाद !
उत्तर द्याहटवाअगदी थरारक प्रसंग! वाचताना अंगावर काटा येतो.
उत्तर द्याहटवा